यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
16 Nov 2011 - 12:17 am

या लेखनाची प्रेरणा

यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत उपरोल्लेखित लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं. तसं ते त्या धाग्यामध्ये प्रतिसादाच्या स्वरूपात करता आलं असतं पण त्यातील विचारांचं आणि लिखाणाचं बृहत्त्व पहाता नवा धागा काढणंच गरजेचं वाटलं म्हणून हा प्रपंच.

यकुशेठांच्या लेखनातले मुद्दे मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे, ते पुढील प्रमाणे -

  • युजींच्या तथाकथित रुपांतरणोत्तर आयुष्यातली एक जाणीव म्हणजे त्यांचा भाषाविचार. सदर भाषाविचार हा त्यांच्या उपरोल्लेखित लेखाचा विषय आहे.
  • भाषा व भाषेतील शब्द हा अफाट पसरलेल्या या जगाचा प्रतिमारूप जीवनतत्त्वविरहित चिह्नांचा समुदाय आहे आणि मानव त्यांचा ठिगळरूपाने स्वतःच्या संकुचित विचारांना व्यक्त करण्यासाठी वापर करतो.
  • संपूर्ण जगाला व्यक्त करण्याचं सामर्थ्य असूनही संकुचित वापरामुळे शब्द तुकड्यातुकड्यांच्या स्वरूपातंच अभिव्यक्त होतात आणि एखाद्या जिग्सॉ पझलप्रमाणे हे तुकडे एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या तशा स्थितीतील वापरामुळे त्यांच्या योजनेतून कोणतंही योग्य चित्र उमटू शकत नाही.
  • व्यक्ती जेव्हा अशा चिह्नांचा संवादासाठी वापर करते तेव्हा त्या चिह्नांवर त्या व्यक्तीच्या अभिनिवेशांचं आरोपण होऊन त्या चिह्नांमध्ये जीव येतो.
  • अशा अभिनिवेशांद्वारे जीवित झालेल्या शब्दांमुळे आणि त्या शब्दांनी बनलेल्या भाषांमुळे एका ठराविक अभिव्यक्तीचे बंधन पडते.
  • असं असल्यामुळे सदर शब्दरुपी भाषा सर्वश्रेष्ठ सत्य उलगडून सांगण्यास (लेखानुसार आणि स्वतः युजींच्या म्हणण्यानुसार त्यांचे जगाबद्दलचे मत व्यक्त करण्यात) अपुरी पडते.
  • मग त्यांना असं जाणवतं की चिह्नरूपी भाषेतल्या शब्दांची त्यांना काहीच आवश्यकता नसावी म्हणून युजी या माध्यमावर अवलंबून रहात नाहीत.
  • तरीही त्यांच्या अनुयायांशी होणारा संवाद शब्द-भाषेच्या मार्फतच व्हावा लागतो. त्यामुळे त्या संवादात योजलेल्या शब्दांचा त्यांची मानसिक अवस्था समजण्यापुरताच उपयोग व्हावा अशी त्यांची धारणा आहे किंवा तसाच तो होतो असं त्यांचं मत आहे.
  • आयुष्यभरात या चिह्नरूपी भाषेच्या विळख्यात राहिल्याने आपण जग जाणू शकत नाही तर त्याऐवजी या चिह्ननिर्देशित प्रतिमांच्या घोटाळ्यात फसतो.
  • जेव्हा या चिह्नांनी दर्शवलेल्या प्रतिमांच्या जंजाळातून सुटू म्हणजे भाषा --> शब्द --> चिह्न --> प्रतिमा --> असत्य ही साखळी तोडू तेव्हा आपल्याला सत्याचं म्हणजेच युंजींच्या मताने आपल्या आजुबाजुच्या जगताचं दर्शन होईल.

आता वरील जंत्रीमध्ये जे विवेचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांचा विचार करण्यापूर्वी खुद्द युजींबद्दल चार शब्द सांगणं आवश्यक होईल असं मला वाटतं.

यु. जी. तथा उप्पलुरी गोपाल कृष्णमूर्तींचा जन्म मच्छलीपट्टणम् (आन्ध्र प्रदेश) मध्ये १९१८ साली आणि त्यांचा मृत्यु २००७ साली इटली इथे झाला. तत्त्वज्ञान, अध्यात्माची आवड असणारे युजी अनेक वर्ष अनेक योगी आणि तत्त्वज्ञानी लोकांशी संबंधित राहिले. त्यांचे आजोबा थिऑसॉफिस्ट असल्याने त्यांचा तिथे ओढा होता आणि थिऑसॉफिकल सोसायटीच्या मदतीसाठी ऐन विशीत त्यांनी युरोपात लेक्चर्स दिली होती. पुढे युजी रमण महर्षी आणि जे. कृष्णमूर्तींच्या सहवासात आले. दोन्हीकडे त्यांचं समाधान झालं नाही. दरम्यान जे. कृष्णमूर्तींशी विसंवाद होऊन ते तिथून बाहेर पडले. त्यानंतर काही वर्ष ते आपल्या थोरल्या मुलाच्या उपचारांसाठी अमेरीकेत राहिले. याच वेळेला त्यांनी आपल्या कुटुंबापासून फारकत घेतली आणि स्वतः इंग्लंडमध्ये आणि नंतर पॅरीसला जाऊन राहिले. तिथे त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची झाल्यामुळे तिथून ते जिनीवाला गेले. तिथे त्यांनी भारतीय वकिलातीत जाऊन त्यांना भारतात पाठवण्याची विनंती केली. वकिलातीने त्यांच्या प्रत्यार्पणासाठी खर्च करण्याचं नाकारलं. तेव्हा भारतीय वकिलातीमधल्या व्हॅलेंटिना नावाच्या साठीच्या महिलेने त्यांना आसरा दिला आणि युजींना स्विट्झर्लंडमध्ये घर मिळालं. एकूण या दरम्यान युजींची शारीरिक आणि मानसिक बरीच आबाळ झाली. दरम्यान त्यांचे शक्य त्या मार्गाने अध्यात्मिक साधनेचे प्रयत्न सुरूच होते. याच काळात तिथे लेक्चर्स देण्यासाठी आलेल्या जे. कृष्णमूर्तींशी पुन्हा संपर्क होऊन संवादाला सुरूवात झाली पण थोड्याच दिवसात युजींचा जे. कृष्णमूर्तींकडून भ्रमनिरास होऊन ते पुन्हा वेगळे झाले.

