बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे.
त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं.
मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो.
हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली. मॅपवर 2 लोकेशन दिसली, एकाच भागात, त्यातलं एक निवडलं, आणि निघालो, तिथे पोचलो तर कळलं की हे हॉटेल या गल्लीत नाहीच, शेजारच्या गल्लीत आहे.. बरं शेजारची गल्ली म्हणजे कशी, तर सातारा रोड वर बाहेर यायचं, रांका पासून मार्केट यार्ड पर्यंत जायचं, आणि U टर्न मारून परत यायचं. आणि मग शोधत शोधत जायचं, रस्त्यावर बोर्ड नाही, एक बोर्ड होता तो झाडात लपलेला, कसाबसा तो मिळाला, आणि आम्ही आत गाडी टाकली.
गाडी लावणे म्हणजे मोठे दिव्य होते. झाडांच्या मधून जागा शोधून गाडी लावायची, नो पार्किंग असिस्टंट. तिथे एक बाई होती ती आम्हाला बघून आत निघून गेली.
बाहेर मेनू लावलेला होता पालकाची भाजी, लाल भोपळा, पुरणपोळी, कढी वगैरे. मेनू बघून आत जाऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण केव्हातरी जायचेच आहे तर आताच जाऊया म्हणून गेलो.
आत गेल्यावर पुणेरी पद्धतीने थंड स्वागत झालं, फक्त इतकंच कळलं की यांच्याकडे थाळी आणि इतर मराठी पदार्थ पण आहेत. एकंदर वातावरण बघून बायको तर परत जाऊया म्हणत होती, पण तिला थांबवलं. आणि मेनुकार्ड मागवलं.
एका इंजिनीरिंग च्या पुस्तकाएव्हढं मेनूकार्ड होतं.. साधारण चाळल्या वर इतकं कळलं की आज 350 रु वाली महालक्ष्मी थाळी आहे.
*लिमिटेड थाळी - 3 पोळ्या, एक पुरणपोळी, भोपळा, पालक, कढी, वरण, भात, लोणचे, चटणी, भजी, साबुदाणा वडा, पापड इत्यादी. थाळी लिमिटेड, किंमत 350 रु* .
खरे तर शहाण्या माणसाने इथेच मागे फिरायला हवे होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्ही 2 थाळ्या ऑर्डर केल्या आणि बसलो. जेवण आलं, आता आपण लिमिटेड पदार्थांचा आस्वाद घेऊ.
*साबुदाणा वडा -* मोठ्या पेढ्याइतक्या आकाराचे 2 वडे. टेस्ट ओके.
काकडीची कोशिंबीर - फ्रीजमध्ये साठवलेल्या काकडीची कोशिंबीर असावी बहुतेक. ठीक म्हणावी इतपत.
*पुरणपोळी 1 नग -* 100 टक्के फ्रोझन पोळी गरम करून दिली असणार. आम्ही त्याला एक फुलकाच समजत होतो, पण तो थोडा गोड होता, म्हणून त्याला पुरणपोळी म्हणणे भाग होते. जाड पापुद्रा, पुरणाचा अभाव, आणि खात जावे तशी चामट होत जाणारी. ज्यांनी अमेरिकेत मिळणारी फ्रोझन पोळी खाल्ली असेल त्यांना नक्की कळेल. पुण्यात त्या पदार्थाला पुरणपोळी म्हणण्याची हिंमत मी करु शकत नाही.
*साधी चपाती -* 3 चपात्या, थोड्या जास्त भाजलेल्या, आणि गार होतील तश्या चामट होत जाणाऱ्या. या पण फ्रोझन असाव्यात. तिसरी चपाती, जी गार झाली ती चावतच नव्हती.
एक गोष्ट सांगायची राहिलीच, पहिली चपाती अर्धी खाऊन झाल्यावर त्यांनी *वेलकम ड्रिंक* आणून दिले, guess what? एक कटिंग चहा इतके ताक!! म्हणे वेलकम ड्रिंक. हे वेलकम ड्रिंक बघून अक्षरशः डोळे पाणावले. फोटो काढायचा मोह कटाक्षानं आवरला.
हं, तर पुढचे पदार्थ
*भजी* - सुपारीच्या आकाराची 3 भजी.
मीठ वाढतो तितकी शेंगदाण्याची चटणी आणि मेतकूट.
*भोपळ्याची भाजी -* सालीसकट केलेली लाल भोपळ्याची भाजी, जी अर्धी मी बटाट्याचा रस्सा समजून खाल्ली, अर्ध्यात बायकोने आठवण करून दिली की तो भोपळा आहे!
*पालक रसभाजी* - दाणे, खोबरं आणि मसाला घातला की काहीही खपतं असा त्यांचा बहुधा गैरसमज असावा. त्यात पालक शोधावाच लागत होता, पण त्यातल्या त्यात तीच चांगली लागत होती .
*कढी -* आंबट दही तसेच घट्ट घुसळून त्याची कढी केलेली. ना आपण घरी करतो तशी मिरचीची फोडणी वगैरे असलेली होती, किंवा ना कढी खिचडी सारखी. मेस मध्ये असते तशी चव साधारण होती. आणि खारट!
*वरण* - खारट!
*आणि भात!!* तो सुंदर असणार, कारण त्यांनी तो दिलाच नाही. आम्ही पण मागायला गेलो नाही! इतकं सुंदर जेवण जेऊन पोट भरलं होतं!!
आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, पण साडेतीनशे रुपयात असले जेवण विकणे हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान आहे! परदेशात चालेल हे असले जेवण, पण पुण्यात तर नाहीच नाही!
आता सर्विस बद्दल बोलूया - *अत्यंत मितभाषी स्टाफ* असणार! कारण *आम्हाला जेवण दिल्यावर कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही* . हवं नको वगैरे फारच लांब राहिलं!!
जेवण झाल्यावर बिलाचे पैसे द्यायची वेळ आली, बिलात 350 रु ची थाळी आणि वरती सर्विस टॅक्स बघून माझी सटकलीच होती.. *जी एस टी सकट 735 रु फक्त!* *बिल देताना विचारले, की आजच्या थाळीत भात होता का? तर फक्त सौजन्याने त्यांनी विचारले, तुम्हाला मिळाला नाही का? (सॉरी वगैरे जाऊदे, पण पुढे बोलणे पण नाही, किमान आतल्या माणसाला काय झाले आहे ते विचारावे इतकीच अपेक्षा होती)* केवळ मला भांडायची इच्छा नव्हती, त्यामुळे शांतपणे मी पैसे देऊन बाहेर निघालो होतो, पण तेव्हढ्यात त्यांनी कळ काढली!! मला त्या बाई पुढच्या वेळेस आलात तर डिस्काउंट कूपन देते म्हणून सांगू लागल्या!!
मग मात्र माझी सहनशक्ती संपली. शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
प्रतिक्रिया
22 Aug 2018 - 3:41 pm | मृत्युन्जय
मी काय म्हणतो. महाराष्ट्रीयन लोक खास ठरवुन मराठमोळे जेवण देणार्या होटेलात का जातात? म्हणजे कधीतरी लहर आली थाळी खायची, बाहेर पडलोच आहोत, चला हॉटेलात असे म्हणुन महाराष्ट्रीयन थाळी खायला जायचे समजु शकतो किंवा घरी काही कार्यक्रम आहे, बरेच लोक येणार आहेत कुठे घरी करत बसणार म्हणुन थाळी पार्सल आणले समजु शकतो किंवा म्हातारे कोतारे असलेला ग्रूप आहे आणि त्यांना पार्टी द्यायची म्हणून महाराष्ट्रीय थाळी खायला गेलो हे पण कळु शकते. पण मुद्दाम ठरवुन, महाराष्ट्रीय जेवणाचा आस्वाद घ्यायचा म्हणुन २५ मिनिटे शोधत थाळी खायला जावेच कशाल? रोज घरी खाणारे पदार्थ खायला?
