तुम्ही हल्ली भलतंच काही करत आहात ?
असाल, तर हा धागा खास तुमच्यासाठी आहे.
मित्रांनो, आपण मिपाकर म्हणजे छांदिष्टांची मांदियाळी - आपण काय काय करत नाही? कशानंतरी भारून जाऊन, रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी नवीन, वेगळंच, भलतंच - असं काहीतरी करण्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच नाद असावा. खाजच म्हणा हवंतर.
तर सध्या तुम्ही असं भलतंच काय करत आहात ? ते लिहिण्यासाठी हा धागा.
सुरुवात स्वत:पासून करतो:
---------------------------------------------------------------------------------------------------------------
सध्या मी 'उदरनृत्य' अर्थात 'बेलीडान्स' शिकण्याच्या खटाटोपात आहे. वयाच्या बासष्ठाव्या वर्षी.
हे काय भलतंच? ... या वयात हे असले कसले नाद?... हुच्च की काय हा चित्रगुप्त?..... असे प्रतिसाद आम्हाला आत्ताच दिसू लागलेत..
तरीही सांगतोच.
भगवान पतंजलिंपासून रानिया पर्यंतच्या आमच्या अनेकानेक गुरुंपैकी एकाचा, मुन्नाभाईचा: "देख मामू, दुनिया तेजीसे बदल रहेली है, उसके साथ अपुनकोभी बदलनाईच पडता है, वर्ना अपुनकी खैर नही ... समझा क्या?"... हा हितोपदेश ऐकून मी विचारले, "वो तो ठीक है भाई, लेकिन फिर हमारे "दंड खोकेपे हाथ रखके" का और सुरैय्या, मुकेश, मुबारक बेगम, शम्मी, मधुबाला, ओपी नैय्यर साहब, वगैरा का क्या होगा?"
"अरे सिम्पल है, वो सब अपने साथ ले जानेका, लेकीन अपुन एक जगे रुकनेका नही."
हे मात्र मला पटले, आणि मी .....
पण थांबा, तुम्हाला सर्व सुरुवातीपासूनच सांगतो.....
--------------------------------------
मी चार-पाच वर्षांचा होतो, तेंव्हा एकोणीस-वीसच्या असणाऱ्या माझ्या मोठ्या भावाला व्यायामाचा नाद लागला. प्रत्येक गोष्ट अगदी पद्धतशीरपणे करण्याच्या सवयीप्रमाणे त्याने विविध व्यायामांचे, आसनांचे वगैरे चार्ट बनवून भिंतीवर लावले, आणि जोरात व्यायामाला सुरुवात केली. त्यातले दोन मजेशीर चार्ट अजून आठवतात: "दं.खो.हा.ठे." आणि "दं.खो.पा.ठे." म्हणजे "दंड खोक्यावर हात ठेउन" आणि "दंड खोक्यावर पाय ठेउन". मला तेंव्हा उचलताही न येणारी अवजड मुदगले तो लीलया फिरवायचा. मी अवाक होऊन ते सर्व बघत रहायचो. कालांतराने मलाही व्यायामाचा नाद लागला, आणि सूर्यनमस्कार, मुद्गल फिरवणे, जोर-बैठका, डबलबार, वगैरे प्रकार करू लागलो. 'आसन-पंचदशी' तून योगासने शिकणे, लायब्ररीतून 'व्यायाम- ज्ञानकोश' चे खंड आणून अन्य व्यायाम शिकणे, खूप सायकलिंग आणि डोंगर-दर्यातील भटकंती, यातून भरपूर व्यायाम व्हायचा.
पुढे दिल्लीत आल्यावर देखील सकाळी व्यायाम आणि दोन तास पेंटिंग करून मग सायकलने म्युझियमच्या नोकरीवर जायचो, सायंकाळी लोदी गार्डन मध्ये भटकंती, रविवारी सायकलने दूर दूर जाणे, असे चालायाचे. पुढे अमेरिकन एम्बसीच्या नोकरीत रुजू झाल्यावर सायकल जाऊन द्विचाकी, चौचाकी अश्या गाडयांमधून आवागमन सुरु झाले, काहीसा सुखासीन जीवनक्रम सुरु झाला, पोट आणि वजन वाढू लागले, व्यायाम कमी झाला. पूर्वी जेंव्हा पैशांची कडकी होती, तेंव्हा शरीर ठणठणीत होते, सुखवस्तूपणाचा परिणाम उलटाच होऊ लागला. हे बरे नव्हे, हे कळत होते, पण वळत नव्हते....
