राजयोग - ८

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
4 Jun 2018 - 10:54 am

नक्षत्रराय राजाबरोबर घरी परतत होता. आकाशात अजून कुठे कुठे प्रकाश दिसत होता. खालच्या जंगलात मात्र अंधार हळूहळू आपले हातपाय पसरत होता. उंच झाडांच्या फक्त माथ्यावरच उजेड दिसत होता. हळू हळू तेही अंधारात बुडून गेले की सगळं जंगल जणू अंधाराचं पांघरून घेऊन शांत झोपून जाईल.

राजा महालाच्या दिशेने न जाता मंदिराच्या दिशेने चालू लागले. संध्याकाळची पूजा-आरती आटोपून, दिवा लावून रघुपती आणि जयसिंह दोघे झोपडीत बसले होते. दोघेही आपआपल्या काळजीत मग्न होते. मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात दोघांच्याही चेहऱ्यावरचा अंधार फक्त दिसत होता. तिथे पोचल्यावर नक्षत्ररायचा रघुपतीकडे पाहण्याचा धीर झाला नाही. खाली मान घालून तो एकटक जमिनीकडे पहात राहिला. महाराजांनी स्थिर दृष्टीने रघुपतीकडे पाहिले. असेच काही क्षण गेल्यावर राजांनी रघुपतीला नमस्कार केला. नक्षत्ररायनेही त्यांचे अनुकरण केले. त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकीत रघुपती म्हणाला, "जयोस्तु - राज्यात सर्वकाही कुशल?"

थोडंस थांबून महाराज म्हणाले, "ठाकूर, आशिर्वाद द्या. राज्यात काही अमंगल न घडो. देवीची सर्व बालके गुण्यागोविंदाने नांदू देत. या राज्यात कुणी भावाला भावापासून हिरावून घेऊ नये. जिथं प्रेम आहे तिथे हिंसेची पूजा होऊ नये. राज्यात काही अमंगल होईल या भितीने आपल्याजवळ आलो आहे. पापाच्या संकल्पाने भडकलेला अग्नी क्षणात सगळं काही भस्म करून टाकेल. या अग्नीला थांबवा. शांततेच्या, सहृदयतेच्या पावसाने या अग्नीला शांत करा."

रघुपती म्हणाला, "देवीच्या क्रोधाने भडकलेला अग्नी कोण शांत करू शकेल? एका अपराध्यामुळे हजारो निरपराध भस्मसात होणार."

राजा म्हणाले, "त्याचीच तर भीती वाटतेय. किती समजावून सांगूनही कुणीच का समजून घ्यायला तयार नाही. तुम्हाला माहीत नाहीये का, या राज्यात देवीच्याच नावाने, तिनेच निर्माण केलेल्या सृष्टीचा विनाश केला जातोय? माझ्या या सुखी समाधानी, धनधान्याने परिपूर्ण राज्यात पापाचं रोपटं लावू नका. देवीचा रोष ओढवून घेऊ नका. हे सांगण्यासाठीच मी आज इथे आलोय."

महाराजांनी आपली मर्मभेदी नजर रघुपतीच्या चेहऱ्यावर रोखली. त्यांचा गंभीर, दृढ आवाज बराच वेळ एखाद्या वादळाप्रमाणे झोपडीत घुमत राहिला. काही उत्तर न देता रघुपती केवळ जानवं हातात धरून फिरवत राहिला. महाराज नमस्कार करून नक्षत्ररायचा हात धरून त्याला बाहेर घेऊन आले, त्यांच्या मागे जयसिंहही आला. मागे झोपडीत राहिला फक्त एक दिवा, रघुपती आणि त्याची मोठी होत चाललेली सावली.

रात्र होऊन गेली होती, तारे ढगांच्या मागे लपले होते. आकाशाच्या कानाकोपऱ्यात अंधारच अंधार होता. वाऱ्याबरोबर कदंबाच्या फुलांचा सुगंध येत होता. सगळं जंगल जणू शांत झोपलं होतं, रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज फक्त शिल्लक होता. जंगलातल्या निर्जन रस्त्याने विचारात मग्न असलेले महाराज चालले होते. अचानक मागून आवाज आला,

"महाराज!"

महाराजांनी मागे वळून पाहिलं, त्यांनी विचारलं,

"कोण आहे?"

