काय पाहायचं कळेना? हे पाहा (१) - वाईल्ड वाईल्ड कंट्री

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
31 May 2021 - 2:54 pm

.

कटाक्ष-
नेटफ्लिक्स
माहितीपर
सहा भागांची लघू-मालिका.
एकूण वेळ - ६ तास ४३ मिनिटे
भाषा- इंग्रजी, हिंदी (परभाषीकरण अर्थात डबिंग)

ओळख-

नेटफ्लिक्स ची 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' ही मालिका स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रजनीश तथा ओशो च्या कारकीर्दीवर आधारित एक सत्यकथा आहे. पुण्यातील रजनीश आश्रम सोडून अमेरिकेतील ओरेगोन राज्यात जवळपास 80 हजार एकर जमीन खरेदी करून तेथे उभारलेल्या अत्याधुनिक 'रजनीशपुरम' या शहराभोवती ही मालिका फिरते. १७ रोल्स रॉयसचा मालक असणारा रजनीश अमेरिकेतील पहिली जवळपास साडेतीन वर्षे सार्वजनिक जीवनापासून दूर असताना ओसाड जागेवर स्वतःचे विमानतळ, स्वतःची पोलीस यंत्रणा असणारे सुसज्ज शहर उभी करणारी ओशोची सचिव 'मा आनंद शीला' ही या मालिकेच्या (आणि रजनीशच्या आयुष्यातही) पूर्वार्धातील प्रमुख पात्र आहे. अमेरिकी संविधानातल्या तरतुदी अक्षरशः नागड्या करून धर्माच्या नावाखाली स्वतःचे सत्ताकेंद्र उभारणाऱ्या ‌‌‌‌‌‌शीला आणि रजनीशच्या बुद्धीला सलाम करण्याची प्रेरणा व्हावी एवढ्या अतर्क्य प्रकारे रजनीशपुरम वसवले गेले होते.

'वाईल्ड वाईल्ड कंट्री' ही मालिका मुळात उपलब्ध माहितीचे कलात्मक प्रसारण नसून रजनीशच्या भरभराटीच्या काळातील (१९६०-८५) मुळ चित्रफितींचे अप्रतिम संपादन आहे. त्यामुळे साडे सहा तासांच्या मालिकेतील जवळपास चार एक तासांचे चित्रण हे त्या काळातील मूळ चित्रफिती आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची महती नेमकेपणाने उमगलेल्या रजनीशची ही कमाल! स्वत:च्या जवळपास सर्व सार्वजनिक कृत्यांचे ध्वनिचित्रमुद्रण करणारी यंत्रणा ओशोजवळ होती. कदाचित हीच कहाणी आता नेपथ्य उभारून सत्याचा अजिबात अपलाप न करता सादर करण्यात आली असती तर तिच्यावर अनेकांचा विश्वास बसला नसता अशा करामती रजनीशी भक्तांनी अमेरिकेत प्रत्यक्षात आणल्या होत्या. परंतु अमेरिकी वृत्तवाहिन्यांच्या आणि रजनीशपुरम मधील तेव्हाच्या मुळ चित्रफितींमुळे यावर विश्वास ठेवणे अपरिहार्य होऊन जाते.

मालिकेत मध्येमध्ये ओशोच्या विचार प्रणालीची ओळख करून देण्यात आली असली तरी ती चूक की बरोबर यावर टिप्पणी करायचे टाळून केवळ प्रत्यक्षात भौतिक जगातील ओशोच्या कर्माचा लेखाजोखा मांडला आहे. आधी रजनीशच्या 'प्रेमात' आकंठ बुडालेली शीला आयुष्याच्या उत्तरार्धात रजनीश‌ करिता काही 'दशलक्ष डॉलर्स ची लूट करून गेलेली एक वेश्या' कशी होते, या १८० अंशातील प्रवासाचा वेग धक्कादायक आहे. रजनीशपुरमच्या स्थापनेत आणि वाढीत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या ओशोच्या सध्या हयात सहकाऱ्यांच्या मुलाखतींनी मालिकेत एक रंगत आणली आहे. सध्या स्वित्झर्लंडच्या बेसल शहरात राहणारी मा आनंद शीला आपल्या मुलाखतीत तिच्या आक्रमक आणि क्रुर स्वभावाची झलक दाखवतेच.

मालिकेच्या शेवटाकडे रजनीशपुरम च्या विरोधातील स्थानिकांच्या लढ्याचे निर्णायक वळण, ओशोच्या अंतर्गत वर्तुळात दोन प्रभाव क्षेत्रे निर्माण होणे, मा आनंद शीलाची एक कुटील चाल आणि आणि अमेरिकी तपास यंत्रणांना हुलकावणी देण्यासाठी ओशोचा जवळपास यशस्वी झालेला एक हवाई डाव या सर्वांमुळे हा माहितीपट कुठल्याही थरारक चित्रपटापेक्षा कमी रंजक नाही.

