लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या.
"वयनी..... " अशी किनर्या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै. गणपत पाटील यांच्यासारख्या आवाजात हाक ऐकू आली की आई म्हणते पांडेकर आजी आल्या. अशिक्षित, अडाणी बाई. अतिशय प्रेमळ. तिचं तिच्या बागेवर पोटच्या मुलासारखं प्रेम. नवरा म्हणजे मुलखाचा चिकट होता असं आजीच स्वतः सांगते. तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. तेव्हापासून नवर्याबद्दल मन कलूषित झालेलं , पण जुने संस्कार .. त्यामुळे नवर्यासोबतच उरलेलं आयुष्य घालवीत होती. नवरा पोलिस खात्यात जमादार होता. त्यामुळे कोल्हापूरतील राजारामपुरी पोलिस स्टेशन मध्ये ओळख आहे बाईची. काळा सावळा रंग , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा तो ही मामांचा म्हणजे तिच्या नवर्याचा होता, ती तो आता वापरते., आणि डोक्याची चांदी झालेली. अशी ही आजी. त्या मामांनी संपूर्ण आयुष्यात एक चांगलं काम केलं ते म्हणजे ४ लहान लहान खोल्यांचं का होईना पण साधारण ३००० स्क्वे. फूटच्या प्लॉटवर स्वतःचं घर बांधलं. घराच्या आवारात आजीनी लावलेली झाडं म्हणजे पायरी आंबा, लिंबू, शेवगा, पेरू, चिकू, जाई, जुई, मोगरा, गुलाब, २ प्रकारच्या जास्वंदी. झाडांवर अतिशय माया. तिच्या सोबतीला म्हणजे ती बॉबी कुत्री आणि माय-लेकरं असलेली वेगवेगळ्या डोळ्यांची मांजरं..
हे प्राणीही जणू आजी एकटी आहे तिला आपल्याशिवाय कोणी नाही हे जाणूनच असल्यासारखे...
आंब्याच्या सिझन मध्ये मोठाले येणारे पायरी आंबे राखायला बाई, दिवसरात्र बागेत बसून असते. २ खोल्यांमध्ये बिर्हाड ठेवल्याने सोबतही होते आणि मामांच्या तुटपुंज्या पेन्शन शिवाय मिळकतही होते थोडिफार.
गॅस ला नंबर नोंदवायचा असेल किंवा काही बँकेची कागदपत्र समजावून घ्यायची असतील तर हळू हळू धिम्या गतीने चालत चालत आजी येते आणि आईकडून किंवा घरी जे कोणी असेल त्याच्याकडून वाचून किंवा फोन लावून घेते. एक मात्र, तिची ही जी काहि कामं आम्ही करतो त्याच्या बदल्यात ती झाडाचे आंबे, लिंबं, शेवग्याच्या शेंगा आणून देते. सगळ्या जगाला ती तिच्या बागेत येणारी फळ विकते पण आमच्याकडून एक पैसाही नाही घेत. मी कधी गेले कोल्हापूरला तर मला आवडते म्हणून शेवग्याच्या शेंगांची तिखट, खमंग भाजीही करून आणून देते. यामध्ये कोणताही दिखाऊपणा नाही . पण झाडांबद्दलचं प्रेम आणि अभिमान अपार.
"आजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्तच झाली आहे .."
" मग! हुनारचं की, माझ्या झाडाच्या शेंगा हैत.. लई दळदार.. त्या बाजारच्या नव्हत, चवळीवानी!!" असं चिरक्या आवाजत पण ठसक्यात उत्तर मिळेल .
या बाईचं उत्पन्नाचं साधन म्हणजे, मामांची पेन्शन, येणारं घरभाडं आणि आंबे, लिंबं, शेंगा, पेरू... श्रावणात जाई-जुई, मोगर्याची फुलं विकून मिळणारि रक्कम. कॉलनीतली लोकं सुद्धा त्या बाईला जपतात.. बाजरातून शेवगा, पेरू आणून खाण्यापेक्षा आजीकडूनच घेतात. भलेही स्वत:च्या बंगल्यातल्या बागेतून टोपलीभर फुले निघू देत पण सत्यनारायण, मंगळागौरी, आणि गणपतीच्या पूजेला घरोघरि फुलं येतात ती आजीच्या बागेतली. त्यामुळे तिचा तिच्या झाडांबद्दलचा अभिमानही द्विगुणीत होतो आणि मग म्हणते..
"माझ्या मोगर्या वानी मोगरा कुट्टं मिळायचा न्हाई. परवा, शेजारची सुजा आल्ती.. ५० रूप्पयची फुलं घ्यून गेली बगा.." त्यावेळी तिच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वहात असतो.
मध्येच एकदा आजी अशीच आली घरी.. " वयनी...... हैसा काय??"
"या आजी.. आई नाहिये.. या ना बसा जरा" .. मी
"ताई, कुटं गेली आई, येनार हायका लवकर??" .. आजी
"येईल १० मिनीटात. बसा तरी." .. मी
हा संवाद होईपर्यंत आजी जेमतेम बंगल्याचं गेट उघडून आत आलेलि असते. तिला चालायला खूप वेळ लागतो.. वयोमाना प्रमाणे येते तिच्या गतीने. मग ती आत येईपर्यंत मी स्वयंपाकघरातून पाणी पिऊन येते. आजी आत येते, नेहमीच्या ठरलेल्या दाराजवळच असणार्या खुर्चीजवळ बसते. याचं कारण, दाराजवळच्या खुर्चीतून तिला तिच्या घराकडे लक्ष ठेवता येतं खास करून आंब्याच्या किंवा पेरूच्या सिझनमध्ये. कारण घराच्या मागे असणार्या झोपडपट्टितली मुलं ताबडतोब येतात दगडं मारायला. आणि एखादा दिसलाच आंब्यावर किंव पेरूवर दगड मारणारा.. तर.. टिपेच्या चिरक्या स्वरातून ती त्याला शिवी हाणते.. बिचार्याला आजी कुठून ओरडते आहे ते दिसतही नाही, आवाज मात्र ऐकू येत असतो. बिचारा इकडं तिकडं बघत निघून जातो.
आजी बसते, काठी ठवते.. मग एकदम म्हणते.."इवडी इवडी झालित आता.. ३-४ दिवसांत पिकली की, आनून देतो हां"
"काय इवडी इवडी झालित आजी? काय आणून देताय??" मी.
"अगं बाई माजे, पिरू गं... इवडी झाल्येत.. आता पिकतील छान.. देतो आनून".. 'इवडी' असं अंगठा आणि इंडेक्स (मराठी??) बोट दाखवत आजी म्हणते.
"हो, पण आजी मी विकत घेणार पेरू.. असेच नकोत मला" मी..
" न्हाइ गं बाई.. माजी प्वोर हायस.. म्हायेरी आलियास.. विकत नक गं बाई.." आवाजात जास्तीत जास्त मार्दव आणून आणि व्याकुळ होत आजी म्हणते.
मला तिचं मन मोडवत नाही. मी 'बर' म्हणते.
तिला कधीतरी औषधं, बिस्किट आणून हवी असली तर येऊन सांगते "ताई, तू भाइर गेलिस तर माजी इवडी औषदं आनि ती मारिची मिळत्यात तसली बिस्किटं बी आनशील ??" पैसे पुढे करते. मी घेत नाही. "आजी, अहो आहेत पैसे.."
"नगं.. हे घ्यून जा. " हातात कोंबते पैसे. मिही फारशी खसखस न करता ते घेते कारण त्यातून तिचा मला स्वाभिमान दिसतो. माझ्या पैशानी औषधं आणायची.. बस्स! इतरांचं काही देणं नको.. हीच भावना.
या बाईचं मला आश्चर्य वाटतं.. काहीही होऊदे... पण तिचं कुत्र, तिची मांजरं.. आणि तिची बाग... या बद्दलचा तिचा अभिमान हा सतत असतो बोलण्यातून. दुसरा विषय म्हणून नाही.
या आजीची एक लकब आहे. ती खुर्चित बसली ना तरी डाविकडे उजवीकडे अशी डुलत असते. बहुदा तिच्या उतरत्या वयामुळे होत असावं.. जशी डॉ. श्रीराम लागूंची मान हलते तशी आजी खांद्याच्या रेषेत डुलत असते.
"बरं.. मी यू का आता?" आजी
" का हो बसा ना.." मी
" नगं.. राधा आणि सखी ( मांजरी आणि तिचं ते पिलू) येतील हितं हुडकत.. जातो आता" आजी. खरंच बरं का मंडळी, एकदा हि राधा आणि सखी आल्या होत्या आजीच्या मागोमग आणि आजी उठेपर्यंत कंपाऊंड वॉलवर बसून होत्या.
आजी उठते तिच्या त्या विटक्या, तळ झिजलेल्या स्लिपर्स चढवते, काठी घेते आणि निघते. मी उठून आत येते आणि जवळ जवळ १० मिनिटांनी फाटकाचा आवाज होतो.. आजी आता कुठे गेटच्या बाहेर पडलेली असते हळूहळू तिच्या चालीने..
दुसरे दिवशी पुन्हा चिरक्या आवाजात हाक ऐकू येते.. "वयनी.. हैसा काय??"
- प्राजु
प्रतिक्रिया
15 Jul 2008 - 9:25 am | मनिष
प्राजू अशी अजून्ही येऊ देत! छान जमले आहे!
16 Jul 2008 - 7:40 am | मेघना भुस्कुटे
मस्त जमले आहे. येऊ दे अजून. :)
15 Jul 2008 - 9:34 am | यशोधरा
प्राजू, एकदम मस्तच लिहिलं आहेस! खूप आवडलं मला.
इंडेक्स = तर्जनी का?
15 Jul 2008 - 6:43 pm | विजुभाऊ
अंगठा , इंडेक्स (मराठी??) = तर्जनी , मध्यमा , अनमिका , करंगळी या क्रमाने
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
15 Jul 2008 - 9:37 am | डोमकावळा
व्यक्तीचित्र सुंदर आहे...
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
- डोम
15 Jul 2008 - 10:10 am | सहज
आजी इथे येउन गेल्या असे वाटले.
:-)
15 Jul 2008 - 11:13 am | ऋषिकेश
अचूक निरिक्षण.. बर्याच वयस्क लोकांसाठी त्यांचा स्वाभिमान सर्वात महत्त्वाचा होतो.
बाकी आजीबाई भावल्या :) मस्त चित्रण
अजून येऊ दे!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
15 Jul 2008 - 11:42 am | बिपिन कार्यकर्ते
प्राजू...
व्यक्तिचित्र छानच उतरले आहे. तुम्ही उल्लेखलेल्या स्फूर्तिस्थानांच्या तोडीचे लेखन झाले आहे. व्यक्तिचित्र वाचताना आपण जणू काही त्या व्यक्तिला प्रत्यक्ष भेटतो आहोत आणि आपली त्या व्यक्तिशी तितकीच घनिष्ट जवळीक आहे असे वाटले तर ते व्यक्तिचित्र खरे, ते जमलंय इथे...
मला सुद्धा पांडेकर आजी आत्ताच घराचा दरवाजा लावून गेल्यासारखं वाटतंय... असंच मस्त मस्त लिहित रहा.
बिपिन.
15 Jul 2008 - 11:47 am | ANIRUDDHA JOSHI
PRAJUJI,
REALLY FANTASTIC. TUMHI KHUP SUNDAR LIHILE AAHET KOLHAPURI BHASHETLE BARKAVE AGADI JESE CHYA TASE AAHET. MI KOLHAPURCHAH ASLYANE HE MALA LAGECH JANAVATE. LAI BHARI KEEP IT UP.
ANIRUDDHA.
15 Jul 2008 - 11:56 am | विसोबा खेचर
MI KOLHAPURCHAH ASLYANE HE MALA LAGECH JANAVATE
छ्या! तुम्ही कुठले कोल्हापूरचे? तुम्हाला तर अजून साधं मराठमोळं मराठीदेखील लिहिता येत नाही! :) -- हघ्या
असो,
एक नम्र सूचना - हे मराठी संस्थळ आहे याचे भान असू द्या व इथे मराठीतच लिहा....!
अन्यथा तुमचे यापुढील बिगरमराठी लेखन येथून नाईलाजास्तव काढून टाकले जाईल. तशी वेळ कृपया आमच्यावर येऊ देऊ नका!
आपला,
(मराठी) तात्या.
15 Jul 2008 - 11:51 am | विसोबा खेचर
प्राजू,
आज्जीचं व्यक्तिचित्र अतिशय सुरेख रंगवलं आहेस.., जियो...!
तिच्या त्या विटक्या, तळ झिजलेल्या स्लिपर्स चढवते,
ह्या वाक्याने थोडा दुखावला गेलो...!
तात्या.
15 Jul 2008 - 5:30 pm | प्रियाली
आजी आवडली.
15 Jul 2008 - 5:40 pm | प्राजु
वाचन केलेल्या आणि प्रतिसाद दिलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jul 2008 - 5:41 pm | वरदा
मस्तच गं खरोखर पांडेकर आज्जी आत्ताच दरवाजा लावून निघतायत आणि उद्या येतील परत असं वाटलं...
तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला.
हे वाचून खूप वाईट वाटलं....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
15 Jul 2008 - 5:49 pm | शितल
प्राजु ,
आजी, तीचे झाडावरील कुत्रा, माजर वरील प्रेम आणि
कोल्हापुरी भाषा मस्तच वाटले, कोल्हापुरला जाऊन आल्या सारखे वाटले.:)
15 Jul 2008 - 6:31 pm | प्राजु
वरदा, शीतल.. मनापासून धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jul 2008 - 6:32 pm | राधा
छान लिहिल आहेस ग........आजीच चित्रच डोळ्यासमोर आल.......
15 Jul 2008 - 7:12 pm | चतुरंग
पहिलंच व्यक्तिचित्र आहे असं खरंच वाटत नाहीये. कोल्लापुरी बोलीचा साज चांगला सजला आहे! :)
(अवांतर - कसं झालंय अशी धाकधूक वाटत होती का? कारण आटोपतं घेतल्यासारखं वाटलं!)
चतुरंग
15 Jul 2008 - 7:29 pm | मुक्तसुनीत
प्राजू ,
तुमचा हा लेख तुमच्या आतापर्यंतच्या लिखाणातला विशेष चांगला जमला आहे असे मला वाटले ! कोल्लापूरची खास बोली , सगळ्या लकबी .....बेत जमला बरे का ! :-)
15 Jul 2008 - 8:21 pm | अभिज्ञ
लेख छान झालाय.थोडासा मोठा करता आला असता असे वाटते.
अभिज्ञ.
15 Jul 2008 - 9:05 pm | केशवसुमार
प्राजुताई,
अजी छान रंगवलीय.. व्यक्तीचित्र लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आवडला..
लिहित रहा.. सवयीने अजून खुलवता येईल.. पुलेशु.
केशवसुमार
स्वगतः व्यक्तीचित्रांची लाट आली वाटतं मिपावर :B
15 Jul 2008 - 9:19 pm | धनंजय
व्यक्तिचित्र आहे. फारच छान.
15 Jul 2008 - 9:26 pm | मदनबाण
मस्तच.. वरदाशी सहमत..
का कोणास ठाऊक पण मला लहानपणीची चल रे भोपळ्या टुणुक टुणुक.. ही गोष्ट आठवली...
मदनबाण.....
15 Jul 2008 - 10:01 pm | वाचक
चांगले जमले आहे - अजून उठाव येउ शकला असता जर 'संपादकिय संस्करण' केले असतेत तर.
उदाहरणे देतो
पहिल्या चार ओळीतच वाक्यरचना जी विस्कळीत वाटते आहे ती नीट करता आली असती - अगदी थोडेसे बदल करुन खाली चिकटवतो आहे - बघा कसे वाटते
पांडेकर आजी आल्या. अशिक्षित, अडाणी बाई. काळा सावळा रंग , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा तो ही मामांचा म्हणजे तिच्या नवर्याचा होता, ती तो आता वापरते., आणि डोक्याची चांदी झालेली. अशी ही आजी. अतिशय प्रेमळ. नवरा पोलिस खात्यात जमादार होता. पण नवरा म्हणजे मुलखाचा चिकट होता असं आजीच स्वतः सांगते. तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. तेव्हापासून नवर्याबद्दल मन कलूषित झालेलं , पण जुने संस्कार .. त्यामुळे नवर्यासोबतच उरलेलं आयुष्य घालवीत होती. त्या मामांनी संपूर्ण आयुष्यात एक चांगलं काम केलं ते म्हणजे ४ लहान लहान खोल्यांचं का होईना पण साधारण ३००० स्क्वे. फूटच्या प्लॉटवर स्वतःचं घर बांधलं. घराच्या आवारात आजीनी लावलेली झाडं म्हणजे पायरी आंबा, लिंबू, शेवगा, पेरू, चिकू, जाई, जुई, मोगरा, गुलाब, २ प्रकारच्या जास्वंदी. तिचं तिच्या बागेवर पोटच्या मुलासारखं प्रेम. झाडांवर अतिशय माया.
त्याचप्रमाणे कुठे 'आजीचा' उल्लेख बाई म्हणून होतो तर कुठे आजी - एकसंधपणा जाणवत नाही अशामुळे.
बाकी एक नेहेमीचीच सूचना म्हणजे - परिष्करण - शुद्धलेखनाच्या चुका आणि 'टायपो ' सहज टाळता येउ शकण्यासारखे
पण ' क्षमता (पोटेन्शियल) ' जबरदस्त आहे तुमच्यात - लिहित रहा.
15 Jul 2008 - 10:57 pm | प्राजु
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.
वाचक, आपण सुचवलेले बदल आवडले. आपल्या सुचना मी लक्षात ठेवेन. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jul 2008 - 11:49 pm | पिवळा डांबिस
छान उतरलंय, प्राजु, हे व्यक्तिचित्र! मला आवडलं!!
बर्याच वयस्क लोकांसाठी त्यांचा स्वाभिमान सर्वात महत्त्वाचा होतो.
सहमत! आणि त्या जोडीला आर्थिक परिस्थिती जर बेताची असेल तर त्याला एक विलक्षण धार येते. अशा वेळेस तु केलंस तसं त्यांच्या इच्छेला मान देणंच श्रेयस्कर.
कोल्हापुरी भाषेचं वळण छान उतरलं आहे. पण चतुरंगाप्रमाणे मलाही वाटलं की अजून थोडं सविस्तर करता आलं असतं. विशेषतः आजीच्या आयुष्यातील घटनांबद्द्ल! मलाही आवरतं घेतल्यासारखं वाटलं!
असो.
प्राजुकडून अजून व्यक्तिचित्रे वाचायला उत्सुक!!
आता निवृत्त,
-डांबिसकाका
16 Jul 2008 - 12:38 am | नंदन
व्यक्तिचित्र आवडले. मिपाला अजून एक समर्थ व्यक्तिचित्रकार मिळाला, हे नक्की!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Jul 2008 - 12:48 am | संदीप चित्रे
अजून व्यक्तिचित्रं लिही.
इंडेक्स (मराठी??) == तर्जनी
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
16 Jul 2008 - 8:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्यक्तिचित्र झकास झालंय !!!
पुढील व्यक्तिचित्राच्या प्रतिक्षेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे