बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे.
त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं.
मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो.
हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली. मॅपवर 2 लोकेशन दिसली, एकाच भागात, त्यातलं एक निवडलं, आणि निघालो, तिथे पोचलो तर कळलं की हे हॉटेल या गल्लीत नाहीच, शेजारच्या गल्लीत आहे.. बरं शेजारची गल्ली म्हणजे कशी, तर सातारा रोड वर बाहेर यायचं, रांका पासून मार्केट यार्ड पर्यंत जायचं, आणि U टर्न मारून परत यायचं. आणि मग शोधत शोधत जायचं, रस्त्यावर बोर्ड नाही, एक बोर्ड होता तो झाडात लपलेला, कसाबसा तो मिळाला, आणि आम्ही आत गाडी टाकली.
गाडी लावणे म्हणजे मोठे दिव्य होते. झाडांच्या मधून जागा शोधून गाडी लावायची, नो पार्किंग असिस्टंट. तिथे एक बाई होती ती आम्हाला बघून आत निघून गेली.
बाहेर मेनू लावलेला होता पालकाची भाजी, लाल भोपळा, पुरणपोळी, कढी वगैरे. मेनू बघून आत जाऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण केव्हातरी जायचेच आहे तर आताच जाऊया म्हणून गेलो.
आत गेल्यावर पुणेरी पद्धतीने थंड स्वागत झालं, फक्त इतकंच कळलं की यांच्याकडे थाळी आणि इतर मराठी पदार्थ पण आहेत. एकंदर वातावरण बघून बायको तर परत जाऊया म्हणत होती, पण तिला थांबवलं. आणि मेनुकार्ड मागवलं.
एका इंजिनीरिंग च्या पुस्तकाएव्हढं मेनूकार्ड होतं.. साधारण चाळल्या वर इतकं कळलं की आज 350 रु वाली महालक्ष्मी थाळी आहे.
*लिमिटेड थाळी - 3 पोळ्या, एक पुरणपोळी, भोपळा, पालक, कढी, वरण, भात, लोणचे, चटणी, भजी, साबुदाणा वडा, पापड इत्यादी. थाळी लिमिटेड, किंमत 350 रु* .
खरे तर शहाण्या माणसाने इथेच मागे फिरायला हवे होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्ही 2 थाळ्या ऑर्डर केल्या आणि बसलो. जेवण आलं, आता आपण लिमिटेड पदार्थांचा आस्वाद घेऊ.
*साबुदाणा वडा -* मोठ्या पेढ्याइतक्या आकाराचे 2 वडे. टेस्ट ओके.
काकडीची कोशिंबीर - फ्रीजमध्ये साठवलेल्या काकडीची कोशिंबीर असावी बहुतेक. ठीक म्हणावी इतपत.
*पुरणपोळी 1 नग -* 100 टक्के फ्रोझन पोळी गरम करून दिली असणार. आम्ही त्याला एक फुलकाच समजत होतो, पण तो थोडा गोड होता, म्हणून त्याला पुरणपोळी म्हणणे भाग होते. जाड पापुद्रा, पुरणाचा अभाव, आणि खात जावे तशी चामट होत जाणारी. ज्यांनी अमेरिकेत मिळणारी फ्रोझन पोळी खाल्ली असेल त्यांना नक्की कळेल. पुण्यात त्या पदार्थाला पुरणपोळी म्हणण्याची हिंमत मी करु शकत नाही.
*साधी चपाती -* 3 चपात्या, थोड्या जास्त भाजलेल्या, आणि गार होतील तश्या चामट होत जाणाऱ्या. या पण फ्रोझन असाव्यात. तिसरी चपाती, जी गार झाली ती चावतच नव्हती.
एक गोष्ट सांगायची राहिलीच, पहिली चपाती अर्धी खाऊन झाल्यावर त्यांनी *वेलकम ड्रिंक* आणून दिले, guess what? एक कटिंग चहा इतके ताक!! म्हणे वेलकम ड्रिंक. हे वेलकम ड्रिंक बघून अक्षरशः डोळे पाणावले. फोटो काढायचा मोह कटाक्षानं आवरला.
हं, तर पुढचे पदार्थ
*भजी* - सुपारीच्या आकाराची 3 भजी.
मीठ वाढतो तितकी शेंगदाण्याची चटणी आणि मेतकूट.
*भोपळ्याची भाजी -* सालीसकट केलेली लाल भोपळ्याची भाजी, जी अर्धी मी बटाट्याचा रस्सा समजून खाल्ली, अर्ध्यात बायकोने आठवण करून दिली की तो भोपळा आहे!
*पालक रसभाजी* - दाणे, खोबरं आणि मसाला घातला की काहीही खपतं असा त्यांचा बहुधा गैरसमज असावा. त्यात पालक शोधावाच लागत होता, पण त्यातल्या त्यात तीच चांगली लागत होती .
*कढी -* आंबट दही तसेच घट्ट घुसळून त्याची कढी केलेली. ना आपण घरी करतो तशी मिरचीची फोडणी वगैरे असलेली होती, किंवा ना कढी खिचडी सारखी. मेस मध्ये असते तशी चव साधारण होती. आणि खारट!
*वरण* - खारट!
*आणि भात!!* तो सुंदर असणार, कारण त्यांनी तो दिलाच नाही. आम्ही पण मागायला गेलो नाही! इतकं सुंदर जेवण जेऊन पोट भरलं होतं!!
आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, पण साडेतीनशे रुपयात असले जेवण विकणे हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान आहे! परदेशात चालेल हे असले जेवण, पण पुण्यात तर नाहीच नाही!
आता सर्विस बद्दल बोलूया - *अत्यंत मितभाषी स्टाफ* असणार! कारण *आम्हाला जेवण दिल्यावर कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही* . हवं नको वगैरे फारच लांब राहिलं!!
जेवण झाल्यावर बिलाचे पैसे द्यायची वेळ आली, बिलात 350 रु ची थाळी आणि वरती सर्विस टॅक्स बघून माझी सटकलीच होती.. *जी एस टी सकट 735 रु फक्त!* *बिल देताना विचारले, की आजच्या थाळीत भात होता का? तर फक्त सौजन्याने त्यांनी विचारले, तुम्हाला मिळाला नाही का? (सॉरी वगैरे जाऊदे, पण पुढे बोलणे पण नाही, किमान आतल्या माणसाला काय झाले आहे ते विचारावे इतकीच अपेक्षा होती)* केवळ मला भांडायची इच्छा नव्हती, त्यामुळे शांतपणे मी पैसे देऊन बाहेर निघालो होतो, पण तेव्हढ्यात त्यांनी कळ काढली!! मला त्या बाई पुढच्या वेळेस आलात तर डिस्काउंट कूपन देते म्हणून सांगू लागल्या!!
मग मात्र माझी सहनशक्ती संपली. शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
प्रतिक्रिया
19 Aug 2018 - 11:40 pm | चांदणे संदीप
थाळी प्रकारात आधी कोणाचातरी अनुभव ऐकून जाणेच योग्य असे माझे मत.
रच्याकने, हा लेख आधी कायप्पाला दाखवून आणलाय का?
Sandy
20 Aug 2018 - 8:46 am | आनन्दा
कायप्पा वर मी अगदी पर्सनल ग्रुप ना टाकलाय. पण चेपू वर जाम फेमस झालाय हा लेख.. तिथून कोणीतरी टाकला असेल कायप्पा वर.
काय आहे, तिथे जाऊन फ्रस्ट्रेट झालेले बरेच जण असणार आहेत, त्यामुळे असा लेख मिळाला की ढकलत असतील पुढे..
20 Aug 2018 - 9:09 am | प्रचेतस
हॉटेलच नाव सांगा भो, जाहिररित्या सांगून औचित्यभंग होत असेल तर व्यनित कळवलंत तरी चालेल.