या काळातच युजींना तथाकथित शारीरिक आणि मानसिक रुपांतरणाचा अनुभव आला. त्यांनी स्वतः या अनुभवाचं वर्णन असं केलेलं आहे (संदर्भः विकीपेडिया) -

I call it calamity because from the point of view of one who thinks this is something fantastic, blissful and full of beatitude, love, or ecstasy, this is physical torture; this is a calamity from that point of view. Not a calamity to me but a calamity to those who have an image that something marvelous is going to happen.[10]

Upon the eighth day:

Then, on the eighth day I was sitting on the sofa and suddenly there was an outburst of tremendous energy – tremendous energy shaking the whole body, and along with the body, the sofa, the chalet and the whole universe, as it were – shaking, vibrating. You can't create that movement at all. It was sudden. Whether it was coming from outside or inside, from below or above, I don't know – I couldn't locate the spot; it was all over. It lasted for hours and hours. I couldn't bear it but there was nothing I could do to stop it; there was a total helplessness. This went on and on, day after day, day after day.[10]

The energy that is operating there does not feel the limitations of the body; it is not interested; it has its own momentum. It is a very painful thing. It is not that ecstatic, blissful beatitude and all that rubbish – stuff and nonsense! – it is really a painful thing.[10]

 
या अनुभवानंतर त्यांनी स्वतःचं तत्त्वज्ञान मांडायला सुरूवात केली. त्यांचं तत्त्व त्यांच्याच शब्दात होतं, "Tell them that there is nothing to understand." (सांगा त्यांना की इथे काहीही जाणण्यासारखं नाही.) - सं. - विकीपेडिया

त्यांचं सदर तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या काही व्यक्तींना ते ज्ञानी वाटत तर काहींना पाखंडी पण लवकरच त्यांच्या या 'अगम्य' तत्त्वज्ञानाबद्दल पुस्तकं लिहिली गेली, त्यांची विविध ठीकाणी भाषणं आयोजीत केली गेली आणि ते एकूणच प्रसिद्धीस पावले.

युजींबद्दलची माहिती सगळ्यांना असणं शक्य नाही म्हणून इथे आधी सांगितली.

योग आणि ध्यान करणार्‍यांच्या साधनेमध्ये त्रुटी किंवा चूक घडल्यास त्याचे परिणाम त्यांच्या मनाला भोगावे लागतात असं योगशास्त्रात सांगितलं जातं. हे परिणाम क्लेश स्वरूपात त्यांचे मन त्रिगुणांपैकी (सत्त्व-रज-तम) ज्या गुणाच्या अधिपत्याखाली असेल त्यानुसार घडून येतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे ते पाच क्लेश होत. पातंजल योगसूत्रांमध्येही या क्लेशांना अविद्याजन्य मानलेलं आहे. हे इथे सांगण्याचं कारण इतकंच की असाच काहीसा प्रकार युजींच्या बाबतीत घडला असावा आणि त्यालाच त्यांनी त्यांना स्वतःला अनुभवाला आलेलं 'रुपांतरण' असं मानलं असावं. यासाठी किती काळ लागतो वगैरे सूत्रांमध्ये दिलेलं नाही पण युजींची ही अवस्था आठ दिवस होती असं त्यांच्या शब्दांतूनच कळतं. युजींच्या भ्रमित अवस्थेला सुरूवात झाली ती इथेच असं मला वाटतं. मात्र त्यांनी स्वतः मात्र या अनुभवाला एका विशिष्ट जाणीवेचं स्वरूप मानलं आणि नंतर त्या जाणीवेलाच नाकारलं. गौतम बुद्धापासून इतर तत्त्वज्ञानींना जे सर्वश्रेष्ठ सत्याचं ज्ञान झालं त्याचा शोध घेणार्‍या युजींनी त्याच सत्याला नाकारलं, त्याच्या ज्ञानाला नाकारलं इतकंच काय तर त्यांनी व्यक्त झालेल्या प्रत्येक गोष्टीला नाकारलं. या नकाराचाच एक भाग म्हणजे यशवंतरावांनी मांडलेला त्यांचा भाषा-विचार.

युजींचं हे सगळं तत्त्वज्ञानच कसा एक भ्रम आहे हेच आता आपल्याला समजून घ्यायचं आहे.

युजी म्हणतात -

भाषा व भाषेतील शब्द हा अफाट पसरलेल्या या जगाचा प्रतिमारूप जीवनतत्त्वविरहित चिह्नांचा समुदाय आहे आणि मानव त्यांचा ठिगळरूपाने स्वतःच्या संकुचित विचारांना व्यक्त करण्यासाठी वापर करतो.

संपूर्ण जगाला व्यक्त करण्याचं सामर्थ्य असूनही संकुचित वापरामुळे शब्द तुकड्यातुकड्यांच्या स्वरूपातंच अभिव्यक्त होतात आणि एखाद्या जिग्सॉ पझलप्रमाणे हे तुकडे एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या तशा स्थितीतील वापरामुळे त्यांच्या योजनेतून कोणतंही योग्य चित्र उमटू शकत नाही.

