राजयोग - २

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
23 May 2018 - 11:44 am

राजयोग - १

त्या दिवसानंतर झोप पूर्ण झाल्यावर किंवा पूर्वदिशेला सुर्यदेवतेचे आगमन झाल्यावरही राजाची सकाळ होत नसे. फक्त त्या दोन भावाबहिणीचे लोभस चेहरे पाहूनच त्यांची सकाळ होत असे. रोज त्या दोघांना फुलं आणून दिल्यांनतरच ते स्नान करीत. हे दोघे भाऊ बहीण घाटावर बसून त्यांना अंघोळ करताना पहात असत. ज्या दिवशी सकाळी ते दोघे येत नसत त्यादिवशी जणूकाही राजांचा पूजापाठ पूर्ण होत नसे.

हासि आणि ताताचे आईवडील नाहीत. फक्त एक काका आहेत. काकांचं नाव आहे केदारेश्वर. या लहान मुलांना त्यांचाच आधार आहे.

बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं. ताता आता 'मंदिर' म्हणतो पण कढईला अजूनही 'तलई'च म्हणतो. याहून जास्त तो बोलू शकत नाही.

गोमती नदीच्या किनाऱ्यावर नागकेशराच्या झाडाखाली बसून हासि ताताला अनेक गोष्टी सांगे. आपले आधीच मोठे असलेले डोळे अजून मोठे मोठे करून तो त्या गोष्टी ऐकत असे. तुम्हीआम्ही त्या ऐकल्या तर त्याचा अर्थही लावू शकणार नाही, पण ताताला त्या कळत होत्या इतकंच तिच्यासाठी पुरे होतं. स्वच्छ मोकळ्या हवेत झाडाखाली बसून गोष्टी ऐकताना त्या कोवळ्या हृदयात कोणते विचार येत असतील, किती चित्रं साकार होत असतील याची आपण कल्पना तरी करू शकतो का?

इतर कुणी मुलांबरोबर ताता खेळत नसे. तो फक्त आपल्या बहिणीबरोबर तिची सावली होऊन फिरत असे.

आषाढ महिना होता. सकाळचं आकाश गडद काळ्या ढगांनी भरलं होतं. अजून पावसाला सुरुवात झाली नव्हती, परंतु कोणत्याही क्षणी आकाश फाटेल आणि पाऊस कोसळेल असं वाटत होतं. दूर कुठेतरी पावसाचे थेंब पडत होते. हवेत सुखद गारवा होता. गोमती नदीच्या विशाल पात्रावर आणि तिच्या दोन्ही काठाना असलेल्या जंगलावर अंधारून आलेल्या आकाशाची काळी सावली पडली होती. काल रात्री अमावस्या होती. काल रात्रीच भुवनेश्वरी देवीची महापूजा संपन्न झाली होती.

योग्य वेळी हासि ताताचा हात पकडून स्नान करायला आली. रक्ताची एक धार संगमरवरी घाटाच्या शुभ्र पायरीवरून ओघळून नदीच्या पाण्यात मिसळली होती. काल रात्री ज्या एकशे एक रेड्यांचा बळी दिला होता, ते त्यांचंच रक्त होतं.

त्या रक्ताचा ओघळ पाहून घाबरलेल्या हासिने राजाच्या कानाजवळ जाऊन कुजबुजत विचारलं,

"हा कसला डाग आहे बाबा?"

राजाने उत्तर दिलं, "देवी! हा रक्ताचा डाग आहे."

हासि म्हणाली, "एवढं रक्त? का?"

त्या छोट्याशा मुलीच्या कातर स्वरांनी राजाच्या मनातही तो प्रश्न तसाच प्रतिध्वनीसारखा बराच वेळ घुमत राहिला.

"एवढं रक्त? का?" राजाच्या अंगावर काटा आला.

राजा तर दरवर्षी ही रक्ताची धार पहात आला होता, पण हासिचा निरागस प्रश्न ऐकून त्यांच्या मनात विचार आला, "खरंच का एवढा रक्तपात?". राजाला उत्तर द्यायचे सुचले नाही. अस्वस्थ होऊन स्नान करीत असताना राजा याच प्रश्नाचा विचार करू लागला.

हासि नदीच्या पाण्यात आपला पदर भिजवून पायरीवर बसल्या बसल्या तो रक्ताचा डाग मिटवायचा प्रयत्न करू लागली. तिचं पाहून ताताही आपल्या छोट्या हातांनी तेच करू लागला. हासिचा पदर रक्ताने माखून लाल झाला. राजाचं स्नान संपेपर्यंत दोघा भावा बहिणींनी मिळून रक्ताचा डाग पुसला.

त्याचदिवशी घरी गेल्यावर हासिला ताप आला. ताता जवळ बसून त्याच्या छोट्या छोट्या बोटांनी बहिणीचे बंद डोळे उघडायचा प्रयत्न करे. मधूनच तिला हाक मारी, "ताई!" त्याची हाक ऐकून हासि दचकून जागी होई. "काय रे ताता?" एवढं बोलून ती ताताला जवळ ओढत असे, पण तेवढ्या कष्टांनीही तिला ग्लानी येत असे. ताता काही वेळ ताईच्या चेहऱ्याकडे पहात राही. काही बोलत नसे. थोडा वेळ गेला की पुन्हा ताईच्या मानेला धरून, तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा नेऊन अगदी हळू आवाजात म्हणत असे, "ताई तू उठणार नाही?" त्याच्या शब्दांनी कळवळून जागं होऊन त्याला आपल्या छातीशी घट्ट धरून हासि म्हणे, "का नाही उठणार रे बाळा!"