20 Aug 2018 - 9:14 am | प्रचेतस
ओह्हो. शीर्षकातच नाव दिसतंय :)
19 Aug 2018 - 11:42 pm | सुचिता१
छान आहे समीक्शा :) :) तो विडीओ म्हणजे मला आत्मस्तुती चा बॉंम्ब च वाटला होता . त्यांच े आदर्श आहेत,
मँकडॉनाल्ड आणि डॉमीनोज मग काय फ्रोजन फुड वर च सगळी मदार असेल .
20 Aug 2018 - 5:36 am | जेम्स वांड
आमच्या वरच्यावाडीच्या पारावर कोणी उतारा म्हणून ठेवलं तर काळं कुत्रं बी खाणार नाही. पुरणपोळी पुरणपोळीच असते, ती पुण्यात खावा का आणि कुठं (तुम्ही खाल्लेली खचितच नव्हती, पण ती कुठंही खाल्ली असती तरी पुरणपोळी म्हणवले नसतेच).
एकंदरीत हॉटेलानुभव पाहता निगेटिव्ह रेटिंग पण कमीच पडेल असे वाटते. पण त्याला जोडून असलेला "पुण्यातच काय ती सुग्रास जेवायची अक्कल आहे" हा ओव्हरटोन पण काही तितका खास आवडला नाही, असोच.
20 Aug 2018 - 8:32 am | आनन्दा
पुणेरी टोन वगैरे काही नाही. उलट पुण्यात म्हणून हे सगळं खपतय.. कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात या हॉटेल ने 2 महिन्यात गाशा गुंडाळला असता..
मी पुण्यात राहतो म्हनून मी पुण्याचं नाव घेतो. इतकंच!! परंतु हे अस्सल मराठी जेवण नाही, त्यामुळे कोणत्याही शहराचे नाव टाकले म्हणून काही फरक पडणार नाही.
20 Aug 2018 - 10:18 am | जेम्स वांड
माफी असावी एकडाव, बाकी ग्रामीण जेवणाचा अभाव आहे पुण्यात खुद्द शहरात पण नशिबाने लाभलेल्या आजूबाजूच्या मावळांत मिळून जातं उत्तम
20 Aug 2018 - 10:48 am | लई भारी
एक झकास पोस्ट होऊन जाऊ दे की या खादाडीची! आम्हाला पण ४ ठिकाणं म्हायती पडतील!
रच्याकने: मी "बैजवार" हा शब्द वापरणार होतो; पण परत गोंधळलो कि खरंच असा शब्द(अर्थात: बोलीभाषेत) आहे का?
आईला,गावाला जाऊन लै दिस झाले म्हणजे!
20 Aug 2018 - 8:35 am | आनन्दा
बाकी हे खरं आहे. आणि पुण्यात अस्सल मराठी, (ज्यात खान्देशी आल्या, वर्हाडी आल्या, कोकणी पण आल्या) डिलेकसी कुठे मिळतच नाहित असे माझेही मत आहे. पण या बाईंचा विडिओ बघून अपेक्षा वाढल्या होत्या..
25 Aug 2018 - 7:35 pm | बॅटमॅन
डेलिकसीज मिळतात की. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या मिळतात. तुम्हांला अपेक्षित असलेल्यापैकी कुठला प्रकार मिळाला नाही?
20 Aug 2018 - 6:53 am | गवि
अनेक, म्हणजे शेकडो शाखा दणादणा उघडत गेलेल्या (विशेषतः निष्काळजीपणे चुकीच्या फ्रॅंचायजी देऊन) अनेक रेस्टॉरंट चेन्समधे असाच अनुभव येतो.
हायवेवर जागोजागी असलेल्या कामत रेस्टॉरंटच्या चवीविषयीही असंच मत आहे.
20 Aug 2018 - 8:47 am | आनन्दा
कामत बद्दल तर न बोललेलं बरं..
20 Aug 2018 - 7:03 am | नाखु
त्यापेक्षा चिंचवड बेष्ट,गावात गोडाधोडासकट वर दिलेल्या पैश्यापेक्षा कमी किंमतीत "अब्ब" म्हणेपर्यंत चापून खा,रोज बदलता मेनू.
आणि हो नुकताच एक मिपाकर जाऊन आला आहे
खुलाशी नाखु
20 Aug 2018 - 8:27 am | प्रचेतस
सुहास भोजनालय का?
20 Aug 2018 - 6:24 pm | मराठी कथालेखक
सुहासचं जेवण चांगलं असतं (म्हणजे फार अप्रतिम नसलं तरी) पण बाकी गोष्टी डोक्यात जातात.
दुपारी अंधारलेलं असलं तरी दिवे बंद असतात, ग्राहकाने विनंती केली तर दिवे लावले जातात.
मी एकदा दुपारी एकटाच गेलो होतो तेव्हा काहीशी गर्दी होती आणि मी बसून बराच वेळ झाला मात्र ताट आले नाही, बहूधा पुरेशा चपात्या वगैरे तयार नसतील असा विचार करुन मी शांतपणे वाट बघत बसलो. मात्र बाजूच्या टेबलावर माझ्या नंतर आलेल्या काही ग्राहकांकडे ताटे आली तेव्हा माझं डोकं फिरलं. सरळ उठलो आणि काउंटरवर जावून म्हणालो "माझ्या नंतर आलेल्या ग्राहकांना तुम्ही ताटं वाढता ? ती काय स्पेशल आहेत का की मी एकटा (म्हणजे हॉटेलला कमी उत्पन्न) म्हणून असं" आणि मग तिथून निघालो पण कुणी ना दिलगिरी व्यक्त केली ना थांबवण्याचा प्रयत्न केला. असो.
हिंजवडीला जाताना वृंदावन - अंगत-पंगत अशी हॉटेलची जोडी आहे..म्हणजे वृंदावन हे डिश पध्द्तीचे तर अंगत-पंगत हे थाळीचे.. ते एकदा नक्की बघा, .. स्विगीवरुनही त्यांची थाळी पार्सल मागवता येते. . चवही चांगली आहे. एका थाळी पार्सलमध्ये दोघे खावूनही बरेच अन्न उरते... एका थाळी पार्सलमध्ये चार भाज्या , सहा चपात्या, भजी वा तत्सम पदार्थ , गोड पदार्थ्, गोड कढी, दोन प्रकारचे वरण , भात असं बरंच काही येतं.
तिथे जावून खाण्याचा अनुभवही चांगलाच आहे (पार्सलपेक्षा थोडा महाग वाटला तरी) !!
21 Aug 2018 - 8:27 am | प्रचेतस
अंगत पंगत वरुन तर दररोजचा जाण्यायेण्याचाच रस्ता आहे पण अतापर्यंत कधी जाणं झालं नाही तिथं, तुम्ही म्हणताय तर एकदा थाळी खाउन पाहतो तिथली. बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे. १०० रुपयात विदाऊट स्वीट अमर्यदित थाळी अआणि १५० रुपयात स्वीटसकट अमर्यादित. चव खरोखरच छान आहे.
21 Aug 2018 - 11:46 am | चिनार
अंगत पंगत उत्तम आहे. पुण्याला असताना तीन- चार वेळेला गेलो आहे.
आता पुण्यात आल्यावर एकदा जाईन म्हणतो..
21 Aug 2018 - 11:55 am | पुंबा
कट्टा करण्यासारखे आहे का?
21 Aug 2018 - 12:23 pm | प्रचेतस
कट्टा करण्यासारखे नाही, तुलनेने जागा खूप कमी आहे. साताठ टेबल्स फक्त.
22 Aug 2018 - 3:20 pm | लई भारी
त्यांनी आता जवळच, कल्याण-भेळ/हयात च्या बाजूला मोट्ठ्या जागेत स्थलांतर केलंय. नवीन ठिकाणी गेलो नाही पण जागा मोट्ठी आहे.
ह्यांचं जेवण थोडं मसालेदार वाटलं.
डबा नसेल तर पर्याय म्हणून जवळच 'चामुंडा' ची थाळी बेश्ट आहे.
22 Aug 2018 - 4:19 pm | प्रचेतस
तिथेही जाउन आलोय. आधीच्या जागेपेक्षा जरा मोठी असली तरिही त्यामानाने अपुरीच आहे.
21 Aug 2018 - 6:43 pm | मराठी कथालेखक
इंडियन थाळी हाऊसच्या माहितीबद्दल धन्यवाद.. नक्कीच बघेन एकदा
20 Aug 2018 - 7:15 am | चामुंडराय
अशा पुरणपोळीला आम्ही पुरण-दा-प्राठ्ठा म्हणतो.
20 Aug 2018 - 9:58 am | आनन्दा
ठ्ठो! चपखल शब्द आहे.
20 Aug 2018 - 7:59 am | तुषार काळभोर
कुझिन महाराष्ट्रीयन
टाईप कॅज्युअल
एव्हरेज कॉस्ट फॉर टू ९०० फक्त
घरातल्या जेवणाला एवढे पैसे??!!
बाकी तुम्ही केलेल्या वर्णनावरून गाळा/खानावळ टाईप वाटलं होतं, पण फोटो तर पॉश हॉटेलसारखे आहेत.
20 Aug 2018 - 10:01 am | आनन्दा
हॉटेल खूप पॉश आहे. स्वच्छता वगैरे माहीत नाही, पण ठीकठाक असावी. ऐसपैस आहे. पण पुण्यात त्यांची स्पर्धा सरावनाभुवनशी नसुन गल्लोगल्ली असलेल्या खाणावळी, आणि श्रेयस, सुकांता, पंचवटी सोबत आहे हे कसे विसरुन चालेल?
20 Aug 2018 - 8:01 am | दिगोचि
विमानात शाकाहारी जेवण मिळत नाही हे शक्य नाही. या बाईनी अगोदर विमान कम्पनीला सान्गितले नसेल. म्हणुन तसे झाले असेल कारण अगोदर सान्गितलेल्यानाच फक्त तसे जेवण मिळते. तसेच रु. ३५०च्या थाळिला जीएसटी धरुन ७३५ रुपये कसे पडले? कारण जीएसटी फक्त १० टक्केच आहे ना? म्हणजे ७७० रुपये २ थाळ्यान्चे मिळून पडले असते.
20 Aug 2018 - 8:28 am | पिलीयन रायडर
5% आहे ना रेस्टॉरंटना..
20 Aug 2018 - 8:29 am | आनन्दा
2 थाळ्या, 5 टक्के जी एस टी
20 Aug 2018 - 8:15 am | सिरुसेरि
असल्या उद्धट , आगाउ आणी दिखाउ हॉटेलपासुन सावध केल्याबद्दल धन्यवाद . तरी नशीब , तिथल्या स्टाफने "इतने पैशेमें इतनाहिच मिलेगा " असली उत्तरे दिली नाहीत .
20 Aug 2018 - 8:28 am | पिलीयन रायडर
व्हिडीओ मध्येच बाई डोक्यात गेल्या होत्या.
350 मध्ये लिमिटेड थाळी, ते पण इतका सुमार मेन्यू.. गेलातच कसे काय!!
20 Aug 2018 - 9:56 am | आनन्दा
खर सांगु? पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आता. त्यामुळे मी स्वतःच कित्येक दिवस या बाबतीत काय वेगळे करता येईल असा विचार करतोय, त्याची काहीतरी रुपरेषा मनात आहे पण, फक्त सध्या ग्रुहकर्जात अडकलोय म्हणून उडी मारता येत नाही.
या बाईंचा व्हिडिओ बघितला आणि वाटलं की अरेच्चा, आपल्या मनात जे आहे तेच तर यांनी केलंय. त्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर मनात निर्माण झाला, आणि त्यामुळे काहीही झाले तरी पुण्यात हे हॉटेल सुरु झाल्यावर एक्दा तरी जायचंच असं ठरवलं.
असो..
साधरणपणे बे एरिया च्या इन्डिअन स्टोर मध्ये जे पदार्थ मिळायचे ते पदार्थ काल पुन्हा एकदा खाल्ले आणि एकदम परत आम्रविकेत गेल्याचा फील आला. ३५० रु मध्ये असा जगप्रवास दुर्मिळच!
20 Aug 2018 - 10:45 am | लई भारी
थाळीच्या एकसूरीपणाबद्दल अगदी सहमत! आपला मनोदय लवकरच प्रत्यक्षात येवो :)
शेवटचा "जगप्रवास" चा टोमणा जबरी आहे :)
रच्याकने: झोमॅटो वर अजून 'Opening soon' दाखवतंय.
त्याच्याआधीच बंद पडतंय वाटतं! :D
20 Aug 2018 - 6:32 pm | मराठी कथालेखक
दुर्वांकूर चांगलं आहे की ? अर्थात मी ही तिथे मोजून दोन तीन वेळा गेलो असेन पण जेव्हा गेलो तेव्हा आवडलं होतं.. मी चिंचवड मध्ये रहात असल्याने पुण्यातले हॉटेल्स फारसे माहित नाही. चिंचवडमध्ये मयूरची लोकप्रियता आहे बर्यापैकी पण बरेच महागडे आहे, मी फारसा गेलो नाही. दुसर्या एका प्रतिसादात मी हिंजवडीच्या अंगतपंगत चा उल्लेख केला आहे. ते चांगले आहे.
21 Aug 2018 - 8:29 am | प्रचेतस
मयुर खूपच महाग आहे. ३५० रु. अमर्यदित थाळी फक्त जिलेबीसह. इतर काही स्वीट हवे असल्यास ८० रु, १०० रु. एक वाटी असे. मात्र जेवणाची चव अप्रतिम आहे.
24 Aug 2018 - 4:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
मी सुकांता, दुर्वांकुर, श्रेयस येथील थाळी खाल्ली आहे आणि बर्यापैकी आवडली सुद्धा. डेक्कनचे मथुरा पण छान आहे. (विशेषतः सकाळी मिळणारे व्हेज प्लॅटर ज्यात कोथिंबीर वडी, बटाटा वडा, आळु वडी. सुरळीची वडी वगैरे असते) थाळी नको असल्यास भाजी भाकरी वगैरे सुद्धा मस्त.
बादशाही आणि पुना बोर्डींग हाउसबद्दल तर काय सांगावे?
काही वर्षा पुर्वी डेक्कनला एक हॉटेल होते, नाव आठवत नाही पण थाळी मस्त घरगुती. गेलाबाजार शनिवारातले रसोई डायनिंग पण ठीक.
24 Aug 2018 - 6:45 pm | सिरुसेरि
हॉटेल सुजाता हे एके काळी डेक्कन ( कि लक्ष्मी रोड ? ) भागात चांगले हॉटेल होते . नंतर ते बंद पडले .
21 Aug 2018 - 9:53 am | हुप्प्या
बे एरियात प्रचंड संख्येने भारतीय रेस्टॉरंटे आहेत पण सरसकट अत्यंत सुमार दर्जा. पूर्णब्रह्माची बे एरियातील जेवणाशी तुलना म्हणजे खास शालजोडीतला हाणला आहे!
20 Aug 2018 - 11:30 am | माहितगार
पुण्यासारख्या शरात सुद्धा बुंबई प्रमाणेच दोन घटका बसण्यासाठी सार्वजनिक जागांची उपलब्धता कमी झालेली आहे. हाटेलात काही मिंटे ते तासभर केवळ बसण्यासाठीच पैसे द्यायचे असतात. हे लक्षात घेतले म्हणजे खाण्यास उपलब्ध केले गेलेले पदार्थ बसण्यास मिळालेल्या जागेचे काही मिंटांचे भाडे मोजल्यामुळे मिळालेला बोनस समजून, चवीपुरते चाखुन सोडून द्यावे, म्हणजे मनाला ताण येत नाही.
