(अ)सुरक्षीततेची भावना आणि भिती हे तसे खूप सारे कंगोरे असलेले, व्यापक पट असलेले विषय आहेत. त्यात स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षीततेचा सांभाळ अशा विषयांचाही समावेश करता येऊ शकेल का असा एक विचार अलिकडे काथ्याकुटात असलेल्या भारतीय संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का? धाग्यावरून पोषाख फॅशन हेही अनेक कंगोरे असलेले विषय आहेत परंतु त्या संबंधाने (अ)सुरक्षीतते भावना असते का या बद्द्ल तुम्हाला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी काही नवे प्रश्न धागा लेखात जोडतो आहे.
# प्रश्नोत्तरे गट २ रा
१) चांगली अथवा वाईट नजर म्हणजे काय -ती कशी ठरवली जाते ? विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने वाईट नजरांचा पाठलाग होतो असे तुम्हाला वाटते का ? असे वाटल्याने तुम्हाला/ तुमच्या परिचीतांपैकी/बद्दल कुणाला अथवा असुरक्षीत वाटते का ?
२) विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने तुमच्या मनात काही 'कल्पना' येतात म्हणून त्या तशाच इतरांच्या मनात येतात असे तुम्हाला वाटते का ? इतरांच्या मनात 'कल्पना' येतात म्हणून तुम्हाला असुरक्षीत वाटते का ? मनातील अयोग्य 'कल्पना'ंची लोक परोक्ष-अपरोक्ष चर्चा करतात अशा चर्चा ऐकुन तुम्हाला या विषयावर असुरक्षीत वाटते का ?
३) तुमच्या नात्यातील-परिचयातील-गल्लीतील-गावातील-जातीतील-धर्मातील एखादी स्त्री परपुरषाशी मोकळेपणाने बोलली-वागली तर तुम्हाला काय वाटते अटेंशन डेफीशीट वाटते-हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ?
४) एकुण सांख्यिकीय आकडेवारी स्त्री परिचीत पुरुषांपेक्षा अपरीचीत पुरुषांकडून अधिक असुरक्षीत असल्याचे सुचवत नाही तरीही अपरीचीत पुरुषांबद्दल असुरक्षेची भावना अधीक असते का ?
५) स्त्रीयांना कोणकोणत्या परिस्थीतीत असुरक्षीत वाटते ? समजा एखाद्या विवाहीत स्त्रीच्या नवर्याच्या आसपास मस्तानीसम स्त्री आली किंवा त्याचे दुसर्या स्त्रीकडे लक्ष गेले तर त्या मस्तानीच्या स्त्रीत्वाच्या प्रदर्शनाचा अटेंशन डेफीशीट वाटते -हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
६) नात्यांना नाव दिल्याने जसे की- भाऊ ताई इत्यादी- स्त्रीयांना अधीक सुरक्षीत वाटते का ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ?
८) अल्पवयीन पाल्यांच्या बद्दलच्या (खासकरून मुलींच्या) (अ)सुरक्षीततेच्या बद्दल भावनांचे विचारांचे स्वरुप कसे असते ?
९) उपरोक्त (अ)सुअरक्षीततेच्या भावना तुम्ही कशा हँडल करता ? इतर लोक कसे हँडल करतात ? (अ)सुअरक्षीततेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने कशा हँडल केल्या जाऊ शकतील असे तुम्हाला वाटते?
-(अ)सुरक्षीततेचा सांभाळ धाग्याचा परिघ मोठा ठेवायचा आहे आपण आपल्या मनातील इतरही संबंधीत प्रश्न अथवा उत्तरांची या धाग्याच्या माध्यमातून मनमोकळी चर्चा करू शकता.
धागा लेखाचे शीर्षक तात्पुरते बदलले आहे मूळ शीर्षक "(अ)सुरक्षीततेचा सांभाळ" आणि नंतरही एवढेच असेल.
