राजयोग - ६

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
30 May 2018 - 3:56 am

गोमती नदीच्या दक्षिण दिशेचा किनारा एका ठिकाणी बराच उंच आहे. पावसाच्या पाण्याने आणि नदीच्या छोट्या छोट्या प्रवाहानी तिथे अनेक गुहा, भुयारं तयार झाली आहेत. आठळ्या इतस्ततः पसरलेल्या लहान मोठ्या खडकांमधून पाण्याचे वेडेवाकडे प्रवाह वाट काढत मुख्य नदीत जाऊन मिसळत होते. तिथे आजूबाजूला अजिबात झाडे वाढली नव्हती. टेकडीवरच्या खडकांमध्ये एखाद दुसरं चुकार रोपटं उगवलं होतं. पण इथून थोडंस दूर अंतरावरून सागवान आणि निलगिरीच्या मोठमोठ्या वृक्षांनी या किनाऱ्याला अर्धचंद्र आकारात वेढलं आहे. मंदिराच्या आसपास उंच उंच वाढलेल्या झाडांमुळे विस्तीर्ण आकाश दिसू शकत नसे. इथे मात्र नजर जाईल तिथे मोकळं आकाश दिसायचं. गोमती नदीचा दूरवर गेलेला नागमोडी प्रवाह आणि दुसऱ्या किनाऱ्यावरची शेतं इथून अगदी नीट पहाता यायची.

रोज सकाळी इथे फिरायला येण्याचा महाराज गोविंद माणिक्यांचा नियम आहे. कुणालाही बरोबर न घेता. ना कुणी मंत्री, ना सेवक. सकाळचा हा वेळ फक्त त्यांचा असे. दूर किनाऱ्यावर मासे पकडायला आलेले कोळी, इथल्या एखाद्या खडकावर ऋषीमुनींप्रमाणे डोळे मिटून शांत बसलेल्या आपल्या महाराजांना पहात. त्यांचा ध्यानस्थ चेहरा सकाळच्या सूर्यकिरणांनी उजळलेला दिसतो की त्यांच्या आत्म्याच्या तेजाने हे सांगणे फार कठीण होतं. पावसाळ्याच्या दिवसांत ते रोज इथे येणं शक्य नसतं, पण हल्ली पाऊस नसेल त्यादिवशी ते छोट्या तातालाही सोबत घेऊन येतात.

आता ताताला 'ताता' म्हणायची इच्छा होत नाही. एकच व्यक्ती होती, जिच्या तोंडी ही हाक गोड वाटायची. ती व्यक्तीच आता नाही. वाचकांना तर ताता या शब्दाचा अर्थही माहीत असणार नाही. लपाछपी खेळत असताना खट्याळपणे उंच उंच झाडामागे लपत हासि जेव्हा तिच्या गोड आवाजात 'ताता' अशी हाक मारे तेव्हाच त्या नावाला अर्थ प्राप्त होत होता. तिने मारलेली गोड हाक ऐकून कोकिळा गायला सुरू करत असे. त्या निर्जन वनात ताता हा शब्द सगळीकडे घुमत असे तेव्हाच त्याला काही अर्थ होता.

आता ती मुलगी या जगात नाही. तो छोटा मुलगा आहे, पण 'ताता' नाही. सगळं जग त्याला एक छोटा मुलगा म्हणूनच ओळखतं पण 'ताता' तर फक्त त्या मुलीसाठीच होता. महाराज या छोट्या मुलाला धृव म्हणत, तेव्हा आपणही त्याला इथून पुढे धृवच म्हणूयात.

