गाण्यांशी निगडीत आठवणी

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
31 Dec 2007 - 1:04 am

आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे. अर्थात किशोर कुमार सोबत इतर लोकांचाही आवाज असल्याने ते लगेच लक्षात येते. (आठवले, तीन देवियां सिनेमातील हे गाणे.)
दहावीत (बहुधा ११ वीत ) असतानाची गोष्ट. मला ताप आला होता. त्यामुळे मी झोपलो होतो. मध्येच जाग आल्यावर पाहिले तर मी खोलीत एकटाच होतो. रात्री ११च्या नंतर बेला के फूल मध्ये हे गाणे सुरू होते. ते गाणे ऐकताना एकदम ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे आता कधी ही हे गाणे ऐकले की एकदम फ्रेश्श वाटते ;)
(आताही हे लिहिता लिहिता मागे गाणे ही सुरू ठेवले आहे :) )

घूंघट की आड से..
आमिर खान, जुही चावलाचे हे गाणे ऐकायला मस्तच आहे. त्यातील शब्दही छान आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या लहानपणीचा सार्वजनिक गणपती समारंभ आठवतो. ज्यात कॉलनीतील एका मुलाने व त्याच्या घरी आलेल्या एका मुलीने ह्या गाण्यावर नाच केला होता.
ह्या सोबतच तम्मा तम्मा लोगे (थानेदार) तसेच आशिकी मधील गाणी ऐकली की तेच सर्व गणपतीचे दिवस आठवतात, ज्यात दिवसभर ही गाणी सुरू असायची. तम्मा तम्मा लोगे वर तर मनात येईल तसा नाच केला होता.

फरेब मधील ओ हमसफर हे गाणे ऐकले की महाविद्यालयातील दुसरे वर्ष आठवते. आणि बाहेर पाऊस पडत आहे असेच वाटते. ह्याचे कारण हे की ही गाणी जेव्हा चालत होती तेव्हा पावसाळा होता आणि माझ्या बाजूच्या खोलीतील मुले हीच गाणी लावून ठेवत होती.

यह जो थोडे से है पैसे, मुझसे नाराज हो तो.. पापा कहते हैं मधील ही गाणी ऐकली की परीक्षेच्या आधी दिलेल्या सुट्ट्या आठवतात. अर्थात त्या सुट्ट्या अभ्यासाकरीता होत्या पण त्यात गाणी ऐकणे, सिनेमे पाहणे हे थोडेच थांबते. :)

अश्विनी ये ना..
गंमत जंमत मधील हे गाणे ऐकले की आधी किशोर कुमारची गाण्याची पद्धत, जी दूरदर्शन वर दाखविण्यात आली होती, आठवत होती तसेच त्यातील अशोक सराफ ची जी बायको दाखविली आहे (चारूशिला साबळे) तिचे झाडू घेऊन नाचणे आठवायचे. पण कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिले आमचे एक सर प्रत्येक वार्षिक समारंभाला हे गाणे गायचे, आणि त्यांच्या शाखेच्या फ्रेशर पार्टीलाही. त्यामुळे आता कधीही हे गाणे ऐकले की कॉलेजचे ते समारंभ आठवतात.

ॐकार स्वरूपा..
कॉलेज मधील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ह्याच गाण्याने व्हायची (आताही होत असेल). त्यामुळे हे गाणे ऐकले की मग ते समारंभ आठवणे आलेच.

मैं हूं झूम झूम झूमरू..
लहानपणी गणपतीतील अंताक्षरीच्या निवडफेरीत मी हे गाणे फक्त सुरुवातीच्या संगीतावरून ओळखून म्हटले होते. त्यामुळे अंताक्षरीत मी निवडला जाण्यास फायदा झाला होता. :)
तसेच कार्यालयाच्या सेमिनार वजा सहलीत औरंगाबादला असताना अजिंठा लेण्यात जाताना बसमध्ये हे गाणे गायलो होतो.
हे दोन प्रसंग ह्या गाण्याशी निगडीत राहतील असे वाटते.

