मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे.
याबद्दल मदनकेतु म्हणतो: "... एवढ्या हजारो स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना घेऊन द्वारकेपर्यंतचे शेकडो योजने अंतर कसे पार करणार? एवढा मोठा जथा पायी चालून जाणार म्हणजे किती दिवस लागतील? वाटेत रानटी पशु किंवा रानटी लोकांच्या टोळ्या यांच्यापासून संरक्षण कसे करायचे ? एवढ्या सर्वांच्या रात्रीच्या मुक्कामाची, जेवणाखाणाची, अंथरूण-पांघरुणाची कशी काय सोय करणार? त्यात थंडीचे दिवस. दिवस छोटे आणी रात्री मोठ्या. शेकोटीसाठी, स्वयंपाकासाठी वाळकी लाकडे हवीत, ती कशी मिळवायची ? एवढ्या स्त्रिया, त्यांची आपापसात भांडणे झाल्यास, त्या आजारी पडल्यास वा कुणाला पायी चालणे अशक्य झाल्यास काय करायचे ? सगळेच प्रश्न होते...."
तर मित्रहो, अशी कल्पना करा, की तुम्हीच त्याकाळचे मदनकेतु होता, आणि तुमच्यावर श्रीकृष्णाने टाकलेली ही जबाबदारी तुम्ही समर्थपणे पार पाडलीत.
कसे केलेत हे सर्व, त्या पाचेक हजार वर्षांपूर्वीच्या काळात ? कसे नेले त्या वीस हजारांच्या तांड्याला, आसाम ते द्वारकेपर्यंतचे तीन हजार कि.मी. चे अंतर पार करून? बैलगाड्या वा रथातून की पायी ? संरक्षणाची, जेवणखाणाची, मुक्कामाची, सरपण, शिधा, घोडे, बैल, दवादारू वगैरे सर्व गोष्टींची कशीकाय तजवीज केलीत? वाटेत काय काय घडले? कोणत्या अडचणी आल्या? त्यावर कशी मात केलीत?
सोडा तुमच्या कल्पनेचे वारू भरधाव, आणि लिहून काढा जे जे सुचेल ते.
(मुदत: २५ नोहेंबर, २०१३)
सर्वोत्कृष्ट प्रतिसादकाला माझे एक चित्र सप्रेम भेट.
संदर्भ: 'नरकचतुर्दशी: मदनकेतू आणि सोळा हजार एकशे आठ स्त्रियांची कथा'
http://www.misalpav.com/node/25950
प्रतिक्रिया
3 Nov 2013 - 8:48 pm | चित्रगुप्त
माझी काही चित्रे इथे बघा:
http://www.flickr.com/search/?q=sharad+sovani
3 Nov 2013 - 9:38 pm | पाषाणभेद
त्याकाळात मदनकेतुला किती कालावधी लागला या सर्व तांड्याला व्दारकेपर्यंत पोचवायला? तो कालावधी सांगितला तर काही सुसंगती लावता येईल.
बाकी तुमची मुळ कथा वाचली. अतिशय छान निरूपण केले आहे तुम्ही. चित्रगुप्त महाराज की जय!
3 Nov 2013 - 9:45 pm | चित्रगुप्त
अवधि किती लागला हे तुम्ही कसेकाय गेलात, यावरच अवलंबून. त्यामुळे तुम्हीच सांगायचे ते.
3 Nov 2013 - 9:59 pm | पाषाणभेद
>>> अवधि किती लागला हे तुम्ही कसेकाय गेलात, यावरच अवलंबून. त्यामुळे तुम्हीच सांगायचे ते.
काका, यात बरेच पॅरॅमिटर मिसिंग आहेत. जसे जाण्याचा मार्ग, कालावधी, जाण्याचे साधने आदी. एकदोन पॅरामिटर फिक्स सांगा म्हणजे अवांतर होणार नाही.
जाण्याचा मार्ग भले सांगू नका. पण कालावधी फिक्स आहेच तोच सांगा म्हणजे त्यात बजेट बसवतो. नायतर आम्ही ओरीसा, द्रवीड देशही भटकून आणू पॅसेंजरांना.
3 Nov 2013 - 11:43 pm | प्रचेतस
मदनकेतू उवाचः
आता नरकासुरपुत्र भगदत्त गादीवर असल्याने आम्हाला निदान तांड्याची काही चिंता नव्हती. एक हजार बैलगाड्यांसह २०००० जणांना किमान १० दिवस पुरेल असा शिधा भगदत्ताकडून घेऊन आम्ही निघालो. साथीला भगदत्ताने २०० रथांसह १००० कडवे शस्त्रधारी पदाती सैनिक आमच्या संरक्षणासाठी दिलेले होतेच. आघाडीला ५० रथ आणि १०० पदाती, पिछाडीला तेव्हढेच आणि उरलेले सर्व जण मध्ये मध्ये विखरून तांड्याच्या संरक्षणासाठी ठेवलेले. एकंदरीत आमचा बचाव अतिशय भक्कम नसला तरी किमान भिल्ल, अभीरादी रानटी टोळ्यांपासून संरक्षणासाठी पुरेसा होता. साथीला पुढचा मार्ग काढण्यासाठी तसेच सुरक्षितता तपासण्यासाठी माझे निष्णात १० हेर मी आधीच पुढे पाठवले होते.
आता द्वारकेच्या परतीच्या निर्धोक मार्गाची आखणी करणे आले.
जायच्या दृष्टीने सर्वात जवळचा मार्ग होता तो प्रागज्योतिषपुराहून दक्षिणेकडे सरकून पौंड्र, वंग, औंड्र आणि तदनंतर पश्चिमेकडे सरकून नर्मदेच्या काठाने विंध्याचल ओलांडून अवंतीनगरी पार करून आनर्त देशात पोहोचणे पण हा मार्ग जवळचा असला तरी फार धोक्याचा. पौंड्र नगरीचा पौंड्रक वासुदेव हा श्रीकृष्णाचा कट्टर वैरी. पुढे वंग, औंड्र राज्यांशीही सख्य नाहीच. तदनंतर वैराण माळराने ओलांडून पुढे गेल्यावर विंध्यगिरीचे घनदाट जंगल त्यातील अत्यंत क्रूर अभीर टोळ्या. बरे इतके अडथळे ओलांडून पुढे गेलो तर समोर अवंती नगरी उभी. मूळचे यादवकुलीन असलेले अवंतीचे विंदानुविंद हे कृष्णाचे हाडवैरी. कृष्णाने केलेला त्यांचा पराभव त्यांच्या मनात अजूनही ठसठसतोय. ज्याप्रमाणे वाघाच्या गुहेत वात चुकून आलेले वासरू वाघ जीवंत जाऊ देत नाही त्याचप्रमाणे आयता हातात आलेला हा जथा विंदानुविंद सोडतील हे शक्य तरी आहे काय?
तेव्हा हा जवळचा मार्ग आम्ही एकमताने बाजूस सारला आणि पुढच्या मार्गांचा विचार करावयास लागलो.
दुसरा मार्ग होता प्रागज्योतिष, अंग, मगध व पुढे यमुनेच्या काठाने काशी राज्य, चेदी, करूष व पुढे माळव्यावरून आमचा आनर्त देश. हा मार्ग तर फारसा विचार न करताच आम्ही निकालात काढला. करण तर स्पष्टच होते. आमचा अत्यंत प्रबळ वैरी मगधराज जरासंध व श्रीकृष्णाचा आत्येभाऊ चेदीराजा शिशुपाल यांची अभद्र युती. याच जरासंधाच्या भितीने आम्ही मथुरा सोडून दूर आनर्त देशात द्वारका नगरी वसविली. तो जरासंध आमच्या घास घेतल्याशिवाय स्वस्थ कसा बसेल?