महाराज आधी एकटेच नदीकिनारी येत, काही दिवसांपासून ते धृवला त्यांच्याबरोबर आणतात. त्याच्या निष्पाप चेहऱ्यात जणू त्यांना ईश्वराचेच प्रतिबिंब दिसत असे. दुपारनंतर महाराज मंत्रीमंडळासोबत राज्याच्या कामांमध्ये गढून गेलेले असत. जनतेच्या समस्यांवर सगळे मिळून विचारविमर्श करीत. सकाळ होताच तो निरागस मुलगा त्यांना त्या जगातून खूप दूरवर घेऊन जात असे. त्याच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांमध्ये पाहिल्यावर काही काळाकरिता का होईना पण महाराज सगळ्या समस्या विसरून जात. त्या मुलाचा हात धरून त्रिपुराची ती छोटी राजसभा सोडून महाराज विश्वाच्या राजपथावर प्रवेश करत. तिथून अनंत निळ्या आकाशाखाली पसरलेली ब्रम्हांडाची महासभा दिसे. पृथ्वीलोक, अंतरिक्ष, स्वर्ग अशा विविध लोकांमधून येणारे संगीत तिथे ऐकायला मिळे. त्या जगात सगळंच साधं, सोपं होतं. क्रोध, चिंता, अस्वास्थ्य, अशांती यापैकी कुणीच तिथे येऊ शकत नव्हत. त्या कोवळ्या मुलाच्या मनातलं प्रेम अनुभव करताना महाराजांसाठी सगळं जगच प्रेममय होत असे.

या सकाळच्या वेळी त्यांना धृवबरोबर करायला आवडणारे काम म्हणजे त्याला गोष्ट सांगणे. त्यातही बाळ धृवाची गोष्ट त्या दोघांची सर्वात आवडती. धृवला ती गोष्ट संपूर्ण समजायचीच असं नाही पण तरीही राजाला वाटे की धृवने त्याचे बोबडे बोल ऐकवत तीच कथा त्यांना पुन्हा सांगावी. आजही महाराज असेच गोष्ट सांगण्यात रमले होते, धृवही मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.

गोष्ट ऐकता ऐकता धृव म्हणाला, "मी जंगलात जाणाल.."

राजा म्हणाले, "काय करणार जंगलात जाऊन?"

धृव - "देबाप्पा बघायला जाणाल."

राजा - "आपण आता जंगलातच तर आलोय, देवबाप्पाला भेटायला."

धृव - "कुठेय देबाप्पा?"

राजा - "इथेच"

धृव - "ताई कुठेय?"

असं म्हणून तो उभा राहिला आणि मागे वळून पाहू लागला. त्याला वाटलं पूर्वीसारखंच ताई हळूच मागून येऊन त्याचे डोळे बंद करणार. पण मागे कुणीच न दिसल्यावर त्यानं काहीसं खट्टू होऊन पुन्हा विचारलं, "ताई कुठेय?"

राजा म्हणाले, "आपल्या ताईला देवबाप्पाने बोलावून नेलं."

धृव पुन्हा म्हणाला, "कुठेय देबाप्पा?"

राजा म्हणाले - "बाळा तू बोलावं न देवबाप्पाला.मी तुला ते भजन शिकवलंय ते म्हण, मग येईल देवबाप्पा."

ते ऐकून आपलं छोटस शरीर डोलवत, हात उंचावून देवबाप्पाला बोलवत धृव भजन म्हणू लागला.

किती साद घालू देवा तुला,
मी अनाथ बालक या जगी.
संसार हा निबीड वनासारखा,
घनघोर अंधःकार, नयनात नीर
मार्ग मला सापडत नाही रे..

कुणी न जाणतो या जगी,
कधी पडेल काळाचा विळखा
म्हणून सदैव करतो तुझाच धावा
तूच तारणहार, तूच माझा आसरा
भक्तांची आई म्हणती तुला सारे,
त्या नावाला तरी तू जाग रे..

तुझीच आशा मम जीवनाला..
अंध:कारात दाखवतील मार्ग
तुझेच प्रकाशमान डोळे..
हा धृव तुलाच पाहतो
तूच माझा धृव तारा,
अजून कुणाला पाहू रे?

राजाने शिकवलेलं ते भजन र ला ल, क ला त, ड ला द असं उलटसुलट करून, अर्धी वाक्य तोंडातल्या तोंडात आणि अर्धी मोठ्याने असं करून धृव गोड आवाजात ते भजन गात होता. ते पाहून राजाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. नदी, आजूबाजूची झाडे, पक्षी सर्व काही जणू ते दृश्य पाहून आनंदाने हसत होते. राजाला वाटलं जसं धृव त्यांच्या मांडीवर बसला आहे तसेच त्यांनाही कुणीतरी आपल्या प्रेमळ मिठीत घेऊन मांडीवर बसवले आहे. ते स्वतः, त्यांच्या आजूबाजूला असलेली प्रत्येक जड-चेतन वस्तू त्या महान शक्तीचा शोध घेण्यासाठीच तिथे उपस्थित आहे. त्यांच्या मनातला आनंद आणि प्रेम सूर्याच्या किरणाप्रमाणे दहा दिशाना परावर्तित होऊन आकाशही उजळून निघालं.

त्याचवेळी आपली तलवार सांभाळत जयसिंह गुहेच्या मार्गाने येऊन राजासमोर उभा राहिला.

महाराज आपले दोन्ही हात उंचावून धृवची भजन गाताना असलेली मुद्रा करून म्हणाले, "यावे जयसिंह! यावे!"

त्यावेळी राजा एका लहान मुलाबरोबर मूल झाले होते. शिष्ठाचार, मर्यादा सगळं काही विसरून.

जयसिंहने खाली वाकून राजाला नमस्कार केला आणि म्हणाला,

"महाराज एक प्रार्थना आहे."

राजा - "काय आहे? सांग!"

जयसिंह - "माता आपल्यावर अप्रसन्न झाली आहे."

राजा - "का? माता अप्रसन्न व्हावी असं मी काय केलं?"

जयसिंह - "महाराज, बळीची प्रथा बंद करून आपण देवीच्या पूजेत विघ्न निर्माण केलं आहे."

राजा - "का जयसिंह? कशासाठी ही हिंसा? मातेच्या कुशीत तिच्याच बाळाचं रक्त सांडून तू तिला प्रसन्न करणार?"

जयसिंह सावकाश महाराजांच्या चरणांजवळ बसला. धृव त्याची तलवार घेऊन खेळू लागला.

जयसिंह म्हणाला, "पण महाराज, बळीची प्रथा तर शास्त्रसंमत आहे."

राजाने उत्तर दिलं, "खरोखर शास्त्रांत सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं विधीपूर्वक पालन केलं जातं? सगळे आपापल्या स्वभावानुसार, ज्याला जसं सोयीचा असेल तो अर्थ लावून हे विधी पार पाडतात. लोक देवीच्या समोर सांडलेले बलिदानाचं रक्त अंगाला माखून जोरजोरात ओरडून अंगणात नाचत असतात, तेव्हा ते देवीची पूजा करीत असतात? नाही ही तर त्यांच्याच मनात लपलेल्या हिंसारुपी राक्षसीची पूजा झाली. हिंसा करण्यासाठी बलिदान करणं हा शास्त्रांनी सांगितलेला नियम नाही, आपल्या मनात लपलेल्या हिंसेचा बळी देणं हाच अर्थ शास्त्रांमध्ये अभिप्रेत आहे. "

काही वेळ जयसिंह शांत बसला. काल रात्री त्याच्या मनात ज्या विचारांनी थैमान घातलं होतं, महाराज अगदी तेच त्याला समजावून सांगत होते.

शेवटी जयसिंह म्हणाला, "मी प्रत्यक्ष देवीच्या मुखे हे ऐकून आलोय. देवीने स्वतः सांगितलंय की तिला महाराजांचा बळी हवाय." सकाळी मंदिरात घडलेली संपूर्ण घटना जयसिंहने महाराजांना सांगितली.

महाराज हसून म्हणाले, "ही देवीची इच्छा नाही. रघुपतीची आज्ञा आहे. देवीच्या मागे लपून त्यांनीच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असणार."

राजाने असं सांगताच जयसिंह चकित झाला. त्याच्याही मनात हाच संशय आला होता पण वीज चमकून जावी तसा तो क्षणार्धात नष्टही झाला होता. राजाने त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करताच पुन्हा एकदा त्याच्या मनाला संशय व्यापू लागला.

जयसिंह हळवा होऊन म्हणाला, "नको महाराज नको! मला पुन्हा एकदा संशयाच्या गर्तेत ढकलू नका. मी किनाऱ्यावरच ठीक आहे, ह्या वादळात माझा टिकाव लागणार नाही. तुम्ही जे सांगताय ते ऐकून मला समोर फक्त आणि फक्त अंधारच दिसतोय, बाकी काही नाही! माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. देवीची इच्छा असो की गुरुदेवांचा आदेश, माझ्यासाठी दोन्ही समान आहेत. या आदेशाच पालन मी अवश्य करणारं."

असं बोलून जयसिंहाने पटकन तलवार काढली. ते पाहून धृव जोर जोरात रडू लागला. आपल्या छोट्या हातांनी त्याने राजाला घट्ट मिठी मारली. राजानेही जयसिंहकडे पूर्ण दुर्लक्ष करून धृवला आपल्या मिठीत सुरक्षित केलं.

ते निर्व्याज प्रेम पाहून जयसिंहान तलवार दूर फेकून दिली. राजाच्या मिठीत स्फुंदत असलेल्या धृवच्या पाठीवर हात फिरवून तो म्हणाला, "घाबरू नको बाळ, हे बघ मी चाललो. तू याच महान आत्म्याच्या सानिध्यात रहा, या विशाल बाहूंमधेच तू सुरक्षित आहेस. महाराजांपासून तुला कुणी दूर करू शकणार नाही."

राजाला नमस्कार करून जयसिंह परत जायला निघाला. पण पुन्हा काही विचार करून परत आला आणि महाराजांना म्हणाला,

"महाराज तुम्ही सावध राहील पाहिजे. आपले बंधु नक्षत्ररायलादेखील तुमचा वध करण्यास प्रवृत्त केलं आहे. आषाढ चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा चौदा देवतांची पूजा आहे तेव्हा घात होण्याची शक्यता आहे."

राजा हसून म्हणाला, "काही झालं तरी नक्षत्र माझा वध नाही करणार, त्याचं फार प्रेम आहे माझ्यावर. "

जयसिंह राजांची आज्ञा घेऊन परत गेला.

राजाने धृवकडे पाहून प्रेमाने त्याच्या गालांवर ओघळलेले अश्रू पुसले आणि म्हणाला, "आज तूच या पवित्र धरतीवर रक्तपात होऊ दिला नाहीस. कदाचित यासाठीच तुला तुझी ताई सोबत घेऊन नाही गेली."

झाल्या प्रसंगाने काहीसा बावरलेला धृव म्हणाला, "ताई कुठेय?"

आता आकाशात ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. सूर्य झाकोळून गेला होता. नदीवर, दूर जंगलावर काळी सावली पडू लागली होती. पावसाची लक्षणं दिसू लागताच राजा धृवला घेऊन महालात परत गेले.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

30 May 2018 - 4:21 am | manguu@mail.com

छान

हे खरंच टागोरांनी लिहिलेलं आहे?
ते काळाच्या खूप पुढे होते म्हणायचं..

प्रचेतस's picture

30 May 2018 - 8:43 am | प्रचेतस

अप्रतिम कथा.

वाचतो आहे. ह्या भागात छोट्या ध्रुव च्या भजन गाण्याच्या प्रसंगामुळे अनेक सुंदर बंगाली गीते आठवली.

गुरुदेव रबिन्द्रनाथांच्या साहित्याला अखिल विश्वाचे धन का म्हणतात याची प्रचिती येतेय.
म्हटली तर साधी कथा, समजली तर वैश्विक भाष्य !

पु भा प्र,

अनिंद्य

खरं तर रविंद्रनाथांच्या कथा कधीच वाचल्या नाहीत. मध्यंतरी इपिकवर 'रबिंद्रनाथ की कथाएं' वर मालिकादेखील प्रसारित झाली होती ती देखील पाहिली नाही.

पण ह्या अनुवादामुळे कथांतील सामर्थ्य, साधेपणा, सच्चेपणा समजतोय.

वाचतेय. ह्या भागाचा अनुवाद मला फार आवडला, खास करून पहिला परिच्छेद.

एस's picture

30 May 2018 - 1:01 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

आता भाषांतर जरा सराईत वाटते. तरीही अजून

एकच व्यक्ती होती, जिच्या तोंडी ही हाक गोड वाटायची. ती व्यक्तीच आता नाही.

अशा ठिकाणी जरा अडखळायला होते.
'जिच्या तोंडी ही हाक गोड वाटायची, ती एकमेव व्यक्तीच आता नाही.'
असे चालून गेले असते.

रातराणी's picture

31 May 2018 - 10:54 am | रातराणी

धन्यवाद ताई. वाक्यरचनेकडे लक्ष देईन आता. :)

manguu@mail.com's picture

30 May 2018 - 6:30 pm | manguu@mail.com

मला कटापा आणि बाहुबली आठवले

रातराणी's picture

31 May 2018 - 11:10 am | रातराणी

सर्वांना धन्यवाद :)