महाभारतातली माधवी

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
27 Jul 2015 - 7:36 pm

सुर्याची लेकरे मधील एका प्रतिक्रियेत श्री स्वॅप्स यांनी माधवीचा उल्लेख केला. महाभारतातील अनुकंपनीय पात्रांमध्ये त्यांनी माधवीचा उल्लेख केला. त्या अनुषंगाने आलेल्या उत्सुक प्रतिक्रियांमुळे ही जिलबी पाडायची इच्छा झाली. त्यामुळे याचा दोष पुर्णपणे स्वॅप्स यांना द्यावा ;).

****************************************************************************************************

दुराग्रह आणि आत्मप्रौढी हे दोन दुर्गुण एखाद्या माणसाला किती त्रासदायक ठरु शकतात आणि पर्यायाने आपल्या आजुबाजुच्या निष्पाप लोकांना किती त्रास देउ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिचार्या माधवीची कथा. पांडवांना सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीदेखील देणार नाही या अट्टाहासावर ठाम असलेल्या आणि इतरांच्या बळावर प्रौढी मिरवणार्या दुर्योधनाला समजावुन कृष्णाची संधी स्वीकारण्याचा सल्ला देण्यासाठी नारद मुनींनी दुर्योधनाला ही कथा सांगितली.

ही कथा आहे विश्वामित्रांची आणि त्यांचा शिष्य गालव याची. ही कथा आहे ययातीची. पण त्याहुन महत्वाचे म्हणजे ही व्यथा आहे ययातीच्या अप्सरेहुन सुंदर मुलीची माधवीची. ययाती बद्दल जितके अधिक वाचावे तितके तो एक शूर राजा असला तरी एक नालायक पिता होता याची खात्री आपल्याला मनोमन पटत जाते. हा तोच ययाती ज्याने तारुण्य मिळवण्यासाठी आपल्या मुलांच्या भवितव्याची वाट लावली.

रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा. वार्धक्याची भिती वाटण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी कारणे होती आणि नेमके हेच ओळखुन शुक्राचार्यांनी त्यांच्या मुलीची उपेक्षा केल्याबद्दल त्याला वार्धक्याचा शाप दिला. गयावया केल्यावर ययातीला उ:शाप मिळाला की तो त्याच्या वार्धक्याची त्याच्या कुठल्याही मुलाच्या तरुणपणाशी अदलाबदल करु इच्छितो. विषयवासनेच्या आहारी गेलेल्या ययातीने १००० वर्षांच्या कालावधीसाठी यदु, तुर्वसु, द्रह्यु, अनु आणि पुरु या आपल्या पाचही पुत्रांकडे तारुण्याची याचना केली. १००० वर्षांत सर्व सुखे उपभोगुन निश्चिंतमनाने निवृत्ती स्वीकारता येइल असे त्या बिचार्याने ठरवले होते.

पहिल्या चार पुत्रांनी पित्याच्या क्षोभाची तमा न बाळगता या असमान आणि अन्य्याय्य मागणीला चक्क नकार दिला. त्यांनी पदोपदी विषयवासना “उपभोगाने शमत नाही तर वाढतच जाते”. “भोग हे यज्ञात आहुतीत पडलेल्या तूपाचे काम करतात आणि विषयवासनांची वन्ही वाढवतच जातात” हे त्या अभाग्याला समजावण्याचे प्रयत्न केले पण सदसद्विवेकबुद्धी गमावलेल्या त्या राजाने उलट त्या चौघांनाच शाप दिले. यदुला शाप मिळाला की त्याचे वंशज कधीही राजे बनु शकणार नाहीत तर तुर्वसुला लवकरच अधोगती होउन निर्वंश होण्याचा शाप मिळाला. द्रह्युला नामधारी राजेपण मिरवण्याचा शाप मिळाला तर अनुकडून आणि त्याच्या वंशजांकडुन यज्ञयाग करण्याचा अधिकार काढुन घेतला गेला. पाचवा पुरु मात्र पहिल्या चार जणांची अवस्था बघुन शहाणा झाला असावा आणि त्याने नम्रपणे पित्याचे वार्धक्य स्वीकारले. त्याला मात्र १००० वर्षांनंतर राज्य मिळाले आणि समृद्ध राज्याचा वारसा देखील.

यदुच्या वंशातच पुढे यादव आणि यादव वंशात कृष्ण जन्मला तर द्रह्युच्या वंशात पुढे भोज आणि त्याच्या वंशात पुढे नामधारी राजे जन्मले ज्यांना कधी कंस / जरासंधांनी खुळ्खुळ्यासारखे स्वार्थासाठी वापरले तर कधी त्यांनी राजे असुनही कृष्ण / बलरामाच्या सावलीत नामधारी बनून राहणे पसंत केले. तुर्वसुचे वंशज नंतर यवन म्हणुन हिणवले गेले तर अनुचे वंशज म्लेंच्छ म्हणुन. पुरुच्या वंशात मात्र पौरव (अथवा कौरव ) जन्माला आले आणि त्याचे वंषज कुरु म्हणुन प्रसिद्ध झाले.

माधवी याच ययातीची मुलगी. ज्या ययातीने स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मुलांच्या आणि वंशाच्या आयुष्याचे आणि भविष्याचे वाट्टोळे केले त्याच ययातीने स्वतःच्या मोठेपणाचा तोरा मिरवण्यासाठी आणि नंतर स्वर्गप्राप्तीसाठी आपल्या मुलीच्या आयुष्याची माती केली. आणि हे सर्व झाले गालव ॠषींच्या दुराग्रही हट्टामुळे.

गालव ऋषी म्हणजे विश्वामित्र ऋषींचे शिष्य. त्यांनी १००० वर्षे (अबबबब) विश्वामित्रांची मनापासून सेवा केली (ही सुद्धा एक उपकथा वेगळी आहेच पण विस्तारभयास्तव इथे देत नाही). त्यामुळे प्रसन्न होउन विश्वामित्रांनी त्यांना सांगितले की तुझे शिक्षण आता पुर्ण झाले तु आता योग्य ठिकाणी जाउन अर्थार्जन, धर्मार्जन कर. परंतु गालव ऋषींना गुरुच्या ऋणांतुन मुक्त झाल्याशिवाय आणि गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणे बरे वाटेना. वास्तविक गालव ॠषी अतिशय गरीब होते आणि त्यांना गुरुदक्षिणा देणे जमणार नाही हे विश्वामित्रांना माहिती असल्याने त्यांनी वारंवार गालव ऋषींना गुरुदक्षिणा नको म्हणुन सांगितले पण गालव ऋषींचा गुरुदक्षिणा देण्याचा अट्टाहास आणि दुराग्रह नडला. ते विश्वामित्रांची पाठ सोडायलाच तयार होइनात. अखेर चिडुन विश्वामित्रांनी त्यांना सांगितले की "एक कान काळा असणारे शशीकिरणांसारख्या दूधी रंगाचे ८०० घोडे मला गुरुदक्षिणा म्हणुन आणुन दे. जा त्वरेने निघ.”

ही असली विचित्र मागणी ऐकुन मात्र गालव ऋषींची पाचावर धारण बसली. ८०० घोडे गुरुदक्षिणा म्हणून द्यायची त्यांची ऐपत नव्हती तिथे ८०० पांढरेशुभ्र घोडे ते देखील एक कान काळा असणारे ते कुठुन आणुन देणार? जगाचा स्वामी तो विष्णु सोडून आपली मदत कुणीच करु शकत नाही याची त्यांना जणू खात्रीच पटली आणि ते चिंताग्रस्त झाले. विष्णु जरी त्यांच्या मदतीला नाही गेला तरी त्या विष्णुचे जे वाहन ते गरुड गालव ऋषींचे मित्र होते. ते नेमके त्यावेळेस तिथुनच चालले होते. त्यांनी गालव ऋषींना मदत करायचे आश्वासन दिले.

