वैधानिक इशारे
१.---> कुत्री पाळणे, हे अतिशय घातक व्यसन असल्याने, जबाबदारीने, आर्थिक कुवतीने आणि सामाजिक भान ठेवूनच, ह्या व्यसनाच्या नादी लागावे.
२.---> कुत्री एखाद्या लहान मुलासारखीच असतात.त्यांच्या देहबोलीवरून, खाण्या-पिण्यावरून आणि भुंकण्यावरून त्यांच्या आजारपणाचा, त्यांच्या मागणीचा, अंदाज घ्यावा लागतो.त्यांची भाषा फक्त त्यांच्यावर मनापासून प्रेम करणार्या व्यक्तीलाच समजू शकते.
३.---> कुत्र्यांना शिकवणे हे अत्यंत वेळखाऊ आणि शांतपणे करायचे तप आहे.विशेषतः त्यांच्या "शी-शू"च्या सवयी बाबतीत.त्यांच्यावर जास्त न रागावता ह्या सवयी लावणे, सुरुवातीला थोडे त्रासदायक ठरेल, पण ह्या सवयी लागतात.
४.---> आली लहर आणि घेतला कुत्रा, असे अजिबात करू नका.कुत्रा पाळणे हे तिन्ही-त्रिकाळ करायची गोष्ट आहे.घरात २४ तास कुणी ना कुणी असेल तर (विशेषतः जेष्ठ लोक) कुत्रा जरूर पाळा.मला तरी ह्या बाबतीत कुत्र्यांचा खूपच उत्तम अनुभव आला आहे.आमच्या सासूबाई आता घर सोडून जावू शकत नाहीत.घरात कुत्री आणल्यापासून, त्यांना ह्या कुत्र्यांची छान सोबत होते.
==================================================================
काही सूचना
सूचना १ ----> ह्या भागात कृपया "कुत्र्यांची तोंडओळख आणि लॅब्रेडोर" ह्या विषयीच माहितीची देवाण-घेवाण करु या.
सूचना २ ----> पुढील भागात आपण "बीगल" ह्या जातीविषयी माहिती घेवू या.
सूचना ३ ----> आम्ही जरी श्र्वान-व्यसनी असलो तरी, ह्या व्यसना बाबतीत जाणकारही नाही आणि विशेषज्ञ तर अजिबात नाही.त्यामुळे, मी इथे लिहीत असलेली माहिती. बरीचशी मिळवलेली आणि थोडी-फार स्वानुभवाची आहे.कृपया माझी माहिती चुकीची असल्यास, दुरुस्त करण्यात यावी, ही कळकळीची विनंती.
सूचना ४ ----> कूठलाही कुत्रा किंवा कुत्री घेण्यापुर्वी, आपल्या घराजवळ किंवा आपल्याला सहज नेता-आणता येईल इतक्या अंतरावर पशूवैद्यक असावा.
सूचना ५ ----> आपल्या घराजवळ एखादे पाळीव श्र्वान असेल तर फार उत्तम.साधारणपणे ज्या कुटुंबात श्र्वान असते ते पाळीव श्र्वानांना आणि त्यांच्या मालकांना नेहमीच मदत करतात आणि दोन्ही घरातली कुत्री एकमेकांबरोबर छान खेळतात.
==============================================================
कुत्र्यांची निवड ======>
कुत्र्यांची निवड करतांना मी खालील गोष्टींना प्राधान्य देतो.
१. कारण
अ) सोबत ----> आमच्या सासू बाईंना अजिबात ऐकायला येत नाही.त्यामुळे आमच्या अपरोक्ष, त्यांची काळजी घ्यायला कुणी तरी त्यांच्या बरोबर असावे.
ब) संरक्षण ----> बाहेरची कुणी व्यक्ती घरांत आली तर, ती सतत आपल्या जवळ असली पाहिजे.आपल्या इशार्या नुसार त्यांनी भुंकायला पाहिजे.
२. घराचे आकारमान ---->
माझा अनुभव, सुरुवातीला आम्ही हा निकष धान्यात घेतला न्हवता.सुदैवाने आमच्या लॅब्रेडॉर जातीच्या कुत्रीने, आमच्या घराचे आकारमान कमी असले तरी, त्रास दिला नाही.पण प्रत्येक लॅब्रेडॉर तसे नसते.किंबहूना, लॅब्रेडीर, ग्रेट-डेन, डॉबरमन, गोल्डन रीट्रीव्हर, अल्सेशियन जातीच्या कुत्र्यांना किमान गॅलरी असलेले घर उत्तम.
पग, बीगल, पामेरियन, ह्या अशा दीड-फुटी कुत्र्यांना कमी जागा असली तरी चालते.
३. आज्ञाधारक पणा ---->
प्रशिक्षित कुत्री, मालकाने आज्ञा दिल्याशिवाय, शक्यतो घरात भुंकत नाहीत.तरी पण रॉटवायलर सारखी नाठाळ(?) कुत्री फ्लॅट धारकांनी पाळू नयेत, असे मला वाटते.
बंगला असेल तर रॉटवायलर सगळ्यात उत्तम, असे माझे मत.
------------------------------------------------------
श्र्वानांची काळजी =====>
१. खाणे-पिणे =====>
प्रत्येक श्र्वान हे आपापल्या कुवतीनुसारच खाते.लॅब्रेडॉर, ग्रेट-डेन, रॉटवायलर एका वैठकीत २-४ भाकर्या सहज रिचवतात आणि आपण काही खाल्लेच नाही अशा अविर्भावात बसतात.
आहार नियमित, वेळच्यावेळी आणि संतुलीत असावा.शक्यतो, कुत्र्यांना भरवायला जावू नये.त्यांची खाण्या-पिण्याची भांडी पण वेळोवेळी बदलावी.कुत्री बर्याचदा एककल्ली असल्याने, ठरावीक व्यक्ती आणि ठरावीक भांडे, ह्याची सवय, त्यांना लगेच लागू शकते.
पुढे-मागे काही कारणांंमुळे, त्या व्यक्तीला कुत्र्याला अन्न द्यायला न जमल्यास किंवा ते भांडे नसल्यास, कुत्रे इतरांनी दिलेल्या किंवा दुसर्या भांड्यातील अन्नाला तोंड लावत नाहीत.(ह्या दोन्ही गोष्टी बघीतलेल्या आहेत.)
पे-डीग्रीचे खाद्य सुरुवातीला, ३-४ महिन्यांपर्यंत जरूर द्या.पण पुढे मात्र हळूहळू घरच्या जेवणाची सवय त्यांना लावा.
भात-पोळी-भाकरी-अंडी-मासे-मटन आणि कोंबडी आठवडाभर आलटून-पालटून द्या.शक्यतो मैद्याचे पदार्थ जास्त देवू नका.
त्यांच्या पाण्याच्या भांड्यात सतत पाणी असेल ह्याची काळजी घ्या.
२. जंतू संसर्ग ====>
श्र्वानांना जंतू संसर्ग फार लवकर होतो.विशेषतः छोट्या श्र्वानांना.त्यामुळे, वेळच्या वेळी कोमट पाण्याने आणि साबण लावून श्र्वानांना आंघोळ घालणे.
आपण आजारी असलो तर, श्र्वानांच्या जवळ फार वेळ जावू नका.
३. कातडीचे रोग ====>
तापमान आणि इतर आजारी कुत्र्यांच्या सहवासामुळे (मग भले तो थोडा वेळासाठी तरी का असेना) आपल्या श्र्वानाला पण हे रोग होवू शकतात.
कुत्र्यांच्या कातडीरोगावर मलमे उपलब्ध असली तरी, ती मलमे कुत्र्यांच्या अंगावर जास्त वेळ टिकत नाहीत.कुत्रे लगेच ती मलमे चाटायला लागतात.
त्यामुळे शक्यतो, आम्ही ही मलमे, कुत्रे झोपल्यावर लावतो.कधी यश मिळते तर कधी मिळत नाही.
४. श्र्वानांना फिरायला नेणे ====>
सुरुवातीचे २-३ महिने किंवा श्र्वानांचे लसीकरण पुर्ण होईपर्यंत, श्र्वानांना फिरायला नेवू नये.
कारण, एकतर त्यांना अद्याप आपल्या सुचना समजत नसतात, त्यांना रहदारीचा अंदाज येत नसतो आणि रस्त्यावरच्या घाणीला ते कधी तोंड लावतील, ह्याची खात्री नसते.