या धागा लेखास एकच एक स्वरुप देण्या पेक्षा या विषयाच्या तुम्हाला जाणवणार्या कोणत्याही कंगोर्या विषयी आपापल्या भावना, विचार आणि माहितीची मनमोकळी देवाण घेवाण व्हावी असा उद्देश ठेवत आहे, तुम्ही प्रतिसादातून तुमच्या प्रश्नांचीही भर घालू शकता . धागा लेखाचे स्वरुप वाद-विवादाचे कमी मनमोकळ्या चर्चेचे अधिक असल्यामुळे 'काथ्याकुट' हा सदर टाळून जनातले मनातले ह्या सदरात ठेवला आहे. चर्चा सुरवातीसाठी म्हणून काही प्रश्न ठेवतो आहे, धागा लेखातील प्रश्नांची संख्या चर्चा जशी जशी पुढे जाईल तशी वाढवेन.
# प्रश्नोत्तरे गट १ ला
* भितीच्या भावनेची गरज असते का ?
* भिती का वाटते ?
* तुम्हाला कशा कशाची भिती वाटते ?
* भिती आणि असुरक्षतेची भावना या एकच गोष्टी आहेत का वेगवेगळ्या ?
* असुरक्षीत का वाटते ? असुरक्षीततेच्या भावनेची गरज असते का ?
* तुम्हाला स्वत:ला अथवा इतरांमध्ये कोणकोणत्या असुरक्षीततेच्या भावना आढळतात ?
* (अ)सुरक्षीततेची भावना कशी सांभाळता/ सांभाळावी ?
* काळजी घेणे आणि काळजी करणे यात फरक कसा करावा ? असा फरक करणे तुम्हाला जमते का ?
* सुरक्षीततेचे गरज, स्तर कोणकोणते असतात ?
* सुरक्षीततेची सुयोग्य काळजी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी भविष्यातील शक्यतांचा वेध कसा घ्यावा/ घेता ? जोखीम व्यवस्थापन कसे करता ?
* कोणती भिती/काळजी/असुरक्षततेची भावना अनाठायी असते ? अनाठायी भिती/काळजी/असुरक्षततेची भावना कशी टाळावी तुम्ही कशी टाळता ?
* विश्वास, श्रद्धा यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल ?
* मिथके, कथा, धर्मसंस्थाप्रणित विश्वास, श्रद्धा, माहिती आणि तत्त्वज्ञान यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल ?
चर्चेत सहभागासाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि सहभागी व्यक्तीस मनमोकळेपणापासून परावृत्तकरु शकणारी अवांतरे व्यक्तीगत हल्ले टाळण्यासाठी आभार.
प्रतिक्रिया
7 Jan 2016 - 12:22 pm | संदीप डांगे
चांगले प्रश्न आहेत व आवडीचा विषय. जरा वेळ काढून येतो. तुर्तास पोच.
7 Jan 2016 - 12:56 pm | कंजूस
लहानपणी शारिरीक/मानसिक भिती असतात सर्वांना.मोठेपणी आर्थिक आणि सामाजिक दुर्लक्ष होइल काय ही भिती वाढली.अगदी ढोबळ सांगितलं.
8 Jan 2016 - 1:23 pm | असंका
अ. भितीच्या भावनेची गरज असते का ?
होय. गरज असते. धोके जाणवून त्यापासून तयारी करण्यासाठी भितीची गरज असते.
ब. भिती का वाटते ?
अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते.
क. तुम्हाला कशा कशाची भिती वाटते ?
मला बहुतेक उंचीची आणि पाण्याची भिती वाटते. आणि मरणाची भिती वाटायला हवी असंही वाटतं. पण छोट्या छोट्या गोष्टींनीच मी इतका घाबरून जातो, की मरणाचा तर मी विचारही करत नाही.
ड. भिती आणि असुरक्षतेची भावना या एकच गोष्टी आहेत का वेगवेगळ्या ?
असुरक्षिततेची भावना हा शब्दप्रयोग मी अगोदर ऐकलेला नाही. कशासंदर्भात तो वापरला जातो ते कळलं तर त्यात आणि भितीत फरक आहे का ते सांगता येइल.