मग गरुडानेच गालव ऋषींना सांगितले की समस्त ब्रह्मांडात त्यांची मदत करु शकेल असा एकच राजा आहे आणि तो म्हणजे ययाती. मग गरुडाच्या पाठीवर बसुन गालव ॠषी ययातीकडे गेले. गरुडाने ययातीला विनंती केली की गालव ऋषींना त्याने मदत करावी. पण त्यावेळेस ययातीचा खजिना तर रीता होता. त्याच्याकडे काही असे घोडे नव्हते. पण दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवण्याचा कमीपणा तर पदरी पाडून घ्यायचा नव्हता. स्वतःची कीर्ती तर अबाधित राखायची होती. म्हणुन ययातीने परस्पर गालव ऋषींना सांगितले की "माझी अप्सरेहुन सुंदर कन्या माधवी अजुन अविवाहित आहे. तिच्या सौंदर्यामुळे तिला अनेको राजांकडुनच काय तर देवाधिकांकडुनही मागणी आलेली आहे. तिच्या बदल्यात हुंडा म्हणुन कुठलाही राजा तुला ८०० घोडेच काय तर सगळ्या जगातली संपत्ती तुझ्या पायाशी ओतेल. तु हिलाच घेउन जा आणी हिच्या बदल्यात तुला पाहिजे ते मिळव"

गालव ऋषींना देखील अशी काही भिक्षा मिळवण्यात गैर वाटले नाही. बापाच्या सांगण्यावरुन बिचार्या माधवीची परवड सुरु झाली. एका भोग्य वस्तु सारखी ती गालव ऋषींच्या मागुन निघाली. गालव तिला सगळ्यात आधी अयोध्येच्या इक्श्वाकुकुलीन राजाकडे घेउन गेले. आयोध्यापतीला बिचार्याला मूल नव्हते. माधवीला हमखास मूल होइल असे गालव ऋषींनी सांगताच त्याला आनंदच झाला. पण तिच्या बदल्यात लागणारे ते तसले ८०० घोडे मात्र त्यांच्याकडे नव्हते.

त्या राजाने एखाद्या गुलामाचे करतात त्याप्रमाणे माधवीचे निरीक्षण केले आणि मग गालवांना सांगितले की "या स्त्रीमध्ये जे सहा अवयव उन्नत हवेत तसे हिचे आहेत, जे सात अवयन कमनीय असायला हवेत ते सात अवयव कमनीय आहेत, ज्या ३ जागा खोलगट असायला हव्यात त्या खोलगट आहेत आणि जे पाच अवयव लाल असायला हवेत ते तसेच आहेत. थोडक्यात एक महापराक्रमी पुत्राला जन्म देण्यासाठी जे गुण एखाद्या स्त्रीमध्ये हवेत ते सगळे हिच्यामध्ये आहेत." आता हे सगळे वर्णन करण्यासाठी राजाने माधवीचे किती सूक्ष्म आणि कसे निरीक्षण केले असावे हे वेगळे सांगायला नको. अर्थात राजा मोठा न्यायी आणि दिलदार होता. तो अतिशय उदारपणे गालवांना म्हणाला की असे बघ माझ्याकडे ८०० नसून केवळ २०० च घोडे तुला पाहिजेत तसे आहेत तर तु माधवीला इथेच सोडुन जा. मी तिला फक्त एकच मूल होइपर्यंत इथे ठेउन घेइन आणि मग तु तिला परत घेउन जा. उरलेले ६०० घोडे तु कुठल्याही इतर ३ राजांकडुन वसून कर. हिच्यासाठी २०० घोडे काय कुठलाही राजा देइल. माधवीला प्रत्येक पुत्रप्राप्तीनंतर कौमार्याची परत प्राप्ती होइल असा आशिर्वाद असल्याने गालवांनी या योजनेला संमती दिली. अयोध्येच्या राजाला मग माधवीकडुन वसुमानस नावच्या पुत्राची प्राप्ती झाली.

वसुमानसाच्या जन्मानंतर गालव ॠषी परत माधवीला न्यायला आले. तिला घेउन मग ते काशीनरेश दिवोदासाकडे गेले. या सर्व प्रकरणाची किर्ती दिवोदासाकडे आधीच गेली होती. आणि माधवीसारख्या सुंदर स्त्रीला भोगायला अर्थात तोही आतुर झालाच होता. गालवाला हवे असलेल्या घोड्यांसारखे २०० घोडे त्याच्याकडेही असल्याने गालव माधवीला घेउन त्याच्याकडे येणार याचीही त्याला खात्रीच होती. माधवीपासुन त्यालाही मग पुत्रप्राप्ती झाली. त्यांच्या मुलाचे नाव होते प्रतार्दन.

त्यानंतर गालव ऋषी माधवीला भोज राजा उशिनराकडे घेउन गेले. त्यांच्यापासुन माधवीला सिवी नावाच्या पुत्राची प्राप्ती झाली. मात्र दुर्दैवाने उशिनराकडेही तसले केवळ २०० च घोडे असल्याने एका पुत्राच्या प्राप्तीनंतर त्यानेही माधवीला परत गालवांकडे सुपुर्त केले.

अश्याप्रकारे गालवांकडे ६०० घोडे जमले होते. पण तरीही उरलेले २०० घोडे कुठे मिळतील हे त्यांना उमजेना म्हणुन ते परत गरुडाकडे गेले. गरुडाने त्यांना सांगितले की "उरलेले २०० घोडे मिळवण्याचा प्रयत्न देखील करु नकोस. कारण ते ब्रह्मांडात कुठेही अस्तित्वात नाहित. अश्याप्रकारचे १००० घोडे पुर्वीच्या काळी केवळ वरुणाकडे होते. गाधी नावाच्या एका राजाच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा जेव्हा ऋचिक ऋषींनी बोलुन दाखवली तेव्हा ते घोडे ऋचिकांनी मिळवुन दिल्यास आपल्या मुलीचे लग्न त्यांच्याशी लावुन देण्याची तयारी गाधीने दाखवली. तेव्हा ऋचिकांनी वरुणाच्या यज्ञाचे पौराहित्य करुन हे घोडे त्याच्याकडुन मिळवले आणि गाधींच्या मुलीशी लग्न जमवले. गाधींनी मग हे १००० घोडे दान केले. त्यातले २०० घोडे प्रत्येकी या तीन राजांनी मिळवले आणि उरलेले ४०० घोडे नदीत वाहुन गेले. त्यामुळे पृथ्वीतलावर आता असे केवळ ६०० च घोडे उरले आहेत." वास्तविक विश्वामित्र ऋषी या गाधीचेच पुत्र. म्हणजे एकप्रकारे हे ६०० अश्व एकेकाळी त्यांच्याच मालकीचे होते आणि जगात असे ८०० अश्व अस्तित्वातच नाहित हे त्यांना माहिती असणार आणि गालव त्यांची गुरुदक्षिणा पण कधीच देउ शकणार नाहित हे देखील विश्वामित्रांना माहिती असणार. गालवांच्या आडमुठ्या हट्टीपणाला त्यांनी चांगलाच उतार शोधुन काढला होता.

पण गरुड देखील आपल्या मित्राची प्रतिज्ञा पुर्ण करण्यासाठी झपाटलेला होता. त्याने यातुनही एक मार्ग काढला. गरुड गालवांना म्हणाला की प्रत्येक राजाने एका पुत्राच्या बदल्यात तुला २०० घोडे दिले. याचाच अर्थ असा की या माधवीबरोबर संग करुन मिळवलेला एक पुत्र २०० घोड्यांइतका मौल्यवान आहे. त्यामुळे २०० घोड्यांच्या बदल्यात तु या माधवीलाच विश्वामित्र ऋषींना अर्पण कर. गालव मग ६०० घोडे आणि माधवीला घेउन विश्वामित्र ऋषींकडे गेले. आणि सर्व कथा सांगुन एका पुत्राच्या प्राप्तीसाठी माधवीला गालवांनी अखेर विश्वामित्रांनाच अर्पण केले. तिला बघुन विश्वामित्र देखील गालवांना म्हणाले की "हिला आधीच माझ्याकडे घेउन आला असतास तर मलाच हिच्याकडून ४ पुत्र मिळाले असते. असो. मी माधवीकडुन एका पुत्राची प्राप्ती करुन घेउन. हे ६०० घोडे तु असे कर जवळपासच्या कुरणात चरायला सोडुन दे". थोडक्यात ज्या माधवीने त्या ६०० घोड्यांसाठी इतकी मानखंडना सोसली त्या ६०० घोड्यांचे विश्वामित्रांच्या दृष्टीने काहिच महत्व नव्हते. गालवांच्या नसत्या अट्टाहासापायी माधवीला मात्र चार पुरुषांनी भोगले. यथावकाश माधवीने विश्वामित्रांच्याही मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अष्टक.

वसुमानस पुढील काळात सत्शील आणि धर्माचा रक्षणकर्ता म्हणुन प्रसिद्धी पावला तर सिवी दानशूर म्हणुन आणि प्रतार्दन महापराक्रमी निपजला तर अष्टकाने अनेको यज्ञांचे पुण्य जमविले. अष्टकाच्या जन्मानंतर विश्वामित्रांनी माधवीला गालवांना परत केले तर गालवांनी तिला तिच्या पित्याच्या म्हणजे ययातीच्या हवाली केले.

प्रत्येक पुत्रप्राप्तीनंतर परत कुमारिका झालेल्या माधवीला तिच्या लोकोत्तर सौंदर्यामुळे लग्नाच्या बाजारात मोठीच किंमत असल्याने ययातीने तिचे परत लग्न जमवण्याचा घाट घातला आणि गंगा यमुनेच्या संगमावर तिचे स्वयंवर थाटले. तिथे अनेक नाग, यक्ष आणि गंधर्व जमले होते (माधवीची "किर्ती" एव्हाना सगळीकडे पोचली असावी कारण मोठ्या राजांपैकी कोणी तिथे असल्याचा उल्लेख येत नाही) पण झाल्या प्रकाराला विटलेल्या आणि आपल्या देहाची झाली ती विटंबना पुरेसे झाली असे बहुधा वाटत असलेल्या माधवीने लग्नाच्या ऐवजी वनवासाचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर अनेको वर्षे ती भ्रमिष्टावस्थेत वनांतुन फिरत राहिली आणि तपश्चर्या करत राहिली. पण तिचे भोग लवकर संपले नाहित.

देहाचे सर्व भोग उपभोगुन ययाती यथावकाश स्वर्गात पोचला. पण तिथेही त्याने माती खाल्ली. आपल्या ऐश्वर्याचा आणि सामर्थ्याचा त्याला गर्व झाला. अहंकारातुन त्याने इतर सर्वांना स्वतःपेक्षा कनिष्ठ लेखले परिणामस्वरुपी तू स्वर्गात राहण्याच्या लायकीचा नाही असे म्हणुन इतर सर्वांनी आणि इंद्राने मिळुन त्याला पृथ्वीतलावर ढकलुन दिले. खाली पडत असताना पडायचेच असेल तर जिथे सत्शील माणसे जमली आहेत अश्या ठिकाणी मी पडावे अशी इच्छा ययातीने प्रदर्शित केली. त्याचवेळेस नैमिषारण्यात नेमके माधवीचे चार पुत्र (म्हणजे ययातीची नातवंडेच) एकत्र जमुन यज्ञ करत होती. ययाती त्यांच्यामध्येच जाउन पडला. हिंदी चित्रपटातले सगळे योगायोग एकत्र जमुन यावेत तद्वत नेमकी रानावनातुन फिरणारी माधवी तिथेच आली आणि गालव ऋषीदेखील पोचले. मुलांनी आपल्या आईला ओळखले. ययातीला मात्र नाही. पण माधवीने बापाला ओळखले आणि तिनेच आजा नातवंडाची भेट घडवुन आणली. अनेको वर्षांच्या सदाचरणाने आणि यज्ञाने माधवीच्या चारही मुलांनी अपुर्व पुण्यसंचय केला होता. माधवीनेदेखील पुण्य कमावले होते. आयुष्यभर बापाच्या किर्तीच्या हव्यासापोयी मानखंडना वाट्ञाला आलेल्या त्या राजकुमारीने परत एकदा त्याग करत आपल्या आणि आपल्या चारही मुलांच्या पुण्यसंचयाच्या आधारावर ययातीला परत स्वर्गात पोचवले. गालव ऋषींनीदेखील ययातीने केलेली मदत स्मरुन आपल्या पुण्यातला एक अष्टमांश भाग ययातीला दिला आणि अहंकारामुळे धरतीवर पोचलेला ययाती गर्वहरण होउन परत स्वर्गात पोचला. माधवी तिच्या ललाटी असलेला वनवास भोगण्यासाठी परत वनात गेली.

अश्याप्रकारे गालवांचा अट्टाहासी दुराग्रह आणि ययातीच्या कीर्तीच्या लालसेची अहंकाराची आणि गर्वाची फळे मात्र निष्पाप आणि निरागस माधवीने भोगली.

संस्कृतीनाट्यधर्मइतिहासवाङ्मयकथासाहित्यिकसमाजलेख

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Jul 2015 - 8:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

छान लिहिलयं. वाखुसाआ.

अस्वस्थामा's picture

27 Jul 2015 - 8:09 pm | अस्वस्थामा

हिंदी चित्रपटांच्या निर्बुद्ध अशा कथांचा उगम कोठून आहे ते कळून येतेय. अंगावर येणारे आहे सगळेच..
पण अशा तर्‍हेचे कथानक कोणत्या हेतूने रचले ते काही समजत नाही.
ययातिची रचना तर काय म्हणून अशी अति व्हिलनिक आणि तरीही स्वर्गात जाणारा अशी केलीय काय माहित. की फक्त इतर त्यागमूर्तींचे त्याग झळाळून दिसायलाच की काय त्याची पात्र योजना आहे..

विवेकपटाईत's picture

27 Jul 2015 - 8:10 pm | विवेकपटाईत

ययाती आज हि जिवंत आहे आणि आता तर त्याचा अहंकार आणखीनच वाढला आहे,
.....
बघुन धरतीची दशा
करू लागला ययाति विचार
की शोधली पाहिजे आता
अंतरिक्षात दूसरी धरा कुठे तरी दूर.
किंवा
आपल्या शक्तिने देवताना करेन च्युत
मग भोगू शकेन स्वर्णिम स्वर्गातुन
अप्सरांना नित-नवीन.
कदाचित! अक्षय अमृताचे पात्रच
भागवू शकेल माझी तहान.
...
http://vivekpatait.blogspot.in/2011/04/blog-post_18.html

dadadarekar's picture

27 Jul 2015 - 8:17 pm | dadadarekar

किती दुष्टपणा हा !

याचा 'दोष' घ्यायला मी अर्थातच तयार आहे आणि तसा तो दिल्याबद्दल आधी तुम्हांला धन्यवाद!