मालिकेनंतरची शिल्लक-
असत्य आणि अप्रामाणिकपणा वर आधारित धार्मिक आणि राजकीय कारकीर्द यांचा अंत कशा प्रकारे होतो हे मानवजातीला नवीन नाही. हिटलर ने एकूण किती ज्यू मारले यापेक्षा त्यावेळी इतर जर्मनांना ज्यू मारणे अत्यावश्यक का वाटले हे समजून घेणे हा इतिहास असतो. कुणा गुरुने स्वर्णिम भविष्याचे स्वप्न दाखवून हजारो मानवांना त्यांच्या नकळत दास बनवणे हे एकाच वेळी मानवाच्या अद्भुत बौद्धिक क्षमतेचे आणि त्याच बुद्धीच्या क्षणिक ठिसूळतेचे निदर्शक आहे, हाच या‌ 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' चा धडा.

धर्मसमाजजीवनमानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणचित्रपटआस्वादसमीक्षाशिफारस

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

31 May 2021 - 3:24 pm | गॉडजिला

बाकि लेख उत्तम.

कुणा गुरुने स्वर्णिम भविष्याचे स्वप्न दाखवून हजारो मानवांना त्यांच्या नकळत दास बनवणे हे एकाच वेळी मानवाच्या अद्भुत बौद्धिक क्षमतेचे आणि त्याच बुद्धीच्या क्षणिक ठिसूळतेचे निदर्शक आहे, हाच या‌ 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' चा धडा.

एक व्यक्ति / गुरु हे करतो हीच खरी भ्रामकता... वास्तव हे असते की हे सर्व समाज करत असतो व एका व्यक्तिकडे त्याचे नेत्रुत्व जाते, इतकेच.

बाकी शिला म्हणजे अत्यंत आक्रमक आणि काहिसं क्रुर भासेल असं पण जबरदस्त प्रकरण आहे खरे...

गॉडजिला's picture

31 May 2021 - 4:27 pm | गॉडजिला
गुल्लू दादा's picture

31 May 2021 - 6:42 pm | गुल्लू दादा

मालिका बघावी लागेल. श्री गिरीश कुबेर यांच्या 'युद्ध जीवांचे' या पुस्तकात रजनीशपुरंम बद्दल वाचले होते. तेव्हा प्रचंड धक्का बसला होता.

वाईल्ड वाईल्ड कंट्री एकदम जबरदस्त आहे. त्यातला ओशो कडचा वकील स्टिफन किंग सारखा दिसतो हे निरीक्षण नोंदवतो.

त्याचे कार्य तरी समांतर होते... डायनामिक होते पण समांतर होते... म्हणता येइल

अनुस्वार's picture

31 May 2021 - 7:55 pm | अनुस्वार

ओशोने स्वतः अनेकदा 'I'm the rich man's guru' असं म्हटलंय. डाव्या विचारधारेत ज्या कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या उत्थानाचा विचार केला जातो, तो वर्ग ओशोने स्वतःसाठी राबवूनच‌ घेतला. सबब! प्रसंगी ओशोला भांडवलशाहीचे अपत्य म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

गॉडजिला's picture

31 May 2021 - 8:10 pm | गॉडजिला

मग कम्युन उभे केले कशाला ?

मला वाटते कम्युन फ्लॉप गेले म्हणून डावे जवळ करत नसावेत कारणं तो उघड उघड डाव्या विचारसरणीचा पराभव ठरतो

कोणती डावी विचारसरणी नक्की ? अनेक डाव्या विचारसरण्या आहेत.

आणि काय डाव्या तत्वांखाली कम्युन चालवले कल्पना नाही. पण पुण्यातला मल्टी मिलियन डॉलर धंदेवाईक कम्युन अजूनसुद्धा चांगला जोराने चालू आहे. त्यात तर बुवा काही डावी गोष्ट ठळकपणे दिसत नाही. ओरेगॉन मध्ये तिथले रहिवासी आणि शिलाने एकमेकांच्या काड्या केल्या नसत्या तर नक्की कम्युन चाललंच असतं. कम्युन मधले रहिवासी खुशच तर होते, तो नैसर्गिकरित्या बंद पडला असे म्हणणे अयोग्य ठरेल. इन फॅक्ट चालू असताना सेल्फ स्स्टेनिंग, रहिवाश्याना स्वर्ग वैगेरे वाटणारच होता.