इ. असुरक्षीत का वाटते ? असुरक्षीततेच्या भावनेची गरज असते का ?
भविष्यात काय होणार आहे, त्याचा अंदाज बांधता न आल्याने किंवा जे होइल त्याला तोंड देण्यात आपण कमी पडू शकतो ही भावना म्हणजे भिती. त्यानेच असुरक्षित वाटतं. ते वाटत राहिल्याने, आपली पुरेशी तयारी झालेली नाही, अजून तयारी करायला हवी अशी जाणीव होत रहाते. त्यामुळे ही भावना तयारी करून घेण्यासाठी आवश्यक असावी. तो एक कुणीतरी कॉम्प्युटरमधला मोठा माणूस होता, तो म्हणला होता ना की ओन्ली द पॅरानॉइड्स सर्वाइव..!
फ. तुम्हाला स्वत:ला अथवा इतरांमध्ये कोणकोणत्या असुरक्षीततेच्या भावना आढळतात ?
म्हणजे काय ते कळलं नाही..काही उदाहरण दिलंत तर सांगता येइल.
ग. (अ)सुरक्षीततेची भावना कशी सांभाळता/ सांभाळावी ?
मन घट्ट करून. दुसरा काय पर्याय?
ह. काळजी घेणे आणि काळजी करणे यात फरक कसा करावा ? असा फरक करणे तुम्हाला जमते का ?
काळजी हे सारखेच शब्द दोन्हीत असले, तरी अर्थात जमीन आस्मानाचा फरक आहे. काळजी घेणे म्हणजे काही तरी विशिष्ट कृती करणे अपेक्षित आहे. काळजी करणे म्हणजे एक मनाची स्थिती आहे.
8 Jan 2016 - 2:06 pm | प्रसाद१९७१
हे जरा कळले नाही. बर्याच वेळेस, ज्ञान वाढले की पण भीती वाढते. उलट "अज्ञानात सुख असते" असे काहीतरी म्हणतात.
काही उदा
१. हे खाल्ले की तो रोग होतो वगैरे. अर्धवट ज्ञानामुळे, काही बारीक सारीक दुखले तरी कँसर पासुन अजुन कुठला तरी मोठा रोग झाला आहे अशी भिती वाटते. इत्यादी.
२. एखाद्या रस्त्यावर, एरीयात गावगुंडांचा धोका आहे असे कोणी सांगितले की त्या एरीयातुन जाताना भिती वाटते. पुर्वी जरी एखाद्या अंधार्या ठीकाणुन गेलो असलो, पण कोणी तिथल्या भुताचा अनुभव सांगितला की पुढच्या वेळेला जाताना भिती वाटते.
8 Jan 2016 - 2:35 pm | असंका
तुम्हाला न कळायला काय झालंय? फिरकी घेताय गरीबाची अन काय...
मुळात मी भितीच्या अस्ण्या नसण्याबद्दल बोलत नसून कमी जास्ती भिती वाटण्याब्द्दल बोलतोय .
अशी वस्तू/स्थिती जिच्याबद्दल काहीच माहिती नाही तीला मी अज्ञात म्हणतोय. जसं भूत. किंवा अंधारी खोली. किंवा सरळ अंधार.
जसजशी माहिती मिळायला लागते, तसतसं आपल्याला त्यापासून नक्की काय धोका आहे ते ठरवता यायला लागतं. त्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या माहितीचा उप्योग करून घेता येतो, अन एकंदरीत भिती कमी होतेच.
तुम्ही जी उदाहरणं दिलीत ती बघू-
१. हे खाल्ले की तो रोग होतो. हे झालं ज्ञान. आता या वस्तूला अज्ञात म्हणणं शक्य नाही. याउलट अशी एखादी वस्तू जी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहात. टाकाल का तोंडात अशीच्या अशी उचलून? कसची भिती जास्त आहे? समजा केळं खाल्लं, पेरू खाल्ला की मला सर्दी होते. पण कमीत कमी हे खायचे पदार्थ आहेत हे तरी मला माहित आहे? त्यामुळे मी तत्काळ मरणार नाही हेही मला माहित आहे. पण जंगलात गेल्यावर कितीही आकर्षक फळं मला दिसली आणि त्यांची मला माहिती नसली, तरी मी त्यांच्याकडे बघणार पण नाही. कारण ती फळं मला अज्ञात आहेत.