त्यातच एक दिवस तिकडे अमेरिकेत काहीतरी चक्रे फिरली, आणि 'आर्ट्स अमेरिका' हा विभाग बंद झाला. अमेरिकन आणि ब्रिटीश लायब्ररीतून चित्रकला, वास्तुकला, काव्य, नृत्य, इ. वरील पुस्तके कमी होऊन कॉम्प्युटर आणि बिझनेस मॅनेजमेंटच्या पुस्तकांची लाट आली. लायब्ररीत येणारे वयस्क, अभ्यासू लोक हळू हळू कमी होत जाउन त्यांची जागा जीन्स-टी शर्टातल्या तरूणाईने घेतली. ऑफिसातले माझे प्रशस्त केबिन जाऊन 'क्युबिकल' मध्ये बसावे लागले...
... लवकरच फोटोग्राफी, कला, प्रदर्शन इ. विभाग बंद झाले. जगभरातील अमेरिकन सरकारच्या नोकरीतील बरेचसे कलावंत, लेखक, कवी वगैरेंच्या नोकरयांवर गदा आली, त्यात मीही होतो....
... आता दिवसभर घरीच असल्याने खरेतर व्यायामासाठी भरपूर वेळ होता, पण सवय मोडलेली होती. काही न करताही सतत थकवा वाटायचा. आपल्याला 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' हा विकार जडला आहे, असे वाटू लागले. यावर भरपूर व्यायाम हाच खरा उपाय, पण माझ्यात आता त्यासाठी उत्साहाच उरला नव्हता. दरवर्षी एक जानेवारीला आता यावर्षी अमुक किलो वजन कमी करायचेच, असा नुसता निश्चयच होत होता. 'माझा साक्षात्कारी ह्रदयरोग' वाचून कोलेस्ट्रॉल, एलडीएच, ट्रेडमिल-टेस्ट वगैरे नवीन माहिती मिळाली. कधीही कोणतीही टेस्ट करून घेतलेली नव्हती, ती आता केल्यावर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असल्याचे समजले...
एका मित्राशी केलेल्या दीर्घ चर्चेतून 'महत्वाकांक्षा' या व्याधीतून स्वत:ला मुक्त करणे तातडीचे आहे, हे हळूहळू स्पष्ट झाले, आणि खरोखरच त्याची प्रचीती आली. महत्वाकांक्षा-मुक्त अवस्था जवळजवळ गाठता आल्यावर जीवनातला आनंद, उत्साह, समाधान पुन्हा गवसले ...
आणखी एका मित्राचे वजन हळूहळू वाढत एकशे पंधरा किलो झाले होते, ते त्याने चार वर्षात चिकाटीने व्यायाम करून सत्तरवर आणल्याचे उदाहरण बघून पुन्हा व्यायामाचा प्रयत्न सुरु केला, परंतु पूर्वी सहज जमणारी आसने, जोर-बैठका, सूर्यनमस्कार आता जमत नव्हते, त्यामुळे हिरमोड व्हायचा. पायी चालण्याची प्रचंड आवड, पण प्रदूषण, धूळ, गोंगाट, उकाडा, घाणेरडे रस्ते, गर्दी वगैरेत चालणे नकोसे वाटायचे. रामदेव बाबाचे कार्यक्रम बघून प्राणायाम सुरु केला, आणि कधीमधी ओशो प्रणीत 'सक्रीय ध्यान' केले, तर दिवस भर खूप ताजेतवाने वाटायचे.
पुढे मुले मोठी होऊन परदेशी गेल्यावर तिकडल्या वार्या होऊ लागल्या.पॅरीस मधील मोठमोठी जंगल-सदृष्य उद्याने, झाडे आणि हिरवळ, म्युझियम्स मधील कलाकृती वगैरे बघून मनाला टवटवी आली, पायी भटकंती पुन्हा सुरु झाली. तीन महिन्यापूर्वी अमेरिकेत आल्यावर सुंदर 'मोहाक' नदीकाठी तासनतास फिरायला जाऊ लागलो.
अलिकडे थंडी सुरु झाल्याने बाहेर फिरणे कठीण झाले, आता काय करावे ? मुलगा म्हणाला, जिम मध्ये जाउन तिथे ट्रेडमिलवर चालूया. परंतु यापूर्वी भारतात बघितलेल्या जिम मधील कोंदट वातावरण आणि भयंकर कानफाडू 'संगीत' यामुळे 'जिम' या प्रकाराविषयी माझे फारसे चांगले मत नव्हते. आणि त्या कृत्रिम पट्ट्यावर चालणे तर मला हास्यास्पदच वाटत होते.
