घरांचे ढिगारे...

सुहास झेले's picture
सुहास झेले in जनातलं, मनातलं
6 Aug 2015 - 4:56 pm

एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र ...कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे "मुंबईत स्वतःचे हक्काचे घर"

मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही... ज्याप्रमाणे मुंबईचा विकास होत गेला, त्याप्रमाणे तेथे काम करणारा चाकरमानी दूरवर फेकला गेला. मुंबईचा पसारा अस्ताव्यस्त पसरला आणि त्यातूनच सुरु झाली जागेची बोंबाबोंब. अनेक बिल्डर्स ग्रुप्स, राजकारण्यांनी मोक्याच्या जागांवर वर्षानुवर्ष कब्जा करून ठेवला. जागांचे दर गगनाला भिडले आणि सामान्य माणसाला प्रत्यक्ष मुंबईत घर घेणे आवाक्याबाहेर गेले. मग जिथे परवडेल तिथे आपला संसार थाटून, तीच धावपळ नव्याने सुरु. लोकांची वस्ती वाढली आणि जिथे आवाक्यात घरं यायची, तीही परवडण्यासारखी उरली नाही. त्यातच रोज हजारो स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या लोकांचा भार मुंबई सोसते आहेच.

अश्या जमिनी बिल्डरांना, मालकांना खुणावू लागल्या नसत्या तर आश्चर्यच !! मोक्याच्या जुन्या जमिनीवर उभ्या असलेल्या २-३ मजल्यांच्या इमारती पाडून, तिथे २०-३० मजल्यांचे टोलेजंग कॉम्प्लेक्स उभे राहू लागले. ह्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकांनी हात धुवून घेतले आणि अनेकांनी त्यांना विरोधही केला. २-३ मजल्यांच्या चाळीरुपी बिल्डींगमधून, टॉवरमध्ये राहायला जायला कोणाला आवडणार नाही? पण तिथे गेल्यावर वाढलेला खर्च खिशाला परवडणारा नव्हताच. मग अश्या लोकांनी आपली ती घरं विकून, अजून कुठेतरी लांब संसार थाटण्याची तयारी सुरु केली. ज्यांनी विरोध केला, अश्या लोकांच्या इमारतीचे पाण्याचे कनेक्शन तोडले गेले, वीज कापली गेली, इमारतीचा मेंटेनन्स बंद केला गेला... वर त्यांच्याकडून घराचे भाडं / मेंटेनन्स चार्जेस "वसूल" केले जायचे. आधीच त्या खूप जुन्या इमारती, त्यात काही मेंटेनन्स होत नसल्याने पार मेटाकुटीला आल्यागत अवस्था. अश्या हजारो इमारती आज मुंबई शहरात "थरथरत" उभ्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊनच इथल्या रहिवाश्यांना रहावे लागते. जेणेकरून आणखी एक वर्ष लोटता येईल.

गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री ठाकुर्ली (मातृछाया) आणि ऑगस्ट ३ तारखेला नौपाडा (कृष्णा निवास) येथे तीन मजली इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. त्यात अनुक्रमे ९ आणि १२ रहिवाश्यांचा बळी गेला. आता हल्ली मुंबईकरांना इथे बॉम्ब फुटला किंवा तिथे बिल्डींग पडली, अश्या बातम्यांचीही सवय झालीच आहे म्हणा... असो मुंबईचे स्पिरीट जिंदाबाद... !!

