कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
15 May 2013 - 1:45 pm

माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो.

'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे).

साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ?

ब्रम्हदेव हा सृष्टीचा निर्माता. सृजनाचा देव. तेंव्हा 'ब्रम्हमुहूर्त' म्हणजे सृजनशीलतेची वेळ. चित्र, लेखन, किंवा अन्य कश्याहीसाठी नवीन कल्पना केंव्हाही, कुठेही सुचून जात असल्या तरी त्यांचं प्रमाण या ब्रह्म मुहूर्तावर मात्र सर्वात जास्त असतं, असा माझा दीर्घ अनुभव आहे.

पण म्हणून आपण गजर वगैरे लावून पहाटे तीनला जांभया देत, आळसवटलेले उठलो, तरी काही सृजनशील कल्पना सुचतीलच, ही शक्यता फारच कमी आहे.

पहाटे तीनच्या सुमारास उठून 'ब्रम्हमुहूर्ता' चा लाभ घ्यायचा, तर खालील अटी पूर्ण झालेल्या असल्या पाहिजेत:

१. झोप पूर्ण झालेली असली पाहिजे, आणि तात्काळ उठून अंथरुणाच्या बाहेर येण्याचा उत्साह वाटत असला पाहिजे. गजराशिवाय आपोआप झोप उघडलेली असली पाहिजे.

२. पोटातले अन्न पूर्ण पचलेले असले पाहिजे, आणि उठल्यावर लगेच शौच्याची भावना/निकड झाली पाहिजे.

या दोन गोष्टी साधायच्या, तर खालील दोन गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे:

१. आदल्या रात्री नऊ -साडेनऊच्या सुमारास झोपणे, आणि

२. आदल्या दिवशीचे संध्याकाळचे जेवण (तेही हलके, सुपाच्य) सूर्यास्ताच्या सुमारास झालेले असणे.

असे थोडे दिवस केले, की झोप आपोआपच लवकर उघडू लागेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसा केंव्हाही, विशेषत: दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ अवश्य झोप घ्यावी.

मग काय मंडळी, घेणार ना 'ब्रह्ममुहूर्ता' चा लाभ?

संस्कृतीकलावाङ्मयजीवनमानराहणीप्रकटनअनुभवशिफारससल्ला

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

15 May 2013 - 1:49 pm | सौंदाळा

लेख छान.

मग काय मंडळी, घेणार ना 'ब्रह्ममुहूर्ता' चा लाभ?

इच्छा असूनही सध्या अवघडच दिसतंय

ब्रह्ममुहुर्त आणि सृजन यांच एकास एक नातं असतं तर!
बरेच पेपरवाले,रिक्षावाले, आयटीवाले, सुरक्षा रक्षक, फूलवाले, पुजारी ..... कलाकार झाले असते.*
निद्रानाश असणारे असंख्य लोकही कलाकार झाले असते ...
(बहुसंख्य कलाकारी पाहून ही शंका येतेच म्हणा ) :-)

बाकी मला यापेक्षा 'जीवशास्त्रीय घड्याळ' ही संकल्पना जास्त सोयीची वाटते :-)

* इथं नोंदवलेले व्यवसाय करणा-या लोकांचा अपमान करण्याचा हेतू नाही, हे आणि इतर कोणतेही व्यवसाय मी तुच्छ मानत नाही.

सौंदाळा's picture

15 May 2013 - 2:16 pm | सौंदाळा

बरेच पेपरवाले,रिक्षावाले, आयटीवाले, सुरक्षा रक्षक, फूलवाले, पुजारी.... वरील लेखातील अटी पूर्ण करत नसावेत असे वाटते.

प्रकाश घाटपांडे's picture

18 May 2013 - 10:58 am | प्रकाश घाटपांडे

बाकी मला यापेक्षा 'जीवशास्त्रीय

घड्याळ' ही संकल्पना जास्त सोयीची वाटते

सहमत!