काय करावे, असा प्रश्न पडला, की माझ्या अनेक गुरुंपैकी कुणाचा तरी मी धावा करतो. तर यावेळी मुन्नाभाईने दिलेला सल्ला .... "देख मामू, दुनिया तेजीसे बदल रहेली है, ...वगैरे... ऐकून मात्र मी जिम मध्ये जायला तयार झालो. मला वाटत होते, इथे अमेरिकेतले जिमवाले नक्कीच मोझार्ट वगैरे वाजवत असतील ... पण कसले काय, तिथेही तसलाच गोंगाट....
मग मी म्हणालो, आपण घरीच बनवूया जिम. आपण वाजवूया मोझार्ट, मुकेश, ओपी नय्यर आपल्या जिम मध्ये. मग काय, लगेच ट्रेडमिल आणि डंबेल्स घेऊन आलो. ट्रेडमिलचे अवजड धूड घरात चढवताना दमछाक झाली, पण उत्सुकतेने सर्व जुळवाजुळव केली, आणि बूटबीट घालून त्यावर स्वार झालो.
मला वाटले होते, दीड-दोन तास आपण नदीकाठी चालतो, तसेच या पट्टयावरही चालू, त्यात काय विशेष? पण अवघ्या दहा मिनिटात दमछाक झाली, भोवळ येऊन मी लवंडलोच... पण दुसर्या दिवशी पंधरा मिनिटे, तिसर्या दिवशी वीस, असे करत आठवड्याभरात पाउणेक तास चालू लागलो... (यावरून कधी सवय नसलेला माणूस ट्रेडमिलवर दहा मिनिटे चालण्याने थकतो, आणि त्याला लगेच अॅडमिट व्हायला, अँजियोग्राफी वगैरे करायला सांगितले जाते, यातील मर्मही उलगडले)...
पण घरातल्या घरात, एकाच जागी चालणे तसे कंटाळवाणेच. यावर उपाय म्हणून चालताना जुनी आवडती गाणी ऐकणे-बघणे सुरु केले. ताशी अमुक मैल गतिसाठी अमकी गाणी, अशी अनेक कमी-जास्त गतीची गाणी निवडली. शरीराला एकाच प्रकारच्या व्यायामाची सवय लावली, तर तो व्यायाम हळूहळू प्रभावहीन होतो, म्हणून चालण्याची गती बदलत रहाण्याच्या दृष्टीनेही हे चांगलेच.
मग एक दिवस वाटले, आपल्याला व्यायामातही कशाला हवी ही नाच-गाण्यांची करमणूक? मग काही काळ ते बंद करून श्वासाकडे लक्ष देत चालू लागलो. नंतर 'पातंजल योग-सूत्रे ' मुखोद्गत करण्याचा क्रम सुरु केला.
... आणि काय आश्चर्य, ट्रेडमिलवर चालण्याने अल्पावधीत पोट कमी होऊ लागले, जोम आणि शक्ती वाढू लागली... मुन्नाभाईचा सल्ला बरोबरच होता म्हणायचा....
पण ते 'उदरनृत्या' विषयी तर राहिलेच सांगायचे...
सुरैय्याचे 'ये कैसी अजब दास्तां हो गयी है' हे माझे आवडते गाणे. तिची आणखी गाणी युट्यूबवर हुडकताना अचानक कुण्या 'सुराया' चा बेलीडान्स नजरेस पडला. हा प्रकार बरा वाटल्याने शोध घेता अनेक उत्तमोत्तम बेलीडान्स सापडले. या नर्तकींची कमालीची लवचिक, चपळ सडसडीत शरीरे बघून वाटू लागले की आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपल्याला काही नर्तक व्हायचे नाही पण शरीर चपळ झाले तर हवेच आहे. शोध घेता 'रानिया' आणि अन्य काही नर्तकींचे या नृत्याचे सुरुवातीपासून पद्धतशीर शिक्षण देणारे व्हिडियो सापडले, आणि त्यावरून जमेल तसे शिकणे सुरु झाले....
... तर लहानपणी सुरु झालेली माझी व्यायाम- यात्रा अनेक वळणे घेत सध्या ट्रेडमिल-डंबेल्स-बेलीडान्सच्या स्वरूपात चालू आहे. पोट कमी होणे आणि चपळता, उत्साह, जोम वाढणे सुरु झालेले आहे... आता हळूहळू आसने, सूर्यनमस्कार, मुद्गल, जोर-बैठका वगैरेंवर पण यायचे आहे ...