तो ओळखीचा आवाज म्हणाला,

"मी आपला पापी सेवक, जयसिंह! महाराज तुम्हीच माझे गुरू, माझे स्वामी आहात. माझं दुसरं कुणीच नाही. या अंधारातून जसं तुम्ही तुमच्या छोट्या भावाचा हात पकडून त्याला नेत आहात, तसंच माझाही हात धरा. दिवसेंदिवस माझ्याभोवतीचा अंधार वाढतंच चाललाय, त्यातून मला बाहेर काढा. माझं बरं वाईट काहीच मला कळत नाहीये. योग्य काय, अयोग्य काय ते समजावून सांगणार मला कुणी नाही. मी एकदा उजवीकडे जातो, एकदा डावीकडे, माझ्या जीवनाला, विचारांना एक दिशा नाही."

अंधारात जयसिंहाच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसलं नाही. फक्त त्याच्या भरून आलेल्या आवाजातली थरथर महाराज ऐकत राहिले. इतका वेळ शांत,स्तब्ध असलेल्या अंधारात समुद्रासारखी लाट आली. जयसिंहाचा हात पकडून महाराज म्हणाले, "चल माझ्याबरोबर."

***

दुसऱ्या दिवशी जयसिंह मंदिरात परत आला. पूजेची वेळ होऊन गेली होती. रघुपती उदास चेहऱ्याने बसला होता. आजवर कधीच पूजेचा नियम चुकला नव्हता.

जयसिंह त्यांच्याकडे न जाता, बागेत गेला. त्याने लावलेल्या फुलझाडांच्या मध्ये जाऊन बसला. वाऱ्याच्या झोतानी ती झाडे हलतडुलत होती. त्यांची सावली जयसिंहाच्या अंगाखांद्यावर नाचत होती. चारी बाजूला फुलांचा बहर होता. थंडगार सावलीत जयसिंहाचं मनही शांत होत होतं. त्याच्या मनाला विश्रांती देण्यासाठी निसर्गानं जणू त्याला प्रेमानं मिठी मारली होती. जयसिंहाला वाटलं निसर्गात केवढा संयम आहे. तो कधी स्वतःहून काही मागत नाही, काही प्रश्न विचारत नाही, कुणाच्या भावनांना दुखावत नाही, कुणी काही बोललं तरच बोलतो. त्या निरव शांत वातावरणात जयसिंह महाराजांनी त्याला जे समजावून सांगितलं होतं त्याचा विचार करू लागला.

त्याचवेळेस रघुपतीने मागून हळू येऊन त्याच्या पाठीवर हात ठेवला. जयसिंह चकित झाला. रघुपती त्याच्या शेजारी बसला. जयसिंहाकडे पहात अगदी हळव्या स्वरात म्हणाला, "तू असा का वागतो आहेस? काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची? मी तुझं असं काय वाईट केलंय म्हणून तू माझ्यापासून दूर दूर चालला आहेस?"

जयसिंहने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला अडवत रघुपती पुढे बोलू लागला,

"माझ्या प्रेमात काही कमी राहिली का? काय अपराध केला मी तुझा? माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी तुझ्याकडे क्षमेची भीक मागतो. या तुझ्या गुरूला, तुझ्या वडीलांसमान असलेल्या रघुपतीला माफ कर, मला माफ कर.."

वीज पडल्याप्रमाणे जयसिंह घाबरला.. रघुपतीचे पाय पकडत म्हणाला, "नाही नाही असं बोलू नका गुरुदेव, मी भरकटलोय.. मला चूकबरोबर काही कळत नाही.."

त्याचा हात पकडून रघुपती म्हणाला, "बाळ, मी तुला लहानपणापासून आईसारखं प्रेम दिलंय, वडिल करतील त्याहुन काकणभर जास्तच काळजीनं तुला सर्व शास्त्रांमध्ये पारंगत केलं आहे, एखाद्या मित्रावर विश्वास ठेवावा त्या विश्वासानं तुला वेळोवेळी माझी एकूनएक योजना सांगितली आहे. मग आता तुला माझ्यापासून कोण दूर करतंय? इतक्या दिवसांच्या आपल्या मायेच्या बंधनाला कोण तोडतंय? मला नियतीनं तुझ्यावर दिलेल्या अधिकारात आता कोण वाटेकरी येऊ पाहतोय? सांग बाळा, त्या पापी मनुष्याचं नाव तरी मला कळू दे.."