आता आमच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित पण सर्वात लांबचा असा एकच मार्ग उरला होता. तो म्हणजे वायव्येकडे सरकून विदेह नगरी गाठणे. विदेह नगरीचा राजा आमचा मित्र राजाच होता. तिथे जाऊन थोडी विश्रांती घेऊन तसेच काही दिवसांचा शिधा बरोबर घेऊन शरयूच्या तीराने कोसल व पुढे गंगातीरावरची पांचाल नगरी गाठणे आम्हास सहजशक्य होते. पांचाल नगरीचा द्रुपद हा तर आमचा परममित्रच. व त्यापुढचे कुरु देश तर आमचा पूर्वीपासूनचा मित्रदेश. कुरूंच्या खाली दक्षिणेकडे सरकल्यास येतो तो मत्स्यदेश. त्याची राजधानी विराटनगरी अर्थात उपप्लव्यमध्ये विराट राजा आमचे नक्कीच स्वागत करेल याची तर खात्रीच आहे. मत्सदेशीच्या पुढे मात्र निषादनगरीचा राजा एकलव्याच्या रूपाने आम्हास एकमेव अडथळा होता अर्थात त्याचे सामर्थ्य तुलनेने मर्यादित असल्याने हा अडथळा पार करणे आम्हास साध्य होते.
अर्थात हाच सर्वात सुरक्षित मार्ग असल्याने शेवटी तोच निवडला गेला व आम्ही तांड्यासह मार्गस्थ झालो.
तुलनेने सुरक्षित मार्ग असला तरी आमचा पहिला टप्पा होता तो विदेह गाठणे. ह्या मार्गात घनदाट जंगलांचा आणि उंच डोंगररांगाचा अडथळा होताच. आमचे निष्णात हेर पुढे मार्ग काढत काढत चालले होते. असेच ४/५ दिवस गेले. आता आम्ही विदेह आणि प्रागज्योतिषपुराच्या मध्यावर आलो होतो. अचानक आजूबाजूच्या झाडीतून काही रानटी टोळ्यांनी आमच्यावर अकस्मात हल्ला केला. आमच्या सवध सैनिकांनी तत्परतेने त्यांना प्रत्युत्तर देऊन पिटाळून लावले तरी आमचेही १०/१५ सैनिक प्राणास मुकले व कित्येक जखमी झाले. स्त्रिया मात्र पूर्णपणे सुरक्षित राहिल्या. झाल्या घटनेपासून सावध होऊन आम्ही फक्त थोडीशी विश्रांती घेत घेत पुढचा मार्ग काटून विदेह नगरीत पोहोचलो. विदेहराजाने आमचे मनापासून स्वागत करून आमची विश्रांतीची तसेच जखमी सैनिकांच्या सुषृशेची व्यवस्था केली. चार पाच दिवस तेथेच थांबून आम्ही ताजेतवाने होऊन तसेच अधिकचा शिधा घेऊन पुढे निघालो. आता पुढचा भाग सपाट मैदानी तसेच मित्र देशांचा असल्याने सुरक्षिततेची फारशी चिंता नव्हती. चार दिवसांत कोसल गाठले. कोसलराजाकडे २/३ दिवस मुक्काम करून त्याचा पाहुणचार स्वीकारून आम्ही पांचालनगरीकडे निघालो. पाचच दिवसांत पांचालनगरीत येऊन पोहोचलो. दृपदाने आमचे भव्य स्वागत केले. नरकासुर हा द्रुपदाचाही शत्रूच. त्याच्या वधामुळे आनंदित द्रुपदाने आमचा प्रचंड आदरसत्कार केला. स्त्रियांना नवी वस्त्रे दिली. बैलगाड्यांना ताज्या दमाचे बैल पुरवले. तसेच वाटेत लागणार्या दुधदुभत्यासाठी ५० गायी दिल्या. तसेच १० निष्णात वैद्यसुद्धा आमच्या जथ्यात दिले. याउप्परही दृपदाने त्याचे निष्णात ५०० सैनिक आमच्या संरक्षणासाठी बरोबर दिले. दृपदाकडे ५ दिवस मुक्काम करून आम्ही पुढे कूच केले. आता कुरु राज्यात जाऊन व्यर्थ वेळ न दवडता आम्ही दक्षिणेकडे मत्स्य देशात सरकलो. अवघ्या दोनच दिवसांत मत्स्यदेश गाठून विराटाचा आदरसत्कार स्वीकारून फक्त एकच दिवस विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. आता एकमात्र अडथळा होता तो निषादराजाचा.
अता आम्ही निषादराजाला हूल देऊन जायचे ठरवले. आमचे निष्णात हेर याधीच निषादनगरीत पाठवले होतेच. हेरांनी तिथे जाऊन हूल उठवली की द्वारकेचा राजा वसुदेव संकर्षणासह निषादनगरीवर हल्ला करण्याचा प्रयत्नात आहे. साहजिकच निषादराज एकलव्याने आपले सर्व सैन्य द्वारकेच्या दिशेने तैनात केले. त्यामुळे आम्ही निषादनगरीच्या पूर्वकडून जाऊन खाली दक्षिणेकडे सरकून माळवा प्रांतात जाण्यात यशस्वी ठरलो. आमचे हे याधीच द्वारकेत जाऊन पोहोचले होतेच. आमची बातमी मिळाल्यामुळे स्वतः बलराम माळव्यात येऊन थांबला होता. बलरामासारखा प्रबळ ताकदीचा योद्धा आता आमच्या संरक्षणाला असल्यामुळे आम्ही तत्परतेने द्वारकेत सुखरूप येऊन पोहोचलो.
माझ्यावर सोपवलेली कामगिरी मी अगदी व्यवस्थित पार पाडली होती. जवळपास सर्व स्त्रिया सुरक्षित होत्या. मात्र विदेहनगरीच्या आधी आलेल्या संकटामुळे थोडेसे गालबोट लागले होतेच. याशिवाय दूरच्या प्रवासाची दगदग सहन न होवून वा नरकासुराच्या बंदिवासात सोसलेल्या हाल अपेष्टांमुळे १०/१२ स्त्रिया वाटेतच प्राणांस मुकल्या. दैवगती मोठी विचित्र असते हेच खरे.
द्वारकेत सुखरूप तर येऊन पोहोचलो पण आता माझ्यापुढे एकच प्रश्न उरला होता तो म्हणजे या सोळा सहस्त्र स्त्रियांचे आता काय होईल? काय विषयलोलुप यादव त्यांना सुखाने जगू देतील काय? अर्थात त्याची काळजी करायला श्रीकृष्ण समर्थ आहेच. तो नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेनच.
4 Nov 2013 - 12:39 am | अग्निकोल्हा
फकस्त
1) दहा बार दिवसात सदरिल समूह 3000 वगैरे वगैरे किलोमीटर कापू शकणार नै
2) अन जर तुमि यावृत्तान्ताचे गुहेतिल दगडी शिल्प इथे चिटाकवाले नै तर आमि ह्यो खराबी मन्नार नै.
4 Nov 2013 - 4:48 pm | प्रचेतस
हा हा.
वृत्तांत लिहिताना नकाशा डोळ्यांसमोर नसल्याने अंतराची तशी गल्लतच झाली.
बाकी नरकासुराच्या तावडीतून स्त्रियांना सोडवल्यावर कृष्णाने आनंदाने मुरली वाजवली त्या क्षणाचे हे शिल्प बघा
![a](https://lh6.googleusercontent.com/-YB67NxDfi8I/UneBdm-QtfI/AAAAAAAAanI/ySFCelFnXPE/s1152/IMG_7041.jpg)
पांचाल राज्यात दृपदाने मदनकेतूला ताज्या दमाचे बैल पुरवले त्या घटनेचे हे शिल्पांकन पहा.
![a](https://lh3.googleusercontent.com/-5ONWhRfd2mc/UneA-N0XL4I/AAAAAAAAanA/jL2AZoWT5MI/s1152/IMG_7042.jpg)
5 Nov 2013 - 1:49 pm | अग्निकोल्हा
नेहमीप्रमाणेच सुरेख शिल्प , आता या चित्रांसोबतच तुमचा प्रतिसाद खर्या अर्थाने समग्र जाहला असे वाटते... धन्यवाद.
5 Nov 2013 - 3:11 pm | प्रचेतस
हाहा. :)
4 Nov 2013 - 10:02 am | चित्रगुप्त
वल्लींनी उल्लेख केलेली राज्ये वगैरे या नकाशात बघा:
![.](http://en.academic.ru/pictures/enwiki/77/Mahabharata_BharatVarsh.jpg)
5 Nov 2013 - 5:25 pm | प्रसाद गोडबोले
तत्कालीन परिस्थिती पाहता ३००० किमी अंतर तब्बल १६१०० स्त्रियांना घेवुन निर्धोकपणे पार करणे जवळपास अशक्य होते वाटे मध्ये अंग , पौंड्र वगैरे शत्रुराष्ट्र टपुन बसलेली होती . शिवाय विदर्भात रुक्मिणीस्वयंवर कांडात दुखावलेला रुक्मीही जखमी वाघासारखा टपुन बसलेला होता , तसे अभीर वगैरे लोकांना वासुदेव सोबत असताना हरवणे काहीच अवघड नव्हते पण १६१०० स्त्रियांना सोबत घेवुन त्यांच्या राज्यातुन मार्ग काढणे केवळ अशक्य प्राय होते .
उत्तरेकडुन गंगेच्ता वरुन प्रवास करत करत हस्तिनापुर व तेथुन सरस्वतीच्या पश्चिमेकडुन द्वारका असा एकच मार्ग फीजीबल वाटत होता पण त्यातही पांचाल , कौरव पांडव ह्यांच्यात राजकीय तणाव होतेच त्यांच्या कडुन मदत मिळण्याची शक्यता नव्हतीच शिवाय हे अंतरही जास्त होते आयुष्यातली कित्येक वर्ष कारावासात घालवलेल्या ह्या राजकुमारींना ते शक्यच नव्हते .... मग ह्यावर शेवटी एकच पर्याय उरला होता ...
समुद्र उल्लंघन ...
वासुदेवांनी नरकासुराचा दारुण पराभव केल्यावर ३ महिने स्वतः प्रागज्योतिषपुरात ठाण मांडुन भव्य नौकांची निर्मिती करवुन घेतली , सुमारे २०० प्रवासी नेता येतील अशा १०० नौका बनवुन घेतल्या मात्र बनवताना त्या युध्द नौका वाटतील अशा प्रकारचे त्यांना स्वरुप दिले होते ...आणि मग आमचा प्रवास सुरु झाला
सर्वप्रथम ब्रह्मपुत्र नदीच्यापात्रातुन आम्ही पद्मानदीत आलो आंइ मग गंगा सागरात प्रवेश केला ... आम्ही शक्यतो किनार्याच्या कडेनेच प्रवास करीत होतो मात्र व्यवस्थित अंतर राखुन . साधारण २० दिवस पुरेल एतके अन्न प्रतयेक जहाजावर होते शिवाय ५० शत्रधारी शिपायीही होते .
हे सारे चालु असताना १०० १०० बैलगाड्या उत्तरेच्य दिशेने व पश्चिमेच्या दिशेने चालु लागल्या होत्या व तशा बातम्या वेगाने पौंड्र अंग विदर्भात पसरलेल्या होत्या , कलिगचे लोक कोण्याच्या अध्यात मध्यात कधीच नव्हते पण तरीही त्यांचे लक्ष पौंड्र प्रांतातील घडामोडींवर होते त्यामुळे किनार्या समीपहुन प्रवासकरतानाही आमच्या कडे विशेष कोणाचे लच गेले नाही , आमचा पहिला पडाव पडला श्रीलंकेच्या दक्षिण किनार्यावरील एका छोट्या बंदरात ! येथे वासुदेव हे साक्षात रामाचेच अवतार असल्याच्या समज असल्याने व अजुनही बिभिषणावर विश्वास असलेल्यालोकांचे प्राबल्य असल्याने आम्हाला येथे मदतच मिळाली ,
आमची खरी परीक्षा झाली ही पांड्यप्रांताशेजारी मात्र आमच्या जहाजांची रचना ही त्यांच्याच युध्द जहाजासारखी बनवल्याने शिवाय जहाजावरील शिपायांची वेषभुषाही त्यांच्याच सारखी असल्याने कुणालाही तिळमात्र शंका न येता आमाचा ताफा सहज त्या भागातुन सुटुन गेला . आता येथुन पुढे मार्ग तसा सोपा होता , मात्र एका वादळात आमच्या जहाजांचे थोदेफार नुकसान झाले , काही शिपायी आणि राजकन्याही दगावल्या मात्र त्यांचे इतर संस्कार करत बसण्यात वेळ वाया घालवणे शक्य नसल्याने त्यांना जवळील समुद्रकिनार्यावर टाकुन देण्यात आले .
(असा खडतर प्रवास करत आम्असताना विशेष आग्रहास्तव जहाजे भृगुक्षेत्री थांबवुन तेथील प्रसिध्द खारेशेंगदाणे विकत घेतले .)
बाकी पुढील प्रवास समुद्र मार्गे करीत शेव्वटी द्वारिकेला पोहचलो , सारे शत्रु त्या सोदलेल्या बैलगाड्यांच्या मागे जंगलात भटकत राहिले ...
शेवटी एकच प्रश्न राहिला होता
समुद्र उल्लंघनाच्या पापाला काहीच प्रायश्चित्त नव्हते , शेवटी वासुदेवांनीच
शंखमध्ये स्थितं तोयं भ्रामितं केशवोपरि |
अंगलग्नं मनुष्याणां ब्रह्महत्या व्यपोहति ||
असे म्हणुन , शंखातील जल शिंपडुन सर्वांना पापमुक्त करुन आनंदाने द्वारिकेत सामावुन घेतले ....
3 Nov 2013 - 11:52 pm | चित्रगुप्त
काहीच फिक्स नाही, कारण सारेच काल्पनिक आहे. वाटेल तेवढे अवांतर होऊ द्या, आणि वाटले तर उलट्या दिशेने पूर्ण पृथ्वी-प्रदक्षिणा करून द्वारकेला पहुचा. जेवढा जास्त कल्पनाविलास आणि बारकावे, तेवढी जास्त मजा येईल वाचायला. वाटले तर विनोदी अंगाने लिहा, काही अगदी अतर्क्य, अशक्य, अफाट कल्पना सुचल्या तर आणखी छान. या निमित्ताने इतिहास, भूगोल, पुराणे, इ. चा अभ्यास झाला, तर छानच.
(आत्ताच नवनाथ चरित्रात वाचत होतो, स्त्री-देशातील स्त्रिया मारुतीच्या बुभुत्काराने गर्भवती होत असत.... वगैरे. अचाट कल्पनाशक्तीचे उदाहरण)
4 Nov 2013 - 1:16 am | शशिकांत ओक
प्रागज्योतिषपुर (A) किंवा सध्याचे गौहाटी A ठिकाणापासून ते द्वारका (B)पर्यंत कसे जावे, वाहन व्यवस्था, खानपान व्यवस्था, अंतर मोजणी, दिशादर्शक वाटाडे व प्रवासातील सुरक्षा साधने यांची आखणी कशी करावी व पार पाडावी हाच मुळ उद्देश आहे.
![गूगलने दाखवलेला नकाशा](https://lh3.googleusercontent.com/ItyYO8icQNXMX6dXDjfA6cFFgCaLDpRcNU0T8wD-rQY=w353-h220-p-no)
प्रश्न सोपे करायला - वाहने महत्वाच्या व्यक्तींसाठी रथ व घोडे, सामानवाहतूक - बैलगाड्या व आसामी हत्ती व तत्सम पशूंची सोय. एकदम सर्वांनी न जाता १००-२०० व्यक्तींची एक एक टोळी करून दर रोज दिवसाच्या उजेडात ३० ते ४० किमी जावे. त्यामुळे जनावरांना लागणारा दाणा गोटा व लोकांना जेवायला लागणारा शिधा, याची सोय करायला सोपे केले गेले असावे. ज्या गावागावातून हा मानवी जत्था पुढे सरकला की पुढील जत्थाची सरबराई करायला सोपे जावे,वाटेतील डोंगर कपारी व ब्रह्मपुत्रा व गंगानद्यांची प्रचंड पात्रे, दलदलीचा सुंदरबनचा प्रदेश प्रदेश, यातून जाताना जनावरे व माणसांची पाणी पिण्याची सोय ही तितकीच महत्वाची असावी. विंध्यपर्वत राजी पार करताना विविध भिल्ल व अन्य वाटा रोखून प्रहार करणाऱ्या लुटारू टोळ्या यांचा उपद्रव न व्हावा यासाठी त्यांच्याशी लढाईचा प्रसंग न करताना जाण्यासाठी त्या प्रदेशाला वगळून काढला जाणारा मार्ग. वाटेत मांडलिक राजे व त्यांच्या अखत्यारातील सुभेदारांनी या कामात दिले जाणारे सहकार्य होईल असे ढोबळ स्वरूपाचे नियोजन असावे.
युद्ध मोहीम नसल्याने दररोज २५ किमीचा पल्ला पार करायला लागला असे मानले तर १००० किमी चा प्रवास काही विघ्ने आली नाहीत तर ४० दिवसात पुरा करता येतो. २० हजारमधील पहिल्या व शेवटच्या व्यक्तीला द्वारकेत पोहोचायच्या अवकाशात बरेच अंतर असू शकेल. याचा विचार करता 120 ते 180 दिवसामधे सर्व व्यक्तींना, नेण्याची आखणी केली गेली असेल. प्रत्यक्षात किती वेळ लागला याचा उल्लेख व्यासांनी केला असेल तर त्याची काही माहिती चित्रगुप्तांनी काढावी व सादर करावी ही विनंती.
एका जुलुमी राजसत्तेच्या उलथण्यामुळे नव्या राजकारणातील भगदत्त सारख्या तरुण व व्यवहारी नेत्याच्या अखत्यारीतील प्रदेशातून हा प्रचंड मानवी लोंढा नेण्याच्या कामी त्याचे सेनापतित्व कामाला आणले गेले असावे. सत्ता परिवर्तनानंतरच्या झालेल्या लेखी करारात अशी कलमें असणे स्वाभाविक आहे. सध्याच्या राजकीय नकाशावरून तो मार्ग ३००० कि मी असला तरी त्याकाळी जरा कमी असावा.
अशी जीवित स्त्रिया व वृद्धांना द्वारकेतून हस्तिनापुरला तातडीने नेण्याची जबाबदारी कृष्णाच्या निधनानंतर पुन्हा अर्जुनावर आली होती. ती त्याला पुर्ण करता आली नाही व प्रचंड विचका होऊन निराश व पराजित अवस्थेत परतावे लागले. यावरून त्या मोहीमेतील जोखीम व त्याचे लष्करी महत्व यावर जोर देऊन चित्रगुप्तांनी विचार करायला प्रवृत्त केले याबद्दल धन्यवाद.
4 Nov 2013 - 2:16 pm | चित्रगुप्त
अर्जुन हा निष्णात धनुर्धर जरी असला, तरी कृष्णाच्या सारथ्यावाचून त्याचे ते कौशल्य कसे निष्प्रभ, निरर्थक होते, याचा हा खुद्द महाभारतातील पुरावा.
... हाच आमच्या या धाग्याचा विषय होता.
4 Nov 2013 - 8:59 am | चौकटराजा
विनोदी अंगाने एकदम सोपे . मी म्हणजे मदनकेतू असे समजा. मी एकदम प वि वर्तक यांचे स्मरण केले. त्या काळात
म्हणजे आमच्या काळात त्यांचा कोणता तरी जन्म चालू होताच. त्याही काळात त्यानी खूप तप केले होतेच . ते आमची अडचण ओळखून प्रकट झाले. मी त्याना म्हणालो " हं हे असे आहे. " ते म्हणाले "ठीकाय " मग सर्व स्त्रियानी च मी वर्तकांचे उपरणे पकडले.पवि एकदम त्यांच्या सकट सूक्ष्म देहात गेले. कोणतीही अडचण न येता चलो द्वारका चा नारा झाला. द्वारकेला जायला मला व आमच्या कंपू ला फक्त पाच पळे लागली.
( कोनकॉर्ड वगैरे फालतू शीध त्याकाळी लागलेले नव्हते. )
4 Nov 2013 - 9:35 am | पैसा
वल्लीने मस्त लिहिले आहे. ओक काकांनीही मस्त लिहिले आहे. चित्राच्या आशेने प्रयत्न करायला अज्याबात हरकत नै! वेळ मिळाला की लिहितेच!
4 Nov 2013 - 9:47 am | आनन्दिता
तुमची चित्र बघुन खपले आहे इतकच लिहीते सध्या...!! तुम्हाला मनापासुन दंडवत घालते....
4 Nov 2013 - 4:39 pm | चौकटराजा
चित्रगुप्त जी, फ्लिकर वरची रंगांची उधळण , रचनांची पखरण डोळे भरून पाहिले. ही दिवाळी सत्कारणी लागली. आपण खरोखरच उत्तम चित्रकार आहात. फेसबुकवर सुरेश पेठे यांचे कडे फ्रेंड रिक्वेस्ट टाका .तुमचे व पेठे काकांचे दोघांचेही उर्वरित
आयुष्य रंजक होत जाईल. त्यांचा भर जलरंगावर आहे.
5 Nov 2013 - 5:04 am | पाषाणभेद
प्रतिसाद लिहीण्याआधी मिपावरील चित्रगुप्त हे फार मोठे चित्रकार आहेत हे मी आधीच मान्य करतो. त्याचप्रमाणे वल्लीशेठ व मिपावरील इतरही व्यक्ति त्या त्या विषयातील तज्ञ आहेत असे समजतो.
>>>>काहीच फिक्स नाही, कारण सारेच काल्पनिक आहे. वाटेल तेवढे अवांतर होऊ द्या, आणि वाटले तर उलट्या दिशेने पूर्ण पृथ्वी-प्रदक्षिणा करून द्वारकेला पहुचा. जेवढा जास्त कल्पनाविलास आणि बारकावे, तेवढी जास्त मजा येईल वाचायला. वाटले तर विनोदी अंगाने लिहा, काही अगदी अतर्क्य, अशक्य, अफाट कल्पना सुचल्या तर आणखी छान. या निमित्ताने इतिहास, भूगोल, पुराणे, इ. चा अभ्यास झाला, तर छानच.
असे करण्यामध्ये आपण इतिहासाचा विनोद करत नाही काय? मान्य आहे की प्रत्येकाला विचारस्वातंत्र आहे, जे मनात येईल ते लिहीण्याचेही स्वातंत्र आहे. पण जर असे काही विनोदाने किंवा अगदी विनोदाने नाही पण जरी वल्लीशेठने लिहीले तशी जरी कल्पना करून लिहीले तरी ते घडलेल्या इतिहासाला न्याय देईल काय? उद्या तुम्ही जरी नाही पण कुणीतरी 'शिवाजी महाराज आग्र्याहून कोणत्या मार्गे आले' या विषयी उथळ अर्थाने लिहील. (लक्षात असू द्या की शिवाजी महाराज आग्राहून कोणत्या मार्गे आले हे अजूनही कुणी पुराव्यानिशी सांगू शकत नाहीत. त्या त्या मार्गांची फक्त शक्यता व्यक्त केली गेली आहेत. यातच महाराजांचे भौगोलिक ज्ञान, राजकिय मुत्सद्देगीरी दिसते. अर्थात तो वेगळा मुद्दा आहे.)
त्याचप्रमाणे वल्लीशेठनी "2) अन जर तुमि यावृत्तान्ताचे गुहेतिल दगडी शिल्प इथे चिटाकवाले नै तर आमि ह्यो खराबी मन्नार नै." या अग्निकोल्हा यांच्या मागणीसाठी जी काही छायाचित्रे दिलीत ती खरोखर
>>> १) बाकी नरकासुराच्या तावडीतून स्त्रियांना सोडवल्यावर कृष्णाने आनंदाने मुरली वाजवली त्या क्षणाचे हे शिल्प बघा
व
>>> २) पांचाल राज्यात दृपदाने मदनकेतूला ताज्या दमाचे बैल पुरवले त्या घटनेचे हे शिल्पांकन पहा.
अशा अर्थाचीच आहे काय? वरील दोन्ही शिल्पे/ छायाचित्रे वल्लीशेठनी कोणत्या ठिकाणावरून घेतलेली आहेत? ती शिल्पे नक्की त्या त्या प्रसंगासाठी तयार केली गेलीत काय?
त्याचप्रमाणे चित्रगुप्तांच्या-(मिपा) हा मुळ लेख (व त्या सदृष्य आधीचेही लेख - म्हणजे चित्रेमिश्रीत इतिहासाचे पुर्नलेखन) यातील लिखीत भाग व त्या त्या अनुषंगाने येणारी चित्रे ही खरोखर त्या त्या प्रसंगाशी निगडीत किंवा त्या प्रसंगांसाठीच त्या त्या चित्रकारांनी चित्रीत केली गेली गेली आहेत काय? तसे असेल तरच लेखाला (व मुळ चित्रांनादेखील) न्याय मिळाला असे मानता येईल. अन्यथा ते इतिहासाचे विदृपीकरण होत नाही काय?
माझे एवढेच म्हणणे आहे की पुराणे, पोथ्या, इतिहास फार भव्य आहेत. त्यांचे पुर्नलेखन सुद्धा त्याच गंभीरतेने केले जावे जेणे करून ते वाचणार्यांना व पुढील पिढ्यांपर्यंत योग्य संदेश गेला पाहीजे.
पुराणे, पोथ्या, इतिहास यांवर भाष्य करणे, टीका करणे, विश्लेषण करणे वेगळे अन त्या त्या पुराणकथांचा संदर्भ घेवून पुर्नलेखन करणे वेगळे आहे.
संदर्भ घेवून पुर्नलेखन करणे योग्य गंभीरतेनेच केले जावे.
याच प्रतिसादाचा संदर्भ घेवून चित्रगुप्तांच्या लेखांमध्ये जर अनुषंगीक चित्रे आलेली नसतील तर ती काढूनही टाकण्याची मागणी पुढे आली तर तसे करण्यास संबंधीतांनी काळजी घ्यावी.
माझा वरील सर्व प्रतिसाद हा तत्वाचा, चर्चेचा मुद्दा आहे. चित्रगुप्तजी, वल्लीशेठ किंवा या प्रतिसादाशी संबंधीत वैयक्तीक मनाला लावून न घेतील अशी माझी समजूत आहे. या प्रतिसादाबाहेर ते सर्व माझे मित्रवर्य आहेत.
धन्यवाद.
5 Nov 2013 - 8:44 am | प्रचेतस
पाभे भावना पोहोचली.
इतिहासाचे विदृपीकरण मलाही मान्य नाहीच. याच कारणे मला मृत्युन्जय, युगंधर, श्रीमान योगी, शहेनशहा आदी कादंबर्या नावडत्या होतात. पण एखाद्या भक्कम संहितेवर कल्पनेचा मुलामा लावून त्यावर तर्कवितर्क लढवून लिहिणे हे तसे अयोग्य वाटत नाही.
बाकी रामायण, महाभारत हे इतिहासांपेक्षाही जास्त पुराणे आहेत. महाभारतात इतिहासाचा नक्कीच अंश असेलही किंबहुना तो आहेच असे मी मानतो. तथापी मूळ संहितेतील जागांचे आजच्या जगाशी असलेल्या भौगोलिक साम्याखेरीज इतर कुठलाही पुरातत्वीय पुरावा आजतरी अस्तित्वात नाही. महाभारतावरील संस्करण साधारण पाचव्या शतकापर्यंत चालू असल्याने तुलनेने अलीकडच्या काळातील शक, हूण, बर्बर आदी टोळ्यांचे संदर्भही आपल्याला दिसतात. अर्थात व्यासांच्या मूळ 'जय' ग्रंथावर ही इतर लेखकांनी चढवलेली कल्पनेची पुटेच. त्यानुसारच रामायण, महाभारताच्या मूळ संहितेला फारसा धक्का न लावता आजच्या लेखकांनी जर काही कल्पनारम्य लिखाण केले तर ते क्षम्य मानावे लागेल.
पण हाच न्याय आपल्याला पक्क्या इतिहासाला (उदा. शिवाजी महाराज, पेशवे, मुघल) लावता येणार नाहीच. कारण ह्या कालखंडातील असंख्य पुरावे उपलब्ध आहेतच. ते धुडकावून जर लेखकांनी इतिहासाचे विदृपीकरण केले (जसे कानेटकर, देसाईंनी संभाजीच्या बाबतीत केले) तर ते अक्षम्यच आहे.
बाकी मी टाकलेल्या शिल्पांबद्दल म्हणशील तर ती लोणी भापकर ह्या लहानशा खेडेगावातील यादवकालीन मल्लिकार्जुन मंदिरातील आहेत. तिथल्या सभामंडपातील छतांवर असलेल्या ह्या शिल्पांमध्ये कृष्णाच्या जीवनातील प्रसंग शिल्पांकित केलेले आहेत. वरील दोन्ही प्रसंग हे गोकुळातील आहेत. मी त्यांचा उपयोग अग्निकोल्हा ह्याच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देताना माझ्या मूळ प्रतिसादाच्या अनुशंगाने केला इतकेच.
5 Nov 2013 - 7:13 am | चित्रगुप्त
मंडळी काय म्हणतात यावर ? हे जाणून घेण्यास उत्सुक.
याबद्दल माझी स्वतःची भूमिका सुद्धा लवकरच लिहीन.
5 Nov 2013 - 10:22 am | जेपी
दोन दिवसांपासुन प्रयत्न करतोय पण कल्पना शक्ति रजनीकांतच्या पलिकडे जातच नाही . बाकी त्याकाळी नौदल होत का .?
5 Nov 2013 - 11:19 am | चौकटराजा
खरे तर आम्हाला इतिहासात रमणेच मान्य नाही. राजे रजवाड्यांच्या इतिहासात रमण्यापेक्षा मानव वंशाच्या इतिहासात फार
तर रमणे आवडते.
5 Nov 2013 - 6:06 pm | चित्रगुप्त
मस्त प्रतिसाद येत आहेत.
वल्ली आणि गिरिजा यांनी अगदी वेगवेगळे मार्ग - तात्कालीन राजकारण, शत्रु-मित्र राजे इ. चा विचार करून - सुचवले आहेत, तर ओकांनी एवढा मोठा जथा एकदम नेण्यातील धोके ओळखून टप्प्या-टप्प्याने स्त्रियांना नेणे सुचवले आहे. चौरांनी एकदम शॉर्टकट सुचवला आहे. एकंदरित या प्रकल्पात रूची घेतली जात आहे. आणखी नवनवीन कल्पना लवकरच येतील अशी आशा आहे.
@ पाभे: तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्य्यांवर स्वतंत्रपणे धागा काढता येईल, परंतु सध्या लढवा की कल्पना तुम्हाला योग्य वाटतील, तश्या.
@ तथास्तु:
ब्रम्हास्त्र, पर्जन्यास्त्र, मडक्यातून शंभर गर्भांची उत्पत्ती, मारुतीचे रेत सुसरीच्या तोंडात पडल्याने गर्भ-संभव, अश्या काळात काय अशक्य असणार?
अर्थात धाग्याचा मूळ हेतु प्रत्यक्षात, अगदी खरोखर शक्य असलेल्या पद्धतीने कसा प्रवास केला असेल, याची कल्पना करणे हा आहे, त्या पद्धतीचे लिहिल्यास जास्त चांगले. नाहीतर चौरांनी क्षणार्धात द्वारका गाठली आहेच.
पैसा ताईंच्या अभ्यासपूर्ण, आणि मुक्तविहारी यांच्या आगळ्या धर्तीच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. याशिवाय जास्तीत जास्त मिपाकरांनी भाग घ्यावा, ही इच्छा.
एवढ्या स्त्रियांचे आपापसातील संबंध, त्यांच्या भाव-भावना, चतुर्वर्णाच्या बंधनांमुळे निर्माण होणार्या समस्या, जेवणखाण, मुक्काम, वाहने, आजारपण, गरोदर स्त्रियांची व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, रोगराई, वाटेत जथ्यावर आलेली संकटे, वगैरेंबद्दल तपशीलात लिहिता आल्यास उत्तम.
5 Nov 2013 - 7:03 pm | पैसा
बरोबर १६००० स्त्रिया न्यायच्या असल्याने शत्रुप्रदेश चुकवून जाणे क्रमप्राप्तच होते. मग विचारविनिमय करून प्राग्ज्योतिषपूर, विदेह, कोसल, पांचाल, कुरू, मत्स्य, निषाद द्वारिका असा मार्ग ठरवला. आधी सर्व राजांना दूत पाठवून मदतीची विनंती केली. ती सर्व मित्र असल्याने अर्थातच त्यांनी मान्य केली. निषाद राजा श्रीकृष्णाचा मित्र नसला तरी कौरवांचा मित्र होता. स्वयं श्रीकृष्णाने दुर्योधनाशी दूताद्वारे वार्तालाप करून निषाद राजा एकलव्य जरी मदतीला आला नाही तरी निदान उपद्रव करणार नाही याची व्यवस्था करवली.
या १६००० स्त्रियांचे २ गट केले. त्यातील सुमारे १०००० स्त्रिया या राजकन्या असल्याने युद्धकलेत तशाच अश्वारोहणात प्रवीण होत्या. त्यांच्यासाठी अश्वांची व्यवस्था करण्यात आली. जवळपासच्या राज्यांतूनही अश्व आणवले. सोबत सुमारे ८०० धनुर्धर अश्वारोही देऊन त्यांना शस्त्रे, काही शिधा आणि काही मुद्रा देऊन पुढे रवाना केले. त्यांच्या पाठोपाठच ज्या स्त्रिया रथ हाकू शकत होत्या त्यांच्यासाठी रथांची व्यवस्था केली. राहिलेल्यांना सुमारे २०० रथी सैनिकांच्या रथातून प्रवास सुरू केला. या रथांमधे आवश्यक शस्त्रांबरोबर काही शिधा घेतला. स्वयंपाकासाठी आवश्यक तेवढी मोठी भांडी घेतली. प्रत्येकाचे आंथरूण पांघरूण त्याच्याजवळच असे. जेथे आपण मिळेल तेथे आवश्यक वस्तू विकत घेऊन आम्ही चपल गतीने मार्गक्रमणा करत राहिलो. वाटेत मित्र राजांनी सर्वतोपरि शिधा आणि संरक्षण याची मदत देऊन आम्हाला उपकृत केले. हे सुमारे ४०० योजनांचे अंतर पार करायला आम्हाला साधारण एक मास आणि एक पक्ष लागला.
वाटेत अनेक ठिकाणी नागरजन या अश्वारोही आणि शस्त्रसज्ज स्त्रियांना पहायला उभे रहात असत. आणि शीतल जल लागेल तेवढे आम्हाला पुरवीत असत. रात्रीचा मुक्काम नगराजवळ परंतु नदीकाठी एखाद्या गवताच्या कुरणात करण्याचा परिपाठ ठेवला होता. त्यामुळे अश्वांना खाणे आणि पाणी यांचा व्यवस्थित पुरवठा होत असे. सर्वांना विश्रांती मिळे. तसेच कोणाला आवश्यकता पडल्यास औषधी वनस्पती जवळपास उपलब्ध होत असत. सर्व सैनिक रात्री आलटून पालटून पहारा करत असत. त्यामुळे वन्य प्राणी आणि चोरांचे भय राहिले नाही.
एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया एकत्र आल्यानंतर त्यांच्यात कलह होणे अपरिहार्य होतेच पण डोक्यावरील संकटांची जाणीव असल्याने सर्वजणी आवरते घेत असत. स्वयंपाक सर्वजणी मिळून विभागून करत असत आणि जिथे उपलब्ध होईल तिथे कंदमुळे फळे असाच आहार बहुतेकजणी घेत असत. त्यामुळे विश्रांती भरपूर मिळे आणि आजारपणे फारशी आली नाहीत.
या मार्गात इतर सर्व राज्यांतून काही समस्या आल्या नाहीत. एकलव्याच्या राज्यातही त्याने दूत पाठवून कुशल विचारले. मात्र त्याच्या राज्याच्या सीमेवर वनवासी टोळ्यांकडून त्रास होण्याची शक्यता वर्तवून सावध रहाण्याचा इशारा दिला. त्याप्रमाणे वनातून काही टोळीवाल्यांनी हल्ला केला परंतु, तोपर्यंत या सर्व स्त्रिया एवढ्या प्रवासातून आल्यामुळे कणखर बनल्या होत्या आणि सैनिकांबरोबर त्यांनीही आपापली शस्त्रे चालवली. ते पहाताच किरात भिल्ल पळून गेले.
यानंतर आम्ही आणखी काही न घडता निर्वेधपणे द्वारकेत पोचलो.
(प्रवासाचा मार्गः सौजन्य मा. वल्ली)
9 Nov 2013 - 9:34 am | त्रिवेणी
मी पैसा ताईंची असिस्टट होते.
9 Nov 2013 - 9:41 am | पैसा
=)) म्हणजे गेल्या जन्मातला मदनकेतूचा असिस्टंट त्रिकूट!! =))
9 Nov 2013 - 6:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
सावधान ! बक्षिसातला वाटा राखून ठेवायचा छुपा प्रयत्न ! ;)
(हघ्याहेवेसांन)
9 Nov 2013 - 6:18 pm | पैसा
वल्लीचा मार्ग वापरल्यामुळे त्याला वाटा द्यावा लागणार हे आधीच फिक्स आहे. आता आणखी वाटे आणि तेही एका चित्राचे कसे पाडायचे हा प्रश्नच आहे! =))
9 Nov 2013 - 9:09 pm | चित्रगुप्त
चित्राचे वाटे करायचे झाल्यास अमूर्त चित्र बरे. उदाहरणार्थ माझे हे चित्रः
![.](http://farm9.staticflickr.com/8047/8400518193_a6908b7064_h.jpg)
9 Nov 2013 - 9:23 pm | प्रचेतस
अहो पण माझा पहिला नंबर आला तर मी नाय हां वाटे करणार.
9 Nov 2013 - 10:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्चं १०० पर्सेंट बरोबर आहे. तुम्हा सगळ्या यशस्वी उमेदवारांच्या वतिने ते बक्षिसाचे चित्र मी माझ्याकडे सुरक्षित ठेवायची जबाबदारी घेतो... उगाचच मिपा सदस्यात भांडणे झाल्याने मला खुप्खुप दःख होईल त्यापेक्षा ही जबाबदारी मी जsssड अंतःकरणाने मान्य करतो ;)
9 Nov 2013 - 11:13 pm | प्रचेतस
=)) =)) =))
10 Nov 2013 - 3:49 pm | पैसा
इस्पीकचा एक्का, तुम्हीच ठेवून घ्या चित्र. नाहीतरी वल्लीला मिळाले तर आम्हाला जळजळ होणार आहे!!
10 Nov 2013 - 5:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
चित्रगुप्तजी, वाचताहात ना ? सायेब ते चित्र आमच्या खात्यावर लिहा बघू पटकन (स्वगतः काय सांगावे या लोकांचा विचार बदलला बिदलला तर ;) )
10 Nov 2013 - 6:49 pm | चित्रगुप्त
@ इस्पिकचा एक्का: लिहितो खात्यावर, पण त्याआधी एक झकास प्रवास-वृत्तांत लिहा की, आसाम ते द्वारकेचा, तुमचा तर हातखंडा आहे प्र.वृ. लिहिण्यावर. प्रतिक्षेत आहे.
पूर्वी इंग्लिश चित्रकलेचे रॉयल अॅकॅडमीचे वार्षिक प्रदर्शन असायचे, त्यात उद्घाटनाच्या आधीचे एक-दोन दिवस 'वार्निशिंग डे' म्हणून असायचे. आपापल्या चित्रांना साफ-सूफ करून, वॉर्निश लावून तकाकी देणे, थोडेबहुत बदल वा फिनिशिंग करणे, हे त्या दिवशी चित्रकार करत. काही बिलंदर चित्रकार तर आजूबाजूची चित्रे बघून त्या सर्वात आपले चित्र उठून दिसेल, असे महत्वाचे बदलही करत.
टर्नर हा सुप्रसिद्ध चित्रकार आधी काहीतरी थातुरमातुर रंगवलेले चित्र देऊन वार्निशिंग डे च्या दिवशी त्याच चित्रावर झपाट्याने काम करून तात्कालीन कलारसिकांना थक्क करणारे चित्र रंगवीत असे. (खालील उजवीकडले चित्र)
डावीकडील चित्रः George du Maurier, (Punch: 19 June 1877, p. 226)
उजवीकडील चित्रः J. M. W.Turner (1775-1851) at the Royal Academy, Varnishing Day
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे असे तीन-चार 'वार्निश डे' या धाग्यासाठी दिनांक २६ ते ३० नोहेंबर करावेत का? प्रतिसादकांना स्वतःच्या लिखाणात काही दुरुस्त्या, काढ-घाल करता येतील, लिखाण अधिक परिपूर्ण करता येईल.
या प्रकारे केलेल लिखाण अंतिम मानले जाईल.
हा धागा म्हणजे एक प्रयोग आहे, त्यामुळे यात आणखी नवीन प्रयोग करणे उचित राहील असे वाटते.
मंडळींचे काय मत आहे?
10 Nov 2013 - 9:12 pm | प्रचेतस
नको राव काका. लै टंकाळा आला परत बदल करण्याचा.
10 Nov 2013 - 6:45 pm | त्रिवेणी
मला चित्राचा वरचा उजवा कोपरा चालेल, तिथे गणपतीचा चेहरा दिसतो आहे.
5 Nov 2013 - 8:06 pm | चित्रगुप्त
व्वा. हळूहळू छान भर पडत आहे.
सर्व प्रतिसाद आल्यावर या सर्वांतून थोडे-थोडे घेऊन या मोहिमेचा एक अत्युत्तम आराखडा तयार होईल.
याशिवाय द्वारकेत या स्त्रियांचे पुनर्वसन कसे केले हाही मुद्दा घेतला जाऊ शकतो.
7 Nov 2013 - 3:42 pm | ज्ञानोबाचे पैजार
आज जवळ जवळ ५,००० वर्षे लोटली या गोष्टीला. पण माझा जीवलग मित्र चित्रगुप्त याला सुध्दा मी याचा पत्ता लागु दिला नव्हता. त्याने मला जंग जंग पछाडले पण मी काही त्याला पत्ता लागु दिला नाही. शेवटी त्याने असे जाहिर विचारायला सुरुवात केली. आता इतक्या वर्षांनंतर काही हरकत नाही सांगायला. त्याला तरी किती छळायचे? म्हणुन सांगतो.
ऐका.....
प्राग्ज्योतिषपूर सोडणे मला शक्य नव्हते. कारण माझ्यावर अनपेक्षीतपणे येउन पडलेली जबाबदारी. नरकासुराच्या पापात मी सुध्दा सहभागी होतो.या कामी मी जर श्रीकृष्णाला मदत केली तर माझ्यासाठी बंद झालेले स्वर्गाचे दार पुन्हा उघडु शकते असे नारद मुनींनी मला सांगीतले. पापक्षालनाची ही संधी सोडणे मला कदापी शक्य नव्हते.
पण मी होतो एक वैद्य. माझे औषधांचे, वनस्पतींचे आणि रसायनांचे ज्ञान जरी प्रचंड असले तरी क्षत्रीयांमधे असतात ते गुण माझ्या अंगात काडीमात्रही नव्हते. आतापर्यंत तलवार, धनुष्य या गोष्टी मी केवळ मौजेसाठी हाताळल्या होत्या. रोग्याची निष्णात पणे शस्त्रक्रिया करणारा मी, दोन क्षत्रीयांचे छोटेसे भांडण , तलवारी उपसुन त्यांचे एकमेकांवर धावणे नुसते बघताना सुध्दा घाबरुन जात असे. मी या सोळा सहस्त्र स्त्रीयांचे संरक्षण कसे बर करणार होतो? इतक्या दुर त्यांना समर्थपणे कसे बर घेउन जाणार होतो?
पण ज्या अर्थी श्रीकृष्णाने ही जाबाबदारी माझ्या शीरावर सोपवली त्या अर्थी मी ती समर्थपणे पेलू शकेन हा त्याला विश्र्वास असावा. ज्याच्या कडे एकाही लढाइचा अनुभव नाही की ज्याच्या हाताखाली सैनीकांची एक छोटीशी तुकडी सुध्दा नाही, अशा माझ्या सारख्या अक्षात्र मनुष्यावर, असली मोठी जबाबदारी तो उगाच टाकायचा नाही हे मी जाणुन होतो. सोळा सहस्त्र स्त्रीयांना हजारो योजने अंतर पार करुन ते सुध्दा शत्रुच्या नजरा चुकवत घेउन जायचे म्हणजे केवढा मोठा लवाजमा होणार. त्यांच्या संरक्षणासाठी जाणार्या सैनिकांवर तरी कसा विश्र्वास ठेवणार. एखाद्या स्त्रीच्या अंगावर एखादा ओरखाडा जरी उठला तरी त्याचा डाग श्रीकृष्णाच्या माथ्यावर लागणार होता.
वाजतगाजत लवाजम्यासह सगळ्या स्त्रीयांना व्दारकेला नेणे म्हणजे मोठ्या अनर्थाला निमंत्रण देण्या सारखे होते. श्रीकृष्णाने ही जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती खरी, पण काय करावे हे मला समजत नव्हते. एकदा मनात विचार आला की आपल्या जवळील औषधिंचा वापर करुन त्या स्त्रीयांच्या बरोबर जाणार्या सैनिकांना काहि काळासाठी नपुंसक बनवावे म्हणजे त्यांच्या कडुन या स्त्रीयांना काही धोका पोचणार नाही. पण त्या स्त्रीयांच्या जथ्यावर हल्ला झाला तर काय? हल्लेखोरांचा बंदोबसस्त मी कसा बरे करणार होतो? आमचे सैनिक त्या हल्लेखोरांना पुरे पडले नाही तर?
मोहीम यशस्वी करण्या साठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत होता. भगदत्त त्या स्त्रीयांकडुन शस्त्रविद्येचा सराव करुन घेत होता. मी त्यांना निरनिराळ्या वनस्पती ओळखायला शिकवत होतो. त्यांचे गुणधर्म सांगत होतो. कोणी त्यांना संकट काळी निर्णय कसे घ्यायचे याचे मार्ग दर्शन करत होते तर कोणी अजुन काही. त्या मुळे इतरांपासुन त्या स्वतःचे संरक्षण काही काळ तरी करु शकणार होत्या. संपुर्ण प्रवासाची हमी तर कोणीच घेत नव्हते.
छे.. विचार करुन मस्तक फुटायची पाळी आली होती पण कोणताही मार्ग सुचत नव्हता. अनेक जणांशी या विषयावर चर्चा केली. कोणी समुद्र मार्गाने जायचे सुचवले तर कोणी मित्र देशांच्या मदतीने पुढे सरका असे सांगीतले. पण या सगळ्या मधे धोका हा होताच कारण सोळा सहस्त्र स्त्रीया आणि त्या सुध्दा एका पेक्षा एक लावण्यवती. मित्र देशांची मदत घेतली तरी एवढ्या लावण्यवतींना एकत्र पाहिल्यावर कोणाचीही मती भ्रष्ट होण्याची शक्यता होती.