... गेल्यावर्षी पुण्याला भावाकडे (आता वय शहात्तर) गेलेलो असता गराजमध्ये धुळीने माखलेली, आम्ही कधीकाळी फिरवत असलेली शिसवी मुदगल-जोडी, चाळीस वर्षांनंतर अचानक पुन्हा बघून गलबलून गेलो होतो... ती जणू म्हणत होती, असा कसा रे विसरलास आम्हाला?...
आता मात्र मी ती नक्की घेऊन येणार, आणि पुन्हा फिरवू लागणार... अगदी पूर्वीप्रमाणेच, रोज दीडशे वेळा. अगदी नक्की.
आणि ते सुंदर बेलिडान्सचे व्हिडियो यापुढील धाग्यात.
-----------------------------------------------
मित्रहो, हा झाला माझा हुच्चपणा. तुम्हीपण हल्ली वा पूर्वी केलेल्या काहीतरी वेगळ्याच खटाटोपाची गंमत कळूद्या ना सर्वांना.
प्रतिक्रिया
13 Nov 2012 - 2:13 am | किसन शिंदे
छान लेखन!
सध्या बरेचशे उद्योग करायचं मनात आहे पण रोजच्या रहाटग्यातून वेळ मिळेल तेव्हा ना.
13 Nov 2012 - 4:12 am | अगोचर
घरी एलिप्तीकल, दम्बेल, वजने वगैरे आणून ठेवली आहेत. वजनही शंभरी पलीकडे गेले आहे. फक्त बेली डान्स शोधणे बाकी आहे !
बघू आता. ह्या धाग्यावरून प्रेरणा घेऊन काही घडते का ते.
13 Nov 2012 - 4:45 am | पहाटवारा
"
एका मित्राशी केलेल्या दीर्घ चर्चेतून 'महत्वाकांक्षा' या व्याधीतून स्वत:ला मुक्त करणे तातडीचे आहे, हे हळूहळू स्पष्ट झाले, आणि खरोखरच त्याची प्रचीती आली. महत्वाकांक्षा-मुक्त अवस्था जवळजवळ गाठता आल्यावर जीवनातला आनंद, उत्साह, समाधान पुन्हा गवसले ...
"
बोलता बोलता काय एकदम गुपीत सांगून टाकलेय बॉस !
साला आमचे घोडे अजून या म्.का.च्या पेंडिभोवतीच घुटमळते आहे .. ना मन कि शांती ना निर्मल आनंद !
एकदा ते जमले कि बरेच काहि जमेल .. तोवर .. वाचतोय ..
-पहाटवारा
13 Nov 2012 - 5:18 am | चौकटराजा
ये कैसी अजब दास्तां हो गयी
छुपाते छुपाते बयां होग गयी
मी सध्या रोज " खयालोमे " युरोपचा दौरा करीत असतो. ( प्रत्यक्ष योग कधी येणार ? ) .आता म्हणाल तर मी रोम पाहून रात्रीच्या गाडीने मिलान ला जात आहे. सकाळी साठ साडेसाठ ला पोहोचेन मग चार तास तरी मिलन चर्च साठी द्यावयास हवेत. मग कलोन गाठणार ! ( काय आहे की नाही "गॉन केस ?)
13 Nov 2012 - 9:11 am | श्री गावसेना प्रमुख
महत्वाकांक्षा' या व्याधीतून स्वत:ला मुक्त करणे तातडीचे आहे
सध्या मी 'उदरनृत्य' अर्थात 'बेलीडान्स' शिकण्याच्या खटाटोपात आहे. वयाच्या बासष्ठाव्या वर्षी.
वैयक्तीक महत्वाकांक्षाअसेल
जिंदगी कैसी ये पहेली हाय ,
कभी तो हसाये,कभी ये रुलाये.
(अंहकारापासुन मुक्ती मिळवा सुखी व्हा)
13 Nov 2012 - 9:53 am | मदनबाण
ह्म्म...
