दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो.
वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे. It's more of interpretation and understanding context and concepts behind, it may not appeal instantly - but it grows on you! ते येरागबाळ्याचे काम नाही.
पुरोगामी उर्दू लेखकांमधे कैफ़ी आज़मी, महंमद इक्बाल हे काही महत्वाचे लेखक आहेत. ह्या लेखात महंमद इक्बाल ह्याच्या रचनेबद्द्ल काही लिहायचा प्रयत्न केला आहे.
डॉ. महंमद इक्बाल साधारणपणे ओळ्खले जातात त्यांच्या "सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ताँ हमारा" मुळे. पण त्यांच्या असाधारण प्रतिभेची, विद्व्तेची उदाहरणे त्यांच्या रचनेत कित्येक सापडतात. हे त्यांचे काही ’अशआर’ (शेर चे अनेकवचन) अर्थासहित (काही संदर्भ डॉ. सुरेशचंद्र नाड्कर्णी यांच्या "ग़ज़ल" ह्या पुस्तकातुन) -
मोती समझकर शाने-करीमीने चुन लिये
क़तरे जो थे मेरे अर्क़े-इन्फ़आ़लके।
अर्थ : "माझ्या पश्चाताप्दग्धतेचे जे अश्रुंचे थेंब जमिनीवर पडले, ते परमेश्वरानेही मोती म्हणून वेचून घेतले."
हा सुरेख कल्पनाविलास पहा -
सूरजने जाते, जाते शामे-’सियह क़बाको
तश्ते-उफकसे लेकर लालेके फूल मारे।
पहना दिया शफक़ने सोनेका सारा ज़ेवर
कुदरतने अपने गहने चांदीके सब उतारे।
अर्थ : "मावळतीच्या सूर्याने जाता जाता कृष्ण्वसना संध्येच्या अंगावर क्षितिजाच्या तबकातील लाल फुले उधळली. आकाशगंगानी आपले सोन्याचे अलंकार तिच्यावर चढवले आणि निसर्गाने आपले चांदीचे दागिने (पांढरशुभ्र सुर्यप्रकाश) उतरवूने ठेवले.
अल्लामा इक्बाल यांची "हक़ीक़ते-हुस्न" नावाची एक अप्रतिम रचना आहे (सौंदर्य परमेश्वरला विचारते, ’तू सौदर्याला अमरत्व का दिले नाही?’ आणि परमेश्वर त्याला नश्वरतेबद्द्ल सांगतो) , त्यातील काही अशआर -
है रंगे-तगय्युरसे जब नमूद इसकी
वही हसीन है हक़ीकत ज़वाल है इसकी।
अर्थ : "असलेलं मोडून त्या जागी नवीन निर्माण होणे, अशा अविरत बदलातूनच हे जग घडलेले आहे, आणि म्हणूनच ज्याचा र्हास होत जातो (जे नाशवंत असते), ते सुंदर असते."
कहीं क़रीब था, ये गुफ्तगू क़मरने सुनी
फ़लकपे आम हुवी, अख्तरे-सहरने सुनी।
सहरने तारेसे सुनकर सुनायी शबनमको
फ़लककी बात बता दी ज़मींके महरमको।
अर्थ : "चंद्र जवळच कुठेतरी होत, त्याने ही कानगोष्ट ऐकली आणि मग सार्या नभांगणात ही गोष्ट पसरली; ती पहाटेच्या तार्याने ऐकली... पहाटेने तार्याकडून ऐकून ही गोष्ट दवबिंदूंना सांगितली आणि (मग) हे आकाशातील रहस्य जमीनीवरच्या मर्मज्ञांना कळले."
इक्बाल ह्यांच्या सुरवातीच्या रचनात प्रखर राष्ट्र्प्रेम दिसते, त्यांच्या प्रसिद्ध रचनेच्या ह्या ओळी बघा -
तंग आके मैने दैरो-हरमको छोडा
वाइज़का वाज़ छोडा, छोडे तेरे फसाने।
पथ्थरके मूरतोंमें समझा है तू खुदा है
खांक़े वतनका मुझको हर ज़र्रा देवता है!
अर्थ : "कंटाळून मी शेवटी मंदिर-मशीद वगैरे सोडून दिलंय, मौलवीचा उपदेश आणि तुझे पुराण ऐकणे देखील सोडून दिले आहे. त्या पाषाणाच्या मुर्तीत देव आहे असे तुला वाटते, पण देशाच्या मातीचा प्रत्येक कण मला देवासमान आहे."
