लाल पेरू

सुज्ञ माणुस's picture
सुज्ञ माणुस in जनातलं, मनातलं
6 Mar 2013 - 10:15 am

लाल पेरू

"अरे, मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ." असे म्हणत मित्राने मला जवळ जवळ ओढतच दुकानात नेले. मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता. त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार नाही म्हणून दुःख हि झाले होते.त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो.

पेरू, अहाहा.. या दोन शब्दातच किती सुख सामावले आहे. तुम्हाला ते जाणवणार नाही पण नुसते त्या दोन शब्दांच्या उच्चारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटते. "मोठेपणी तू कोण होणार बाळा?" अश्या बाळबोध प्रश्नांना मी 'डॉक्टर, इंजिनिअर अशी टिपीकल उत्तरे न देत "पेरूवाला" होणार असे उत्तर देऊन सर्वांना चकित करायचो. ( आई वडिलांना लाज आणायचो असेही म्हणता येईल). पण खरंच, लहानपणापासून माझे स्वप्न होते ते पेरूवाला बनण्याचे. "किती मनसोक्त पेरू खायला मिळत असतील न या पेरूवाल्या काकांना? आणि त्यामुळेच हे एवढे चांगले असावेत का? पेरूवाल्या काकांचे गाव कोणते असावे? नंतर भूगोल शिकल्यानंतर, अमेरिकेमधील "पेरू" हे शहर त्यांच्यामुळेच उदयास आले असावे का ?' असे असंख्य प्रश्न मला पडत असत.

२ रुपयांना मिळणारे पेरू हे जसे अमृताचा गोळा वाटायचे तसे, त्याचे ४ काप करून त्यात तिखट मीठ घालून हिरवागार पेरू देणारे काका हेच मला ईश्वराचे रूप भासायचे.

हिरवेगार तर कधी लाल पेरू खायची इच्छा झाली की मग आम्ही गावात घराच्या मागील पेरूच्या बागेत धूम ठोकायचो. मनसोक्त पेरू खाऊन झाले की मग त्यातल्या बिया दाताने कडकड चावून कोणाचे दात जास्त चांगले याची स्पर्धा लागायची. गावातील जत्रेमध्ये व बाजारामध्ये पेरूवाले दिसले की प्रत्येकाला भाव विचारायचा आणि घ्यायचा मात्र एखादाच. पण तो हि घ्यायला पराकोटीची हुज्जत, जिकीर.

एकदा एका झाडाला मोठा पाऊण किलोचा पेरू आल्याची बातमी कळली. ती म्हणजे आताच्या onsite पेक्षा मोठी बातमी होती. विकणाऱ्या व्यक्ती कडून त्याची इथम्भूत माहिती मिळवल्यावर तो आपल्याला परवडणार नाही असे वाटून झालेला हिरमोड, आई कडे त्याच्यासाठी धरलेला हट्ट, त्या काकांनी "आवडल्याय न पोराहो, मग जा की घेऊन " असे म्हणत फुकट देऊ केलेला तो मोठा पेरू, तत्क्षणी "You made my day" असे चेहऱ्यावर उमटलेले भाव, त्यानंतर तो घरी आणल्यानंतर लगेच खाऊन संपायला नको म्हणून लपवून ठेवलेले ते दोन दिवस, आणि दोन दिवसांनी कापल्यानंतर घरातील सगळ्यांनी एकत्र बसून घेतलेले आस्वाद. कधीही विसरू शकत नाही असे ते क्षण.

नंतर परत इथे शिक्षण चालू झाले की सगळे चोचले बंद व्हायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत शाळेबाहेर उभ्या असलेल्या पेरूवाल्या काकांकडे धाव घ्यायचो. पण खिशात पैसे नसल्याने अधाशी नजरेने ते बघण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. पेरू कापताना त्याच्या देठाचा भाग जर जास्त कापला गेला की तो खाऊन त्या पेरूची चव "predict" करण्याचा प्रयत्न करायचो. यातच मग " कोणाचे दात जास्त चांगले?" या स्पर्धेचे "कोण लवकर झडप घालून देठाचे काप जास्त खातो" यामध्ये रूपांतर व्हायचे.

त्यानंतर बरेच वर्षे गेली. आयुष्य सावरण्याच्या गडबडीत हि माझी आवड कुठे लुप्त झाली कुणास ठाऊक? त्यानंतर परत माझा पेरू शी संबंध आला तो विमानतळावर. तेथील सामान तपासणी करणाऱ्या माणसाने " You can't take this with you" असे म्हणत माझ्या सामानातील पेरू बाहेर काढून चक्क फेकून दिले. आईने मला खूप आवडतात म्हणून आवर्जून आणून दिले होते. क्षणात माझ्या मस्तकात रागाची भावना उमटली. अनेक विनवण्या करूनही यश आले नाही. शेवटी माझ्या या जिवलगाशिवायच मी देश सोडून गेलो.

असाच एके दिवशी मित्राची वाट बघत कार रस्त्याच्या बाजूला उभी केली होती, अगदी फुटपाथ ला चिकटून. तेवढ्यात एक पेरू गाडीच्या डाव्या खिडकीतून आत गाडीत पडला."न्यूटन" ला सफरचंद पडल्यावर आणि त्यानंतर शोध लावल्यावर जेवढा आनंद झाला असेल त्यापेक्षा कैक पटींनी आनंद मला झाला. वाकून बघितले तर एक पेरू विकणारी मुलगी टोपलीत पेरू घेऊन फुटपाथवरून जात होती. अन जागा नसल्याने खेटून जाताना तो पेरू गाडीत पडला असावा.

" साह्येब घ्या ना एक पेरू, छान हिरवेगार आहेत."
" नाही नको "
" अहो साह्येब घ्या, लाल पेरू बी आहे. तुम्ही कधी खाल्ला नसेल असा, थोडेच उरलेत ५-६, घ्या एखादा "

पटकन सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यातून झरझर सरला. मी काही रुपडे देऊन सगळे टोपलीतले पेरू खरेदी केले . लगेच खायला सुरवात केली. वेदनेने विव्हळ झाल्यावर आठवले की बहुतेक दातांचे "रूट क्यानोल" झाले आहे. जेव्हा पेरूसाठी मी व्याकूळ व्हायचो अन दात चांगले होते , तेव्हा ते कधीच मिळाले नाहीत. आता टोपलीभरून पेरू समोर असूनही खाण्यासाठी चांगले दात नाहीत. अरेरे !!

अजूनही ते पेरू फ्रीज मध्येच आहेत. त्या लाल पेरूची चव मी अजूनही चाखली नाहीये.

कारण, आता स्पर्धा लागते ती दातांमध्ये, कोणी पहिला तुकडा तोडायचा याची.

सागर
http://sagarshivade07.blogspot.in

वावरसाहित्यिकजीवनमानप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

पिंपातला उंदीर's picture

6 Mar 2013 - 10:19 am | पिंपातला उंदीर

मस्त : )

भीडस्त's picture

6 Mar 2013 - 10:28 am | भीडस्त

पेरुपुराण पुरवून पुरवून प्राशिले.

मी_देव's picture

6 Mar 2013 - 11:19 am | मी_देव

मस्तच

च्यायला आमच्या शेतात पेरूची बाग आहे
पण पेरू,चिंच,बोरे ह्या गोष्टी ढापून ,पळापळी करून,बागेच्या मालकाच्या शिव्या खावून, पुरवून पुरवून खाल्याशिवाय काय मजा नाही बुवा

सुज्ञ माणुस's picture

6 Mar 2013 - 12:27 pm | सुज्ञ माणुस

मजा आहे राव तुमची .. आम्हाला गावच नाही त्यामुळे शेती, बाग पण नाही.

आवडलं. आताशा पेरु खाणे होतंच नाही अन तो गुलाबी पेरु खाउन तर काळ लोटला.

आदूबाळ's picture

6 Mar 2013 - 11:57 am | आदूबाळ

पेरू हा देश आहे हो...