तर ह्या दोन्ही इमारती  खूप जुन्या (४० हून जास्त वर्ष ) आणि इमारतीच्या मालकांच्या भांडणात अडकलेल्या होत्या. ह्यामधल्या मातृछाया इमारतीच्या दुर्घटनेची माहिती माझ्या मित्राकडून (प्रसन्न आपटे) मिळाली. प्रचंड पाउस सुरु असतानाच, मोठा आवाज होऊन १५-१८ संसार ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. प्रसन्नची इमारत मातृछायेच्या अगदी बाजूला लागुनच आहे. त्याला लगेच फोन केला असता, तिथला गोंधळ ऐकू येत होता. त्यालाही काय करावे सुचत नव्हते. लोकांची गर्दी, त्यात प्रचंड पाऊस. रस्ते इतके चिंचोळे, की अगदी अग्निशमन दलाची साधी गाडी ही पुढे जाऊ शकत नव्हती. कसे बसे NDRF वाले झाडे, भिंती तोडून आत पोचत होते. सगळे टीव्ही मिडिया पत्रकार बाईट्स, फोन, कॅमेरा घेऊन घडलेल्या घटनेची माहिती गोळा करण्यात गुंतले होते. बचाव दलाने शक्य तितके जीव वाचवले आणि आपले बचावकार्य संपवले. शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्यावर अग्निशमन दल, पोलीसदेखील तेथून निघून गेले. आता मागे उरला तो फक्त एक ढिगारा !!

दुसऱ्या दिवशी सगळीकडे बातम्या आल्या, लोकं हळहळली असला प्रसंग कोणावरही ओढावू नये वगैरे, अश्या कमेंट्स सोशल नेटवर्कवर देऊ लागली... पण आता पुढे काय? जे वाचले त्यांचे पुनर्वसन? किमान काही मदत.. इतकी साधी अपेक्षा आपण माणुसकीच्यादृष्टीने ठेवूच शकतो ना? दुर्घटना झाल्यानंतर तीन दिवसांनी प्रसन्नकडे विचारपूस केल्यावर मला जे समजले ते फारच धक्कादायक होते. जी लोकं वाचली, त्यांची व्यवस्था एका महापालिकेच्या मराठी शाळेत एका हॉलमध्ये केली होती. तो हॉल त्यांना फक्त आठवड्याभरासाठी दिला होता, कारण तिथे ५ तारखेला एक लग्न होते आणि त्याआधी त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करावी असा आदेश पालिकेने दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होते ते वेगळेच. त्यात हॉल खाली करायची सक्ती. ठाकुर्लीमधील रहिवासी जमेल ती मदत त्या रहिवाश्यांना करत होती..त्यात काही कसूर पडू देत नव्हते.....परंतु सरकारी यंत्रणेकडून त्यांना काहीच ठोस मिळत नव्हते. प्रत्येकजण आपआपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकत होता.

त्यांना काही मदत करायच्या उद्देशाने रविवारी सकाळी ८ वाजता मी ठाकुर्लीला पोचलो. प्रसन्न आणि त्याची आई, त्या हॉलमध्ये पोहे आणि चहा घेऊन आले होते. तिथले चित्र पाहून पार अंगावर काटा आला. २५-२८ रहिवाशी मिळेल त्या अंथरूणावर झोपलेले होते. कोणी शेजारी-पाजारी किंवा हॉलच्या स्वच्छतागृहात अंघोळीसाठी, बाथरूमसाठी जात होते. हॉलच्या एका कोपऱ्यात कपड्यांचा प्रचंड मोठा ढिगारा पडला होता. त्यातूनच मिळेल ते कपडे रहिवाशी आलटून पालटून वापरत होते. दोन-तीन खोल्यांचा संसार एक-दोन प्लास्टिकच्या पिशवीपुरता उरला होता. स्थानिक नगरसेवक, राजकारणी लोकांनी दुर्घटनेनंतर त्या शाळेत जाऊन दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत देऊ केली होती. ज्यात १५ टॉवेल, १० टूथपेस्ट, १५ टूथब्रश, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल आणि बिस्लरी पाणी होते आणि हो बदल्यात मदत केल्याचे फोटो काढून घेतले निर्लज्जपणे !!

तिथून आम्ही दुर्घटनेच्या ठिकाणी गेलो. तिथे साधं चिटपाखरूदेखील नव्हते. त्या रहिवाश्यांचा संसाराचा ढिगारा तसाच निपचित पडून होता. त्यांच्या मौल्यवान गोष्टी, आठवणी त्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या. तेव्हा ना तिथे कोणी सुरक्षारक्षक ना कसला अटकाव. चोरांना, भंगारवाल्यांना मोकळे रान. कोणाला काहीच पडली नव्हती. ना राजकारण्यांना ना मिडीयाला. कोणीही तिथे फिरकले नव्हते दोन-तीन दिवस.