असो. लेखाच्या निमित्ताने काही पुणेद्वेष्ट्या लोकांनी नेहमीप्रमाणे हात धुवुन घेतले आहेत. चांगली महाराष्ट्रीयन थाळी कुठे मिळते याची काही उत्तरे:
१. फडके डायनिंग हॉल (शैलेश रसवंती जवळ, एसपी कॉलेजच्या समोरच्या गल्लीत.
२. दुर्वांकुर
३. शबरी
४. श्रेयस
५. आशा डायनिंग हॉल ( थाळी म्हणाण्यापेक्शा राइस प्लेटला जवळची).
६. पुना बॉर्डिंग
७. पुणे गेस्ट हाउस वगैरे वगैरे वगैरे
पुण्यात वर्हाडी, खानदेशी पदार्थ देणारी हॉटेल्स पण ढिगाने आहेत. अर्थात ती फार प्रसिद्ध नाहित कारण एवढा जळजळीत माल पुणेकरांना मानवत नाही. शिवाय मागणीप्रमाणे पुरवठा असतो. जर मुळात मासवडी खायची इच्छा होणारे लोकच हाताच्या बोटावर असतील तर हॉटेल वाला कश्याला तोट्यात जाण्यासाठी उफराटे धंदे करेल.
शिवाय मला हे कळत नाही वळचणीतल्या कुठल्यातरी गावातुन येउन " च्यामारी आमच्या ***** सारखे ***** मिळत नाही पुण्यात" असले गळे काढुन काय उपायोग? पुणेरी (पद्द्धतीचे) जेवण तुझ्या गावात मिळते तरी का रे?
बाकी पुण्याला खाद्यसंस्कृती शिकवणे म्हणजे सामान्य माणसाने देवाला धर्म, आनंदला बुद्धीबळ आणि तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्याएवढे हास्यास्पद आहे.
22 Aug 2018 - 5:25 pm | आनन्दा
माझा विषय मुळातच वेगळा आहे - मी त्या हॉटेलला थाळी खायला गेलो होतो असे तुमचे म्हणणे असेल तर तसे मुळीच नाही -
मी का गेलो होतो ते पहा -
मी पार्टीसाठी सहसा थाळीमध्ये जात नाही. कारण तेच आपण नेहमी खातो, पण संकष्टीचा उपास सोडायचा असेल, किंवा सार्या कुटुंबाला झेपेल असे जेवण हवे असेल तर थाळीमध्ये जातो. पण तिथे पण इतका एकसुरीपणा आहे की त्याचा कंटाळा आलाय. या ताईंनी काहीतरी वेगळे केलय असे त्यांचे व्हिडिओ बघुन वाटले, म्हणून केवळ मी तिथे गेलो, २५ मिनिटे शोध घेऊन. समोरच बासुरीसारखे सुंदर रेस्तो असताना. अर्थात तिथे जाऊन सगळा विचका झाला हा भाग वेगळा
22 Aug 2018 - 5:56 pm | मृत्युन्जय
तुमचा अपेक्शाभंग मी समजु शकतो.
22 Aug 2018 - 5:28 pm | चांदणे संदीप
Aur ye laga sixer!!
Sandy
23 Aug 2018 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
हायला ! हा खरा पुणेरी तडका ! घ्या आता !
22 Aug 2018 - 3:54 pm | गवि
खेड शिवापूर आणि पुढेमागे इतकी, घरगुती, गावरान, चुलीवरची, तुपातली (चिकन, मटण, वांगी सर्व शुद्ध घरगुती तुपात, लोण्यात इ.)... अशी हॉटेल्स आहेत की घरगुती, गावरान शब्द आलटून पालटून नजरेसमोर स्क्रोल होत राहतात.
तिथे कधीकधी विचारावंसं वाटतं "मला शहररान, बाजारगुती, डालडायुक्त जेवण हवं आहे, कुठे मिळेल का या भागात?" ;-)
22 Aug 2018 - 4:40 pm | चिनार
अगदी अगदी अस्संच होतं गवि सर..
मलातर नेहमी "मला हॉटेलातलं चिकन खायचंय हो, घरातलं नाही" असं ओरडायची इच्छा होते.
22 Aug 2018 - 4:56 pm | हतोळकरांचा प्रसाद
विडिओ बघितल्यानंतर एक ना एक दिवस अशा प्रतिक्रिया वाचायला मिळतील असे वाटलेच होते :) इतर राज्यांतील लोक ह्या असल्या पुरणपोळ्या खातात आणि मग हमारे स्वीट्स खाके देखो वगैरे बढाया मारतात :).
कसलाही मोठेपणाचा ढोल न वाजवता चविष्ट नॉन-व्हेज थाळी देणारे दाजी (दाजीचा ढाबा, रावेत-वाल्हेकरवाडी रोडवर) लै धान्य म्हणावे लागतील :).
23 Aug 2018 - 10:50 am | जेम्स वांड
देवाला प्रश्न विचारायचा प्रमाद पत्करून विचारू इच्छितो
खास स्पष्टीकरण
१. मला पुणे द्वेष असण्याचे काहीच कारण नाहीये
२. पुणे पुणेकर वगैरेंपैकी कोणीच माझे कुठलेच घोडे मारलेले नाहीये.
३. पुण्यात मिळणाऱ्या उत्तम थाळी पद्धतीच्या जेवणाला कोणीच नावे ठेवलेली मला तरी खपणार नाही.
४. भिकार खायच्या जागांना भिकार म्हणल्यावर जळफळाट होऊन पुणेरीपण जागृत व्हायचं प्रयोजन समजलं नाही.
23 Aug 2018 - 11:04 am | गवि
पुण्यात प्रॉपर पुण्याचा म्हणावा असा कुठला पदार्थ खायला मिळेल ?
म्हणजे शिक्रण, मटारउसळ, काकडी कोशिंबीर (खमंग काकडी) इ. का?
23 Aug 2018 - 11:15 am | जेम्स वांड
पण मटार उसळ, काकडीची खमंग फोडणी घातलेली (काकडी नीट कोचवून) कोशिंबीर वगैरे पदार्थ कुळधर्म कुळाचारच नाही तर इतरही वेळी पूर्ण महाराष्ट्रात खाल्ला जातो, अर्थात ह्यापैकी काही पदार्थांवर जातीय शिक्के पडतात खरे पण भौगोलिक दृष्ट्या ते काही पुण्याचे प्रॉपर वाटत नाहीत. मटार उसळ (पाव), वडापाव, पावभाजी वगैरे पदार्थ तर थेट मुंबईच्या गिरणीसंस्कृतीच्या भरभराटीच्या काळात उगम पावलेले पदार्थ होत.
बेनिफिट ऑफ डाउट म्हणून शिकरण खाशा पुणेरी खाद्य मांदियाळीत अंतर्भूत करावं म्हणलं तरी (किमान) पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक गावात ते पिढ्यानपिढ्या खाल्लं जातंय (दळणवळण साधने तितकीशी नसताना) कोणी पुण्याला येऊन शिकून गेलं असेल अशी शक्यता नसतानाही.
23 Aug 2018 - 11:19 am | गवि
हे राम.
23 Aug 2018 - 11:48 am | माहितगार
तो रेस्त्राँमधला गोग्गोड दहीवडा पुण्याबाहेर सुद्धा मिळत असणे शक्य असल्यास मला व्यक्तिशः कल्पना नाही इतरत्र मिळत नसल्यास प्रॉपर पुण्याचा समजता येईल का ? दुसरे प्रत्येक पदार्थात साखर हे वैशीष्ट्य पेठ-प्रादेशिक की समुह विशेष हे नेमके माहित नाही.
या व्यतरीक्त अमृततुल्य आतशा लोपपावत चाललेला हा सेवा विशेष होता. बाकी उर्वरीत महाराष्ट्राच्या आहारात नसलेला चितळेंच्या बाकरवडी व्यतरीक्त पुणेरी पदार्थाची कल्पना नाही. अजून असतील तर जाणून घेण्यास उत्सुक.
23 Aug 2018 - 12:41 pm | जेम्स वांड
सोमेश्वर तिसऱ्या राजाच्या काळातील मनसोल्लास मध्ये दहिवाड्याचे उल्लेख सापडतात. त्यामुळे तो पुणेरी ओरिजिनल असणे शक्य नाही. आता साखरेची चव घालणे हे "स्थानिक व्हेरियेशन" म्हणून नक्कीच गणले जाईल पण मूळ पदार्थ नाही गणल्या जाणार.