२-३ महिने झाले की, मग प्रत्येक श्र्वानाला. मग तो छोटा असो वा मोठा, त्यांना रोजच्या रोज फिरायला न्यावेच लागते.इथे कुठल्याही प्रकारे अळं-टाळं करून चालत नाही.लॅब्रेडॉर सारख्या मोठ्या श्र्वानांना किमान २-३ किमी आणि ते पण दिवसातून २ वेळा अत्यंत आवश्यक आहे.
छोटा श्र्वान असेल तर त्याला पण त्याला झेपेल इतपत फिरवायला हवेच.
किंबहूना श्र्वानांना जितका व्यायाम द्याल तितके त्यांचे आरोग्य उत्तम राहील.
५. श्र्वानांना शिकवणे ====>
खरेतर श्र्वानांना शिकवणे फार सोपे.संयम आणि अंदाज ह्या गोष्टी असतील तर फारच सोपे.
ते लहान असतानांच त्यांना शिकवायला घ्या.
सुरुवात, त्यांना शांत बसवण्या पासून करा.
इथे थोडी-फार चापटी मारलीत तरी चालते.कारण तसेही जास्तीत-जास्त २ चापट्यांनीच काम होते.
एकदा त्यांना बसायची सवय झाली, की मग आपण "खा" म्हटल्याशिवाय, त्यांनी खायला नको, ही सवय लावणे, सोपे जाते.
कुत्र्यांना घेवून फिरायला जातांना, ह्या दोन्ही सुचनांचे पालन त्यांनी केलेच पाहिजे.
तिसरी सवय म्हणजे, बेल वाजवल्या वर भुंकणे किंवा दरवाजा जवळ येणे.
चौथी आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे, श्र्वानांना त्यांच्या शी-शूची जागा ठरवून देणे.
सुरुवातीला, त्यांना द्रव पदार्थच जास्त प्रमाणात द्यायला लागतात.साहजीकच त्यांचे "शू"चे प्रमाण आणि वारंवारता जास्त असते.३-४ महिन्यांनी घन आहार चालू झाला की, शूची वारंवारता फार कमी होते.
साधारणपणे खायला दिल्यानंतर, एक १०-१५ मिनिटातच त्यांना "शू" होते.अशावेळी त्यांचे खाणे आम्ही बाथरूम मध्येच देतो.एकदा त्यांनी सलग ३-४ खाणी आणि लगेचची "शू" बाथरूम मध्ये केली की, मग ती देवाघरी जाई पर्यंत पुढील प्रत्येक "शू" ती बाथरूम मध्येच करतात.
"शू" प्रमाणेच त्यांच्या "शी"च्या वेळा आणि जागा पण ठराविक असतात."शी" करण्यापुर्वी प्रत्येक कुत्री स्वतः भोवती रिंगण घालतात.त्यांनी असा पिंगा घालायला सुरुवात केली, की सरळ त्यांना बाथरूम मध्ये नेतो.४-५ दिवसांत सवय लागते.
शेकहँड द्यायला किंवा सलाम करायला शिकवण्यापेक्षा, ह्या ४ मुलभूत सवयी, श्र्वानांनी आत्मसात केल्या की श्र्वानाचे आणि श्र्वान मालकाचे सुखी-समाधानी-आनंदी जीवन सुरु होते.
आता आपण श्र्वानांच्या जातींच्या आणि त्या-त्या जातीतल्या श्र्वानांच्या गुणावगुणांच्या माहितीची देवाण-घेवाण करू या.
६. बाळंतपण ---->
त्र्यांचे बाळंतपण हा एक आनंदाचा सोहळा असतो आणि त्याच प्रमाणे जबाबदारीचा.
आपल्या कुत्रीला दिवस गेले की, एखाद्या बाळंतिणी सारखी तिची काळजी घ्यायला लागते.तिला सकस आणि चौरस आहार, किती वेळा आणि कुठला द्यावा हे पशुवैद्यका कडून जाणून घ्या.
दुर्दैवाने, आमच्या पहिल्या कुत्रीची पिल्ले काही कारणांमुळे गर्भाशयातच वारली.
आम्हा उभयतांचे अज्ञान, चुकीची औषध-योजना, घरापासून दूर असलेले पशुवैद्यक आणि लॅब्रेडॉरचे आकारमान, ही त्यामागची कारण-मीमांसा.
पिल्ले आतल्या आत गेल्यामुळे, तिचे गर्भाशय काढायला लागले.त्याची परिणिती कुत्रीचे वजन वाढण्यात झाली.
त्यामुळे तुमची कुत्री जर गर्भवती झाली तर, अनुभवी पशुवैद्यकाला पर्याय नाही.
कुत्र्यांच्या बाळंतपणाबाबत जास्त अनुभव नसल्याने, मी इथेच थांबतो.
==================================================
श्र्वान क्रमांक १ ======> लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर
होतील बहू, असतील बहू, पण माझ्या दृष्टीने सर्वोत्तम कौटुंबिक श्र्वान म्हणजे लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर.
मी बघीतलेले ९९% लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर, अतिशय प्रेमळ, बर्यापैकी समजूतदार आणि सहनशील होते आणि आहेत.
ह्यांचे दुर्गूण म्हणजे, प्रचंड खादाडपणा, अवाढव्य शरीर, वजन आणि केसगळती.
शरीराने बर्यापैकी अवाढव्य असल्याने डॉक्टर जवळ नसेल आणि स्वतःची गाडी नसेल तर फार कमी रिक्षावले, ह्यांना न्यायला तयार होतात.
आधी ह्यांना जेवायला घालून मग जेवायला बसतात तर थोडी शांत असतात, पण जर तुम्ही आधी खायला बसलात तर तुमच्या ताटात तोंड घालायचा नक्कीच प्रयत्न करतील.
तशी ही जात बर्यापैकी आळशी.लहानपणी जी काय मस्ती करतील तीच.पण साधारणपणे १-२ वर्षांची झाली की, आपण बरे आणि आपले घर बरे, ह्याच भुमिकेत शिरतात.ह्यांना शिकवायला जास्त त्रास पडत नाही.बाहेर फिरायला काढले की आमच्या लॅबूला तर नंतर-नंतर पट्टा पण लावत न्हवतो.
आता इथेच थांबतो.पुढे भेटू या प्रतिसादात.
पुढच्या भागात आपण बीगल विषयी माहिती घेवू या.
प्रतिक्रिया
9 Feb 2016 - 7:58 pm | अप्पा जोगळेकर
दादा,
(जोगळेकर वाचताय ना?) हे काय आहे ?
शिवाय त्या दुसर्या ताई म्हणतात 'तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कडेच ठेवा' . हे काय आहे ?
असो. रजा घेतो.
10 Feb 2016 - 12:09 am | भंकस बाबा
आल्प्स पर्वतरांगात वाट चुकलेल्या गीर्यारोहकाना वाचवन्यासाठी 'सेंट बर्नाड'ही जात वापरली जाते. त्याला जेंटल जायंट देखिल म्हणतात. हां कुत्रा दिसायला आड़दांड असला तरी स्वभावाने अत्यंत मवाळ असतो. बर्फात फसलेल्या गीर्यारोहकाना हां मदत येइपर्यन्त हां साथ देतो. जिथे पुण्यात आठ डिग्री वर तापमान गेले की गारठायला होते तिथे हां उणे तापमानात अपघातग्रस्तांच्या आजुबाजूला बसतो.
27 Feb 2016 - 4:10 pm | कैलासवासी सोन्याबापु
हा म्हणजे तोच भक्कम कुत्रा का ज्याच्या गळ्यात एक छोटे रम किंवा ब्रांडी चे पिंप अड़कवलेले असते , त्याला एक तोटी वगैरे जमानिमा असतो, अडकलेल्या गिर्यारोहक लोकांना बर्फात हा कुत्रा हुड़कुन काढतो मग त्यांनी ती तोटी सुरु करून २ घोट ब्रांडी/रम पिऊन शरीर गरम केले की त्यांना वाट दाखवत खाली आणतो म्हणे हा कुत्रा (किंवा आणत असे)
9 Feb 2016 - 9:30 pm | गॅरी ट्रुमन
मार्च-एप्रिल १९९३ मध्ये मुंबईत राहिलेल्या प्रत्येक मुंबईकराने खरे तर जंजीरविषयी प्रचंड कृतज्ञ राहिले पाहिजे. १२ मार्चच्या स्फोटात ३०० किलो आर.डी.एक्स वापरले गेले होते आणि त्यात २५७ लोक मारले गेले आणि ९०० जखमी झाले.त्यानंतर १५-२० दिवसात जंजीरने मुंब्रा आणि नागला बंदर येथून त्याच्या जवळपास दहापट आर.डी.एक्स शोधून काढण्यात मदत केली होती.किती हजारांचे प्राण वाचविण्यात त्याचा सहभाग होता कुणास ठाऊक.जंजीर हा माणूस असता तर एक काय तर दहा भारतरत्नेही त्याच्यावर ओवाळली तरी कमीच पडली असती.