पुण्यातला मल्टी मिलियन डॉलर धंदेवाईक कम्युन अजूनसुद्धा चांगला जोराने चालू आहे

नाही पुन्यातला कम्युन केंव्हाच बंद पडला... चालु आहे ते कायद्याने रिसोर्ट आहे. पैसे द्या व रहा. रिसॉर्टमधे जे काही केले जाते त्याची जबाबदारी मालकाची नसुन ग्राहकाची असते... कम्युन बंद होउन जमाना झाला.

ओशोने देव देव करा सान्गितले नाही, सर्वाना समान हक्क आहेत असे सांगितले... जगातील बहुतांश हिप्पि चळवळी अशाच अस्तात व त्यातील जे सदस्य मुल श्रिमंत असतात त्यांच्या पैशावर समुदाय उपभोग घेत हिप्पि चळवळ जगतो... जरी तो पैशाच्या मागे नसतो...

ओर्गॉनमधील कम्युन हा एक अनोखा प्रयोग होता पद्दुचेरी जवळील ओरोविल्ल देखिल असाच नो मनी, पोलिटिक्स अन रिलिजनचा अनोखा प्रयोग आहे पण त्यालाही काळा पैसा लपावयला वापर, खुन, बलात्कार, बाल लैगिक शोषण यांस्म्दर्भात आरोप ही काळी किनार आहेच...

पण मुख्य चर्चेचा मुद्दा कम्युनचे यश हा नसुन त्याची शिकवण डावीकडे झुकती आहे की नाही हा आहे

ओशोबद्दल या मालिकेपलिकडे मला काही माहिती नाही. त्याचे विचार डावे का उजवे कल्पना नाही.

व आपले मत नोंदवावे ही विनंती...

कंजूस's picture

31 May 2021 - 7:04 pm | कंजूस

ओशोचा पुण्यातल्या कोरेगावपार्कचा आश्रम बघायची इच्छा होती. सांडपाणी नाला फिरवून ,झाडे लावून किमया केली होती म्हणतात. बायोटेक्नोलजी.

युनाइटेड स्टेट्स मध्ये असे "कल्ट " असणे हे नवीन नाही .. मागे ते अमिश सारखेच असोत किंवा डेव्हिड कुरेश सारखे ... परंतु हे दोन्ही आणि इतर सुद्धा ख्रिस्ती धर्माच्या आसपास असलेलं आहेत / होते या बाबतीत प्रथमच बिन ख्रिस्ती संबंधित वाधु लागला .. त्यामुळे कदाचित " गॉड आणि गन" वली अमेरिका "जास्त" अस्स्वस्थ झाली कि काय? + हा नवीन "कल्ट " लीडर गौरवर्णीय नाही ? हा मुद्दा यात होता का ? कितपत होता ? यावर काही भाष्य असले तर बघायला आवडेल !
या शिवाय धर्म म्हणून मान्यता पावलेले पण ज्यांच्यावर कल्ट असल्याचे आरोप केले जातात ते म्हणजे " चर्च ऑफ सायांतलोजी "

अनुस्वार's picture

1 Jun 2021 - 9:59 am | अनुस्वार

निदान मालिकेत तरी दाखवला नाही. परंतु 'कल्ट'च्या‌ बाबतीत ओशो 'लॅन्डलाईन'च्या जमान्यात '५जी' वेगाने वाढत होता. मालिका पाहून इतर 'कल्ट' आणि 'रजनीशीइजम' यांतले साम्य आणि विरोधाभास जास्त प्रकट होतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2021 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभार, चांगली ओळख करुन दिलीय. नक्की पाहीन.

-दिलीप बिरुटे

धन्यवाद. दुसरा भाग पहातोय. अजून तरी ओशोंनी जे केलं ते अजिबात चुकीचं वाटत नाहीये. 80000 एकर खडकाळ wasteland चं त्यांनी हरितजमिनीत परिवर्तन केलं. पण केवळ आपल्या पेक्षा वेगळी विचारसरणी म्हणून स्थानिक त्यांना विरोध करतायत असं दिसतंय. जर उपर्यांनी येऊन तिथली स्थानिक जमीन ताब्यात घेऊ नये असं असेल तर अमेरीकन्स नी रेड इंडियन्स बरोबर काय केलं होतं? तेव्हा कुठे होता राधासुता तुझा धर्म? बाकी याला विरोध ख्रिस्ती धर्मवेड्या अमेरिकन गावकऱ्यांकडून झालेला दिसतोय. यांचा धर्म देवाचा आणि बाकीचे धर्म, cult म्हणजे सैतानाचे काय? अमेरिका बाहेरच्या देशात पैशाने सरकारे विकत घेते, वॉलमार्ट आणून लोकल उद्योग धंद्यांची वाट लावते तेव्हा काय होतं ते कळलं ना? मला जराही सहानुभूती वाटत नाहीये या अडाण्यांबद्दल.