अमृततुल्य कदाचित समाविष्ट होईल, पण त्याचा इतिहास एकदा चाळून पहावा लागेल
(प्रा. पुष्पेश पंत फॅन) वांडो.
23 Aug 2018 - 12:59 pm | माहितगार
अॅज व्हेरीएशन तरी पुण्यापुरते मर्यादीत आहे की कोल्हापूर सातारा अथवा कोकणातही गोग्गोड दहिवडा मिळतो . उत्तर कर्नाटकात बराच फिरलो पण दहिवड्याची चव शोधून पहाणे त्यावेळेस सुचले नाही.
माहितगारगिरीबद्दल __/\__
* बाकी बाकरवडी बद्दल आपले कन्फर्मेशन मिळाले नाही. ती महाराष्ट्रात आणखी कुठे होत असे का ?
23 Aug 2018 - 1:20 pm | जेम्स वांड
मूळ महाराष्ट्रीयन पदार्थ नाहीये, गुजराती पदार्थ आहे अर्थात व्यावसायिक प्रकारे कुरकुरीत बाकरवडी बनविण्याचे श्रेय चितळ्यांना जातेच.
23 Aug 2018 - 1:22 pm | जेम्स वांड
जिथे जास्त एकवटलेली असेल तिथे बाकरवडी बऱ्यापैकी माहितीची असावी. उदाहरणार्थ सांगली मिरज कुपवाड जिथे व्यवसायानिमित्त खूप गुजराती मारवाडी लोक स्थायिक झालेले आढळतील. विदर्भात पण असावेत, मी त्या भागात जास्त फिरलेलो नाही त्यामुळे माझ्या माहीतीत नाही
23 Aug 2018 - 1:57 pm | माहितगार
ओह तर पदार्थातील साखरेचे व्हेरीएशन सोडले तर, पुणेरी खाद्यसंस्कृती आयातीतच म्हणायची !
आपण मृत्यूंजयरावांच्या वाक्याची पहाता पहाता विकेट घेतलेली दिसतीए ;) बघा बुवा पुणेकरांनो :) काही स्वतंत्र स्थानिक पदार्थ शोधता येतो का ते !
23 Aug 2018 - 2:37 pm | प्रचेतस
मिसळ ही अस्सल पुणेरी म्हणावी लागेल. मिसळीचं सर्वात जुनं हॉटेल वैद्यबुवांचं, सुमारे १०० वर्ष उलटूनही आजही चालू आहे. ह्याच्यापेक्षा जुनं मिसळीचं हॉटेल ऐकिवात नाही. मिसळ पण नेहमीसारखी नाही, आलंयुक्त पांढर्या मसाल्याची.
23 Aug 2018 - 2:41 pm | प्रचेतस
शेवपाव वगैरे लेटेस्ट पदार्थ पण पुण्यातच प्रथम सुरु झाले.
मासवडी बहुधा पुण्याचीच असावी म्हणजे शहरातली नसून नारायणगाव, मंचर वगैरे खेड-आंबेगाव तालुक्याच्या भागातली.
23 Aug 2018 - 3:09 pm | अभ्या..
आचार्य अत्र्यांच्या आत्मचरित्रात माट्यांच्या मिसळीच्या हॉटेलाचा उल्लेख आहे. तो काळ म्हणजे साधारण १९१० ते २५. त्यांचे इनोव्हेशन म्हनजे भाज्याचे तुकडे, पोह्याचा चिवडा आणि मसालेदार उसळीचा रस्सा ह्याचे फर्मास मिश्रण असा मिसळीचा उल्लेख आहे. अल्पावधीतच पुणेकरांना ह्या मिसळीचा लळा लागला. (पुण्याच्या तत्कालीन एका हॉटेलात वेगवेगळ्या खोल्या , वेटरना युनिफॉर्म, चकचकित बिल्ले आदि सोयी सुरु झाल्या पण वस्ताद पुणेकरांनी त्या वेटरना थोडे पैसे देऊन कमी बिल लावायला लावणे आदी गैरप्रकारामुळे ते क्रांतीकारी हॉटेलाने लवकरच गाशा गुंडाळला असाही उल्लेख आहे.) सध्यकालीन मिसळीतला महत्त्वाचा घटक म्हणजे फरसाण आणि शेव, कांदा हे त्या काळात नाही वापरले जात. आणि त्याकाळच्या मिसळीसम भजी,शेव आणि भाजी हे कामगारांचे खाद्य म्हणून जेथे जेथे कामगार वस्त्या होत्या (मुंबई, सोलापूर, इचलक्रंजी) तेथे तेथे प्रचंड लोकप्रिय होते, अजूनही आहे. भज्याऐवजी काही ठिकाणी वडे किंवा सुशीला किंवा पोहे दिले जात इतकेच. तस्मात सध्यकालीन मिसळीवर आमचीच म्हणून अधिकार वापरु नये हि विनंती.
24 Aug 2018 - 12:00 pm | परिंदा
भज्याऐवजी काही ठिकाणी वडे किंवा सुशीला किंवा पोहे दिले जात इतकेच.
>>
सुशीला हा कोणता पदार्थ आहे? पहिल्यांदाच ऐकतोय.
24 Aug 2018 - 1:11 pm | पिलीयन रायडर
जसे आपण जाड पोहे भिजवून फोडणी देऊन पोहे करतो, तसं चुरमुरे भिजवून घ्यायचे आणि त्याला फोडणी द्यायची. काही ठिकाणी ह्यात दाळवं सुद्धा घालतात. पटकन होणारा मस्त पदार्थ आहे हा.
फक्त चुरमुरे भिजवून म्हणजे पातेल्यात पाणी घेऊन त्यात चुरमुरे टाकायचे. त्यातून हवा जात असल्याचा आवाज येतो. तो आवाज थांबला की चुरमुरे हलके पिळून घेऊन फोडणीत टाकायचे.
24 Aug 2018 - 1:26 pm | गवि
लगदा होत नाही का?
24 Aug 2018 - 1:34 pm | अभ्या..
नाही ओ, अगदी साबुदाणा भिजवल्यागत नाही ठेवायचे. चुरर झाले की निथळून घ्यायचे. मराठवाड्यात सगळ्या टपऱ्या हाटेलात सुशीला मिळतो. त्यावर सांबर भाजी टाकून देतात. प्लस शेव.
नळदुर्ग आणि अनदुराला दोन उडपी भावाची हाटेले आहेत. इडली स्पेशल. तिथे एकदम पातळ चटणी इडलीवर टाकून देतात. वर शेव. सांबर सेपरेट वाटीत. बरेच जण ते घेतही नाहीत. तिथे सुशिल्यावर चटणी घालून देतात.
24 Aug 2018 - 1:37 pm | पिलीयन रायडर
छे छे.. हे पहा.. https://www.youtube.com/watch?v=fOXWkoPBMco
24 Aug 2018 - 1:43 pm | गवि
अभ्याशेठ, पिराजी .. धन्यवाद..
23 Aug 2018 - 3:48 pm | जेम्स वांड
ह्या आधारावर "वैद्य मिसळ हॉटेल" हे आज अस्तित्वात असलेले सर्वाधिक जुने मिसळ हॉटेल आहे, इतपत विधान करता येईल. ते आजही सुरू असल्यामुळे त्याचे ट्रेस नीट होतायत मागे इतिहासात, पण कळीचा प्रश्न हा आहे की मिसळ एक खाद्यपदार्थ म्हणून रस्सा, शेव-भजी-मसाला इत्यादी एकत्र करून (नीट फरसाणाच्या तिखटपणाला जोडीला मापून बनवलेला रस्सा वगैरे) करून तंत्रशुद्ध मिसळीची पाककृती /पहिली प्लेट नेमकी वैद्यांनी(च) ११० वर्षांपूर्वी शोधून काढली होती का नाही हा निष्कर्ष कसा काढणार?
24 Aug 2018 - 11:59 am | चिनार
आमच्या अमरावतीत गड्डा मिसळ नावाचे एक हॉटेल होते. आता बंद झाले बहुतेक. २० वर्षांपूर्वी त्यांची तिसरी का चौथी पिढी ते हॉटेल चालवत होती. या हिशोबाने शंभर वर्षे त्यांनापण झाले असतील. झालेच आहेत असा माझा दावा नाही.पण मिसळीचे उगमस्थान शोधण्याच्या स्पर्धेत अमरावतीची उमेदवारी मान्य करावी (नंतर डिपॉझिट जप्त झाले तरी हरकत नाही.)
ता.क. गड्डा किंवा अमरावतीच्या कुठल्याही हॉटेलमध्ये मिसळीसोबत (किंबहुना मिसळ,भेळ,भजे या कोणहोसोबत) पाव मिळत नाहीत. मिसळ नुसतीच हादडायची अशी इथली पद्धत आहे. त्यामुळे स्पर्धा मिसळ -पाव या पदार्थाची असेल तर अमरावतीची उमेदवारी स्वीकारण्यात येऊ नये.
24 Aug 2018 - 1:36 pm | अभ्या..
च्यायला, म्हणजे मिसळ आमची हा पुणेकरांचा दावा "पहिला सार्वजनिक गणपती आमचाच" ह्या दाव्याप्रमाणे बोगस निघाला की.
24 Aug 2018 - 2:05 pm | प्रचेतस
तुम्हाला दावा कुठे दिसला ब्वा?
24 Aug 2018 - 2:20 pm | चिनार
पण "गुळचट मिसळ" ह्या पदार्थाचे उगमस्थान पुणे हेच आहे. पुण्यातले बेडेकर गुळचट मिसळवाले ह्याचे शोधकर्ता. मिसळीत गोडवा आणून मिसळीच्या मूळ स्वभावालाच हरताळ फसल्याने ह्या प्रकाराला स्थानिक व्हेरिएशन ह्या गोंडस नावाखाली खपवून पुण्याचे श्रेय हिरावून नये ही आग्रहाची मागणी.
"गुळचट मिसळ" हा नवीन पदार्थ म्हणून स्वीकारण्यात यावा.
24 Aug 2018 - 2:40 pm | मराठी कथालेखक
पुणेकरांच्या स्वभावातला गोडवा मिसळीत उतरला असेल हो.
24 Aug 2018 - 3:56 pm | अभिदेश
पुण्याला नाव ठेवणारी मंडळी आता पुण्यात राहिल्या आल्यामुळे आता पहिल्या सारख पुणे राहिल नाही हेच खर.
24 Aug 2018 - 3:58 pm | अभ्या..
हम्म..
आता सुधारेल हळूहळू
24 Aug 2018 - 4:07 pm | अभिदेश
मुळचे पुणेकर की नवीन आलेले? मुळचे सुधरण्याच्या पलिकडे गेलेत आणि नवीन आलेले त्यांची स्पर्धा करतायेत .
25 Aug 2018 - 1:37 am | रानरेडा
अथर्व वेद किंवा यजुर्वेद मध्ये मिसळीचा उल्लेख आहे ना ? त्यावरूनच तो उल्लेख इतर धर्म ग्रंथात घेतला आहे हे खरे आहे ना ?
25 Aug 2018 - 11:14 am | मोहन
कोणीही गड्डा मिसळीची आठवण ईथे काढेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. वा! वा !
मिसळी सोबत पाव खायची पध्द्त तेंव्हा रुढ व्हायची होती. कटींग चाय (ऑरेंज) - मिसळ हे काँबो प्रचलीत होते. चहाला ऑरेंज म्हणणारे मला अमरावती सोडून कुठेच दिसले नाहीत. आठ्वणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद चिनार भाऊ.
27 Aug 2018 - 10:46 am | चिनार
कालच अमरावतीला चक्कर झाली..
थोड्या चौकशीअंती असे कळले की, अमरावतीस्थित गड्डा मिसळ हॉटेल १९६५ च्या दरम्यान सुरु झाले. आणि साधारण ५ वर्षांपूर्वी बंद झाले. त्यामुळे मिसळ पदार्थ हा मूळ अमरावतीचा नाही. अमरावतीची उमेदवारी मागे घेण्यात येत आहे.
23 Aug 2018 - 3:51 pm | जेम्स वांड
ही नम्र विनंती
बरेच दिवस मनात असलेली चर्चा नीट घडणार असेल तर घडू द्या की चार क्षण. माझं काही मृत्युंजय साहेबांशी वैयक्तिक वैर नाही किंवा मी पुणेद्वेष्टाही नाही. फक्त एक वाक्य ट्रिगर पॉईंट होतं चर्चा सुरू करायला
23 Aug 2018 - 6:44 pm | माहितगार
वाक्याची विकेट लिहिलय, मृत्यूंजय रावांची नव्हे हो.
भांडणे करु नयेत, पण वादावे जरुर !!
- हा मराठी बाणा चालवण्यात भूषण !
23 Aug 2018 - 6:03 pm | चिनार
देवाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आगाऊपणे स्वतः देण्याचा प्रमाद करू इच्छितो.
उत्तर : अपमान !! (आणि हा भल्याभल्यांना गिळता येत नाही)
(आणखी एक प्रमाद: धाग्याचा विषय "पुण्यातले भिकार हॉटेल्स किंवा रसातळाला गेलेली पुणेरी खाद्यसंस्कृती" यापैकी किंवा तत्सम नसताना हा उडणारा तीर आपल्या ***/ छातीत का घेण्यात आला हे अनाकलनीय आहे)
23 Aug 2018 - 6:41 pm | जेम्स वांड
मग हा रुचकर चविष्ट गरमागरम अपमान जसं लोकांना वाढता येतो तसं लोकांनी वाढल्यावरही गिळता आला पाहिजे.
इत्यलम.
बाकी उडते बाण घेण्यात तुम्हीही शौकीन दिसताय. असो असो!
24 Aug 2018 - 10:41 am | ट्रम्प
प्रॉपर मुंबई चा , प्रॉपर कोलकाता चा , प्रॉपर दिल्ली चा वैगेरे कुठल्याही शहराचे पदार्थ माझ्या ऐकवीत तर नाही मग तिथे पुण्याचा टेंभा मिळवण्यात काय हशील ?
सर्वात जुने मिसळचे हॉटेल पुण्यात असले म्हणून काय झाले ? त्या हॉटेल मधील मिसळीच्या चवीवर आणि कार्यपद्धती वर यथेच्छ टीका करणारे सुद्धा पुणेकरच आहेत ते सुद्धा सदाशिव नारायण मधले .
राहिला प्रश्न महाराष्ट्रीयन थाळी चा . किती हॉटेल मध्ये महाराष्ट्रीयन थाळी चवदार मिळते ? विचार करून ! करून !! हातावरील बोटां च्या संख्ये पुढे आकडा जात नाही , जी थाळी सहज कुठल्याही हॉटेल मध्ये उपलब्ध होत नाही , व ज्या थाळीला बहुसंख्य ग्राहकवर्गा चा पाठींबा त्या थाळी चा झेंडा फडकवण्यात अर्थ नाही .
25 Aug 2018 - 11:29 pm | बॅटमॅन
अगदी असेच नाही. काही केसेसमध्ये डीटेल्स उपलब्ध आहेत.
१. रसगुल्ला प्रथम कलकत्त्यात बनवला गेला. (१८६८ साल)
२. वडापाव प्रथम मुंबईत बनवला गेला. (नक्की साल माहिती नाही)
१. रसगुल्ला प्रथम कलकत्त्यात बनवला गेला.
२. वडापाव प्रथम मुंबईत बनवला गेला.
26 Aug 2018 - 5:31 am | सुनील
के दास यांनी प्रथम बनवला असे मानले जाते, हे खरे. परंतु, आताशा ओडिशानेदेखिल "माजा नंबर पयला" म्हणून जी आय टॅग साठी क्लेम केला आहे. खरे काय ते चौकशीअंती समजेलच!
७० च्या दशकात सुरुवातीला, दादरात!