मन१'s picture

6 Mar 2013 - 12:05 pm | मन१

three stupid phases of life:-
childhood:- when you have lots of energy and time; but no money to enjoy. many of your dreams remain unfullfilled.
.
Young age/initial adulthood:- when you have lots of energy and money; but no time to enjoy. many of your dreams remain unfullfilled.
.
old age:- when you have lots of money and time; but no energy to enjoy. many of your dreams still remain unfullfilled.
.
classic tragedy of human life.
लेख आवडला.

सुज्ञ माणुस's picture

6 Mar 2013 - 12:20 pm | सुज्ञ माणुस

मनोबा,
अगदी बरोबर बोललात. हेच अभिप्रेत होते मला हे लिहिताना.
यातून सुवर्णमध्य कसा काढावा याचा विचार करतोय

निवेदिता-ताई's picture

6 Mar 2013 - 12:29 pm | निवेदिता-ताई

आता टोपलीभरून पेरू समोर असूनही खाण्यासाठी चांगले दात नाहीत. अरेरे !!>>>>>

अरेरे.......... लहानपण देगा देवा ||||||

टोपलीभर पेरु खायला चांगल्या दातांबरोबर चांगलं पोट देखील पाहिजे, नसता गहन प्रसंग ओढवेल.

स्वाती दिनेश's picture

6 Mar 2013 - 12:31 pm | स्वाती दिनेश

पेरुची गोष्ट आवडली,
स्वाती

वेल्लाभट's picture

6 Mar 2013 - 12:34 pm | वेल्लाभट

खूप सुरेख लिहिलंय!

पेरुविषयीचा नॉस्टाल्जिया - डाऊन द मेमरीलेन लिखाण- आवडलं.

पिकल्या पेरुच्या बिया दाढेत अडकण्याचा फार त्रास होतो म्हणून तसा पेरु खात नाही. कच्च्या पेरुत बियाही कच्च्या असतात म्हणून चावल्या जातात. या फळाची सीडलेस जात मिळाली तर फार बरं होईल.

पेरुत मीठ भरुन देणार्‍या काकांविषयी सहमत.. :)

या फळाची सीडलेस जात मिळाली तर फार बरं होईल.>>>> एकदम सहमत
असे झाल्यास मी पण बाल्कनीमध्ये पेरूची लागवड करू शकीन. :) तेवढीच तुळशीला कंपनी :)

५० फक्त's picture

6 Mar 2013 - 6:58 pm | ५० फक्त

किंचित असहमती,

नाही हो गवि, पेरुच्या दातात अडकलेल्या बिया, आंब्याच्या दातात अडकलेले केसरं, सत्यनारायणाच्या प्रसादाचं टाळुला लागुन राहणारं तुप / डालडा, पाणीपुरी खाताना पुरी तोंडात फुटुन लागणारा जीवघेणा ठसका, भडंग खाताना प्रत्येक शेंगादाणा खौट असेल याची भिती, या शिवाय मजा नाही ह्या गोष्टी खायला.

बॅटमॅन's picture

6 Mar 2013 - 7:00 pm | बॅटमॅन

किंचित असहमती:

ते तूप अन शेंगदाणे वगळता बाकी कायपण चालेल.

बॅटमॅन's picture

6 Mar 2013 - 12:46 pm | बॅटमॅन

अतिशय सुर्रेख!!!!!!!!!!!!!

धारवाडला मावशीकडे हे असले लाल पेरू पहिल्यांदा खाल्ले. लै लै मस्त लागले ब्वॉ!!!!! तसे आपणपण लहानपणापासून पेरूचे फ्यान हौत. अगदी ल्हानपणी तं आंबा आवडतच नसे, पेरूच चापत असू खुंदलखुंदलके.

शिलेदार's picture

6 Mar 2013 - 1:01 pm | शिलेदार

वाचताना जिभेखालून पाणी वाहू लागल बगा मस्तच लिहिलाय!!!