ताक धिना धिन ताक धिना धिन...
रखवाला सिनेमातील हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे. मी नेहमी गुणगुणत असे. शाळेत मग आमच्या वर्गात एक दोन वेळा मला गायलाही सांगितले होते. एकदा तर काय झाले की, आमच्या वर्गात दुसऱ्या वर्गातील मुलगा येऊन आमच्या टीचरला म्हणाला की मला त्यांच्या वर्गात बोलावले आहे. माझ्या टिचर ने मला पाठवले. तिकडे गेल्यावर कळले की त्यांच्या वर्गात अभ्यास संपला होता. मग मनोरंजन करण्याकरीता मला गाणे गायला सांगितले. तेव्हाही मी हेच गाणे गायलो होतो. आता ती
इयत्ता/साल आठवत नाही, पण हे गाणे ऐकले की तो प्रसंग नक्की आठवतो.

अरे हो,
प्यार हमें किस मोड पे ले आया..
सत्ते पे सत्ता चे हे गाणे तर राहिलेच. बंगळूरच्या ऑफिसच्या सहलीत सकाळी एका ठिकाणाहून परत येताना हे गाणे गाऊन मी धमाल केली होती. त्याच दिवशी मग संध्याकाळी बंगळूरला परत येताना ३ बस पैकी कोणत्या बसमध्ये बसावे हे विचार चक्र चालू असताना मित्रासोबत बसलो होतो. तेव्हा सकाळी आम्ही फिरायला गेलेल्या गटातील एक मुलगा मला शोधत आला व त्यांच्या बसमध्ये घेऊन गेला. तिथे तर मग काय हे गाणे, आणखी भरपूर धमाल गाणी गात, खेळ खेळत आम्ही परतीचा प्रवास केला होता.

छैया छैया
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास सर्व खोल्यांत हेच गाणे वाजविले जात होते. एवढा वैताग आला होता की मी माझ्या २/३ मित्रांना तर सांगितले होते की माझ्यासमोर हे गाणे लावायचे नाही. त्यांनी तर एकदा मग गंमत केली. मी एकाच्या खोलीत गेलो असताना मुद्दाम हे गाणे लावले व दुसऱ्या मित्राला जाऊन सांगितले की मी हे गाणे लावायला सांगितले. काय रागावला होता मग तो माझ्यावर. अर्थात मग नंतर ते आम्ही निकालात काढले होते.

आणखी ही गाणी आहेत, काही सध्या आठवत नाहीत.

तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का?

कलानृत्यसंगीतजीवनमानमौजमजाचित्रपटप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

31 Dec 2007 - 2:07 am | विसोबा खेचर

देवदत्तराव, तुमचा लेख छान आहे आणि सांगितलेल्या आठवणीही छान आहेत!

तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का?

हो, अगदी भरपूर आठवणी आहेत!

'सालस' ही आमची एकेकाळची प्रेयसी! तिचं-आमचं जमत असतानाची गोष्ट. भर पावसाळ्यात हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी (सांगून विश्वास बसणार नाही, परंतु होय, आता आम्ही अंमळ स्थूल आहोत परंतु कॉलेज जीवनात बर्‍यापैकी आकारात होतो, भरपूर व्यायामबियाम करायचो आणि तेव्हा मित्रमैत्रिणींच्या सोबत बरेचसे गडकिल्ले चढलो-उतरलो आहोत!) पावसाळी कुंद वातवरणात गरमगरम चाय पितांना वॉकमनवर लावलेलं 'दिवाना हुआ बादल' हे गाणं आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं होतं! आम्हा दोघांना जरा निवांतपणा मिळावा म्हणून एका झोपडीवजा आडोश्याला आमच्या इतर मित्रमंडळींनी आम्हाला दोघांना जरा चहा पिण्याकरता (!) मोकळं सोडलं होतं!

तेव्हा त्या रसरशीत पोरीचा आम्ही हळूच एक मुकाही घेतला होता! साला आयुष्यातला पहिलावहिला मुका! आणि त्याच्याशी निगडीत 'दिवाना हुआ बादल' हे गाणं!

अब क्या बताऊ आपको देवदत्तराव! जाने दो....!