तसेही, वडा-पाव हा काही स्वतंत्र खाद्यपदार्थ नाही. बटाटेवडा महाराष्ट्राततरी तत्पूर्वीही बनत होताच. पोर्तुगीज्/ब्रिटिश्/इराणी कृपेमुळे, मुंबईत पावदेखिल उर्वरीत महाराष्ट्राच्या मानाने प्रथम आला. तेव्हा दोन्ही पदार्थ एकत्र करून एक स्वस्त आणि पोटभरू पदार्थ बनवला गेला, हे मात्र खरे.
* पहिल्या बाजीरावाच्या काळात बटाटावडा बनवला गेल्याचे पुसटसे वाचले होते. नक्की आठवत नाही.
26 Aug 2018 - 10:21 pm | बॅटमॅन
बंगाल आणि ओडिशा यांच्यामधील रसगुल्ल्याच्या भांडणासंबंधी मी जवळपास सर्व बातम्या इ. वाचले आहे. रसगुल्ल्याचा इतिहास सांगणारे एक बंगाली पुस्तकही वाचले आहे. त्याबद्दल लिहिलेही आहे ते यथावकाश प्रसिद्ध होईलच. मुख्य मुद्दा असा आहे की सध्या जो रसगुल्ला बनतो त्याची बेसिक कन्सेप्ट जुनी असली तरी दूध फाडायची पद्धत नवीन आहे. या नव्या पद्धतीमुळे केलेला रसगुल्ला अगोदरच्या तुलनेत जास्त काळ टिकतो. या नव्या पद्धतीने बनवलेला रसगुल्ला प्रथम १८६८ साली बनवला गेला.
बाकी बटाटेवडा महाराष्ट्रात कधी आला? १७०० साली सुरत इथे अखिल भारतात प्रथम बटाट्याचे पीक घेतले गेले असे वाचले आहे. तेव्हा तुम्ही म्हणता ते खरे असूही शकेल, परंतु त्याला निश्चित पुरावा पाहिजे. मिळाला तर फार बेस्ट होईल.
26 Aug 2018 - 10:23 pm | बॅटमॅन
शिवाय, दूध फाडून त्याचे गोळे बनवून ते साखरेच्या पाकात तळले की जे काही तयार होते त्याला रसगुल्ला हे नाव १८६८ सालीच देण्यात आले. त्याअगोदर हे नाव प्रचलित नव्हते.
27 Aug 2018 - 2:00 pm | जेम्स वांड
रसगुल्याचा पूर्वज खीर मोहन असावा. ही एक ओडिया मिठाई असून रसगुल्याप्रमाणेच छेना चेंडू पाकात बुडवून बनवली जाते. पारंपरिक उडिया पद्धतीत पाक गुळाचा (केशरी रंगाचा) असतो. हे चेंडू गुळाच्या पाकात भिजवून नंतर निथळून घेतले का ते झालं खीर मोहन आणि तसेच विक्री होईस्तोवर गुळाच्या पाकात मुरू दिले की झाले ते सुप्रसिद्ध ओडिया "पाहला रसगुल्ला".
टीप - जातिवंत खवय्ये एकदा खीरमोहन/पाहला रसगुल्ला तोंडी लावला का नंतर पांढरे गुलाबजल/केवडाजल शिंपडलेले रसगुल्ले ढुंकूनही पाहणार नाही. हल्दीराम-बिकाजी वगैरेचे डबाबंद गोडमिट्ट अत्याचार तर दूरच राहिले.
27 Aug 2018 - 2:03 pm | जेम्स वांड
म्हशीच्या दुधाला फाडून बनवलेला रसगुल्ला एका घासात ओळखेल आणि 'उडी बोका' म्हणून पानावरुन उठेल. अस्सल रसगुल्ले, खीर मोहन, पाहला वगैरे कायम गायीच्या दुधाचेच असायला हवेत. म्हशीच्या दुधाची मिठाई बंगाली खाताना दिसणे बांबूची फुले पाहायला मिळल्यागत दुर्मिळ योग आहे.
24 Aug 2018 - 10:49 am | ट्रम्प
प्रॉपर मुंबई चा , प्रॉपर कोलकाता चा , प्रॉपर दिल्ली चा वैगेरे कुठल्याही शहराचे पदार्थ माझ्या ऐकवीत तर नाही मग तिथे पुण्याचा टेंभा मिळवण्यात काय हशील ?
सर्वात जुने मिसळचे हॉटेल पुण्यात असले म्हणून काय झाले ? त्या हॉटेल मधील मिसळीच्या चवीवर आणि कार्यपद्धती वर यथेच्छ टीका करणारे सुद्धा पुणेकरच आहेत ते सुद्धा सदाशिव नारायण मधले .
राहिला प्रश्न महाराष्ट्रीयन थाळी चा . किती हॉटेल मध्ये महाराष्ट्रीयन थाळी चवदार मिळते ? विचार करून ! करून !! हातावरील बोटां च्या संख्ये पुढे आकडा जात नाही , जी थाळी सहज कुठल्याही हॉटेल मध्ये उपलब्ध होत नाही , व ज्या थाळीला बहुसंख्य ग्राहकवर्गा चा पाठींबा त्या थाळी चा झेंडा फडकवण्यात अर्थ नाही .
24 Aug 2018 - 8:25 pm | माहितगार
सहमत व्हायला होतय.
23 Aug 2018 - 3:43 pm | जेम्स वांड
११० वर्षे जुनी?
प्रचेतस भाऊ, धिस इज इंटरेस्टिंग. ह्यावर अजून थोडा खाद्य इतिहास होऊन जाऊ दे देवा.
प्रचेतस भाऊंनी दिलेली माहिती म्हणजे ती सत्यापीत झाली. तरी मग मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ हे समीकरण कसे रूढ झाले असेल?
23 Aug 2018 - 6:41 pm | प्रचेतस
ते मिसळ इतिहास वगैरे खरंच माहीत नाही पण आजमितीसही चालू असणारे मिसळीचे सर्वात जुने हॉटेल पुण्यातील हे अगदी नक्की.
23 Aug 2018 - 6:51 pm | माहितगार
प्रचेतसराव या फेसबुक व्हिडीओनुसार नाशिक मिसळच्या पहिल्या हॉटेलाच्या नंबरवारीत पुण्याला स्पर्धा देऊ इच्छित आहे असे दिसते.
23 Aug 2018 - 7:10 pm | प्रचेतस
पुणेच पहिलं निघावं अशी माझी काही इच्छा वगैरे नाही हो. मूळ कुठलं आहे ते समजल्याशी कारण.
बाकी तो व्हिडीओ दिसत नाहीये.
23 Aug 2018 - 7:06 pm | माहितगार
एस.पी.डी.पी.चाही इतिहास तपासला पाहीजे. पदार्थाचे महित नाही पण कमीत कमी एस.पी.डी.पी. हे शॉर्टफॉर्म पुण्याचे निघावे असा कयास आहे. चुभूदेघे
25 Aug 2018 - 6:33 pm | सुबोध खरे
एस.पी.डी.पी.चाही इतिहास
एस पी डी पी( सेव पोटॅटो दही पुरी) हा पुणेकरानी उगाच कॉस्मोपॉलिटन सोफिस्टिकेटेड आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
मी पहिल्यांदा पुण्यात होतो तेंव्हा १९८३ ते १९८७ अखेर( एम बी बी एस साठी) वैशालीत याच पदार्थाला एस बी डी पी (शेव बटाटा दही पुरी) असे स्वच्छ मराठी नाव होते.
आम्ही अनेक वेळेला संध्याकाळी हा पदार्थ चाळा म्हणून खात असू. वैशालीत बागेत संध्याकाळी जागा सहज मिळत असण्याचे दिवस होते ते.
कालांतराने पुण्यात अर्ध आंग्ल मंडळी बोकाळली आणि १९९३-९४ च्या सुमारास किंवा थोडे नंतर आपण कॉस्मोपॉलिटन, सोफिस्टिकेटेड आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात ते एस पी डी पी झाले.(१९९१ ते १९९७ परत मी पुण्यात होतो)
यातील पोटॅटो सोडून बाकीचे पदार्थ हिंदीत पण तसेच आहेत म्हणून बटाट्याचा पोटॅटो केला गेला.