शिद's picture

6 Mar 2013 - 3:56 pm | शिद

घरच्या पेरुच्या झाडाची आठवण आली एकदम...आईने बहुतेक १९९० च्या दरम्यान फक्त रु.२/- ला पेरुचे छोटे रोपटे आणले होते आणि आजतागायत आम्ही जवळजवळ रु. २०००/- पेक्षा जास्त किंमतीचे पेरु तर नक्कीच खाल्ले असतिल... :)

अमोल केळकर's picture

6 Mar 2013 - 4:08 pm | अमोल केळकर

खुप मस्त लेखन :)

अमोल केळकर

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2013 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.millan.net/minimations/smileys/studsmatta.gif

लेखन खूपच आवडले. मलाही पेरू आवडतात पण बीया दातात अडकून नकोशा होतात.
दात आहेत तर चणे नाहीत असे म्हणण्याऐवजी दात आहेत तर पेरू नाहीत आणि पेरू आहेत तर रूट्क्यानाल असे म्हणावे लागेल आता. ;)

पिशी अबोली's picture

6 Mar 2013 - 8:01 pm | पिशी अबोली

मस्तच लेख.. :)
'पेराद'-पेरू चीज खाऊन बघा.. अतिशय सुंदर चव उतरते पेरुची त्यात. बिया नाहीत आणि.
पेरू म्हणजे स्वर्ग आहे. त्यात लाल पेरू तर सुंदरच..
मी जमेल तेव्हा, जमेल तसे आणि जमेल तितके पेरु खात असते.. दात आहेत तोपर्यंत सोडणार नाही.. :)

सुज्ञ माणुस's picture

7 Mar 2013 - 10:06 am | सुज्ञ माणुस

'पेराद'-पेरू... कधी ऐकले नाही. कुठे मिळतात ? याचा छडा लावलाच पाहिजे आता :)
पेरू म्हणजे स्वर्ग आहे. सहमत :)

पिशी अबोली's picture

7 Mar 2013 - 10:34 am | पिशी अबोली

'ग्वावा चीज' नावाने सर्च करा. गोवन प्रकार आहे. पेरु आवडणार्‍यांसाठी पक्वान्न.. :)

पिशी अबोली's picture

15 Mar 2013 - 7:16 pm | पिशी अबोली
सुज्ञ माणुस's picture

15 Mar 2013 - 9:26 pm | सुज्ञ माणुस

पिशी अबोली,
एक नंबर काम केले तुम्ही. आजच आई कडे डिमांड केली पाहिजे याची :)

आशु जोग's picture

6 Mar 2013 - 8:42 pm | आशु जोग

लाल पेरूवरून आठवलं,
लहानपणी बागेत लाल पेरूचीच झाडे होती.

त्यामुळे लालशिवाय पेरुला दुसरा रंग असतो ही जाणीवच नव्हती.
एकदा सुटीला आम्ही शहरात गेलो तेव्हा नातेवाईकांनी आतून पांढरे असणारे पेरू आणले होते.

पेरू पांढरे असतात हे आमच्यासाठी अगदी नवीन होते.

बाय द वे
आपला ट्रेकिंगसंबंधीचाही लेखही पाहीला. ST ची लाल जनिका.

उगाच शंका आली आपण शहरात लहानाचे मोठे झालात का ?

सुज्ञ माणुस's picture

7 Mar 2013 - 10:10 am | सुज्ञ माणुस

आशु जी,
धन्यवाद. आणि शंका कशी आली हे सांगाल का ?
पण शंका बरोबर आहे. आम्हाला गावच नाही पुण्यातच जडण घडण.
म्हणूनच २ दिवसाचे गावाचे जगणे ट्रेक करून जगतो. पण मग तिथे कुठलाही छान छौकी नाही. मिळेल तिथे राहा, मिळेल ते खा. :)

शहरी लोकांना वाटणारे अप्रूप आणि ग्रामीण लोकांचे अप्रूप वेगळे

मराठे's picture

6 Mar 2013 - 9:43 pm | मराठे

पेरूपुराण आवडलं.
बाय-द-वे, एअरपोर्टवर पेरू घेऊन जाऊ न देण्यावरून एक किस्सा आठवला. माझ्या एका मित्राला असाच एअरपोर्टवर अडवला होता. तो अर्धा डझन आंबे घेऊन चालला होता. प्रथमच जात असल्यामुळे फळं घेऊन जाता येत नाहीत हे त्याला माहितच नव्हतं. अधिकार्‍याने आंबे टाकून द्यायला सांगितलं. ह्याने बराच वेळ त्याच्याशी हुज्जत घातली आणि तो बधत नाही म्हटल्यावर ह्या माणसाने एका बाजूला उभं राहून सगळे अर्धा डझन तिथल्या तिथे आंबे खाऊन संपवले!

अर्धा डझन आंबे तिथल्या तिथे खाऊन संपवले !! :) मस्त
बरीच प्रगती केली असेल त्या माणसाने. :)
काहीबाही मस्त :)

ह्या माणसाने एका बाजूला उभं राहून सगळे अर्धा डझन तिथल्या तिथे आंबे खाऊन संपवले!

विमानाच्या मोरीचं काय झालं असेल...!

अर्धाच डझन होते म्हणून ठीके!

मजेशीर दिसला असणार हा मित्र.. अर्धा डझन आंबे एअरपोर्टवर उभा राहून खाताना. या बाजूला आंबे, नि त्या बाजूला कोयी नि सालं :D

पेरुमय लेख आवडला. :) कधी काळी मी माझ्या हाताने पेरु तोडले होते ते दिवस आठवले ! अगदी कच्चा पेरु खाताना सुद्धा फार आनंद वाटायचा !पेरु सरबत सुद्धा लयं झ्याक लागते बघा. :) बहुतेक महाबळेश्वरला पेरु सरबताच्या बाटल्या मिळतात.(बहुतेक मॅप्रोवाले बनवतात.)आता पेरु रसाचे रिअल ज्युसचे छोटे पाउच सुद्धा मिळतात.

(चोरुन कैर्‍या तोडणारा):)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Mar 2013 - 10:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकेकाळी ठाण्यात पेरूचं आईस्क्रीमही खायचे चिक्कार.
परदेशात पेरू मिळालेले पाहून मी पण आनंदाने उडी मारली होती. आणि रूट कॅनल वगैरे शब्द वाचून आधी जाऊन दात फ्लॉस करून आले. असल्या गोष्टींसाठी वाट्टेल तो 'त्याग' करायची तयारी आहे.

चौकटराजा's picture

8 Mar 2013 - 9:17 am | चौकटराजा

एस टी बस हा विषय काय आता पेरू हा विषय काय यातून आयुष्यावर बोलू काही या धाटणीचे लेखन करायचे ही मिपावर
खासीयत यापूर्वी आलेली आहेच तिचे पुनरुज्जेवन होतेयसे वाटतेय. वा वा ! बाकी गुलाबी पेरूचे सोडा साधा पेरू देखील दहावर्षा नंतर बाजारात पहायला मिळेल काय अशी शंका वाटू लागलीय.लहान लहान विषयातून आस्वादाचा व चिंतनाचा वेध
घेणे म्हणजेच रोमँटिक असणे.

सुज्ञ माणुस's picture

8 Mar 2013 - 9:32 am | सुज्ञ माणुस

चौकट राजा,
प्रतिसाद आवडला. माझ्या भटकंतीचे अनुभव व्यतीत करण्यासाठी ब्लोग सुरु केला पण हे विषय दिवसापासून मनात घोळत होते. भटकंती राहिली बाजूला आता ललित लेखनाचा आस्वाद घेतोय.
लहान लहान विषयातून आस्वादाचा व चिंतनाचा वेध घेणे म्हणजेच रोमँटिक असणे…. >>>> सहमत

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Mar 2013 - 9:35 am | श्री गावसेना प्रमुख

दहा काय वीस वर्षांनंतर कळवा, पेरु ची टोपली पाठवतो असाल तिथे

सुज्ञ माणुस's picture

8 Mar 2013 - 3:50 pm | सुज्ञ माणुस

पेरूची टोपली पाठवून काय उपयोग ?? पेरू पाठवा. मुलांना देईल खायला :)

आशु जोग's picture

8 Mar 2013 - 7:44 pm | आशु जोग

सुज्ञ
जमल्यास
हे पहा

सोत्रि's picture

8 Mar 2013 - 8:19 pm | सोत्रि

खुप छान, लेखन आवडले!

