राजयोग - १३

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
18 Jun 2018 - 3:40 pm

विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय.

रघुपतीला पाहताच टेहेळणी बुरुजावरचे पहारेकरी सावध झाले. शंख वाजू लागले. भाले, तलवारी घेतलेले सैनिक चारीबाजूंनी पुढे सरसावले. रघुपती जानवं दाखवून इशारा करू लागला. सैनिक सावधपणे अंदाज घेऊ लागले. रघुपती टेहेळणी बुरुजापर्यंत पोचल्यावर पहारेकर्यांनी पुढे होऊन त्याला विचारलं, "कोण आहेस तू?"

रघुपती म्हणाला, "मी ब्राह्मण, अतिथी."

विजयगढचे महाराज विक्रमसिंह धार्मिक होते. देव, ब्राह्मण आणि अतिथी यांची ते मनोभावे सेवा करीत. जानवं घातलेलं असेल तर किल्ल्यात प्रवेश करायला वेगळ्या प्रवेशपत्राची गरज नसे. पण युद्धाच्या दिवशी काय करणं योग्य आहे हा प्रश्न सैनिकांना पडला.

रघुपती म्हणाला, "तुम्ही मला शरण दिली नाहीत तर यवनांच्या हातून माझं मरण निश्चित आहे."

विक्रमसिंहाच्या कानावर ही बातमी जाताच त्यांनी रघुपतीला किल्ल्यात प्रवेश करायला परवानगी दिली. टेहेळणीच्या बुरुजावरून एक दोरखंडाची शिडी उतरवली गेली आणि रघुपती किल्ल्यात दाखल झाला.

किल्ल्यात सगळे युद्ध सुरू होण्याची वाट पहात होते. वृद्ध काकासाहेबांनी रघुपतीच्या आदरातिथ्याची जबाबदारी घेतली. त्यांचं खरं नाव आहे खडगसिंह पण कुणी त्यांना काकासाहेब म्हणतं, तर कुणी सुभेदारसाहेब, का म्हणतात हे कुणालाच माहीत नाही. जगाच्या पाठीवर त्यांचा कुणी भाचा नाही की भाऊ नाही, काका होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांचं वतन इतर वतनदारांपेक्षा अगदी नगण्य आहे पण तरीही कुणाच्याच मनात त्यांच्या सुभेदारसाहेब असण्याबद्दल किंतु नाही. बिना भाच्यांचे काका आणि बिना वतनाचे सुभेदार असल्यावर त्यांना जगाची नश्वरता किंवा लक्ष्मीची चंचलता आपली उपाधी हिरावून घेईल याची चिंताच नाही.

रघुपतीचा तेजस्वी, एखाद्या दीपशिखेसारखा असलेला बांधा पाहून काकासाहेबांनी अगदी भक्तिभावे त्याला नमस्कार केला, म्हणाले, "वाह! हाच खरा ब्राह्मण!"

आजूबाजूला सुरू असलेल्या चिंताजनक गोष्टींवर दुःखी होत काकासाहेब म्हणाले, "तसेही आता असे कितीसे ब्राह्मण भेटतात.."

रघुपती म्हणाला, "खूपच कमी."

काकासाहेब - "पूर्वी ब्राह्मणाच्या मुखावर तळपत्या आगीचं तेज होतं, आता सगळी आग फक्त जठरात आहे!"

रघुपती - "ती तरी कुठे पहिल्यासारखी आहे?"

त्याच्या म्हणण्याला दुजोरा देत काकासाहेब म्हणाले, "अगदी बरोबर! अगस्ती ऋषींनी जसा समुद्र पिला तशी जर त्यांची भूक असती तर? विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी!"

रघुपती म्हणाला, "अशा अजूनही काही गोष्टी असतील!"

काकासाहेब म्हणाले, "हो मग काय! आहेतच! जम्भू ऋषींची तहान कशी होती याची गोष्ट तर सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण त्यांची भूक कशी होती हे कुठे कुणी लिहून ठेवलंय? ते फलाहार करीत म्हणजे कमी खात होते असं थोडीच आहे, दिवसभरात किती फळं खाल्ली याचा कुणी हिशोब ठेवला असता तर काही समजलं असतं!"

जम्भू ऋषींचं महात्म्य मनोमन आठवत रघुपती म्हणाला, "नाही साहेब, आहाराकडे त्यांचं लक्ष होतं कुठे!"

काकासाहेब जीभ चावून म्हणाले, "राम राम! काय सांगता ठाकूर? त्या लोकांचा जठराग्नी किती प्रबळ होता त्याचेही काही पुरावे आहेत, बघा काळाच्या ओघात कितीतरी अग्नी विझून गेले, होमहवन आता कुठे होतं?पण.."

त्यांचं बोलणं मधेच थांबवत रघुपती रागावून म्हणाला,
"होमहवन होणार तरी कसं? तूप तरी आहे का? नास्तिकांनी सगळ्या गायींचा बंदोबस्त केला! हवन करायला त्याची सामग्री नको का? हवनाचा अग्नी निरंतर जळत नाही राहिला तर ब्रह्मतेज तरी कसं टिकून राहणार?"

रघुपती आतल्याआत धुमसू लागला.

त्याचा आवेश पाहून काकासाहेब म्हणाले, "बरोबर आहे तुमचं, ठाकूर. गायी मरून पुन्हा पृथ्वीवर जन्म तर घेत आहेत, पण त्यांच्यापासून तूप मिळण्याची काही शाश्वती नाही.. बरं, कुठून येणं झालं आपलं?"

रघुपती म्हणाला, "त्रिपुराच्या राजधानीवरून."

विजयगढच्या बाहेर असलेल्या इतिहास, भूगोलाची काकासाहेबांना फार माहिती नव्हती. त्यांच्यासाठी जगात फक्त एक विजयगढच आहे, बाकी माहिती हवी कशाला?

आपल्या तुटपुंज्या ज्ञानाच्या आधारे काहीशा अंदाजाने काकासाहेब म्हणाले, "अस्स! त्रिपुराचे महाराज खूप मोठे आहेत ना?"

रघुपतीने होकारार्थी मान हलवली.

काकासाहेब - "काय करता ठाकूर आपण?"

रघुपती - "मी त्रिपुराचा राजपुरोहित आहे."

आनंदाने आपले डोळे मिटून घेत काकासाहेब म्हणाले, "वाह!" रघुपतीविषयी त्यांच्या मनातला आदर अजून वाढला.

"काय काम काढलंत इकडे?"

रघुपती - "तीर्थ दर्शनासाठी आलो."

तेवढ्यात धूम असा आवाज झाला. शत्रूपक्षाने किल्ल्यावर हल्ला केला. काकासाहेब हसून डोळे मिचकावत म्हणाले, "काही नाही, दगड टाकत असतील." जेवढा विश्वास काकासाहेबांचा विजयगढवर आहे, तेवढे तर विजयगढमधले दगडही मजबूत नसतील. कुणी दूरदेशीचा पाहुणा किल्ल्यात आला की काकासाहेब त्याला आपल्या ताब्यात घेत आणि विजयगढ कसा महान आहे याची त्याला पूर्ण खात्री करून देत. त्रिपुराच्या राजधानीवरून साक्षात त्रिपुराचा राजपुरोहित आला, असा पाहुणा काही पुन्हा पुन्हा येत नाही. काकासाहेब मनोमन अतिशय खुश झाले. रघुपतीबरोबर ते विजयगढच्या इतिहासाची चर्चा करू लागले. "असं बघा, ब्रह्माने जेव्हा हे जग निर्माण केलं तेव्हाच हा विजयगढचा किल्लाही बनवला. मनूनंतर लगेचच महाराज विक्रमसिंहांचे पूर्वज विजयगढवर राज्य करू लागले यात काहीच शंका नाही." शंकराने या किल्ल्याला कुठला वर दिला, कार्तवीर्यार्जुन कसा इथे बंदी होता, काही म्हणता काही रघुपतीपासून लपवलं नाही.