इक्बाल यांच्या "असरारे-खुदी" ह्या त्यांच्या पर्शियनमधील ग्रंथाचा इंग्रजीमधे अनुवाद झाला, आणि त्यासाठी त्यांना "सर" हा किताबही इंग्रजांकडून मिळाला. "अल्लामा" हे त्यांना लोकांनी दिलेले संबोधन - त्याचा अर्थ विद्वान अथवा पंडित असा घेता यईल. "खुदी" (आस्मिता, स्वाभिमान ह्या अर्थाने) बद्दल ते म्हणतात -
खुदीकी है ये मंज़िले-अव्वलिन
मुसाफिर तेरा नशेमन नहीं।
तेरी आग इस खाकदाँसे नही
जहाँ तुझसे है, तू जहांसे नही।
अर्थ : "हा आस्मितेचा पहिलाच टप्पा आहे, हे तुझे ठिकाण/विसावा (अंतिम ध्येय) नाही. तुझी ज्योत/आग (प्रेरणा, चैतन्य ह्या अर्थाने) ह्या मातीतली नाही. तुझ्यामुळे जगाचे अस्तित्व आहे, तू ह्या जगामुळे नाहीस."
त्यांची प्रतिभा सर्वस्पर्शी होती आणि त्यांच्या कित्येक रचना त्यांच्या विद्वत्तेची, तत्वज्ञानातील अभ्यासाची ग्वाही देतात. उर्दू शायरीतील कित्येक रचनांप्रमाणे त्यांच्या रचनांतूनही कित्येक अर्थ निघतात, आणि वरवरच्या अर्थापलिकडे खूप काही सांगून जातात. त्यांचा अजून एका प्रसिद्ध रचनेतील (’एक नया शिवाला’) हे काही अशआर -
आ गै़रियतके पर्दे इक़ बार फिर उठा दें
बिछडोंको फिर मिला दें, नक़्शे-दुई मिटा दे।
सूनी पडी हुवी है, मुद्दतसे दिलकी बस्ती
आ इक नया शिवाला इस देसमें बना दें।
दुनियाके तीरथोंसे उँचा हो अपना तीरथ
दामाने-आसमाँसे इसका कलस मिला दें।
हर सुबह उठके गाएं मंतर वो मीठे मीठे
सारे पुजारीयोंको मय प्रीतकी पिला दें।
शक्ति भी शांती भी भक्तोंके गीतमें है
धरतीके बासियोंकी मुक्ति प्रीतमें है!
सोपी रचना आहे, त्यामुळे संपुर्ण अर्थ द्यायची गरज नाही, काही कठीण शब्दाचे अर्थ असे -
- गै़रियतके = परकेपणाचे
- नक़्शे-दुई = दुफळी, दुरावा
- शिवाला = शिवालय, शिवमंदिर
- दामाने-आसमाँसे इसका कलस मिला दें=ह्याचा कळस आकाशाला जाऊन भिडावा
- मय=मद्य, मदिरा
असा हा विद्वान, प्रतिभावंत उर्दू शायर आणि लेखक, "डॉ. महंमद इक्बाल" उर्फ अल्लामा इक्बाल!!
- मनिष दिवाना
प्रतिक्रिया
28 Nov 2007 - 2:25 am | मनिष
जमल्यास "कैफी आज़मी" ह्यांच्याविषयी लिहिण्याचीही इच्छा आहे, शिवाय अदिम हाश्मी यांच्या "फासलें ऐसे भी होंगे..." ह्याविषयीही लिहायचा प्रयत्न करेन. प्रतिसाद अवश्य लिहा!
(उर्दूप्रेमी) मनिष
30 Nov 2007 - 10:32 am | धोंडोपंत
मनिषराव,
अवश्य लिहा. त्याचप्रमाणे मीर तक़ी मीर च्या शायरीबद्दल ही लिहा असे आमचे सांगणे आहे.
कारण उर्दू शायरीचा हा बादशहा अनेकांना अपरिचित आहे. ग़ालिबसारखा शायरही मीर बद्दल लिहून गेलाय की
रेख़्ते के तुम ही उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'
कहते है अगले ज़माने मे़ कोई 'मीर' भी था....
क्या बात कही है ग़ालिबने? ग़ालिब सारखा माणूस मीरबद्दल हे उद्गार काढतो...सही..
ग़ालिबने मीर च्या काव्याला दिलेले हे सर्टिफिकेट कुठल्याही ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा मोठे आहे.
आपला,
(मीरप्रेमी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
28 Nov 2007 - 2:47 am | सर्किट (not verified)
मावळतीच्या सूर्याने जाता जाता कृष्ण्वसना संध्येच्या अंगावर क्षितिजाच्या तबकातील लाल फुले उधळली. आकाशगंगानी आपले सोन्याचे अलंकार तिच्यावर चढवले आणि निसर्गाने आपले चांदीचे दागिने (पांढरशुभ्र सुर्यप्रकाश) उतरवूने ठेवले.
ओ हो हो ! काय सुंदर वर्णन आहे !
असलेलं मोडून त्या जागी नवीन निर्माण होणे, अशा अविरत बदलातूनच हे जग घडलेले आहे, आणि म्हणूनच ज्याचा र्हास होत जातो (जे नाशवंत असते), ते सुंदर असते.
क्लास ! आजानुकर्णाचे मतपरिवर्तन लवकाराच होईल असे दिसते.
- (कलिजा खलास) सर्किट
ता.क. स्वतःचे नाव आपण "दीवाना-ए-मानिष असे लिहिले आहे. म्हणजे मनिषचा दीवाना, असा अर्थ होतो ना ? आपल्याला दीवाना-ए-इक्बाल लिहायचे होते का ?
28 Nov 2007 - 3:01 am | मनिष
ता.क. स्वतःचे नाव आपण "दीवाना-ए-मानिष असे लिहिले आहे. म्हणजे मनिषचा दीवाना, असा अर्थ होतो ना ? आपल्याला दीवाना-ए-इक्बाल लिहायचे होते का ?
हो, चुकलंच. आता - "मनिष दिवाना" करतो! :)
29 Nov 2007 - 9:37 pm | आवडाबाई
दीवाना-ए-मानिष
ह्यावरून एका अलीकडेच अत्यंत गाजलेल्या एका गाण्यामधील गंमत आठवली
ऐ मेरी मेरी मेरी जोहराजबीं (गायक-हिमेश रेशमिया ; गीतकार-समीर ; चित्रपट-फिर हेराफेरी)
ह्याची पुढचीच ओळ "फुर्कत-ए-गम मिटा जा" अशी आहे. येथे विरहाचे दु:ख असा अर्थ अभिप्रेत असावा, त्यामुळे तो गम-ए-फुर्कत असायला हवा (असा माझा कयास, बरोबर आहे ना?).
29 Nov 2007 - 10:05 pm | धनंजय
काय धमाल गाणे आहे ते! पण समीर यांचा शब्दप्रयोग ठीक असावा.
इदाफ्याचे नियम (म्हणजे अमुक-ए-तमुक-ए-ढमुक) चे नियम मला अजून नीट कळले नाही, म्हणून भाष्य करायला कचरतो. पण इदाफ्यात (असले तर) विशेषण शेवटी येते याची नोंद घेतली पाहिजे.
म्हणजे "मजनूच्या लैलेचे सुंदर स्मित" = "तबस्सुम-ए-लैला-ए-मजनू-ए-हसीन"
असे काहीसे यावे.
मनिष यांच्या लेखातल्या इक़्बाल यांच्या कवितेत
"शाम-ए-सियाहक़बा" असे रूप आले आहे. त्याचा अर्थ "कृष्णवसना हिची संध्या" नसून "कृष्णवसना (अशी) संध्या" असा मनिष यांनी दिला आहे, तो ठीकच आहे.
त्यामुळे अमुक-ए-तमुक चा अर्थ "तमुकचा अमुक" असा घेता येतो आणि संदर्भानुसार "तमुक असा अमुक" असा घेता येतो, असा ढोबळ अर्थ मी काढतो.
हा प्रकार मला नीट कोणी समजावून सांगितला तर हवा आहे. मनिष, धोंडोपंत, चित्तर, कोणी सांगू शकतील...
29 Nov 2007 - 10:48 pm | सर्किट (not verified)
यामुळे अमुक-ए-तमुक चा अर्थ "तमुकचा अमुक" असा घेता येतो आणि संदर्भानुसार "तमुक असा अमुक" असा घेता येतो, असा ढोबळ अर्थ मी काढतो.
अच्छा म्हणजे अर्थ-ए-वाक्य असा आहे होय?