20 Aug 2018 - 12:45 pm | योगी९००
बंगलोरला त्यांच्या दोन्ही रेस्टारंट मध्ये जाऊन आलो. चांगला अनुभव आला. झुणका भाकरी आवडली. पुण्यातच यांना काय झाले कोणास ठाऊक...
त्या व्हीडीओ मध्ये ती बाई म्हणाली की विमानात तिला शाकाहारी नाही मिळाले. कित्येक तास उपाशी राहीली वगैरे...आणि नंतर थोड्या वेळाने म्हणाली की माणूस सोडून काहीही खाऊ शकते....!! काय टोटल लागली तर मला सांगा..
20 Aug 2018 - 1:04 pm | पिलीयन रायडर
मला त्या बैंचा टोन आवडलाच नाही म्हणून मी पूर्ण पाहिला नाहीये तो व्हिडीओ, पण शाकाहारी जेवण मिळालं नाही हा काय किस्सा आहे? मी जे काही दोन चार वेळा फ्लाईटमध्ये बसलेय त्यात कधीही प्रॉब्लेम आला नाही. घरात बाकीचे लोक आहेत जे सतत फिरत असतात, त्यांनाही कधी असा त्रास झाला नाही...
20 Aug 2018 - 1:10 pm | गवि
+१
का ते सांगता येत नाही पण काहीतरी इरिटेटिंग होतं त्यात हे खरं.
20 Aug 2018 - 9:44 pm | मृण्मयी१
त्या बाईंच्या बोलण्यात फार कृत्रिमपणा आहे. केवळ मार्केटींगच्या दृष्टीने केलेले हे विडीओज आहेत. मला त्यात प्रामाणिकपणाचा अभाव जाणवला. मी शहाणी, मला सगळं समजतं असाही आव वाटला. बाई डोक्यात गेल्यात खरं.
21 Aug 2018 - 12:28 pm | तिमा
कंंठाळीपणा, आत्मस्तुती, माजोरीपणा हे सर्व एकत्र आले की इरिटेटिंग होणारच की !
कानडी उच्चार असल्यामुळे, वार्यावरची वरात, मधल्या कडवेकर मामी आठवल्या. कंठाळा आला की वो!
20 Aug 2018 - 1:40 pm | आदूबाळ
हे शक्य आहे, अधूनमधून माझ्याही बाबत होतं. नुकताच आलेला अनुभव फिन एअरचा. अर्थात हे भारताला जाणार्या 'लेग'मध्ये होत नाही, आणि आगोदर व्हेज ऑर्डर करायची सोय सगळीकडे असतेच. मीच कधीकधी आळशीपणा करतो.
20 Aug 2018 - 2:53 pm | पिलीयन रायडर
हो म्हणजे सोय असतेच. ऑर्डर द्यावी लागत असेल आधी इतकंच काय ते. आज काल विमानात व्हेज जेवण मिळत नाही हे पटत नाही.
एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते!
आणि अजून एक म्हणजे.. लिमिटेड.. मी फारशी थाळी खात नाही, पण तरी स्वीट लिमिटेड हे ऐकलंय, सगळंच जेवण लिमिटेड ते ही 350 मध्ये, काही चुकल्या सारखं वाटत नाही का? मला वाटतं सुकांता वगैरे फेमस थाळ्या साधारण ह्याच कॉस्ट मध्ये अनलिमिटेड जेवण देतात ना?
21 Aug 2018 - 2:54 pm | आदूबाळ
हे सगळ्यांनाच जमत नाही. याला संक कॉस्ट फॅलसी म्हणतात.
The Misconception: You make rational decisions based on the future value of objects, investments and experiences.
The Truth: Your decisions are tainted by the emotional investments you accumulate, and the more you invest in something the harder it becomes to abandon it.
20 Aug 2018 - 3:11 pm | योगी९००
मलाही टोन आवडला नाही. फार गर्विष्ठ असा टोन वाटला. एक दोन वाक्यानंतर असेही वाटले की ही बाई दोन पेग मारून आली आहे.
20 Aug 2018 - 5:34 pm | सुचिता१
१००% सहमत !!
20 Aug 2018 - 3:19 pm | वरुण मोहिते
हॉटेल ला . 4 पेग मारून थाळी खाऊन येईन. कोकम सरबत मिळते का? वोडका नि सरबत कोणाला काही कळणार नाही मग अजून 2 पेग. पुरणपोळी चालेल चकण्याला.
20 Aug 2018 - 6:14 pm | पुंबा
बाईंच्या बोलण्यातून हा प्रयोग एकूणच पाणचट असणार आहे अशी कल्पना आली होती. स्वयंस्तुतीचा अतिरेक केला आहे त्यांनी त्या व्हिडिओत. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे मूळात मेन्यु कार्डात पदार्थ आणि किंमत पाहून तुम्ही थाळी मागवायलाच नको होती असे वाटते.
21 Aug 2018 - 9:44 am | हुप्प्या
अगदी १००% सहमत! बाईंचा व्हिडियो म्हणजे आत्मकेंद्रित वृत्तीचा एक उत्तम नमुना आहे. गिर्हाईकांना चांगली सेवा द्यावी यापेक्षा कुणाची तरी खोड मोडावी अशा भावनेतून उद्योग सुरु केला आहे की काय असे वाटत रहाते!
पूर्णब्रह्माला माझ्यातर्फे पूर्णविराम.
20 Aug 2018 - 6:31 pm | धर्मराजमुटके
एक व्यावसायिक म्हणून मत मांडू इच्छितो. यात कुणाला खरे खोटे ठरविण्याचा किंवा कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही.
बहुधा बर्याच आस्थापनांमधे एक पाटी लावलेली असायची की आमची सेवा खराब असली तर आम्हाला सांगा आणि चांगली असली तर इतरांना सांगा. सोशल मिडिया आपल्या हातात आल्यापासुन आपण नेमेके उलटे वागतोय काय ? आपणास तिथली सेवा आवडली नसल्यास तेथील व्यवस्थापकांना भेटून तिथे काय वाईट होते हे सांगावयास हवे होते. इथे आंतरजालावर लिहून त्यांची सेवा सुधारेल असे वाटत नाही. आपल्या टीकेमुळे त्यांचा व्यवसाय आणि पर्यायाने पोटपाणी धोक्यात येऊ शकते. मागे काही वर्षांपुर्वी इथे ठाण्यातल्या "मेतकुट" हॉटेल बद्दल देखिल असाच नकारात्मक अनुभव सांगणारा लेख आला होता. त्याही धाग्यावर मी अशाच प्रकारे मांडलेल्या मताचे समर्थन कोणीही केले नाही तरी देखील स्वत:कडे वाईटपणा घेऊन ही गोष्ट पुन्हा सांगाविशी वाटते.
ग्राहक म्हणून आपणांस चांगली सेवा मिळण्याचा हक्क आहेच आणि ती नाही मिळाली तर तक्रार करण्याचा हक्क देखील १००% आहे. मात्र जालावर तक्रार करताना समोरच्याचे नुकसान किती प्रमाणात होऊ याचा अंदाज आपल्याला येत नाही म्हणून हा प्रतिसाद प्रपंच (अर्थात समोरच्याचे नुकसान व्हावे असा आपला हेतू नसतो पण तसे होते खरे) !
तक्रार करण्यापुर्वी समोरच्या पार्टीचा थोडा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा ही विनंती ! अगदीच चुकीला माफी नाही असा अॅप्रोच नको !
प्रतिसादामुळे कोणाला वाईट वाटले असल्यास क्षमस्व !
20 Aug 2018 - 6:58 pm | मराठी कथालेखक
१) कसं आहे की चांगल्या सेवेत काहीशी उणीव असेल तर व्यवस्थापनाला 'सुधारणेस वाव आहे' असे सांगण्यात उत्साह वाटतो पण सेवा फारच गंडली असेल तर असे काही सांगण्याचा उत्साह वाटत नाही.
