अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ६ औलीला जाण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि तपोबन भ्रमण

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
13 Oct 2015 - 3:02 pm

सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ३ नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ४ जोशीमठ दर्शन
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ५ अलकनंदेसोबत बद्रिनाथच्या दिशेने. .

औलीला जाण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि तपोबन भ्रमण

१८ डिसेंबर. आज ह्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे. आज औलीला जायचं आहे. औली हे ह्या मोहिमेतलं एक मुख्य आकर्षण आहे. औली एक स्कीइंग स्पॉट आहे. औलीला जाण्याचं किंबहुना ह्या सगळ्या प्रवासाचं मुख्य आकर्षण हिवाळ्यात उंच जागी फिरण्याचा आनंद घेणं हेच आहे. मागच्याच वर्षी लदाख़ला जाऊन आलो होतो, त्यामुळे वाटत होतं की, तेवढा नाही पण थोडा फार बर्फ बघावा. काल बद्रिनाथ रोडवर ही इच्छा ब-याच प्रमाणात पूर्ण झाली आहे. औलीची उंची २७०० मीटर ते ३००० मीटर आहे.


शंकराचार्य मंदीरासमोर सुरू होणा-या पायवाटेवरून मागे वळून बघताना

जोशीमठवरून औलीला जाण्यासाठी फार पर्याय नाहीत. एक पर्याय तर जीप बूक करून जाणे हा आहे पण तो खूप महाग आहे. इथे शेअर जीपही चालतात असं कानावर आलं खरं पण तसं दिसलं नाही. आता एकच मार्ग राहिला तो म्हणजे ट्रेक करत जाणं. औली जोशीमठपासून सुमारे १८ किलोमीटर दूर आहे. नीरज जाटच्या ब्लॉगवरून प्रेरणा घेऊन पायी जाण्याचं ठरवलं. ट्रेकमध्येही दोन पर्याय आहेत. एक तर सरळ रस्त्याने जाणं- लाँग कट. १८ किलोमीटर चालावं लागेल. दुसरा पर्याय म्हणजे कच्च्या पायवाटेने- पगडंडीने जाणे. त्याचं अंतर साडेसात किलोमीटर असेल. पण त्यामध्ये तीव्र चढ असणार. प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन ठरवेन कसं जाता येईल.


खाली जोशीमठ आणि समोर एका दुर्गम गावाकडे जाणारा रस्ता

शंकराचार्यांच्या मंदिराच्या मागून औलीकडे जाण्याची पायी वाट जाते हे नीरजच्या ब्लॉगवर वाचलं होतं. पण त्या रस्त्यावर पुढे जाऊन रस्ता चुकलो. एका माणसाला विचारलं तर त्याने सांगितलं की हा रस्ता तर जंगलाकडे जातोय. त्याने मग कुठून जायचं‌ ते सांगितलं. थोड्या वेळ रस्ता शोधून मग पायी वाट लागली. ही शॉर्ट कटची पगडंडी आहे! मध्ये मध्ये ही मुख्य रस्त्यालाही ओलांडेल. ह्या वाटेने निघालो तर रमणीय नजारा समोर आला. जोशीमठच्या पलीकडे दूरवर अलकनंदा दिसते आहे. आणि ते इतकं दुर्गम डोंगरात बसलेलं एक गाव! पण थोड्याच वेळात थकायला झालं. पायवाट सोपीच आहे. जे मुरलेले ट्रेकर्स आहेत ते म्हणतील की हा तर पक्का रस्ताच आहे. पण मला त्रास होतोय कारण ह्या पगडंडीमध्ये एक एक पायरीची उंची जास्त आहे. दोन फूटांची एक पायरी आणि अशा सलग पाय-या. लवकरच थकलो. थोडा वेळ चाललो की, परत थांबावं लागतंय. जोशीमठच्या वरच्या भागातली वस्ती अजून सुरू आहे. मध्ये मध्ये घर लागत आहेत. एका ठिकाणी पाणी मागून घेतलं. इथे झाडांवर फुलंही सुंदर आहेत. पण आता पाय नकारघंटा वाजवत आहेत!


हीच ती पायवाट!

हे होण्याचं कारण कदाचित हेच असेल की, मला आधीच्या ट्रेकचा कोणताही अनुभव नाही. काल मी जरी एकोणीस किलोमीटर चाललो असलो तरी तिथे अशा चढाच्या पाय-या नव्हत्या. आणि पंडुकेश्वरमध्ये अशा पाय-या चढताना त्रासही झाला होता. हा शॉर्टकट असा आहे की, ज्यामध्ये वाटेची लांबी कमी आहे पण उंची जास्त आहे. त्यामुळे एकेक पावला जास्त ऊर्जा लागते आणि पाय लवकर थकत आहेत. शिवाय कदाचित कालच्या १९ किलोमीटरच्या ट्रेकिंगमुळे शरीरातला ऊर्जा स्तर आधीच कमी झाला आहे. काहीही असेल पण आता पुढे जाता येत नाही अशी स्थिती येते आहे. जोशीमठवरून सकाळी नऊला निघालो. दोन तासांमध्ये जेमतेम तीन- चार किलोमीटर पुढे आलो असेन. थांबत थांबत चालत राहिलो. थोड्या वेळाने मुख्य रस्ता मिळाला. चला, त्या पगडंडीपासून तर सुटलो. पण इतका थकलोय की, ह्या रस्त्यावर पण चालताना अडचण होते आहे.

थोडा वेळ थांबून ऊर्जा येण्याची वाट बघितली. पण जमलं नाही. पाय अगदी नाही म्हणत आहेत. आता एकच पर्याय आहे- एखादं वाहन मिळायला हवं औलीकडे जाणारं. चहा पीत त्याची वाट बघितली. खाजगी टूरिस्टच्या गाड्या जात आहेत. पण कोणी थांबायला तयार नाही. आता दुपारचे बारा वाजत आहेत. जर मी स्वत:ला ओढत ओढत नेलं तरी तिथे पोहचायला चार- पाच तास लागतील. म्हणजे तिथेच थांबावं लागेल. आणि बहुतेक औलीचे हॉटेल्स ह्या वेळी बंद आहेत किंवा फक्त महाग रिसॉर्टस सुरू असावेत. दोन्ही गोष्टी मला पटणार नाहीत. आणि तसंही मी नुकतंच ट्रेकिंगमध्ये पाऊल ठेवलंय. तेव्हा अन्य उपाय नसल्याने परत जोशीमठकडेच वळतो.

अर्थातच मन स्वत:ला दोष देत आहे. पण काय करणार. माझी अजून तितकी तयारी झालेली नाहीय. किंवा माझी इच्छाशक्ती कमी पडत असेल. काहीही असो. पण एकदा उतरायला लागल्यावर बरं वाटलं. उतरताना रस्त्यानेच आलो आणि नंतर एक शॉर्ट कट घेतला. हा शॉर्ट कट मिलिटरी एरियातून जाणारा आहे. जोशीमठ फक्त यात्रेकरूंचं ठिकाणच नाहीय तर एक मिलिटरीचं मुख्य युनिटही आहे. तिबेट सीमेपासून ७५ किलोमीटर अलीकडे असलेल्या ह्या जागी सेनेची अनेक केंद्रे असणं स्वाभाविकच आहे. स्काउटचं केंद्र आहे, बी.आर.ओ. चं कार्यालयही आहे. मिलिटरी एरियातून जाताना सिव्हिलिअन्सना इकडून जाता येतं, हे एका जवानाला विचारून कन्फर्म केलं. नाही तर नंतर अजून अडचण यायची! ह्या वाटेने काही वेळातच जोशीमठला पोहचलो. वाटेत मिलिटरीची अनेक युनिटस, क्वार्टर्स आणि कँटीन लागले. एका तासात जोशीमठच्या स्टँडवर पोहचलो.

काही जीप्स उभ्या आहेत. अचानक वाटलं की, आज तपोबनला जाता येईल? दुपारचा दिड वाजतोय. कदाचित एखादी जीप जाणारी असू शकेल. चौकशी केली आणि लगेचच जीप मिळाली. हे तपोबन गांव जोशीमठ- मलारी रस्त्यावर आहे. ह्या मार्गावर ह्या गावापर्यंतच जीप्स सुरू आहेत, असं कळालं. जोशीमठपासून ते सुमारे वीस किलोमीटर असेल. एका नकाशात तपोबनची उंची ३००० मीटरपेक्षा अधिक सांगितली होती. त्यामुळे तपोबनला जाण्याची इच्छा झाली.

नजारे अद्भुतच आहेत! आणखी एका रमणीय परिसरात भ्रमंती! उत्तराखंडमध्ये आल्यापासून जेव्हा जेव्हा जीपमध्ये बसतोय, तेव्हा एकदम सुसंगत गाणी लागत आहेत. इथेसुद्धा! नवीन शिखर दिसत आहेत. एका तासामध्ये तपोबन आलं. एक छोटसं गाव. रस्ता पुढे सुरू दिसतोय. पुढच्या एक- दोन गावांमध्ये तरी नक्की सुरू असणार. पण इतकं चालायची इच्छा नाहीय. तरीही तपोबनच्या जवळ फिरलो. रस्त्यापासून काही अंतरावर एक मंदीर आहे. तिथपर्यंत चालत गेलो. रस्त्याच्या काठाला शाळाही दिसते आहे. वस्ती पसरलेली आहे. रस्त्याच्या देखभालीवर काम करणारे मजूरही दिसत आहेत. थोड्या वेळात त्या मंदिरात पोहचलो. ह्याच रस्त्यावर पुढे काही अंतरावर द्रोणगिरी पर्वत आहे.

मंदिराजवळ एक गरम पाण्याचं कुंड आहे! निसर्गाची कृपा! जितकं निसर्गाजवळ जाऊ, त्याची कृपा वाढत जाते. इथे वातावरण अगदी थंड आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी निसर्गाने गरम पाणी दिलं आहे. लदाख़मध्येही बघितलं होतं की, नुब्रा व्हॅलीमध्ये पनामिकच्या जवळ गरम पाण्याचे झरे आहेत. इतक्या थंड हवेतही त्यातून पाण्याची वाफ येते आहे. थोडा वेळ तिथे फिरून कच्च्या वाटेने परत निघालो. जवळूनच एक नदी वाहते आहे. इथेही बरंच बांधकाम सुरू आहे. कच्ची पायवाट रस्त्याला समांतर आहे. मध्ये मध्ये काम करणारे मजदूर दिसत आहेत. थोड्या वेळात शाळेच्या इमारतीजवळ आलो. इथे पायवाट रस्त्याला मिळाली.

तपोबन छोटं गांव असूनही इथे मिनी बँक आहे. टपाल कार्यालय आहे. हॉटेल आहे. जोशीमठची जीप लवकरच मिळेल. लोक साधे दिसत आहेत. अजून इथे टूरिजमचा रोग पसरलेला नाहीय. त्यामुळे हॉटेलही स्वस्त वाटलं. हा रस्ता मलारी गावाकडे जातो. ते तिबेट सीमेला लागून आहे. अर्थात् ह्या दिवसांमध्ये त्याच्या बरंच आधी रस्ता बंद झाला असणार. एक गोष्ट नक्की जाणवते आहे की, तपोबनची उंची नक्कीच ३००० मीटर नाहीय. त्याहून कमीच आहे. कदाचित जोशीमठइतकीच असावी. पण दृश्यांचं सौंदर्य टिकून आहे. परततानाही रस्त्यावरून अपूर्व नजारा दिसला. बी.आर.ओ. रस्ता सुरू ठेवण्यासाठी सतत काम करताना दिसते आहे. आजही बराच बर्फ दिसला; पण तो दूर पर्वतांवर. कालसारखा रस्त्यावर नाही. असो.

पाच वाजता जोशीमठला पोहचलो. आज माझा जोशीमठमधला शेवटचा दिवस आहे. उद्या पहाटे ऋषीकेशला जायला निघेन. जोशीमठमध्ये एका जागी पेठा दिसल्या. हे इथलं स्थानिक उत्पादन आहे का, असं विचारलं. दुकानदाराने सांगितलं की, ह्या आग्र्याच्याच पेठा आहेत! आणि दुकानदारही स्थानिक नसून सहारनपूरचा आहे. हिवाळ्यातही व्यापार सुरू आहे. आता मस्त थंडी आणि रात्र पडते आहे. आजही मस्त दृश्ये बघायला मिळाली. पण. . . औलीला जाता आलं नाही. एक प्रश्न वारंवार मनात येतोय. काल मी बद्रिनाथच्या दिशेला जात असताना अगदी सहज सात किलोमीटर चढाचा रस्ता पार केला. काहीच अडचण आली नाही. उलट मला कोणी तरी ओढत आहे, असंच वाटत होतं. पण औलीला जाताना तर कोणी तरी थांबवत आहे, असं वाटलं. . . असो. हरकत नाही. अपयश हीच यशाची पहिली पायरी किंवा पगडंडी असते! रात्री थंडी वाढत जाते आहे. झोपही येतेय. आता बस पहाटे लवकर उठून साडेपाचची ऋषीकेशची बस घ्यायची आहे. . .


मलारी रोडवरचं तपोबन


मंदिराजवळ गरम पाण्याचा झरा

पुढील भाग: हिमालयाचा निरोप घेत ऋषीकेशकडे प्रस्थान

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

समाजप्रवासछायाचित्रणविचारआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

13 Oct 2015 - 3:21 pm | मधुरा देशपांडे

नेहमीप्रमाणेच छान वर्णन. हिमालयातील ट्रेकिंगचे वेड असणार्‍या एका मैत्रिणीलाही तुमच्या लेखमालिकेचे दुवे दिले आहेत.

एस's picture

13 Oct 2015 - 3:37 pm | एस

मस्त ट्रेक!

अमृत's picture

14 Oct 2015 - 11:44 am | अमृत

अलकनंदा किती सुरेख नाव आहे नदीचं!

जितकं निसर्गाजवळ जाऊ, त्याची कृपा वाढत जाते - सहमत.

जगप्रवासी's picture

14 Oct 2015 - 3:31 pm | जगप्रवासी

अप्रतिम ट्रेक

मस्तच ट्रेक झाला.पुभाप्र

शंतनु _०३१'s picture

15 Oct 2015 - 4:17 pm | शंतनु _०३१

प्रवासवर्णन आवडले,सगळे भाग वाचुन काढले आज. वा खु साठवतोय. पु भा प्र

पैसा's picture

23 Oct 2015 - 7:12 pm | पैसा

वाचून थंडगार वाटतंय!