सध्या मी देखील वजन उचलण्याच्या भानगडीत पडलो आहे, म्हणजे अधुन मधुन मला तशी लहर येत असते...तशी ती लहर सध्या आलेली असल्याने एक रॉड आणि सहा प्लेट्स उचलण्याचा उध्योग सध्या करतोय.हा उत्साह अजुन किती दिवस टिकेल ते मला काही माहित नाही. पण जेव्हा केव्हा माझ्या पोटाच्या तंबोर्याकडे माझे लक्ष जाते तेव्हा फार फार काळजी वाट्टे आणि परत वजन उचलण्याची लहर येते. ;)
आपण वाजवूया मोझार्ट, मुकेश, ओपी नय्यर आपल्या जिम मध्ये.
मोझार्ट चे नाव वाचताच मला Ludwig van Beethoven यांचे "Für Elise" ("For Elise") चे स्वर कानात वाजु लागले. :) तुम्ही सुद्धा ते ऐका...
तिची आणखी गाणी युट्यूबवर हुडकताना अचानक कुण्या 'सुराया' चा बेलीडान्स नजरेस पडला. हा प्रकार बरा वाटल्याने शोध घेता अनेक उत्तमोत्तम बेलीडान्स सापडले. या नर्तकींची कमालीची लवचिक, चपळ सडसडीत शरीरे बघून वाटू लागले की आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपल्याला काही नर्तक व्हायचे नाही पण शरीर चपळ झाले तर हवेच आहे.
हा.हा.हा.... सुराया ? तुम्ही अजुन Sadie च्या नाच पाहिलेला दिसत नाहीये ! मी जितकेपण बेली डान्स पाहिले आहेत त्यात हिचा नंबर १ला लागतो... आज पर्यंत हिच्या सारखी बेली डान्सर माझ्या पाहण्यात आलेली नाही.
आता हिचा व्हिडीयो मी इथे देतो आहे तो २ कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ;) पोटाचा व्यायाम करणार्यांनी तर जरुर पहावा असा हा व्हिडीयो आहे. ;)
आणि ते सुंदर बेलिडान्सचे व्हिडियो यापुढील धाग्यात.
वाट पाहतो... :)
{नॄत्य प्रेमी) ;)
13 Nov 2012 - 2:50 pm | चित्रगुप्त
आपल्या सुरैय्या ची गाणी हुडकताना अचानक सुरायाचे नृत्य यूट्यूब वर दिसले, आणि बेलीडान्स चा सिलसिला सुरु झाला.
बघता बघता सॅडी, मोरान, रानिया, यास्मिन, दारिया, दिदेम, लैला, अलिशिया,इझिदा, नादिया, शेर-सांडा(बापरे!) निली वगैरे वगैरे अनेक नर्तकींची नृत्ये डाउनलोड केली. कुणा-कुणाची देउ, म्हणून या धाग्यात एकही घातले नाही. तुम्ही दिलेले सॅडीचे नृत्य पहिल्याच दिवशी सापडले होते, उत्कॄष्टच आहे तिचे नृत्य. आपल्या हिंदी, तमिळ वगैरे सिनेमातही फार वर्षांपासून या नृत्याचा अविष्कार बघायला मिळतो, तो एक वेगळाच संशेधनाचा विषय होईल.
बेलिडान्स मधे इजिप्शियन, तुर्की, ग्रीक, गोथिक, ट्रायबल वगैरे प्रकार आहेत म्हणे. कुणी यावर प्रकाश टाकेल का?
बीथोवेन वरील एक सिनेमा नुक्ताच बघितला, एकदा तरी बघण्याजोगा आहेचः
13 Nov 2012 - 10:22 am | भडकमकर मास्तर
मस्त लेख..
उदर नृत्याचा जाहीर कार्यक्रम कधी करताय ? :)
13 Nov 2012 - 11:06 am | संजय क्षीरसागर
दिवाळी सकाळ झकास झाली
13 Nov 2012 - 1:15 pm | श्रावण मोडक
लेख आवडला.
:-)
13 Nov 2012 - 3:02 pm | अभ्या..
>>>>हल्ली तुम्ही भलतंच काही करत आहात का ?<<<<
अगदी खरे म्हणजे, हो सध्या मी प्रेमात पडलोय ;)
13 Nov 2012 - 4:24 pm | चौकटराजा
प्रेमात पडला म्हण्जी कयाच्या ?
लेअरच्या की ओपॅसिटीच्या ? पॅटर्नच्या की ब्रशच्या ? इरेझरच्या की
स्मजच्या ? सिलेक्टच्या की इनव्हर्सच्या ?
कारण प्रेमात कधी ओपेक व्हायचे व कधी ट्रान्स्परंट याचे सावध जजमेट लागते.
लग्न झाले नसेल तर प्रेम इरेज करता येते पण सही झाली असेल तर स्मजवरच
भागवून घ्यावे लागते.
