राजयोग - ३

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
24 May 2018 - 12:37 pm

राजयोग - १

राजयोग - २

गोविंद माणिकय राजाची सभा सुरु आहे. भुवनेश्वरी देवीच्या मंदिराचे पुजारी राजाच्या दर्शनासाठी आले आहेत.

पुजारीजींचं नाव आहे रघुपती. देवीची पूजा झाल्यावर चौदा दिवसांनी मध्यरात्री चौदा देवतांची पूजा केली जाते. या पूजेच्या दिवशी आणि दोन रात्री कुणीही बाहेर पडत नाही, राजासुद्धा नाही. जर राजाला बाहेर जावं लागलं तर त्याला पुजारी सांगतील तो दंड द्यावा लागतो. ह्या पूजेच्या रात्री मंदिरात बळी द्यायची प्रथा आहे. हा बळी राजभवनातून दान म्हणून दिला जातो. याच कामासाठी आज पुजारी राजभवनात आले आहेत. पूजेसाठी अजून फक्त चौदा दिवस शिल्लक आहेत.

राजाने सांगितलं, "या वर्षी मंदिरात बळी दिला जाणार नाही."

हे ऐकून सर्व सभागण आश्चर्यचकित झाले. राजाचा बंधु नक्षत्ररायच्या डोक्यावरचे केसही उभे राहिले.

पुजारी रघुपति म्हणाले, "हे स्वप्न तर नाही?"

राजाने उत्तर दिलं, "नाही पुजारीजी, इतके दिवस आम्हीच स्वप्न पहात होतो. एका छोट्या मुलीच्या रूपात कालीमातेने मला स्वतः दर्शन दिले आहे. तिने सांगितलं आहे, साक्षात करुणेची मूर्ती असलेली माता, आपल्याच बालकांचं रक्त आता पाहू शकत नाही."

रघुपती - "इतक्या दिवसांपासून मग आई रक्तपान का करीत आली आहे?"

राजा - "नाही! आईने कधीच रक्तपान केले नाही. बळीच्या नावाखाली जेव्हा तुम्ही रक्तपात करीत होता तेव्हा आईने दुःखातिरेकाने आपला चेहरा झाकून घेतला होता."

रघुपती - "महाराज, तुम्ही राज्य व्यवहार खूप चांगला समजता परंतु पूजा, कर्मकांड याविषयी तुम्ही अज्ञानी आहात. यासर्व गोष्टींची काळजी करणं माझं काम आहे..जर देवी नाराज असती तर सर्वात आधी ते मलाच कळलं असतं."

नक्षत्रराय विद्वानाप्रमाणे आपली मान हलवत म्हणाले, "हो तर, हे बरोबर आहे, पुजारीजींना आधीच कळलं असतं."

राजा म्हणाला, "ज्या व्यक्तीच हृदय कठोर झालं आहे, ती देवीचे शब्द ऐकू नाही शकत."

नक्षत्ररायने पुजारीजींच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्यामते या गोष्टीचं उत्तर मिळणं आवश्यक होतं.

रागाने बेभान होऊन रघुपति म्हणाले, "तुम्ही पाखंडी नास्तिकांप्रमाणे बोलत आहात."

योग्य काय, अयोग्य काय या गोंधळात पडलेला नक्षत्रराय पुन्हा हळू आवाजात म्हणाला, "हं, नास्तिकाप्रमाणे तर बोलत आहेत."

राजा पुजारीजींच्या रागाने लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाले, "पुजारीजी तुम्ही राजसभेत बसून आपला वेळ व्यर्थ घालवीत आहात. मंदिरातील कार्यांना उशीर होत आहे. तुम्ही मंदिरात जा आणि जाता जाता मार्गामध्ये घोषणा करा आजपासून या गोविंद माणिकयच्या राज्यात जो देवापुढे बळी देईल त्याला या देशातून निर्वासित करण्याची शिक्षा होईल."

रागाने कापत असलेले पुजारीजी त्यांचं जानवं हातातल्या हातात फिरवत म्हणाले, "तुझा सत्यानाश होऊ दे!"

