अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेशमधून प्रस्थान

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
20 Oct 2015 - 4:23 pm

सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ३ नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ४ जोशीमठ दर्शन
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ५ अलकनंदेसोबत बद्रिनाथच्या दिशेने. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ६ औलीला जाण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि तपोबन भ्रमण
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ७ हिमालयाचा निरोप घेत ऋषीकेशकडे प्रस्थान
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ८ ऋषीकेश दर्शन

ऋषीकेशमधून प्रस्थान

२१ डिसेंबरच्या पहाटे ऋषीकेशमधून लवकर ट्रेन घ्यायची आहे. ऋषीकेशमधून सकाळी सात वाजता दिल्लीची पॅसेंजर निघते. ह्या ट्रेनने मला गाज़ियाबाद जंक्शनपर्यंत जायचं आहे व तिथे मला घरातले इतर सदस्य भेटतील आणि परतीचा प्रवास सुरू होईल. ऋषीकेश स्टेशन इथून सुमारे चार किलोमीटर दूर आहे. पायी पायीच जातो. ह्या संपूर्ण प्रवासात शक्यतो पायीच जाण्याला प्राधान्य दिलं होतं. त्यामुळे आत्ताही पायी पायीच निघालो. स्टेशन नक्की किती दूर आहे, पक्कं माहित नाही. म्हणून पहाटे सव्वा पाचलाच बाहेर निघालो. बाहेर रात्रीचा गडद अंधार आहे.

चालता चालता हळु हळु थंडी कमी झाली. पाठीवर मोठी बॅग असल्यामुळे घामही आला. लवकरच उजाडलं. लोक दिसायला लागले. हळु हळु धुक्यामध्ये लपलेले डोंगरही दिसले. आज त्यांचा निरोप घेतोय! मनामध्ये थोडी अस्वस्थता आहे. खरोखर पिथौरागढ़मधून सुरू झालेल्या ह्या प्रवासामध्ये काय काय बघायला मिळालं! ह्या आठवणी नेहमी सोबत असतीलच.

पुढे गेल्यावर थोडी विचारपूस करत स्टेशनचा रस्ता शोधला. सकाळी वातावरण एकदम ताजतवानं आहे. मानवी उपद्रव अगदी थोडे असल्यामुळे निसर्ग शुद्ध स्वरूपात बघायला मिळतोय. पक्ष्यांचं कूजन, शुद्ध हवा, झाडांची सळसळ आणि आल्हाददायक थंडी! लवकर निघाल्यामुळे आरामात तिकिट काढता आलं. तिकिट काढून प्लॅटफॉर्मवर आलो. एक ट्रेन उभी आहे. पण अनेकांना विचारलं तरी ही दिल्ली पॅसेंजर आहे, असं कोणाला माहिती नव्हतं. काही जण म्हणाले की, ही लक्सरपर्यंत जाईल, अमुक गावापर्यंत जाईल. स्टेशनवर काम करणा-या एका माणसाला विचारलं‌ तेव्हा त्याने सांगितलं की, हीच दिल्ली पॅसेंजर. मन किती चंचल आहे! दोन मिनिटांपूर्वीची तगमग आणि आता एकदम निश्चिंतता. मन तर एक पेंडुलम आहे जे फक्त इकडून तिकडे जात राहातं. .

वेळेवर ट्रेन सुरू झाली. धुक्यामध्ये लपलेल्या मार्गावरून पुढे निघाली. हरिद्वार ट्रेनमधूनच बघितलं. हळु हळु गर्दी वाढायला सुरुवात झाली. अनेक विद्यार्थी आहेत. रूरकीनंतर ट्रेनने उत्तराखंड सोडला. ह्या वेळेपुरता हिमालयाचा रामराम घेतला.