अर्धवट ज्ञान हे जास्त धोकादायक असेल हे मान्य, पण जर त्याची जाणीव असेल तर भिती कमी होते. पूर्ण ज्ञान ज्याला आहे असे लोक कमीच असणार. त्यामुळे निर्णय घेण्यास पुरेसे ज्ञान मिळाले की भिती कमी होते.
२. गावगुंड - ही ज्ञात गोष्ट आहे. अज्ञातापेक्षा कमी तयारीने गेलात तरी चालेल. पण अज्ञात ठिकाणी जाताना काय तयारीने जायचं हेच माहित नसतं. कुठली भिती जास्त असेल ?
मात्र भुताबद्दल मला शंभर टक्के मान्य आहे आपलं म्हणणं! एवढंच काय, माझी भितीची व्याख्याच मी भूतांच्याबद्दलच्या भितीवरून बेतलेली आहे. भूत कुणी बघितलेलं आहे का हो? सगळ्यांनी? कुणीतरी तरी असेल ज्याने भूत बघितलेलं नाही? तरी ते घाबरतात? ही कसची भिती असते? तर अज्ञाताची!! भूत कसं असेल तेच माहित नाही, तरी भिती तर वाटते! का? कारण हेच की माहित नाही!
18 Jan 2016 - 9:14 am | असंका
ओ धागाकर्तेसाहेब, तुम्ही तर धाग्याचा गाभाच बदलून टाकला.
सहज जाणवलं म्हणून- माझा हा वरचा प्रतिसाद म्हणजे आपल्या नव्या ४ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे - "नोन डेविल".
18 Jan 2016 - 10:43 am | माहितगार
ओह, नवे प्रश्न जोडताना प्रश्नांचा क्रम बदलू शकतो ह लक्षात घेतले नाही. नवे प्रश्न जोडताना प्रश्न गट १ , २ असे उल्लेख करतो म्हणजे कन्फ्युजन टळण्यास मदत होईल, -उद्देश अधिक प्रश्न जोडणे आणि अधिक लोकांना चर्चेत सहभागी करून घेणे आहे; चर्चेचा गाभा सुरक्षा विषयक दृष्टिकोण हाच आहे-
लक्ष वेधल्या बद्दल आणि चर्चा सहभागाबद्दल आभारी आहे.
8 Jan 2016 - 2:59 pm | असंका
* सुरक्षीततेचे गरज, स्तर कोणकोणते असतात ?
हे फार तांत्रिक शब्द दिसताहेत. हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय आहे, त्यांच्यासाठी सोडावा का हा प्रश्न? कारण हे सुरक्षिततेचे स्तर इ. असतात ही गोष्टच माझ्यासाठी एक नवीन माहिती आहे. उगा फेकाफेक करू शकतो, पण या उत्तराला काय मार्क थोडीच आहेत?
* सुरक्षीततेची सुयोग्य काळजी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी भविष्यातील शक्यतांचा वेध कसा घ्यावा/ घेता ? जोखीम व्यवस्थापन कसे करता ?
केवढे अवघड अवघड शब्द वापरता हो! अर्थ लावतानाच दिवस जाइल!
मुळात मी आला दिवस घालवण्यावर विश्वास ठेवत असल्याने हे सगळं काही मी करत नाही - फक्त इंशुरन्स मी शक्य तेवढे काढून ठेवलेले आहेत. गाडी, मेडीक्लेम आणि लाइफ.
* कोणती भिती/काळजी/असुरक्षततेची भावना अनाठायी असते ? अनाठायी भिती/काळजी/असुरक्षततेची भावना कशी टाळावी तुम्ही कशी टाळता ?
ते कुठले प्रिन्सिपल आहे ना- ८५/१०/५% वालं ते वापरतो. आपण अनेक गोष्टींची काळजी करतो, त्यातील ८५% (की असलंच काहीतरी %) गोष्टी कधीच वास्तवात येत नाहीत. १०% गोष्टी वास्तवात होउ शकतात अशी ५०% शक्यता असते. आणि ५% गोष्टी मात्र होतातच. आता या कुठल्या गोष्टी कुठल्या कॅटेगरीत घालायच्या ते थोडा अनुभव वापरूनच ठरवावे लागते.
* विश्वास, श्रद्धा यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल ?
ज्या गोष्टींनी आपण काळजीत आहोत, त्या जर याच्याशी मुळात संबंधित नसतील, तर असा संबंध मांडणे म्हणजे मनाचे खेळ असतील. एरवीही ते मनाचे खेळच असतील. पण अनेकदा त्या खेळांचा खरोखर उप्योग होतो असं पाहिलेलं आहे.
* मिथके, कथा, धर्मसंस्थाप्रणित विश्वास, श्रद्धा, माहिती आणि तत्त्वज्ञान यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल
शेवटच्या दोन प्रश्नांवर परत येतो.
17 Jan 2016 - 1:12 pm | माहितगार
काथ्याकुटात असलेल्या भारतीय संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का? धाग्यावरून पोषाख फॅशन हेही अनेक कंगोरे असलेले विषय आहेत परंतु त्या संबंधाने (अ)सुरक्षीतते भावना असते का या बद्द्ल तुम्हाला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी काही नवे प्रश्न धागा लेखात जोडतो आहे.
17 Jan 2016 - 2:44 pm | लाडू.
हो. इथे येईन कॉम्पुटर वरून लोग इन करून. सध्या मोबाइल वर आहे. छान विषय
17 Jan 2016 - 3:31 pm | चलत मुसाफिर
शारीरिक आकर्षण ही संपूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. ते विविधप्रकारे व्यक्त होत असते. परंतु मानवी संस्कृती अनेक कारणांमुळे (काही योग्य, काही अयोग्य) त्यावर नानाविध बंधने टाकते. त्यातही देशोदेशी, वंशोवंशी फरक असतो. परिणामी, या आकर्षणाचे काही पैलू आपोआप "चांगले" तर काही "वाईट" ठरवले जातात. जिथे "वाईट" पैलू दिसतात, त्याबद्दल भीती किंवा घृणा निर्माण होते. विशेषतः पूर्वीय देशांत, शारीरिक आकर्षण हीच काहीतरी लज्जास्पद, कलंकसमान गोष्ट आहे असा टोकाचा दृढ समज आढळून येतो. परिणामी या विषयावर निकोप चर्चा होऊ शकत नाही.
बहुसंख्य लैंगिक गुन्हे हे शारीरिक गरजेपोटी होत नसून बलदर्शनाच्या मानसिक गरजेपोटी होत असतात. परंतु हे समजून घेण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती समाजात नसेल, तर त्यावर उपाय शोधणे अशक्यप्राय होऊन बसते. त्यातूनच मग "भरचौकात फाशी द्या", किंवा "खच्ची करून टाका" अशा आक्रस्ताळ्या मध्यमवर्गीय मागण्या पुढे येतात.
18 Jan 2016 - 3:47 pm | लाडू.
माझी वैयक्तीक मते:
१) चांगली वाईट नजर स्त्रीला कळते अस म्हणतात. आणि ते खर आहे. घराबाहेर कुठेही, मग ते बाजारात असो किना ऑफिस मध्ये, ओळखीचा किंवा अनोळखी पुरुष आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो ते लगेच कळते. विशिष्ट वेळी, अगदी लक्ष नसतानाहि, आपल्याला ओढणी सावरायची गरज आहे हे अचानक मेंदूत चमकून जात. आणि त्यावेळी निरीक्षण केल्यास कोणीतरी आपल्याकडे पाहत असतच.