चहूबाजूंनी दरबारात आलेले लोक पुजारीजींच्या अंगावर धावून गेले. राजाने सर्वांना इशाऱ्यानीच दूर व्हायला सांगितले.

रघुपती पुढे बोलू लागला, "तू राजा आहेस, तुझी इच्छा झाली तर तू प्रजेचं सर्वस्व हरण करशील. म्हणून काय तू मातेकडून तिचा बळी पण हिरावून घेशील? हुं! तुझं स्वतःचं असं काय सामर्थ्य आहे? जोपर्यंत मी रघुपती मातेचा सेवक आहे तोपर्यंत जर तू पूजेत विघ्न आणशील तर मीसुद्धा बघून घेईन!"

सभेत बसलेले मंत्री राजाचा स्वभाव पूर्ण जाणून होते. त्यांना माहीत होतं की एकदा ठाम निश्चय केल्यानंतर राजाला लगेच त्यांच्या निश्चयापासून विचलीत करणं अशक्य आहे. ते हळू आवाजात भीत भीत राजाला म्हणाले, "महाराज, देवीसमोर बळी द्यायची ही प्रथा आपल्या पूर्वजांपासून चालत आली आहे. एकही दिवस यात खंड पडला नाही." इतकं बोलून मंत्री शांत झाले.

राजाही शांत बसला. मंत्री पुन्हा म्हणाले, "आज आपण पूर्वापार चालत आलेल्या आपल्या पूर्वजांच्या प्रथेत बाधा आणली तर स्वर्गात ते असंतुष्ट होतील."

मंत्रीगणांच्या बोलण्यावर महाराज विचार करू लागले. नक्षत्ररायही स्वतःला खूप माहिती असल्याप्रमाणे म्हणाला, "हो , हो असंतुष्ट तर होतील."

मंत्री पुन्हा म्हणाले, "महाराज असं करा, जिथे हजार बळी दिले जात तिथे शंभर बळींचीच आज्ञा द्या."

ही चर्चा ऐकत असलेले सर्व सभासद आश्चर्य चकित होऊन पहात राहिले. गोविंद माणिक्य आपल्या विचारांमध्ये मग्न झाले होते. क्रोधीत पुजारीजी घाईघाईने राजसभेतून जायला निघाले.

त्याचवेळी द्वारपालाची नजर चुकवून एक छोटा बालक अनवाणी पायांनी आत आला. राजसभेच्या मधोमध उभे राहून राजाकडे आपल्या मोठमोठ्या डोळ्यांनी पहात त्यानं विचारलं,

"ताई कुठेय?"

आधीच हैराण झालेल्या सभासदांकडे याचं काही उत्तर नव्हतं. त्या मोठ्या राजभवनाच्या भिंतीवर जणू काही त्या मुलाच्या कोवळ्या आवाजातील प्रश्नाने पुन्हा पुन्हा आघात केला, "ताई कुठेय?"

त्याचक्षणी सिंहासनावरून उतरून राजाने त्या मुलाला कडेवर घेतलं आणि दृढ आवाजात दरबाराला उद्देशून म्हणाले, "आजपासून आपल्या राज्यात बळी दिला जाणार नाही. आता या विषयावर पुन्हा चर्चा होणार नाही."

मंत्री म्हणाले, "जी आज्ञा!"

ताताने राजाला विचारलं, "माझी ताई कुठेय?"

राजाने उत्तर दिलं, "आईजवळ."

ताता काही क्षण तोंडात बोट घालून शांत बसला. राजाच्या उत्तराने त्याचं त्या क्षणापुरतं समाधान झालं. तेव्हापासून राजाने ताताला आपल्या जवळ ठेऊन घेतलं. केदारेश्वराना ही राजप्रासादामध्ये जागा दिली गेली.

राजा दरबारातून निघून जाताच सभासद आपआपसात बोलू लागले, "घोर अंधःकार! आम्हाला तर माहीत आहे बौद्ध धर्मिय रक्तपात करीत नाहीत. आता आपल्या हिंदू राष्ट्रांतही तोच नियम तर नाही होणार?"

नक्षत्रराय त्यांच्या हो ला हो करीत म्हणाला, "खरंय, आपल्या हिंदू राष्ट्रांतही तोच नियम नाही होणार?"

सर्वानी विचार केला हे नक्कीच अनर्थाचे लक्षण आहे. अजून काय असू शकतं? शेवटी या दोन धर्मामध्ये फरक तरी काय राहिला?

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

24 May 2018 - 1:21 pm | पद्मावति

सुंदर. पु.भा.प्र.

सस्नेह's picture

24 May 2018 - 1:21 pm | सस्नेह

वाचतेय...

प्रचेतस's picture

24 May 2018 - 1:25 pm | प्रचेतस

वाचत आहेच.
उत्तम अनुवाद करताय.

अनिंद्य's picture

24 May 2018 - 2:02 pm | अनिंद्य

@ रातराणी,

पहिल्या भागात अडखळलेली कथा आता प्रवाही झाली आहे. भाषांतर होत असतांना पार्श्वभूमी थोडक्यात सांगायला हवी होती, असे उगाच वाटले. अर्थात रवींद्रनाथांच्या साहित्याचे भाषांतर - भावानुवाद हे अवजड शिवधनुष्य आहे ह्याची जाणीव आहे. गैरसमज नसावा.

गुरुदेवांच्या कथनाचा गोडवा भाषाबदलात कमी होतो असे माझे मत. तुम्ही ते बदलायला लावताय हे हे तुमच्या लेखनाचे यश :-)

अनेक शुभेच्छांसह,

अनिंद्य

रातराणी's picture

25 May 2018 - 2:50 am | रातराणी

भाषांतर होत असतांना पार्श्वभूमी थोडक्यात सांगायला हवी होती, असे उगाच वाटले.

आपल्या मताशी सहमत आहे, प्रस्तावनेमध्ये काही बदल करता येतो का पहाते.

गुरुदेवांच्या कथनाचा गोडवा भाषाबदलात कमी होतो असे माझे मत.

अगदी अगदी! हे वेडं धाडस केलंय याची पूर्ण कल्पना आहे. आपल्यासारख्या वाचकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच अजून उत्साह टिकून आहे.

आपले आणि सर्व वाचकांचे खूप खूप धन्यवाद :)

वाचतो आहे. सुरेख. पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

manguu@mail.com's picture

24 May 2018 - 2:43 pm | manguu@mail.com

छान

सिरुसेरि's picture

24 May 2018 - 5:19 pm | सिरुसेरि

तातुच्या दु:खात वाचक गुंतत जातो , हेच मुळ कथेचे व तुमच्या अनुवादाचे यश आहे .

रातराणी's picture

25 May 2018 - 2:51 am | रातराणी

सर्वांना अनेक धन्यवाद :)

शिव कन्या's picture

25 May 2018 - 9:51 am | शिव कन्या

बऱ्याच दिवसांनी तू लिहिती झालीस, छान वाटले.

सगळे भाग वाचले.... जमून येतंय.

यांचेक 'विसर्जन' नावाचे इंग्लिश नाटकही आहे. नाट्यरुपांतर केले आहे. बहुतेक गुरुदेवांनीच केले आहे. आता आठवत नाही.

शिव कन्या's picture

25 May 2018 - 9:52 am | शिव कन्या

*याचेच असे वाचावे.

रातराणी's picture

25 May 2018 - 10:22 am | रातराणी

धन्यवाद ताई :)
अनुवाद करताना तुझी आठवण येतेच, कारण मिपावर आधी तुझे अनुवाद वाचूनच, आपणही प्रयत्न करून पहायला हवा अस वाटलं होतं.

अनिंद्य's picture

25 May 2018 - 2:35 pm | अनिंद्य

'विसर्जन' नावाचे इंग्लिश नाटकही आहे....

बरोबर !
नाट्यरूपांतर गुरुदेवांनीच केले आहे.
इंग्रजी आणि बंगालीत बऱ्याच कलाकारांनी हे नाटक सादर केले आहे. निसर्ग त्रिवेदीच्या ग्रुपने इंग्रजीत आणि देबेश चक्रवर्तीच्या संचाने बंगालीत (बहुदा NCPAत) केलेले मंचन आठवते.