दोन महिने मी फक्त विविध योजनांचा विचारच करत होतो पण एकही योजना माझ्या मनास उतरत नव्हती. श्रीकृष्णाने निवडलेले माझे इतर सहकारी क्षत्रीय होते. युध्द करणे हा त्यांचा धर्मच होता. स्वतःच्या बाहुबळावर त्यांना प्रचंड विश्र्वास होता. त्यांच्या दृष्टीने मी भित्रा व अतिविचारी होतो. त्यांच्या स्वामीने मला त्यांचा नायक केल्या मुळे त्यांना माझ्या इच्छेविरुध्द् वागता येत नव्हते. अन्यथा त्यांनी सशस्त्र कुच करायची केव्हाच तयारी केली होती.
श्रीकृष्णाने माझ्या सारख्या अक्षत्रीय मनुष्याची या मोहिमेसाठी निवड केली याचा अर्थ त्याच्या मनात नक्की काहितरी वेगळे असणार. पण काय ते काही तो सांगुन गेला नव्हता. त्याने सारेकाही माझ्यावरच सोपवले होते. शेवटी नारदमुनींच्या मदतीने मी स्वर्ग लोकात वास करत असलेले माझे तात सोमकेतु यांना निरोप धाडला व ते माझ्या समोर प्रगट झाले. त्यांना मी संपुर्ण हकिगत विस्ताराने सांगितली. ते माझे केवळ पिताश्री नव्हते तर माझे गुरु सुध्दा होते. या पेचप्रसंगात तेच मला मार्गदर्शन करु शकतील असा मला विश्र्वास होता. आणि घडलेही तसेच.
माझ्या आणि तातांच्या भेटीनंतर तीन मासांचा कालावधी उलटुन गेला. मी ज्या सोळाव्या ब्राम्हणाची मोठ्या उत्सुकतेने वाट पहात होतो तो आता व्दारकेला येउन पोचला होता. त्याने इतके दिवस मोठ्या विश्र्वासाने सांभाळलेली वल्गुलिका (पेटी) माझ्या सुपुर्त केली. श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने त्याचा आदर सत्कार केला व त्याला संतुष्ट केले. मी, शुभांगी आणि श्रीकृष्ण मोठ्या लगबगीने त्याच्या महालातल्या चोरदरवाज्याने आतल्या कक्षात गेलो. फार कमी लोकांना श्रीकृष्णाच्या या कक्षाची माहिती होती. एकुण पंधरा वल्गुलीका तेथे ठेवल्या होत्या आणि आताची ही सोळावी.
प्राग्ज्योतिषपूरपासुन व्दारके पर्यंतचा प्रवास माझ्या डोळ्या समोरुन तरळुन गेला. त्या सोळा ब्राम्हणांची मोठ्या काळजीपुर्वक निवड मी केली होती. व प्रत्येकाकडे एक वाल्गुलिका सोपवली होती. त्यात काय आहे ते मात्र कोणालाच ठाउक नव्हते. तसेच त्या सगळ्यांना एकएकटे बोलावुन ही कामगीरी सोपावली होती. त्या मुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने आपल्या एकट्यालाच या कामासाठी निवडले आहे असा त्यांचा समज झाला होता. व मोठ्या खुषीने ते या कामासाठी तयार झाले होते. कोणत्याही परीस्थीतीत ती वाल्गुलिका उघडायची नाही. उघडल्यास त्यांचा तात्काळ मृत्यु होईल असे त्यांना बजावण्यात आले होते. हे सर्व काम अतिशय गुप्त पणे करण्यात आले होते.
एका रात्रीत प्रागज्योतिषपूरातुन सोळा सहस्त्र स्त्रीया गायब झाल्या होत्या आणि त्यांच्या पाठोपाठ मी. बाकी कोणालाच काय चालले आहे याचा आम्ही पत्ता लागु दिला नव्हता. श्रीकृष्णाने नेमलेले माझ्या बरोबरचे इतर साथीदार, सर्व स्त्रीया अचानक गायब झाल्या मुळे, गोंधळुन गेले होते. बरीच शोधाशोध केल्या नंतर ते मोठे निराश होउन व्दारकेला परतले. तिकडे मला पाहुन त्यांना आश्र्चर्याचा धक्का बसला होता. मला जाब विचारायचा त्यांनी बराच प्रयत्न केला पण मी काही त्यांना दाद लागु दिली नाही. शिवाय मी सतत श्रीकृष्णा बरोबरच असल्या मुळे त्यांना फारसे काही करता आले नाही.
मी मोठ्या धडधडत्या अंत:करणाने पहिली वाल्गुलिका उघडली. त्यामधुन अंगुष्ठे एवढी एक बाहुली बाहेर काढली. प्रथम तिच्यावर थोडेसे पाणी शिंपडले. झोपेतुन जागे व्हावे तशी ती खडबडुन जागी झाली. मी तिला विचारले "रोहिणी प्रयोगाला तयार आहेस ना?" तिने होकार देताच माझ्या पिताश्रींनी दिलेल्या दुसर्या रसायनाच्या पात्रात मी तिला बुचकळुन काढले. श्रीकृष्ण मोठ्या उत्सुकतेने माझा हा प्रयोग पहात होता. पण मी आणि शुभांगी निश्र्चिंत होतो. कारण मी पहिला प्रयोग शुभांगीवरच केला होता व या परी़क्षेतुन ती सही सलामत बाहेर आली होती. शुभांगीने तातडीने रोहिणीला बाजुच्या कक्षात नेले व एका मंचकावर ठेवले. हळु हळु तिचा आकार वाढत होता. शुभांगीने पटकन एक तलम वस्त्र तिच्या अंगावर टाकले. तो पर्यंत तीचा देह पुर्ववत झाला होता. माझ्या पिताश्रींनी दिलेल्या पहिल्या रसायनाचा प्रभाव आता पुर्णपणे उतरला होता.शुभांगीने तिला भरपुर पाणी प्यायला दिले व बाजुच्या महालात विश्रांती करता घेउन गेली.
श्रीकृष्णाने हर्षभराने मला मिठीत घेतले.
आम्ही पण सगळ्यांनी हे गुपीत इतकी वर्ष फार काळजीपूर्वक जपले होते.
अनेकांना हा श्रीकृष्णाने केलेला एक चमत्कार वटला होता. त्याच्या देवपणाच्या यादित अजुन एका गोष्टीची भर पडली होती.
8 Nov 2013 - 12:49 am | अग्निकोल्हा
पण 16k+ स्त्रिया अचानक गायबल्या होत्याचे कधीच एकले नाही. अन्यथा परमसखा निल्कांताने सर्वांना हुडकुन सुरक्षित पोचवायला मला हमखास पाचारण केलच असते....
7 Nov 2013 - 4:34 pm | चित्रगुप्त
व्वा. अतिशय कल्पक.
10 Nov 2013 - 1:28 am | एस
तिकडची ती डेक्कन ओडिसी आणि पॅलेस ऑन व्हील्स दोन्ही मग थेट इकडे मागवून घेतल्या. बास, मग काय. येऊन पोहोचलो की थेट द्वारकेत. हाय काय अन् नाय काय. :-))
10 Nov 2013 - 1:30 am | एस
ते चित्र तेवढं विमानानं पाठवून द्या. ;)
16 Nov 2013 - 4:15 pm | चित्रगुप्त
अजून कुणी लिहीत आहे का?
प्रतिक्षेत.
16 Nov 2013 - 4:17 pm | प्रचेतस
अजून कुणी नै लिहिलं
तुम्ही आता निकाल जाहिर करून टाका.
17 Nov 2013 - 8:40 pm | चित्रगुप्त
28 Nov 2013 - 8:44 pm | जेपी
विजेता घोषीत करा .
बाकी तुमच्या पुराणाकडे बघण्याच्या नजरेमुळे आम्हालाही वेगळीच कल्पना सुचलीये .
लवकरच टाकीन . कितपत आवडेल शंका आहेच पण लिहीन .
29 Nov 2013 - 8:03 pm | चित्रगुप्त
निकाल जाहीर करण्यात उशीर होत असल्याबद्दल क्षमस्व. लवकरच करतो.