भारांच्या जगात... ३
मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत
ज्यूल्स व्हर्नच्या ' ऑफ ऑन अ कॉमेट' (Off on a comet) या कादंबरीचा हा दुसरा रोमांचकारी भाग!. ’सूर्यावर स्वारी?’ या पहिल्या भागात (ह्याबद्दल वाचण्यासाठी लेखाच्या खाली लिंक देत आहे) फ्रान्सचे कॅप्टन हेक्तर सर्वादाक आणि रशियाचे काऊंट तिमाशेफ, हेक्तरचा इमानी नोकर बेन झूफ, तिमाशेफ यांच्या ’दोब्रिना’ बोटीचा कप्तान प्रकोपिअस आणि इतर जण एका धमाक्यामुळे एका नवीन प्रवासाला सुरुवात करतात आणि दुसर्या भागात त्यांना येऊन मिळतात ते ’ अनाकलनीय मजकूर’ लिहिणारे फ्रेंच प्रोफेसर ’रोझेत’!
मरणासन्न अवस्थेत असलेल्या प्रोफेसरांना परत मर्त्य जगात घेऊन येण्याचे काम बेन झूफ आणि नेग्रेत हे करतात. हे प्रोफेसर म्हणजे एकेकाळचे कॅप्टन हेक्तर सर्वादाकचे शिक्षक निघतात आणि चालू होते सर्वांचीच कसरत आणि धावपळ. बुद्धीने कुशाग्र पण स्वभावाने हेकट आणि विक्षिप्त असणारे हे प्रोफेसर रोझेत सर्वांना ’गालिया’शी ओळख करून देतात आणि घडणार्या विचित्र गोष्टींचा खुलासा होतो.
’गालिया’ हे ह्या सर्व लोकांचे नवीन विश्वच असते असे म्हणायला हरकत नाही. झपाट्याने कमी होणार्या तापमानामुळे ज्वालामुखीच्या डोंगराच्या गुहांत आश्रय घेणारे हे सर्व प्रोफेसरांचे विद्यार्थी बनतात आणि आणि ह्या गालियाचे वजन प्रोफेसर महाशय ह्यांना करून दाखवून अचंब्यात पाडतात.
सारखे कमी होणारे तापमान आणि एके दिवशी अचानक थंड पडलेला ज्वालामुखी शब्दश: ह्यांच्या तोंडाचे पाणी पळवतो. मग सुरुवात होते ह्या नवीन ज्वालामुखीच्या उदरात उष्णतेचा शोध घेण्याची मोहीम! सर्वांना संभाळून घेत जगण्याची धडपड... रोझेत यांची सांगितलेले विज्ञान, इतिहास आणि नवीन अपरिचित भूगोल आणि ग्रहतार्यांचे गणित ह्यात सर्वांची ससेहोलपट होते. जवळ जवळ येणारा गुरू धडकणार की काय? ... शनीमाहात्म्य जाणून घेतानाचे दिसणारे शनीचे रुपडे... गालियाला बसणारी थप्पड आणि ह्या सर्व जंजाळातून मुक्त होऊन परत आपल्या मूळ निवासस्थानी जिवंत आणि सुखरूप पोहोचण्यासाठी उभारलेले बलूनचे धूड... ह्या सर्व रोमांचात अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही.
पुस्तकाच्या सुरुवातीला खूप आकडेमोड, गणित आणि विज्ञान (अपरिचित असा भूगोलदेखील) असले तरी पुढे पुढे कादंबरी आपलीच एक खास पकड घेते. ह्यात नि:संशयपणे बेन झूफ आघाडीवर आहेच तसेच प्रोफेसर आणि कंजूस इसाकदेखील!
बाकी भारांची आणि ज्यूल्स व्हर्नची मूळचीच मिस्कील वृत्ती ह्यात ’चार चॉंद’ लावते असे म्हणायला हरकत नाही.
प्रकरणांची नावेदेखील त्याच प्रमाणे उत्कंठा वाढवणारी आणि अफलातून. उदा. प्राध्यापकाचा पुनर्जन्म, भरपूर इतिहास किंचित उपहास, पृथ्वीवाल्यांचा पांढरा चेंडू, गालिया आणि अवलिया, इसाकचा काटा, आकडेमोड आणि डोकेफोड, गुरुचरित्र, शनीमाहात्म्य, नाताळामागून घोटाळा, इसाकनिती, ’बोलून’ मार्ग काढला, गालियाला थप्पड बसते आणि उड्डाण!