माधवी ह्या पात्राला मी अनुकंपनीय का म्हणालो याचे सर्व विवेचन तुमच्या लेखात आलेले आहेच. त्याबद्दल ऊहापोह करण्याची आवश्यकता नाहीच. मला इथे या कथेच्या वेगळ्या अर्थाबद्दल बोलायचे आहे. माधवीला कौमार्यपुनर्प्राप्तीचा वर होता हे खरेतर त्या काळात (म्हणजे ही कथा आज ज्ञात असलेल्या स्वरूपात रूढ होण्याच्या आधी) 'कौमार्य ही संकल्पनाच तेव्हा फारशी महत्त्वाची नसावी' असे समजले पाहिजे. कौमार्यरक्षणापेक्षा त्या काळात जननक्षमता तत्कालीन सामाजिक-आर्थिक परिस्थितीमध्ये जास्त महत्त्वाची होती. दुसरे असे, की माधवीच्या स्वयंवराचा भाग हा नंतर आला असावा. कारण विवाहसंस्था रूढ होण्याच्या आधीची मुक्तसमाजरचना ह्या प्रसंगातून अप्रत्यक्षरित्या दृग्गोचर होते.

माधवीची शोकांतिका ही की, तिला 'संपत्ती' प्रमाणे, देण्याघेण्याच्या वस्तूप्रमाणे वागवले गेले. तेही तिच्या मनाचा, जोडीदार निवडण्याच्या तिच्या अधिकाराची पर्वा न करता. आणि ह्याहून अधिक धक्कादायक हे, की ह्या सर्व प्रकाराला कुणीही आक्षेप घेताना दिसत नाही! उलट याचे समर्थन त्याकाळात होत होते की काय अशी शंका उत्पन्न होते.

आज जेव्हा आजूबाजूला मानवी तस्करीचा एवढा भयानक प्रकार पाहतो तेव्हा 'माधवी'ची आठवण आल्याशिवाय राहत नाही!

अस्वस्थामा's picture

27 Jul 2015 - 8:46 pm | अस्वस्थामा

पण असा अंदाज करायला या एका कथेखेरिज इतर काही कथा अथवा पुरावे आहेत का ? नै तर एक कथा ही अतिशयोक्त अशी करुणरस-कथाही असू शकते.

एस's picture

27 Jul 2015 - 10:15 pm | एस

चांगली शंका आहे.

ह्या कथेचे अंतरंग उलगडण्यासाठी आधी काही तथ्ये पाहिली पाहिजेत. त्यातले पहिले म्हणजे महाभारताचा काळ हा कालखंड आणि 'लोककथा-> जय -> भारत -> महाभारत' हा दीर्घ कालखंडात विभागलेला प्रवास ह्या दोन्ही दृष्टींनी पाहू गेल्यास रामायण ह्या दुसर्‍या प्रसिद्ध महाकाव्यापेक्षा बराच जुना ठरतो. दुसरे तथ्य म्हणजे महाभारतातली भव्यता ही नंतर वाढत गेली. जर तसे युद्ध झाले असलेच तर ते प्रत्यक्षात बरेच लहानसे असे टोळीयुद्ध होते.

ह्याबरोबरच महाभारतीय आर्थिक-सामाजिक परिस्थिती आणि प्रवाहांचा धांडोळा घ्यायला महाभारताच्या बाहेर इतर 'दर्शनां'चा आधारही घ्यावा लागतो. त्यात चार्वाकांच्या 'वसंतोत्सवाचा' संदर्भ महत्त्वाचा आहे.

इतरत्रही खुल्या समाजजीवनाचे संदर्भ विपुल सापडतात. दुर्गा भागवत आणि रा. चिं. ढेरे इत्यादी विद्वानांनी यावर विपुल भाष्य केले आहे. मिपावरच एक धागा होता वि. का. राजवाड्यांच्या 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकावर.

विवाहसंस्थेची सुरुवात कशी झाली यावर एक कथाही आहे पुराणात. आत्ता संदर्भ नसल्याने त्यावर भाष्य करीत नाही. पण तात्पर्य असे की कौमार्यरक्षणाच्या आणि स्त्रीपुरूष संबंधांमधील मोकळीक ही तत्कालीन साहित्यात विपुल प्रमाणात आढळून येते.

उगा काहितरीच's picture

27 Jul 2015 - 8:56 pm | उगा काहितरीच

दंडवत स्विकारावा महाराज !

कधीही वाचलं ऐकलं नव्हतं या दुर्दैवी माधवीबद्दल.काय ते आयुष्य.
अशाच नेहमी न वाचण्यात येणा-या अजुनही पात्रांबद्दल वाचायला आवडेल.

प्रचेतस's picture

27 Jul 2015 - 9:40 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.

बाकी ययाती खरेच भोगलोलुप होता का?

मृगयेच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या तहानलेला ययाती आपल्या राज्यात आलेला पाहून देवयानी स्वतः त्याला मागणी घालते. ब्राह्मण क्षत्रिय विवाह हा धर्मबाह्य असून तसेच इतरही अनेक कारणांमुळे विवाहास नकार देणार्‍या ययातीला अखेर देवयानीच्या आग्रहापुढे मान तुकवावी लागते.

नंतर शर्मिष्ठेशी विवाहालासुद्धा तो नकारच देतो अखेर तिच्या आग्रहापुढे आणि युक्तीवादापुढे हार पत्करुन तो गांधर्वविधी करुन तीला पुत्रदान करतो.

ह्या दोन्ही ठिकाणी ययातीने नसून देवयानी व शर्मिष्ठेनेच पुढाकार घेतल्याचे दिसून येते.

शुक्राचार्‍यांच्या जरेच्या शापानंतरही पुरुकडून आपली जरावस्था त्याला देऊन आणि त्याचे यौवन आपल्याकडे घेऊनही ययाती फक्त विषयलोलुपतेच रममाण झाल्याचे आढळत नाही. ह्या काळात त्याने भरपूर यज्ञ केले, दाने दिली, चोर दरवडेखोरांचा बंदोबस्त केला. आपले राज्य वाढवले. इतके सर्व करुन आपले राजाचे कर्तव्य पूर्ण करुन विरक्त होऊन आपली वृद्धावस्था परत घेतली व घोर तपानुष्ठान करुन शशरीर स्वर्गास गेला. सदेह स्वर्गास जाणारा हा पहिला राजा. इतके करुनही तपाचा गर्व झाल्याने पतन झालेल्या ययातीने आपले पतन पृथ्वीवर सज्जनांच्याच ठिकाणी व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

अर्थात हा झाला महाभारतातल्या ययातीच्या व्यक्तीमत्वाचा अल्पसा आढावा.

ययातीची कथा अतीप्राचीन. महाभारतात ती आहेच, रामायण, भागवत आणि इतर पुराणांतही ती येते. पण ययातीचे सर्वात जुने उल्लेख ऋग्वेदांत आहेत. त्याबरोबरच ययातीच्या इतर पुत्रांचेही.
ऋग्वेदातले उल्लेख सोडले तर महाभारत आणि इतर ठिकाणी ह्या कथा रूपकार्थाने येतात. ऋग्वेदात सातव्या मंडलात दाशराज्ञ युद्धाचे वर्णन आहेत. त्यात ह्या पाचही पुत्रांचे वर्णन आले आहे ते वेगवेगळ्या टोळीनायकांच्या रूपाने. यात सुदासाचा विजय होऊन अनु, दुह्यु ह्यांना युद्धात नदीत बुडून मरण येते तरपुरुंना सरस्वती पार करुन पुढे यावे लागते तर तुर्वसु सिंधुपार करुन जातात.

नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद प्रचेतस.
महाभारतामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे ..... ज्याला जे वाटेल नि आवडेल ते त्यानं घ्यावं.

अगदी समर्पक प्रतिसाद प्रचेतस! ययाती लंपट अजिबात नव्हता. वि.स.खांडेकरांनी त्यांच्या ययाती नामे कादंबरीत तसा रंगवला आहे. मात्र ते साफ चुकीचं आहे.

शिवाय एकेक राजाकडून एकेक पुत्रप्राप्ती करवून घ्यायची योजना माधवीची आहे. संदर्भ : महाभारत उद्योगपर्व ५.२ पीडीएफ पान क्रमांक ७८ https://www.scribd.com/doc/19449377/%E0%A4%89%E0%A4%A6-%E0%A4%AF%E0%A5%8...

यावरून दिसतं की माधवीची कन्यादानास हरकत नसावी. पुढे असंही म्हंटलंय की चार पुत्रांची आई व्हायला मिळणे भाग्याचे लक्षण आहे. म्हणजे प्रस्तुत प्रसंग तिला अवचित प्राप्त होणाऱ्या संधीसारखा वाटतो आहे. हे पुण्यवर्धक कार्य आहे अशी तिची धारणा होती. तिला कौमार्याच्या पुनर्प्राप्तीचा वर मिळाल्याचं ययातीला ठाऊक होतं. त्यामुळे तिचा ऋषीकार्यार्थ विनियोग करण्यात त्यावेळच्या नियमांप्रमाणे काहीच हरकत नसावी.

आ.न.,
-गा.पै.

मृत्युन्जय's picture

28 Jul 2015 - 3:08 pm | मृत्युन्जय

बाकी ययाती खरेच भोगलोलुप होता का?

विस्वचीला विसरलास का? ;)

दाशराज्ञ युद्धाचे वर्णन आहेत. त्यात ह्या पाचही पुत्रांचे वर्णन आले आहे ते वेगवेगळ्या टोळीनायकांच्या रूपाने.

हे त्या १० राजांचे युद्ध तेच का? याच्यावर थोडी माहिती हवी होती.

प्रचेतस's picture

28 Jul 2015 - 3:15 pm | प्रचेतस
मृत्युन्जय's picture

28 Jul 2015 - 6:35 pm | मृत्युन्जय

विस्वची एक अप्सरा होती. चित्ररथ गंधर्वाच्या ताफ्यातील. ययातीची मानलेली बायको ;)

प्रचेतस's picture

28 Jul 2015 - 7:38 pm | प्रचेतस

अरे त्या प्रतिसादाचा फ़क्त हेडरच प्रकाशित झालेला दिसतोय.

मला म्हणायचे होते की विस्वची अप्सरेचा उल्लेख आदिपर्वातील ययातीच्या उपाख्यानात आढळत नाही. हा भाग इतरत्र कुठे आलाय का?

बाकी दाशराज्ञ युद्ध म्हणजे १० राजांचे युद्ध. हे युद्ध वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्या वैमनस्यातून सुरु झाले.
अधिक माहिती संदर्भ शोधून टंकतो.

मृत्युन्जय's picture

29 Jul 2015 - 11:12 am | मृत्युन्जय

विस्वचीचा उल्लेख उद्योगपर्वात येतो रे. पण बहुधा आदिपर्वातदेखील येतो. मी बघुन सांगतो. बाकी ययाती भोगलोलुप होता असे खांडेकरांनी म्हणण्याला आणि मला ते पटण्ण्याला महाभारतातल्याच काही संदर्भांचा आधार आहे. ययाती एक महान राजा होता हे तर आलेच पण त्याच्या विषयलोलुपतेसंदर्भात काही संदर्भ सापडतात (मुलांबरोबर वार्धक्य वाटुन घेण्याचा त्याचा विचारही असाच वाटतो).

तेव्हढा मुलांबरोबर वार्धक्य वाटून घेण्याचा विचार सोडला तर त्याच्या विषयलोलुपतेबद्दल मला तरी काही आढळले नाही. संदर्भ मिळाले तर अवश्य देच.

मृत्युन्जय's picture

29 Jul 2015 - 2:14 pm | मृत्युन्जय

हा आदिपर्वातला संदर्भ:

And, O king, having virtuously ruled his subjects for a long time, Yayati was attacked with a hideous decrepitude destroying his personal beauty. And attacked by decrepitude, the monarch then spoke, O Bharata, unto his sons Yadu and Puru and Turvasu and Drahyu and Anu these words, 'Ye dear sons, I wish to be a young man and to gratify my appetites in the company of young women.

इथे ययाती ताकाला जाउन भांडे लपवत नाही आहे तो सरल सरळ विषयप्राप्तीसाठी तरुण स्त्रियांबरोबर संग करुन सुखप्राप्तीची अपेक्षा बोलवुन दाखवत आहे. इथे "तरुण स्त्रिया" हा अनेकवचनी उल्लेख महत्वाचा वाटतो.

आदिपर्वातच हाही उल्लेख येतो:

Then, after a thousand years had passed away, Yayati, that tiger among kings, remained as strong and powerful as a tiger. And he enjoyed for a long time the companionship of his two wives. And in the gardens of Chitraratha (the king of Gandharvas), the king also enjoyed the company of the Apsara Viswachi. But even after all this, the great king found his appetites unsatiated

विस्वचीचा उल्लेख अजुन एके ठिकाणी येतो:

And having obtained youth for a thousand years, the king acquainted with the mysteries of time, and watching proper Kalas and Kashthas sported with (the celestial damsel) Viswachi, sometimes in the beautiful garden of Indra, sometimes in Alaka (the city of Kuvera), and sometimes on the summit of the mountain Meru on the north.

इथे विस्वचीचा उल्लेख येतो. शिवाय १००० वर्षे विषयसुखे भोगल्यानंतर देखील त्याचे समाधान झालेले नाहिच हा उल्लेख देखील येतो.

अवांतरः महाभारतात १००० वर्षे हा उल्लेख इतका सहजा सहजी येतो की त्याची अतीच जास्त गंमत वाटते. कच देवयानी प्रकरण चालले १००० वर्षे. मग देवयानी ययातीने सुखाचा संसार केला १००० वर्षे. त्यानंतर शर्मिष्ठा वयात आली (देव जाणे त्या काळात मुली कितव्या वर्षी वयात यायच्या) मग ययातीने तिच्याशी देखील संसार केला. मग मुलाशी म्हातारपणाची अदलाबदली केली १००० वर्षांसाठी. त्यानंतर ययातीने वानप्रस्थाश्रम स्वीकारला १००० वर्षांसाठी. त्यानंतर तो स्वर्गात राहिला किमान २००० वर्षे. मग तो अजुन वरच्या स्वर्गात राहिला किमान १० लाख वर्षे. त्यानंतर तो जमिनीवर पडला तेव्हा त्याचे नातू जिवंत होते (त्यांनीच त्याला परत स्वर्गात पाठवले). ही सगळी अतिशयोक्ती वैतागवाडी ठरते. त्यामुळे १००० वर्षे किंवा १० लाख वर्षे ही जशीच्या तशी न स्वीकारता खुप मोठा कालखंड म्हणुन स्वीकारायला हवीत.

प्रचेतस's picture

29 Jul 2015 - 2:24 pm | प्रचेतस

ओह्ह. ओके.
घरी गेल्यावर परत माझ्याकडच्या प्रतीतले तपासून पाहीन.

बाकी संख्येविषयक उल्लेख महाभारत, रामायण किंवा इतरही पुराणात अतिशयोक्तच आहेत. रामायणात तर हे उल्लेख हजारात नसून खर्व, निखर्व, परार्ध अर्बुद अशा संख्येने येतात.

मृत्युन्जय's picture

29 Jul 2015 - 3:06 pm | मृत्युन्जय

खासकरुन "company of young women" या शब्व्दांचे मराठी भाषांतर काय केले आहे ते प्लीज सांग. बाकी फारसा फरक असण्याची शक्यता नाही कारण मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांतरे एकाच प्रतीवरुन केली आहेत. भाषांतर करताना अर्थाचा फरकच काय तो वेगळा असण्याची शक्यता आहे. म्हणजे इथे young women मराठी भाषांतरात "तरुण बायका" असा जर होत असेल तर मग ते "बायको" या अर्थी घ्यायचे की "स्त्री" या अर्थी हा प्रश्न पडु शकतो.