ताताच्या संपूर्ण दिवसातल्या खेळण्याची, बागडण्याची आशाही ताईबरोबरच मलूल झाली. ताई काही उठत नाही, हसत नाही हे पाहून त्याच्या चेहऱ्यावरचं तेज कुठल्याकुठे पळालं. त्या छोट्याशा जीवाला सगळीकडे अंधारच दिसू लागला. आकाशही जणूकाही त्याच अंधाराने भरून आलं होतं. घराच्या कौलांवर एका पाठोपाठ एक पावसाच्या थेंबाचे शब्द ऐकू येत होते. अंगणातलं चिंचेचं झाड पावसाने संपूर्ण भिजून गेलं होतं. रस्त्यावर कुणी वाटसरूही नव्हते. केदारेश्वर आपल्याबरोबर एक वैद्य घेऊन आले. नाडीपरीक्षा आणि हासिची अवस्था पाहून त्यांना तरी ते लक्षण बरे वाटले नाही.

दुसऱ्या दिवशी स्नान करण्यासाठी आलेल्या राजाने पाहिलं, आज दोघे भाऊ बहीण त्यांची वाट पहात नाहीत. राजाने मनात विचार केला कदाचित या मुसळधार पावसामुळे ते येऊ शकले नसतील. स्नान, पूजा इत्यादी आवरून पालखीत बसल्यावर राजांनी सेवकांना केदारेश्वरांच्या घरी जायची आज्ञा केली. सर्वांना या गोष्टीच आश्चर्य वाटलं पण राजापुढे कुणी काही बोलू शकलं नाही.

केदारेश्वराच्या घरी जेव्हा राजाची पालखी पोचली तेव्हा घरात मोठी गडबड सुरु झाली. त्या गडबडीमध्ये लोक हासिचे आजारपण विसरून गेले. फक्त ताता उठला नाही. तो अचेतन ताईच्या कुशीजवळ बसला होता, ताईच्या पदराचं एक टोक आपल्या तोंडात भरून तिच्याकडे पहात होता.

राजाला घरात येताना पाहून ताताने विचारलं, "ताईला काय झालं?"

अस्वस्थ राजाने काही उत्तर दिलं नाही. आपली मान वरखाली हलवत हलवत ताताने पुन्हा विचारलं, "ताईला लागलंय का?"

ताताचे काका केदारेश्वरानी काहीशा अस्वस्थपणे उत्तर दिले, "हो, रे बाळा."

लगेच ताता आपल्या ताईजवळ गेला. तिचं डोकं आपल्या छातीशी कवटाळून त्यानं विचारलं, "ताई तुला कुठे लागलंय ग?"

त्याला वाटलं ताईला लागलं असेल तिथे तो फुंकर मारेल, तिच्या जखमेवरुन हात फिरवेल आणि मग ताईला बरं वाटेल. पण तरीही ताई उत्तर देत नाही, हे काही त्याला सहन झालं नाही. त्याचे छोटे गाल, ओठ फुगवून तो रुसून बसला. आपल्या अभिमानाला ठेच लागली असे वाटून रडू लागला. कालपासून तो बसला आहे पण तरीही ताई का बोलत नाही? का हसत नाही? ताताने असं काय केलं की ती त्याच्यावर एवढी नाराज झाली?

राजाच्या समोर ताताचे असे वागणे पाहून केदारेश्वर एकदम घाबरले. ताताचा हात पकडून ते त्याला ओढत दुसऱ्या खोलीत घेऊन गेले.

राजवैद्यानी येऊनही फारशी आशादायक बातमी दिली नाही. संध्याकाळी जेव्हा राजा पुन्हा हासिला भेटायला आले तेव्हा ती तापाच्या ग्लानीमध्ये बडबडत होती, "एवढं रक्त का आई?"

राजा म्हणाले, "देवी, मी थांबवेन हा रक्तपात."

हासि - "ताता ये रे, आपण दोघे हे रक्त पुसूया."

राजा - "चल देवी, मी पण येतो."

काही वेळाने हासिने डोळे उघडले. चारीबाजूला नजर फिरवून जणू काही ती कुणाला तरी शोधत होती. ताता त्यावेळी रडता रडता दुसऱ्या खोलीत झोपून गेला होता. तिला ज्याला पहायचं होतं ती व्यक्ती न दिसल्यामुळे हासिने डोळे बंद केले ते पुन्हा कधीच उघडले नाही. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी राजाच्या मांडीवर हासि कायमची झोपून गेली.

जेव्हा लोक हासिचे शरीर त्या घरातून कायमचे बाहेर घेऊन गेले तेव्हा या सर्व गोष्टींनी अनभिज्ञ ताता शांतपणे झोपला होता. त्याला जर कळलं असतं, तर तोसुद्धा त्याच्या ताईबरोबर सावलीसारखा निघून गेला असता.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

कथेला एकदम वेगळंच वळण मिळालंय.

पुभाप्र

पद्मावति's picture

23 May 2018 - 1:49 pm | पद्मावति

<<<कथेला एकदम वेगळंच वळण मिळालंय.>>> +१
वाचतेय.

सिरुसेरि's picture

23 May 2018 - 3:17 pm | सिरुसेरि

अरेरे .. हा भाग वाचुन डोके सुन्न झाले .

शाली's picture

23 May 2018 - 3:23 pm | शाली

ईतक्यातच कथेला वळण?
छान लिहिताय. अनुवाद वाचतोय असं वाटत नाही.

आनन्दा's picture

23 May 2018 - 7:39 pm | आनन्दा

हा अनुवाद आहे?

manguu@mail.com's picture

23 May 2018 - 3:27 pm | manguu@mail.com

छान