ऋषिकेश's picture

15 May 2013 - 2:12 pm | ऋषिकेश

खिक् :D

पाषाणभेद's picture

15 May 2013 - 2:48 pm | पाषाणभेद

माफ करा चित्रगुप्तजी हा लेख काही पचनी पडला नाही.

चित्रगुप्त's picture

15 May 2013 - 5:08 pm | चित्रगुप्त

....हा लेख काही पचनी पडला नाही ...
जरा आणखी स्पष्टीकरण देता का?
म्हणजे लेखातील आशयाशी असहमत, की मांडणीशी, की आणखी काही?
अश्या स्पष्टीकरणातूनच शिकायला मिळते, म्हणून विचारले.

त्यांची बहुधा नाईट शिफ्ट सुरु असेल. नथिंग एल्स. ;)

पा भे ह घ्या. :)

पाषाणभेद's picture

15 May 2013 - 6:22 pm | पाषाणभेद

काही मनाला लावून घेवू नका हो. आपली जी लेखांची मालिका चालू आहे त्यामुळे मला हा देखील लेख तसाच आहे काय असे वाटले. तसलेच लेख येवू द्या.

पाषाणभेद's picture

15 May 2013 - 6:26 pm | पाषाणभेद

अन ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यासाठी प्यारे१ म्हणतात तसे नाईट शिप्टवाल्यांना काय कौतूक नाही हो. आमचा ब्रह्ममुहूर्त कधी येतो अन जातो तेच समजत नाही.:-)

सूड's picture

15 May 2013 - 2:52 pm | सूड

शक्य नाही असं दिसतंय.

मालोजीराव's picture

16 May 2013 - 3:25 pm | मालोजीराव

आदल्या रात्री नऊ -साडेनऊच्या सुमारास झोपणे

activities रातच्यालाच जास्त असतात...

म्हंजे ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेस जागे असले की झाले, बरोबर? ;) मग झोपून उठा नैतर जागे र्‍हा.

नव्हे नव्हे माझ्यामते दुसरी अट अधिक महत्त्वाची आहे:

पोटातले अन्न पूर्ण पचलेले असले पाहिजे, आणि उठल्यावर लगेच शौच्याची भावना/निकड झाली पाहिजे

त्या शांत-प्रशांत वेळी 'तिथे' अनेकांना अनेक कल्पना सुचतात असे म्हणतात ;)

ते बाकी खरंच! नेचर अ‍ॅभॉर्स व्हॅक्यूम असे वाचले होते त्याचाच पडताळा म्हटला पाहिजे हा , दुसरे काय ;) एकीकडे काहितरी रिकामे झाले की दुसरीकडे काहीतरी भरले पाहिजेच ;)

आदूबाळ's picture

16 May 2013 - 11:05 am | आदूबाळ

:))

Matter can neither be created nor destroyed. It can only be transformed from one form to another.

ऐसे फिजिक्सचे बोलां... :))

बॅटमॅन's picture

16 May 2013 - 12:27 pm | बॅटमॅन

हीहीही =)) =))

या रविवारी सकाळी ४ पासून कोकणवारीला सुरुवात करणार असल्याने , अपोआप ब्राह्मी मुहूर्तावर उठणे आलेच.

बाकी लेख उगाच वाटला

प्यारे१'s picture

20 May 2013 - 12:17 am | प्यारे१

Kokan calling.. .... by by mumbai

- FB Wall. ;)

ब्राह्म मुहुर्तावर उठण्याचे यम नियम.

ढालगज भवानी's picture

15 May 2013 - 5:58 pm | ढालगज भवानी

मस्त!!!

असा अनुभव आहे खरा, पण ब-याचदा असं होतं की माझे लिखाणातली पात्रं पहाटेच काय पण भर रात्री सुद्धा झोप उडवतात आणि मग उठुन बसावं लागतं कळफलक बडवत.

आदिजोशी's picture

15 May 2013 - 6:26 pm | आदिजोशी

इतकं सिरियसली घ्यायची नसते प्रत्येक कॉमेंट.

चित्रगुप्त's picture

15 May 2013 - 6:54 pm | चित्रगुप्त

....इतकं सिरियसली घ्यायची नसते प्रत्येक कॉमेंट....
अहो, हा लेख सुद्धा ब्रह्ममुहुर्तालाच सुचला. करणार काय? आदतसे मजबूर.

खरंतर या विषयावर आणखीही लिहिण्यासारखं आहे, म्हणजे त्यावेळेला पिंगळा येऊन बोलून जातो, सत्व-रज-तम इ. चे आठ-आठ तासांचे चक्र असते, त्यापैकी पहाटे सत्वगुणाचे प्राबल्य असते, वगैरे वगैरे.

पण हे बहुधा पचनी पडणार नाही, म्हणून लिहिले नाही. पण ज्यांना शक्य असेल, कळकळ असेल त्यांनी अवश्य अनुभव घ्यावा, एवढेच सांगू शकतो.
मला आर्ट्स्कुलात असतानापासून भल्या पहाटे उठून निसर्गचित्रणासाठी जायच्या ओढीतून जी सवय लागली, ती कायम राहिली, आणि त्यातून खूपच चांगले घडत गेले.

सुबोध खरे's picture

15 May 2013 - 6:59 pm | सुबोध खरे

आम्ही कितीही वाजता झोपलो तरीही पहाटे तीन वाजता उठणे अशक्य आहे. बरं झालं आम्ही कलाकार नाही. नाहीतर उपाशी मेलो असतो. पहाटे तीन पर्यंत जागणे सहज शक्य आहे.एखादी गप्पांची किंवा गाण्याची मैफिल असेल तर पहाटे सहा पर्यंत सुद्धा जागणे शक्य आहे पण पहाटे तीनच काय सात वाजता सुद्धा जाग येत नाही.

भटक्य आणि उनाड's picture

18 May 2013 - 10:07 am | भटक्य आणि उनाड

सह्मत तुमच्याशी !!!

प्रसाद गोडबोले's picture

15 May 2013 - 7:03 pm | प्रसाद गोडबोले

पण अवघड आहे .

पिवळा डांबिस's picture

15 May 2013 - 10:39 pm | पिवळा डांबिस

कल्पना सुचण्यासाठी पहाटे तीन वाजता उठायचं..
म्हणजे रात्री नवाला झोपायचं...
सूर्यास्ताला म्हणजे सहा-साडेसहाला जेवायचं....
मग काय चार वाजताच मैफिल सुरू करायची?
भले! कामावरून हाकलून देतील ना आम्हाला!!!!
:)
त्यापेक्षा तुमच्या (आणि शुचिच्या) कल्पनांचा नुसता आस्वाद घेणंच काय वाईट?

बाकी या शुचिच्या प्रतिक्रियांपासून सांभाळा हो! अभिप्राय देऊन देऊन चांगल्या लेखकांना उत्सवमूर्ती बनवून त्यांचं पोटेंशियल घालवण्यात अगदी हातखंडा आहे तिचा!!!!! ;)
नाही, एक आपलं निरिक्षण नोंदवलं!!!!
:)

ढालगज भवानी's picture

15 May 2013 - 10:55 pm | ढालगज भवानी

काय हो पिडां काडी टाकता??? =))

तीन वाजता उठण्याचं मी स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही. खरंतर तीन वाजता झोपलेलंच बरं कारण स्वप्नात चिक्क्कार कल्पना सुचतात. शिवाय पहाटे पडलेली स्वप्न खरीही होतात म्हणे! मी तर असं ऐकलंय की हे विश्व म्हणजे ब्रह्मदेवाला पाहाटेच्या वेळी पडलेलं स्वप्नच आहे!

पिवळा डांबिस's picture

16 May 2013 - 1:56 am | पिवळा डांबिस

मी तर असं ऐकलंय की हे विश्व म्हणजे ब्रह्मदेवाला पाहाटेच्या वेळी पडलेलं स्वप्नच आहे!

शौचाची भावना/ निकड लागल्यावर पडलं असलं पाहिजे त्याला हे स्वप्न!
..नायतर हे असलं प्रसरण पावणारं विश्व बनवलं नसतं त्याने!!!!
:)

अस्वस्थामा's picture

16 May 2013 - 4:30 am | अस्वस्थामा

ढण्ण्ण् ...!!

ब्रह्मदेवाला पाहाटेच्या वेळी पडलेलं स्वप्नच आहे

का? ब्रम्हदेवसाहेब उठत नव्हते का ब्रम्ह मुहूर्तावर? का त्याच दिवशी लेट झाला होता? ;)
.
एनी वे मी एकही चित्र असे ब्रह्म मुहूर्ताच्या सगळ्या अटी पाळून काढलेले नाही. पुढेही जमणार नाही. :)

प्रभाकर पेठकर's picture

16 May 2013 - 12:15 pm | प्रभाकर पेठकर

मी एकही चित्र असे ब्रह्म मुहूर्ताच्या सगळ्या अटी पाळून काढलेले नाही.

ब्रह्म मुहूर्तावर चित्रच काढले पाहिजे असे नाही. सृजनशिलतेचा, विश्वनिर्मीतीचा कुठलाही अविष्कार स्वागतार्ह आहे..... असे आपले मला वाटते.

विसोबा खेचर's picture

16 May 2013 - 3:02 pm | विसोबा खेचर

छान..! :)

मूकवाचक's picture

17 May 2013 - 9:20 am | मूकवाचक

Early to bed and early to rise, makes a man healthy and wise, but his girlfriend dates other guys असे कुठेतरी वाचलेले आठवले.

बॅटमॅन's picture

17 May 2013 - 2:12 pm | बॅटमॅन

Early to bed and early to rise, makes a man healthy and wise, but his girlfriend dates other guys

=)) =)) =))

अभ्या..'s picture

17 May 2013 - 2:43 pm | अभ्या..

Early to bed and early to rise, makes a man healthy and wise, but his girlfriend dates other guys

वॉव. मुव्वा
एक मोट्ठी प्रिंट काढून लावतोच आता ऑफीसात. :)
@बटूशास्त्री जरा सुगम मराठीत श्लोकबध्द वगैरे करायला जमेल काय? ;)

चित्रगुप्त's picture

17 May 2013 - 3:08 pm | चित्रगुप्त

झोपतो आणि उठतो जो लवकरी
आरोग्य-बुद्धि लाभे त्यास झडकरी
मैत्रिण तयाचि घाली, गोमातेस खजुर सत्वरी.

अभ्याशेठ तुमच्यासाठी कायपण ;)

हा घ्या श्लोक.
वृत्तः पृथ्वी.

निजे लवकरी उठे चटशिरी, तयाला खरी |
मिळेल धनबुद्धिसंपद बहू, टनाने जरी |
नुरे निजसखी तयाजवळि हो, करी दे तुरी |
पळोनि इतरांस डेटित बसे, बला ही खरी ||

प्रचेतस's picture

17 May 2013 - 3:32 pm | प्रचेतस

=)) =)) =))

काय रे हे. भारीच.

अभ्या..'s picture

17 May 2013 - 3:35 pm | अभ्या..

धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!! तुला पण आणि चित्रगुप्तांना पण.
@ बॅट्या जरा त्या शेवटच्या ओळीत,
पळोनि इतरांस डेटित बसे, बला ही खरी || ऐवजी
पळोनि इतरांस डेटित बसे, जणू नर्गिस फखरी ||
चालेल काय? यमकात बसतेय पण वृत्तात नाही. :(

बॅटमॅन's picture

17 May 2013 - 3:40 pm | बॅटमॅन

हम्म हे जरा पाहिले पाहिजे :)

चित्रगुप्त's picture

17 May 2013 - 4:46 pm | चित्रगुप्त

नरघिस फकरी म्हणजे काय, याचा जालावर शोध घेता हे मिळाले:

n

चित्रगुप्त's picture

17 May 2013 - 4:42 pm | चित्रगुप्त

'टनाने जरि', 'करी दे तुरी', 'इतरांस डेटित बसे, बला ही खरी' (अबला x बला) अप्रतिम.
आमचा त्रिवार कुर्निसात धोपट्फलकपुरुषा.