प्रचेतस's picture

29 Jul 2015 - 10:05 pm | प्रचेतस

बोरी प्रतीत असे आलेय बघ.

जरां प्राप्य ययातिस्तु स्वपुरं प्राप्य चैव ह |
पुत्रं ज्येष्ठं वरिष्ठं च यदुमित्यब्रवीद्वचः ||१||

जरा वली च मां तात पलितानि च पर्यगुः |
काव्यस्योशनसः शापान्न च तृप्तोऽस्मि यौवने ||२||

त्वं यदो प्रतिपद्यस्व पाप्मानं जरया सह |
यौवनेन त्वदीयेन चरेयं विषयानहम् ||३||

हे यदु,, तू माझी वृद्धावस्था घे आणि तुझ्या यौवनाने मी माझी विषयतृष्णा पूर्ण करेन.

माझ्याकडच्या वि.म. बु. कं. च्या प्रतीमध्येही असाच उल्लेख आहे जी बव्हंशी सातवळेकर पर्यायाने नीलकंठी प्रतीवर आधारलेली आहे. येथे विषयतृष्णेचे भाषांतर company of young women असे केलेले दिसतेय.

बाकी विश्वाची अप्सरेचा उल्लेख बोरी प्रतीत मिळाला नाही मात्र वि.म. प्रतीत मिळाला.

पैसा's picture

27 Jul 2015 - 10:25 pm | पैसा

या सर्व कथा आहेत हे मानले तरी कथेला कुठेतरी सत्याचा आधार असतो. आजच्या काळाचे निकष त्या व्यक्तिरेखांना लावता कामा नये, पण या कथेत माधवीला घोड्यांसोबत तोलले गेले आहे, त्याबद्दल कथेतील इतर कोणी निषेध करत नाही, एवढेच नव्हे तर प्रत्येकाला आपण काही पुण्याचे चांगले काम करतो आहोत याचा कैफ आहे. स्वतः माधवी जरी कुठेही बोलताना दिसली नाही तरी स्वतःचे स्वयंवर मोडून वानप्रस्थ स्वीकारून तिने आपला निषेध व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर तिच्यावर सर्वप्रथम अन्याय करणार्‍या पित्याला आपले तथाकथित पुण्य देऊन ती निर्विकारपणे पुन्हा तपश्चर्येला निघून जाते. त्या पुण्याचाही मोह तिला राहिलेला नाही. एखाद्या व्यक्तीला ना इह ना परलोक, कसलेही आकर्षण राहू नये, ही काय भयानक अवस्था म्हणावी!

सुंदर ओळख. राजकन्येच्या सुखी आयुष्याच्याच कथा ऐकल्या आहेत आजवर. माधवीची झालेली परवड वाचून सामान्य काय किंवा राजकन्या काय भोग कुणालाच चुकले नाही असे वाटले. शिवाय ज्यांच्यामुळे हे सर्व झाले त्या गालव रुशिना काहीही शिक्षा झाली नाही. काय अर्थ आहे का अशा माणसाच्या रुशी होण्याला?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jul 2015 - 1:14 am | निनाद मुक्काम प...

फार पूर्वी लहानपणी ही गोष्ट वाचली होती
आपल्या पुराणातील गोष्टी ह्या अरेबियन नाईट सारख्या सुरस इसापनीती सारख्या बोधप्रत व गुलबकावली सारख्या रम्य असतात त्यात हातिमताई सारखा जादुई परीसस्पर्श लाभला असतो
अनेक हॉलीवूड च्या साय फाय सिनेमांच्या तोडीस तोड कथानक आपल्या पुराण कथांमध्ये मिळते

स्पंदना's picture

28 Jul 2015 - 6:11 am | स्पंदना

गालव ऋषी हे शारिरीक संबंधाविना अन गर्भाशयाशिवाय पुत्र जन्म घडवुन आणत अशी कथा वाचली आहे. अन हा प्रयोग् यशस्वी करण्यासाठी त्यांनी ययातीकडे त्याच्या रुपवान कन्येची मागणी केली होती. अर्थात हे सुद्धा मी वाचलेली कथाच असल्याने बाकिचे माहीत नाही. (त्या काळचे नुसते टेस्ट्ट्युब बेबी नव्हे तर बाळाची पूर्ण वाढ शरीराबाहेर करण्याचे तंत्र, अन ते ही सिलेक्टीव्ह फक्त पुत्रच!)
तुमच्या एकूण कथेत कन्येला "देण्याचा" अधिकार पूर्वापार असल्याचे दिसते आहे.

हरकाम्या's picture

28 Jul 2015 - 8:29 am | हरकाम्या

ही एवढी डोकेफोड कशासाठी. आपली सन्स्क्रुती उदात्त वगैरे आहे हे दाखवण्याचा आपला हा खटाटोप तर नाही ना ?

मृत्युन्जय's picture

28 Jul 2015 - 11:02 am | मृत्युन्जय

आपली संस्कृती उदात्तच आहे. पण ते दाखवण्यासाठी मी या धाग्याचा वापर नक्की केला नसता.

या धाग्याचा तसा काही हेतु आहे असे जर आपल्यास वाटत असेल तर तो नि:संशय माझ्या लेखनदारिद्र्याचा दोष आहे,

पैसा's picture

28 Jul 2015 - 11:25 am | पैसा

बरोब्बर उलट अर्थ म्हणतायत ते.

सनईचौघडा's picture

28 Jul 2015 - 2:01 pm | सनईचौघडा

मालक कुठुन कुठुन अशा कथा शोधुन काढता हो तुम्ही?
मध्यंतरी बी.आर . चोप्रांचं महाभारात ही मालिका झाल्यानंतर "महाभारत की कथाए" नावाची मालिका पाहिल्याचं आठवतय त्यामध्ये युध्दा नंतर महाभारातातील काही अप्रसिध्द व्यक्तिंचं पुढे काय झालं? हे दाखवत होते उदा. एकलव्य.

मृत्युन्जयसाहेब येवु दे अजुन अशा कथा.

अवांतर :- राहुन राहुन एक प्रश्न की जर षडरिपु जिंकल्या वर माणुस ऋषी पदाला पोहचतो असे म्हाणतात ना म्हणजे काम , क्रोध , लोभ , मद, मोह , मत्सर

मग हे ऋषिच कसे काय नंतर सगळे षडरिपु परत अंगिकारतात उदा. सर्वात क्रोधीष्ट म्हणुन दुर्वास, पराशुराम, जमदग्नी, वगैरे
कामविव्हळ ऋषी :- पराशर, विश्वामित्र ,

आणि ते कृत्य करुन परत यांच्या सगळ्या विद्या सही सलामत रहातात. का एकदा ते पद मिळाले की काही करायला मोकळे?

उगा काहितरीच's picture

28 Jul 2015 - 6:41 pm | उगा काहितरीच

अप्रसिध्द व्यक्तिंचं पुढे काय झालं? हे दाखवत होते उदा. एकलव्य.

काय झालं एकलव्याचं ? आठवत असेल तर प्लिज सांगा , (इतर कुणाला माहीत असेल तर सांगा .)

संदीप डांगे's picture

29 Jul 2015 - 6:23 pm | संदीप डांगे

ॠषी आणि मुनि यात नेहमीच गफलत होते.