कालांतरानं नशीबाची दानं आमच्या बाजूने पडली नाहीत आणि सालस आम्हाला दुरावली! अगदी कायमची... परंतु आजही 'दिवाना हुआ बादल' हे गाणं लागलं की आम्ही जेव्हा 'दिवाना हुआ तात्या' या वयाचे होतो तेव्हाचे दिवस आठवतात! :)

अवांतर -

सालसची आणि आमची प्रेमकहाणी आम्ही मनोगतावर लिहायला घेतली होती आणि तिला मनोगती मंडळींचा अक्षरश: अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता! कालांतराने मनोगत सुटलं आणि सालसची कहाणी लेखनातही अधूरीच राहिली! आता पुन्हा ती कहाणी कुठेच लिहिणं होणार नाही. मनोगताशिवाय आम्ही ती इतरत्र कुठेही लिहू शकत नाही/लिहिणार नाही! आपली इच्छा असल्यास ती अधुरी कहाणी इथे वाचा!

(हे लेखन आमच्या ब्लॉगावर ड्राफ्ट स्वरुपात सेव्ह केले होते ते आज अचानक निमित्त मिळालं म्हणून प्रकाशित करत आहे!)

देवदत्तराव, अजूनही अशी अनेक गाणी आहेत ज्यांच्यासोबत आमच्या सुखदु:खाच्या अनेक आठवणी कायमच्या जोडल्या गेलेल्या आहेत! असो...

छ्या! देवदत्तराव, वर्षाअखेरीस तुम्ही सालसची आठवण करून द्यायला नको होतीत! चुकलंच तुमचं!....

आपला,
(दिवाना आणि हळवा!) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jan 2008 - 12:59 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या, तुमच्या सालसला तुम्हीच काय पण आम्ही पण विसरणार नाही. पुढच्या भागांची सगळेच वाट बघत होते. पण.... जाऊ द्या झालं... पण एक विनंति आहे, पुढचे भाग येऊ द्या. बर्‍याच दिवसात तुमचे काही नविन नाही.

बिपिन.

देवदत्त's picture

1 Jan 2008 - 2:46 pm | देवदत्त

तात्या,
आपली आठवण लिहिल्याबद्दल धन्यवाद.
तुमची ती कहाणी मी वाचेन लवकरच.

छ्या! देवदत्तराव, वर्षाअखेरीस तुम्ही सालसची आठवण करून द्यायला नको होतीत! चुकलंच तुमचं!....
उम्म्म... थोडं फार चुकलंच. :)
पण वर्ष अखेरीस चालेल हो. नवीन वर्षात पुढे मग विसरून जायचं. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jan 2008 - 1:21 am | बिपिन कार्यकर्ते

तशी आवडलेली, वेड लावलेली गाणी बरीच आहेत... पण सर्वात जुनी आठवण...

मी ५-६ वर्षांचा असेन. आमच्या शेजारी एक डॉक्टर राहतात. त्यांच्या कडे त्या वेळी एक 'रेडिओग्राम' होता (म्हणजे त्या वेळचा २-ईन-१. त्याच्यात एका बाजूला रेकॉर्ड प्लेयर असायचा आणि एका बाजूला रेडिओ). त्या तबकडीवर ऐकलेले पहिले गाणे... 'अनाडी' मधले नूतन आणि राज कपूर वर चित्रित झालेले 'वोह चाँद खिला, ये तारे हसीं...' हे गाणे. विशेषतः त्यातला 'अकॉर्डियन' चा पीस. अंगावर काटा आल्याचीही तीच पहिली आठवण.

तिथेच आणि त्याच वयात ऐकलेले दुसरे गाणे, पं. भीमसेन जोशींचे 'मन हे राम रंगी रंगले..' हे भजन. आजतागायत तो आवाज विसरू शकलेलो नाही.

हे दोन्ही प्रसंग माझ्या आठवणीत स्पष्ट कोरलेले आहेत. आजही नुसते डोळे मिटले तरी ते दोन्ही प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. फोटोग्राफिक मेमरी म्हणतात तसे.

http://www.youtube.com/watch?v=DCKCUkXBS44

बिपिन.

देवदत्त's picture

1 Jan 2008 - 2:53 pm | देवदत्त

गेले कित्येक महिने असला लेख लिहायचे मनात होते. निदान स्वतःच्या आठवणींकरीताही.

