पूर्णब्रह्माचा अपमान!!

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
19 Aug 2018 - 10:15 pm

बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे.

त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं.
मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो.

हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली. मॅपवर 2 लोकेशन दिसली, एकाच भागात, त्यातलं एक निवडलं, आणि निघालो, तिथे पोचलो तर कळलं की हे हॉटेल या गल्लीत नाहीच, शेजारच्या गल्लीत आहे.. बरं शेजारची गल्ली म्हणजे कशी, तर सातारा रोड वर बाहेर यायचं, रांका पासून मार्केट यार्ड पर्यंत जायचं, आणि U टर्न मारून परत यायचं. आणि मग शोधत शोधत जायचं, रस्त्यावर बोर्ड नाही, एक बोर्ड होता तो झाडात लपलेला, कसाबसा तो मिळाला, आणि आम्ही आत गाडी टाकली.
गाडी लावणे म्हणजे मोठे दिव्य होते. झाडांच्या मधून जागा शोधून गाडी लावायची, नो पार्किंग असिस्टंट. तिथे एक बाई होती ती आम्हाला बघून आत निघून गेली.

बाहेर मेनू लावलेला होता पालकाची भाजी, लाल भोपळा, पुरणपोळी, कढी वगैरे. मेनू बघून आत जाऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण केव्हातरी जायचेच आहे तर आताच जाऊया म्हणून गेलो.

आत गेल्यावर पुणेरी पद्धतीने थंड स्वागत झालं, फक्त इतकंच कळलं की यांच्याकडे थाळी आणि इतर मराठी पदार्थ पण आहेत. एकंदर वातावरण बघून बायको तर परत जाऊया म्हणत होती, पण तिला थांबवलं. आणि मेनुकार्ड मागवलं.
एका इंजिनीरिंग च्या पुस्तकाएव्हढं मेनूकार्ड होतं.. साधारण चाळल्या वर इतकं कळलं की आज 350 रु वाली महालक्ष्मी थाळी आहे.
*लिमिटेड थाळी - 3 पोळ्या, एक पुरणपोळी, भोपळा, पालक, कढी, वरण, भात, लोणचे, चटणी, भजी, साबुदाणा वडा, पापड इत्यादी. थाळी लिमिटेड, किंमत 350 रु* .
खरे तर शहाण्या माणसाने इथेच मागे फिरायला हवे होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्ही 2 थाळ्या ऑर्डर केल्या आणि बसलो. जेवण आलं, आता आपण लिमिटेड पदार्थांचा आस्वाद घेऊ.

*साबुदाणा वडा -* मोठ्या पेढ्याइतक्या आकाराचे 2 वडे. टेस्ट ओके.
काकडीची कोशिंबीर - फ्रीजमध्ये साठवलेल्या काकडीची कोशिंबीर असावी बहुतेक. ठीक म्हणावी इतपत.
*पुरणपोळी 1 नग -* 100 टक्के फ्रोझन पोळी गरम करून दिली असणार. आम्ही त्याला एक फुलकाच समजत होतो, पण तो थोडा गोड होता, म्हणून त्याला पुरणपोळी म्हणणे भाग होते. जाड पापुद्रा, पुरणाचा अभाव, आणि खात जावे तशी चामट होत जाणारी. ज्यांनी अमेरिकेत मिळणारी फ्रोझन पोळी खाल्ली असेल त्यांना नक्की कळेल. पुण्यात त्या पदार्थाला पुरणपोळी म्हणण्याची हिंमत मी करु शकत नाही.
*साधी चपाती -* 3 चपात्या, थोड्या जास्त भाजलेल्या, आणि गार होतील तश्या चामट होत जाणाऱ्या. या पण फ्रोझन असाव्यात. तिसरी चपाती, जी गार झाली ती चावतच नव्हती.

एक गोष्ट सांगायची राहिलीच, पहिली चपाती अर्धी खाऊन झाल्यावर त्यांनी *वेलकम ड्रिंक* आणून दिले, guess what? एक कटिंग चहा इतके ताक!! म्हणे वेलकम ड्रिंक. हे वेलकम ड्रिंक बघून अक्षरशः डोळे पाणावले. फोटो काढायचा मोह कटाक्षानं आवरला.

