‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा - २

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
6 Feb 2015 - 11:29 am

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१

मुकुंदराज कुलकर्णी यांच्या प्रत्येक कवितेतून एका एका प्रसंगामागच्या, स्थळामागच्या, व्यक्तीमागच्या हळुवार भावना अलगद प्रकटतात. शब्दांच्या रचनेतून ती ती भावना एखाद्या आरसपानी वास्तूसारखी सर्व कंगोरे लेऊन मनाच्या प्रतलावर रेखाटली जाते. मूर्त रुपात साकारते. कवितेतील शब्दही फारसे अलंकारिक नाहीत. साधेच शब्द, रोजच्या बोलण्यात नेहमी भेटणारे. पण त्यातूनही काव्यात्मकता अचूक प्रकट झाली आहे. अगदी तुमच्या आमच्याही दैनंदिन जीवनात घडणाऱ्या साध्या साध्या घटनांमध्ये लपलेले ‘काव्य’ नेमकेपणे शोधून या कविता आपल्यासमोर मांडतात.
‘कितीक वर्षांनी’ या कवितेत असाच एक प्रसंग आणि त्यानंतरच्या भावना गमतीदार शब्दात मांडल्या आहेत.
....तारुण्यात एखाद्या ‘तिच्या’बद्दल असलेल्या हळव्या भावना, ती फार वर्षांनी भेटल्यावर कशा उत्सुक होतात हा अनुभव कधी तरी आपल्यालाही आला आहे. तरुणपणीच्या आठवणींना एक सोनेरी मोहक झिलई असते ! तेव्हाची एखादी ‘प्रिय’ व्यक्ती अचानक समोर येते तेव्हा अधीर डोळे त्याच झिलईच्या तावदानातून तिला निरखू जातात. पण प्रत्यक्षात काय दिसते ?

कितीक वर्षांनी
कितीक वर्षांनी ती दिसली
थिजलेली ओठातील गीते
कमनीयतेचा डौल हरवला
देहाचे हो विरूप पोते
नेत्रामधला निळा चांदणी-
-झरा आटला, चमचम विरली
गात्रामधल्या विझल्या ज्योती
दाटून आली सुन्न काजळी
भाव निरागस सरुन मुखावर
चतुराईची आरास सजली
खळ्या गालीच्या हाय लोपल्या
भाळी आठ्यांची उमटे जाळी
दोष नसे कोणाचा काही
काळाचा हा सर्व करिष्मा
सुटलेल्या पोटा सांभाळीत
मीही पाहतो लावुन चष्मा

‘प्रतिभा’ हे ईश्वरी देणे आहे असे म्हणतात. एखाद्याच भाग्यवंताच्या विचारविश्वात तिचे अविष्कारांचे भुईनळे पेटतात. पण त्यांना बत्ती लावणे तरी त्याच्या अधीन असते म्हणता ? छे ! ती विजेसारखी अवचित येते अन प्रकाशाचे भुईनळे लावून जाते. प्रतिभावंत न कर्ता न करवता, फक्त श्रेयाचा धनी. पण हे किती प्रतिभावंतांनी जाणले आहे ?
‘कोडे’ ही कविता मजेदार शब्दात प्रतिभेचे कोडे मांडून गेली आहे.
कोडे
प्रतिभेचा पक्षी अवचित
निज पंख पसरुनी उडतो
बाळूच्या अंगणामध्ये
रत्नांचा पाउस पडतो
तो पक्षी येतो कुठुनी
अन निघून कोठे जाई
हे अवघड कोडे अजुनी
कोणाला सुटले नाही
तो विहंग ठेवुन जातो
सत्कार, हार अन टाळ्या
ती ठेव मानुनी अपुली
हा मिजास मारी बाळ्या

.. ही सर्व प्रतिभा जिथे शरण आहे, त्या ज्ञानियाच्या राजापुढे, आळंदीस त्याच्या समाधीपुढे जेव्हा कवी नतमस्तक झाला तेव्हाची मनाची, देहाची, अस्मितेची झालेली उन्मनी अवस्था प्रकटली आहे ‘ज्ञानियाच्या समाधीला ‘ या कवितेत. लेकराला जशी आईच्या पदराची ओढ तशी माउलीच्या दारातल्या प्रत्येक सजीव-निर्जीवाची कवीला लागलेली ओढ कवितेतून ओसंडून वाहते. ‘देवचि व्हावे’ हा भक्तीचा कडेलोट असे म्हणतात, पण कवी म्हणतो ‘व्हावा देहचि आळंदी आणि मन इंद्रायणी...’

ज्ञानियाच्या समाधीला

ज्ञानियाच्या समाधीला गच्च मारता मिठी
डोळा दाटला पाउस शब्द ओलावले ओठी
मनी उमटला टाहो, मायमाउली सांभाळ
पुन्हा पुन्हा चुकणारे घ्यावे पदरात बाळ
देह गद्गद जणु पान अजानाचे हाले
आणि सोन्याचा पिंपळ मनामध्ये सळसळे
परतीच्या वाटेवर इंद्रयणीस ये पूर
गेली बुडून आळंदी दिसे कळस धूसर
गेली वाहून किल्मिषे झाले निरभ्र आकाश
स्नात मनात सांडला सोनपिवळा प्रकाश
अगा ज्ञानिया सखया एक आर्त विनवणी,
व्हावा देहचि आळंदी आणि मन इंद्रायणी

अशा अथांग, नितांत भक्तीला पार नसतो खरं तर !
...पण भोवताली पाहताना कधीतरी, कुठेतरी दिसते, कुणाला तरी आभाळ भरून मिळालेली वेदना ! आयुष्यभर मिळालेली उपेक्षा, व्यथा. त्या वेदनेची बोच कवीला बोचून जाते. त्या श्रांत जीवांचा आक्रोश मनाचे पडदे फाडून आत्म्याला छेद देतो, आणि मनाला ‘त्या’ सर्वसत्ताधीशाच्या निरंकुश ‘कॉम्प्यूटराइजड’ ‘सत्तेबद्दल ‘शंका’ निर्माण होते.....

शंका
उगवतीचे तलम सोनकिरण
करतात तुझ्या ऊबदार आशीर्वादांची पखरण
सुकल्या अंकुरांसाठी तुझा भरून येतो ऊर
आणि घननीळ आभाळाच्या ओल्या शुभेच्छांनी
सृष्टीत उसळतो सृजनाचा कल्लोळ
येतो नदी-नाल्यांना पूर
तूच जोजवतोस श्रांत जीवांना शयनाच्या विश्रामगृहात
तूच जागवतोस आपुलकीच्या आणि सौहार्दाच्या ज्योती मनामनात
तुझ्या कृपाछत्राखाली अवघं जग सुखरूप
चराचरात अणुरेणूत तुझंच शुभंकर रूप
तुझ्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही
असा संतांचा डंका आहे
..अशा तुझ्या संपूर्ण नियंत्रण असलेल्या ‘कॉम्प्यूटराइजड’ जगात
दुष्टांचं आणि दु:खांचं व्हायरल इन्फेक्शन झालंच कसं ?
...एवढीच एक शंका आहे !!

पण मग या तापल्या मनाला थंडावा द्यायला कधी तरी एक शीतल झुळूकही येते, अनासक्त संतांच्या रूपाने !
त्या निरंकुश ईश्वरी सत्तेचे प्रतिनिधी संत. ज्ञानियाच्या शब्दात, ‘चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव, पियुषांचे..’ असे जे संतजन, त्यांची लक्षणे सामान्यांना कळूनही आकळत नाहीत. त्यांच्या मृदु कनवाळू वृत्तीचे यथार्थ वर्णन लख्ख तेजस्वी शब्दमौक्तिकांतून मांडलं आहे, अखेरीस येणाऱ्या ‘अनासक्त’ या कवितेत. ‘निळाईचा अनासक्त रंग’, ‘डोळ्यातले स्निग्ध चांदणे’, ‘अनाग्रही तरंग’ , ‘अभावाचे अग्निप्रलय’ अशासारखे शब्दसमूह त्यांच्या भाववृत्ती अचूकपणे मनावर चितारतात.
... ‘आकाशातून उतरलेला प्रकाशाचा हात’ या रूपकातून जणू त्या प्रेषितांच्या दैवी गुणसंपदेचा गहन गौरव केला आहे.

अनासक्त

सरोवरासारख्या शांत डोळ्यात त्यांच्या होई प्रतिबिंबित
निळाईचा अनासक्त रंग
आणि पाकळ्यांसारखे हळुवार उमलती
त्यात अनाग्रही तरंग
त्यांच्या समजूतदार संवेदना

अपरिचितांच्या स्पंदनांशीही सहजतेने एकरूप होणाऱ्या
अगदी स्वत:ला पणाला लावून
नात्यांची कोवळीक जपणाऱ्या..
भोवतालचे अभावाचे अग्निप्रलय पाहून
नकळत पावसाळी होतात त्यांचे डोळे
आणि बरसू लागतात तापल्या भूमीवर निरपेक्षपणे
जाहिरातींच्या जगात वाजत असताना
इतरांचे ढोल
ते मात्र लेण्यांच्या शिल्पकारांसारखे कार्यमग्न, अबोल
फुत्कारणाऱ्या विषारी फण्यांच्या प्रदेशातसुद्धा
मावळत नाही त्यांच्या डोळ्यातले स्निग्ध चांदणे
उगारलेल्या शस्त्रांनाही फुटते पालवी त्यांच्या सौजन्याने
कुठून येते हे बळ
आपले बहर मुक्तपणे वाटण्याचे
इतरांच्या शिशिराला ऊब देण्यासाठी स्वत: पेटण्याचे
परवाच कोणीतरी पाहिले करून दार किलकिले
तर पाहणारा थक्क
त्यांच्या पाठीवर फिरत होता
आकाशातून उतरलेला एक प्रकाशाचा हात...
लख्ख !

( समाप्त )

पुस्तकाचे नाव : अनासक्त
साहित्यप्रकार :काव्यसंग्रह
कवी :मुकुंदराज कुलकर्णी
प्रकाशक : सुविद्या प्रकाशन, सोलापूर.

मांडणीकवितासाहित्यिकप्रकटनआस्वादसमीक्षाप्रतिभा

प्रतिक्रिया

छान ओळख .कविता वाचण्यात येतील.

एस's picture

7 Feb 2015 - 8:58 pm | एस

कविता ही अशी चीज असते जिचे रसग्रहण करावया जावे तो तेही येक काव्य बनते. हे दोन्ही लेखही तसेच. कविता जशा आवडल्या तसेच हे लेखही आवडले. काव्यसंग्रह विकत घेऊन वाचला जाईल.

सस्नेह's picture

10 Feb 2015 - 3:59 pm | सस्नेह

पुस्तक-परिचयाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. कितपत जमलाय माहिती नाही.
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.

सुरेख परिचय.शेवटची अनासक्त कविता फार अावडली.संग्रह मिळवुन वाचेन नक्कीच.

सुरेख लिखाण!! घाई, फक्त इतकेच आणि ज्ञानियाच्या समाधीला हे विशेष आवडलं.