आताच विविध भारती वर ऐकले की त्यांनी ३ जानेवारीच्या कार्यक्रमात श्रोत्यांना त्यांच्या गाण्याशी जोडलेल्या आठवणी सांगण्यास विचारले आहे.

एकाच वेळी दोन्हींकडून हे व्हावे हा योगायोग म्हणावा का?

(नाहीऽऽऽऽऽऽ.. मी त्यांची कल्पना चोरलेली नाही. नाहीऽऽऽऽऽऽ.. :D )

प्रमोद देव's picture

1 Jan 2008 - 9:01 pm | प्रमोद देव

गाण्यांच्या आठवणी किंवा असे म्हणा "आठवणीतील गाणी" असा एक कार्यक्रम गेले वर्षभर मी आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर(आधीची मुंबई 'ब') ऐकत आलोय.

१)शाळेत आमच्या वर्गात एक नवी मुलगी आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला तिला बाईंनी गाणे म्हणायला सांगितले. तिने म्हटलेले गाणे माझेही आवडते होते. मात्र मी ते कधीच म्हणत नसे कारण ते माणिक वर्मांनी गायलेले असल्यामुळे साहजिकच ते एका स्त्रीचे गाणे आहे असे मी समजत असे. असो. तर गंमत ही की तिने नेमके तेच गाणे गायले. त्याचे शब्द होते "क्षणभर उघड नयन देवा" आणि हे ऐकताच सगळ्या वर्गाने माझ्याकडे हसत हसत माझ्याकडे दृष्टी वळवली. त्यावेळी मी डोळे मिटून ते गाणे ऐकत होतो. :-)
२) आमच्या घरी जेव्हा पहिला ट्रान्झिस्टर रेडिओ आणला तेव्हा तो सुरु केल्या केल्या जे पहिले गाणे लागले ते होते "सुलताना सुलताना काहे घबराना(असेच काहीसे होते.)".
पुढचे आठवत नाही.
३)तेरी प्यारी प्यारी सुरतको बद्दलची आठवण इथे वाचा.

नंदन's picture

2 Jan 2008 - 4:34 am | नंदन

कहीं ये वोह तो नहीं? :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्रमोद देव's picture

2 Jan 2008 - 8:34 am | प्रमोद देव

वोईच है ये! शुक्रिया नंदनमियाँ!

मुक्तसुनीत's picture

2 Jan 2008 - 3:17 am | मुक्तसुनीत

मला हा लेख आणि ही संकल्पनाच खूप आवडली. प्रत्येक गाण्याबरोबर एकेक आठवण ही आहेच. मग ते गाणे "बेदर्दी बालमा तुझको" असो किंवा "दर्द्-ए-डिस्को" असो. आपल्या जडणघडणीत , आयुष्याच्या प्रवासामध्ये ऐकलेल्या गाण्यांचा एक फार मोठा हिस्सा आहे. कणेकरांनी एके ठिकाणी म्हण्टले आहे , आमची पिढी रेशनच्या तांदूळांवर , डालडाच्या तूपावर आणि शंकर-जयकिशनच्या गाण्यांवर वाढली. तपशील बदलले तर प्रत्येकाचे हे वाक्य होईल. आजही कुणी आजोबा सैगलच्या आठवणीत रमतात, तलतच्या नावाने कुणाला हुंदका येतो आणि कुणाच्या नातवा-पणतवाचे (!) "शारुक् खान्" च्या "दर्दे डीस्को "शिवाय जेवण पूर्ण होत नाही. संगीताशिवाय आपण कधीच नव्हतो आणि नाही. अगदी मारकुट्या मास्तरांचे , तिरसट काकांचे , खाष्ट सासूचे "स्वतःचे" असे एखादे गाणे असतेच. वर्षांमागून वर्षे जातात , प्रस्तराचे एकमेकांवर जसे थर जमत जातात तसे , आपल्यावरूनसुद्धा काळानुसार बदलत्या संगीताचे थर जमतात. बेगान्या देशात आयुष्य काढताना , आप्तस्वकीयांपासून तात्पुरते किंवा कायमचे दूर असताना उब असते कधीकाळी ऐकलेल्या , प्रेम केलेल्या गाण्यांची.