२) शिवाय आपण अतिशय वाईट सेवा देतोय याची त्या व्यवस्थापनाला किंचितही कल्पना नसावी हे पटत नाही.. तिथले व्यवस्थापक , कर्मचारी हे देखील कुठेतरी ग्राहक म्हणून जात असतीलच ना.
३) ज्यांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे ते स्वतःहून अभिप्राय जाणून घेण्याची तत्परता दाखवतात. बार्बेक्यू नेशनमध्ये एकदा जावून बघा.. ते किती लोकप्रिय आहेत याची त्यांना चांगली कल्पना आहेच पण तरी गर्व नाही ..तुम्हाला स्टार्टर्स आवडलेत ना हे आवर्जुन विचारता, स्टार्टर्समध्ये आणखी काय हवं हे पण विचारतात..शेवटी टॅबमधून पुन्हा औपचारिक अभिप्रायही घेतात...
४) पण "आपल्याला आपले पैसे मिळाले ना झालं तर मग.. ग्राहक संतुष्ट आहे की नाही काय पडलीये आपल्याला" असंच वागणं दिसत असेल तर काय अभिप्राय देणार. इथे लेखकानं लिहिलंय की
त्यावरही त्या बाईंनी लेखकाला असं का वाटलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये.. मग येवू दे की अशा लोकांचं पोटपाणी धोक्यात .. त्यांचं पोटपाणी चालावं म्हणून अनभिज्ञ लोकांनी त्यांच्याकडे जात रहाण्यापेक्षा लोकांना सावध करुन लेखकाने चांगलंच केलंय
21 Aug 2018 - 11:52 am | आनन्दा
माझी देखील साधारण अशीच भावना आहे.
अनेक ठिकाणी मी जेवण झाल्यावर management ला फीडबॅक देऊन जातो.
इतका क्रूर फीडबॅक देण्याची ही माझी देखील पहिलीच वेळ आहे. आणि बहुधा या गोष्टीला त्यांचे जेवण कारणीभूत नसून कस्टमर management कारणीभूत आहे असे वाटतेय.
बघू, जमले तर कुठे काय कसे चुकत गेलं याचा एक प्रतिसाद पण टाकेन. मला स्वतःला पण हे खूप लागून राहिले आहे.
22 Aug 2018 - 6:53 am | pawar.sujit
sahamat
20 Aug 2018 - 6:33 pm | अभ्या..
मी काय म्हणतो, त्या पूर्णब्रह्माची क्वालिटी ओकेटोके असती, गेलाबाजार अॅव्हरेज असती तर त्या बाईंना इतक्या शिव्या पडल्या असत्या का? म्हणजे त्यांनी भाषणात जे काही विठाई थाळी, अक्कलकोटाची स्वामीसमर्थ थाळी आदी फिरुन संशोधन करुन सिध्द केल्या गेलेल्या थाळ्यांचे वेगळेपण नावाची चीज काही चेक केली गेली आहे का? केवळ फॅन्सी नावे मेनूत टाकून त्याच त्याच भाज्या वाढणे म्हणजे आंत्रप्रुनरशिप मिरवणारे खरोखरीच डोक्यात जातात. त्यातल्या त्यात ह्या प्रकारासाठी मोजली जाणारी किंमत तर दिव्य आहे. खरोखर पुण्यात ६०० रुपयाचा पिझ्झा, ३५० रुपयाची थाळी, २८० रुपयाची एखादी पंजाबी भाजीची डिश, ८०-१०० रुपयाचा नान व रोटी अशा किंमती केवळ स्थानमाहात्म्यामुळे आहेत की केवळ लोक देतात तेवढा पैसा म्हनून आकारायची पध्दत आहे? म्हणजे लोक इतके पैसे कशासाठी मोजतात हा मला पडलेला प्रश्न आहे. पूर्णब्रह्माची गोष्ट बाजुलाच पण वीकेंडास गर्दीने वेटींग पण ओसंडून वाहणार्या हॉटेलात लाजवाब, कधी चाखली नाही इतपत स्वादिष्ट, अप्रतिम अशी मनापासून दाद द्यावी असे अन्न सापडलेच नाही. गागुचका म्हणलात तरी हरकत नाही पण माझी सोलापुरी जीभ अशा अन्नाचे इतके पैसे देऊन इतके कौतुक करायला धजत नाही हेच खरे.
संधी मिळाली तर टाकणार भो आपण पण हाटेल....पुण्यात.
20 Aug 2018 - 6:41 pm | सतिश गावडे
प्रतिसादांत उल्लेख असलेला व्हिडीओ युट्युबवर आहे का?
20 Aug 2018 - 7:09 pm | पिलीयन रायडर
https://youtu.be/AHoABEdAFmQ
21 Aug 2018 - 10:06 am | सतिश गावडे
धन्यवाद.
21 Aug 2018 - 2:42 pm | स्वधर्म
हा व्हिडीअो. पोशाखापासूनच ‘जितं मया’ शैली इरिटेटिंग अाहे. मी बाहेर जाऊन थाळी खाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तथापि, मराठी जेवण महाराष्ट्राबाहेर अाणि देशाबाहेरही पोहोचवत अाहेत, हे अावडले.
21 Aug 2018 - 12:33 pm | सोमनाथ खांदवे
बाई मुळच्या कुठल्या हे माहीत नाही . पण व्हिडीओ बघताना त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वाक्याला अहंकार ओसंडून वाहत होता . सतत स्वतःचे कौतुक चालले होते . अहंकार मुळे ग्राहकांना गृहीत धरण्याची वृत्ती वाढीस लागते व त्याचा परिणाम क्वालिटी वर झाला असेल .
21 Aug 2018 - 2:56 pm | खटपट्या
सहमत, १७ वर्षे आयटीत काम केल्यावर बर्यापैकी पैसे साठवून नविन व्यवसाय सुरु केला असणार. पण हालाखीच्या परीस्थीतीतून, शुन्यातून हातात काहीच नसताना कीतीतरी महीला पोळीभाजी आणि अन्य खाद्यपदार्थ विकून चांगले पैसे कमावत आहेत. पण अशी जाहीरात कधी पाहीली नाही.
उदाहरणादाखल खालील लिंक पहा
https://www.youtube.com/watch?v=2zY5NkswIow
20 Aug 2018 - 10:35 pm | बोलघेवडा
पुण्याला नाव ठेवायची फॅशन आहे. त्यामुळे फार लक्ष देत नाही. चांगली महाराष्ट्रीय थाळी पाहिजे असेल तर आपटे रोड वरील श्रेयस आणि Law College रोड वर कृष्णाला पर्याय नाही. स्वस्तात उत्तम दर्जा हवा असल्यास आपटे रोड वर आशा डायनिंग हॉल भेट द्या. सिहगड रोड वरील आनंदी डायनिंग
हॉल हि चांगला आहे.
21 Aug 2018 - 10:31 am | जेम्स वांड
सकळ त्रिखंडातलं सगळंच सर्वोत्तम, त्याला कोण काय करणार? चांगल्या गोष्टींना नावे ठेवत नाहीये कोणी, पण जे चूक आहे त्याला कोणी चूक म्हणत असेल तर उगाच खुपवून घेण्यात अर्थ नाही.
20 Aug 2018 - 11:05 pm | यशोधरा
फेसबुकवर पुणे इट आऊट म्हणून ग्रुप आहे त्यावर हे लेखन आहे, ते तुम्हीच टाकलं आहे का तिथे?
21 Aug 2018 - 9:21 am | आनन्दा
हो..
21 Aug 2018 - 10:20 am | यशोधरा
अच्छा.. ओके.