- (पेरु न आवडणारा) सोकाजी

स्पंदना's picture

12 Mar 2013 - 6:54 am | स्पंदना

पेरु अतिशय आवडता! त्याच्या वासाने जे पाणी सुटत तोंडाला ते दुसर्‍या कोणत्याही फळाच्या वासाने नाही सुटत.

लेखन आवडले.

किसन शिंदे's picture

15 Mar 2013 - 7:25 am | किसन शिंदे

सुंदर लेखन!

पेरू खायचं टाळतो सहसा त्याचं कारण दातात अडकणार्‍या त्या बिया. त्रास होतो नुसता नंतर अडकलेल्या त्या बिया काढताना.

आमच्या घरी बरीच पेरूची झाडे आहेत. आम्ही लहानपणी पेरू काढून ते वडापाव वाल्याकडे विकायला देत असू, त्यातून जे पैसे मिळ्तील त्याचा दुसरा खाऊ घेत असू. डिसेंबरमध्ये ठाण्याला माझ्या आतेबहिणीच्या साठीशांतीला साठ पेरू दिले होते. सर्व नातेवाईक तुटून पडले त्या पेरूंवर!! तुमचे पेरूप्रेम वाचून हे सर्व आठवले!!

सुज्ञ माणुस's picture

15 Mar 2013 - 9:21 pm | सुज्ञ माणुस

साठीशांतीला साठ पेरू दिले होते.
मजा आहे …. मी यायला हव होत साठीशांतीला :)
असो, पुढे कधी असा प्रसंग आला तर सांगायला विसरू नका. :)

श्री गावसेना प्रमुख's picture

16 Mar 2013 - 12:40 pm | श्री गावसेना प्रमुख

त्यांची आतेबहीण एकदाच साठ वर्षाची झालेली असणार ना ,पेरु साठी तुम्ही डबल साठी नाठी करताय का?

पैसा's picture

15 Mar 2013 - 9:35 pm | पैसा

मी पेरूच काय, कैर्‍या, चिंचा, करवंदे, तोरणे असली रानटी फळे सुद्धा अजून आवडीने खाऊ शकते. नशीब आहे म्हणून कधीतरी मिळतात आणि दातांचे रूट कॅनॉल असले तरी पर्वा करत नाही!

पिशी अबोली's picture

15 Mar 2013 - 11:21 pm | पिशी अबोली

नशीब आहे म्हणून कधीतरी मिळतात

+१०००००००
मी एकेका रानटी फळासाठी जीव टाकत असते..आणि त्या त्या सीझनला ती ती फळं खाल्ली नाहीत की कसंनुसं होतं अगदी..

सुज्ञ माणुस's picture

16 Mar 2013 - 8:10 pm | सुज्ञ माणुस

नशीब आहे म्हणून कधीतरी मिळतात
बरोबर आहे !
यावरून तुंग चा ट्रेक आठवला मला. असलेली बस सोडून आम्ही हौसेने चालत जात गेलो होतो ५ किमी.
पावसाळ्यात जाताना, पूर्ण रस्त्याच्या आजूबाजूला जांभूळ, करवंदाची झाडे.
ट्रेक राहिला बाजूला, २ तास आम्ही तिथेच होतो झाडावरून जांभळे, करवंदे तोडत.
आजपर्यंत खाल्ली नसतील तेवढी जांभळे मी त्या दिवशी खाल्ली. जवळ जवळ २ किलो करवंदे मी घरी आणली होती.
नशीबच !!