गाज़ियाबादपासून पुढची ट्रेन रात्री दहा वाजता आहे. ही पॅसेंजर दोन तास जरी लेट झाली तरी सात वाजता गाज़ियाबादला सोडेल. ट्रेन फार लेट नाहीय. तरीही मनामध्ये थोडी अस्वस्थता आहेच. सकाळीच इतर जण टनकपूरवरून निघाले आहेत. ते गाज़ियाबादलाच भेटतील व सोबतच पुढचा प्रवास करू. पॅसेंजर कुप्रसिद्ध देवबंदवरून गेली. जसं दिल्ली जवळ आलं, ट्रेनमधली गर्दी वाढत चालली. आता तर ही मुंबईच्या लोकलसारखी होते आहे. कदाचित गाज़ियाबादमध्ये उतरताना अडचण येऊ शकते. मोठी महानगरं नेहमी थोडी अडचणीची वाटतात. जितकं जमेल, तितकं दिल्लीसारखं शहर टाळायचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट म्हणजे कोणती ट्रेन/ बस कोणत्या स्टेशनवरून सुटते हे निश्चित कळणं अवघड जातं. शिवाय खर्चही बराच जास्त येतो. त्यामुळे ह्या वेळेस दिल्लीच्या ऐवजी गाज़ियाबादवरून ट्रेन बदलायचं ठरवलं. गाज़ियाबाद जवळ येत गेलं. ट्रेनच्या दरवाजामध्ये जाण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागली. पण आरामात उतरलो.

इथे बाकीचे जण भेटले. त्यांना मी पिथौरागढ़मध्येच सोडून आलो होतो. आठ दिवसांनी पुन: भेटतोय. आता इथून रात्री अहमदाबादची ट्रेन घ्यायची आहे. १६ डिसेंबरचं कांड होऊन जेमतेम चार- पाच दिवस झालेले आहेत. त्यामुळे तोही एक काळजीचा मुद्दा आहे. लवकरात लवकर दिल्ली परिसरातून निघावसं वाटतं आहे. असो. काही अडचण न येता पुढची ट्रेन घेतली. आता ह्या प्रवासाचा अंतिम टप्पा सुरू झाला.

पिथौरागढ़मधून निघाल्यानंतरचा सगळा प्रवास अजून आठवतोय. पहिल्या दिवशी पहाटे साडेपाचला बागेश्वरची बस घेतली. धुक्यामध्ये प्रवास सुरू! 'हर हर भोले नमो शिवाय' सोबत सुरुवात. चौकोरीजवळ पहिल्यांदा बर्फ दिसला. बागेश्वर- ते बैजनाथ छोट्या बसमधून येताना लोकांनी दाखवलेली आत्मीयता! नंतर बैजनाथमध्ये भ्रमंती. ग्वालदामचा अपूर्व नजारा! पिंडर नदी आणि कर्णप्रयाग. पुढे जोशीमठ- अलकनंदा आणि बद्रिनाथजवळचा बर्फ! परतताना दूरवरुन निरोप देणारे हिमालयाचे शिखर! शेवटि ऋषीकेशमध्ये आश्रम आणि गंगा दर्शन. आयुष्यातला हिमालयातला पहिला छोटा ट्रेक! खूप मजा आली.

यथावकाश ट्रेन अहमदाबादला पोहचली. इथून पुढची‌ ट्रेन घ्यायची आहे, कारण सरळ मुंबईच्या ट्रेनचं बूकिंग मिळालेलं नाही. काही तास अहमदाबादमध्ये निघून पुढे निघालो. वस्तुत: जीवनात कुठेही थांबणं होतच नसतं. जे ठिकाण 'गंतव्य' वाटतं किंवा घर वाटतं, तेसुद्धा प्रत्यक्षात एक तात्पुरता मुक्काम तर असतं. .

पुढील भाग: अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १० इस मोड़ से जाते हैं . . (अंतिम)

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

समाजप्रवासविचारआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

एस's picture

20 Oct 2015 - 4:40 pm | एस

वाचतोय! पुभाप्र.

अमृत's picture

20 Oct 2015 - 5:01 pm | अमृत

हा भाग फार छोटा झालाय!

शंतनु _०३१'s picture

20 Oct 2015 - 6:26 pm | शंतनु _०३१

जरा त्रोटक वाटले, पु भा प्र ......

शिव कन्या's picture

20 Oct 2015 - 8:05 pm | शिव कन्या

अजून फोटो हवे होते.

मार्गी's picture

21 Oct 2015 - 2:11 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! मोहीम संपत असल्यामुळे व लेखमाला संपत असल्यामुळे थोडा छोटा झाला भाग. :)

पैसा's picture

30 Oct 2015 - 4:16 pm | पैसा

जे ठिकाण 'गंतव्य' वाटतं किंवा घर वाटतं, तेसुद्धा प्रत्यक्षात एक तात्पुरता मुक्काम तर असतं. .

अगदी खरंय!