नंतर महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांना (अशोक पानवलकरांना) हा सर्व प्रकार मी मेसेज करून कळवला आणि त्यांच्याकडून काही करता येईल का विचारणा केली. त्यांनी तत्परतेने दोन पत्रकार तिथे पाठवतो असे सांगितले. पत्रकार तिथे आले. त्यांनीं सर्व रहिवाश्यांशी दोन तास चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तिथे जाऊन अजून एक गोष्ट कळली, की पालिकेने ह्या इमारतीला ३-४ वर्षापूर्वी धोकादायक जाहीर केले होते आणि त्याची नोटीस इमारतीच्या मालकाला देण्यात आली होती. मालकाने सदर गोष्ट रहिवाश्यांपासून लपवून ठेवून, त्यांच्याकडून घरांची भाडी घेत राहिला. अगदी जून पर्यंतच्या पावत्या मी स्वतः बघितल्या आहेत. महाराष्ट्र टाईम्सच्या तन्मय टिल्लूला देखील त्याची एक प्रत देण्यात आली. पालिकेने दिलेल्या जेवणात झुरळे आणि तारा मिळाल्याने, त्यांनी ते जेवणही नाकारले आहे. आजूबाजूचे रहिवासी जे खायला देऊ शकतील त्यावरच त्याचा गुजारा सध्या सुरु आहे. त्याचवेळी तिथे कोणी राष्ट्रीय निवारा परिषदेचे सदस्य रहिवाश्यांच्या बाजूने उभे राहू.. गरज पडल्यास आंदोलन करू..उपोषण करू वगैरे घोषणा करू लागले. हे कुठून आले माहित नाही, पण त्यांची भविष्यातली राजकीय इच्छाशक्ती साफ दिसून येत होती. रहिवाश्यांना एक आशेचा किरण .. एक नेता (?) मिळाला आणि तुम्ही बोलू ते आम्ही करू असे सर्व बोलू लागले.

दुसऱ्या दिवशी (सोमवारी) मटाला बातमी आली.  मिडीयाचे प्रेशर आल्यानंतर तरी त्यांना त्या हॉलमध्ये राहू देण्याची माझी अपेक्षा फोल ठरली आणि बुधवारी हॉलवर लग्नकार्य असल्याने त्या २५-३० लोकांची व्यवस्था मंगळवारी तडकाफडकी पांडुरंगवाडी येथील नाईट शेल्टर्समध्ये करण्यात आली अगदी जबरदस्तीने. ह्या नाईट शेल्टर्सची अवस्था त्यांच्या इमारतीपेक्षा अधिक वाईट आहे आणि तिथे राहणे निव्वळ अशक्यप्राय आहे. तिथे हे रहिवासी राहत आहेत. ही लढाई इथेच संपणार नाही आणि इतक्यात संपणार देखील नाही. त्या मालकावर केस होईल, मग साक्षी-पुरावे.. मग अनंत काळ कोर्टाचे फेरे.. !!

ह्या सगळ्या प्रकियेला किती वर्षे.. दशके जाईल ह्याची कल्पना करवत नाही, पण हे सर्व सांगण्याचा मुद्दा एकच... अशी अवस्था कोणाचीही होऊ शकते. काही निवडक लोकांच्या राजकारणामुळे आज लाखो मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन अश्या घरात नाईलाजाने राहत आहेत. निव्वळ आपल्या घराची मालकी जाऊ नये म्हणून. उद्या पुढेमागे बिल्डींगचा मालक री-डेव्हलपमेंट करेल, नवीन बिल्डर आणेल. आपल्याला हक्काचे मजबूत घर मिळेल अशी एकच आशा.....तोवर घराचा ढिगारा न होता, जितके पावसाळे बघता येतील तितके बघावे अशी परिस्थिती !!!!