आई बाबांचे मम्मी डॅड्डी झाले त्या कालावधीतिलच हा बदल असावा.
24 Aug 2018 - 7:54 pm | यशोधरा
बरं, पोटं भरली का आता तरी पुण्यावर घसरून? आता विषय पुढे न्या मग.
24 Aug 2018 - 8:48 pm | नाखु
पुणे कसं (हाँटेलमध्ये) खाण्याच्या बाबतीत अतिभिकार, तिथल्या भुक्कड लोकांना अजिबातच खाण्याची अक्कल नाही आणि आमच्या गावचा महीनाभर शिळा पाव सुद्धा त्रिखंडात डंका वाजवत आहे हे सिद्ध केल्याशिवाय चैन पडणार नाही.
धागाविषय उपरोक्त भोजनालयात आलेला अत्यंत अव्यावसायिक अनुभव व ते लक्षात आणून दिले तरी उर्मटपणे दिलेला प्रतिसाद यावर आहे.धागाकर्त्याने पुण्यातच इतरेत्र ठिकाणी सुग्रास भोजन अनुभवल्याचे स्पष्ट केले आहे...पण जस सबसे तेज वाल्या वाहिन्या तू आधी की मी आधी असं करून आपल्याला आवडत्या ध्येय्याकडेच चर्चा,बातमी वळवितात तसाच पवित्रा घेतला आहे.(त्या निमित्ताने चार दुगाण्या पुण्यावर झाडून घेऊ परत संधी मिळते न मिळते)
नगरला जन्मलेला आणि पुण्याने संगोपन केलेला पिंपरी-चिंचवड कर नाखु
24 Aug 2018 - 9:35 pm | जेम्स वांड
भिकारला भिकार म्हणलं तर दुसऱ्या गावांना हीन लेखत "आनंदला बुद्धिबळ, देवाला धर्म " वगैरे वाचून म्हणलं बोवा विचारावं पुण्याचं व्हर्जिनल खाणं काय ते, तुम्ही फारच लावून घेतलेलं दिसतंय. काही वैयक्तिक घेतलं का काय तुम्ही, घेतलं तर घ्या, आम्हाला फरक पडत नाही.
बाकी बोलायला बहुत आहे नाखु जी, पण त्यासाठी तुमच्या तुसडेपणाशी स्पर्धा लावावी लागेल. म्हणून थांबतो.
(सातारला जन्मलेला अन पुण्याने पोसलेला जातिवंत तिरसट) वांडो.
25 Aug 2018 - 11:31 pm | बॅटमॅन
मिसळ हा पदार्थ बहुधा पुण्यात प्रथम तयार केला असावा असे उपलब्ध माहितीवरून तरी दिसते.
बाकी कशाबद्दल हे विधान करता येईल हे मला माहिती नाही.
26 Aug 2018 - 5:47 am | सुनील
मिसळ हा उसळीपासून उत्क्रांत होत गेलेला पदार्थ.
कडधान्याची उसळ ही आपल्याकडे पारंपरीक. तीत चिवडा घालून (मिसळून) मिसळ बनवली गेली (कुणी/केव्हा?).
पुढे गुजराथी समाजाशी संपर्क आल्यावर चिवड्याची जागा फरसाणीने घेतली.
आणि पुढे तीत तर्रीचे प्रमाण वाढ्वून ती पावासोबत खाऊ जाऊ लागली!
25 Aug 2018 - 9:36 am | यशोधरा
तर काय!!
किती दुत्त हो नाखुचाचा तुम्ही! चक्क मुद्द्याच्या पाईंट मांडता! आता हे पाप फेडण्यासाठी अजुन कोणत्याही चार पाच धाग्यांवर जा आणि संबंध नसला तरी तिथे पुण्याचा विषय काढून पुण्यात हे कसं वाईट आणि ते कसं बेक्कार वगैरे लिहून या. समजलं?
ओक्के मग.
25 Aug 2018 - 10:24 am | नाखु
पापक्षालन करण्यासाठी तत्काळ कामाला लागतो.
सध्या खालील धाग्यांवर प्रक्षोपण प्रतिसाद देणार आहे
राहुल गांधीं, कार्यशैली आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुढील संधी, आव्हाने आणि मर्यादा
छायाचित्रण कलेचा आस्वाद
अनवट किल्ले ३८ : वेताळवाडी गड (Vetalwadi gad
आपण दिलेल्या शटी अर्ती नुसार धागे निवडले आहेत
पापक्षालन क्षमाप्रर्थी नाखु
25 Aug 2018 - 10:44 am | जेम्स वांड
अहो परत परत तेच ते काय बोलताय ताई. पुणे पूर्ण रद्दी भंगार अन टाकाऊ वगैरे मी बोललोच नाहीये, फक्त पुणे इतर गावांसारखंच एक गाव आहे अश्या बेताने प्रतिसाद दिलेत.
असो, तुम्हाला किंवा नाखुजींना काही फारच वाकडे लागले असेल तर हात जोडून माफी मागतो बस.
_/\_
25 Aug 2018 - 10:51 am | यशोधरा
दादा, मी तुम्हाला काहीच म्हणल नाही की. उगाच स्वतःवर का ओढून घेताय, समजले नाही.
आणि वाकडे लावण्याबाबत म्हणाल तर पुणेकरांना सवय झालीय. फारसे लक्ष देऊ नये हे लक्षात आले आहे आता, थोडीशी गंमत करून घेऊन सोडून देतात, झालं.
25 Aug 2018 - 12:31 pm | जेम्स वांड
सोडून दिल्याचा मनाचा मोठेपणा दाखवल्याबद्दल आभार!
रच्याकने पुण्याला पूर्णच वाईट म्हणणाऱ्या काही मेम्बरांना इथेच मिपावर उत्तरेही मीच दिलीयेत, इतकं नमूद करून रजा घेतो.
25 Aug 2018 - 12:18 pm | सतिश गावडे
थोडेसे अवांतर: एक ज्येष्ठ मिपाकए पुण्याचा विषय निघाला की पुण्याला नावे ठेवण्यात आघाडीवर असातात. या धाग्यावर दिसत नाहीत ते. मला नेहमी वाटायचे की त्यांना एखाद्या पुणेरी कन्येने नकार दिला असणार किंवा आधी होकार देऊन नंतर कोलले असणार त्याशिवाय एखाद्या शहराविषयीईतकी मनस्वी चीड असू शकत नाही.
आता मुख्य मुद्दा: धागा एका भोजनालयाच्या दर्जाबद्दल असताना पुण्याच्या खाद्यसंस्कृतीवर कसा काय घसरला?
25 Aug 2018 - 12:33 pm | जेम्स वांड
आता मुख्य मुद्दा: धागा एका भोजनालयाच्या दर्जाबद्दल असताना पुण्याच्या खाद्यसंस्कृतीवर कसा काय घसरला?
मृत्युंजय जी अन अभ्याश्री जाणोत.
25 Aug 2018 - 1:39 pm | नाखु
गमतीत असतय त्ये!!!
तुम्ही त्या कळपात नाहीत हे मलाही माहित होतं पण थोडी गम्मत आपली पण!!
जगन्मित्र वाचकांची पत्रेवाला नाखु
25 Aug 2018 - 3:02 pm | जेम्स वांड
मला वाटलं नाखुजी खरंच तापले की काय, मग मीही माफक पसरलो, त्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.
लहान समजून माफ करून टाका काही उणेअधिक बोललो असेल मी तर प्रतिसाद प्रपंचात.
_/\_
25 Aug 2018 - 1:50 pm | प्रचेतस
कोण हो ते?
25 Aug 2018 - 6:42 pm | पिलीयन रायडर
आज पुणे इट औट्स वर एकदम पॉझिटिव्ह रिव्ह्यू आलाय!
गुरू सावंत हे सुद्धा हॉटेल मालक आहेत, त्यांचा रिव्ह्यू..