ऋषी म्हणजे सर्व इंद्रिय जिंकलेला, संतपदाला पोचलेला माणूस अशी सामान्य धारणा आहे. पण ती चुकीची आहे. ऋषी म्हणजे संशोधक, वैज्ञानिक, शास्त्रकार. निसर्गाचा शास्त्रीय अभ्यास करून त्याद्वारे प्रयोग करून वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करणे/एखाद्यास करून देणे इत्यादी कामे ते लोक करत असत. प्राचीन भारतीय विज्ञान हे प्रचलित विज्ञानापेक्षा वेगळ्या पद्धतीने निसर्गाकडे (विश्व) बघते. त्यामुळे ऋषी म्हणजे सायंटीस्ट ही संकल्पना पचायला जड जाते. पण खोलवर विचार केला तर त्यात तथ्य आहे हे लक्षात येईल. त्यांचे वेषभूषा, भाषा, संस्कृती ह्या गोष्टी सोडून फक्त कार्य व विचार पाहिले तर आजच्या संशोधकांपेक्षा वेगळं असं काय आढळतं?

ते वेगवेगळे शास्त्र-विद्या यांच्यात संशोधन करण्यात व त्याचे शिक्षण देण्यात आयुष्य व्यतित करत असत. नावाजलेल्या ऋषींची नावे घेतली तर असे दिसेल प्रत्येकाचे स्वतःचे असे काही खास वैशिष्ट्य होते. तसेच त्यांचा उच्च-सन्यासी विचारांशी काही संबंध नाही. त्यामुळे षड् रिपु विजयाचा ऋषींशी काही संबंध नाही.

मुनि म्हणजे ज्याने इंद्रिय-विजय मिळवला आहे असा मनुष्य. ऋषी-मुनि असे एकत्रित म्हणायची पद्धत आहे कारण समाजासाठी हे दोघेही मार्गदर्शक व पूज्य आहेत. पण दोघांचे क्षेत्रच वेगळे आहे.

ऋषी, मुनि, सन्यासी, साधू, महात्मा, योगी वैगेरे शब्दांचे खरे अर्थ विसरले जाऊन काहितरी भलतेच अर्थ जनसामान्यांत प्रचलित आहेत. जुने ग्रंथ हे देवाशीच संबंधीत असतात, त्याचे पारायण केल्याने पुण्य प्राप्त होते, ह्यापण अशाच मूळ ज्ञानापासून भरकटवणार्‍या खुळचट भारतीय कल्पना आहेत.

वरील विचार माझे स्वतःचे मत असून व्यक्तिगत निरिक्षण आणि अभ्यासावर आधारित आहे. याबद्दल जाणकारांकडून योग्य माहिती ऐकायला आवडेल.

सहमत. आपण नेहमीच विचारपूर्वक(स्वतः) प्रतिसाद देतात हे निरीक्षण आहे.

ययाती बद्दल जितके अधिक वाचावे तितके तो एक शूर राजा असला तरी एक नालायक पिता होता याची खात्री आपल्याला मनोमन पटत जाते.>>> होय अगदी . नुसता नालायक पिताच नाही तर माणूस म्हणण्याच्या लायकीचा नवता . पण माधवी महाभारतात नक्की कुठे येते हो ? कारण ययाती च्या बापाला नहुषाला भीमाने शापमुक्त केल्याची कथा वाचली होती .

आयुष्यभर बापाच्या किर्तीच्या हव्यासापोयी मानखंडना वाट्ञाला आलेल्या त्या राजकुमारीने परत एकदा त्याग करत आपल्या >> म्हणूनच ययाती सारखे नालायक लोक तयार होतात . नको त्या ठिकाणी दया दाखवायची हौस .

इथे चूक फक्त गल्वाचीच आहे असं म्हणता येणार नाही . विश्वामित्रयाची सुधा आहे . निर्लज्ज पाने तो म्हणतोय हिला आधीच का नाही आणलस माझ्याकडे .
गालवने माधवीला यायातीकडून घेताना सांगितलं होता , "राजा काळजी करू नकोस . मी माधवीचा स्वताच्या पुत्री प्रमाणे सांभाळ करीन. " गालव विश्वामित्राचा शिष्य म्हणजे तो त्याला मुलासारखा . आणि मुलाची मुलगी म्हणजे नातीसारखी . आणि हा विश्वामित्र तिच्यापासून पुत्र प्राप्ती करून घेतो

मृत्युन्जय's picture

28 Jul 2015 - 6:34 pm | मृत्युन्जय

महाभारतात माधवीची कथा येते फक्त म्हणुन महाभारतातील माधवी. बाकी ययाती कौरव पांडवांच्या कैक पिढ्या आधी होउन गेला. ययातीच्या २ मुलांपासुन (काही पिढ्यांनंतर) यादव आणि कौरव - पांडव निपजले. यदु पासुन यादव आणि पुरु पासुन कौरव आणि पांडव

बॅटमॅन's picture

28 Jul 2015 - 4:08 pm | बॅटमॅन

...................

कठीण आहे.

अत्रन्गि पाउस's picture

28 Jul 2015 - 6:49 pm | अत्रन्गि पाउस

हेच म्हणतो

ही कथा असो वा सत्य वा काही पण माधवीची परवड वाचताना गलबलून आले. काय प्रतिसाद लिहावा तेच कळत नव्हते.
छान लिहितोस तू. कथा उलगडून दाखवायचे तुझे कसब कौतुकास्पद आहे. अजूनही लिही.

मनीषा's picture

28 Jul 2015 - 9:41 pm | मनीषा

ही कथा माहीती नव्हती .
बरेच प्रतिसाद ही माहितीपूर्ण आहेत.
वाचते आहे.

पिलीयन रायडर's picture

28 Jul 2015 - 11:38 pm | पिलीयन रायडर

ऐक माधवी नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. तेव्हाच डोक्यात तिडीक गेली होती...

चित्रगुप्त's picture

29 Jul 2015 - 3:46 am | चित्रगुप्त

महाभारत आणि अन्य पुराणातील विविध कथा हल्लीच्या वाचकासमोर आणण्याचे महत्वाचे काम करत असल्याबद्दल अनेक आभार.
काही म्हणा, प्राचीन लेखकांच्या उत्तुंग कल्पनाशक्तीची झेप पाहून विस्मय वाटतो.
बाकी हल्लीच्या मापदंडाने एवढ्या प्राचीन समाजातीलतील नीतिनियमांना, परंपरांना बरेवाईट म्हणणे याला विशेष काही अर्थ नाही. त्याकाळी काय विचाराने , कोणत्या दृष्टीकोनातून या कथा रचल्या गेल्या, हे आज आपल्याला कळणे दुरापास्त.
पुढे कधी जमले, तर माधवी आत्मकथन करते आहे, असे मानून ही कथा लिहावी, असे वाटून गेले.

याप्रकारचे आमचे काही जुने लेखनः
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय'
http://www.misalpav.com/node/25328
.

नरकचतुर्दशी: मदनकेतू आणि सोळा हजार एकशे आठ स्त्रियांची कथा:
http://www.misalpav.com/node/25950
.

विचित्रवीर्याची चित्र-विचित्र कहाणी (महाभारत भाग-३)
http://www.misalpav.com/node/26965
.

(मृत्युंजय, या धाग्यात माझ्या जुन्या धाग्यांचे दुवे देत असल्याबद्दल क्षमस्व. महाभारत आणि पुराणकथांच्या प्रेमापोटी हे करत आहे).

मृत्युन्जय's picture

29 Jul 2015 - 2:17 pm | मृत्युन्जय

आपले चित्रमय प्रतिसाद नेहमीच स्वागतार्ह आहेत. त्याकडे झैरात म्हणुन नाही बघणार आणि मी पण काहीवेळा झैरात करतोच की ;)

पाटीलअमित's picture

29 Jul 2015 - 4:01 am | पाटीलअमित

सदर माधवी ची कथा मा बो वर पण आलेली आहे ,पण त्यात ती प्रथम पुरुषी (?) असून माधवी च्या अंतरंगातले भाव दाखवले आहेत ,त्यात माधवी स्वतः गालव ह्यांच्या वर अनुरुक्त झाली असे दाखवले आहे

चित्रगुप्त's picture

29 Jul 2015 - 8:04 am | चित्रगुप्त

तुर्वसुला लवकरच अधोगती होउन निर्वंश होण्याचा शाप मिळाला.....तर अनुकडून आणि त्याच्या वंशजांकडुन यज्ञयाग करण्याचा अधिकार काढुन घेतला गेला.