- सुझे !!

फोटो साभार - प्रसन्न आपटे

समाजजीवनमानराहणीराहती जागाप्रकटनप्रतिक्रियाबातमीअनुभवमत

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

6 Aug 2015 - 5:06 pm | टवाळ कार्टा

It's fault in our upbringing
बरेच काही लिहावेसे वाटत आहे पण ते सगळे निगेटिव्ह :(

दुसरा मरेना का...आपले ठिक चालले आहे ना...मग गप्प बसा असाच कल आहे सगळीकडे

रिपोर्ताज सुन्न करणारे आहे. जगात भारत हाच कदाचित एकमेव देश असावा जिथे मानवी आयुष्याला कवडीचीही किंमत उरलेली नाही.

भारत हाच कदाचित एकमेव देश असावा जिथे मानवी आयुष्याला कवडीचीही किंमत उरलेली नाही.

+१

काळा पहाड's picture

10 Aug 2015 - 11:27 pm | काळा पहाड

तसंच काही नाही. अजूनही काही भाग आहेत. इराक आणि सिरीया मधला प्रदेश, नायजेरिया, सोमालिया, पाकिस्तान. जर कितीही खाली जायचं म्हटलं तर तिथेपर्यंत सुद्धा जाता येईल. भारत अजून तिथे पर्यंत गेलेला नाही याचा अर्थ जावू शकणारच नाही असं नाही. आपले राजकारणी नाही का, कालव्याचे आणि धरणाचे पैसे खातात मग पाणी टंचाई झाल्यावर पाणी विकायचा पण उद्योग करतात, तसं अशा परिस्थितीतही नवीन नवीन बिझनेस शोधून काढतील. मग एखाद्या काकाची शस्त्र काळ्याबाजारात खरेदी विक्रीची टोळी असेल, पुतण्याची जहाजं अपहरण अरण्याची टोळी असेल, एखाद्या युवराजाचा अफू स्मगलिंग चा बिझनेस असेल. शेवटी काय तर सामान्य माणूस जो यांना आत्तपर्यंत मत देत आला तो नंतर प्रोटेक्शन मनी द्यायला लागेल. राजकारणी नावाची माणसं दगडानं ठेचूनच संपवायची असतात हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत असंच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Aug 2015 - 5:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

लेका ही माणसे ब्लॅक होल मधे ओढल्या गेल्यासारखे घाण फीलिंग आले !! आता मी माझ्या आयुष्यावर १००००००० वेळा विचार करेन राव कधीही

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Aug 2015 - 5:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

*कधीही रड़ताना

बातमी वाचल्या वाचल्या स्पा आठवला होता. आणखी काही माहिती ठाऊक नसल्यानं गप्प होतो.
स्पा ला मेसेज पाठवत आहे.

तुमचा अभिषेक's picture

6 Aug 2015 - 6:07 pm | तुमचा अभिषेक

यावर काय बोलू हे समजत नाहीये, कारण नित्याचीच बातमी झाल्यासारखे आहे हे..
जेवणात तारा झुरळे, तासाला जेसीबीचे हजार रुपये द्या नाहीतर उरलेसुरलेही गेले, ज्याला मायबाप सरकार म्हणतो त्या कोणाला काही पडलीच नाही, सारेच चीड येण्यासारखे

पैसा's picture

6 Aug 2015 - 6:17 pm | पैसा

जे बेघर झालेत त्यांच्या अवस्थेची कल्पनाही करता येत नाहीये. आयुष्यभर काडी काडी करून जमवलेला संसार.. ते लवासावाले असते तर किंवा झोपडपट्टीवाले तर सगळे व्यवस्थित झाले असते.

ही लढाई इथेच संपणार नाही आणि इतक्यात संपणार देखील नाही. त्या मालकावर केस होईल, मग साक्षी-पुरावे.. मग अनंत काळ कोर्टाचे फेरे.. !!
सर्व लेख वाचल्यावर हे वाक्य वाचताना अक्षरशः अंगावर काटा आला.

