राजयोग - १४

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
4 Jul 2018 - 11:43 am

काकासाहेबांच्या आनंदाला आज उधाण आलंय. दिल्लीश्वराचे राजपूत सैनिक आज विजयगढचे पाहुणे आहेत. बलशाली शाहशुजा विजयगढच्या किल्ल्यात बंदी आहे. कार्तवीर्यार्जुनानंतर असा बंदी मिळालाच नाही विजयगढला. त्याची अवस्था आठवून निश्वास सोडून काकासाहेब राजपूत सुचेतसिंहला म्हणाले, "बघा बरं, काय तयारी करावी लागली असेल शंभर हातांत बेड्या घालायला.. कलियुग आलं आणि सगळी धुमधाम बंद! आता राजाचा मुलगा असू दे नाहीतर बादशहाचा, बेड्या घालायला दोनपेक्षा जास्त हात कुठे शोधून सापडणार नाहीत.काय मजा मग असे बंदी पकडण्यात?"

हसत हसत सुचेतसिंह आपल्या हातांकडे पहात म्हणाला, "हे दोन हातच पुरेसे आहेत!"

थोडा विचार करून काकासाहेब म्हणाले, "हां तेही ठीक आहे म्हणा, तेव्हा कामही भरपूर असेल. आता काम इतकं कमी असतं की या दोन हातांचच काय करावं कळत नाही. अजून जास्त हात असते तर बाकी काही नाही पण सारखं सारखं मिशा पिळाव्या लागल्या असत्या."

काकासाहेबांच्या वेशभूषेत आज जराही कसर नाही. हनुवटीपासून खाली पिकलेल्या दाढीचे छान दोन भाग करून ते दोन्ही कानांवरून मागे टाकले आहेत. मिशा चापून चोपून व्यवस्थित कानापर्यंत मागे बसवल्या आहेत. डोक्यावर ऐटीत पगडी आहे, कमरेला तलवार. नक्षीदार जरीच्या, पुढचं टोक शिंगाप्रमाणे वळवलेल्या मोजड्या पायात शोभून दिसतायत. आज काकासाहेबांच्या चालीत निराळीच ऐट आहे, विजयगढचा महिमा त्यांच्या देहबोलीतून ओसंडून वाहतोय. आज जमलेल्या सगळ्या राजपूतांसमोर विजयगढचा गौरव सिद्ध होणार, या आनंदात ते तहान भूक सगळं काही विसरून गेले आहेत.

सुचेतसिंहला बरोबर घेऊन ते पूर्ण दिवस त्याला किल्ला दाखवत फिरत होते. सुचेतसिंहने कधी एखाद्या गोष्टीवर काही प्रतिक्रिया नाही दिली तर स्वतःच "वाह वा वाह वा" म्हणून त्याला उत्साही करण्याचा प्रयत्न करीत होते.
किल्ल्याचे बुरुज दाखवताना त्यांना जरा जास्तच प्रयत्न करावे लागले. त्या बुरुजाहूनही अविचल भाव सुचेतसिंहच्या चेहऱ्यावर होते. काकासाहेब तरीही त्याला कधी बुरुजाच्या उजवीकडे, कधी डावीकडे, कधी वर, कधी खाली नेऊन "अवर्णनीय! प्रशंसा तरी कशी करू!!" म्हणत राहिले, पण सुचेतसिंहच्या हृदयावर त्याचा जराही परिणाम झाला नाही. शेवटी संध्याकाळी थकून सुचेतसिंह म्हणाला, "मला भरतपुरच्या किल्ल्याशिवाय इतर कुठला किल्ला आवडत नाही."

कुणाशी वादविवाद करण्याचा काकासाहेबांचा स्वभाव नव्हता, काहीसे निराश होऊन ते म्हणाले, "अवश्य अवश्य! तुम्हाला असं वाटणं योग्यच आहे."

एक मोठा निश्वास सोडून त्यांनी शेवटी किल्ल्याविषयी चर्चा बंद केली. विक्रमसिंहांचे पूर्वज दुर्गासिंह यांची गोष्ट सांगू लागले. म्हणाले, "दुर्गासिंहांना तीन मुलं होती. सगळ्यात धाकटा चित्रसिंह. त्यांची एक विचित्र सवय होती. रोज सकाळी ते अर्धा शेर चणे दुधात शिजवून खात! शरीरही तसंच होतं! बरं तुम्ही ज्या भरतपुरच्या किल्ल्याबद्दल सांगताय, तो नक्कीच खूप मोठा असेल नाही? पण ब्रह्मवैवर्त पुराणात त्याचा काहीच कसा उल्लेख नाही?"

सुचेतसिंह हसून म्हणाला, "त्यावाचून काही काम तर नाही ना अडलं!"

काकासाहेब खोटं खोटं हसत म्हणाले, "हा हा हा! अगदी बरोबर! अगदी बरोबर! मग काय तर त्रिपुराचा किल्लाही फार मोठा आहे म्हणे, पण विजयगढचा.."

सुचेतसिंह - "त्रिपुरा? हा कुठला देश?"

काकासाहेब - "फार सुंदर देश आहे तो! मी इतकं सगळं सांगण्यापेक्षा त्रिपुराचा राजपुरोहित आमचा अतिथी आहे. त्याच्याच तोंडून तुम्हाला कळू देत."

पण आज ब्राह्मण शोधूनही कुठे सापडला नाही. खट्टू होऊन काकासाहेब मनातल्या मनात म्हणाले, "या अडाणी राजपुतापेक्षा तो ब्राह्मण बरा!"

सुचेतसिंहसमोर त्यांनी रघुपतीची तोंड दुखेपर्यंत प्रशंसा केली. विजयगढबद्दल रघुपतीच्या मनात किती अप्रूप आहे तेही न विसरता सांगितलं.

***

काकासाहेबांच्या तावडीतून सुटायला सुचेतसिंहला नंतर फार कष्ट करावे नाही लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी बंदीला घेउन सम्राटांची सेना कूच करण्याचं ठरलं, आणि सैनिक प्रवासाच्या तयारीत गुंतले.

कैदखान्यात शाहशुजा अतिशय कंटाळून मनाशीच म्हणत होता, "किती मूर्ख लोक आहेत हे! शिवीरातून माझा हुक्का तरी आणून द्यावा ना!"

विजयगढच्या डोंगराच्या पायथ्याशी एक खूप खोल तलाव आहे. त्या तलावाच्या किनाऱ्यावर वीज पडून जळून गेलेल्या पिंपळाचं एक खोड आहे. रघुपतीने बरोबर त्या खोडापाशी येऊन तलावात डुबकी मारली आणि अदृश्य झाला.

किल्ल्यात प्रवेश करायला जो गुप्त मार्ग आहे त्याचं तोंड याच तलावात अगदी तळाशी आहे. आतपर्यंत पोहत जाऊन त्या भुयाराच्या तोंडाशी असलेला एक भलामोठा दगड खालून खूप जोर लावून हलवावा, तेव्हा ते दार उघडतं. आतल्या माणसाला तो दगड हलवणे शक्यच नाही. किल्ल्याच्या आत असलेल्या कुणाला बाहेर यायचं असेल तर ते हा मार्ग वापरू शकत नाहीत.

शुजा कैदखान्यात पलंगावर झोपला होता. तिथं एका पलंगाशिवाय इतर काहीही नाही. कोपऱ्यात एक दिवा जळत होता. अचानक त्या खोलीत एक भगदाड दिसू लागलं. त्यातून हळू हळू डोकं बाहेर काढीत जणू पाताळातून रघुपती वर आला. त्याचं सगळं अंग ओलं झालं होतं. कपड्यातून पाण्याच्या धारा खाली गळत होत्या. धीर करून रघुपतीनं शुजाला स्पर्श केला.

दचकून शुजा काही वेळ डोळे चोळत पडून राहिला. मग एकदम आळसावून म्हणाला, "काय वैताग आहे? आता हे लोक रात्री झोपूही देणार नाहीत का? काय विचित्र माणसं आहेत.."

रघुपती हळू आवाजात म्हणाला, "शहजादयांनी उठण्याची कृपा करावी. मी तोच ब्राह्मण आहे. मला आठवून तर बघा थोडं. भविष्यातही मला विसरू नका.."

दुसऱ्या दिवशी सकाळी सम्राटांची सेना कूच करायला तयार झाली. शुजाला जागं करायला राजा जयसिंह स्वतः बंदिशाळेत गेला. बघितलं तर शुजा पलंगातून उठला नव्हता. जवळ जाऊन हात लावला तर शुजा तिथे नव्हताच. फक्त शुजाचे कपडे तिथे होते, शुजा नव्हताच. खोलीच्या बरोबर मधे एक भुयार दिसत होतं, त्याचं दगडी झाकण बाजूला पडलं होतं.

