२. सु.शिं.चे मानसपुत्र- दारा बुलंद

अजिंक्य विश्वास's picture
अजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं
7 Apr 2016 - 5:53 pm

१. सु.शिं.चे मानसपुत्र
दारा बुलंद

मागच्या काही भेटीमध्ये सुगंधा काकूंनी (सुगंधा सुहास शिरवळकर) त्यांच्या आठवणी सांगताना एक अशीच आठवण सांगितली. जी बहुदा सुहास शिरवळकर: असे आणि तसे मध्येही आली आहे.
सु.शिं.ना भेटायला त्यांचे अनेक फॅन्स महाराष्ट्र , देशभरातून आणि परदेशातून यायचे. त्यातल्या काही मुली खास करून दारा बुलंदला भेटायचे म्हणून सु.शि. आणि काकूंकडे हट्ट धरायच्या. मग त्यांची समजूत काढता काढता शिरवळकर द्वयींच्या नाकी नऊ यायचे. त्या मुली अथवा स्त्रियांची अशी निरागस समजूत असायची की दारा बुलंद हा शिरवळकरांना भेटला आहे आणि शिरवळकरांना तो कुठे राहतो , याचा पत्ता माहित आहे आणि ते आपल्याला देत नाहीत. त्यांना हे समजवून सांगायला फार त्रास व्हायचा की, ’दारा बुलंद हे फक्त कथा-कादंबर्‍याचे पात्र आहे. ते आपल्यामध्ये नाहीये’.
एकदा एक मुलगी काकूंजवळ हट्टाला धरून पेटून उठली , की तिला दाराला राखी्च बांधायची आहे. काकूंनी तिला खूप समजवायचा प्रयत्न केला की दारा हे फक्त हे कॅरेक्टर आहे. पण तिला समजवून घ्यायचेच नव्हते. ती काकूंना म्हणाली की, ही राखी तुम्ही ठेऊन घ्या. माझ्या समाधानासाठी तरी राखी ठेवा. म्हणजे ती दाराला पोहोचली असे मी समजेल. तिच्या समजूतीसाठी काकूंना राखी ठेऊन घ्यावी लागली.
असा हा दारा!
तर ’बादल’बद्दल बोलताना आधी तसे की, दोन बादल आहेत. ते जाणून घ्यायला तुम्हाला सु.शिं.च्या आक्रोश, गिधाड, लास्ट बुलेट ह्या तीन रहस्यकथा ह्याच क्रमाने तुम्हाला वाचायला लागतील. नंतर बादलबद्दलचा हा पुसटता उल्लेख ’बेफिकीर’ (म्हणजेच आत्ताची ’अवाढव्य’) मध्ये वाचायला मिळेल.
दाराची पहिली कथा जानेवारी १९७५ मध्ये प्रकाशित झाली. तिचे नाव ’ही वॉज टु डाय’ (गंमत म्हणजे जानेवारी १९७५ मध्ये पहिली ’अमर कथा’ - ’थर्‌राट’ देखील प्रकाशित झाली. त्याबद्दल नंतर कधीतरी)
दाराची पूर्ण कथा तीन भागात प्रसिध्द झाली.
१. ही वॉज टु डाय,
२. सन्नाटा,
३. द लास्ट फाईट
जी पुढे जाऊन एकत्रित प्रथमावृती म्हणून ’सन्नाटा’ ह्या नावाने प्रसिध्द झाली.
बादल एका कथानकात दाराचे पाहून एका गुंडाला/ किंवा स्वत:च्या साथीदाराला उचलतो आणि दारा स्टाईलमध्ये फेकतो, फक्त त्याला तो गुंड/ साथीदार झेलता येत नाही. त्यावेळेस दारा प्रसंगावधान राखून त्या व्यक्तीला झेलतो. (मला कथानकाचे नाव आठवत नाही. तुम्हाला कोणाला आठवले तर नक्की सांगा.)
बादल हा दाराला तोडीस तोड आहे. फक्त तो थोड्या भडक डोक्याचा असल्यामुळे अडचणीत येतो.
मधुर पूर्ण टोळीचा मेंदू असल्यामुळे सर्व शांत सावधपणा आणि धूर्तपणा त्याच्याकडे आहे.
दारा हा कधीच स्त्री लंपट अथवा कुठल्याही स्त्री अथवा तरूणीला पाहून तिच्यावर भाळलेला संपूर्ण ’बुलंद’ कथांमध्ये मलातरी कधीच आढळले नाहीये. तो स्त्रियांना एकतर आई किंवा बहीण ह्याच नजरेतून पाहत आला आहे.
’बुलंद’ कथांमध्ये रोमान्स हा मधुर- सलोनीच्या रूपाने खूप साधेपणाने व तसाच साजेसा ठेवला आहे. त्यांची एकमेकांबद्दल असणारी काळजी, अंडरस्टॅंडींग आणि दाराला कळू नये , ह्यासाठी घेत असलेली काळजी कळून येते. गंमत म्हणजे दाराला देखील हे माहित असून तो ह्याबद्दल कधी आक्षेप घेताना आढळत नाही, तर तो ह्या प्रकाराला एक मूक संमती दर्शवतो. इव्हन कधी कधी अशा प्रसंगाकडे तो काणा डोळा करून आपल्याला काही माहितच नाही असे भासवतो.

बाकी आधुनिक शस्त्रभांडाराचे बदलते मालक, वेगवेगळ्या शस्त्रांचे प्रकार, फाईटस्‌च्या पद्धती आणि घाबरट पोलीस इन्स्पेक्टर यांच्याबद्दल ’बुलंद’ कथा वाचूनच आपल्याला अधिक कळेल.

सु.शिं. कधीच राजस्थान वा त्या बाजूकडील परिसरात गेले नाहीत. पण त्यांनी नकाशे वापरून राजस्थान व त्याबाजूचा परिसर साम, जैसलमेर, छांग, किकोरी, सामचे वाळवंट आपल्या वाचकांसाठी जिवंत करून ठेवले आहे. तेथील माणसांच्या स्वभावानुसार.
_________________

दारा बुलंद ह्या पात्राशी निगडीत असणारी एक आठवण सम्राट शिरवळकर यांनी सांगितली आहे.

सम्राट शिरवळकर- दारा वाचला आणि जोर बैठका मारल्या नाहीत असा कोणी आहे का रे इकडे? पूर्वी मी पण जोर बैठका मारून बसलो आहे या दारापायी. एकदा तर शाळेत असताना गोष्टही लिहण्याचा प्रयत्न केला होता तीच पात्रं घेऊन. मग लक्षात आलं की हे तर दोन पानाच्यावरच जात नाहीये तेव्हा फाडून टाकलं, सिनेमातील कवी सारखं. जमिनी खालून खंदक खणून, गावठी बॉम्ब वगैरे वापरून बादलकडे लीड ठेवला होता, जोडीला शीतल. तर दारा आणि मधुर कुठल्यातरी दुसऱ्या समरप्रसंगात अडकले आहेत आणि बाहेरून गुप्तपणे शत्रू सैन्य पोखरून बादल, शीतल दाराची कोंडी फोडणार... असल काहीतरी होतं ते. असो.
या ठिकाणी आता मी माझा रोल लक्षात ठेवून एक आठवण सांगतो.
पुण्यात सप्तर्षी वाडा आहे ( सोमवार पेठेत). या वाड्यात उत्तम शिव मंदिर होते. (पुरातन होते. तेव्हाच कोर्ट कचेऱ्या चालू होत्या हक्कांवरून. सद्य स्थिती माहिती नाही). या वाड्यात मी शालेय वयात सप्तर्षीकडे शिकवणीसाठी जात असे. वाडा चमत्कारिक आणि माणसेही. पण तो आत्ता विषय नाही. तर या वाड्यात सप्तर्षींच्या डोक्यावर जे घर होते. तिथे एक माझा दादा शोभेलसा तरुण मुलगा राहात असे. मी शिकवणीसाठी आलो की तो हमखास मला खिडकीत दिसे. एक दिवस त्याची आणि माझी ओळख झाली, म्हणजे करून देण्यात आली खास. कारण तो दारा बुलंद वाचायचा. फक्त दारा! त्या मुलाच नाव अभिजित होतं. प्रेमानी मी त्याला अबू खान हाक मारायचो. ( का ते आठवत नाही). तर हा अभिजित उर्फ अबू, दारा सारखी शरिर संपदा बनवायची म्हणून कँप भागातील फिशर नावाच्या माणसाकडे ट्रेनिंग घ्यायचा. त्या जिमच नावही फिशर जिमच होतं. तो म्हणे तयारीच करून घ्यायचा. ( म्हणजे माझ्यासारखा जिथे नक्की जाणार नाही असे ठिकाण.) मला वाटतं ते दिवस काही आता सारखे कानाकोपऱ्यावर आधुनिक व्यायामशाळा असणारे नव्हते. कुस्ती आणि मल्ल विद्या/ व्यायाम शिकवणाऱ्या तालमी पुण्यात चिकार होत्या. पण अबूला दारासारखी बॉडी बनवायची होती त्याला मग आधुनिक जिमचा पर्याय नव्हता(!).... तर या अबुकडे एक दिवस मी गेलो असताना तो नुकताच बाहेरून आल्याने घरात उघडाबंब फिरत होता. खिडकीतून येणाऱ्या सूर्यास्ताच्या तीरीपित तो मला सिलूएट (silhouette) मध्ये दिसला. वाराही सुटला होता त्यात त्याचे कुरळे केस वाऱ्यावर भिरभिरत होते...आणी... क्षणभर माझ्यासमोर तो दारा म्हणूनच उभा राहिला. मला वाटत माझ्या मनात दाराची प्रतिमा तयार होताना या अबूचा चेहरा नेहमी त्यात डोकावतो (या माणसाचं आडनाव मला आठवत नाहीये आणि काही केल्या मला तो फेसबुकवर सापडत नाहीये). काही जसे फिरोज, अमर, मंदार, दाराचे पत्ते शोधतात, तसे आपल्याला भावलेली पात्रं, त्यांच्या काही लकबी, वैशिष्ट्यं... इतरांच्यात शोधता का तुम्ही किंवा स्वतःच तशा काही लकबी उचलता का? अर्थात दाराला पकडून पुढे चर्चा चालू ठेवू या. माझा शेवटचा प्रश्न हा परत कधीतरी जनरल चर्चेत घेऊ या.
आभार!