जयसिंह म्हणाला, "गुरुदेव, तुमच्यापासून मला कुणीही दूर करत नाहीये..तुम्हीच मला आपल्यापासून दूर केलंय..मी तर खूप समाधानी होतो आपल्या घरात, तुम्हीच मला रस्त्यावर आणलं.. तुम्ही म्हणालात, कोण माता, कोण पिता, कोण कुणाचं आहे? तुम्ही म्हणालात, या संसारात प्रेमाचं, मायेचं बंधन नाही, कुणाचा कुणावर काही अधिकार नाही..जिला मी माझी आई समजत होतो तिला तुम्ही एका क्षणात राक्षसी करून टाकलं..जिथं जिथं हिंसा आहे, भावाभावात वाद आहेत, मनुष्य एकमेकांशी युद्ध करण्यात मग्न आहेत तिथं तिथं शक्ती केवळ आपली रक्ताची तहान भागवायला उभी आहे..एका आईच्या कुशीतून तिच्या मुलाला ओढून घेऊन तुम्ही या कुठल्या राक्षसीच्या देशात पाठवलं?"

रघुपती काही बोलू शकला नाही. बराच वेळ गेला..शेवटी एक खोल श्वास घेऊन तो म्हणाला,

"मग तू स्वतंत्र झालास असं समज, बंधनातून मुक्त झालास, माझा काही अधिकार नाही आता तुझ्यावर..जर यातच तुझं सुख आहे तर तसंच होऊ देत.."

एवढं बोलून रघुपती तिथून जायला उठू लागला.

जयसिंह रघुपतीचे पाय धरून म्हणाला.."गुरुदेव असं नका म्हणू.. तुम्ही एकवेळ मला सोडू शकाल.. पण मी आपल्याला नाही सोडू शकत.. माझी जागा इथेच आहे या चरणांजवळ.. तुम्ही माझ्यासाठी जो मार्ग निवडाल तोच माझा मार्ग.."

रघुपतीने जयसिंहला उभे करून मिठी मारली.. अनावर झालेले अश्रू रघुपती थांबवू शकला नाही.. बराच वेळ जयसिंहाच्या खांद्यावर डोकं ठेवून तो काही न बोलता अश्रू ढाळत राहिला.

***

मंदिरात अनेक लोक आले होते. भरपूर गोंधळ सुरू होता. रघुपतीने रुक्ष आवाजात त्यांना विचारलं,

"कशासाठी आलाय तुम्ही सगळे इथं?"

गर्दीतून एकाच वेळेस अनेक आवाज आले,

"आम्ही देवीच्या दर्शनाला आलोय"

रघुपती म्हणाला, "कुठे आहे देवी? देवी या राज्यातून निघून गेली.. तुम्ही लोक कुठे सांभाळू शकलात तिला..निघून गेली ती.."

आधीच्या गोंधळात अजूनच भर पडली. लोक अनेक प्रश्न विचारू लागले,

"काय सांगताय पुजारीजी?"

"आमचा असा काय अपराध झाला?"

"काही करून देवीला प्रसन्न नाही करता येणार?"

"माझा भाचा आजारी होता, म्हणून मी काही दिवस आलो नव्हतो पूजेला.."

"वाटलं होतं माझे दोन बकरे देवीला अर्पण करेन, पण खूप दूर रहातो मी, म्हणून आलो नाही.."

"गोवर्धनने आईला बोललेला नवस फेडला नाही, पण त्याची शिक्षा मिळाली की त्याला.. सहा महिने झाले अंथरुणाला खिळून आहे.."

गर्दीत एक उंच धष्टपुष्ट माणूस होता, त्यानं सगळ्यांना दम देऊन शांत केलं. हात जोडून रघुपतीला म्हणाला,

"पुजारीजी आमच्याकडून काय अपराध झाला? देवी का सोडून गेली आम्हाला?"

रघुपती म्हणाला, " एक थेंब रक्तसुद्धा वाहू शकत नाही तुम्ही देवीला..वाह रे तुमची भक्ती!"

सगळे लोक शांत झाले. काही वेळाने हळू आवाजात लोक बोलू लागले..

"राजानेच बंदी आणलीय, आम्ही तरी काय करू?"

हे सारं दृश्य पहात जयसिंह एका जागी दगडासारखा थिजला होता.. "आईनेच बंदी आणलीय.." एका क्षणी त्याला ओरडून सांगावंसं वाटलं, पण तो काही बोलू शकला नाही.

रघुपती मोठ्या आवाजात गरजला, "राजा कोण आहे? आईची जागा राजापेक्षा खाली आहे का? मग तुम्ही रहा तुमच्या राजाला डोक्यावर घेऊन या अनाथ देशात! बघू तुमची कोण रक्षा करू शकतं ते!"

गर्दीत कुजबुज सुरू झाली..