कितीतरी गाण्यांच्या कितीतरी आठवणी आहेत. कायकाय सांगायच्या ? एकेक गायक , एकेक संगीतकार , एकेक गीतकार खजिनेच्या खजिने ठेऊन काळाच्या पडद्याआड गेले आहेत. कितीतरी ख्याल गायकाना बैठकीत ऐकले , काही गझलनवाझांच्या मैफली अगदी काही फूटांवरून ऐकल्या. कितीतरी रात्री रंगल्या. कितीतरी प्रवास , कितीतरी गप्पा गाणी, गायक , संगीत, गीतकार , आणि त्यांची सृष्टी यांच्या सहवासात गेले आहेत.

शेवटी, हरिवंशराय बच्चन यांचे आत्मचरित्राचे शीर्षक आठवते : "क्या भुलूं , क्या याद करूं ! "

डॉ.प्रसाद दाढे's picture

2 Jan 2008 - 9:22 am | डॉ.प्रसाद दाढे

मी एक गाण॑ शोधतो आहे लहानपणी छायागीतमध्ये ऐकलेल॑, त्यात किशोरकुमार आणि माला सिन्हा आहेत्.'आरारारारा तोड ना दिल बेकरार का..' असे काहीसेसे त्याचे शब्द होते.फार मस्त गाणे होते.त्यात शेवटी माला सिन्हा इतकी फाकडू लाजते की वाह! कोणीतरी प्लीज पिक्चरचे नाव सा॑गा.

चतुरंग's picture

9 Jan 2008 - 1:27 am | चतुरंग

'बाँबे का चोर' असावा. रवीचं संगीत आहे.
चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jan 2008 - 10:15 am | llपुण्याचे पेशवेll

मी ६वीत असेन तेव्हा. संध्या़काळी शाळेतून घरी आलो आणि गाणे रेडीओवर चालू होते
'छेडीती पानात बीन थेंब पावसाचे ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात'
काहीही अर्थबोध झाला नाही.
मग काही वर्षे गेली . मी कोकणात माझ्या गावी गेलो होतो. उन्हाळा होता. आणि वळवाची एक सर येऊन गेली व परत ऊन आले. आलेले ढग थोडे पुढे गेले. मी घरातून बाहेर आलो. आणि जे काही दृश्य दिसले त्याने मला वरील ओळींची अनूभूती दिली. आजूबाजूला गळणार्‍या थेंबांनी मला ''छेडीती पानात बीन'' म्हणजे नेमके काय याची अनुभूती दिली आणि त्यानंतर मी गाणे खरे रसिकतेने ऐकू लागलो. या घटनेला मी माझा पुनर्जन्म समजतो. कारण त्या घटनेने मला रसिकतेची देणगी दिली.
पुण्याचे पेशवे

झंप्या's picture

12 Jan 2008 - 7:23 am | झंप्या

दत्त्या, सही विषय रे!!
मलापण सत्या मधले 'गोली मार भेजेमे' ऐकले की आमच्या गँगजी आठवण येते बघ!
-सबका डॉन एक

सुधीर कांदळकर's picture

13 Jan 2008 - 6:57 pm | सुधीर कांदळकर

यूं शरमाया.
रुपारेल कॉलेज, मुंबई च्या वार्षिक सोहळ्यात फिशपाँडचा कार्यक्रम चालू होता. प्र. रा. वि. सोवनी सुप्रसिद्ध विद्नानलेखक आमचे आवडते प्रा तेव्हा अँकरिंग करीत. त्यांनी एका ब्यूटी क्वीनला रंगमंचावर बोलाविले. तिला फिशपाँड आला होता. ती रूपगर्विता ताबडतोब मंचावर गेली. मग प्रा. नी फिशपाँड गाऊन दाखविला.
चांद सा मुखडा क्यूं शरमाया .......
अरे हट. तुझे एप्रिल फूल बनाया.

इनोबा म्हणे's picture

14 Jan 2008 - 6:34 pm | इनोबा म्हणे

शाहिर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारीत "माझी मैना गावाकडं राह्यली,माझ्या जिवाची होतीया काह्यली" हे गाणे कोणाकडे आहे का?किंवा ते कुठे मिळेल?(अल्बमची माहीती वगैरे...