चौकटराजा's picture

17 May 2013 - 5:12 pm | चौकटराजा

आता सांगा ही सरस्वती तुमच्या बोटात ब्राह्मवेळेस आली काय ? तसे नसेल तर चित्रकार भाऊंचे म्हणणे काय आहे यावर ? आँ ?
ब्याट्रॉव , काय काय आहे तुमच्या टकुर्‍यात राव ! मस्त !

उपास's picture

17 May 2013 - 7:25 pm | उपास

डेटितच्या ऐवजी भेटित घातले तर नुसतेच थिल्लर न वाटता त्याला (साहित्यिक) वजन येईल अजून असे वाटते ;)

बॅटमॅन's picture

17 May 2013 - 7:32 pm | बॅटमॅन

वा! हा पाठ अधिक योग्य आहे. सूचनेकरिता धन्यवाद :)

चित्रगुप्त's picture

18 May 2013 - 6:50 am | चित्रगुप्त

...हा पाठ अधिक योग्य...
नाही हो, 'डेटित' मधे जी खुमारी आहे, ती 'भेटित' मधे कुठून येणार?
पंतप्रधान म. सिंग आणि नवाज शरीफ यांच्या 'भेटित' ...वगैरे साठी ते ठीक आहे.

बॅटमॅन's picture

18 May 2013 - 3:24 pm | बॅटमॅन

वृत्ताच्या आणि भाषेच्या चौकटीत बसवायचे तर भेटित ठीके, पण डेटित चा अर्थ वेगळा आहे तो बसत नाही हेही खरेच म्हणा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

लई भारी, वाघूळशेठ ! +P

Early to bed and early to rise, makes a man healthy and wise, but his girlfriend dates other guys...
... व्वा. किती सात्विक असतील त्या बाला.

पहाटे ब्रह्ममुहुर्तावर उठून सडासंमार्जनादि करून 'गायी'ना 'डेट्स' म्हणजे सात्विक खजूर खाउ घालणे, वाहवा. अश्या बाला ज्या पुण्यभूमित आहेत, त्या भारत भूस अभिवादन. गर्वाने म्हणा...

अभ्या..'s picture

17 May 2013 - 3:07 pm | अभ्या..

=)) =)) =)) =)) =)) =))
गर्वाने म्हणा... असल्या गायीच्या बैलाला..........................

बॅटमॅन's picture

17 May 2013 - 3:42 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

चित्रगुप्त's picture

19 May 2013 - 4:47 am | चित्रगुप्त

आत्ता, पहाटे चार वाजता, आम्हाला अचानक स्मरण झाले की आमच्या 'नेपोलियन'..इ. च्या लेखात उल्लेखिलेल्या श्रीमंत तुकोजीराव होळकर यांचे संग्रहातील पोथ्यांमधे खालील कवने पण होती:

प्रातःकाळी उठावे
दिशेकडे दुरी जावे
रात्रौ लवकरचि झोपावे
म्हणिजे बरे ...

अश्या सवयी ज्या नरा
लाभे आरोग्य दिसे बरा
बुद्धि-वैभव आणि हुन्नरा
पाविजेल की...

परि तयाचि मित्र-ललना
देई डेट अन्य जना
बापुडा झोपे, सखि निर्वसना
रमे-गमे मित्रांसवे...
-----
आणि शार्दुलविक्रिडितातील हे कवनः

झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती
गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती

"Early to bed and early to rise, makes a man healthy and wise, but his girlfriend dates other guys" ...याचे मूळ या प्राचीन कवनांमधे आहे, हे तो उघडचि आहे.

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2013 - 10:23 am | प्रभाकर पेठकर

हा: हा: अगदी वरिजिनल पुरावा.

बॅटमॅन's picture

19 May 2013 - 12:42 pm | बॅटमॅन

जब्री पुरावा. शार्दूलविक्रीडितातले कवन लैच आवडले.