.....आणि

तुर्वसुचे वंशज नंतर यवन म्हणुन हिणवले गेले तर अनुचे वंशज म्लेंच्छ म्हणुन.

या दोन्हीचा संबंध 'यवन' = ग्रीक, आणि म्लेंच्छ = मुसुल्मान, याचेशी आहे काय?
तसेच 'तुर्वसुची लवकरच अधोगती होउन निर्वंश' झाला, तर त्याचे वंशज कुठून आले ? ग्रीकांना यवन आणि मुसुलमानांना म्लेंच्छ म्हणून संबोधण्याची प्रथा केंव्हापासूनची आहे ?

प्रचेतस's picture

29 Jul 2015 - 9:07 am | प्रचेतस

आयोनिया म्हणजे सध्याच्या ग्रीस आणि टर्कीचा काही भाग. इकडे ग्रीक वसाहती होत्या. तिकडून आलेल्या लोकांना आयोनियन म्हणत. आयोनियनचेच अपभ्रष्ट रूप यवन असे झाले.

म्लेंच्छ शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे संस्कृत न येणारे- समजणारे लोक. सर्वसाधारणपणे वायव्येकडून येणार्‍या बाल्हिकाच्या (वाहिक देश/सध्याचा अफगाणिस्तानातील बाल्ख प्रदेश) पलीकडून येणार्‍या रानटी टोळीवाल्यांना म्लेच्छ म्हटले जाते.

पैसा's picture

29 Jul 2015 - 9:44 am | पैसा

सुमेरियन लोकांचा एक देव अनु नावाचा होता. तो यातलाच अनु का?

उम्म ते नै सांगता येत. यवन हा तुलनेने बराच अलीकडचा उल्लेख आहे तर म्लेच्छ बराच प्राचीन. सुमेरियन लोक म्हणजे इंडो इराणीयन. अनु ला इंडो आर्यन्समध्ये देवतांत कधीच स्थान नव्हते. तो एक स्थानभ्रष्ट ययातीपुत्र होता. ऋग्वेदाने अनुला टोळीवाला मानलंय. तरी अधिक संदर्भ तपासावे लागतील.

तुडतुडी's picture

29 Jul 2015 - 11:42 am | तुडतुडी

म्लेंच्छ शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे संस्कृत न येणारे- समजणारे लोक.>>>
हा संदर्भ कुठून मिळाला सांगता का ? म्लेंच्छ शब्दाचा अर्थ नीच , पापी असा होतो
यवन हा तुलनेने बराच अलीकडचा उल्लेख आहे तर म्लेच्छ बराच प्राचीन. >>>
कालयवन . यवन हा सुधा प्राचीन शब्द असावा

हा संदर्भ कुठून मिळाला सांगता का

म्लेच्छ शब्दाचा अर्थ इथे मिळेल.

कालयवन . यवन हा सुधा प्राचीन शब्द असावा

अलीकडचा म्हणजे ढोबळ मानाने बुद्धोत्तर काळातला. सर्वसाधारणपणे मौर्य साम्राज्यानंतरचा. तर प्राचीन म्हणजे बुद्धपूर्वकाळातला.

पद्मावति's picture

29 Jul 2015 - 2:08 pm | पद्मावति

मूळ लेख आणि त्यावरील अनेक प्रतिसादही अभ्यासपूर्ण.

मृत्युन्जय's picture

29 Jul 2015 - 3:31 pm | मृत्युन्जय

सर्व वाचक प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद.

ही कथा माधवी या पुस्तकात आहे. तुम्ही महाभारतातला संदर्भ देऊ शकाल का? वाचायला आवडेल.

मृत्युन्जय's picture

29 Jul 2015 - 8:34 pm | मृत्युन्जय

महाभारतात उद्योग पर्वात ही कथा येते. अहंकार आणि दुराग्रह या दुर्गुणांमुळे एखाद्या माणसाचे आणि त्याच्या आजुबाजुच्या इतर माणसांचे कसे नुकसान होते हे सांगण्यासाठी नारद मुनींनी ही कथा दुर्योधनाला सांगितली. कृष्णशिष्टाईच्या दरम्यान हा संवाद घडतो. दुर्योधनाने कृष्णाचा संधी प्रस्ताव मान्य करावा यासाठी कण्व आणि नारद मुनी दुर्योधनाचे मन वळवायचा प्रयत्न करत असतात तेव्हा ही कथा सांगितली जाते.

प्रचेतस's picture

29 Jul 2015 - 10:26 pm | प्रचेतस

बाकी ही माधवीची कथा प्रक्षिप्त असावी असे मला वाटते. कारण ह्यात असलेला गरुड व विष्णू यांच्या प्रभावाचे वर्णन.

उत्तरययातीचरित्र आदिपर्वातही येते त्यात ययातीचे पतन हे 'तपामध्ये माझी बरोबरी करु शकेल असा देव, मनुष्य आणि गंधर्व आणि मनुष्यांमध्ये कोणीही नाही' ह्या स्वस्तुतीने लागलेल्या दोषामुळे झाल्याचे दिसते.

तर माधवीच्या कथेनंतर आलेल्या उत्तरययातीचरित्रात ययातीचे पतन हे स्वर्गलोकी केलेल्या देव, ऋषी महर्षी यांच्या अवमानामुळे झाल्याचे दिसते.
ह्यात परत प्रतर्दन, वसुमना, शिबी आणि अष्टक ह्यांच्या पुण्याच्या योग्ये ययातीचे स्वर्गात पुनरुत्थान होते.

ययातीने स्वर्गलोकी जमलेल्या देव, ऋषी महर्षींच्या सभेत इतरांकडे फारसे लक्ष दिले नाही तेव्हा सर्व देव, महर्षी ययातीला धिक्कारून विचारे लागले हा राजा कोण ? हा स्वर्गात कसा आला?
त्यांचे ज्ञान आवृत्त झाल्याने त्यांनी ययातीला ओळखले नाही व ययाती एकाएकी निस्तेज होऊन पतन पावला.
ह्यानंतर तो परत नातवंडाच्या अनुष्ठानाच्या ठिकाणी जाऊन पडतो व प्रतर्दन, वसुमना, शिबी आणि अष्टक यांसह माधवीचे अर्धे व गालवाचे एक अष्टमांक याच्या योगे पुन्हा स्वर्गात पोहोचतो.

अस्वस्थामा's picture

29 Jul 2015 - 8:58 pm | अस्वस्थामा

बाब्बौ.. मृत्युन्जया आणि प्रचेतसा, तुमचे संदर्भ ऐकून आम्हाला कॉम्पेक्स याया लागला आहे. थोडा तुमचा मोर्चा त्या तुडतुडींच्या विमान, ब्रम्हास्त्र(पक्षी: अणुबॉम्ब) वगैरे गोष्टी पुराणादि ग्रंथात शोधण्यात लावला असता तुम्ही तर त्यांचा तिकडच्या धाग्यावरचा "मनस्ताप" तरी कमी झाला असता.
त्यांना हेच म्हणायचेय, तुम्ही लोक "कोणी कोणास काय म्हणाले" ते शोधत बसताय त्यापेक्षा "आमच्या पूर्वजांनी काय काय शोधले" ते शोधले म्हणजे त्यांना मिरवता येईल की नाई ?

(उपरोध अपेक्षित)