संध्याकाळी खबर मिळाली, शत्रूपक्षाला किल्ल्याचं काहीही नुकसान करता आलं नाही. त्यांनी तोफा लावल्या, पण तोफांचे गोळे किल्ल्यापर्यंत आलेच नाहीत. काकासाहेब काहीतरी गुपित कळल्यासारखं रघुपतीकडे पाहून हसले. त्यांचं म्हणणं होतं, किल्ल्याला भगवान शंकराकडून जो अभेद्यतेचा वर मिळाला आहे त्याचा यापेक्षा वेगळा पुरावा काय असणार? जणूकाही नंदीने ते तोफांचे गोळे हवेतच झेलले, आता कैलासावर गणपती आणि कार्तिकेय त्या गोळ्यांनी गोट्या खेळतील!

***

रघुपतीचं उद्देश्य एकच होतं, काहीही करून शुजाला आपल्या मुठीत करणं! जंगलात त्यानं जेव्हा शुजा किल्ल्यावर आक्रमणाची तयारी करत असल्याचं ऐकलं तेव्हाच त्यानं मनोमन ठरवलं, मैत्रीचा हात पुढे करून आधी किल्ल्यात प्रवेश मिळवायचा आणि मग शुजाची जशी जमेल तशी मदत करायची. पण त्याचा तसा युद्धविभागाशी काहीच संबंध नव्हता, मग नेमकी मदत कशी करता येईल हे काही तो ठरवू शकला नाही.

दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध सुरू झालं. शत्रूपक्षाने तोफा लावून किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग ढासळला, पण त्यांना आत प्रवेश करता आला नाही. बघता बघता तुटलेला बुरुज पुन्हा दुरुस्त करण्यात आला. अधूनमधून काही गोळे आत आले आणि किल्ल्यावरचे चार दोन सैनिक धारातीर्थी पडले, काही जखमी झाले.

"घाबरायचं काही काम नाही ठाकूर, हा सगळा नुसता खेळ सुरू आहे." असं म्हणत काकासाहेब चारीबाजूंनी फिरत किल्ला दाखवू लागले. कुठे शस्त्रागार आहे, कुठे धान्याचं भांडार आहे, कुठे जखमी सैनिकांची सुश्रूषा केली जाते, कुठे कैदखाना आहे, कुठे दरबार आहे, अगदी बारीकसारीक गोष्टी त्याला दाखवू लागले. रघुपतीच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य मोठ्या कौतुकाने पुन्हा पुन्हा पाहू लागले. रघुपती म्हणाला, "वाह! काय विलक्षण कारखाना आहे, त्रिपुराचा किल्ला काय टिकणार यापुढे? पण साहेब, एका गोष्टीचं आश्चर्य करावं तितकं कमीच आहे. त्रिपुराच्या किल्ल्यात एक भुयारीमार्ग आहे, कधी लपून बाहेर पडायचं झालं तर. इथं तसं काहीच दिसत नाही.

काकासाहेब काही सांगणार होते, पण लगेच स्वतःला सावरून म्हणाले, "नाही, या किल्ल्यात असं काही नाही."

रघुपती अतिशय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, "इतक्या मोठ्या किल्ल्यात एकही भुयारीमार्ग नाही? काय सांगता!"

काहीसे हळवे होऊन काकासाहेब म्हणाले, "भुयारीमार्ग नाही असं कसं शक्य आहे? असणारच कुठेतरी, पण आम्हाला कुणाला त्याबद्दल माहिती नाही."

रघुपती हसून म्हणाला, "मग नसणारच! तुम्हालाच माहीत नाही तर अजून कुणाला माहीत असणार?"