21 Aug 2018 - 4:01 pm | माहितगार
http://www.purnabramha.com/feedback---compliments-.html हि लिंक त्यांच्या वेबसाईटवर आढळली. धर्मराजमुटकेंप्रमाणे खुपणं हे संबंधीतांना कळवणे केव्हाही चांगले असे वाटते. त्या नंतर अनुभव चांगला आला तर ठिकच आहे आणि नाही आला तर सोशल मिडिया चर्चेस जो काही अनुभव असेल तो शेअर करण्यास उपलब्ध आहेच.
21 Aug 2018 - 4:40 pm | आनन्दा
खरे आहे.. सामान्यपणे मी तेच करतो. पण त्या दिवशी फसवणूक, अपमान, अपेक्षाभंग वगैरे अनेक भावना साठल्या होत्या ज्याचा परिपाक म्हणून सोशल मिडिया पोस्ट घडली.
कधी वाटते मझे चुकले की काय. पण त्या दिवशी फेसबूक वर टाकल्यावर ज्या पोस्ट आल्या त्यातून असे जाणवले की पुण्यात तरी हॉटेलच्या मॅनेजमेंटने या गोष्तींचा विचारच केलेला नाही. असंख्य लोक त्यांना फीडबॅक देऊन आलेत, पण त्यांची क्वलिटी तशीच आहे. त्यामुळे त्याना कोणीतरी असा प्रसाद देणारच होते. योगायोगाने ते काम मझ्याकडुन घडले इतकेच. दुसरे म्हणजे, जेव्हा त्यानी सोशल मिडिया चा जाहिरातीसाठी वापर केला तेव्हा त्यानी हा विचार करायला हवा होता की जर आपण तो दर्जा देऊ शकलो नाही तर हे सारे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकते. तेव्हाची मिळालेली गुड पब्लिसिटी चांगली आणि ही वाईट असे नाही चालणार. आणि तसेही बाइ मराठी मानसाना त्यांच्या चिन्धीगिरीसाठी शिव्या घालताना दिसतातच, त्यामुळे त्याना या साधनाच्या मर्यादा माहीत असाव्यात अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी.
असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?
21 Aug 2018 - 5:41 pm | माहितगार
तुम्ही सोशल मिडियावर लिहिलेत त्या बद्दल काहीच म्हणणे नाही, पण सोबत त्यांच्या मुख्य मॅनेजमेंटला लिहिणेही उत्तम. हवे तर आता पर्यंत आलेल्या निवडक फिडबॅकची जंत्री बनवून दिल्यासही हरकत नाही.
तो युट्यूब मधले सादरीकरण पाहून आभिमान आणि आत्मप्रौढी मधला फरकही कुणितरी नजरेस आणून देणे गरजेचे असावे असे मलाही वाटले. पण शेवटी कुणि मराठी उद्योजक प्रयत्न करताहेत तेव्हा आपण फुल न फुलाची पाकळी एकदा कल्पना देऊन पहावी एवढेच.
21 Aug 2018 - 6:57 pm | ट्रम्प
' तो ' व्हिडिओ पाहून सुद्धा त्या थंड बाईच्या थंड हॉटेल मध्ये थंड जेवण करायला धागा मालक गेलेच कसे ? हा मुख्य मुद्दा आहे . व्हिडिओ पहिल्या नंतर त्या ऍरोगंट बाईच्या हॉटेल मध्ये पैसे घालवून जेवण करणे शुद्ध मूर्खपणा आहे तरीपण बाकी मिपाकरांना सावध केल्या बद्दल धन्यवाद .
21 Aug 2018 - 9:46 pm | आनन्दा
खरे तर परवा पूर्णब्रह्म वर पोस्ट टाकल्यावर इतका गदारोळ होईल अशी अपेक्षा नव्हती. बऱ्याच लोकांनी मला पाठिंबा दिला तर काही लोकांनी तू मुद्दाम नेट-पिकिंग करतोयस असे आरोपही केले. मी देखील स्वतःचे परीक्षण केले. कदाचित हे हॉटेल इतके खराब नसेल ही, किंबहुना ते तसे नसावे अशी मला देखील अपेक्षा आहे. म्हणून मग माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अजून एक लेख लिहायचा निर्णय घेतला.
साधारण 10 वर्षे मी पुण्यात वेगवेगळ्या मराठी रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवत आहे. अगदी गिरीजा आणि आनंदी पासून मयूर, पंचवटी आणि सुकांता पर्यंत सगळ्या थाळ्या मी टेस्ट केल्या आहेत. आणि पूर्वी देखील कुठेतरी लिहिल्याप्रमाणे या सर्व थाळ्या एकसुरी आहेत, म्हणजे त्याच भाज्या, कोशिंबिरी, आणि मुख्य म्हणजे स्वीट चे तेच ते प्रकार. श्रीखंड, गुलाबजाम, फ्रुटसलाद किंवा बासुंदी.
पुरणपोळी किंवा मोदक म्हणजे चैन अशी स्थिती काही दिवसांपूर्वी होती, सध्या थोडा फरक पडलाय. राजस्थानी असेल तर सोबत जिलबी आणि अन्य काही वेगळे स्वीट असतात.
महाराष्ट्रात डेलिकेसी इतक्याच आहेत का? कोकणातच श्रावणात होणारे वेगवेगळे प्रकार बघितले तरी 10 तरी वेगळे पदार्थ मिळतील. पण कोणत्याही कारणाने का असेना हे पदार्थ इथे मिळतंच नाहीत, त्यामुळे या साऱ्या थाळ्या मध्ये एकप्रकाराचा एकसुरीपणा आहे.
या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या डेलिकेसी देणारे एक मराठी रेस्टॉरंट सुरू करावे असे साधारण 3-4 वर्षे डोक्यात चालू आहे, पण इतर अनेक जबाबदाऱ्या आणि काही कारणाने ते जमत नाहीये.. पण त्याची रूपरेषा माझ्या डोक्यात होती..
योगायोगाने जयंती कठाळे यांचा स्वयं मधला व्हिडिओ कुठेतरी पाहण्यात आला, आणि कुठेतरी आत भिडला. असं जाणवलं की माझ्या स्वप्नात हे हॉटेल आहे, तेच या ताई प्रत्यक्षात आणत आहेत.. तेव्हाच ठरवलं होतं की केव्हातरी या नेमकं काय करतायत हे बघायला हवे. त्यावेळेस हा फ्रेंचैझी वगैरे प्रकार डोक्यात नव्हता, पण जयंती कठाळे या माझ्या रोल मॉडेल होत्या, या बाबतीत.
पुण्यात जेव्हा यांचं उदघाटन झालं तेव्हा मी नेमका दुसऱ्या कामात स्वस्त होतो, आणि तसे बिबवेवाडी लांबही होते, त्यामुळे जाणे झाले नाही. म्हणून शेवटी एका रविवारी संध्याकाळी तळजाई आणि पूर्णब्रह्म असा प्लॅन केला.
पण तिथे जाण्यापासून धक्क्यावर धक्केच बसत गेले आणि त्याची परिणती एका मोठ्या पोस्टमध्ये झाली, ज्याचा मला स्वतःलाच खूप त्रास झाला..
विचार करत गेलो तसे मला कळत गेले की कुठे काय चुकत गेले ते. नुसते जेवण खराब असते तर मला इतका त्रास झाला नसता. मी काउंटरवर सांगून बाहेर पडलो असतो की मला जेवण नाही आवडलं, पण यावेळेस योगायोगाने चेन ऑफ इनसिडेंट घडत गेली, ज्याने शेवटी कडेलोट झाला, त्यामुळे मी आता या सगळ्या गोष्टी एक एक करून घेणार आहे, काय चुकलं, आणि काय करता आले असते ते.
या सगळ्या सांगण्यामध्ये एका मल्टिनॅशनल चेन माझ्या काय अपेक्षा होत्या ते ही मी विशद करीत जाणार आहे.