ह्याच बरोबर सर्वांची बिनचूक व्यक्तीवैशिष्ठ्यं आणि स्वभाव हे ह्या कादंबरीचे जीव! ह्यात सुद्धा इंग्लिशमन लोकांचा वेडाचार आणि जगापासून आपलेच वेगळे जग असल्याचा अलूफ स्वभाव ह्या धमालीत भर टाकतात. विशेषत: त्यांचे अजब पद्धतीत बुद्धीबळ खेळण्याचा प्रकार!
ह्या कादंबरीत असणारी ’ओरिजनल’ चित्रे मला आतंरजालावर सापडली ती तुमच्या सोईसाठी देत आहे. बाकी हा धमाल प्रकार एकदा तरी नक्की अनुभवण्यासारखा आणि तोदेखील मूळ पूर्ण स्वरुपातच! (संक्षेप नाही. संक्षेपाचे नाव देणार होतो, पण दिले तर ह्या प्रकाराचे गुपित एका प्रकारे उघड होईल म्हणून देत नाही.)
बाकी परिचय कसा वाटला ते कळवा. आणि तयार राहा पुढच्या भारांच्या वेडकथांसाठी: उडती छबकडी!
मी सध्या तुमची रजा घेतो.
लवकर आणि नक्की कळवा.
धन्यवाद!
(सूर्यावर स्वारी? ह्या पुस्तकाच्या परिचयाची लिंक : सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत. )
ता.क.- मी भागवतांची खालील पुस्तके खूप आशेने आणि मेहनतीने शोधत आहे. मिळाल्यास कृपया मला देऊ शकत असाल तर नक्की संपर्क साधा. पुस्तकाचा योग्य तो मोबदला अथवा बदल्यात कुठले पुस्तक हवे असल्यास नक्की कळवा, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. (संपर्क- +९१ ८९५६८ ६८३३२)
१. मायापूरचे रंगेल राक्षस- लाखाणी बुक डेपो
२. मुक्काम शेंडेनक्षत्र- लाखाणी बुक डेपो
३. काळा बाण-लाखाणी बुक डेपो
४. चंद्रावर स्वारी-लाखाणी बुक डेपो
५. झपाटलेला प्रवासी-लाखाणी बुक डेपो
६. किल्ल्यातील कारस्थान-लाखाणी बुक डेपो
७. उडती छबकडी- भारतीय ग्रंथ भवन
८. माझा विक्रम
९. वैतागवनातील वाफारे
१०. चिन्याचा चिन्याचा जमालगोटा
११. भटकबहाद्दर
१२. हिंमतवान जासूद- (लाखाणी बुक डेपो-बहुतेक)
१३. सगळं सगळं ठीक होतं- मॅजेस्टिक बुक डेपो
१४. अंतराळात अग्निबाण- मॅजेस्टिक बुक डेपो
१५. तोरणा कुणी जिंकला
१६. खरा खजिना
१७. काश्याची काशियात्रा
१८. लाख मांजरी
१९. अलकनंदा आणि जादूगार जिम
२०. समुद्र सैतान- लाखाणी बुक डेपो
२१. सफरचंद-लाखाणी बुक डेपो
२२. शाळेतली भुताटकी- मॅजेस्टिक बुक डेपो
२३. वनस्पतींचा जादूगार- मॅजेस्टिक बुक डेपो
२४. पबुताईच्या गोष्टी- ढवळे प्रकाशन (केशव भिकाजी ढवळे)
२५. पबुताईची फ कशी झाली- ढवळे प्रकाशन (केशव भिकाजी ढवळे)
२६.निळा मासा- नाग विदर्भ प्रकाशन
२७. एक चमत्कारिक रात्र- नाग विदर्भ प्रकाशन
ह्या लेखप्रपंचाचे आणखी दुवे
1. सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत.
2. भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत
प्रतिक्रिया
9 Aug 2018 - 9:19 am | गवि
एकदा दुकानात दिसली होती दोन्ही पुस्तकं पण संक्षिप्त आवृत्ती असं लिहिलं होतं.
9 Aug 2018 - 9:59 am | अजिंक्य विश्वास
संक्षिप्त आवृत्ती ह्यातल्या बर्याच पुस्तकांची आली आहे. पण बहुतेक करून नावे बदलली आहेत. तेच शोधणे चालू आहे सध्या
9 Aug 2018 - 1:16 pm | गवि
संक्षिप्त आवृत्ती म्हणजे नेमका काय प्रकार आहे? जर मजकूर काटछाट करून आकार छोटा करत असतील तर कितपत कमी होतो कंटेंट? असं करण्यात व्यावसायिक फायदा काय त्यांचा?