#पुर्णब्रह्म
सोशल मिडियावर या हॉटेलशी ओळख झाली. मराठी वडापाव ते महाराष्ट्रीयन थाळी पर्यंत उत्तम दर्जा आणि चव देणारी अनेक हॉटेल्स आणि खानावळी पुण्यात आहेत एखादा अपवाद वगळला तर जवळजवळ सगळ्याच ठिकाणी अनेकदा जेवण झालय.
महाराष्ट्रीयन जेवण त्यात शाकाहार म्हटल काही नावाजलेली जूनी हॉटेल्स जी खरोखरच अत्यंत चिकाटीने आणि प्रामाणिकपणे पुणेकराना सेवा देत आहेत. पुर्णब्रह्म म्हणजे पुण्याबाहेर लोकप्रिय झालेला ब्रांड आता या स्पर्धेत आलाय. नावाजलेल मराठी अन्नपदार्थाच हॉटेल,चिकाटीने मेहनत करून आणि प्रस्थापितांच्या स्पर्धेत स्वताच्या ब्रांडची ओळख निर्माण करून देणारी सेलिब्रिटी मालकीण ☺या सुरुवातीला समोर दिसणाऱ्या दोन जमेच्या बाजू पहाता एक लंच तो बनता हे मनात अगदी पकक होत परंतु खरा योग मात्र काल आला.
काही कामा निमित्त सातारा रोडवर गेलो आणि समोरच पूर्णब्रम्ह दिसल म्हटल आलोच आहोत तर पान टाकूनच जाऊत ☺ म्हणून हॉटेलात शिरलो.
शाकाहारी खास करून कोकणस्थ पद्धतीच जेवण म्हणजे माझी दुखरी नस ....कदीही आणि कितीही खाऊ शकतो पण हल्ली प्रस्थापित मराठी हॉटेलात अळूच फ़दफद/बिरडयाची उसळ या नावाखाली वाढल्या जाणाऱ्या भाज्या मेनुकार्डात वाचूनच अंगावर काटा येतो. सुदैवाने पुर्णब्रह्मच्या बोर्डावर अस धक्कादायक काहीही लिहीलेल नव्हतं. त्यामुळे ऑर्डर प्लेस करायची हिंमत सुद्धा केलीच.
आता चव आणि हॉटेलबद्दल अगदी थोडक्यात ☺
साधारण पणे वीस ते पंचवीस कार पार्क करता येतील इतक पार्किंग/दर्जेदार मराठी ऍमबियन्स(लग्नाच्या पंगतीत बसल्यासारखा सरळ नाही) / खुप आउटस्टैंडिंग म्हणता येणार नाही पण एखाद्या अमराठी व्यक्तीला सुद्धा सहज रुचेल इतकी छान चव/ कल्पकतेने नवीन जनरेशनला भावेल असा डिजाइन्ड मेनू (रॉ मटेरियल क्वालिटी आणि क्वांटिटी)/अत्यंत डिसेंट सोनाराच्या दुकानात असतो तसा स्टाफ़ आणि बैकग्राउंडला छान मराठी अभंग. यापेक्षा जास्त माझ्या अपेक्षा नसल्यामुळे शाकाहारी थाळीत पुर्णब्रह्म कायमच झाल ☺
पुण्यातील इतर शाकाहारी थाळी मिळणाऱ्या ठिकाणापेक्षा काही गोष्टी इथे सम्पूर्ण वेगळ्या आहेत ज्याची चर्चा होण आवश्यक वाटत म्हणून त्याचा उल्लेख करण आवश्यक आहे.
१) इथे वाढदिवसाच्या दिवशी ग्राहकाच औक्षण केल जात. उत्सवमूर्तीच्या पानात अगदी स्टैंडर्ड साईझची पूरणपोळी भेट म्हणून वाढली जाते शिवाय बिलावर ५ टक्के सूट सुद्धा दिली जाते.
२) दररोज मेनू संपूर्ण बदलला जातो (न्यु रिजन न्यु मेनू) ही थीम चालवली जाते.
३) लहान मुले/गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकरीता अत्यंत वेगळा मेनू आणि गरज वाटल्यास खास सर्विस दिली जाते.
आपली मराठी संस्कृती आणि खाद्यपरंपरा याची सांगड घालण्याचा पुरेपुर प्रयत्न हॉटेल व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे थाळीच्या नावाचा उल्लेख करण सुद्धा गरजेचे वाटते. (नावाप्रमाणे बदलणारा मेनू)
सोमवार - श्री शिव थाळी
मंगळवार - श्री स्वामी समर्थ थाळी
बुधवार - श्री विठाई थाळी
गुरुवार - श्री दत्तगुरु थाळी
शुक्रवार - श्री बालाजी थाळी
शनिवार - श्री गजानन महाराज थाळी
रविवार - श्री महालक्ष्मी थाळी
एकूण क़ाय तर मराठी अन्नपदार्थाना सातासमुद्रापार घेऊन जायचे ब्रॉड माइंडेड मराठी हॉटेल मालकीणीचे स्वप्न अपूरे राहण्याच एकही कारण मला तरी दिसल नाही. त्यामुळे पुर्णब्रह्म तिमला खुप साऱ्या शुभेच्छा ☺
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपुरे फायदा घेऊन लिहिलेली तळटीप ☺- मराठी थाळी खायला गेल्यावर साइड डिश म्हणून ताटात फाफड़ा,मिर्च्या चटण्या आणि ढोकळा न वाढल्याबद्दल कौतुक ☺
वर्षानु वर्षाच तेच फदफद / बिरडयाची उसळ लग्नाच्या पंगतीत बसून जेवण केल्याच फील देणाऱ्या रिजिड संकल्पनेला फाट्यावर मारणारी पुर्णब्रह्म टिमचा मेनू छान वाटला शिवाय आवडला सुद्धा ☺ मराठी अन्नपदार्थ इतक्या कल्पकतेने आणि आदराने वाढल्यामुळे प्रस्थापित व्यावसायिकापेक्षा जास्त आकारलेले ३० ते ४० रुपये जिव्हारी लागणारे वाटले नाहीत ☺
गुरु सावंत
25 Aug 2018 - 6:50 pm | अभ्या..
असेल बाबा एखादेवेळेस चांगलेपन हॉटेल.
आपल्या आनंदरावांचाच मूड नसावा कदाचित त्यादिवशी.
किंवा अजुन कैतरी.
.
ह्या गुरु रिव्ह्यु बाबतीत : सेम धंद्यात सहसा उघडौघड वाकडेपणा घेत नाहीत म्हणतात, छानछान करायचे असते बोथ साईडनी ते पण म्युच्यली आणि प्लानिंगने. तसे असले तर मात्र अवघड आहे.
25 Aug 2018 - 7:08 pm | यशोधरा
तसेच दिसतेय रिव्ह्यू पाहता. तिथेही प्रतिसाद देताना लोक फारसे सकारात्मक वाटत नाहीयेत.
26 Aug 2018 - 1:11 pm | आनन्दा
खूप लिहावेसे वाटतेय, बऱ्याच गोष्टींचे संदर्भही लागतायत.
पण असो.
कस्टमर सक्सेस हा कोणत्याही व्यवसायाचा पाया असतो, आणि त्याकडे चालकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. कारणे काहीही असतील, पण एक व्यवसाय म्हणून हे नक्कीच चांगले नाही असे नमूद करावेसे वाटते.
चुकीचा रस्ता धरलाय त्यांनी. देव त्यांना शक्ती देवो.
26 Aug 2018 - 1:47 pm | गवि
वरील रिव्ह्यू हा आनन्दा यांच्या रिव्ह्यूतले काही पॉईंट घेऊन त्यांवर पॉझिटिव्ह लिहिल्यासारखा भासला. तसं नसूही शकेल.
25 Aug 2018 - 7:47 pm | पिलीयन रायडर
मला हा वरचा रिव्ह्यू जरा जास्तच गुडी गुडी वाटला. आणि हटकून लिहिल्या सारखा. इतरही लोकांनी जेवण वाईट होतं असं लिहिलं आहेच त्यामुळे मला तर आनंद ह्यांचा रिव्ह्यू जास्त प्रामाणिक वाटला.
