कुणी घडवून आणले 'महाभारत'?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
26 Dec 2013 - 10:29 pm

मदनकेतु उवाच:

श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदीतून मुक्त केलेल्या स्त्रियांना द्वारकेपर्यंत सुखरूप घेऊन जाण्याची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळे मी देवलोकाचा कायमचा निवासी झालो.
मला फिरण्याची फार आवड, त्यामुळे मी नित्य नवनवीन जागी फिरत असतो. नारदमुनिंनी मला दिलेल्या ‘गगनगामी परिभ्रमण सूचना’ यंत्राचा मला फार उपयोग होतो. (याला भूतलावर ‘जीपीएस’ असे म्हणतात, म्हणे).
एकदा फिरताना एका घरातून मला मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. खिडकीतून डोकावून बघतो, तो आत दोन किरीटधारी द्यूताचा पट मांडून बसलेले दिसले. जवळच एक धिप्पाड मल्ल दर्पणात बघून गदा फिरवत होता, तर आणखी एकजण धनुष्याची वादी बदलत होता. पलिकडील दालनात एक सुंदर स्त्री संजयाने घरोघरी बसवलेल्या ‘दूरचित्रवाणी’ नामक संचावर काहीतरी सासवा-सुनांची भांडणे बघत बसलेली होती.

“बंधो, हा देखील डाव तू हरलास. आता तुझा हा सुवर्ण किरीट माझा झाला. बोल, आता काय लावतोस पणावर?” … त्या दोघांपैकी उग्र चर्येचा किरीटधारी म्हणाला.
“ मी आता माझी स्त्री पणाला लावतो” असे म्हणत दुसरा मिशाळ किरीटधारी फासे खुळखळवू लागला.

त्याचे हे शब्द ऐकून पलीकडल्या दालनातील स्त्री ताडताड पावले टाकत येऊन गरजली, “ चांडाळा, येवढे महाभारत घडले, तरी तुझी द्यूताची खुमखुमी भागलेली नाही? अधमा, भूतलावर असताना मी फक्त एकाला वरलेले असूनही केवळ तुझ्या हट्टापायी मला पाच जणांची बटकी बनून आयुष्य कंठावे लागले. तुझ्या नादानपणामुळे भर सभेत माझी विटंबना झाली, आणि त्यातूनही परत मिळालेले राज्य तू पुन्हा द्यूत खेळून गमावलेस ...पण लक्षात ठेव, आता मी तुझी बटकी नाही, तर इथे मी देवलोकाची स्वतंत्र निवासिनी आहे. मला पणावर लावण्याचा तुला काहीही अधिकार नाही, समजलास ? ... हे ऐकून त्या गदाधारी मल्लाने पण डोळे वटारून जळजळीत उग्र नजरेने बघताच तो मिशाळ किरीटधारी वरमला, आणि “बर, बर, तू जा तिकडे” म्हणून गप्प बसला.

हे सगळे बसून मला हसू आले. मला पूर्वीचे सगळे आठवले, आणि प्रश्न पडला, की ते जे येवढे महाभारत घडले, त्याची सुरुवातीपासूनची हकीगत काय असेल? मग लगेचच मी नारदमुनींच्या प्रासादात जाऊन त्यांना हा प्रश्न विचारला.
“अरे, ती एक फार मोठी कहाणी आहे, सांगतो ऐक” असे म्हणून नारदमुनी बोलू लागले:

नारद उवाच:

कौरव-पंडवांच्या त्या महायुद्धात त्यात नाना देशीचे नाना राजे त्यांच्या सैन्यासह सहभागी होऊन सर्व मृत्युमुखी पडले. अपरिमित जीवहानि होऊन आर्यांची संस्कृती नष्टप्राय झाली. पुढे युद्धातून पळून गेल्यामुळे जिवंत राहिलेले सैनिक, स्त्रिया आणि वृद्ध आपापल्या आकलनाप्रमाणे अनेक गोष्टी सांगू लागले. या युद्धाबद्दल विविध प्रकारच्या कथा प्रसृत झाल्या. त्यातले खरे - खोटे कुणालाच कळेनासे झाले. कुणी पांडव सुष्ट आणि कौरव दुष्ट असे सांगू लागले, तर कुणी त्याउलट बोलू लागले.

महर्षी कृष्णद्वैपायन व्यास यांना याबद्दल बरीच माहिती होती, कारण त्यांचा स्वत:चा सुद्धा यापैकी काही घटनांमधे सहभाग होता. त्यांनी ठरवले, की या सगळ्या कथांचे संकलन करावे, आणि खरोखर काय घडले, हे जाणून काव्यरूपात शब्दबद्ध करावे. व्यासांनी यापूर्वी वेदांचे संकलन केलेले असून त्यांच्या आश्रमात त्यांचे अनेक हुशार शिष्य होते. त्या सर्वांच्या मदतीने हे कार्य अंगावर घेऊन त्यांनी ‘जय’ नामक महाकाव्य रचले, आणि त्याची संथा आपल्या शिष्यांना दिली.

पुढे अर्जुनाचा नातू परिक्षित, याचा मुलगा राजा जनमेजय याने नाग जमातीच्या लोकांचा नायनाट करण्याचे सत्र आरंभले. त्या प्रसंगी व्यास-शिष्य वैशंपायन याने व्यासांचे ते काव्य गाऊन दाखवले, शिवाय आश्रमात संग्रहित, पण व्यासांनी त्यांच्या काव्यात समाविष्ट न केलेल्या अनेक कथा देखील सांगितल्या. जनमेजयाला आपल्या पूर्वजांविषयी अभिमान वाटावा, अश्या स्वरूपात हे सर्व सांगितले गेले. पुढे नैमिषारण्यात सौती याने पुन्हा आणखी अनेक उपकथांची भर टाकून हे महाकाव्य आणखी विस्तृत स्वरूपात सांगितले.

… परंतु या सर्वात मुळात आर्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर संहार खरोखर कुणी, कसा आणि का घडवून आणला, आर्यांच्या कोणत्या दुर्गुणांमुळे त्यांच्यावर हे संकट ओढवले, हे मात्र सांगितलेच गेले नाही, तेच आज मी तुला सांगणार आहे …
… नारायण नारायण ”
थोडेसे थांबून नारदमुनी पुन्हा बोलू लागले:

“कृष्णार्जुनाने खांडववन जाळून इंद्रप्रस्थ वसवले, याची नोंद व्यासांच्या काव्यात झाली, परंतु त्याआधीही फार पूर्वीपासून हा उद्योग आर्य करत आलेले होते. सुरुवातीला गाई-गुरांचे कळप घेऊन दूर-दूर फिरत रहाणारे आर्य स्थिरावू लागले, आणि त्यांची प्रजा जसजशी वाढू लागली, तसतशी त्यांना शेतीसाठी, नगरे वसवण्यासाठी जास्त मोकळ्या जागेची आवश्यकता भासू लागली. शिवाय सरपणासाठी, शव-दाहनासाठी, यज्ञासाठी, घरे बांधण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर लाकूडफाटा मिळवणे आवश्यक झाले. यासाठी त्यांनी वस्तीभोवतीच्या अरण्यांकडे मोर्चा वळवला आणि मोठमोठे वृक्ष कापून लाकूड आणि मोकळी जागा मिळवणे सुरु केले.

मात्र त्यामुळे वनांमध्ये राहणार्‍या नाग, भिल्ल, किरात, निषाद, पैशाच, खोंड, मुंडा, गोंड, कोरकू, संथाळ, गुर्जर, अभिर, तोमर, पारधी, मीणा, वंजारी, कोळी, कथौडी, भारीया, खारीया, टोडा, अश्मक, राक्षस वगैरे वनवासी जमातीवर संकट ओढवले. या आदिवासींचा आपल्या प्रगत शास्त्रविद्येच्या जोरावर आर्य सहज पाडाव करत, आणि त्यांच्या स्त्रियांना पकडून नेऊन दासी बनवत. आर्यांचे विवाह सोहळे, श्रेष्ठींचे आगमन इ. प्रसंगी शंभर-शंभर सुस्वरूप दासींची जी भेट दिली जायची, त्या सर्व या आदिवासी स्त्रियाच असत. त्यांना होणारी संतती पुन्हा दास-दासी, सूत, सेवक वगैरे म्हणून कामाला लावत.
सुरुवातीला या वनवासी जमातींनी आणखी आतील दाट अरण्यांमधे आश्रय घेतला, परंतु आर्याचे आक्रमण दिवसेंदिवस अधिकाधिक वाढू लागले, तशी त्यांच्यात फारच घबराट पसरली. यावर काहीतरी उपाययोजना केलीच पाहिजे, असे सर्वांना वाटू लागले. निरनिराळ्या जमातीचे प्रमुख आपापसातले वैर बाजूला ठेऊन एकत्र विचार विनिमय करायला जमले, आणि त्यांनी आपला वन्यरक्षक संघ स्थापला.

“मदनकेतु, तुझे पूर्वज रत्नकेतु देखील त्या संघाच्या बैठकीत आलेले होते. त्यांनी सर्वांना सल्ला दिला, की याकामी गंधर्वांची मदत मागावी. कारण आर्यांचा उपद्रव गंधर्वांना सुद्धा होऊ लागला होता. गंधर्व हे मुख्यत: गायन वादन, नृत्य, कलाकुसर वगैरेत प्रवीण असून त्यांच्या स्त्रिया नृत्य आणि कामकलेत निपुण अश्या अप्सरा असत. गंधर्वांकडे फक्त स्वसंरक्षणापुरते सैन्य असले, तरी ते आर्यांच्या तोडीस तोड होते. मात्र आपणहून कुणाची खोड काढणे वा आक्रमण करणे, असे उद्योग गंधर्व करत नसत. अधून मधून आर्यांचे सैन्य मुद्दाम गंधर्वांवर स्वारी करत असे, आणि त्यांचेशी लढण्यात गंधर्वसेना गुंतली, की दुसर्‍या बाजूने शिरकाव करून आर्यांचे दुसरे पथक अप्सरांचे अपहरण करी.

रत्नकेतु हा निष्णात वैद्य असून त्याची गंधर्वांचा प्रमुख चित्ररथ याचेशी मैत्री होती. काही वनवासी जातिप्रमुखांसह तो चित्रसेनास भेटला. बराच खल झाल्यानंतर चित्ररथाने सुचवले, की आर्य फार सामर्थ्यवान असून ते सर्वत्र पसरलेले असल्याने ठिकठिकाणी युध्द करून त्यांचा पाडाव करणे शक्य नाही. त्यापेक्षा त्यांची आपापसातच भांडणे लावून ते आपापसात लढून नष्ट कसे होतील, याचा विचार करावा. त्यांचेकडे असलेल्या वन्य जमातीच्या दास-दासींशी संधान बांधून त्यांच्याकडली माहिती मिळवत रहावे, त्या माहितीचा उपयोग करून त्यांच्यात वैर पेटेल, असे करावे. तसेच ठिकठिकाणच्या स्त्रिया पळवून त्यांचेद्वारे जी संतती ते उत्पन्न करत असतात, त्या संततीला हाताशी धरून आपले इप्सित साधावे.
आर्यांनी मोठमोठी नगरे वसवून ज्योतिष, गणित, काव्य, शिल्पशास्त्र, युध्दशास्त्र, अश्वविद्या, शस्त्रविद्या वगैरेत पारंगत होऊन अमाप वैभव मिळवले आहे खरे, परंतु त्याबरोबरच द्यूत, सुरापान, अहंकार, कामांधता इत्यादी दुर्गुणांचा त्यांच्यात फार प्रादुर्भाव झालेला आहे, या गोष्टीचा उपयोग चातुर्याने करून घ्यावा, असेही चित्ररथाने सुचवले.

सुंदर वनवासी स्त्रियांद्वारे आर्य नृपतिंना मोहात पाडण्याचा एक प्रयत्न पूर्वीही केला गेला होता, पण त्यात यश मिळाले नव्हते. राम-लक्ष्मण वनवासात असताना त्यांना मोहित करण्यासाठी ‘शूर्पणखा’ नामक वनकन्येला पाठवण्यात आहे होते, परंतु त्यांनी तिचा कावा ओळखून अन्य आर्यांवर तिने पुन्हा तसला प्रयोग करू नये, म्हणून तिला विद्रूप करून सोडून दिले होते. आता पुन्हा तसाच प्रयोग करून बघावा असे ठरवून ‘गंगा’ नामक युवतीला कुरुराज्याचा प्रमुख राजा प्रतीप याच्याकडे पाठवण्यात आले. गंगा सरळ भर सभेत जाऊन प्रतीपच्या मांडीवर बसली, परंतु प्रतीप हा मुळात सात्विक प्रवृत्तीचा राजा असून अद्याप मूलबाळ झालेले नसल्याने मनाने फार खचलेला होता. त्यातून गंगा त्याच्या उजव्या माडीवर जाऊन बसल्याने आर्यांच्या संकेताप्रमाणे ती त्याची कन्या वा स्नुषा ठरली. भार्येने, रक्षेने, वारांगनेने वा दासीने वामांकावर बसावे, असा आर्य संकेत होता. त्यामुळे मला जर मुलगा झाला, तर तो तुझा स्वीकार करेल, असे सांगून प्रतीपने गंगेला परत पाठवले. याप्रमाणे कुरुवंशात प्रवेश करण्याचा पहिला प्रयोग फसला. यापुढे वनकन्यांना असे भर सभेत न पाठवता गंगा व अन्य नद्या पार करण्यासाठी ठिकठिकाणी उत्तम नौका ठेवायच्या आणि त्या नौकांवर कामकलेत प्रवीण अश्या चतुर स्त्रियांची योजना करून महत्वाच्या आर्य पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना त्या स्त्रियांशी विवाह करायला लावायचा. मग त्यांना होणार्‍या संततीद्वारे आर्यांची सत्ता हळुहळू काबीज करायची, असा बेत ठरला. मग काही सुंदर वन्य तरुणींना गंधर्वलोकात अप्सरांकडून नृत्य, कामादि कलांचे शिक्षण घेण्यास पाठवले गेले.

राजा प्रतीप आणि त्याची राणी सुदेष्णा यांना उतारवयात एक पुत्र झाला, त्याचे नाव शंतनु असे ठेवले. शंतनुला आपल्या सात्विक पित्याचे छत्र फार काळ लाभले नाही, त्यामुळे तो काहीसा हट्टी, दुराग्रही आणि कामासक्त असा पुरुष झाला. मृगयेसाठी तो बरेचदा वनात जात असे, हे बघून वन्य संघाने पूर्वी प्रतीपकडे जाऊन आलेल्या गंगेची ‘गंगा’ याच नावाची लावण्यसंपन्न, नृत्यनिपुण, कामचपला अशी कन्या शंतनुच्या संपर्कात येईल, अशी व्यवस्था केली. तिने अधोमुख, तिर्यक दृष्टी, उत्तरियाची चाळवाचाळव इत्यादि विभ्रमांनी शंतनुला अगदी घायाळ केले. काममोहित झालेल्या शंतनुने तिच्याकडे समागमाची मागणी करताच तिने आपल्या जमातीच्या सर्व लोकांस बोलावून त्यांचेसमक्ष शंतनुने आपले पाणिग्रहण करून, राणी बनवून राजप्रासादात घेऊन जावे, आणि तिने काहीही केले, तरी त्याबद्दल शंतनुने काहीही बोलू नये, बोलल्यास ती तात्काळ त्याला सोडून जाईल, इत्यादि अटी घालून त्याच्यासह हस्तिनापुरास प्रयाण केले. याप्रकारे गंगेच्या पोटी जन्मणार्‍या भावी कुरु सम्राटाद्वारे सत्तेवर आपले प्रभुत्व कायम करण्याचा वन्य संघाचा हेतु सफल होण्याची शक्यता निर्माण झाली.

वन्य लोकांमध्ये एकाद्या स्त्रीच्या पोटी जर अगदी अशक्त, रोगिष्ट मूल जन्माला आले, तर ते मूल नदीत सोडून सुसर देवतेला अर्पण करण्याची प्रथा होती. कारण अरण्यातील खडतर जीवनात अश्या मुलांचा प्रतिपाळ करणे अवघड तर असेच, शिवाय मोठेपणी अश्या मुलांना तिथले जीवन झेपतही नसे. नवीन येणारी प्रजा अत्यंत काटक, सबळ असावी, यावर त्यांचा फार कटाक्ष असे. गंगेच्या पोटी जन्माला येणारी संततीसुद्धा तशीच असली पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती, कारण त्याद्वारेच त्यांना मोठे राजकारण घडवून आणायचे होते.

शंतनु हा अतिशय कामासक्त असल्याने वयात आल्यापासून तो नित्य अनेक दासींशी संग करत असे. परिणामी त्याचे पौरुष्य निस्तेज झालेले होते. त्यामुळे गंगेला त्याचेपासून होणारी संतति अगदी निर्बळ, रोगिष्ट अशी उपजू लागली. गंगेच्या माहेरची मंडळी, अर्थात वन्य संघाचे लोक पुत्र जन्मानंतर अर्भकाची तपासणी करण्यास येत, आणि त्या दुर्बल मुलांना गंगेत सोडून येत. शंतनु गंगेच्या सर्वस्वी अधीन असल्याने आणि वचनबद्ध असल्याने तो या बाबतीत काहीच बोलू शकत नसे. अशी सात मुले नदीत सोडल्यावर वन्य संघ विचारात पडला. त्यांनी योजलेला बेत पार पडणे , हे मुळात गंगेला धडधाकट मूल होण्यावर अवलंबून होते. शेवटी रत्नकेतुने देवलोकातील काही दिव्यौषधि शंतनुला देऊन, गंगेकरवी त्याला सक्तीने ब्रम्हचर्य आणि अन्य दैवी व्रते पाळायला लावून त्याची प्रकृती अगदी खणखणीत करवली, मगच त्याचेकडून गंगेने पुत्रप्राप्ती करवून घेतली. देवविद्या अनुसरून, व्रतस्थ राहून सक्षम झाल्यावरच मगच शरीरसंबंध केल्याने आता मात्र उत्तम लक्षणांनी युक्त, कांतिमान आणि सुदृढ असा पुत्र जन्मला, त्याचे नामकरण ‘देवव्रत’ असे करण्यात आले.

मात्र या देवव्रताचे पालन-पोषण जर कुरुराज्यात, आर्य संस्कृतीत झाले, तर वन्यसंघाचा हेतू तडीस जाणे दुरापास्त झाले असते, म्हणून लहानग्या देवव्रताला घेऊन गंगा पुन्हा तिच्या अरण्यवासी समाजात परतली, ती कायमचीच. तिथे देवव्रताचे शिक्षण वन्यसंघाच्या देखरिखीखाली चालले. आर्य लोकातील अनिष्ट प्रथा, त्यांनी चालवलेले वनप्रदेशावरील आक्रमण, वनवासी युवतीचे अपहरण करून त्यांना दासी बनवण्याची परंपरा, राजा शंतनु याची कामासक्ति वगैरेंबद्दल त्याला वारंवार सांगण्यात यायचे. हे सर्व ऐकून त्याचे चित्तात आर्य संस्कृतीबद्दल अभिमान वाटण्याऐवजी काहीसा तिटकाराच निर्माण होऊ लागला, आणि आपण विवाहाच काय, स्त्रीसंग सुद्धा करू नये, अशी त्याची धारणा होऊ लागली. आर्यांकडून होणारी वनांची नासधूस आणि वन्य संस्कृतींचा विनाश थांबवणे, हेच आपले जीवनकर्तव्य असे त्याला वाटू लागले.…
(क्रमश:)

संस्कृतीइतिहासवाङ्मयसमाजराजकारणमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

26 Dec 2013 - 10:38 pm | खटपट्या

वाचतोय...

यसवायजी's picture

26 Dec 2013 - 10:42 pm | यसवायजी

आवडेश. पुभाप्र.

प्रचेतस's picture

26 Dec 2013 - 10:42 pm | प्रचेतस

लेखन आवडले.

शंतनु च्या जागी शांतनु अशी दुरुस्ती सुचवतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2013 - 12:17 am | डॉ सुहास म्हात्रे

और आंदो, तुमच्या शैलीत !

बॅटमॅन's picture

27 Dec 2013 - 12:18 am | बॅटमॅन

वाहवा!! लेखन आवडलेच. पुढील भागाची प्रतीक्षा करीत आहे.एकीकडे पु ना ओक ष्टैल कल्पनाशक्ती अन दुसरीकडे भैरप्पा ष्टैल कारणमीमांसा अगदी उत्तम जमली आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Dec 2013 - 12:41 am | निनाद मुक्काम प...

हे महाभारत जर आज एक वेगळा विचार म्हणून छोट्या पडद्यावर आणले तर काय राडा होईल असा विचार मनात आला.
पण एका वेगळ्या अनुषंगाने त्या काळातील महानाट्याचा आढावा घेणे आवडेश

खटपट्या's picture

27 Dec 2013 - 3:24 am | खटपट्या

मस्तै !!! येवुदे अजुन

तुषार काळभोर's picture

27 Dec 2013 - 8:47 am | तुषार काळभोर

विंटरेष्टिंग!

स्पा's picture

27 Dec 2013 - 9:30 am | स्पा

अरे वा, परत महाभारत

मस्त, ती विचित्र चित्रे मिस केली पण

ती विचित्र चित्रे मिस केली पण +१
बाकी वाचतोय .

मृत्युन्जय's picture

27 Dec 2013 - 11:27 am | मृत्युन्जय

समांतर महाभारताची ही कथाही आवडली.

कुसुमावती's picture

27 Dec 2013 - 12:32 pm | कुसुमावती

मस्तच. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

गणपा's picture

27 Dec 2013 - 1:59 pm | गणपा

रोचक...... वाचतोय.

मुक्त विहारि's picture

28 Dec 2013 - 3:18 am | मुक्त विहारि

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

अभ्या..'s picture

28 Dec 2013 - 6:04 pm | अभ्या..

छान. आवडले. :)

नशिब तुम्ही व्यासाच्या जागी नव्हतात.

आवशीचो घोव्'s picture

28 Dec 2013 - 9:48 pm | आवशीचो घोव्

फारच छान

इष्टुर फाकडा's picture

28 Dec 2013 - 10:10 pm | इष्टुर फाकडा

पुभाप्र

उद्दाम's picture

29 Dec 2013 - 1:41 pm | उद्दाम

:)

सस्नेह's picture

29 Dec 2013 - 3:01 pm | सस्नेह

महाभारत 'मुळा'पासूनसुद्धा गोडच लागते...

वडापाव's picture

29 Dec 2013 - 8:14 pm | वडापाव

मस्त!!! पु भा प्र

इन्दुसुता's picture

29 Dec 2013 - 9:57 pm | इन्दुसुता

वाचतेय.
पुभाप्र

चित्रगुप्त's picture

4 Jan 2014 - 7:48 pm | चित्रगुप्त

यापुढील भागः 'मत्स्यगंधेची प्रतिज्ञा' लवकरच येणार.

..अतिशय वाचनीय व सन्ग्रहणीय.

धन्यवाद

विनोद१८

आयुर्हित's picture

6 Jan 2014 - 1:18 am | आयुर्हित

व्वा व्वा क्या बात है! उत्कृष्ट लिखाण करता राव!

माहितीच्या जालावर व प्रत्यक्ष मिपावरच हे महाभारत सूरु झालेलं बघून मी स्वत:लाच चिमटी काढली आणि हे खरे आहे यावर विश्वास ठेवला.

मात्र त्यामुळे वनांमध्ये राहणार्‍या नाग, भिल्ल, किरात, निषाद, पैशाच, खोंड, मुंडा, गोंड, कोरकू, संथाळ, गुर्जर, अभिर, तोमर, पारधी, मीणा, वंजारी, कोळी, कथौडी, भारीया, खारीया, टोडा, अश्मक, राक्षस वगैरे वनवासी जमातीवर संकट ओढवले.

यात एक छोटासा बदल सुचवावा वाटतो:

यातील आभीर हि जमात(किवा वंश/जात?) यदुवंषीय (यादव) असून कृष्ण स्वत:ह्या वंशातील एक होता.
आभीर या शब्दाची युत्पत्ती आभी + आर्य म्हणजेच आरंभीचे आर्य असा होय.
त्यामुळे ती वनवासी नसावी व चुकून वरील सूची मध्ये घेतली गेली असावी.
अजून एक संदर्भ: शिवाजी सावंत लिखित मृत्युन्जय मध्ये कृष्णाच्या वंशाचे नाव अभिरभानू असे आहे.

पुढे आभीर ह्याचा अपभ्रंश होऊन अहिर झाले.अहिरराजे होऊन गेलेत जे धुळे+नंदुरबार ह्या पट्यातील लोकाची आजही आडनावे आहेत व इतर महाराष्ट्रातहि असतील.हि सर्व कृष्णाचेच वंशज आहेत.

कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत

यातील आभीर हि जमात(किवा वंश/जात?) यदुवंषीय (यादव) असून कृष्ण स्वत:ह्या वंशातील एक होता.
आभीर या शब्दाची युत्पत्ती आभी + आर्य म्हणजेच आरंभीचे आर्य असा होय.
त्यामुळे ती वनवासी नसावी व चुकून वरील सूची मध्ये घेतली गेली असावी.
अजून एक संदर्भ: शिवाजी सावंत लिखित मृत्युन्जय मध्ये कृष्णाच्या वंशाचे नाव अभिरभानू असे आहे.

कृष्ण हा क्षत्रिय होता, बालपण फक्त गोकुळात गेले इतकेच. आभीर लोक हे क्षत्रिय नव्हते माझ्या माहितीप्रमाणे. अर्जुनाचा एकदा त्यांनी पराभवही केलेला आहे पोस्ट-महाभारत.

आणि ती व्युत्पत्ती तर साफच चुकीची आहे. आभीर म्हणजे आभी + आर्य ही पहिली घोडचूक अन त्याचा अर्थ आरंभीचे आर्य ही दुसरी घोडीचूक. बाकी सर्व कृष्णाचे वंशज इ.इ. तिसरी शिंगरूचूक.

आभीर हे क्षत्रिय होते व आहेत(आम्हीही आहोत) व भगवान कृष्ण याच वंशाचे होते

अधिक माहितीसाठी पहा विकिपीडिया
आणि Followers of Krishna
आपला लाडका: आयुर्हीत

बर्फाळलांडगा's picture

6 Jan 2014 - 1:43 am | बर्फाळलांडगा

शंतनु हा अतिशय कामासक्त असल्याने वयात
आल्यापासून तो नित्य अनेक दासींशी संग करत असे.
परिणामी त्याचे पौरुष्य निस्तेज झालेले होते.
त्यामुळे गंगेला त्याचेपासून
होणारी संतति अगदी निर्बळ, रोगिष्ट अशी उपजू
लागली.

गंधर्वांकडे फक्त स्वसंरक्षणापुरते सैन्य असले, तरी ते
आर्यांच्या तोडीस तोड होते. मात्र आपणहून
कुणाची खोड काढणे वा आक्रमण करणे, असे उद्योग
गंधर्व करत नसत. अधून मधून आर्यांचे सैन्य मुद्दाम
गंधर्वांवर स्वारी करत असे, आणि त्यांचेशी लढण्यात
गंधर्वसेना गुंतली, की दुसर्या बाजूने शिरकाव करून
आर्यांचे दुसरे पथक अप्सरांचे अपहरण करी.

हे तूफान विनोदी!

असो मुळ प्रश्न हा आहे की आर्य त्यानचेवर लाद्लेल्या युध्दात
गंडल्या नंतर या जमाती राज्य कर्त्या झाल्या की तशाच वनात पडीक राहिल्या ?

खिलजि's picture

23 Apr 2019 - 8:19 pm | खिलजि

हा भाग सुंदर होता ,, आता पुढील भाग वाचने आले ..

चित्रगुप्त's picture

31 Aug 2023 - 8:31 pm | चित्रगुप्त

सध्या महाभारतावर चर्चा सुरू असल्याने नवीन मिपाकरांसाठी.

बबन ताम्बे's picture

2 Sep 2023 - 5:26 pm | बबन ताम्बे

एका वेगळ्या दष्टीकोनातून लिहिलेले महाभारत आवडले.
तुमचा प्रचंड अभ्यास दिसून येतो.
पुढील भाग पण असतील तर धागा वर आणा. वाचण्यास उत्सुक आहे.