मेहुणीवर प्रेम जडले असेल तर बायको व मेहुणी यात सिले़क्ट व इन्वर्स याचा
समतोल राखावा.
काहीही असा अनुभव नसलेल्या चोराचा ( चौराचा) आगाउपणे , चावटपणे दिलेला सल्ल्ला )
14 Nov 2012 - 5:38 pm | अभ्या..
राजासाब, प्रेमात इमेज एकदम पीएनजी फोरमॅट आहे चांगल्या रिझोल्युशनची. बॅकग्राऊंड ट्रान्स्परंट. :)
कुठे पण ओपन करा. वेबला नाय तर प्रिंटला. फरक नाही. :)
आता बघु जजमेंट कसे बसतेय ते. ;) फाईल करप्टली नाही म्हणजे बास.
आणि न्यू फाईल, न्यू वर्कस्पेस आहे. डिफॉल्टवर आहेत सगळे टूल्स.
तरी व्यावसायिक कौन्सेलिंग साठी लै लै धन्यवाद.
अवांतर: ते मेहुणीचे सिलेक्शन पाथ मध्ये सेव्ह करून ठेवावे म्हणतो. ;)
13 Nov 2012 - 6:03 pm | चित्रगुप्त
अनुभव नाही असं कसं म्हणता चौरा? कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...
झाडावर-ढगावर, चित्रावर-गाण्यावर, प्रेम मात्र सेम असतं..
प्रेमात 'पडणं' का म्हणतात, मला काही कळत नाही,
खड्ड्यात पडणं, लफड्यात पडणं यासारखं ते नाही...
झोपेतून उठल्यावर, आजारातून उठल्यावर
येणारी टवटवी प्रेमात असता वाटते
म्हणून प्रेमात उठलो असे म्हणणे
मला जास्त बरोबर वाटते.
13 Nov 2012 - 7:52 pm | पैसा
एक हुच्चपणा करायचा किडा डोक्यात आहे. पण आधीच बोलत नाही. जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा सांगेनच!
13 Nov 2012 - 9:07 pm | इष्टुर फाकडा
अगदी सहजपणे प्रेरणादायक लिहिलंय. तुमच्या इतकंच जिवंत राहायची शक्ती तुमच्या इतक्या वयात मला मिळो ही प्रार्थना :)
15 Nov 2012 - 9:58 pm | अन्या दातार
अगदी हेच मनात आले हा लेख वाचून
13 Nov 2012 - 9:36 pm | तिमा
व्यायाम सुरु करायचा आहे. पण काही मोटीव्हेशन पाहिजे ना! कुणी म्हणालं की, एवढे एवढे वजन कमी करुन दाखवलंस ना, तर मी तुमचीच! तर उडी मारुन व्यायामाला सुरवात करीन.
13 Nov 2012 - 11:33 pm | चित्रगुप्त
अशी अटी घालून मिळालेली 'ती' तुमचे वजन पुन्हा वाढले, की सोडून जाईल ना?
'ती' कशी पाहिजे, तर "मै पिया तेरी, तू माने या ना माने, काहेको उठाये ये भारी भारी वजने" अशी.
(१९५६ च्या 'वसन्त बहार' मधील गाणे)
http://www.youtube.com/watch?v=is7oI1kMQKY
14 Nov 2012 - 2:22 am | निनाद मुक्काम प...
एकदम झकास लिहिले आहे
काका आजकाल च्या जगात नेहमीचे जीवन एवढे कष्टमय झाले आहे की त्यातून एखादा छंद जोपासणे निव्वळ अशक्य होऊन बसले आहे.
अश्यावेळी ह्या वयात तुमची जिद्द माझ्या सारख्या तिशीतील तरुणास एक नवीन प्रेरणा देते.
14 Nov 2012 - 7:20 am | ५० फक्त
लई भारी लिहिलंय, असंच काहीतरि करायचा प्रयत्न चालु आहे, पण पैसातै म्हणतात तसं शक्य झालं तर उघड करेन.
14 Nov 2012 - 9:25 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
आजच कोलावेरी नृत्याची फित पाहिली व बेली डान्सचे प्राथमिक धडे घेतले.
थुलथुल (अल)बेलीला थोडा व्यायाम मिळाला.
15 Nov 2012 - 7:15 am | १००मित्र
--- फारच आवडलं !
15 Nov 2012 - 2:29 pm | बॅटमॅन
एकच नंबर!!!