हं, तर पुढचे पदार्थ
*भजी* - सुपारीच्या आकाराची 3 भजी.
मीठ वाढतो तितकी शेंगदाण्याची चटणी आणि मेतकूट.
*भोपळ्याची भाजी -* सालीसकट केलेली लाल भोपळ्याची भाजी, जी अर्धी मी बटाट्याचा रस्सा समजून खाल्ली, अर्ध्यात बायकोने आठवण करून दिली की तो भोपळा आहे!
*पालक रसभाजी* - दाणे, खोबरं आणि मसाला घातला की काहीही खपतं असा त्यांचा बहुधा गैरसमज असावा. त्यात पालक शोधावाच लागत होता, पण त्यातल्या त्यात तीच चांगली लागत होती .
*कढी -* आंबट दही तसेच घट्ट घुसळून त्याची कढी केलेली. ना आपण घरी करतो तशी मिरचीची फोडणी वगैरे असलेली होती, किंवा ना कढी खिचडी सारखी. मेस मध्ये असते तशी चव साधारण होती. आणि खारट!
*वरण* - खारट!

*आणि भात!!* तो सुंदर असणार, कारण त्यांनी तो दिलाच नाही. आम्ही पण मागायला गेलो नाही! इतकं सुंदर जेवण जेऊन पोट भरलं होतं!!
आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, पण साडेतीनशे रुपयात असले जेवण विकणे हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान आहे! परदेशात चालेल हे असले जेवण, पण पुण्यात तर नाहीच नाही!

आता सर्विस बद्दल बोलूया - *अत्यंत मितभाषी स्टाफ* असणार! कारण *आम्हाला जेवण दिल्यावर कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही* . हवं नको वगैरे फारच लांब राहिलं!!

जेवण झाल्यावर बिलाचे पैसे द्यायची वेळ आली, बिलात 350 रु ची थाळी आणि वरती सर्विस टॅक्स बघून माझी सटकलीच होती.. *जी एस टी सकट 735 रु फक्त!* *बिल देताना विचारले, की आजच्या थाळीत भात होता का? तर फक्त सौजन्याने त्यांनी विचारले, तुम्हाला मिळाला नाही का? (सॉरी वगैरे जाऊदे, पण पुढे बोलणे पण नाही, किमान आतल्या माणसाला काय झाले आहे ते विचारावे इतकीच अपेक्षा होती)* केवळ मला भांडायची इच्छा नव्हती, त्यामुळे शांतपणे मी पैसे देऊन बाहेर निघालो होतो, पण तेव्हढ्यात त्यांनी कळ काढली!! मला त्या बाई पुढच्या वेळेस आलात तर डिस्काउंट कूपन देते म्हणून सांगू लागल्या!!
मग मात्र माझी सहनशक्ती संपली. शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!

संस्कृतीपाकक्रियापारंपरिक पाककृतीआस्वादसमीक्षाअनुभवशिफारस

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

27 Aug 2018 - 6:35 pm | पद्मावति

खरे तर आताशा मला मराठी थाळीपेक्षा आंध्र थाळीच जास्त भारी वाटू लागली आहे अगदी अगदी, मलाही आवडते आंध्र थाळी /जेवण. चटण्या तर अप्रतिम असतात. दोडकी, वांगी, गवार कुठल्याही भाज्यांच्या इतक्या छान चटण्या बनवणे तिकडचे लोकंच बनवू जाणेत. कस्टमर सर्व्हिस पण उत्तम. खचाखच हॉटेल भरलं असून सुद्धा एखाद्या ग्राहकाची आवड लक्षात ठेवून ऑर्डर करण्याच्या आधीच टेबल वर 'गारे' ( मेदू वड्यांचं चटपटीत व्हर्जन) आवर्जून आणून देणाऱ्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं.
बाकी मराठी रेस्टॉरंट्सचा तर मला फारसा अनुभव नाही पण एकूण मराठी ग्राहकसेवेचा अनुभव माझा तरी फारसा बरा नाही. प्रामाणिकपणा असतो. उदाहरणार्थ एखाद्या पदार्थाची ऑर्डर दिली की प्रामाणिकपणे सांगतात की हा पदार्थ तुम्ही सांगितलेल्या दिवसापर्यंत आम्ही देऊ शकत नाही किंवा हा पदार्थ आम्ही बनवतच नाही. ते खरोखर चांगलंय पण बोलण्याची पद्धत चांगली नसते. म्हणजे आपल्याला ऑर्डर दिल्याबद्दलअल्मोस्ट गिल्टी वाटायला लागतं :) याउलट अमराठी दुकानांमध्ये. बिनधास्त हो म्हणतात मग भलेही गोंधळ घालतील.