काकासाहेब बराच वेळ गंभीर होऊन शांत बसले. तोंडासमोर चुटक्या वाजवीत "हरी ओम! राम कृष्ण हरी!" म्हणत एक मोठी जांभई दिली. मग चेहऱ्यावरुन, दाढीमिशांवरून हात फिरवत म्हणाले, "ठाकूर तुम्ही तर ईश्वराची सेवा करणारे! पूजाअर्चा करणारे! तुम्हाला सांगायला काही हरकत नसावी, किल्ल्यात आत यायला आणि बाहेर जायला दोन गुप्त मार्ग आहेत पण बाहेरच्या कुणाला ते दाखवायला मनाई आहे."

काहीशा संशयी सुरात रघुपती म्हणाला, "ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर असेलही."

काकासाहेबांना वाटलं, चूक त्यांचीच आहे. एकदा हो, एकदा नाही म्हणल्यावर कुणालाही संशय येणारचं. एखाद्या पाहुण्याच्या नजरेत त्रिपुराच्या किल्ल्यापेक्षा विजयगढचा किल्ला कमी व्हावा हे काही त्यांना सहन झालं नाही. ते म्हणाले, "असं बघा, आता त्रिपुरापासून तुम्ही खूप दूर आहात. आणि त्यात तुम्ही देवाधर्माची माणसं! तुमच्याकडून काही रहस्य उघडलं जाण्याची तशी शक्यता नाही."

रघुपती म्हणाला, "पण काय गरज आहे? तुम्हाला माझा इतकाच संशय येत असेल तर राहिलं! जाऊ द्या तो विषय! मी पडलो ब्राह्मणाचा मुलगा, मला किल्ल्याच्या या गोष्टींशी काय घेणंदेणं?"

जीभ चावत काकासाहेब म्हणाले,"अरे देवा देवा! तुमच्यावर कसला संशय? चला एकवेळ दाखवून आणतो."

इकडे शुजाच्या सैन्यात मोठी खळबळ माजली. शुजाचं शिबीर जंगलात होतं. सुलेमान आणि जयसिंहाच्या सेनेने येऊन त्याला बंदी बनवलं. लपूनछपून किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या सैनिकांवर चालून गेले. शुजाच्या सैन्याने लढाई न करताच वीस तोफा मागच्या मागे फेकून तोडल्या.

किल्ल्यात एकच जल्लोष झाला. सुलेमानचा दूत विक्रमसिंहाकडे पोचताच त्यांनी स्वतः किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर येऊन सुलेमान आणि राजा जयसिंहाचं स्वागत केलं. दिल्लीश्वराची सेना आणि हत्तीघोड्यांनी किल्ला भरून गेला. विजयाचं निशाण फडकावलं. शंख, रणवाद्यांच्या आवाजांनी सगळा आसमंत दुमदुमला. काकासाहेबांच्या पांढऱ्या झुपकेदार मिशांखालचं मिश्किल, प्रसन्न हसू हळूहळू मोठं होतं गेलं.

क्रमशः

कथामत

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

18 Jun 2018 - 4:08 pm | श्वेता२४

विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय. खुपच छान चाललीय कथामाला. व्यनि केल्याला तुम्ही कृतीतून पुढील भाग लगेच टाकून उत्तर दिलंत याबद्दल धन्यवाद. पुभाप्र

अनिंद्य's picture

18 Jun 2018 - 4:14 pm | अनिंद्य

भाग आवडला,
आता पुढील भागाच्या प्रतीक्षेत !

manguu@mail.com's picture

18 Jun 2018 - 5:15 pm | manguu@mail.com

छान

.

नाथमाधवांची वीरधवल कादंबरी आठवली

तिसरा भाग वाचला आणि वाचन थांबवले. विचार केला, जरा जास्त भाग आले की सलग वाचता येईल. थांबलो ते बरं केलं असं वाटले पहिल्या भागापासुन वाचल्यावर. वा! मस्तच! छान!
लिहायची स्टाईल आवडली.

प्रचेतस's picture

18 Jun 2018 - 7:06 pm | प्रचेतस

हा भागही खूप छान.

यशोधरा's picture

18 Jun 2018 - 9:29 pm | यशोधरा

वाचते आहे..

एस's picture

18 Jun 2018 - 11:21 pm | एस

वाचतोय.