रघुपती सर्वांना दिसेल अशा ठिकाणी उभा राहून म्हणाला,

"राजाला मोठं तुम्ही केलंत! त्याच्याकडूनच आपल्या आईचा अपमान केलात.. तिला तिच्या घरातून जायला भाग पाडलं.. काय वाटलं, सुखी व्हाल तुम्ही? अजून तीन वर्षांनी या देशात तुम्हाला घरं बांधायला जमीनच राहणार नाही.. तुमच्यामागे दिवा लावायलासुद्धा कुणी वाचणार नाही.. तुमच्या सर्व कुळाचा विनाश अटळ आहे.."

लोकांमध्ये कुजबुज वाढतच चालली.. गर्दी हळूहळू वाढू लागली.. त्याच उंच माणसाने पुन्हा हात जोडून विचारले,

"मुलांचा काही अपराध झाला, तर आईने काही शिक्षा करावी. पण आई अशी मुलांना टाकून सोडूनच गेली तर मुलांनी काय करावं? सांगा पुजारीजी, काय केल्याने आई परत येईल.."

रघुपती निर्वाणीच्या स्वरात म्हणाला,

"जेव्हा तुमचा हा राजा या देशातून निघून जाईल.. तेव्हा आई पुन्हा इथे येईल."

हे ऐकताच कुजबुज थांबली. सगळीकडे भयाण शांतता पसरली. शेवटी लोक एकमेकांच्या तोंडाकडे पाहून आश्चर्य करू लागले. एक शब्दही बोलायची कुणाची हिंमत झाली नाही.

रघुपती गडगडाट करीत म्हणाला,

"तुम्हाला पाहायचंच आहे तर! या, या जरा माझ्याबरोबर.. खूप लांबून आलाय ना तुम्ही सगळे दर्शनाला, चला मग मंदिरात.."

सगळे घाबरत घाबरत दाटीवाटीने गाभार्यासमोर येऊन उभे राहिले. गाभार्याच दार बंद होत. रघुपतीने ते हळू हळू उघडलं.

काही क्षण कुणाच्याही तोंडून काही शब्द निघाला नाही. सगळे अवाक होऊन पहात होते. गाभाऱ्यात मूर्ती लोकांकडे पाठ करून उभी होती. तिचा चेहरा काही केल्या दिसत नव्हता. रडवेल्या आवाजात काही लोक म्हणू लागले, "आमच्याकडे तोंड करून उभी रहा आई, अशी नाराज होऊ नको.." माना उंचावून उंचावून लोक एकमेकांना "आई कुठेय? आई कुठेय?" विचारू लागले. दगडाचीच मूर्ती ती, ती कशी वळून पाहणार? या गोंधळाला बावरून लहान मुले रडू लागली. कुणी बेशुद्ध पडत होतं तर कुणी वयस्क "आई आई' म्हणून लहान मुलांप्रमाणे रडत होतं. कधी नव्हे ते स्त्रियांचे पदर डोक्यावरून खाली पडले होते, उर बडवत त्या एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या. तरुण मोठमोठ्याने "आई आम्ही तुला जाऊ नाही देणार, तुला परत आणणारच" ओरडत होते.

सगळं राज्यच जणू तिथं एकत्र येऊन "आई, आई" असा घोष करू लागलं होतं. दुपार होऊन गेली होती. आकाशात सूर्य तळपत होता. तहानभूक हरपलेल्या लोकांचा आक्रोश काही केल्या थांबत नव्हता.

जयसिंहाला हा आक्रोश सहन होत नव्हता. लटपटत्या पायांनी रघुपतीजवळ येऊन तो म्हणाला,

"गुरुदेव, मी काहीच बोलू शकत नाही?"

"नाही, काही बोलायचं नाही.." रघुपती म्हणाला.

"काहीतरी चुकतंय असं नाही वाटत तुम्हाला?"

"नाही" रघुपतीने ठामपणे उत्तर दिले.

मुठी आवळून जयसिंह म्हणाला, "या सगळ्यावर मी असाच विश्वास ठेवू?"

रागाने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकीत रघुपती म्हणाला, "हो!"

"नाही सहन होत मला हे सगळं.."

मनावरचा ताण असह्य झालेला जयसिंह छातीवर हात ठेवून लोकांच्या मधून वाट काढत पळतच बाहेर गेला.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

4 Jun 2018 - 11:20 am | अनिंद्य

चित्रदर्शी !

पु भा प्र

हा संघर्ष कुठल्या थराला जाईल याची भयचकित उत्सुकता लागली आहे. पुभाप्र.

सुरेख जमला आहे ह्याही भागाचा अनुवाद.

प्रचेतस's picture

4 Jun 2018 - 6:31 pm | प्रचेतस

अशोकाने बंद केलेली प्राणीहत्या आणि त्यामुळे लोकांत निर्माण झालेला रोष असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले.