आपल्या गावगाड्यात जात नावाची व्यवस्था अगदी पाचर मारल्यासारखी फिट्ट बसली आहे. कितीही हाकला म्हंटलं तर जात नाही ती जात असं तिचं वर्णन केलं जातं. आपण सगळे जण कळत नकळतपणे का होईना या जातिव्यवस्थाचे पाईक आहोत. भारताच्या कुठल्याही खेड्यात गेलं तर हे वास्तव सहजपणे दिसून येतं. शहरात थेट नसला तर वेगवेगळ्या पद्धतीने जातीभेद दिसतोच. कधी तो रहाण्याच्या बाबतीत असतो, तर कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत. कोणी फक्त जातवाल्यानाच घर देतं, तर कोणाच्या सोसायटीमध्ये नॉनव्हेज पदार्थ चालत नसतात. महाराष्ट्रात पाटीलकी पूर्वापार चालत आली आहे, राजे राजवाडे गेले, इंग्रज आले तेही गेले मग आली लोकशाही तरीही पाटीलकीचा रुबाब काही कमी झालेला नाही, आजही गावाच्या पाटलाला प्रचंड महत्व असतं. मोठा मान असतो. त्याच्या घरात घडणाऱ्या घटनांचा परिणाम गावावर कळत-नकळतपणे होत असतो.
वऱ्हाडातल्या खामगाव जवळच्या फुलगावच्या 'गुलाब धांडे पाटलाची'हि कथा. जातीने 'लेवा पाटील' असलेला गुलाब धांडे पाटील गावातल्या भरपूर काळ्या-कसदार जमीन जुमला असेलल्या तालेवार घराण्यातला आहे. इथे जातीचा उल्लेख या साठी केला, कारण जात हि या कादंबरीचा गाभा आहे. त्या शिवाय याला काहीच महत्व उरत नाही. तर असो, असा हा गुलाब उच्च शिक्षणासाठी दिल्लीला असतो, त्याला एम फिल करून पीएचडी करायची आहे, त्यासाठीचा त्याचा विषय आहे 'जाती व्यवस्था '. त्या संबंधाने त्याचं संशोधन सुरु आहे ते सुरु असतांना गुलाबला भारतातल्या समाज व्यवस्थेचं विदारक चित्र दिसतं. त्याचे प्राध्यापक आणि त्यांच्यात चालणाऱ्या चर्चांमधून गुलाबचे जातीविषयक विचार बरेच स्पष्टपणे दिसतात. शिक्षण घेत असतांना इकडे फुलगावात धांडे पाटलांच्या कुटुंबात बऱ्याच उलथापालथी घडतात आणि हे सगळं थांबवायचं असेल तर गुलाब समोर एकच मार्ग असतो, तो म्हणजे लग्नाचा. हो लग्न पण ते जातीतच. तसं केलं तर त्याच्या घराण्याचं, धांडे पाटलाचं जातीत आणि पंचक्रोशीतल्या समाजात वजन वाढणार असते. जमिनीचे प्रश्न सुटणार असतात. पण यासाठी गुलाबला स्वतःच्या इच्छा माराव्या लागणार असतात. त्याच्या दिल्ली आणि गावातल्या जगात फार फरक आहे. दिल्लीतलं वातावरण फार मुक्त आहे त्या उलट फुलगावात बरीच उलट परिस्थिती आहे. त्यामुळे हवं ते करण्याचं स्वातंत्र्य देणारी, वर वर पाहता मोकळी ढाकळी भासणारी दिल्ली आणि परंपरा प्रतिष्ठा यांच्या कल्पनेत गुरफ़टलेलं फुलगाव यांच्यात गुलाब धांडे पाटील अडकला आहे. या परिस्थिती गुलाब काय करतो. त्याचं लग्न कुठे ठरते. हे वाचण्यासाठी कादंबरी नक्की वाचा.
गावपातळीवर चालणाऱ्या बऱ्याच प्रथा परंपरांचं वर्णन 'पंगतीतलं पान' मध्ये दिलं आहे. पण कादंबरी जास्त आवडायचं कारण म्हणजे कादंबरी ज्या भागात घडते तो, अकोला-खामगाव-शेगाव-बुलढाणा-मलकापूर हा भाग परिचयाचा आहे, त्या लहानपण याच भागात गेल्याने. कादंबरीतल्या पात्रांसोबत, रूढी परंपरांसोबत मी सहजपणे जोडलो गेलो. अगदी थोडक्या शब्दांत लेखकाने गावातले माणसं, समाज जागा जिवंत केल्या आहेत. हे 'पंगतीतलं पान' चं बलस्थान म्हंटलं तरी चालेल. 'पंगतीतलं पान' हि मॅजेस्टिकच्या 'हिंदू' वर आधारित कांदबरी लेखन स्पर्धेच्या पहिल्या पारितोषिकाची मानकरी जरी असली तरी, समृद्ध अडगळ असलेली 'हिंदू' मी वाचली नाही, पुढे वाचेन कि नाही हे सुद्धा माहिती नाही. या स्पर्धेच्या परंपरतेतून जयवंत दळवींची 'चक्र' सारखी कादंबरी पुढे आली आहे. त्यामुळेच परंपरेच्या 'पंगतीतलं पान' अगदी वाचनीय आहे कारण कधी ना कधी आपण सुद्धा या पंगतीतल्या पानाचा भाग झालेलो असतो.
----
पंगतीतलं पान
ले. अविनाश कोल्हे
पृष्ठसंख्या : १६८
प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन
प्रतिक्रिया
28 Sep 2020 - 1:52 pm | अनन्त अवधुत
कादंबरी विकत घेण्यासाठी ऑनलाईन दुवा मिळेल काय?
एखाद-दुसरी प्रत घ्यावी म्हणतोय.
दुवा द्या...दुवा घ्या
28 Sep 2020 - 4:21 pm | महासंग्राम
https://www.majesticreaders.com/book/13413/pangatitala-paan-avinash-kolh...
3 Oct 2020 - 11:44 am | अनन्त अवधुत
.
29 Sep 2020 - 1:46 pm | श्वेता२४
वाचणे आले.
29 Sep 2020 - 6:12 pm | विश्वनिर्माता
ओळख आवडली. वाचावे म्हणतो.
30 Sep 2020 - 1:25 pm | कुमार१
ओळख आवडली
30 Sep 2020 - 1:52 pm | कपिलमुनी
असे वेगळ्या विषयावर लेख वाचले की बरं वाटत