अस वाटल्याने किंवा वाईट नजर कळल्यानं नेहमीच असुरक्षित वाटत अस नाही. ऑफिस किंवा घराजवळ, पूर्णपणे सुरक्षित आहोत आपण हे माहित असते. पण अनोळखी ठिकाणी, किंवा रात्री एकटी असताना थोडी भीती वाटू शकते.
२) विशिष्ट प्रकारच्या पेहरावाने या नजरावर काहीच फरक पडत नाही. प्रत्येक पुरुष त्याच्यावरच्या संस्कारांप्रमाणे वागतो अस मला वाटत. अशी खूप उदाहरण मी अनुभवलीत, चांगली पण आणि वाईट पण, पेह्रवणे त्यांच्यावर फार फरक पडला नाही.
(उदा. ऑफिस मध्ये, शनिवारी आम्ही कॅजुअल्स घालू शकतो. पण काही विशिष्ट माणसांची नजर कोणत्याही दिवशी तेवढीच वाईट असते)
४) परिचित अपरिचित जास्त फरक नाही पडत. एकंदरीतच माणूस आणि त्याची नजर कळतेच. अपरिचित माणूस सुद्धा बऱ्याचदा कम्फर्टेबल वाटू शकतो
५) सध्या मी विवाहित नाही. विवाह होईल अजून ४ महिन्यात. पण ८ वर्षाचं नात, आणि त्यानंतरच्या विश्वासावरून, एवढ नक्कीच सांगू शकते, मस्तानी सम स्त्रीचा, तिच्या स्त्रीत्वाचा हेवा वाटत नाही. एखाद्या स्त्रीचे कौतुक जरी माझ्या जोडीदाराने माझ्या समोर केले तरी ते तेवढ्यापुरतेच असेल असे मला वाटते.
६) नात्यांना नावे देणे मला पटत नाही. आणि त्याने सुरक्षिततेचा मुद्दा बदलत नाही
19 Jan 2016 - 2:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे बघितलेलं आपल्याला आवडलं तर ती नजर चांगली. बघितलेलं आवडलं नाही, हे शब्दांशिवाय त्या व्यक्तीलाही समजून पुन्हा आपल्याकडे बघायला सुरुवात केली तर ती वाईट नजर.
कपडे आणि नजरेचा संबंध नाही (कारण चांगलं किंवा वाईट हे आपल्या विचार, बुद्धी, मतावर अवलंबून असतं).
मला किंवा माझ्या परिचयातल्या कोणालाही गरजेपेक्षा अधिक किंवा मुद्दाम लक्ष देण्याइतपत असुरक्षित वाटत नाही. (असुरक्षितता डिजिटल होय किंवा नाही छाप नसते.)
काही लोकांच्या मनात माझ्यात मनात असतात तसेच विचार येतात आणि काहींच्या मनात येत नाही. कोणतीही व्यक्ती जगातल्या अर्ध्या लोकांना "फार्फार" आवडेल हे अशक्य आहे.
लोकांच्या विचारांमुळे असुरक्षित वाटत नाही.
चर्चांमुळेही असुरक्षित वाटत नाही.
सगळ्याचं होलसेल उत्तर - नाही.
नाही. दोन कारणं आहेत -
१. गविंनी याबद्दल कुठेतरी लिहिलंय. या गोष्टीचा मला त्रास होणारच नाही, अशी भावना असते.
२. तर्क असा की सांख्यिकीचे आकडे एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या बाबतीत लागू होतातच असं नाही.
आणि ओळखीच्या लोकांवर संशय घेत राहिले तर माझं आयुष्य कधी जगू? असा प्रश्न पडतो.
स्त्रिया एकसाची विचार करतात, अशा या प्रश्नांतल्या गृहितकाबद्दल मला होलसेल असुरक्षितता वाटते.
एरवी मला कोणत्याही कारणास्तव, व्यक्तीमुळे लक्ष देण्याइतपत असुरक्षितता वाटलेली नाही. माझ्या बऱ्या अर्ध्याला मैत्रिणी नाहीत (आणि मला चिक्कार मित्र आहेत) या कारणास्तव मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं.