अभ्या..'s picture

19 May 2013 - 2:09 pm | अभ्या..

हीहीहीही. भारीच उत्खनन हाय. लै आवडले. :)
पण चित्रगुप्तजी तुम्ही, आमचा बॅट्या, असले हे वृत्तात वगैरे कसे काय लिव्हता बुवा. आम्हाला त्यांची नावे लक्षात ठेवायची मारामार, लक्षणे अन मात्रा तर दूरच. :(.

चित्रगुप्त's picture

19 May 2013 - 3:17 pm | चित्रगुप्त

...असले हे वृत्तात वगैरे कसे काय लिव्हता बुवा...
घ्या...यालाच म्हणतात रामाची सीता कोण.
अहो, हाच तर आहे ब्रह्ममुहुर्ताचा महिमा.

संजय क्षीरसागर's picture

19 May 2013 - 11:59 pm | संजय क्षीरसागर

परि तयाचि मित्र-ललना
देई डेट अन्य जना
बापुडा झोपे, सखि निर्वसना
रमे-गमे मित्रांसवे...

ब्राह्ममुहुर्ती उठूनी जागा, वेळ मला ती येई न कामा
म्हणे कामिनी केवळ घरकामा, बरा असे हा दत्तूमामा

अनंगरंग जो उधळून रात्री, दमूनी पहुडला ब्राह्ममुहुर्ती
तयावरी ही उधळून प्रिती, कामा लावीन दत्तूमामा

रामचंद्र's picture

30 Jan 2024 - 9:41 pm | रामचंद्र

झकास! 'बदनाम पर तू मस्त मस्त' या दिव्यवाणीला अनुसरून.

चित्रगुप्त's picture

16 May 2013 - 4:21 pm | चित्रगुप्त

सृजनशीलतेचा मक्ता फक्त कलावंतांनाच नसतो. जगातील प्रत्येक व्यक्ती कमी-अधिक प्रमाणात सृजनशील असतेच. कल्पकता ही कोणत्याही बाबतीत उपयोगी पडू शकते. जसे गजबललेल्या काँक्रीटच्या जंगलापेक्षा नैसर्गिक वातावरण असलेले जंगल, उद्यान, उपवन इ. जास्त रमणीय, स्फूर्तीदायक, आरोग्यदायक, तशीच संपूर्ण दिवसभरात पहाटेपासून सूर्योदयापर्यंतची वेळ ही उत्तम. हिचा लाभ ज्याने त्याने आपापल्या गरजेप्रमाणे, आवडीप्रमाणे घ्यावा.

विनायक प्रभू's picture

16 May 2013 - 5:25 pm | विनायक प्रभू

ब्रम्ह मुहुर्तावर उठण्याचे खुप फायदे असतात.

प्यारे१'s picture

17 May 2013 - 11:04 pm | प्यारे१

कृ शि सा न वि वि गुरुवर्य
हा हा हा!
अवघड आहे ब्वा!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 May 2013 - 5:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आमचे एक accountancy चे मास्तर होते, त्यांना म्हणे accountancy मध्ये विशिष्ट प्रश्न सोडवायला एक नविन formula सापडला, त्याला त्यांनी formula no. 12 असे नाव दिले. कां तर जेव्हा त्यांना हा फॉरमुला सुचला तेव्हा ते एका चाळीत रहायचे आणि ते असेच ब्राम्हमुहुर्तावर १२ नंबरच्या शौचकुपात.......
तर असं आहे या ब्राह्ममुहुर्ताचे
:D :D

मंदार कात्रे's picture

22 Jan 2014 - 11:46 am | मंदार कात्रे

'जीवशास्त्रीय घड्याळ' हीच संकल्पना यासंदर्भात लागू पडते .
त्याचप्रमाणॅ पहाटे ३ च्या वेळी झोप आर ई एम अवस्थेतली झोप म्हणजेच साखरझोप असते...

यावेळेला अनेक क्रिएटीव्ह / सुखद भावना जाग्रुत करणारे हार्मोन स्रवतात ,असे मागे वाचलेले होते.