जेपी's picture

6 Aug 2015 - 6:33 pm | जेपी

माफ करा.
पण मी क्रुष्णा निवास या घटनेबद्दल जेवढ वाचल त्यातुन एक कळत की रहिवाश्यांची इतरत्र घर होती.इमारत पडणार याची पुर्वसुचना मिळालती.मग रिकामी का नाही केली.शिकलेली माणसपण मग असा अडाणीपणा का ?

सुधांशुनूलकर's picture

6 Aug 2015 - 6:41 pm | सुधांशुनूलकर

सुहॄदांचा वियोग आणि घर जाणं या दु:खात आणखी भर..

त्यांना काही मदत करायच्या उद्देशाने रविवारी सकाळी ८ वाजता मी ठाकुर्लीला पोचलो.

सुहासजी, अशा वेळी केवळ दु:ख करत न बसता त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही, प्रसन्नने आणि इतर काही जणांनी काहीतरी कृती केली, त्याला दाद द्यावीशी वाटते.

आदिजोशी's picture

6 Aug 2015 - 6:53 pm | आदिजोशी

जुन्या चाळी पडल्या की काही प्रश्न मनात उभे राहतात.

मालकाचा? नक्कीच. बिल्डिंगच्या तपासणीची जबाबदारी मालक म्ह्णून त्याचीच आहे. बिल्डींगची डागडूजी करत नाही कारण सरकारने भाडेकरूंना अभय देण्यासाठी भाडे गोठवले आहे, त्यामुळे पैसाच येत नाही हातात. मुंबईत ३-४ इमारतींचे मालक असणारे, पण स्वतःसुद्धा चाळीच्या खोलीत राहणारे मालक ओळखीत आहेत. रिडेव्हलप करत नाही, कायदेशीर कारणं आहेतच, पण इतकी वर्ष नगण्य भाड्यात हे राहिले आता फुकट जागेचे मालक होणार ही भावना. त्यापेक्षा जुनी झाली की स्वतः सोडून जातील मग बघू ही आशा. लोभ सुटत नाही.

भाडेकरूंचा? नक्कीच. बिल्डिंग जुनी झालेली आणि मोडकळीस आलेली दिसत असूनही तिथे राहिले. कारण ४० वर्षापूर्वी गोठवलेल्या ५० रुपये भाड्यात अजून मुंबईत घर कुठे मिळणार. आत्त सोडली आणि रिडेव्हलपमेंट होऊन टॉवर उभा राहिला तर फुकट नुकसान. पिढ्यानुपिढ्या ज्या घरात राहतोय ते मालकीचे नाही, भाडे आजच्या काळात मालकावर अन्यायकारक आहे हे माहिती असूनही तिथेच टिच्चून राहणारे. बाहेरून कुठून कुठून येऊन भय्ये बस्तान बांधतात इथे, त्यामुळे मुंबई परवडत नाही हे सांगू नकाच.

लोभ दोघांनाही आहे. पण ज्याचं नुकसान मोठं त्याला मोठा पाठिंबा.

स्पा's picture

6 Aug 2015 - 8:36 pm | स्पा

वर आदिचा प्रतिसाद वाचला, या प्रकरणाबाबत सोडली काहीच बोलायचे नाही असे ठरवलेले होते.पण सुहास ने धागा टाकला म्हणून अजून काही गोष्टी लिहितोय.
यावर मला वादही घालायचा नाहिये किंवा अजून काहीच बोलण्यासारखे नाही, डोके काम करत नाहीये.

आदीने लिहिलेली केस टिपिकल गिरगाव, परळ चाळीतली आहे. (५० रुपये भाडे, मालकाचा पत्ता नाही,शंभर वर्षे जुन्या चाळी, टाॅवरची स्वप्ने) डोंबिवलीत काय प्रकार आहे याचा त्याने जराही अभ्यास केलेला दिसत नाही)

@सरकारने भाडेकरूंना अभय देण्यासाठी भाडे गोठवले आहे, त्यामुळे पैसाच येत नाही हातात. मुंबईत ३-४ इमारतींचे मालक असणारे, पण स्वतःसुद्धा चाळीच्या खोलीत राहणारे मालक ओळखीत आहेत. रिडेव्हलप करत नाही, कायदेशीर कारणं आहेतच, पण इतकी वर्ष नगण्य भाड्यात हे राहिले आता फुकट जागेचे मालक होणार ही भावना. त्यापेक्षा जुनी झाली की स्वतः सोडून जातील मग बघू ही आशा. लोभ>>><<<<

इकडचे सगळे मालक गाववाले, आगरी,हेच सरकार , यांचेच कायदे
कोठलेही भाडे गोठवलेले नाही, उलट भाड्यातुन ह्यांनी अनेक वर्षांची पाणीबिल थकवलेली, कनेक्शन कापल्याने बाहेरून पाणी भरायची वेळ लोकांवर आली.प्रसंगी दमदाटी करायला मागेपुढे पहात नाहीत.पोलिस सुद्धा यांच्या नादी लागत नाहीत,सामान्य सोडा.

<>>>>><<
भाडेकरूंचा? नक्कीच. बिल्डिंग जुनी झालेली आणि मोडकळीस आलेली दिसत असूनही तिथे राहिले. कारण ४० वर्षापूर्वी गोठवलेल्या ५० रुपये भाड्यात अजून मुंबईत घर कुठे मिळणार. आत्त सोडली आणि रिडेव्हलपमेंट होऊन टॉवर उभा राहिला तर फुकट नुकसान. पिढ्यानुपिढ्या ज्या घरात राहतोय ते मालकीचे नाही, भाडे आजच्या काळात मालकावर अन्यायकारक आहे हे माहिती असूनही तिथेच टिच्चून राहणारे. बाहेरून कुठून कुठून येऊन भय्ये बस्तान बांधतात इथे, त्यामुळे मुंबई परवडत नाही हे>>>>>>>

as I said earlier मुंबईतील चाळीत राहून दादर बोरिवली पारले अशा ठिकाणी फ्लॅट भाड्याने देणार्या लोकांबद्दल हा वरील प्रतिसाद असेल तर त्यावर माझे म्हणणे नाही,पण सरसकटीकरण असेल तर नक्कीच आक्षेप आहे, असेल.

इकडच्या अनेक चाळीत ( ठाकुर्ली  )मुख्यत्वे निम्न मध्यम आणि गरिब वर्ग राहतो त्याला फ्लॅट मध्ये राहण्याइतके भाडे परवडत नाही. पगडी प्रकारावर इकडच्या खोल्या पूर्वी विकल्या गेल्या. ज्यात एक दिड लाखापासुन चार लाखांपर्यत as a deposits मालकांनी घेतले. इतक्या वर्षांनी समजा भाडेकरुने रुम सोडुन जायचे ठरवले तर हे मालक आता त्यांना ते पॆसे देत नाहीत ,असेच सोडून जा म्हणून धमकवतात. टाॅवर ची कसली डोंबल्याची स्वप्न बघणार,ती स्वप्न हे मालक पहाताहेत. आहेत ते हक्काचे पॆसे देखिल मिळत नाहीयेत. आणि सर्वात मोठा विनोद पन्नास रुपये भाडे, ते असेल गिरगावात.  इकडे तिन ते पाच हजार भरुन लोकं रहात होती रितसर पावत्या मी गोळा करुन योग्य माणसांकडे दिलेल्या आहेत.

एका प्रसंगातून अनेक गोष्टी कळल्या, अनेक माणसे भेटली. ग्राऊंड लेवल वर काम करायला मिळालं.  मिडियाचे भयंकर स्वरूप पाहायला मिळाले.  इथे आपण बसुन लय चर्चा करु, प्रत्यक्षात हक्कासाठी एक एक पायरीवर झगडायला लागते तेव्हा कळते सो कोल्ड सिस्टिम.

इथेहि वादविवाद झडतील, प्रत्यक्षात खुप कमी आहेत जे खरचं मदतीला धावुन येतात.

सुहास, प्यारे आता पटकन नावे आठवतात, अनेक लोक भेटली.भेटत राहतील.

अजून लिहिण्यासारखे बरेच आहे,  पण इच्छाच मेलिये
सुहास ने लिहिलेच आहे, मित्र, शेजारी गेले. प्रयेकाची एक कहाणी होती. आम्ही आता मुक साक्षिदार उरलो आहोत

प्यारे१'s picture

6 Aug 2015 - 9:10 pm | प्यारे१

@ स्पा,

नाव काय घेतो आहेस. आपल्या लोकांसाठी थोडाफार हातभार लागला तर त्यात मिरवण्यासारखं काही नसतं.
आणि अजून मदत केलेली नाहीच. फक्त करु शकेन असं म्हटलंय. (तू डिटेल्स पाठवशील)
तुमच्या समोर वाढलेलं आसमानी आणि सुलतानी संकट अतिशय त्रासदायक आहे ! :(

हे ही दिवस जातील. आशा बाळगून अस.

आदिजोशी's picture

7 Aug 2015 - 2:49 pm | आदिजोशी

माझा प्रतिसाद अर्थातच मला असलेल्या माहितीवर आधारीत आहे, ज्यात गिरगाव, दादर, परळ, अंधेरी, बोरिवली ह्या जागा आहेत. त्यामुळे डोंबिवलीत तशी अवस्था नसल्यास आणि भाडेकरूंची अवस्था वेगळी असल्यास प्रतिसाद मागे घ्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही.
तुझ्या मनस्थितीची कल्पना असल्याने उगाच फाटे न फोडता प्रतिसाद इथेच थांबवतो.

...........उगाच फाटे न फोडता प्रतिसाद इथेच थांबवतो."

मिपावर असे लोकशाही वातावरण असल्यानेच,

आम्ही "मिपाकर" आहोत.

श्रीरंग_जोशी's picture

6 Aug 2015 - 8:47 pm | श्रीरंग_जोशी

या प्रकारच्या बातम्या गेली अनेक वर्षे वृत्तपत्रांत वाचत आलेलो आहे.
पण अगदी जवळून झालेले हे शब्द चित्रण प्रथमच वाचण्यास मिळाले.

तुमचे व स्पा चे कौतुक वाटते.

रातराणी's picture

7 Aug 2015 - 11:10 am | रातराणी

सुन्न झालेय वाचून. पै पै जोडून उभा केलेला संसार असा कोसळल्यावर काय होत असेल याची कल्पनासुद्धा करावीशी वाटत नाही.

राही's picture

7 Aug 2015 - 12:05 pm | राही

वाचून सुन्न आणि हतबलतेमुळे अधिकच सुन्न.
सर्वत्रच आभाळ फाटलेले दिसतेय. कुठे कुठे आणि किती किती म्हणून टाके घालणार?

अशा भयानक परिस्थितीत माणूस अति संवेदनशील किंवा अति क्रूर होतो ... आणि त्याचे हे उदाहरण आहे

फारएन्ड's picture

9 Aug 2015 - 8:57 am | फारएन्ड

वाईट वाटले वाचून. एकदम इफेक्टिव्ह लिहीले आहे. तुमच्यासकट जे मदतीला गेले त्यांना टोटल रिस्पेक्ट!

शेवटची काही वाक्ये तर फारच निराशाजनक परिस्थिती दाखवतात.

वेल्लाभट's picture

10 Aug 2015 - 3:39 pm | वेल्लाभट

तुमचं लेखन खूप प्रभावी आणि मुद्देसूद आहे. तुम्ही, प्रसन्नने आणि इतर ज्या कुणी खरी आणि मनापासून मदत केली त्यांच्याबद्दल प्रचंड आदर.