श्वेता२४'s picture

30 Aug 2018 - 5:08 pm | श्वेता२४

मुंबईत कुठेशी मिळतात या आंध्र थाळ्या कुणी सांगावे

गणामास्तर's picture

26 Aug 2018 - 10:51 am | गणामास्तर

पुण्याची खाद्यसंस्कृती कशी का असेना किंवा पहिली मिसळ कुठं का बनवेनात , आपल्याला चांगली मिसळ खायला मिळाल्याशी मतलब.
बाकी, पुण्यात जितक्या प्रकारच्या किंवा चवीच्या मिसळ मिळतात तितक्या खचितच दुसऱ्या कुठल्या शहरात मिळत असतील. बेडेकरच्या 'गुळचट' पासून रामनाथच्या 'जहाल' आणि 'अतिजहाल' पर्यंत.
कुठल्या शहरात काय खावं याच भान असलेलं कायम बरं.

अवांतर : राहण्यासाठी मुंबई एकदम भिकार.

प्रचेतस's picture

26 Aug 2018 - 10:57 am | प्रचेतस

अवांतर : राहण्यासाठी मुंबई एकदम भिकार.

शतप्रतिशत सहमत.

सुनील's picture

26 Aug 2018 - 11:18 am | सुनील

राहण्यासाठी मुंबई एकदम भिकार

सातपट सहमत!

सतिश गावडे's picture

26 Aug 2018 - 11:57 am | सतिश गावडे

पुणेकर म्हणत आहेतः आली रे आली आता मुंबईची बारी आली ;)

नाखु's picture

26 Aug 2018 - 1:23 pm | नाखु

धागा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न म्हणतील पण आपण लक्ष्य देवू नये

गोलमाल चे नाही का तीन चार भाग आलै

कपिलमुनी's picture

26 Aug 2018 - 4:49 pm | कपिलमुनी

पुण्यात दुसऱ्या बाजीरावाने श्रीखंड प्रथम बनवले असे ऐकले आहे.
तो पुण्याचा आद्य पदार्थ मानायचा का

मराठी थाळी वगैरे सब झूठ आहे. आंध्र थाळीच काय ती खरी. ;)

प्रमोद देर्देकर's picture

27 Aug 2018 - 1:28 pm | प्रमोद देर्देकर

आमच्या मुंबईला भिकारी म्हँताव थांबा तुमची विमानं उद्याची बंदच करतो.

आख्या देशची आर्थिक राजधानी अनं म्हने मुंबई भिकारी

टर्मीनेटर's picture

27 Aug 2018 - 1:42 pm | टर्मीनेटर

'मुंबईत भयंकर गर्दीये' ही तक्रार मुंबईकराखेरीज इतरच लोक जास्त करत असतात. मुंबईतली हवा,गर्दी,डास असल्या गोष्टींना कोणीही कितीही नावं ठेवली तरी त्याला ती खुशाल ठेऊ द्यावीत. कारण मुंबईचा अभिमान बाळगलाच पाहिजे अशी काही अट नाहीये.म्हणजे मुंबईकर व्हायला ही अट लागतच नाही. ती पुण्याला, तिथे अभिमान पाहिजे. उलट मुंबईला कोणी जर 'एक भिकार' म्हणत असेल तर आपण 'सात भिकार' असं सांगून मोकळं व्हावं.

- पु.ल.देशपांडे
हा गुरुमंत्र फार प्रभावी आहे :)

सुनील's picture

27 Aug 2018 - 1:53 pm | सुनील

उलट मुंबईला कोणी जर 'एक भिकार' म्हणत असेल तर आपण 'सात भिकार' असं सांगून मोकळं व्हावं.

तेच तर केलय इथे!!

(सध्याचा ठाणेकर. जन्माने मुंबईकर)

टर्मीनेटर's picture

27 Aug 2018 - 2:02 pm | टर्मीनेटर

:)

आदिजोशी's picture

27 Aug 2018 - 8:38 pm | आदिजोशी

पुणेकरांनी आणि इतरांनी कितीही काहीही गाजावाजा केला, निरांजन ओवाळून घेतले तरी जगातला सर्वोत्तम शाकाहारी खाद्यपदार्थ 'आस्वादची मिसळ' आहे. त्यामुळे चालू द्या तुमचं...