‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
2 Feb 2015 - 12:11 pm

a

(पुस्तक-परिचय )

शाळेत असताना, कविता नावाच्या रम्य प्रकाराचे, त्यातल्या यमक, वृत्त, छंद, अलंकार नावाच्या हत्यारांनी ‘रसग्रहण’ नावाचे नीरस पोस्टमॉर्टेम करावे लागे. ते इतके डोक्यात गेले होते , की पुढे पुढे काव्य या प्रकारापासून किमान एक हजार किलोमीटर दूर राहण्याची मी दक्षता घेत असे. हा आकस निवळायला बरीच वर्षे लागली. हल्ली हल्लीच एखादी गेय आशयघन कविता पुन्हा मनावर जादू करू लागली आहे.
अशात श्री मुकुंदराज कुलकर्णी यांचा ‘अनासक्त’ हा काव्यसंग्रह वाचण्यात आला. वाचता वाचता या कवितांनी मनाचा ठाव कधी घेतला समजलं नाही. या कविता विशेष भावल्या हे पाहून, की या संग्रहातील कवितांना वृत्त-छंदाच्या बेड्या घातलेल्या नाहीत, की यमकांच्या मीटरमध्ये गुंडाळलेले नाही. डेरेदार आशयाचे अनेकरंगी पदर लेऊन ही मुक्तकविता स्वच्छंद विहरत गेली आहे ! तरीही सात्विक आशयाचे अंगण तिने दुरावले नाही.
काव्यक्षेत्रात मुकुंदराज कुलकर्णी हे नाव फारसं प्रसिद्ध नाही. ही व्यक्ती प्रसिद्धीपराड्मुख, शुद्धसात्विक मृदु वृत्तीची देवमार्गी . यापूर्वी त्यांचा ‘अक्षरस्वप्ने’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. ‘अनासक्त’ हा दुसरा. सुविद्या प्रकाशन, सोलापूर यांनी हा संग्रह सुबक रुपात रसिकांना नजर केला आहे.
ईश्वरावरची अथांग श्रद्धा हा स्थायीभाव जसा मुकुंदराज यांच्या कवितेतून ठायी ठायी डोकावतो तसाच जगाच्या व्यवहाराबाबत ईश्वराच्या उदासीनतेचा रोषही प्रकट होतो. त्यांची कविता हळुवार कल्पनेपेक्षा वास्तवातल्या कठोर -करुण काव्यात्मकतेशी जास्त जवळचे नाते जोडते. आजूबाजूला दिसणाऱ्या जगातल्या, घडणाऱ्या घटनांमधल्या विसंगती त्यांच्या दृष्टीने घारीसारख्या अचूक टिपल्या आहेत आणि काव्यबद्ध केल्या आहेत.
या कवितांची जातकुळी जरा वेगळीच आहे. त्या पद्यापेक्षा गद्याशी जास्त जवळचे नाते सांगतात. तरीही, त्या गद्यातून पाझरलेला, चारच शब्दात हजार वाक्ये बोलून जाण्याचा, आणि मोजक्या शब्दात प्रचीती देण्याचा खास काव्यगुण काही लपत नाही. कल्पनेच्या रम्य नंदनवनात ही कविता फारशी रमत नाही. इन फॅक्ट, ही कविता निसर्गाच्या रमणीय सान्निध्यात, अथांग निळ्या आकाशात, रंगरंगील्या फुलात वगैरे फारशी दिसत नाही, तर ती सहज जाता जाता रस्त्यात अवचित भेटते. किंवा अगदी रोज डोळ्यासमोर असणाऱ्या कुठल्यातरी ओबडधोबड माळावर, एखाद्या मध्यम दर्जाच्या हॉटेलात, रस्त्याकडेच्या झोपडीत किंवा अगदी आपल्या पलीकडच्या गल्लीत जाता जाता वळणावर सुद्धा ती नजरेत भरून जाते. आणि तरीसुद्धा ती भावगर्भतेच्या झूल्यात बसवून निसर्ग, आकाश आणि फुले सगळ्यांशी नाते जोडून देते. तिच्या अभिव्यक्तीमागच्या वेदनेचा स्वानुभूत प्रत्यय देऊन जाते. हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य !
या संग्रहातील एकूण ७९ कवितांपैकी सर्वच जरी अंत:करणाचा वेध घेणाऱ्या आहेत, तरी विस्तारभयामुळे काही निवडकच इथे मांडत आहे.
पहिली कविता ‘अलिकडे’.
‘अलिकडे’ शब्दांच्या जंजाळात अडकलेल्या माणसांमधल्या, सरलेल्या संवादाची खंत या कवितेतून खोलवर काटा टोचून गेली. विचारांचे, मतभेदांचे कोट मुक्त संवादाच्या झुळूकांना कसा प्रतिबंध करतात आणि शब्दांमागचा स्नेह संपून शिल्लक राहिलेला ‘सावध’पणा मनात कसा ‘रुतत’ गेला आहे याचे वर्णन काळजात रूतणारे...
अलिकडे
अलिकडे मनमोकळ्या गप्पांचे झरे आटलेले
जागोजागी डबक्यांवर शेवाळ साठलेले
संवादाच्या शब्दांची नको तेवढी सावध पावले
पावलोपावली धर्म, पंथ, जाती, अहंकार यांचे सुरुंग पेरलेले
संरक्षक कोट उभारून माणसे आत आत लपलेली
तिथपर्यंत शब्द पोचण्याची शक्यताच संपलेली
नजरकैदेत पडलेली हृदयीची गाणी
पार आटून गेलेले डोळ्यातील पाणी
कोटांशीच बोलतात कोट
तरीही शब्दांचे ज्वालाग्राही स्फोट
कोटाबाहेर माणूस भेटणे दुरापास्त झालेले,
कर्णाच्या रथचक्रासारखी जागच्याजागी
रुतत चालली आहेत
शब्दांची सावध पावले..

आणखी एक कविता ‘माणसांमध्ये’ नेहमी दिसणाऱ्या काही वृत्तींची चपखल ‘ओळख’ अगदी साध्या उदाहरणातून करून देणारी. सुसंस्कृततेचा बुरखा पांघरून कितीही ‘सभ्य’तेचा आव आणला तरी माणसातल्या निखालस नग्न वृत्ती लपत नाहीत. काही वेळा या वृत्ती शब्दांपेक्षा प्रतीकांमधूनच जास्त परिणामकारकरीत्या व्यक्त होऊ शकतात, याचे मूर्तिमंत प्रत्यंतर म्हणजे ‘ओळख’ !
ओळख
दुधासाठी पायात घोटाळणारे
आणि पोट भरले की
अनोळखी नजरेने पहात जाणारे
मांजर पाहिले की,
काही माणसांची ओळख पटू लागते.
मांजराच्या तावडीत सापडलेला
पण त्याने तात्पुरता खेळण्यासाठी सोडलेला,
तेवढ्या अवधीत
मुक्ततेच्या भ्रामक आनंदात उद्या मारणारा,
किंवा जिवाच्या आकांताने दूर पळण्याचा
अयशस्वी प्रयत्न करणारा
उंदीर पाहिला की
बहुतेक माणसांची ओळख ‘दृढ’ होते....

...ओळख ‘पटणे’ आणि ती पटण्याची अकारण घाई करणे यातला फरक असाच जाणवून दिला आहे, ‘घाई’ या कवितेतून. अनोळखी माणसावर सहजासहजी विश्वास न टाकणे, हा म्हटलं तर चांगला गुण. पण त्याचा नियम होऊन बसला की तोही दुर्गुणच. माणसातल्या, विशेषत: अनोळखी माणसातल्या चांगुलपणावर आपण सहजासहजी विश्वास का ठेवत नाही बरं ? ही वृत्ती कधीकधी सहज भेटणाऱ्या फुलांनासुद्धा मनाला स्वीकारू देत नाही. विशेष म्हणजे हे करताना आपण विसरलो असतो, की कधी आपलेही काटे कुणालातरी रुतले होते.
घाई
प्रत्येक अनोळखी झाडाला काटेरी ठरवण्याची
आपल्याला केवढी घाई
आपल्याला वाटतं,
फुलं वाटणं ही फक्त आपलीच पुण्याई
तसे, आपणही कुणाला
खुपलेले असतो काट्यासारखे
कोणी आपल्यामुळे झालेले असते
फुलांना पारखे
थरथरते आपली हिशेबी फुलपाकळी
जेव्हा ‘काटेरी’ ठरवलेल्या अनोळखी झाडातून
होतो पुष्पवर्षाव आणि..
फुलांचा खच आपल्या पायतळी ....

ओळख होऊनही न स्वीकारणे, याचा निर्देश करते ‘घाई’. पण कधी कधी, ओळख नसतानाही आपण कुणालातरी अंतर्बाह्य ओळखत असतो, कधीच भेट झाली नसतानाही त्याची नस न नस जाणत असतो. त्याच्या विझण्या-फुलण्याचे साक्षी असतो आणि त्याच्यापेक्षाही त्याला ‘जाणत’ असतो !
....जर तो स्वत:च्या अभिव्यक्तीशी प्रामाणिक असेल तर !
हे कसे ? हे मजेदार गूढ उलगडले, ते ‘फक्त इतकेच’ या कवितेतून.
फक्त इतकेच
झाली नाही त्याची माझी
कधीही प्रत्यक्ष भेट
बोललोही नाही कधी मी त्याच्याशी
दूरध्वनीवरून किंवा थेट
कधी मी ऐकलेही नाही
त्याच्याबद्दल कोणाकडून काही
तरी मी त्याला ओळखतो
माहित आहेत मला त्याची
बल-शबल स्थाने
जाणवतात मला त्याच्या
मनातली सूक्ष्म स्पंदने
त्याच्या रक्तकणातील दिव्यांचे
विझणे आणि फुलून येणे
त्याला हळुवार करणारे हळवे कोपरे
आणि त्याची श्रद्धास्थाने
तो स्वत:ला ओळखतो
त्यापेक्षाही मी त्याला जास्त ओळखतो
मी कोणी अंतर्ज्ञानी साधू वगैरे ..?
छे छे तसे काही नाही,
फक्त इतकेच की,
..मी त्याचा कवितासंग्रह समरसून वाचला आहे
आणि अक्षरांमधून प्रतिबिंबित होताना
तो मेकअप करत नसावा, अशी माझी धारणा आहे !

( क्रमश: )

मांडणीवाङ्मयकवितासाहित्यिकआस्वादसंदर्भप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

2 Feb 2015 - 12:20 pm | आदूबाळ

आवडलं! पुभाप्र.

जेपी's picture

2 Feb 2015 - 12:20 pm | जेपी

आवडल...
पुभाप्र

एस's picture

2 Feb 2015 - 12:55 pm | एस

छान लिहिलं आहे!

अन्या दातार's picture

2 Feb 2015 - 4:09 pm | अन्या दातार

छान ओळख. :)

प्यारे१'s picture

2 Feb 2015 - 8:27 pm | प्यारे१

खूप छान रसग्रहण सुरु आहे. क्रमशः ची वाट पाहत आहे.
बाकी
>>> डेरेदार आशयाचे अनेकरंगी पदर लेऊन ही मुक्तकविता स्वच्छंद विहरत गेली आहे ! तरीही सात्विक आशयाचे अंगण तिने दुरावले नाही.
किंवा
>>> आणि तरीसुद्धा ती भावगर्भतेच्या झूल्यात बसवून निसर्ग, आकाश आणि फुले सगळ्यांशी नाते जोडून देते. तिच्या अभिव्यक्तीमागच्या वेदनेचा स्वानुभूत प्रत्यय देऊन जाते.
अशा वाक्यांमधून भावी (अजून अधिकृत नसावं म्हणून) समिक्षिकेची पावलं उमटलेली जाणवली. अर्थात ही वाक्यं ओघानंच आलेली आहेत हे देखील जाणवत राहतं.

प्रचेतस's picture

4 Feb 2015 - 7:00 am | प्रचेतस

उत्तम परिचय.

स्पंदना's picture

4 Feb 2015 - 7:22 am | स्पंदना

किती सुरेख ओळख अन निवडक कवितांची पेरणी.
मला विशेषतः घाई आवडली. मस्तच!!

यशोधरा's picture

4 Feb 2015 - 7:26 am | यशोधरा

वाचते आहे.

कुसुमावती's picture

4 Feb 2015 - 12:43 pm | कुसुमावती

कवितांचे रसग्रहण आवडले.

पुभाप्र.

सुरेख पुस्तक परिचय.पुभाप्र.

पैसा's picture

4 Feb 2015 - 7:55 pm | पैसा

छान ओळख.

विशाखा पाटील's picture

4 Feb 2015 - 9:38 pm | विशाखा पाटील

छान ओळख! समिक्षेतली भाषा रसाळ आहे.

किसन शिंदे's picture

4 Feb 2015 - 10:10 pm | किसन शिंदे

पुस्तकाचे समिक्षण आवडले. मुक्तछंदातल्या म्हणता येईल का या कवितांना?

सस्नेह's picture

5 Feb 2015 - 9:14 am | सस्नेह

मुक्तछंद म्हणण्यापेक्षा या कवितांना छंदमुक्त म्हणणे जास्त योग्य ठरेल +)

मुक्त विहारि's picture

4 Feb 2015 - 10:50 pm | मुक्त विहारि

शाळेत मात्र रसग्रहण न करता चिरफाडच केली जाते.