काही गोष्टी मला वाटलेल्याही सांगाव्याशा वाटतात. खरं खोटं माहीत नाही, पण ठाण्याच्या बिल्डिंगला धोकादायक असल्याचा इशारा देऊन झाला होता. असं असूनही रहिवाशांनी तात्पुरतं पर्यायी घर का बघितलं नाही असा प्रश्न पडला. परिस्थिती नसेल... बरं. इतकी की कुणा नातेवाईकाकडे, मित्राकडे कुठेही व्यवस्था होऊ नये? एकांचा मुलगा अमेरिकेत कामाला होता. किमान त्याने तरी बिल्डिंगची अवस्था बघून आई बाबांना पर्यायी व्यवस्था करून द्यायला हवी होती नाही का? अमेरिकेतले सेफ्टी स्टँडर्ड्स इत्यादि गोष्टी इथे का लागू केल्या नसाव्यात त्याने? एकांचा घोडबंदर ला फ्लॅट होता तरीही ते तिथे करमत नाही म्हणून इथे राहिले.

सकाळी म्हणे एकांच्या घरात प्लॅस्टर मधून सिमेंट पडत होतं फ्री फ्लो मिठासारखं. तेंव्हा तरी काहीतरी डेस्परेट अ‍ॅक्ट व्हायला हवी होती!

मला कल्पना आहे हे वाचून काहींना राग येईल. पण कळकळ यामुळे वाटते ना, की अरे कारण काही असो, पण टू द स्लाइटेस्ट ऑफ इट्स मेजर, कुठेतरी तिथेच राहण्याचा अट्टाहासही आज त्यांच्या दगावण्याला कारणीभूत झाला. जीव महत्वाचा की काही शेवटी? बरं, तिथे राहिले नसते तर हक्क थोडीच गेला असता? त्यासाठी इतर मार्ग आहेत. आज गेले ते गेलेच ना शेवटी? याचं वाईट वाटतं.

हां, बाबा भूकंपच झाला, कल्पनाच नव्हती... समजू शकतो. पण जर थोडी का होईना शक्यता दिसत होती आणि तरीही तुम्ही काहीच अ‍ॅक्ट केली नाहीत तर तेही कुठेतरी चुकलंय.. इतकंच.

सुहास झेले's picture

10 Aug 2015 - 9:37 pm | सुहास झेले

हो ठाण्याच्या इमारतीला नोटीस बजावली होती... ठाकुर्ली येथे ही नोटीस दिली गेली, पण ती जागा मालकाकडे.. रहिवाश्यांना नाही आणि ती मालकाने दुर्लक्षित केली आणि भाडेकरू आणून त्यांना तिथे घुसवू लागला. अगदी मागच्या महिन्यात वसुली करून गेलाय तो भाड्याची !!

अश्या लोकांनी घर न सोडण्याची अनेक कारणे असतील....प्रत्येकाची वेगवेगळी आणि त्यांच्यादृष्टीने ठोस...खूप गोष्टींची कल्पना ही करवत नाही... त्यामुळे कोणाच्या काय चुका काढणार आपण. शेवटी काय जगण्याची धडपड आणि स्पर्धा कोणालाही चुकली नाही हेच खरे !!

स्पा ने लिहिल्याप्रमाणे मालक पागडी परत देत नसल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही सोडून जाता आले नसावे.
स्थानीक पोलिसही त्यांच्या वाट्याला लागत नसल्याने सामान्य माणूस पंगा घेऊ शकत नाही.

पिलीयन रायडर's picture

11 Aug 2015 - 3:25 am | पिलीयन रायडर

वाचुन फार वाईट वाटलं. अशी वेळ कोणावरही न येवो.

अशा परिस्थितीमध्ये जे लोक सध्य बेघर झालेत (अगदी सामान, कपडेही नसणार) त्यांची जबाबदारी कुणाची?
मालकाची? रहिवाशांची स्वतःची? की सरकारची?

कारण पुर वगैरे आल्यास थोडे दिवस एखाद्या हॉल मध्ये रहाणं ठिक आहे, पण ज्यांची कुठेच काही सोय नाही त्यांनी नक्की काय करायचं आता?