खुणावणारे ते यश शेवटी मृगजळच ठरले

अमितसांगली's picture
अमितसांगली in जनातलं, मनातलं
23 Dec 2012 - 12:24 pm

कडाक्याच्या थंडीतही सत्तर वर्षाची, अंगावर सुरकुत्या पडलेली आजी मंदिराच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करीत होती. गेल्या अनेक वर्षापासून ती नियमितपणे मंदिरात येत होती पण आज मात्र काठी सावरताना तिचे हात थरथरत होते, पायात एक विलक्षण असा शिणवटा आला होता. 'जन्म हि निसर्गाने दिलेली देणगी आहे. आयुष्याचे इप्सित ध्येय साध्य झाले कि त्या दिवसाची आठवण म्हणून वाढदिवस साजरा करावा' अशी तिची ठाम समजूत होती. ती आपल्या यशोशिखराच्या अगदी पायथ्याशी उभी होती व ईश्वराने साथ दिलीच तर आज ती आपला पहिला वाढदिवस साजरा करणार होती. त्यामुळेच ती खूप उत्साही होती, तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.

गेल्या पन्नास वर्षात, जवळपास सतरा न्यायाधीश, बत्तीस सरकारी वकील, अनेक शिरस्तेदार तिच्या आयुष्यात आले होते. काही साक्षीदार इहीलोकी गेले होते तर बरेचसे तिची साथ सोडून माघारी फिरले होते. ती मात्र अजिबात डगमगली नव्हती. रणांगणात ठाण मांडून राहिलेल्या निश्चयी व अविचल योध्याप्रमाणे काळाला कवेत घेण्याचा प्रयत्न करीत होती, अबला म्हणून पडणारी समाजाची विषारी नजर पचवीत होती.

सोळाव्या वर्षीच प्रणयाने उमलणारी ती कळी उमलण्याआधीच नराधमांनी खुरडलेली, वासनेच्या आगीचा शिकार बनलेली. तेव्हापासून आजपर्यंत त्या भळभळत्या जखमा अंगावर घेऊन, अनेक प्रसंगातून तावून-सुलाखून निघून, जीवन नावाच्या अजस्त्र संघर्षाशी दोन हात करत ती न्यायदेवतेला साकडे घालत होती. तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर अनेकांनी कोरडी सहानुभूती दाखविली, नराधमांना शिक्षा देण्यासाठी आंदोलने झाली पण काळचक्रात सर्व काही शांत झाले आणि या वादळाबरोबर ती एकटीच मार्गक्रमण करू लागली.

निकाल ऐकण्यासाठी ती मंदिराच्या गाभाऱ्यात आली व पंचप्राण एकवटून निकाल ऐकू लागली. गेली अनेक वर्षे काळाला जे जमले नाही ते काम मात्र या निकालाने केले. निकाल ऐकताक्षणी ती कोसळली ते मात्र कायमचीच. पुराव्याअभावी अनेकजण निर्दोष सुटले आणि ज्यांना शिक्षा झाली होती ते आधीच मेले होते.

दुर्दैवाने आजीबाईना खुणावणारे ते यश शेवटी मृगजळच ठरले.

अवांतर:

बलात्काराच्या अपवादात्मक किंवा दुर्मिळात दुर्मिळ स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये (रेअरेस्ट रेअर केस) फाशीची शिक्षा देण्यासाठी कायद्यात बदल करण्याची सरकारने तयारी दर्शविली आहे. पण यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची गरज नाही, असेही सरकारने स्पष्ट केले. सोनिया गांधी, शीला दीक्षित, सुषमा स्वराज, ममता, मायावती, जयललिता व मीराकुमारी यांची सरकावर पकड असूनही जर याबाबत कडक कायदा होत नसेल तर हे भारताचे दुर्दैव आहे.

जनलोकपाल विधेयकाप्रमाणे किमान याबाबत तरी सरकारने जनतेची दिशाभूल करू नये व बलात्कारासाठी फाशीच्याच शिक्षेची तरतूद करावी एवढीच अपेक्षा.

धोरणसंस्कृतीकथासमाजजीवनमानविचारप्रतिसादप्रतिक्रियामत

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

23 Dec 2012 - 12:39 pm | स्पंदना

नक्की कुणाबद्दल लिहिल आहे त्याचा संद्र्भ नाही लागला. पण कायद्यान निकाल लागायला खरच एव्हढा वेळ लागतो याची जाणिव झाली. बाकिची चर्चा करायच खरच आता बळ नाही उरल.

रमताराम's picture

23 Dec 2012 - 2:44 pm | रमताराम

"न्याय बलात्काराचा " "
एका ७० वर्ष्याच्या आजीला
कोर्टाच्या पायरीवर उभी असलेंली बघून
मी तिला विचारलं,
आजी तुम्ही इथे कश्या ?
आजी मला म्हणाली,
बाबा सतराव्या (१७) वर्षी
माझ्यावर बलात्कार झाला होता
आज त्याचा निकाल आहे ...................

३२ न्यायदिश , २० वकिल
४० शीरसतेदर बदलून गेले
निम्मे आरोपी मरून गेले
बाकीचे केव्हांचे पळून गेले
तरीही मी जिवंत आहे
हीच एक कमाल आहे
सतराव्या (१७) वर्षी झालेल्या बलात्काराचा
आज निकाल आहे .............................................

भगवान के घर में देंर हें ,
हि म्हण जराही बदली नाही
न्यायदेवतेची पट्टी जरासुद्धा सरकली नाही
आंदोलने तेंव्हाहि झाली
नंतर कुणी फिरकल नाही
तरीही वाटतं, जीवनाची आज सकाळ आहे
सतराव्या (१७) वर्षी झालेल्या
बलात्काराचा आज निकाल आहे ............................

थरथरत्या हाताला धरून .............आजीला उभं केलं
निकाल ऐकण्यासाठी चार भिंतीच्या आत नेलं
निकाल ऐकून आजीचे पाय लटपटू लागेंले
पुराव्याअभावी निम्मे आरोपी निर्दोष सुटले
ज्यांना शिक्षा झाली, ते तर कधीच मरून गेले ................

" ७० वर्ष्याच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे
सतराव्या (१७) वर्षी झालेल्या बलात्कारावर
न्यायालयाचा हा अजून एक बलात्कार आहे ........... "

ही कविता मी प्रथम 'रामदास फुटाणे' यांच्या 'भारत कधी कधी माझा देश आहे' या ध्वनिफीतीमध्ये ऐकली होती. फेसबुकवर याचे 'प्रकाश पाठारे' असे लिहिले आहे. खरेखोटे ते दोघे जाणोत. पण एक नक्की.

आणि आरोपींना शिक्षा होणे म्हणजे 'यश'???? अवघड आहे.

रमताराम's picture

23 Dec 2012 - 10:56 pm | रमताराम

"फेसबुकवर याचे कवी 'प्रकाश पाठारे' असे लिहिले आहे. खरेखोटे ते दोघे जाणोत." असे वाचावे.

अहो एका कायद्यात बदल करायची मागणी जोरात करताना कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन चालत असावे ;)

जोयबोय's picture

24 Dec 2012 - 10:12 am | जोयबोय

उशीरा दिलेला न्याय म्हणजे न्याय नाकारने असे समजले जाते.
कोर्टात केस दाखल होते पण गुन्हा सिद्ध होउन न्याय मिळण्यचे प्रमाण अत्यंत कमि आहे