बंदी पळून गेल्याची बातमी बघताबघता किल्ल्यात पसरली. त्याला शोधायला चारी दिशांना स्वार दौडले. राजा विक्रमसिंहानं शरमेने मान खाली घातली. बंदी पळाला कसा, यावर विचारविमर्श करायला दरबारात सभा बोलावली गेली.

काकासाहेबांचा तो अभिमान, आनंद कुठल्या कुठे पळाला. वेड्यासारखे ते फक्त "ब्राह्मण कुठे आहे?" "ब्राम्हण कुठे आहे?" विचारीत रघुपतीला शोधू लागले. ब्राह्मण कुठेही सापडला नाही. पगडी काढून काकासाहेब डोक्याला हात लावून बसले. तितक्यात सुचेतसिंह आला आणि म्हणाला, "काय आश्चर्याची गोष्ट काकासाहेब? हे कुणा भुताखेताचं तर काम नाही ना?"

हताशपणे मान हलवत काकासाहेब म्हणाले, "नाही नाही कुणा भुताखेताचं हे काम नाही. एका अतिशय अज्ञानी म्हाताऱ्याचं आणि एका विश्वासघातकी शैतानाचं हे काम आहे."

सुचेतसिंह आश्चर्याने म्हणाला, "तुम्हाला हे कुणी केलंय माहीत आहे तर त्यांना पकडून का देत नाही?"

"त्यातला एक पळून गेलाय आणि एकाला पकडून आता राजसभेत नेणार आहे." असं म्हणत काकासाहेब उठले, पगडी,राजसभेचा पोशाख घालून तयार झाले.

राजसभेत त्यावेळी पहारेकऱ्यांची साक्ष घेत होते. काकासाहेबांनी मान खाली घालून सभेत प्रवेश केला. आपली तलवार विक्रमसिंहाच्या पायाशी ठेवत म्हणाले, "मला बंदी बनवायची आज्ञा द्या. मी अपराधी आहे."

राजाने चकित होऊन विचारलं, "काकासाहेब, काय झालं?"

काकासाहेब म्हणाले, "तोच ब्राह्मण, हे सगळं त्या बंगाली ब्राह्मणाचं काम आहे."

राजा जयसिंहाने विचारलं, "तुम्ही कोण आहात?"

काकासाहेब - "मी विजयगढचा म्हातारा काकासाहेब."

राजा जयसिंह - "काय केलं आहे तुम्ही?"

काकासाहेब - "मी विजयगढच रहस्य सांगून विश्वासघात केला आहे. अतिशय मूर्खासारखा त्या बंगाली ब्राह्मणावर विश्वास ठेवून मी त्याला भुयारी मार्ग दाखवला..."

विक्रमसिंह अतिशय रागावून ओरडला, "खडगसिंह!"

काकासाहेब दचकले, आपलं नाव खडगसिंह आहे हे ते जवळजवळ विसरूनच गेले होते.

विक्रमसिंह म्हणाला, "काकासाहेब, आता या वयात तुम्ही लहान मुलांसारखे का वागत आहात?"

काही न बोलता काकासाहेबांनी मान खाली घातली.

विक्रमसिंह पुढे म्हणाला, "काकासाहेब, तुमच्या हातून हे काम व्हावं? तुमच्यामुळे केवढा अपमान झाला आज विजयगढचा."

काकासाहेब गप्प उभे राहिले, त्यांचे हात थरथर कापू लागले. घामेजलेल्या तळहातांनी कपाळाला स्पर्श करून म्हणाले, "नशीब माझं.."

विक्रमसिंह - "माझ्या किल्ल्यातून दिल्लीश्वराचा शत्रू पळून गेला. तुम्ही मला दिल्लीश्वराच्या नजरेत अपराधी केलंत."

काकासाहेब म्हणाले, "अपराधी तर मी एकटा आहे. महाराजांचा यात काही दोष आहे यावर दिल्लीश्वर विश्वास करणार नाहीत."

तुच्छ कटाक्ष टाकून विक्रमसिंह म्हणाला, "कोण आहेस तू? तुला दिल्लीश्वर ओळखत नाहीत. त्यांच्यासाठी तू माझा माणूस आहेस. हे तर मी स्वतः बंदीच्या बेड्या काढून दिल्यासारखं झालं."

काकासाहेब काहीही बोलू शकले नाहीत. डोळ्यातुन वाहणारं पाणी ते थांबवू शकले नाहीत.

विक्रमसिंह म्हणाला, "काय शिक्षा करू तुला?"

काकासाहेब - "जी महाराजांची इच्छा असेल ती.."

विक्रमसिंह - "म्हातारा माणूस आहेस, तुला अजून काय शिक्षा करणार? तुझ्यासाठी निर्वासनाची शिक्षा पुरेशी आहे."

काकासाहेब विक्रमसिंहाचे पाय पकडून म्हणाले, "विजयगढमधून निर्वासन? नाही महाराज, या म्हाताऱ्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मला इथेच मरु द्या. मृत्युदंड द्या मला. या वयात आता मला कुत्र्यासारखं विजयगढमधून हाकलू नका."

राजा जयसिंह म्हणाला, "महाराज, माझी विनंती आहे. याचा अपराध क्षमा करावा. मी स्वतः घडलेल्या गोष्टीची कल्पना सम्राटांना देईन."

काकासाहेबांना क्षमा केली गेली. थरथर कापत असलेले काकासाहेब सभेतून बाहेर जाता जाता कोसळले. त्या दिवसापासून काकासाहेब बाहेर जास्त दिसत नाहीत. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला कोंडून घेतलंय. जणूकाही त्यांचा मणका मोडला असावा.

***

गुजुरपाडा हे ब्रह्मपुत्रेच्या किनारी वसलेलं छोटंसं गाव आहे. तिथला एक छोटासा जमीनदार आहे, पीतांबर राय. गावात काही फारसे लोक रहात नाहीत. जुन्यापुराण्या चंडीमंडपात बसून पीतांबर स्वतःला राजा म्हणवतो. त्याची प्रजाही त्याला राजा म्हणते. त्याचा राज महिमा चारोळीच्या वनांनी घेरलेल्या या छोट्याशा गावापुरताच आहे. जगातल्या मोठमोठ्या राजा महाराजांचे तेज, त्यांच्या कीर्तीचा प्रकाश या सावलीत विसावलेल्या घरट्यापर्यंत पोचत नाही. फक्त तीर्थ स्नानाच्या निमित्ताने येणाऱ्या त्रिपुराच्या राजांना राहण्यासाठी नदीच्या किनारी एक मोठी हवेली आहे, पण बरेच वर्षांपासून कुणी राजे इकडे फिरकले नाहीत. त्रिपुराच्या राजांविषयी इथल्या लोकांना थोडीफार ऐकीव माहितीच आहे.

भाद्रपद महिन्यातल्या एके दिवशी गुजुरपाडामध्ये बातमी पसरली की त्रिपुराचा कुणी राजकुमार हवेलीत रहायला येणार आहे. काही दिवसात मोठमोठ्या पगड्या बांधून आलेल्या लोकांनी हवेलीचा कायापालट केला. त्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने हत्ती-घोडे, सैनिकांची छोटी तुकडी असा लवाजमा बरोबर घेऊन नक्षत्रराय स्वतः गुजूरपाड्यात पोचला. त्याची ऐट, रुबाब पाहून गावकरी अवाक झाले. आजपर्यंत त्यांच्यासाठी पीतांबर फार मोठा राजा होता, पण नक्षत्ररायला पाहिल्यावर कुणालाही पीतांबरचं काही महत्व वाटेना. लोक आपआपसात बोलू लागले, "बघा तर, असा असतो राजकुमार!"

अशाप्रकारे स्वतःच पक्कं बांधलेलं घर आणि चंडीमंडप या दोघांसहित पीतांबरचं अस्तित्व कुठल्याकुठे विरून गेलं, पण तरीही तो आनंदी होता. त्याच्यासाठी नक्षत्रराय अगदी स्वप्नातल्या राजकुमारासारखा होता, त्याच्या चरणी आपली निष्ठा अर्पण करून पीतांबर धन्य झाला.
नक्षत्रराय हत्तीवर पालखीत बसून बाहेर पडल्यावर पीतांबर गावातल्या लोकांना एकत्र करून म्हणे, "राजा पाहिलाय कधी? हा बघा राजा!" रोज मासे, वेगवेगळ्या भाज्या असं सुग्रास जेवण पीतांबर नक्षत्ररायसाठी घेऊन जाई. त्याचा तरुण, सुंदर चेहरा पाहून पीतांबरचं मन मायेनं, अभिमानानं भरून येई. नक्षत्रराय राजा झाला, आणि पीतांबर प्रजेतला एक.