त्या tumultous दिवसांमध्ये मी ठाण्यात राहायला होतो आणि मुंबईकरांना एका प्रकारची अनामिक भिती त्या काळात वाटत होती (बॉम्बफोटांची अजून सवय झाली नव्हती मुंबईला) ती मी पण अगदी जवळून बघितली होती.नोव्हेंबर २००० मध्ये जंजीरचे निधन झाल्याची बातमी आल्यावर फार वाईट वाटले होते.त्याच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
कुत्र्यांचा तिरस्कार करणार्यांना नाही कळायचे हे सगळे!!
9 Feb 2016 - 9:56 pm | संदीप डांगे
__/\__ जंजीरला सलाम!
जंजीरचे काम खरेच हिमालयाएवढे होते.
9 Feb 2016 - 10:30 pm | टवाळ कार्टा
जंजीरला याची देहि ४ इंचावरून बघितले होते :)
दिल्लीला जाताना राजधानी एक्सप्रेस्स मधून घेउन गेलेले आणि आम्च्या डब्ब्याच्या शेजारच्याच डब्ब्यात होता तो
9 Feb 2016 - 7:33 pm | मीता
द मास्क मधील मायलो ..... म्हणजे jack रसेल टेरिअर
9 Feb 2016 - 8:10 pm | बिपिन कार्यकर्ते
ओ टिनटिन, तुमचा तो जगप्रसिद्ध कुत्रा कोणत्या जातीचा आहे ते सांगा ना! ;)
9 Feb 2016 - 8:25 pm | कैलासवासी सोन्याबापु
स्नोवी आहे तो, वायर्ड फॉक्स टेरियर
9 Feb 2016 - 7:04 pm | मोहनराव
लहानपणी एक गावठी कुत्रे पाळले होते. भाड्याच्या घराबाहेर मोठी जागा होती. तिथेच असायचा नेहमी.
काही वर्षाने गेला चटका लावुन .. :(
परत एक कुत्रा पाळायची ईच्छा आहे. बहुतेक उतारवयातच मिळेल वेळ असं दिसतंय!
9 Feb 2016 - 7:32 pm | मी-सौरभ
मी घरी प्राणि पाळायचा विचार करत नसलो तरी त्यांचा द्वेष सुद्धा करत नाही.
9 Feb 2016 - 8:23 pm | मोदक
"जोगळेकर वाचताय ना?"
असे लिहायचे राहिले का?
(काडी!!) :))
9 Feb 2016 - 7:42 pm | बिपिन कार्यकर्ते
च्यामारी भूभूंचा विषय चालू आहे आणि अजून कोणालाच 'मार्ली अँड मी' बद्दल लिहावंसं वाटलं नाही???? लाहौलविलाकुव्वत!!
https://en.wikipedia.org/wiki/Marley_%26_Me_%28film%29
मी घानाच्या विमानतळावर या चित्रपटाचा काही भाग पाहिला आणि वेडा झालो. नावही कळलं नव्हतं. मग नेटाने नेटावर शोधून काढून टोरेंटवरून डाउनलोड केला. प्रचंड रडलो शेवटाला. आवर्जून बघाच. कुत्र्याचे जे काही अनुभव येऊ शकतात ते सगळे यात आहेत. अत्यंत गोड भूभू! लॅबीच तो शेवटी!
27 Feb 2016 - 12:26 am | स्वाती दिनेश
मस्त.. आणि 'डॉबरमन्स गँग' ला विसरलात का मंडळी?
स्वाती
9 Feb 2016 - 8:34 pm | भंकस बाबा
हाय टॉम हैंक्स सोबत. टॉम एण्ड हुचेस , नक्की बघा , शिवाय हचिको, एट बिलो, हे पण जबरदस्त.
9 Feb 2016 - 8:44 pm | कैलासवासी सोन्याबापु
आम्ही पॉल वॉकर ला फ़ास्ट एंड फ्यूरियस पेक्षा ८ बिलो साठी जास्त लक्षात ठेवतो :)
9 Feb 2016 - 8:49 pm | मुक्त विहारि
तसाच, डॉबरमन गँग, पण बरा होता.
बॉलीवूड मध्ये असले सिनेमे बनत नाहीत. इथे कुत्र्यांना पण प्रेमपत्रे वगैरे पाठवायला लावतील.
आय.एस.जोहरने, फाइव्ह रायफल्स नावाच्या हिंदी सिनेमात माकडे आणि कुत्रा ह्यांना उत्तम भुमिका दिल्या होत्या.
9 Feb 2016 - 11:49 pm | भंकस बाबा
मी टॉम एण्ड हुचेस बघायला रात्रिचा बसलो होतो. हातात खिरीचा वाडगा घेऊन खीर ओरपत सिनेमा पहात होतो. त्यात कुत्रा आहे हे मला माहितच नव्हते व् टॉम हैंक्स काय चीज आहे ते पण! त्यात अचानक झालेल्या कुत्र्याच्या इंट्रीवर दचकुन माझ्या हातून खीर अंगावर सांडलि होती. काय भयानक एंट्री होती राव! असा आडदांड भीतिदायक कुत्रा असू शकतो हेच खरे वाटत नव्हते.
वर एक चूक झाली आहे तो कुत्रा फ्रेंच मश्चिफ आहे नेपोलियन नाही.
10 Feb 2016 - 9:53 am | मुक्त विहारि
एक नंबर...
लय येडा मानूस....
जबरदस्त अॅक्टिंग रेंज....
स्वगत : मुवि, धागा कुत्र्यांबाबत आहे.(हॉलीवूड पटांचा उल्लेख झाला तरी, आमचा कळफलक आपोआप टाइप करायला लागतो.)
10 Feb 2016 - 12:54 pm | अदि
आहे ना.. "हॅलो" म्हणून. गाणं पण छान आहे त्यातलं.. मेरा गाना है बहाना, हॅलो हॅलो क तराना.. "
10 Feb 2016 - 5:41 pm | भंकस बाबा
फ्रेंच मश्चिफला घेऊन सिनेमा होता तो, 'turner and hooch' असे नाव होते त्याचे,१९८९ चा सिनेमा आहे हा. वीस वर्षाचा काळ झाल्यामुळे माझी स्मरणशक्ति थोड़ी क्षीण झाली होती.
9 Feb 2016 - 8:56 pm | कैलासवासी सोन्याबापु
कॅट्स एंड डॉग्स
हा एक आमचा आवडता सिनेमा बोलकी कुत्री मस्त वाटतात ह्यात
10 Feb 2016 - 10:08 am | घाटावरचे भट
यंदाच्या २६ जानेवारीच्या परेडमध्ये डॉग स्क्वाडचासुद्धा सहभाग होता. काय मस्त तुरुतुरु चालत होती सगळी कुत्री. अगदी त्यांच्या ह्यांडलर्ससारखीच मार्चिंगच्या तालात.
10 Feb 2016 - 11:20 am | मदनबाण
आपल्याला लयं आवड हाय या प्राण्याची, पण घरच्या लोक्सनी कधी पाळु दिले नाय ! परंतु अश्या एका कुत्र्या बद्धल आठवणी हायेत ज्याच्या जाण्यामुळे साला आपल्याला लयं तर्रास्स्स झाला. कधी फुरसत मंदी वेळ भेटलाच तर लिहीन त्याच्या बद्धल.
बाकी रस्त्यावर मोकाट फिरणार्या आणि रात्रीच्या वेळी नरड्यातले सगळे बळ काढुन भुंकणार्या कुत्तरड्यां बद्धल आपल्याला लयं म्हणजे लयं राग हाय च्यामारी ! साला ४ कलाक शांत झोपायचे पण वांदे हाय या शहरामंदी ! सामान्य माणसाचे साला जगणे म्हणजे नरकच हाय आणि झोपणे म्हणजे यातना, आय टेल यू.
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
10 Feb 2016 - 12:30 pm | गॅरी ट्रुमन
मला अगदी असाच राग गणेशोत्सव, नवरात्र किंवा अमक्यातमक्याच्या जयंतीच्या दिवशी (मशीदीतली बांग ऐकायचा प्रसंग माझ्यावर फारसा आलेला नाही त्यामुळे त्याविषयी माहित नाही) लाऊडस्पीकरवर अहोरात्र कोकलणार्यांविषयी वाटतो.कुत्री बिचारी न समजून माणसांना त्रास देतात.पण माणसे मात्र समजून उमजून स्वतःच्या धार्मिक भावना जपणे या गोंडस आवरणाखाली इतर माणसांना त्रास देत असतात.
10 Feb 2016 - 4:13 pm | मुक्त विहारि
...या गोंडस आवरणाखाली इतर माणसांना त्रास देत असतात."
+१२३४५६७८९०
आवाज करणारी जनावरे, मग ती (मग ती भटकी असोत की पाळीव), कारणाशिवाय आरडा-ओरडा करत नाहीत.
10 Feb 2016 - 7:28 pm | मदनबाण
लाऊडस्पीकरवर अहोरात्र कोकलणार्यांविषयी वाटतो.कुत्री बिचारी न समजून माणसांना त्रास देतात.पण माणसे मात्र समजून उमजून स्वतःच्या धार्मिक भावना जपणे या गोंडस आवरणाखाली इतर माणसांना त्रास देत असतात.
सहमत आहे. दणादणा संगीत / भोंगा वाजवायला बंदी असायला हवी. आवाजाची मर्यादा असायला हवी. मध्यंतरी कुठल्या तरी ठिकाणी डॉब्लीच्या आवाजाने एक व्यक्ती मरण पावली होती असं काहीस वाचल्याचे स्मरत. :(
कुत्रे नुसते भुंकतही नाहीत, तर चावतात देखील... अधुन मधुन मिडिया मधे या बद्धल बातम्या देखील येत असतात परिस्थीतीत फरक पडत नाही. रात्रभर कुत्र्यांच्या आवाजाची कल्पनाच किती त्रासदायक आहे,तर अनुभव त्याहुन त्रासदायक !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
10 Feb 2016 - 8:06 pm | अभ्या..
भटक्या कुत्र्याच्या त्रासाबद्दल तर विचारायलाच नको. माझ्या आईच्या घरी जाताना रात्री १० च्या आत जावे लागते. जर्रा सुनसान झाले की कुत्र्यांचा जो उच्छाद चालू होतो तो रात्रभर असतो. कुठलाही टूव्हीलरवाला त्यांच्या तावडीतून निसटू शकत नाही. एखादी कार किंवा मोठी गाडी असेल तरच त्याची सुटका. (सध्या नेपाळहून निर्बीजीकरण करणारे पथक मागवलेय मनपाने. काय करणारेत कुणास ठऊक)
हे भटक्या कुत्र्याचे तर सोडून द्या. एक असाच मस्तीवाला शेजारी रोज रात्री त्याचे चिल्लर पमेरिअन घेऊन बसायचा. गाडी आली की पट्टा सोडायचा. ते बिचारे जीवाच्या आकांताने गाडीवर यायचे. गाडीवाला गांगरुन धडपडला की हे मालक महाशय खिदळायला मोकळे. दोन तीनदा बघितले. मालकाला सांगून पाह्यले. ऐकेना. एकदा स्कूटर होती माझ्याकडे. घातली बिनधास्त ताणा काढून. मॅटर फिनीश.
आधी हॉटेलात असताना भरपूर नाद केला श्वानवंशीयांचा. अगदी प्रोफेशनली. रॉट, पग, डेन, शेफर्ड. घेतले, वाढविले, विकले, डॉगशो केले. सध्या काहीही कौतुक राहिले नाही.
10 Feb 2016 - 9:20 pm | मुक्त विहारि
"एक असाच मस्तीवाला शेजारी रोज रात्री त्याचे चिल्लर पमेरिअन घेऊन बसायचा. गाडी आली की पट्टा सोडायचा. ते बिचारे जीवाच्या आकांताने गाडीवर यायचे. गाडीवाला गांगरुन धडपडला की हे मालक महाशय खिदळायला मोकळे."
ही अशी माणसे "मानसिक रोगी" ह्या कॅटॅगरीतच मोडायला हवीत.
ह्या अशा व्यक्तींमुळेच, श्र्वानांचे संगोपन करणार्या श्र्वानपालकांकडे आणि मुख्यतः श्र्वानांकडे बघायचा, बर्याच लोकांचा दृष्टीकोन वाईट होतो.
"भटक्या कुत्र्याच्या त्रासाबद्दल तर विचारायलाच नको. माझ्या आईच्या घरी जाताना रात्री १० च्या आत जावे लागते. जर्रा सुनसान झाले की कुत्र्यांचा जो उच्छाद चालू होतो तो रात्रभर असतो. कुठलाही टूव्हीलरवाला त्यांच्या तावडीतून निसटू शकत नाही."
भटक्या कुत्र्यांचा त्रास तर आम्हाला पण होतो.जावू दे.
10 Feb 2016 - 12:10 pm | सुचिकांत
यातून काही अजून मुद्दे मिळतात का ते पहा ..
10 Feb 2016 - 12:12 pm | सुचिकांत
https://www.facebook.com/photo.php?fbid=10153395246393992&set=a.10150362...
10 Feb 2016 - 3:48 pm | संदीप डांगे
तुमच्या पोस्ट मधे खूप चांगली माहिती आहे.
10 Feb 2016 - 6:38 pm | सुचिकांत
आभार संदीप सर.
10 Feb 2016 - 1:35 pm | मृत्युन्जय
एखादा प्राणी पाळणे, त्याला आपल्या आज्ञा पाळायला लावणे हे थोडे क्रुर नाही वाटत? म्हणायला लोक म्हणतात की आमच्या मुलासारखाच आहे. पण मग तुम्हीच त्याला पट्टा लावता ना? घाण करतो म्हणुन घराबाहेर काढता ना? तुम्हाला गावाला जायचे असेल तेव्हा त्याला सोडुन जाता ना? (कदाचित दुसरीकडे सोय लावुन). कुत्रा पाळुन त्याच्याकडुन गुलामी करुन घेता ना? वर काही व्हिडीयो दिसत आहेत. ते कुत्रे म्हणजे चक्क लाचारीचे उदाहरण आहे. गुलाम्गिरी. त्यांना स्वातंत्र्य उपभोगायचे स्वातंत्र्यच नाही.
मोठ्या बंगल्यांमध्ये कुत्रांसाठी ती छोटी खुराडी बघितली की दया येते त्या गरीब प्राण्याची . आम्हाला कुत्र्याचा फार लळा असे म्हणुन राग आल्यावर कुत्र्या च्या पेकाटात लाथ घालणारी माणसे बघितली की तिडीक जाते डोक्यात. तुमच्या मुलाच्या पोटात लाथ माराल का अशी?
त्यांचे नैसर्गिक खाद्य सोडुन तुम्ही त्याला दूध पोळी खायला लावता. बरोबर आहे का ते? कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालुन तुमच्या सोयीने तुम्ही त्याला फिरवुन आणणार, एरवी तो घरात बंद, बर्याच वेळा तर त्याच्या खुराड्यात.
कुत्रा पाळणारे लोक कु त्र्यांवर सर्वात जास्त अत्याचार करतात असे स्पष्ट मत आहे.
10 Feb 2016 - 2:47 pm | संदीप डांगे
मार्गीला घरी आणेपर्यंत हेच विचार होते माझे. कुत्रे, पक्षी व इतर प्राण्यांवर अत्याचार करणारे मालक पाहिलेत. मलातर ते पिंजर्यातले पक्षी, पट्ट्याला बांधलेले प्राणी पाहिले की मालकांशी भांडण होऊ देत पण सोडूनच देऊ असं भयंकर वाटत राहतं. शोबाजीसाठी प्राणी आणतात, अंगापेक्षा जास्त झालं की टाळंटाळ करतात. हौस म्हणून करणार्यांचा उत्साह मावळायला लागतो जेव्हा त्यांना कळतं की 'ही एक राउंड-द-क्लॉक जबाबदारी आहे, कुत्र्याला घेऊन मिरवणे वैगरे हा त्यातला अगदी छोट्टुसा भाग आहे'. तेव्हा प्राण्यांना गुलामासारखं वागवायला सुरुवात होते. अतिशय वाईट विचारसरणी आहे ही. मला कधीही पटली नाही.