ता. क. जाताजाता - सुशिंच्या थोरल्या बंधूंना घरी दारा म्हंटले जात. ती त्यांच्या नावाची व त्यांच्या वडिलांच्या नावाची इनिशिएल्स होती. हा दा.रा. देखील उत्तम शरीरयष्टी कमावलेला त्या काळचा हँडसम लुक्स असलेला, प्रसंगी बिनदिक्कत दोन हात करू शकणारा तरुण होता. पण त्यावरून दारा हे नाव किंवा पात्र बेतलेले नाही. हा निवळ योगायोगचं मानावा लागेल.
__________________
आपले जर काही प्रश्न असतील तर त्याचे निरसन करायला मला नक्की आवडेल.

वरील बहुतेक सर्व माहिती वाचनामुळे , सुगंधा काकू आणि सम्राट यांच्याबरोबर झालेल्या भेटींमधील गप्पा, काकूंनी सु.शिं.ची प्राणापेक्षाही जपून ठेवलेल्या ’लाल’ डायरी या सर्व गोष्टींचे फलित आहे.

मांडणीकथासाहित्यिकमौजमजाआस्वादलेखमाहितीसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

जेसलमेर चे दिनानाथ सिंह ह्यांचे आधुनिक शस्त्र भांडार.
शान-ए-जेसलमेर, बालाजि चि खिंड,
वाह क्या दिन थे यार वो.

पैसा's picture

7 Apr 2016 - 9:11 pm | पैसा

छान आठवणी!

lgodbole's picture

8 Apr 2016 - 12:50 pm | lgodbole

सुशि माझे लाडके लेखक.

प्रचेतस's picture

8 Apr 2016 - 3:18 pm | प्रचेतस

मस्त आठवणी.

कुठली कथा आठवत नाही, पण त्यात असा प्रसंग होता कि दारा एका गुंडाच्या दिशेने तलवार फिरवतो पण त्या गुंडाला काहीच होत नाही आणि तो हसायला लागतो, तर दारा त्याला म्हणतो "हसतोस काय मान हलव" तो गुंड मान हलवतो तर त्याची मान धडावरुन गळुन पडते. दारा इतक्या सफाईने त्याची मान कापतो कि त्याला सुद्धा कळत नाही. भारीच .
"हसतोस काय मान हलव" हा डॉयलॉग आम्हा मित्रांच्यात इतका फेमस होता त्या काळी कि कुणीही हसला कि दुसरा लगेच हा डॉयलॉग चिटकउन द्यायचा.