9 Aug 2018 - 6:37 pm | अजिंक्य विश्वास
संक्षिप्त म्हणजे जवळपास ’रिडर्स डायजेस्ट’ सारखा प्रकार पण खूप कमी शब्दात. मागे मी ’सूर्यावर स्वारी?’ चा परिचय दिला होता. त्याचे संक्षिप्त रूप म्हणजे ’कंपनी चालली सूर्याकडे’. मूळ पुस्तक जवळपास २०० पानांचे आहे, पण संक्षिप्त रूप फक्त ९२ पानांचे आहे. फ़क्त गाभा घेतला आहे. पण मूळ पुस्तकातील डिटेल्स ह्यात येत नाहीत.
कन्टेन्ट खूप कमी आहे त्यात आणि मूळ पुस्तक छोट्या स्वरुपात का होईना बाजारात येणे हा कदाचित व्यावसायिक फायदा असू शकेल.
फार पूर्वी भारांनी ’बालमित्र’ मासिक चालवण्यासाठी काही हजारांचे कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी लाखाणींनी त्यांना एका शब्दावर त्यांचे कर्ज फेडले. मग त्याची परतफेड त्यांनी लाखाणींकडे ही पुस्तके देऊन केली.
सूर्यावर स्वारी?, मुक्काम शेंडेनक्षत्र, चंद्रावर स्वारी, अदृश्य माणूस, किल्ल्यातील कारस्थान, मायापूरचे रंगेल राक्षस, काळा बाण, सफरचंद, समुद्री सैतान, हिंमतवान जासूद आणि झपाटलेला प्रवासी ही पुस्तके लाखाणींनी प्रकाशित केली. पैकी झपाटलेला प्रवासी राजा प्रकाशन आणि नंतर मुक्काम शेंडेनक्षत्र हे उत्कर्ष प्रकाशनने छापले. राजा प्रकाशनने तर ज्यूल्स व्हर्नचा संचच काढला पण दुर्दैवाने तो संक्षिप्त रूपात काढला आणि उत्कर्षने कसे काय केले देव जाणे, पण भारा गेल्यावर मुक्काम शेंडेनक्षत्र छापले.
भारांची जी पुस्तके दिल्याची भावना असेल त्याची जाणीव म्हणून त्यांनी कदाचित ती पूर्ण रुपात आणली नाहीत (अपवाद झपाटलेला प्रवासी आणि मायापूरचे रंगेल राक्षस. पैकी झपाटलेला प्रवासीची तिसरी आवृत्ती पॉप्युलरने काढली होती, म्हणून कदाचित मिळाली असेल, असा माझा अंदाज आहे. पण किल्ल्यांतील कारस्थान, काळा बाण आणि अदृश्य माणूस तर दिसत पण नाही.)
बाकी मी शोधत आहे. जशी मिळतील तसे अपडेट करत जाईन.
9 Aug 2018 - 10:10 am | टर्मीनेटर
लहानपणी वाचलेल्या ह्या पुस्तकांच्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद अजिंक्य विश्वासजी.
9 Aug 2018 - 6:36 pm | अजिंक्य विश्वास
धन्यवाद सर
10 Aug 2018 - 4:59 pm | सिरुसेरि
चिन्याचा चिन्याचा जमालगोटा - याचे खरे नाव "एका चिन्याचा जमालगोटा" असे आहे ना ? . हे पुस्तक पुर्वी उत्कर्ष प्रकाशनाने आणले होते .
10 Aug 2018 - 11:55 pm | अजिंक्य विश्वास
'चिन्याचा चिन्याचा जमालगोटा' हे आधीचे नाव आहे. 'एका चिन्याचा जमालगोटा' हे नाव जेव्हा राजा प्रकाशनने संक्षेप काढायला सुरुवात केली त्यावेळेस दिले गेले आहे. तुम्ही खाली फोटो पाहत आहात तो १९६६ सालाचा आहे, म्हणजेच हे पुस्तक त्या आधी प्रकाशित झाले आहे. तुम्ही जे पुस्तक म्हणत आहात ते १९८५ नंतर संक्षेप रूपाने आले आहे.
13 Aug 2018 - 1:52 pm | आदूबाळ
यातली खालील पुस्तकं माझ्याकडे (पुण्याला) आहेत.
पुण्याला गेलो की शोधतो आणि तुम्हाला फोन करतो.
13 Aug 2018 - 11:38 pm | अजिंक्य विश्वास
धन्यवाद सर, मी आतुरतेने वाट पाहात आहे. खूप खूप आभार