म्हणून आम्ही प्राणी घरी आणण्याआधी खूप विचार केला. मार्गीसाठी रात्री-बेरात्री उठावं लागतं. तिला खेळावसं वाटलं तेव्हा हातातलं काम टाकून जावं लागतं. अनेक गोष्टी आहेत. अंत पाहणार्या असतात. पण आधीच्या दोन मुलांसाठी केलं, आता तिसर्यासाठी असं विचार केलाय म्हणून जाच होत नाही. सगळेच असे नसतात हेही आजूबाजुला बघतोय.
मला वाटतं, लोक जेन्युइन पालकांकडे (काय सही है, मस्त वाटतो ना!) बघून प्राणी आणतात. सत्य कळले की मग सोडूनही देता येत नाही, सांगताही येत नाही अशी अवस्था होते. बळंबळंच 'आम्ही प्राणीप्रेमी' चं उसनं अवसान आणतात. खरे प्राणी पाळू शकणारे दुर्मिळ असतात. तसंच कोणत्या माणसास कोणता प्राणी सोबती म्हणून फिट होईल हे बघुन घ्यायचं असतं, तेच बहुतेक वेळा होतं नाही. मग छोट्या फ्लॅटमधे लॅब, डॉबरमॅन, ग्रेट डेन सारखी कुत्री पाळायला जातात.
10 Feb 2016 - 2:53 pm | संदीप डांगे
त्यांचे नैसर्गिक खाद्य सोडुन तुम्ही त्याला दूध पोळी खायला लावता. बरोबर आहे का ते?
>> ह्या मुद्द्याबद्दल मलाही कुतुहल आहे. इतक्यात वाचल्याप्रमाणे अनेक शतके माणसासोबत राहुन कुत्र्याची पचनशक्तीने माणसाच्या खाद्यपदार्थासोबत विनासायास जुळवून घेतले आहे. कदाचित त्यामुळेच रस्त्यावरची कुत्री शिकार न करता उकिरडे हुंकत, शिळे अन्न धुंडाळत फिरत असावीत. पण याबद्दल अधिक माहिती मिळाल्यास उत्तम. घर शाकाहारी म्हणून कुत्र्याला शुद्ध शाकाहारी ठेवणारे शुद्ध मूर्ख वाटतात. (आय अॅम सॉरी इफ एनिवन हिअर फाइन्ड्स धिस ऑफेन्सिव)
कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालुन तुमच्या सोयीने तुम्ही त्याला फिरवुन आणणार, एरवी तो घरात बंद, बर्याच वेळा तर त्याच्या खुराड्यात.
हे तर आपल्याला आज्याबात पटत नाय. घरात बंद करुन ठेवणे, चोविस तास साखळीत, हा खरंच अत्याचार आहे.
10 Feb 2016 - 3:00 pm | सुनील
+१
आमचा टफी घरात अगदी मोकळा असतो. फक्त बाहेर जाताना त्याला पट्टा बांधावा लागतो - त्याच्यासाठी नव्हे तर, इतरांना त्याच्यापासून सुरक्षित वाटावे म्हणून!!!
10 Feb 2016 - 4:06 pm | मुक्त विहारि
त्याच्यासाठी नव्हे तर, इतरांना त्याच्यापासून सुरक्षित वाटावे म्हणून!!!
आणि
इतर भटकी कुत्री त्याला चावू नयेत म्हणून.
घरात कुत्र्यांना ९०% वेळ पुर्ण मोकळे सोडायलाच हवे.
कुत्र्याला घरात बांधलेला मालक, हा कुत्र्याला गुलाम म्हणूनच वापरतो.
श्र्वान पालक जर कुत्र्याला सवंगडी म्हणून घरात ठेवत असेल आणि कुत्र्याला नक्की काय हवे आहे, हे समजून घेत असेल तर, तो कधीच कुत्र्याला बांधून ठेवणार नाही.
10 Feb 2016 - 3:00 pm | गॅरी ट्रुमन
या सगळ्या प्रतिसादात कुत्र्याच्या ऐवजी "कॉर्पोरेटमध्ये काम करणारे कर्मचारी" आणि मालकाऐवजी "टॉप मॅनेजमेन्ट" किंवा "बॉस" हे शब्द घातले तरी तो प्रतिसाद फार चुकीचा ठरणार नाही ना?
ह.घ्या.हे.वे.सां.न.ला
10 Feb 2016 - 6:38 pm | मुक्त विहारि
एखादा प्राणी पाळणे, त्याला आपल्या आज्ञा पाळायला लावणे हे थोडे क्रुर नाही वाटत?
माझ्या मते तरी नाही.आमच्या सासूबाईंना अजिबात ऐकायला येत नाही.बेल वाजली तरी, त्या दार उघडू शकत नाहीत.
आमची २ही कुत्री बेल वाजली की त्यांना सावध करतात.
कुत्र्याला अनावश्यक कसरती करायला लावणे हे सर्कशी पुरतेच ठेवावे, असे माझे पण मत आहे.खरा श्र्वान प्रेमी असल्या धेडगुजरी आज्ञा कुत्र्यांना शिकवत देखील नाही.
========================
म्हणायला लोक म्हणतात की आमच्या मुलासारखाच आहे. पण मग तुम्हीच त्याला पट्टा लावता ना?
आमची आधीची कुत्री, पट्ट्याशिवायच रस्त्यावर फिरायची.पण लोकच तिचे शरीर बघून घाबरायची.एका रिक्षावाल्याने तर ती कडेकडेने फिरत असतांना देखील तिला मारायला सळी काढली. (डोंबोलीतील रिक्षावाले हे वेगळ्या ग्रहावरून आलेले आहेत.असा मला दाट संशय आहे.सौजन्यता तर त्यांना मानवजाती बद्दल पण नाही.)
त्या घटनेपासून, आम्ही तिला पट्टा लावायला लागलो.
=====================================
घाण करतो म्हणुन घराबाहेर काढता ना?
अजिबात नाही.आमची २ही कुत्री घरातच बाथरूम मध्ये शी-शू करतात.त्यांना तशीच सवय लावली आहे, कारण पावसाळ्यात त्यांना फिरायला जमेलच असे नाही.एकदा लागलेली सवय कुत्रीच कशाला माणसे (की ज्याचा मेंदू ह्या पृथ्वीतलावर सगळ्या सजीवात प्रगत समजला जातो) पण सहजासह्जी सोडत नाहीत.
तुम्हाला गावाला जायचे असेल तेव्हा त्याला सोडुन जाता ना? (कदाचित दुसरीकडे सोय लावुन).
दादा अशी सोय तर आपण आपल्या घरातील व्यक्तींबाबत पण करतो ना? मुलांना पाळण्याघरात ठेवणे, आई-वडीलांना वृद्धाश्रमात ठेवणे, अपंग व्यक्तीला सोबत बघून देणे इ.
================================
कुत्रा पाळुन त्याच्याकडुन गुलामी करुन घेता ना? वर काही व्हिडीयो दिसत आहेत. ते कुत्रे म्हणजे चक्क लाचारीचे उदाहरण आहे. गुलाम्गिरी. त्यांना स्वातंत्र्य उपभोगायचे स्वातंत्र्यच नाही.
हे १००% मान्य.ह्या जगातील बरेच प्राणी अद्याप स्वतंत्र आहेत.गेंडा, जिराफ, झेब्रा इ. प्राणी अद्याप तरी पाळीव नाही आहेत. पण जे प्राणी माणसाला उपयुक्त वाटतात त्यांना सवय लावून माणसाने पाळीव केलेच आहे.उदा. घोडा, गाय,बैल,गाढव,हत्ती आणि कुत्रा.
================================================
मोठ्या बंगल्यांमध्ये कुत्रांसाठी ती छोटी खुराडी बघितली की दया येते त्या गरीब प्राण्याची.
१००% मान्य.
कुत्रा घरात मोकळाच फिरायला हवा.त्याला आपले घर परके वाटता नये.आमची २ही कुत्री घरात मोकळीच असतात.पाहुणे आले की मात्र बांधून ठेवतो.
========================================
आम्हाला कुत्र्याचा फार लळा असे म्हणुन राग आल्यावर कुत्र्या च्या पेकाटात लाथ घालणारी माणसे बघितली की तिडीक जाते डोक्यात. तुमच्या मुलाच्या पोटात लाथ माराल का अशी?
खरा श्र्वान पालक आणि मुलांचा पालक देखील, ह्या गोष्टी करत नाही.
================================================
त्यांचे नैसर्गिक खाद्य सोडुन तुम्ही त्याला दूध पोळी खायला लावता. बरोबर आहे का ते?