- सर्किट
29 Nov 2007 - 11:18 pm | मनिष
मला उर्दू भाषेत रस आहे आणि प्रेमही आहे पण मला फार व्याकरणाचे ज्ञान नाही. मला वाटते, धोंडोपंत किंवा चित्तर जास्त सांगू शकतील. पण माझ्या माहितीप्रमाणे "गम-ए-फुरकत" हे बरोबर आहे, जसे "शब-ए-फुरकत" - "फुर्कत-ए-गम मिटा जा" हे गाण्यासाठी असावे असे वाटते. तरी एकदा खात्री करून घेइन.
अर्थ-ए-वाक्य अफलातुनच!!! :)
29 Nov 2007 - 11:22 pm | कोलबेर
'अर्थ-ए-वाक्य' ह्या हिशोबाने 'दिवाना-ए-मनिष' पण योग्यच मग बहुतेक. इंटरेष्टींग पॉइंट आहे. जाणकारांच्या भाष्याच्या प्रतिक्षेत.
29 Nov 2007 - 11:42 pm | मनिष
मला वाटते, ह्याला "इज़ाफ़त" म्हणतात आणि ते इंग्रजी of सारखा करतात. जसे - हाल-ए-दिल
तसेच विशेषण आणि विशेष्य ह्यांच्यातील नाते दाखवण्यासाठीही वापरतात. जसे - इस्मे-शरीफ़ (शुभनाम)
30 Nov 2007 - 12:02 am | धनंजय
बरोबर. हाच शब्द अपेक्षित होता.
अरबीप्रमाणे उर्दूतही إضافة 'इदा़फ़[त] असा लिहितात. पण तुम्ही म्हणता तसा " इज़ाफ़त " असाच उर्दूत उच्चार आहे.
नियम दिल्याबद्दल धन्यवाद. त्यावरून विशेष्य-विशेषण म्हणून "मनिषे-दीवाना" म्हणण्यास हरकत नव्हती असे वाटते. तरी ऐकायला जरा वेगळेच (थोडे विचित्र) वाटते खरे. म्हणून तुम्ही केलेला बदलही पटतो.
6 Dec 2007 - 1:20 pm | दिगम्भा
अमुक-ए-तमुक हा समास षष्ठी-तत्पुरुष आणि कर्मधारय अशा दोन्ही प्रकारांनी सोडवता येतो अशी माझी समजूत आहे.
उदा. ग़मेफ़ुर्क़त, मुग़ले-आज़म
धनंजय, उर्दूतला ज़्वाद हा ज़ व द च्या मधला आहे असे एका हैदराबादी गृहस्थाने मला सांगितले होते (आधीच सांगतो की चित्तरंजन यांना हे मान्य नाही, त्यांच्या/तज्ज्ञांच्या मते उर्दूत तिन्ही-चारी/सगळ्या ज़ चा उच्चार एकच होतो असे त्यांनी पूर्वी एकदा लिहिले होते). यामुळे अरबीमध्ये त्याचा बरेच वेळा द होतो, जसे रमदान. मराठीतही तकाज़ा चा तगादा याचमुळे झाला असावा.
- दिगम्भा
30 Nov 2007 - 12:02 am | मनिष
विकीपीडिया म्हणते -
Standard Urdu uses many prepositions directly borrowed from Persian, and also some from Arabic. The most common is इज़ाफ़त اضافه izāfat, the particle -e- meaning "of" that links two words together. Example: रंग-ए बहार / رنگ بہار / rang-e-bahār (lit., colour of spring).
त्या न्यायाने मग गम-ए-फुरकत हे बरोबर आहे. बाकी गाण्याबद्दल समीर लाच विचारले पाहिजे!
30 Nov 2007 - 3:40 pm | आवडाबाई
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल-ए-तारिफ आहे :-))
गीतकार समीर असल्यानेच मी (जवळजवळ ऍज ऍन आफ्टरथॉट) प्रश्नार्थक लिहिले, एरवी मी एकदम आत्मविश्वासाने लिहिले असते.
बघू जाणकार काय सांगतात ते !
3 Dec 2007 - 10:41 am | धोंडोपंत
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल-ए-तारिफ आहे :-))
आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं? कमाल आहे.
आपला,
(चकित) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
6 Dec 2007 - 3:08 pm | आवडाबाई
आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं? कमाल आहे.
हो उर्दू आहेच, पण सध्या थोडा ट्रॅक चेंज केलाय. आजपासून सवाई गंधर्व !! तेव्हा ४ दिवस शास्त्रीय संगीत !!
संपल्यावर रिपोर्ट देतेच !
28 Nov 2007 - 3:05 am | मनिष
अर्थात हेच इक्बाल पुढे कट्टर धर्मवादी झाले, पाकिस्तानच्या निर्मितीचा एक खंदा पुरस्कर्ता हा आरोपही त्यांच्यावर झाला. पण त्यांच्या (आणि अर्थातच उर्दू शायरीच्या वैविध्याविषयी, दर्जाविषयी ही चर्चा असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन, उदारमतवादी ते कट्टर धर्मवादी हा प्रवास हे इथे वगळले आहे.
29 Nov 2007 - 7:28 am | किमयागार (not verified)
अर्थातच उर्दू शायरीच्या वैविध्याविषयी, दर्जाविषयी ही चर्चा असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन, उदारमतवादी ते कट्टर धर्मवादी हा प्रवास हे इथे वगळले आहे.
होऊ द्या की त्यावरही चर्चा. हवं तर स्वतंत्र लेख सुरू करा पण आम्हालातरी त्यातच तुमच्या शेरो शायरी पेक्षा जास्त रस आहे.
-कि'गार
30 Nov 2007 - 2:03 pm | धोंडोपंत
सर महंमद इक़्बाल यांनी स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव कधीही मांडला नाही. त्यांना पद्धतशीरपणे त्यात गोवण्यात आले.
सारे जहाँसे अच्छा, हिदोस्ताँ हमारा....
म्हणणारा माणूस हिंदोस्ताँला तोडायची मागणी कशी करेल?
एडवर्ड थॉमसनने त्याच्या पुस्तकात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा उल्लेख करून ती कल्पना सर महंमद इक़्बालांच्या डोक्यातून बाहेर आली आहे असे म्हटले. त्यानंतर लगेच इक़्बाल यांनी आपली अखंड भारताची भूमिका असल्याचे स्पष्ट करतात थॉमसनने फक्त दिलगीरी व्यक्त केली.
पण तोपर्यंत जीना आणि लियाकत अली मंडळीना आयताच बळीचा बकरा मिळाला होता. अलाहाबादच्या मुस्लिम लीगच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर महंमद इक़्बाल यांची निवड 'करण्यात' आली आणि त्या अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा ठराव संख्याबळाच्या आधारे पास करण्यात आला असे इतिहास सांगतो.
वास्तविक सर महंमद इक़्बाल यांचे मत पंजाब, वायव्य सरहद्द आणि बलुचिस्थानचे एक राज्य बनवून ते अखंड भारतात सामावून घ्यावे असे होते.
आपला,
(इतिहाससंशोधक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
30 Nov 2007 - 2:11 pm | मनिष
म्हणूनच मी "आरोप" असे म्हट्ले.
मला वाटते, त्यांची राजकीय, धार्मिक मते बाजुला ठेवून (मला तरी त्यात रस नाही, आणि त्याने वाद-विवाद वाढतो.) त्यांच्या शायरीचा आस्वाद घ्यावा हे उत्तम. :)
30 Nov 2007 - 2:26 pm | धोंडोपंत
मनिषराव,
तुमचे म्हणणे खरे आहे.
पण सर महंमद इक़्बाल यांच्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज असू नयेत म्हणून वरील गोष्ट स्पष्ट करणे अगत्याचे वाटले.
आपला,
(दक्ष) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
28 Nov 2007 - 7:19 am | विसोबा खेचर
मनिषराव,
अतिशय सुंदर लेखन! आपला उर्दू भाषेचा एवढा व्यासंग आहे हे माहितीच नव्हतं. आपल्याकडून अजूनही अश्याच लेखांची अपेक्षा आहे....
उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे.
क्या बात है! त्या भाषेचा रुबाब काही वेगळाच...
तात्या.
28 Nov 2007 - 9:53 am | आजानुकर्ण
असे वाचायला आवडेल. :) मस्त लिहिले आहे.
आजानुकर्ण
28 Nov 2007 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणतो !
30 Nov 2007 - 10:25 am | धोंडोपंत
वा मनिष राव,
बहोत ख़ूब. अप्रतिम लेख. अभिनंदन.
आपला,
(आस्वादक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
30 Nov 2007 - 11:08 am | रामराजे
वा ह वा.. क्या बात है!
3 Jan 2016 - 11:23 am | Rahul D
वाह वाह बहुत खूब