तसंही 350 + टॅक्स देऊन लिमिटेड थाळी हा प्रकारच आपल्याला पटलेला नाही! कुणी काहीही म्हणो. सिंहासनावर बसवून बाजूला कुणी स्वहस्ते पंख्याने हवा जरी घातली तरी लाल भोपळ्याची भाजी खायला मी हॉटेलात जाणार नाहीच :)
25 Aug 2018 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
सिंहासनावर बसवून बाजूला कुणी स्वहस्ते पंख्याने हवा जरी घातली तरी लाल भोपळ्याची भाजी खायला मी हॉटेलात जाणार नाहीच :)
=)) =)) =))
सिंहासनावर बसवून बाजूला कुणी स्वहस्ते पंख्याने हवा घातली तर तो राजेशाही अनुभव घ्यायला मी हॉटेलात नक्की जाईन. नाहीतर इतके पारंपारिक कौतुक रु३५०+ मध्ये दुसरीकडे कुठे मिळणार आहे ?! मात्र, लाल भोपळ्याची भाजी नक्की खाणार नाही... इतर काय बरे खाण्याजोगे आहे ते खाईन ! :) (हघ्याहेवेसांन)
26 Aug 2018 - 3:48 pm | अभ्या..
इतर काय बरे खाण्याजोगे आहे ते खाईन !
बाकी पंख्याने वारा बिरा असले लाड असले तर कुणाला नको असतात? बरेचसे सलून्स न पार्लर्स न बार ह्या तर एका युएसपीवर दणकून चालतात. पर्सनल अटेन्शन महत्त्वाचे हो.
पण खाण्याचा विचार करता बहुतेक हेच लॉजिक असते थाळीचे. नुसत्या डिश सिस्टमनुसार दोन डिश मागवल्या आणि त्या आवडल्या नाहीत तर पैसे वेस्ट जातात. पुण्यात तर २५० च्या खाली डिश दिसतच नाही. थाळीत एखादी भाजी आवडली नाही तर दुसरे तीन चार तरी पर्याय असतात. गुजराती वगैरे टाईपच्या थाळीत गुळचट भाज्यात एखादी तरी टेस्टी तिखी मिळुन जाते. बाकी भात वगैरे नॉर्मल आयटमला चवीपेक्षा टेक्श्चर, गरमपणा आदि भाग बघितले जातील पन दाळ किंवा रस्सा भाजीसोबत तोही खपून जातो. पापड, चटण्या, लोणची असे पदार्थ चार्जेस न भरता ताटात असतात त्यामुळे थाळी हा बराचसा सेफ मार्ग असतो हॉटेलात जेवायचा. पुण्यात दुर्वांकुर, सुकांता आदि मान्यवर थाळी हॉटेलात खाल्ले, इतरही ठिकाणी ट्राय केले पण फारसे नावीन्य अथवा एक्सलन्स जाणवला नाही. टिपिकल वाटीतल्या भाज्या, चपाती किंवा फुलके आणि स्वीट हे तर सोलापुरातही मिळते. किंबहुना अजिंक्य, निसर्ग, मंत्रालय, अंगराज अशा हॉटेलातल्या थाळ्या दुर्वांकुर, सुकांतापेक्षा कीतीतरी दर्जेदार आहेत. शिवाय चटणी, ठेचा, भाकरी, धपाटे, घट्ट दही असे स्पे. सोलापुरी पदार्थ ऑप्शनला असतातच. बरे ह्या थाळ्यांची किंमत कुठेच १००-११० च्या वर नाही.
बाकी इतर डिशच्या बाबतीत बोलायलाच नको, कुठल्याही चित्रविचित्र नावाने डब्बू मिर्ची, पनीर, कांदे फ्राय करुन ग्रेव्हीत देणे किंवा कोफ्ते करुन देणे म्हणजे मेन कोर्सला पैसे मोजणे मला झेपत नाही. काही स्पेशालिटी जसे इटालिअन, लेबनीज, चायनीज अशांच्या बाबतीत मात्र मी अडाणी आहे आणि त्यातले शहाणपण शिकायची इच्छा आहे.
26 Aug 2018 - 7:53 pm | पिलीयन रायडर
मला औरंगाबादच्या थाळ्या सरस वाटतात पुण्यापेक्षा.. चव फार छान असते. मला आत्ता नाव आठवत नाहीये पण सव्वा दोनशे मध्ये फारच टेस्टी जेवण होतं.
26 Aug 2018 - 10:29 pm | बॅटमॅन
खरे तर आताशा मला मराठी थाळीपेक्षा आंध्र थाळीच जास्त भारी वाटू लागली आहे. भाजी वेगवेगळी, नावापुरत्या दोनतीन पोळ्या, दालपालक, सांबार, रसम, दही आणि अर्थातच भाताचे अनलिमिटेड डोंगर. शिवाय चटणी आणि फ्राईड व्हेजिटेबल्स आणि बॉबी. यापैकी पोळी सोडून बाकी सब कुछ अनलिमिटेड.
बर इतकं सगळं आहे तर किंमतही दणकून असेल? नाही लोक्स. तिथे जाऊन खाल्ले तर १००-११०/- फक्त.
आणि हे आहे कुठं? हैदराबादेत? तिथे तर आहेच पण पुण्यातही अनेक आहेत. मगरपट्टा, डीसी इथे एक सोडून दोन आंध्रा मेशी आहेत तिथे १००-११०/- हाच चार्ज आहे.
११०/- में अगर इतना मिले, तो कोई ये (मराठी) क्यूं ले?
(आंध्रा सुपर)
26 Aug 2018 - 10:32 pm | बॅटमॅन
नुसती क्वांटिटि नव्हे तर क्वालिटीही अप्रतिम असते. माझे वडील खाण्याच्या बाबतीत एकदम कट्टर मराठी आहेत. विशिष्ट म्हणजे विशिष्ट पद्धतीचंच जेवण लागतं. इतकं असून त्यांनाही तिथलं जेवण आवडलं. माझी तर काय गोष्टच सोडून सोडा, मी खाद्यसंस्कृतीनिहाय पाहिले असता अण्णा आहे, भाऊ किंवा भैया नाही.
सांगायचा मुद्दा असा की अशीही काही हॉटेले अस्तित्वात आहेत तीही पुण्यात. शिवाय दुसर्या तिसर्यांदा भात/भाजी/सांबार/रसम देताना आजिबात इरिटेट होत नाहीत.
27 Aug 2018 - 9:09 am | प्रचेतस
हिंजवडीत दोन तीन आहेत. पोळ्यांसकट अमर्यादित. जबरी आहेत. ८० रु. फक्त.
27 Aug 2018 - 12:37 pm | खटपट्या
नाव आणि पत्ता द्या.
27 Aug 2018 - 1:01 pm | प्रचेतस
महेश आणि दुसरी बहुधा पॅराडाइज. पर्सिस्टंटच्या मागच्या गल्लीत. शिवाजी चौकातून फेज १ च्या इंफोसिस सर्कलच्या दिशेने आत आल्यावर दुकानांचा पट्टा संपल्यावर पहिल्याच गल्लीत डावीकडे.
27 Aug 2018 - 12:42 pm | खटपट्या
तांदूळ तसा स्वस्त असतो. त्यामुळे भाताचं जेवण अनलिमिटेड द्यायला परवडत असावं. मी हैद्राबादेत असताना अनलिमिटेड भाताचं जेवण २० रुपयात खाललेलं आहे (१९९६ साली) बाकी सांबाराची छोटी बादली समोर आणून ठेवत असत. अनलिमिटेड लोणचं. यातच मटण चिकनचा रस्सा ओतला की, अहाहा ! किमान तीन तास झोप नक्की. मी शनिवार रविवार दुपारी हे जेवण जेउन ताणून देत असे...
गेले ते दीन गेले.
26 Aug 2018 - 10:35 pm | अभ्या..
अगदी अगदी.
बाकी ते बॉबी म्हणजे मुरकुल काय? पुंगळ्या? का कुरड्या?
27 Aug 2018 - 12:48 am | बॅटमॅन
पुंगळ्या बे पुंगळ्या. चटणीला लावून खाल्लो की कळायचं बंदच.