माझी २ही कुत्री आम्ही जे काही खावू ते खात होती.त्यांना आमचेच जेवण हवे असायचे.अर्थात अधून मधून मुद्दाम त्यांच्यासाठी मांसाहार आणावा लागतोच.
मांसाहार पण उकडूनच देतो.
====================================
कुत्रा पाळणारे लोक कुत्र्यांवर सर्वात जास्त अत्याचार करतात असे स्पष्ट मत आहे.
वरील वाक्यात थोडा बदल करायलाच पाहिजे.
कुत्रा पाळणार्यांपैकी (काही) लोक कुत्र्यांवर सर्वात जास्त अत्याचार करतात असे माझेही स्पष्ट मत आहे.
================================================
प्रिय मृत्युंजय,
वरील प्रतिसादामुळे तुझ्या बर्याच शंकांचे निरसन झाले असावे.तरी पण तुला अजूनही कुत्र्यांविषयी किंवा कुत्र्यांच्या पालकांविषयी काही शंका असतील तर जरूर विचार.
मी यथा शक्ती त्या शंकांचे निरसन करायचा जरूर प्रयत्न करीन.
10 Feb 2016 - 2:23 pm | ज्योत्स्ना
हा आमचा गोल्डन रिट्रिवर "मोगली". १३ महिन्याचा हा कुत्रा अतिशय गोड व प्रेमळ आहे.
10 Feb 2016 - 3:14 pm | उगा काहितरीच
वा काय राजबिंडा दिसतोय !
10 Feb 2016 - 3:17 pm | सतिश पाटील
फोटो आणि मोगली दोन्ही सुंदर.
त्याला एक काळा टीका लावा हो.
10 Feb 2016 - 2:24 pm | ज्योत्स्ना
इमेज फार मोठी आलि आहे. मला सेटिंग जमले नाही.
10 Feb 2016 - 2:36 pm | ज्योत्स्ना
गोल्डन रिट्रीवर कुत्रा आम्ही पाळला तेंव्हा माझी अजिबात कुत्र्याबरोबर राहण्याची मानसिक तयारी नव्हती. पण आमचा मोगली आता माझा प्रिय मित्र आहे. अतिशय ट्रेनेबल व हुशार आहे. भुंकणे अजिबातच नाही आणि सर्वांशी मैत्री प्रिय आहे.
10 Feb 2016 - 5:09 pm | यशोधरा
फारच देखणा!
10 Feb 2016 - 5:35 pm | मुक्त विहारि
अतिशय उत्तम जात.
विशेषतः पहिल्यांदाच कुत्र्यांचे संगोपन करत असाल तर..
दोन्ही जाती मस्त देखण्या.
बादवे,
मोगली एकदम चिकणा दिसतोय.
10 Feb 2016 - 6:01 pm | मीता
मोगली एकदम गोड दिसतोय
10 Feb 2016 - 2:57 pm | सिरुसेरि
इमानदार कुत्रे बघितले की "चल रं वाघ्या रडू नको , पाया कुणाच्या पडू नको" हे गाणे नेहमी आठवते .
10 Feb 2016 - 3:13 pm | सतिश पाटील
मला पण कुत्रा मांजर पाळायची भारी हौस
आईने मांजर पाळायला परवानगी दिली. परंतु कुत्रा पाळायला नाही.शेवटी सोसायटीतले सगळे कुत्र हे आपलेच आहेत असे समजून त्यांच्यावारच जीव लावला. (आमच्या एरियात असा एकही कुत्रा नाही जो मला ओळखत नाही.)
प्रसंगी आख्या सोसायटीशी पंगा घेऊन राडा केला.एके दिवशी चोर घुसले आणि वाच्मान झोपला होता, त्याच कुत्र्यांनी भुंकून सगळ्यांना जागे केले, नंतर जेव्हा पोलीस आले म्हणाले, कुत्र चांगल आहे तुमच, ते वाच्मान एवढा पगार घेत नाही आणि इमानदार पण आहे.
२ वेळा कोकस पानेल आणि बॉक्सर पाळायचा अयशस्वी प्रयत्न केला.दोन्ही वेळेला घरातून कुत्रासकट बाहेर हाकलून दिले.तेही बोर्डाच्या परीक्षा सुरु असताना.
मी घरी आलो के आई वडील वरच गुरगुर करून भूकायचा.
ते सांगायचे कि तू नसताना हे मला हाड्तुड करतात.मला त्रास देतात ,किती हुशार असतात साले हे.
सध्या लग्न झाल्यापासून बाजूलाच पण स्वतंत्र घरात राहत असल्याने कुत्रा पाळायची इच्छा पुन्हा जोर धरू लागली आहे.पण आता तो आल्यावर पुन्हा त्याचे आधीसारखे हाल नको म्हणून बायकोच्या मनावर " मी कुत्रा पालनारच" असे बिंबवायला सुरुवात केली आहे. आईने पुन्हा खबरदार सांगितले आहे. आधी बायको देखील मला कुत्र्यासकट घरातून बाहेर काढण्याच्या गोष्टी करत होती. आता ती जरा शांत झाली आहे. तिच्या मनाची देखील कुत्रा पाळण्याची पुरती तयारी झाली कि लगेच आला समजा घरात जोतीप्रसाद. भू भू भू.
आणि कुत्रा हे काही खेळणे न्हावे, त्याच्यावर खेळ करून दाखव हे करून दाखव ते करून दाखव अशी बळजबरी करू नये. बाहेर जाताना त्याला याच्या घरी ठेव त्याच्या घरी ठेव असे करू नये, घरातली माणसे आपण सोबत नेतोय न मग यालाही घेऊन जावे.
त्याला वाटेल तेव्हा त्याने भून्कावे जोर जोरात भून्कावे , प्रसंगी संशयिताला कडकडून चावावे, ४ लोकांनी त्याला घाबरावे असे माझे वयक्तिक मत आहे..
अवांतर - इन डिफेन्स ऑफ अनिमल्स नावाची एक संस्था मुंबई आणि नवी मुंबईत काम करते, जखमी ,हरवलेले, फ्याशन किंवा स्टेटस म्हणून पाळलेले आणि नंतर रस्त्यावर सोडून दिलेले, अनाथ प्राणी सांभाळण्याचे आणि उपचार करण्याचे काम हि संस्था मोफत करते.असे प्राणी हे लोक दत्तक देतात.
10 Feb 2016 - 5:12 pm | यशोधरा
रेस्क्यू म्हणून एक संस्था पुण्यातही असेच काम करते. त्यांच्याकडून दत्तकही घेऊ शकता भूभू आणि म्यांव.
10 Feb 2016 - 3:20 pm | ज्योत्स्ना
कुत्रा काय किंवा दुसरा कोणताही प्राणी/पक्षी पाळण्याचा असु द्या, खरी अडचण माणसाच्या स्वभावाचीच असते. मारहाण, शिक्षा, कोंडणे हे असेच आहे.बरेच पालक पोट्च्या मुलांबाबतही ममत्वहिन वागतात. म्हणुन सगळ्याच लोकांना दोष देणे बरोबर नाही.प्राण्यांच्या बाबतीत दुष्ट वर्तन करणारे लोक बेजबाबदार असतात.म्हणुन सगळेच प्राणी पाळ्णारे त्यांच्यावर अत्याचार करतात हे मानणे चूक आहे.अगदी खरेच पोट्च्या मुलांप्रमाणे प्राण्यांचा सांभाळ करणारेही आपण पाहतच असतो.आणि दुष्ट वागणारेही पहातच असतो.
मुवींनी लिहिल्याप्रमाणे आधी पूर्ण विचार करुनच कोणताही प्राणी सांभाळला पाहिजे. आरंभशूरपणा हा त्या प्राण्याच्या जीवाशी खेळ असतो. पण येवढा विचार न करताच प्राणी घरी आणून नंतर बेजबाब्दार वागणारे बरेच लोक असतात.
10 Feb 2016 - 6:06 pm | सुधांशुनूलकर
हा पहिला भाग मुद्देसूद.
दुसरा भाग तुमच्या बीगलूबद्दल ना?
तुमच्या घरी तिच्याशी भेट झाली आहेच. आता तिच्याबद्दल वाचायला उत्सुक.
तसा मी प्राणिप्रेमी असल्यामुळे प्राण्यांबद्दल, त्यांच्या वागणुकीबद्दल रस आणि कुतूहल आहेच. मित्राच्या कुत्र्याबद्दलचे अनुभव इथॉलॉजीवरच्या लेखात मांडले आहेतच. तुमचे अनुभव आणि चिंतन वाचायला नक्कीच मजा येईल.
आणखी एक : या लेखावरचे प्रतिसादही खूपच मस्त आहेत.
10 Feb 2016 - 8:19 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
11 Feb 2016 - 8:52 am | सुनील
(आमचा टफी)
11 Feb 2016 - 9:43 am | मुक्त विहारि
भलताच प्रेमळ दिसतोय.
11 Feb 2016 - 11:01 am | सुनील
धन्यवाद!
लेख आणि प्रतिसादातून फारशा न चर्चिल्या गेलेल्या काही बाबी -
नोंदणीकरण आणि लसीकरणाविषयी मी वरील एका प्रतिसादात लिहिले आहेच. आता कुत्र्यांना होणार्या काही विकारांविषयी -
कुत्र्यांना - विशेषतः गोल्डन रिट्रिवरसारख्या केसाळ प्रजातींना - होणारा सर्वाधिक विकार असतो तो त्यांच्या अंगावर येणार्या गोचिडसदृश Ticks चा. यासाठी त्याला वेळचे वेळी शांपूने स्नान करवणे आणि दिवसातून किमान २-३ दा तरी केस व्यवस्थित विंचरणे महत्त्वाचे असते. विंचरण्याचे फायदे असे की, Ticks असतील तर त्या समजतात आणि काढता येतात. तसेच त्यावर वेळीच उपाययोजनादेखिल करता येते. खेरीज, त्याला जर काही त्वचारोग अथवा जखमा झाल्या असतील तर त्याही वेळेस समजतात. विंचरल्यानंतर तो अधिक रुबाबदार दिसतो, हा आनुषंगिक फायदा आहेच!!
तसेच कुत्र्याचे दातदेखिल वरचेवर घासत राहणे गरचेचे असते. त्याच्यासाठीच्या वेगळ्या टूथपेस्ट मिळतात. ब्रशही मिळतात पण आम्हाला तरी हाताने दात घासणे अधिक सोपे वाटते. माणसाप्रमाणेच, कुत्र्यांचेदेखिल दातांचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे.
11 Feb 2016 - 11:06 am | अजया
दात घासु देतात का कुत्रे? चावत नाही? किती दिवसांनी घासता?
11 Feb 2016 - 11:12 am | अन्नू
दात घासु देतात का कुत्रे? लहान मुलासारखी टूथपेस्ट चघळतात, पहिल्यादा जबरदस्तीने त्यांचे दात घासावे लागतात.
चावत नाही? नाही चावत.
किती दिवसांनी घासता? आंम्ही तर रोज त्यांचे दात घासायचो.
11 Feb 2016 - 11:14 am | सुनील
त्यांच्यासाठी असणार्या पेस्टीत काय असते ते ठाऊक नाही पण त्यांनी ती आवडते आणि ते तोंड उघडतात!
ब्रशऐवजी हात अशासाठी की ब्रश घातला की ते तोंड बंद करतात आणि मग घासायला त्रास होतो. 'आपला माणूस' असेल तर ते तोड बंद करीत नाहीत (चावा घेत नाहीत) आणि मग व्यवस्थित घासता येते. आम्ही अठवड्यातूम एकदा (आंघोळीच्या वेळेस) दात घासतो.
11 Feb 2016 - 5:15 pm | उगा काहितरीच
हे माहीतच नव्हतं ! रच्याकने चुळा भरतात का नाही ? बापरे भलती काळजी घ्यावी लागते तर.
11 Feb 2016 - 11:28 am | अजया
ही माहिती कोणीच सांगितली नव्हती.धन्यवाद.
11 Feb 2016 - 11:33 am | कैलासवासी सोन्याबापु
मी तर आमच्या फट्या ला पप्पी द्यायला शिकवले होते!! त्याच्यासमोर मुंडके वाकवून "फट्या पप्पी दे रेsss" म्हणले की हलकेच आपला डावा किंवा उजवा कान कुरतडल्या सारखा चावत असे हलकेच!! थोड़े खाली वाकुन जमीनीवर थापटी मारली का धावत येऊन अंगावरुन पलीकडे उडी मारे ग़ुलाम!
11 Feb 2016 - 2:56 pm | प्रकाश घाटपांडे
मी जेनी असे अं अ कुलकर्णी यांचे कॉन्टिनेंटल प्रकाशनाचे पुस्तक आहे. त्यात ती जेनी भुभु लेखिका आहे व शब्दांकन फक्त कुलकर्णींनी केल आहे.
मागच्या आठवड्यात इशान्य भारतात फिरायला गेलो होतो.तिथे अनेक भुभु लोक भेटले.सगळ्यांना 'मराठी' समजत होत. आमच्या मते भुभु लोकांना सर्व भाषा येतात. कारण त्यांना मुख्य प्रेमाची भाषा समजते. भुभुच्या पिल्लांचे निरागस तिरळेपण फार मजेशीर असते.
माझ्या काल्पनिक आत्मचरित्राचे नाव आहे भुभारडे दिवस!
11 Feb 2016 - 7:25 pm | मुक्त विहारि
आज संध्याकाळी आमच्या डोंबोलीतल्या, मॉडर्न पाईडच्या मालकीचा, लॅब्रेडॉर फाटक सोडून पळाला.सुदैवाने त्यावेळी मी तिथेच होतो.त्या कुत्र्याच्या गळ्यात ना पट्टा ना गळ्याचा बेल्ट.ते नौकर बिचारे हातात हात घालून गप्प उभे.ते त्याला बोलवायचा प्रयत्न करत होते पण तो पठ्ठा काही फाटकाच्या आत यायला तयार न्हवता.
एक रिक्षावाला पण हळूच त्या कुत्र्याला स्प्रर्श करून गेला.
मी आधी त्या लॅबूच्या जवळ गेलो.२-३ मिनिटे त्याच्या जवळ जावून, त्याच्या गळ्यापाशी आणि मानेवर खाजवायला लागलो.एकीकडे त्या कुत्र्याशी सरळ मराठीतून बोलायला लागलो. (कुत्र्याला फक्त एकच भाषा समजते आणि ती म्हण्जे "प्रेमाची.")
माझ्या अंगावरील "बीगलूचा" वास त्याला यायला लागला आणि तो हळूहळू कंफर्ट झोन मध्ये गेला आणि माझे हात चाटायला लागला.लॅबूने मला स्वीकारल्यानंतर तिथला स्टाफ पण जरा फ्री झाला.त्या हॉटेलवाल्याकडून त्याची आवडती गोष्ट मागीतली.सुदैवाने त्याच्याकडे डॉग-स्टीक होती.
मग त्या डॉग-स्टीकचे आमीष दाखवून त्या लॅबूला फाटकाच्या आत सोडले.
स्वगत : नीट लक्ष देता येत नसेल तर, कुत्रा पालनाचे पाप करू नका.भेंडी ते काही तुमच्याकडे येत नाहीत.तुम्हीच त्यांना आपल्याकडे आणता आणि मग सांभाळता येत नाही म्हणून नौकरांच्या भरवशावर सोडता.असले मालक, आमच्यासारख्या इमानदारीत श्र्वानांची काळजी घेणार्यांचे, नाव मात्र नाहक बदनाम करतात.
11 Feb 2016 - 7:31 pm | अजया
कुत्र्याचे लसीकरण आणि डिवर्मिंग याबद्दलचे अनुभव आणि माहिती पण वाचायला आवडेल.
11 Feb 2016 - 7:52 pm | संदीप डांगे
हो, हे हवंच होतं. कुणीतरी मदत करा बॉ... :-)
11 Feb 2016 - 8:23 pm | सुनील
डिवर्मिंगबद्दल अधिक माहिती नजिकचा पशुवैद्यक अधिक सांगू शकेल. परंतु, किमान सहा महिन्यातून एकदा तरी डिवर्मिंग करून घ्यावे.
डिवर्मिंगच्या गोळ्या कुत्र्याच्या घशात घालणे हा एक अनुभवच असतो!!
गोळ्यांच्या स्ट्रीपमधून गोळी काढली रे काढली की आमचा टफी सोफ्याच्या मागे, खुर्चीच्या खाली किंवा आणखी कुठेतरी तोंड लपवून बसतो! मग त्याला पकडायचे आणि जबड्याचा वरचा भाग उचलून गोळी घशात आत ढकलायची आणि तोंडाचे दोन्ही जबडे घट्ट बंद करून ठेवायचे. त्याने जीभ बाहेर काढली म्हणजे गोळी पोटात गेली! आणि मग मात्र त्याला त्याचे आवडणारे ट्रीट द्यायचे!!
लसीकरण वर्षातून एकदा करावेच लागते. अन्यथा नोंदणीचे नूतनीकरण होत नाही. एकूण ४ लसी (इंजेक्शन्स) दिल्या जातात (अँटी रेबीज, हिपॅटिटिस आणि अन्य २). त्यानंतर १-२ दिवस कुत्रा थोडा मलूल असतो पण काळजी करायचे कारण नसते.
11 Feb 2016 - 9:43 pm | मुक्त विहारि
एकदम साधे उपाय...
१. आधीच्या कुत्रीला "खजूर" खूप आवडायचा.खजूराची "बी" काढून, त्या जागी "गोळी" ठेवायची.ती लगेच हा
गोळी +खजूर खावून टाकायची.
खजूराच्या ऐवजी कधी-कधी पेढा किंवा गूळ पण वापरला होता.
२. आमच्या सध्याच्या कुत्रीला, खजूर जास्त आवडत नाही.तिला ५रु.च्या फाइव्ह-स्टार मधे गोळी घालून देतो.
कुत्री तितक्या प्रवृत्ती, हेच खरे.
12 Feb 2016 - 12:52 am | यशोधरा
कुत्र्यांना गोड, चॉकलेट्स देऊ नयेत ना?
12 Feb 2016 - 9:15 am | मुक्त विहारि
आणि तसेच मसालेदार, तिखट पदार्थ देखील जास्त प्रमाणात देवू नयेत.
मासे देणार असाल तर, उकडून (थोडे मीठ+थोडॅ हिंग+थोडी हळद घालून.) आणि त्यातील काटे काढून.काटे घशात अडकायचा संभव असतो.
चिकन आणि मटन पण ह्याच पद्धतीने द्यावे.मटणातील आणि चिकन मधील लिव्हर कुत्र्यांना एकदम बेस्ट.
केक, खीर, बासुंदी इत्यादी साख्रयुक्त गोड पदार्थ जास्त प्रमाणात देवू नयेत.साधारण १५-२० दिवसातून एकदम थोड्या प्रमाणात दिले तरी हरकत नसते.(१५-२० ग्रॅम मुळे खूप काही फरक पडत नाही.)
चॉकलेट मात्र जंताची गोळी आणि घन औषधे देणार असाल तरच द्या.रोजचा डोस असेल तर, सकाळचा डोस चॉकलेट बरोबर, दुपारचा डोस खजूराबरोबर अणि रात्रीचा डोस मधात कालवून दिलात तरी खूप काही बिघडत नाही.
खजूर, आंबा, पपई, संत्री, मोसंबी, चिकू, केळी इत्यादी फळे आठवड्यातून एकदा दिलीत तरी चालून जाते.
बीट, बटाटे, गाजर, सुरण इत्यादी पदार्थ पण उकडून आणि मीठ न घालता, थोड्या प्रमाणात दिले तरी चालते.
अंडी शक्यतो उकडून आणि आतला बलक काढून आठवड्यातून ३ वेळा दिलात तरी चालते.
मध १५-२० दिवसातून एखाद-दुसरा चमचा दिलात तर उत्तम. (कुत्र्याला मधाची चव आवडली तर, द्रव औषधे मधातून द्यायला जड जात नाही.वैयक्तिक अनुभव)
थोडक्यात काय तर कुत्र्याला उकडलेल्या भाज्या, अंडी, मटन्,मासे किंचित मीठ्,हळद आणि हिंग घालून दिलेत तरी चालते.
प्रंमाणामध्ये सर्व काही असावे.
12 Feb 2016 - 11:50 pm | भंकस बाबा
माझ्याकडिल पामेरियन पुष्कळ हट्टी होती. तिला आम्ही द्रव रूपातले औषध द्यायचो, अजिबात प्यायची नाही. मग आम्ही तिला ते इंजेक्षनच्या सहाय्याने द्यायचो. पुष्कळ अकांडताण्डव करायची पण एकदा पकडून तोंडात इंजेक्षन खूपसुन औषध दिले की मग गप घ्यायची. दूसरी रोट्विलेर इतकी समंजस होती की मी विष जरी समोर ठेवले असते तर आनंदाने घेतले असते. मी फ़क्त बशीत औषध ठेवले की ती ते घ्यायची.
11 Feb 2016 - 9:48 pm | मुक्त विहारि
एकदम साधे उपाय...
१. आधीच्या कुत्रीला "खजूर" खूप आवडायचा.खजूराची "बी" काढून, त्या जागी "गोळी" ठेवायची.ती लगेच हा
गोळी +खजूर खावून टाकायची.
खजूराच्या ऐवजी कधी-कधी पेढा किंवा गूळ पण वापरला होता.
२. आमच्या सध्याच्या कुत्रीला, खजूर जास्त आवडत नाही.तिला ५रु.च्या फाइव्ह-स्टार मधे गोळी घालून देतो.
कुत्री तितक्या प्रवृत्ती, हेच खरे.
13 Feb 2016 - 2:13 am | अर्धवटराव
आम्हि लहानपणि कुत्रं पाळण्याबाबत घरी विचारणा केली असता तीर्थरुपांचं टिपीकल उत्तर असायच... "दोन अगोदरच पाळतोय ना.." (म्हणजे अस्मादीक व आमचे जेष्ठ बंधू). आईला खात्री होती कि कुत्र्याचं सगळं तिलाच करायला लागणार.. आमची मदत शुण्य. त्यामुळे ति देखील श्वानपालनाबाबत उत्सुकता दाखवत नसे. आमच्या सौ. ने सासु-सासर्यांचे हे गुण एकत्रच उचलले, त्यामुळे आता देखील श्वानपालनाचे चान्सेस नगण्य. तेंव्हा इतरांचं कौतुक बघण्या पलिकडे सध्यातरी काहि करता येत नाहि.
पण एकुणच श्वानपालकांकडे बघुन वाटतं कि हाय कंबख्त, ये तो अपुनने पिया हि नहि.
13 Feb 2016 - 7:33 am | मुक्त विहारि
तुमच्या आईने एकदम योग्य निर्णय घेतला.
मला पण बरेच जण हेच विचारतात की, आमची मुले कुत्रा पाळण्याचा मुले हट्ट करतात. मी पण त्यांना ३-४ पथ्ये सांगतो.
१. मुलाकडे भरपूर फावला वेळ आहे का? आणि २-३ दिवसांनी जर त्यांनी कंटाळा केला तर, तुम्ही ही (कुत्रा पालनाची जबाबदारी) अंगावर घेवू शकता का?
२. कुत्र्याचे पालन-पोषण करायला सरासरी ५००० ते ७००० रुपये वार्षिक खर्च येतो.तो तुम्ही करू शकाल का?
३. कुत्र्याला काही शारिरीक इजा झाली तर तुम्ही त्याला घराबाहेर काढणार की त्याला तहहयात सांभाळणार? शारिरीक इजा झालेल्या कुत्र्याला सांभाळायचे असेल तर काळीज दगडाचेच हवे.
कुत्र्याला शारिरीक इजा झाल्यामुळे, काही विचित्र पालक कुत्र्याला बेवारस सोडून देतात.कालच एक किस्सा समजला.
एक-दोन दिवसात, माहितीची खातरजमा करून. किस्सा टाकतो.
13 Feb 2016 - 7:55 am | यशोधरा
किस्सा टाकतो. >> अजिबात नको :(
13 Feb 2016 - 10:09 am | अन्नू
"अजिबात नको :("
अर्रर्र.. मिपा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा??
27 Feb 2016 - 8:23 am | vikramaditya
a regular sight when pets which are old or ill are dumped from car and the car speeds away.
This is done by the very family which kept the pet for years at home. How cruel and selfish humans can get?
Pets become helpless on streets unless they find an angel.....
Often due to shock of being abandoned the pet dies....really heart wrenching.
27 Feb 2016 - 8:53 am | vikramaditya
a regular sight when pets which are old or ill are dumped from car and the car speeds away.
This is done by the very family which kept the pet for years at home. How cruel and selfish humans can get?
Pets become helpless on streets unless they find an angel.....
Often due to shock of being abandoned the pet dies....really heart wrenching.
27 Feb 2016 - 3:55 pm | प्रकाश घाटपांडे
शीर्षक कस तरी वाटत. कुत्री पालन ऐवजी श्वानपालन किंवा भुभुपालन हवे.