रोज दिवसातून तीनदा नौबत झडू लागली. गावातल्या रस्त्यांवर हत्ती घोडे फिरू लागले. हवेलीला छोट्याशा राजवाड्याचं रूप आलं. हवेलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तलवारी तळपू लागल्या. तऱ्हेतऱ्हेचे बाजार भरू लागले. पीतांबर आणि त्याच्या प्रजेच्या आनंदाला काही सीमा राहिली नाही. निर्वासनासाठी बाहेर पडलेला नक्षत्रराय या छोट्याशा गावाचा राजा बनून सगळं दुःख विसरला. इथं राज्यकारभाराची जबाबदारी तर काहीच नाही, पण राजा होण्याचं सुख मात्र पुरेपूर होतं. इथे तो म्हणेल ती पूर्व दिशा होती, त्याच्या स्वतःच्या देशात त्याला इतका मान कुठे मिळत होता. महत्वाची गोष्ट ही की रघुपतीची इथे सावलीही नाही. आधीच सुखासीन वृत्ती असलेला नक्षत्रराय थोडेसे स्वातंत्र्य मिळताच ऐषो आरामात मग्न झाला. ढाका नगरातून नट-नटी बोलवले गेले, नृत्य-गायन याचा नक्षत्ररायला जराही कंटाळा नाही.

त्रिपुरामधे जसा राज्यकारभार चालायचा अगदी तशीच पद्धत नक्षत्ररायने सुरू केली. सेवकांमधल्या कुणाचं नाव मंत्री ठेवलं गेलं, कुणाचं नाव सेनापती तर पीतांबरला सगळे आता दिवानजी म्हणू लागले. नियमित राजदरबार बसू लागला. मोठा आव आणून नक्षत्रराय न्याय करीत असे. कुणी नकुल येऊन तक्रार करीत असे, "मथुरने मला कुत्रा म्हणलं." नियमानुसार त्यावर आधी विचार केला जाई. अनेक पुरावे गोळा करून मथुर दोषी आहे हे सिद्ध झालं की अतिशय गंभीर चेहरा करून नक्षत्रराय आज्ञा देत असे, "नकुल, तू मथुरचे दोन्ही कान करकचून पिरगळ." वेळ अतिशय सुखात जाऊ लागला. कधी अगदीच काही काम नसेल तर विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी मंत्री बोलावला जाई. मंत्री इतर सभासदांना बरोबर घेऊन नवनवीन खेळ तयार करीत बसे, चर्चा आणि सल्लामसलती संपता संपत नसत. एक दिवस उगाच नावाला काही सैनिक अधिकारी घेऊन पितांबरच्या चंडीमंडपावर आक्रमण केलं गेलं. त्याच्या छोट्याशा तलावातून मासे, बागेतून नारळ, भाज्या लुटून त्या वाजतगाजत हवेलीत आणल्या गेल्या. नक्षत्ररायच्या अशा लीलांनी तो हळूहळू पितांबरच्या गळ्यातला ताईत बनला.

आज महालात एका छोट्या मांजराच्या पिल्लाचं लग्न आहे. नक्षत्ररायच्या छोट्या मांजराचं लग्न मंडल परिवारातल्या एका बोक्याशी ठरलं. दोन्ही परिवारात मध्यस्थी करणाऱ्या एका बुजुर्ग व्यक्तीला त्याच्या कामाचं बक्षीस म्हणून तीनशे रुपये आणि एक शाल देण्यात आली. मांजराला उटणं वगैरे लावायचे विधी पूर्ण झाले आहेत. संध्याकाळी चांगल्या मुहूर्तावर विवाहसोहळा संपन्न होणार. गेल्या काही दिवसांपासून राजवाड्यात त्याचीच धूमधाम सुरू आहे.

संध्याकाळी रस्ते दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघाले, सनईच्या मंगल स्वरांनी वातावरण भारून गेलं. मंडल परिवाराच्या घरातून जरीचे रेशमी कपडे घातलेला बोका अगदी बारीक आवाजात म्यांव म्यांव करीत पालखीतून लग्नस्थळी निघाला. परिवारातला सगळ्यात छोटा मुलगा त्याची दोरी हातात घेऊन करवल्यासारखा मिरवत चालला. शंखध्वनी चालू झाल्यावर नवरदेव मंडपात जाऊन बसला.

विवाह पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या पुरोहिताच नाव आहे, केनाराम, पण नक्षत्रराय त्याला रघुपती म्हणूनच बोलावतो. खरंतर रघुपतीला तो खूप घाबरतो, म्हणूनच या खोट्या रघुपतीला आपल्या बोटांवर नाचवून तो आपल्या मनाचं समाधान करून घेत होता. उगीच कारण काढून त्याला त्रास देत होता, गरीब बिचारा केनाराम सगळं निमूटपणे सहन करीत होता. दुर्दैवाने आज केनाराम सभेत उपस्थित नव्हता, त्याचा मुलगा तापाने फणफणला होता.

नक्षत्ररायने अधीर होऊन विचारलं, "रघुपती कुठे आहे?"

सेवक म्हणाला, "त्यांच्या घरी कुणी आजारी आहे."

नक्षत्रराय कडाडला, "बोलवा त्याला."

रघुपतीला बोलवायला माणूस पळाला. रडणाऱ्या मांजरासमोर नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू झाला.

नक्षत्रराय म्हणाला, "साहाना गा." साहाना राग आळवायला सुरुवात झाली.

काहीवेळाने सेवक येऊन म्हणाला, "रघुपती आले आहेत."

नक्षत्रराय रागावून म्हणाला, "घेऊन या त्याला."

लगेच पुरोहितानं कक्षात प्रवेश केला. पुरोहिताला पाहताच नक्षत्ररायचे हावभाव पूर्ण बदलले. चेहरा पिवळा पडला, घामानं कपाळ भिजून गेलं. साहाना राग, सारंगी, मृदंग सगळं जिथल्या तिथे थांबलं, फक्त मांजराची म्यांव म्यांव त्या स्तब्ध वातावरणात दुप्पट वेगाने घुमू लागली.

हा तर रघुपतीच. काही शंकाच नाही, उंच सडपातळ, तेजस्वी रघुपती. अनेक दिवसांच्या उपाशी कुत्र्याप्रमाणे वखवखलेल्या डोळ्यांनी आग ओकणारा. धुळीने माखलेले आपले पाय मखमली गालिचावर रोवून उभा राहून तो ताठ मानेने म्हणाला, "नक्षत्रराय!"

नक्षत्रराय काही बोलला नाही.

रघुपती म्हणाला, "तू रघुपतीला बोलावलंस, मी आलोय."

नक्षत्रराय अस्पष्ट आवाजात म्हणाला, "ठाकुर - ठाकुर!"

रघुपती म्हणाला, "उठ, इकडे ये!"

नक्षत्रराय सभेतून उठुन हळूहळू त्याच्याकडे निघाला, साहाना रागाचे, सारंगीचे सूर हवेत विरून गेले.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

रातराणी's picture

4 Jul 2018 - 11:48 am | रातराणी

राजयोग - १३ इथे आहे,

https://www.misalpav.com/node/42839

यशोधरा's picture

4 Jul 2018 - 3:38 pm | यशोधरा

वाचतेय.. गुंतागुंत आहे.

प्रचेतस's picture

4 Jul 2018 - 8:37 pm | प्रचेतस

सहमत

श्वेता२४'s picture

4 Jul 2018 - 3:46 pm | श्वेता२४

प्रत्येक भाग नावीन्यपूर्ण. पुढे काय होणार याचा अंदाज येत नाही. रातराणी आपला भावानुवाद खूपच छान . वाचताना खूप मजा येतेय. पुभाप्र.

वाचतोय. कालच आठवण आली होती, बरेच दिवस पुढील भाग आला नव्हता. पुभाप्र.

टर्मीनेटर's picture

4 Jul 2018 - 10:29 pm | टर्मीनेटर

आत्ताच हा भाग वाचला, आवडला. आता आधीचे भाग वाचतो.

अनिंद्य's picture

5 Jul 2018 - 2:45 pm | अनिंद्य

भाग आवडला.
ह्या मालिकेच्या भागांची मी वाट पाहतो.
पुढील भाग लवकर टाका प्लिज.