सुरुवात झाली ती navigation पासून, गूगल मॅप वर दोन लोकेशन असणे हे धंद्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. विशेषतः जेव्हा येणाऱ्याला 4 सिग्नल फिरून यावे लागते तेव्हा. आणि हॉटेलच्या नावाचा साइन बोर्ड रस्त्यावर व्यवस्थित असणे आवश्यक आहे. हॉटेल शोधायला आम्हाला साधारण 25 मिनिटे लागली, यावरून ते किती कठीण होते याचा अंदाज येईल. पत्त्यामध्ये जवळची लँडमार्क असणे आवश्यक आहे.
मला त्या हॉटेलात जायचेच होते म्हणून मी शेवटी ते हॉटेल शोधून काढले. पण आत गेल्यावर साधारण 20x20 च्या जागेत गाड्या लावायच्या होत्या, आणि त्यात मध्यभागी 2 आंब्याची झाडे होती. ती झाडे चुकवून माझी 4.25 मीटरची गाडी लावायची होती. आणि ती देखील अन्य कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन. बाहेर बसलेल्या एक ताई आमची गाडी बघून आत निघून गेल्या. मग मी थोडं मागे पुढे करुन गाडी लावली, ती बहुधा नीट लावली गेली नव्हती, पण माझा नाईलाज होता.
यात काय सुधारणा करता येऊ शकते? आखलेले पार्किंग हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आखलेले पार्किंग असते तर नेमकी कशी गाडी लावली की रस्ता अडणार नाही हे मला कळले असते.
पुढची गोष्ट मेनू ची - माझ्या माहितीनुसार हे मुख्यतः a la karte रेस्टॉरंट आहे, मग थाळी ची जाहिरात का? लिमिटेड थाळी ही एक कोम्बो ऑफर आहे, पण हॉटेलचा USP वेगवेगळे पदार्थ हा आहे. पण बाहेर लावलेला खानावलीसारखा "आजचा मेनू" हा एका थाळी रेस्टो चा फील देत होता. मेनू मध्ये देखील थाळी ची व्हरायटी पहिल्या पानावर, आणि मग थाळी तुम्हाला नको असेल तर बाकीचे पदार्थ अशीच मांडणी होती, त्यामुळे आम्ही थाळी ऑर्डर करणे साहजिक होते.
काय सुधारता येईल? तुमचा USP काय आहे ते आधी ठरवा, थाळी असेल तरच थाळी ठेवा, नाहीतर a la karte असेल तर ते हायलाईट करा. आधी तो बाहेरचा फलक काढून टाका, ते तुमच्या स्टॅंडर्ड ला शोभत नाही.
आता कस्टमर एंगेजमेंट बद्दल-
हे माझ्या आयुष्यातले पहिले रेस्टो होते जिथे जेवण दिल्यानंतर कोणीही काही विचारायला आले नाही.. सामान्यपणे एखादा कस्टमर आल्यावर आपण त्याला आपल्याकडील सर्वोत्तम ऑफर करतो.. मला बाहेर पडताना दिसले की हॉटेलमध्ये अतिशय सुंदर भारतीय बैठक होती. पण ती मला दिसलीच नाही. माझ्याकडे छोटी मुलगी होती, जिने टेबलावर धिंगाणा घातला. खरे तर अश्या वेळेस हॉटेलमालक स्वतः होऊन काय सुटेबल आहे ते सजेस्ट करतात. थोडेसे प्रोऍक्टिव्ह कस्टमर management करायला हवी..
त्याचप्रमाणे गिऱ्हाईकांचे पान रिकामे व्हायला लागले की नवीन पदार्थांची ऑर्डर मिळायची संधी असते. पण ते तितकेच लिमिटेड नाही, तर त्या निमित्ताने फीडबॅक पण मिळतो. जर तेव्हा मला कोणी ऑर्डर विचारायला आले असते तर मी तिथेच बोललो असतो की मला जेवण आवडले नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि मला वाटतं हा अप्रोच ठेवला तर माझ्यासारखे बरेच unhappy customers तिथेच mitigate होतील. आठवा, UPA2 का पडलं, त्यांना ऐकू जात नव्हतं..
बाकी जेवणाबद्दल अगोदरच बोलून झाले आहे, त्यामुळे परत बोलत नाही, फक्त काही गोष्टी नमूद करतो
1. फ्रीजमधली काकडी काढून किसणे, आणि संध्याकाळच्या कोशिंबिरीसाठी सकाळी काकडी किसून फ्रीजमध्ये ठेवणे, याने चवीत खूप फरक पडतो.
2. त्याचप्रमाणे फ्रिजमधून पुरण काढून पोळी लाटणे आणि सकाळी पोळी करून अर्धी भाजून मग संध्याकाळी पुन्हा गरम करणे, याने चवीत खूप फरक पडतो. असे जर तुम्ही करत नसाल तर पोळ्या का चामट होतात यावर अभ्यास केलाच पाहिजे. मी प्रामाणिकपणे सांगतो, शेवटची पोळी खायला आणि तोडायला त्रास होत होता.
तुम्ही कदाचित 2-2 महिने फ्रीज करत नसाल, पण पोळी अर्धी भाजून ठेवल्याने पोळीची वाट लागते. परदेशामध्ये हेच करतात, आणि म्हणून तिथल्या तसल्या पोळ्या खाणाऱ्यांची पोटे बिघडतात.
3. मीठाचा वापर कमी असलेलाच बरा. कढी आणि वरण मी केवळ खारट असल्यामुळे खाऊ शकलो नाही.
4. मोठ्या वाट्या भरून लिमिटेड देण्यापेक्षा छोट्या वाट्या भरून द्या आणि परत सर्व करा. सर्व करायचे कष्ट वाचवायचे असतील तर भरलेल्या वाट्या टेबलावर ठेवा. लोक पाहिजे तर घेतील. पण केवळ पानात आहे म्हणून माझ्यावर वाटीभर वरण संपवायची सक्ती कशाला?
असो, बोलण्यासारखे बरेचकाही आहे, पण किती बोलणार? फक्त आमच्या तुमच्याकडून थोड्या जास्त अपेक्षा आहेत हे कृपया ध्यानात घ्या आणि मुख्य म्हणजे पुण्यात तुमची स्पर्धा सरावना भुवनशी नसून श्रेयस पंचवटी कृष्णा सुकांता किंवा दुर्वांकुर बादशाही आणि स्वीकार शी आहे इतके लक्ष्यात असू द्या म्हणजे झाले. इत्यलम।
21 Aug 2018 - 10:28 pm | माहितगार
थोडक्यात 'व्हॅल्यू फॉर मनीचा अभाव' म्हणता येइल. हे पुर्ण्ब्रह्मा चेनचे स्वतःच्या मॅनेजमेंटकडुन चालवले जाणारे असल्यास फारच वाईट स्थिती म्हणावी लागेल. पण माझ्या अंदाजाने बढाईत बुडालेली मुख्य कंपनी प्रत्यक्षात सपोर्टला कमी पडते, सपोर्ट कमी झाला अथवा अपेक्षीत उत्पन्न हाती लागले नाही की फ्रँचाईझी इंटरेस्ट कमी होतो, मलातरी इनिशीयल इंटरेस्ट संपलेल्या फ्रँचाईजीची केस असण्याची शक्यता अधिक वाटतीए. असो.
22 Aug 2018 - 3:15 pm | लई भारी
आपल्या मुद्द्यांशी अगदी सहमत आहे.
ग्राहक म्हणजे मी राजा आहे अशी वागणूक द्यावी अशी अपेक्षा नाही, पण सौजन्यपूर्वक बोलणे, अभिप्राय दिल्यास त्याची वेळीच दखल घेणं महत्वाचं आहे.
उत्तम जेवण मिळावं ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. त्यातूनही एखाद्या दिवशी काही अपरिहार्य कारणांमुळे काही वाईट अनुभव येऊ शकतो पण अशा वेळी ग्राहकांशी नीट संवाद ठेवणं अपेक्षित आहे असं वाटतं.