ऐडीया नाही. मी असली नावं देत नाही. मला अदितीताई वगैरे म्हणणारे लोक मला गळेपडू आणि/किंवा लाचार वाटतात. पण असुरक्षित? कब्बी नै!
उत्तर देण्यासाठी या प्रश्नाचं प्रमाण मराठी भाषांतर हवं.
असुरक्षितता ही असुरक्षितताच असते. कधी सॉलिड, कधी लिक्विड अशी नसावी; हा अंदाज.
मी शाळकरी वयाची असताना आईची तीच-ती कल्जियुक्त 'लेक्चरं' ऐकून कधीमधी "आई, मला कोणी काही केलं नाही तर मीच घरातून पळून जाईन; म्हणूनतरी लेक्चरं आवर" असं वाक्य तोंडावर येत असे. ते मी नियमाने गिळत असे.
मला अशा काही भावना नाहीत. लोकांचं लोकं सांगतील. भावनांवर नियंत्रणाबाबत जेनेरिक काही बोलण्यासाठी कोणी मानसोपचारतज्ञ गाठलेले बरे.
बाकीचे प्रश्न नंतर वाचेन. सध्या गृहपाठ म्हणून सुरक्षितता हा शब्द तीनशेचौदा वेळा चोप्य-पस्ते करा ही विनंती.
19 Jan 2016 - 10:10 am | माहितगार
तुमच्या सगळ्यात शेवटच्या वाक्यासाठी सर्वप्रथम एक स्मायली.
हा प्रश्न लहानपणी आई-किंवा वडील इतर व्यक्तींशी (भिन्न-लिंगी व्यक्तीशी) मोकळेपणाने बोलले तर असुरक्षीत वाटले होते का? खास करून सावत्र आई किंवा सावत्र वडील यांच्या बद्दलच्या कथा जसे की ध्रूवबाळ हि लहानपणीच ऐकण्यास मिळाली तर त्या वयात असुरक्षित वाटले असू शकते का ?
कदाचित अटेंशन डेफिसीटमुळे बाल वयात मुले आई-वडीलांजवळ बसलीतरी मध्ये जाऊन बसताना दिसतात; पण खासकरून ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना असुरक्षीत वाटत असण्याची आणि त्यातून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका अधिक कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?
19 Jan 2016 - 10:27 am | माहितगार
ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना त्याची आधी पासून सवय असून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका कमी कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?
19 Jan 2016 - 10:44 am | माहितगार
खालील प्रश्नाचे उत्तर देण्या इतपत मिपावर मुस्लिम अथवा मुस्लिमांशी घनिष्ट संबंध असलेल्या व्यक्ति आहेत का माहित नाही तरीही (प्रश्नोत्तरे गट २) प्रश्न ७ मधील प्रश्नात खालील उपप्रश्न जोडता येऊ शकतील.
खरेतर हेच प्रश्न ज्या कुटूंबातील एक पालक घटस्फोट घेते अथवा अधिक विवाह करते अथवा पुर्नविवाहाने आयुष्यात नवा साथीदार आणते त्यांच्यासाठीही लागू पडावेत.
(कृपया केवळ वाद अथवा टिकेकरता म्हणून या प्रश्नाची इतरेजनांनी उत्तरे देऊ नयेत केवळ ज्यांचा अशा प्रश्नांशी सरळ सामना झाला आहे त्यांच्यासाठीच हे प्रश्न आहेत अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार)
१) वडीलांच्या तोंडी तलाकाच्या अधिकारामुळे -किंवा घरातील घटस्फोटाच्या पातळीवरील वादंगांनी- तुम्हाला (तुम्ही मुस्लिम असल्यास) अथवा तुमच्या मुस्लिम मित्राला (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ?
२) पतीने अथवा वडीलांनी एका पेक्षा अधिक विवाह-(अथवा संबंध)-केल्यामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ?
३) आई-किंवा वडीलांच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ?
४) घरातील अपत्ये असलेल्या विधवा स्त्रीच्या- (विधवा पुरषांना काय म्हणतात शब्द आठवत नाहीए) पुरुषाच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने भावना काय होती