पुण्यात बऱ्याच महाराष्ट्रीयन जेवणाच्या ठिकाणी अभिप्राय दिला तरी 'आमच्याकडे असंच असतं' असा आविर्भाव असतो, पण जवळपास सर्व ठिकाणी बहुतांश लोकांना आवडेल असे जेवण असते त्यामुळे चालून जातंय.
25 Aug 2018 - 6:42 pm | सुबोध खरे
आनंदराव
तुम्हाला त्या हॉटेलचा अनुभव सर्वतोपरी वाईट आला हि वस्तुस्थिती आणि त्याबद्दल तुम्ही मुद्देसूद लिहिले आहे मग त्याबद्दल तुम्ही स्वतःला दोषी वाटून घेण्याचे कारण नाही. त्या "ताई"नि जर आपलीच लाल म्हणून व्हिडीओ प्रसारित केला आणि सार्वजनिक न्यासावर आपली भलामण करणारे लेख लिहिले असतील तर त्याचा वाईट अनुभव सुद्धा प्रसारित होणारच आणि व्हायलाच पाहिजे. एकदा खिडकीत बसले कि खालून लोक शुकशुक करणारच, म्हणून कुणाला चिडण्याचे कारण नाही.
असा अभिप्राय घेऊन त्या ताईंना सुधारायचे आहे कि इडली वाल्या कामतांच्या वाटेवर जायचे आहे हे त्यांनी ठरवायचे आहे.
तुम्ही कुणाला आपल्या लेखनाचे समर्थन देण्याचे कारण नाही.तुम्ही दमड्या मोजल्या आहेत चिंचोके नाहीत. भिकार असेल तर भिकारच म्हटले पाहिजे उगाच मारुतीच्या बेंबीत बोट घालून इतरांना खड्ड्यात पाडण्यात हशील नाही.
25 Aug 2018 - 7:22 pm | प्रचेतस
कामतांनी भारंभार फ्रांचाईझी दिलेली हाटेलं तद्दन भिकार आहेत.
21 Aug 2018 - 9:54 pm | नाखु
नुकतेच सुरू झाले आहे,
स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराकडून धनेश्वर कडे जाताना डाव्या हाताला जेमतेम पन्नास पावलांवर पहिल्या मजल्यावर आहे.
रोज बदलता मेनू असतो, मिष्टान्न अमर्यादित तरी वाजवी दरात , अनुभव हीच खात्री, फक्त सोमवारी बंद,
आणि हो चतुर्थी ला उकडीचे मोदक असतात
अनुभवी नाखु
21 Aug 2018 - 11:22 pm | पिलीयन रायडर
पंडित कुलकर्णींचे ना? चांदीच्या ताटात वाढतात ते?
आम्ही वर्षानुवर्षे त्यांच्याकडून स्वयंपाक मागवतो..उत्तम चव! परवाच मासवडी, पुरणपोळी, मसालेभात वगैरे जेवण मागवलं होतं. छानच होतं.
22 Aug 2018 - 4:15 pm | हतोळकरांचा प्रसाद
व्हाट्सऍप वरची पोस्ट बघून दोनच दिवसांपूर्वी ट्राय केले, खेदाने सांगावे वाटते अजिबात चांगले वाटले नाही जेवण. साधारणपणे आमच्या हापिसात असतात तसल्या पोळ्या, पिठले, मटार रस्सा, मसालेभात, कढी यापॆकी काहीच व्वा म्हणण्यासारखे नव्हते. खव्याच्या पोळ्या म्हणून जे काय होते ते बाहेरून आणलेले पेढे + बेसन असे काहीसे मिश्रण घातल्यासारखे वाटत होते. आणि ओल्या नारळाच्या करंजीत घालायचे सारण हा हि एक गोड पदार्थ असतो हे माहितीच नव्हते, नारळाचा हलवा कि काहीतरी नाव दिले होते.
त्यांचे वैयक्तिक केटरिंग कसे असते ते माहिती नाही, पण थाळी नाही आवडली. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो.
सध्या चिंचवड मध्ये अगदी आवर्जून (माझ्यामते) खाण्यासारखी थाळी म्हणजे "रागा" थाळी. चिंचवड स्टेशन चौकात द्वारकादास शामकुमारच्या समोर, जस्ट कॅजुअल्स च्या बाजूला. छान व्यवस्था आणि छान जेवण. उगाच भरमसाठ पदार्थांचा भडीमार न करता ताटातले सगळे पदार्थ (आणि खासकरून भाज्या) खाता येतील असा मेनू. दोन स्वीट्सपैकी बरेच वेळेस उकडीचे मोदक + तूप हे एक असते.
थरमॅक्स चौकातील संस्कृती डायनिंग हॉल पण ट्रे करण्यासारखा आहे.
22 Aug 2018 - 4:32 pm | पिलीयन रायडर
हो? अरेरे... मी स्वतः थाळी नाही खाल्ली जाऊन पण केटरिंग मात्र अनेक वर्ष झाले घेत आहोत..
डांगे चौकात रसरंग की असेच काही तरी नाव असलेले हॉटेल आहे. तिथे पण बरी थाळी मिळते असं आई म्हणत होती.
22 Aug 2018 - 4:55 pm | मराठी कथालेखक
रसगंध नाव आहे.
मी एकदा गेलो होतो. चांगले आहे पण अप्रतिम नाही. भाज्या ठीक वाटल्या , बाकी पदार्थ तुलनेने चांगले होते .नेमकं आठवत नाही पण बहूधा छोटे बटाटेवडे होते , ते चांगले होते. गोड पदार्थ काय होता आठवत नाही पण चांगला होता. पण अगदी आवडीने खावीशी वाटावी अशी एकही भाजी वाटली नाही त्यामुळे नंतर पुन्हा गेलो नाही. तरी अजून एखाद वेळेस जाईन कधीतरी.
22 Aug 2018 - 12:57 am | रीडर
सेल्फ obsessed वाटत आहेत या बाई.
22 Aug 2018 - 1:04 am | रीडर
22 Aug 2018 - 8:54 am | हुप्प्या
बाईंनी मोठ्या घमेंडीत सांगितले की त्या हल्ली फक्त नऊवारीत वावरतात. पण नंतर बोलताना मुले त्यांना ममा की मामा असे म्हणतात असे कळले. नऊवारी साडी नेसलेल्या आईला आई म्हणणे मागासलेले वाटते का की पोरे तिला ममा म्हणणे पसंत करतात?
बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर?
डी एस केंची काही भाषणे ऐकली आहेत त्यातही असाच एक अहंकार जाणवतो. पण थोडा सौम्य. बाईंचा अहंगंड म्हणजे त्यापुढे गगनही ठेंगणे!
22 Aug 2018 - 12:26 pm | माहितगार
उर्वरीत टिका ठिक, पण अशुद्ध भाषाशास्त्राचे येथे प्रयोजन साशंकीत असावे किंवा कसे.
22 Aug 2018 - 2:10 pm | खटपट्या
+१
22 Aug 2018 - 4:40 pm | ट्रम्प
अहंकारापाई त्या बाईने माती खाल्ली हे व्हिडिओ मध्ये दिसलेच होते . ' आमची कुठेही शाखा नाही ' नंतर आता असले व्हिडिओ म्हणजे स्वकौतुक करण्याचा नवीन प्रकार दिसतोय जे व्यवसायाला मारक आहे . स्वकौतुक करणारे कुठल्याही जातीधर्माचे किंवा गरीब , श्रीमंत असुद्या ते डोक्यातच जातात .
कष्ट करून बांधकाम क्षेत्रात नाव कमावलेला डी एस के साळसूदपणे गुंतवणूकदारांचे पैसे अवैधरीत्या त्याच्याच वेगवेगळ्या कम्पन्या मध्ये फिरवत होता हे तपासात सापडले च ना ? बरं ही फिरवा फिरवी करताना वर परत अहंकाराचीच भाषा .
11 Jun 2019 - 12:07 am | एकुलता एक डॉन
त्या नाग पुर च्या आहेत