व्यक्ती जेव्हा अशा चिह्नांचा संवादासाठी वापर करते तेव्हा त्या चिह्नांवर त्या व्यक्तीच्या अभिनिवेशांचं आरोपण होऊन त्या चिह्नांमध्ये जीव येतो.

अशा अभिनिवेशांद्वारे जीवित झालेल्या शब्दांमुळे आणि त्या शब्दांनी बनलेल्या भाषांमुळे एका ठराविक अभिव्यक्तीचे बंधन पडते.

हे सगळ म्हणत असताना युजी विसरतात की भाषा हे केवळ संवादाचंच माध्यम नाही तर ते ज्ञानाचंही माध्यम आहे. आता कुणी म्हणेल की त्यांनी ज्ञानच नाकारलंय तर हे माध्यमही नाकारणारच ना! पण त्याच वेळेला ते त्यांच्या मनाची अवस्था अनुयायांना समजावी म्हणून त्याच भाषेचा उपयोग करतात म्हणजे हा वदतोव्यघातच म्हणायला हवा. त्यांच्या अनुयायांना त्यांच्या मनाची अवस्था समजते म्हणजेच युजींच्या मनाच्या अवस्थेचं ज्ञान होतं म्हणजेच ते ज्या ज्ञानाला नाकारत आहेत त्याचंच अस्तित्व इथे त्याच वेळेला मान्यही करत आहेत. हे त्यांच्या भ्रमाचेच द्योतक होईल.

या शिवाय त्यांनी भाषा ही चिह्नयुक्त वा प्रतिमास्वरूप मानली आहे. भाषा मुळात दोन प्रकारची आहे. बोली भाषा आणि लिखित भाषा. बोली भाषेत स्वर आणि व्यंजनं येतात तर लिखित भाषेत त्यांना विशिष्ट चिह्नं. युजी जेव्हा भाषेला प्रतिमा वा चिह्नयुक्त म्हणतात तेव्हा त्यांचा रोख लेखी भाषेतील चिह्नांकडे आहे असंच जाणवतं. त्याचप्रमाणे ते जेव्हा भाषेला जगाची प्रतिमा मानतात (मुळात हा विचारच किती निरर्थक आहे? तुम्ही जगालाच नाकारता मग त्याची ही प्रतिमा कुठून पैदाकरता?) आणि त्या भाषेच्या शब्दांच्या अक्षरांना संकुचित वापरामुळे तुकड्या तुकड्याने अभिव्यक्त मानतात तेव्हा त्यांचा उपरोल्लेखित वैचारिक भ्रम अधिक स्पष्टपणे दिसतो. कारण एकदाका तुम्ही ज्ञान नाकारलंत, जाणीव नाकारलीत, सत्य नाकारलंत की मग ही शाब्दिक अभिव्यक्ती काय चीज आहे? "जगात काहीही जाणण्यासारखं नाही, जे काही आहे ते केवळ काही असंबद्ध वाक्यं आहेत, ज्यांची संगती तुम्ही लावण्याचा प्रयत्न करता," अशा वाक्यांमधून (सं - विकी) युजींची वैचारिक दिवाळखोरीच दिसून येते असं मला वाटतं कारण एका बाजूला ते ज्या ज्या गोष्टींचं अस्तित्त्व नाकारतात त्या त्या गोष्टी ते दुसर्‍या अंगाने (इनडायरेक्टली) मान्य करतात. मग त्यांनी सांगितलेलं तथाकथित तत्त्वज्ञान केवळ त्यांनी त्याज्य मानलेल्या भाषेतील शाब्दिक बुडबुडेच होतात. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. ऐकणार्‍याला हातात काहीच मिळत नाही. वेळ मात्र फुकट जातो.

मात्र असं असूनही युजी अंगाला काहीच लाऊन घेत नाहीत. त्यांनी ज्ञानालाच नाकारलेलं असल्याने ते कोणतं तरी ज्ञान देत आहेत असं ते स्वतःच मानत नाहीत पण त्याचवेळेला ऐकणार्‍याला त्यांच्या विधानांची संगती लावण्याच्या दृष्टीने त्यांच्या मते मृत भाषेतील शब्दांचे बुडबुडे ते सोडतच असतात मात्र हे बुडबुडे त्यांची मानसिक अवस्था समजावी म्हणूनच असतात, हे एक गौडबंगालच आहे.

करून सवरून नामानिराळं राहण्याच्या युजींच्या या कृतीचा निषेध करावा तितका थोडा आहे. पण दोष त्यांना तरी का द्या? त्यांच्या असंगत आणि भ्रमिष्टावस्थेतील बोलण्यात काही तरी तात्त्विक आणि अध्यात्मिक अर्थ सामावला आहे अशी कल्पना करून त्यांच्या भजनी लागणार्‍या लोकांचीच ही खरी शोकांतिका आहे. युजी स्वतः सांगतात की मी सगळं नाकारतोय पण लोकंच त्यांच्या त्यांच्या डोक्याने त्यांच्या (युजींच्या) असंगत वाक्यांतून अर्थ काढत बसतात आणि अखेर काहीच हातात न मिळाल्याने निराश होतात. युजींच्या वक्तव्यांचा विचार करता ते त्यांना प्रश्न विचारणार्‍याचा प्रत्येक मुद्दा नाकारतात. प्रश्नकर्ता कोणत्यातरी अडचणी सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो तेव्हा ते त्याच्या अडचणी व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या शब्दांनाच नाकारतात. नंतर त्याच्या अडचणींनाच नाकारतात. पुढे त्या व्यक्तीच्या जाणीवांनाच नाकारतात आणि अशा प्रकारे आपल्या अडचणींचा सामना करताना मेटाकुटीला आलेला जिज्ञासू अधिकच संभ्रमात पडतो आणि त्यांच्या नकारात गूढ अर्थ शोधू लागतो. यातच पुढे अधिकाधिक गुरफटत जातो. अशा प्रकारचा विचार काहीही निष्पन्न करत नाही आणि असे असंबद्ध नि 'गूढ' विचार व्यक्त करण्यासाठी युजींसारखं रुपांतरणही आवश्यक नसतं. आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की बाजारातून दोन पैशाची भांग आणून खाल्ली की तत्त्वज्ञानातल्या शेकडो नवनव्या कल्पना सुचू शकतात. भांग खाऊन व्यक्त केलेले नसले तरी युजींचे विचार तसाच एक कल्पनाविलास वाटतो.

खरं तर युजींच्या या तथाकथित तत्त्वज्ञानाचं (पुन्हा वदतोव्यघात) वेगवेगळ्या प्रकारे खंडन करता येणं शक्य आहे. अनेक संदर्भ आणि शास्त्रवचनं यासाठी देता येतील पण ज्यांनी स्वतः तत्त्वज्ञानाचा पाया असलेलं शाश्वत सत्य नाकारलं, त्या सत्याचं ज्ञान नाकारलं, त्या सत्याच्या ज्ञानाचं साधन नाकारलं आणि जग तथा जीवनासंदर्भात कुठल्याही तर्‍हेची साध्यं नाकारली अशा व्यक्तीला फक्त 'नाकारून'च त्याच्या मतांचं खंडण करणं मला अधिक योग्य वाटतं.

धोरणप्रकटनविचारमतप्रतिसादमाहितीप्रतिक्रियावादसमीक्षा

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

16 Nov 2011 - 1:54 am | पुष्करिणी

आभ्यासपूर्ण लेख आवडला. तुमच्या सविस्तर लेखामुळं मला यकुंचा लेख थोडाफार कळला असं वाटतय.

आधी माझा समज होता की युजी शब्दांच्या बाबतीत 'मॅप इज नॉट अ टेरिटरी' असं काहीसं बोलत आहेत. पण आता टेरिटरीच नसल्यानं मॅप कसला आणि बॉर्डर कसली.

जेव्हा या चिह्नांनी दर्शवलेल्या प्रतिमांच्या जंजाळातून सुटू म्हणजे भाषा --> शब्द --> चिह्न --> प्रतिमा --> असत्य ही साखळी तोडू तेव्हा आपल्याला सत्याचं म्हणजेच युंजींच्या मताने आपल्या आजुबाजुच्या जगताचं दर्शन होईल.

युजींचा असा कुठलाही विचार नाही हे स्‍पष्‍ट करु इच्‍छितो. मी लिहीलेल्या कालच्या चार-दोन परिच्छेदांसांठी फक्त बीज म्हणून त्यांच्या अंतर्पटलावर शब्द कसलीही ''प्रतिमा'' निर्माण करु शकत नाहीत हा विचार वापरला होता.

वकिलातीने त्यांच्या प्रत्यार्पणासाठी खर्च करण्याचं नाकारलं.

'प्रत्यार्पण' हा शब्द गुन्हेगारांना एका देशाकडून दुसर्‍या देशाकडे हस्तांतरीत करण्‍यासाठी वापरला जात असल्याचं पाहिलं आहे. इथे हा शब्द चपखल नाही.

तेव्हा भारतीय वकिलातीमधल्या व्हॅलेंटिना नावाच्या साठीच्या महिलेने त्यांना आसरा दिला

अचूकतेसाठी, त्या बाईंचं नाव 'व्हॅलेन्‍टाइन डी कार्व्हान'

त्यांचं सदर तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या काही व्यक्तींना ते ज्ञानी वाटत तर काहींना पाखंडी पण लवकरच त्यांच्या या 'अगम्य' तत्त्वज्ञानाबद्दल पुस्तकं लिहिली गेली, त्यांची विविध ठीकाणी भाषणं आयोजीत केली गेली आणि ते एकूणच प्रसिद्धीस पावले.

इथे स्‍पष्‍ट करु इच्‍छितो की युजींनी कधीही 'हे घ्‍या माझं तत्वज्ञान' अशी भूमिका घेतलेली नाही. टेल देम दॅट देअर इज नथींग टु अंडरस्‍टँड हे तुम्ही वर लिहीलंच आहेत. त्यांची पुस्तकं जरुर आहेत, पण ती युजींनी अजेंडा म्हणून लिहवून घेतलेली नाहीत. ज्यांना युजीचे विचार मोलाचे वाटले त्यांनी त्यांना ग्रंथरुप देण्‍याचा उद्योग केला.
दुसरी गोष्‍ट अशी की युजी कृष्‍णमूर्ती पूर्वायुष्‍यात जरी जगप्रसिद्ध वक्ते असले तरी, रुपांतरणोत्तर मात्र ते भाषण देऊ शकत नसत. हां, ते तुकड्‍या तुकड्यातील संवाद जरुर साधत. हा संवादच पुस्तकांत ग्रथीत करण्‍यात आला आहे. त्यामुळं 'विविध ठीकाणी भाषणं आयोजीत केली गेली' म्हणणं निखालस चुकीचं आहे. मुलाखती जरुर घेतल्या गेल्या. रुपांतरणांनंतर त्यांचं एकच व्याख्‍यान झालं, जे ऐकलं तर कळु शकेल ती युजींना सलग बोलणे, सलग एक विचारधारा पकडून बोलत रहाणे अशक्य बनले होते.

योग आणि ध्यान करणार्‍यांच्या साधनेमध्ये त्रुटी किंवा चूक घडल्यास त्याचे परिणाम त्यांच्या मनाला भोगावे लागतात असं योगशास्त्रात सांगितलं जातं. हे परिणाम क्लेश स्वरूपात त्यांचे मन त्रिगुणांपैकी (सत्त्व-रज-तम) ज्या गुणाच्या अधिपत्याखाली असेल त्यानुसार घडून येतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे ते पाच क्लेश होत. पातंजल योगसूत्रांमध्येही या क्लेशांना अविद्याजन्य मानलेलं आहे. हे इथे सांगण्याचं कारण इतकंच की असाच काहीसा प्रकार युजींच्या बाबतीत घडला असावा आणि त्यालाच त्यांनी त्यांना स्वतःला अनुभवाला आलेलं 'रुपांतरण' असं मानलं असावं.

पातंजल योगसूत्रातील माहीतीसाठी धन्यवादच, ही माहिती माझ्‍यासाठी नवीन आहे. पण युजींचं रुपांतरण फक्त मानसिक नसून ते पूर्णत: शारीरिक आहे हे लक्षात घ्‍या. त्यांच्या प्रत्येक संवादात 'शरीर' हा मुख्य घटक आहे आणि ते मनोव्यापार, मन सरळसोटपणे उडवून लावतात. मनाचं अस्तित्व युजी जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हाही त्यांना जाणवलं नाही. मन नसतं हा त्यांचा जुनाच स्‍वानुभव होता.
इथे युजी आणि इतर दा‍र्शनिकांमधला रुपांतरणोत्तर फरक ठळक करु इच्छितो की, युजी वगळता जवळपास सर्वांचं (अगदी गौतम बुद्ध, महावीर ते अलीकडचे जे. कृष्‍णमूर्ती, रजनीश, एकहार्ट टुली, मुजी, पुंजाजी आणि असेच जेवढे असतील तेवढे ) मानसिक रुपांतरण घडल्याचे दाखले आहेत, युजीच्या रुपांतरणाचा आधार पूर्णत: शारीरिक आहे. युजीबद्दल मी इथे लिहिलेली लेखमाला वाचली तर जाणवेल की त्यांनी रुपांतरण 'मानलं' असे मानणे निखालस गैरसमजाचे होईल. जे बदल शरीरात/वर दृश्य रुपात स्पष्‍टपणे दिसले आहेत, ते कुणी मानण्‍या न मानण्‍याची काय पत्रास?

यासाठी किती काळ लागतो वगैरे सूत्रांमध्ये दिलेलं नाही पण युजींची ही अवस्था आठ दिवस होती असं त्यांच्या शब्दांतूनच कळतं. युजींच्या भ्रमित अवस्थेला सुरूवात झाली ती इथेच असं मला वाटतं.

शरीरात बदल घडून ते स्पष्‍ट दिसायला सुरुवात झालेली असताना ती भ्रम सुरु होण्‍याची अवस्‍था होती असं म्हणणं हे किती चुकीचं आहे हे आपल्यासारख्‍या आयुर्वेदाचार्याला मी सांगू काय?

युजी म्हणतात -
भाषा व भाषेतील शब्द हा अफाट पसरलेल्या या जगाचा प्रतिमारूप जीवनतत्त्वविरहित चिह्नांचा समुदाय आहे आणि मानव त्यांचा ठिगळरूपाने स्वतःच्या संकुचित विचारांना व्यक्त करण्यासाठी वापर करतो.
संपूर्ण जगाला व्यक्त करण्याचं सामर्थ्य असूनही संकुचित वापरामुळे शब्द तुकड्यातुकड्यांच्या स्वरूपातंच अभिव्यक्त होतात आणि एखाद्या जिग्सॉ पझलप्रमाणे हे तुकडे एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या तशा स्थितीतील वापरामुळे त्यांच्या योजनेतून कोणतंही योग्य चित्र उमटू शकत नाही.
व्यक्ती जेव्हा अशा चिह्नांचा संवादासाठी वापर करते तेव्हा त्या चिह्नांवर त्या व्यक्तीच्या अभिनिवेशांचं आरोपण होऊन त्या चिह्नांमध्ये जीव येतो.

हे युजींचे विचार नाहीत. त्यांच्या मनात शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही हा बीजरुप विचार घेऊन मी पुढे मांडलेली भुमिका म्हणा हवं तर. मी मांडलेली ही भूमिका चुकीची आहे असं म्हटलंत तर चालेल, पण हे युजींचे विचार आहेत असं म्हणू नका, ते चूक असोत, बरोबर असोत पण ते त्यांचे विचार नाहीत.

त्याचप्रमाणे ते जेव्हा भाषेला जगाची प्रतिमा मानतात (मुळात हा विचारच किती निरर्थक आहे? तुम्ही जगालाच नाकारता मग त्याची ही प्रतिमा कुठून पैदाकरता?)

प्रतिमा युजी पैदा करीत नाहीत, तुमच्या-आमच्या मनात जी प्रतिमा आहे त्याबद्दल ते बोलतात. देअर इज ओन्ली धीस रिअॅली‍टी, देअर इज नथींग मोर फॉर मी दॅन धीस (हे धीस म्हणजे जग जसं आहे तसं).

"जगात काहीही जाणण्यासारखं नाही, जे काही आहे ते केवळ काही असंबद्ध वाक्यं आहेत, ज्यांची संगती तुम्ही लावण्याचा प्रयत्न करता," अशा वाक्यांमधून (सं - विकी) युजींची वैचारिक दिवाळखोरीच दिसून येते असं मला वाटतं''

'युजींची वैचारिक दिवाळखोरी' हा फार चांगला शब्दप्रयोग केला आहे. ज्यावेळी ते रुपांतरणातून बाहेर पडले तेव्हाच ते विचारमुक्त झाले होते. ते विचाराच्या बाबतीत खरोखर दिवाळखोरीत जगले, पण वेगळ्या अर्थानं. मग ते जे बोललेत ते काय आहे? असं विचाराल तर त्यांना जेव्हा प्रश्न विचारले जात त्यावर ते बोलत आणि हे बोलणे म्हणजे 'समोरच्याच्या मनात जे आहे ते जसंच्या 'इथं' (युजी नावाचे जे काही पटल असेल त्यावर) तसं विचारां/शब्दांद्वारे किंवा शिवाय प्रतिबिंबीत झालेलं आहे.'

इथं एक किस्सा सांगण्‍याचा मोह होतो. युजी समोरचा माणूस काहीही बोलला नाही तरी त्याच्या मनातले विचार ओळखू शकत याचं चित्रिकरण हे एका चित्रीकरणात आलेलं आहे. युजींसोबतच्या बैठकीत बसलेल्या महिलांतील एक सुंदर महिलेला पाहून तिच्याशी संग करता आला तर किती बरं असा विचार त्या बैठकीत बसलेल्या महेश भट यांच्या मनात आला. युजींनी तिथल्या तिथे महेश भट यांना त्यांच्या ब्रॅण्‍डेड शैलीत झोडपून काढून 'तिला मिठीत घ्‍यावं वाटतंय तर घेत का नाहीस (ती तुझ्‍या थोबाडीत मारील हा भाग वेगळा!) , पण तिथं तुझ्यात भरलेली नैतिकता, समाजाचे नियाम आडवे येतात... यामुळंच तुमच्याकडून कधीच जशी घडायला हवा ती कृती घडत नाही' हे सुनावलं होतं. महेश भट यांनी त्यांच्या मनात असे विचार आल्याचे नाकारलेले नाहीच, स्‍वीकारलेलं मात्र आहे.
तुम्ही स्वत:च पहा:

This Is a Dog Barking

ऐकणार्‍याला हातात काहीच मिळत नाही.

हे मान्य करतो. काही मिळण्‍यासाठी जे युजी वाचतील त्यांच्या हातात काहीही पडत नाही. उलट जे काही जमवलं असेल त्यावरुन हात धुवून बसावे लागते. हा माझा स्वानुभव आहे. मी माझ्‍यालेखी शब्दांचे महत्व गमावून बसत आहे हा स्वानुभव आहे.

मात्र असं असूनही युजी अंगाला काहीच लाऊन घेत नाहीत. त्यांनी ज्ञानालाच नाकारलेलं असल्याने ते कोणतं तरी ज्ञान देत आहेत असं ते स्वतःच मानत नाहीत पण त्याचवेळेला ऐकणार्‍याला त्यांच्या विधानांची संगती लावण्याच्या दृष्टीने त्यांच्या मते मृत भाषेतील शब्दांचे बुडबुडे ते सोडतच असतात मात्र हे बुडबुडे त्यांची मानसिक अवस्था समजावी म्हणूनच असतात, हे एक गौडबंगालच आहे.

युजींना स्वत:साठी त्यांचे स्वत:चेही शरीर जाणवत नव्हते... मग अंगाला कसे काय लाऊन घेतील ;-) विनोद सोडा. माझी मानसिक अवस्‍था समजून घ्‍याच, असा त्यांचा आग्रह कधीच नव्हता. त्यांच्या अवस्‍थेत आणि आपल्या अवस्‍थेत मूलभूत फरक आहे आणि तो काय आहे हे ज्यांना समजून घ्‍यावं वाटलं त्यांच्यासाठी युजींना शब्दांचे बुडबुडे सोडावे लागले. यात गौडबंगाल काहीही नाही.

करून सवरून नामानिराळं राहण्याच्या युजींच्या या कृतीचा निषेध करावा तितका थोडा आहे. पण दोष त्यांना तरी का द्या? त्यांच्या असंगत आणि भ्रमिष्टावस्थेतील बोलण्यात काही तरी तात्त्विक आणि अध्यात्मिक अर्थ सामावला आहे अशी कल्पना करून त्यांच्या भजनी लागणार्‍या लोकांचीच ही खरी शोकांतिका आहे.

युजींच्या बोलण्‍यातून कसलाही तात्त्विक किंवा अध्‍यात्मिक अर्थ मी काढत नाही. काही असेलच, तर ते प्रॅक्‍टीकली मला कसं लागू होतं हे अनुभवण्‍याचा प्रयत्न मी जरुर करतो. भजनी लागणे वगैरे प्रकार युजींच्या बाबत संभवत नाहीत, हे आपल्याला माहित नसण्‍याचे कारण म्हणजे आपली युजींशी पुरती ओळख झालेली नाहीय. त्यांना वाचायला गेलं तर प्रत्येक क्षणी, मनात आलेला प्रत्येक विचार छाटून काढतात, अगदी 'वैचारिक दिवाळखोरीत' ढकलतात. ही विशिष्‍ट वैचारिक दिवाळखोरीच (विचारांपासून मुक्त होणे) मला वाटतं सत्य जाणू इच्छिणार्‍यांना अपेक्षित असते. त्यामुळे भजनी लागणार्‍यांची शोकांतिका आहे वगैरे म्हणणे हे या विषयात नेहमीच केल्या जाणार्‍या विधानांप्रमाणे एक 'स्वीपिंग स्‍टेटमेंट' आहे.

युजी स्वतः सांगतात की मी सगळं नाकारतोय पण लोकंच त्यांच्या त्यांच्या डोक्याने त्यांच्या (युजींच्या) असंगत वाक्यांतून अर्थ काढत बसतात आणि अखेर काहीच हातात न मिळाल्याने निराश होतात. युजींच्या वक्तव्यांचा विचार करता ते त्यांना प्रश्न विचारणार्‍याचा प्रत्येक मुद्दा नाकारतात. प्रश्नकर्ता कोणत्यातरी अडचणी सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो तेव्हा ते त्याच्या अडचणी व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या शब्दांनाच नाकारतात. नंतर त्याच्या अडचणींनाच नाकारतात. पुढे त्या व्यक्तीच्या जाणीवांनाच नाकारतात आणि अशा प्रकारे आपल्या अडचणींचा सामना करताना मेटाकुटीला आलेला जिज्ञासू अधिकच संभ्रमात पडतो आणि त्यांच्या नकारात गूढ अर्थ शोधू लागतो. यातच पुढे अधिकाधिक गुरफटत जातो. अशा प्रकारचा विचार काहीही निष्पन्न करत नाही आणि असे असंबद्ध नि 'गूढ' विचार व्यक्त करण्यासाठी युजींसारखं रुपांतरणही आवश्यक नसतं. आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की बाजारातून दोन पैशाची भांग आणून खाल्ली की तत्त्वज्ञानातल्या शेकडो नवनव्या कल्पना सुचू शकतात. भांग खाऊन व्यक्त केलेले नसले तरी युजींचे विचार तसाच एक कल्पनाविलास वाटतो. खरं तर युजींच्या या तथाकथित तत्त्वज्ञानाचं (पुन्हा वदतोव्यघात) वेगवेगळ्या प्रकारे खंडन करता येणं शक्य आहे. अनेक संदर्भ आणि शास्त्रवचनं यासाठी देता येतील पण ज्यांनी स्वतः तत्त्वज्ञानाचा पाया असलेलं शाश्वत सत्य नाकारलं, त्या सत्याचं ज्ञान नाकारलं, त्या सत्याच्या ज्ञानाचं साधन नाकारलं आणि जग तथा जीवनासंदर्भात कुठल्याही तर्‍हेची साध्यं नाकारली अशा व्यक्तीला फक्त 'नाकारून'च त्याच्या मतांचं खंडण करणं मला अधिक योग्य वाटतं.

तुमच्यात माझ्‍याही चिंध्‍या करण्‍याचं धैर्य जेव्हा येईल तेव्हाच तुम्ही सत्य जाणलेलं असेल अशा अर्थाचं युजींचं एक विधान आहे. पण त्यांना नाकारणं हे युजींचं पूर्णपणे परिशिलन करुन या विषयात आलेल्या स्वानुभवातून घडत असेल तर आनंदच आहे. पण पुरेसं समजून न घेताच घाईत निष्‍कर्ष काढला जात असेल तर मला आपल्याला थांबवायला आवडेल. ही वाक्ये तशीच वाटतात, म्हणून त्यावर सखोल लिहीत नाही.

चित्रा's picture

16 Nov 2011 - 3:08 am | चित्रा

वरील चित्रफितीत महेश भटांना दिलेला सल्ला हे ते शेवटी क्रूड एक्झांपल आहे हे म्हणतात ते बरे झाले. कोणी हा सल्ला पाळला नाही म्हणजे मिळवले!

मी माझ्‍यालेखी शब्दांचे महत्व गमावून बसत आहे हा स्वानुभव आहे.

म्हणजे काय? कसलेही वर्णन करण्यास प्रतिमा पुरेशी असते?

म्हणजे काय? कसलेही वर्णन करण्यास प्रतिमा पुरेशी असते?

हे मी माझ्याबद्दल लिहिलं आहे. म्हणजे माझ्यालेखी माझ्यासमोर येणार्‍या शब्दांना फारसं महत्व नाही. त्या शब्दांतून जी प्रतिमा उभी होत असते ती फारतर लक्ष देण्यासारखी असेल.

रामपुरी's picture

16 Nov 2011 - 3:28 am | रामपुरी

चित्रफीतीबद्दल धन्यवाद. सगळं संभाषण नीट ऐकल्यावर पूर्वीचा निष्कर्ष पक्का झाला.
"आणखी एक तद्दन भंपक बाबा"
बाकी विचार ओळखण्याबद्दल म्हणाल तर असले "चमत्कार" कुणीही थोडीफार निरिक्षणशक्ती असलेला आंडूपांडू करू शकतो.

चित्रफीतीबद्दल धन्यवाद. सगळं संभाषण नीट ऐकल्यावर पूर्वीचा निष्कर्ष पक्का झाला.
"आणखी एक तद्दन भंपक बाबा"

आपण जर युजींबद्दल माझ्या लेखमाला वाचून त्यांच्याबद्दलचं हे मत बनवलं असेल तर तो दोष माझ्या तोकड्या लिखाणाकडं आणि मांडणीकडे जातो. मी आपल्याला याबद्दल पुन्हा एकदा स्वतःच्या कोर्‍या पाटीनं प्रयत्न करुन पहावा, आणि तरीही असाच निष्कर्ष निघाला तर योग्य ते मानावं असा सल्ला देईन.

बाकी विचार ओळखण्याबद्दल म्हणाल तर असले "चमत्कार" कुणीही थोडीफार निरिक्षणशक्ती असलेला आंडूपांडू करू शकतो.

हा चमत्कार आहे म्हणून व्हिडिओ इथे टाकलेला नाहीय. शब्दांच्या विना देखील कुणाचेही मंतव्य कुणालाही स्पष्ट दिसू शकते हे याचं दृश्य उदाहरण आहे म्हणून तो टाकला आहे. चमत्कार हा विशिष्ट पठडीतून विचार करणार्‍यांनी तयार केलेला शब्द आहे. आणि थोडेफार चमत्कार कुणीही करु शकतो, जसा हा प्रतिसाद देऊन आपण केलात !

जयंत कुलकर्णी's picture

16 Nov 2011 - 10:08 am | जयंत कुलकर्णी

पहिल्यांदा एवढ्या चांगल्या चर्चेबद्दल दोघांचेही अभिनंदन करतो व धन्यवादही वर दिलेलेच आहेत. चर्चा अत्यंत योग्य अशा वातावरणात चालली असून ती अशीच याच वातावरणात चालू राहूदेत ही सर्वांना विनंती. शेवटी मतांना विरोध करतानासुद्धा आपण त्यातूनही काहीतरी ग्रहण करत असतोच.

काही प्रश्न पडले आहेत ते काही काळाने विचारतोच.

Nile's picture

17 Nov 2011 - 8:17 am | Nile

शेवटी मतांना विरोध करतानासुद्धा आपण त्यातूनही काहीतरी ग्रहण करत असतोच.

असं काय नसतंय हो जयंतराव. हे वाक्य त्या व्हिडिओतल्या निरर्थक संवादासारखंच आहे.

धन्यवाद यशवंतराव!

आमच्या अल्पस्वल्प मतिनुसार लिहिलेल्या लेखावर अपेक्षेप्रमाणे तुम्ही अगदी विस्तृत प्रतिसाद दिलेला आहे.

आधी एक गोष्ट पुन्हा एकदा ध्यानात घ्या की तुमच्या सारखा मी काही युजींच्या मताचा अभ्यासक नाही. किंबहुना तुमच्या त्या संबंधीच्या लेखांनीच माझं युजींकडे लक्ष गेलं आणि त्यासंदर्भात काही वाचन झालं. तुम्ही शब्दासंबंधी लिहिलेल्या लेखाने आणि त्यावरील मतप्रदर्शनाने वरचं लिखाण झालं.

मला व्यक्तिशः कोणत्याही तत्त्वज्ञ आणि ज्ञानी माणसाकडून काही लोकोपयोगी कार्याची अपेक्षा असते. आपल्याकडील ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग लोकांच्या वैचारिक अडचणींवर उतारा म्हणून व्हावा असं काहीसं मला अपेक्षित असतं अन्यथा त्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा उपयोग तो काय? अर्थात माझं असं म्हणणं नाही की हे मत सर्वमान्यच व्हावं पण त्याला सर्वसामान्य म्हणायला काय हरकत असावी?

ज्या वेळी एखादी व्यक्ती ज्ञानी म्हणून समोर येते, त्यांना आलेल्या असामान्य अनुभवाबद्दल सांगते, त्या अनुभवांमुळे त्यांच्यात झालेल्या व्यक्तिगत बदलांचं वर्णन करते आणि एका अर्थात लोकांना त्याद्वारे स्तिमित करते, त्या व्यक्तीकडून आपोआपच समाज काही अपेक्षा करतो. समाज हा जनसामान्यांनीच बनलेला असतो. तेव्हा जनसामान्यांची अपेक्षा त्यांना पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची प्रामुख्याने असते. त्यांना त्यांच्या अडचणीतून एक 'वे आऊट' हवा असतो. शक्य झाल्यास काही उपायांची अपेक्षा असते.

युजी लोकांना त्यांच्या अनुभववर्णनाने स्तिमित करतात पण त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नसतात. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना युजी त्यांच्या 'तथाकथित' रुपांतरीत अवस्थानुरूप उत्तरं देतात पण प्रश्नकर्ती मंडळी त्यांच्याप्रमाणे रुपांतरणाचा अनुभव नसलेली आहेत ना, त्यांना युजींचं म्हणणं कसं कळावं?

यशवंतराव, तुम्ही म्हणता

शरीरात बदल घडून ते स्पष्‍ट दिसायला सुरुवात झालेली असताना ती भ्रम सुरु होण्‍याची अवस्‍था होती असं म्हणणं हे किती चुकीचं आहे हे आपल्यासारख्‍या आयुर्वेदाचार्याला मी सांगू काय?

खरं तर मला ते कसं चुकीचं आहे ते समजून घ्यायला आवडेल. कारण युजींचं तथाकथित रुपांतरण फक्त शारीर होतं हेच मला समजण्यासाठी कठीण आहे. केवळ ते स्वतः आणि त्यांचे मित्र तसं म्हणतात नि मानतात म्हणून मी ही तसंच मानावं असं तुमचं म्हणणं असेल तर किमान मला तरी ते अशक्य आहे. तुम्ही तुमच्या लेखांमध्ये या शारीर बदलांचं वर्णन केलेलं आहे. त्यातल्या बर्‍याचशा गोष्टी युजींचे स्वतःचे अनुभव आहेत. त्वचा, पापण्या वगैरे सोडा पण मेंदूची स्थिती कशी झालीय ते वाटणं, कानाचं जवळचा आवाज दूरून वगैरे विविध प्रकारे ऐकू येणं, डोळ्याने भिंगांसारखं दिसणं इ. इ. वर्णनं युजींचे स्वतःचे अनुभव असल्याने ते सर्वमान्य व्हावेत असा आग्रह मान्य करता येत नाही. त्यातही पुन्हा

मनाचं अस्तित्व युजी जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हाही त्यांना जाणवलं नाही. मन नसतं हा त्यांचा जुनाच स्‍वानुभव होता.

हे असलं आम्ही का मान्य करावं?

आता तुम्ही भ्रम सुरू होण्याच्या अवस्थेबद्दल विचारलंच आहेत तर त्यावर काही सांगू इच्छितो. युजींनी वर्णन केलेली रुपांतरणाच्या वेळची लक्षणं वात दोषाच्या विकृतीची दिसतात. वात विकृतीमधून अशा अवस्थेत भ्रम हे व्याधीलक्षण होऊ शकते. भ्रमात असलेल्या व्यक्तीला जाणवलेल्या गोष्टी तो वर्णन करू शकतो पण ती त्याची शारीरिक स्थिती असेलच असं नसतं. युजी मनाला मानत नाहीत म्हणून त्यांच्या शरीरातलं मनाचं अस्तित्व मी देखिल मानू नये असं तुमचं सांगणं आहे का? तर तसं मला करता येणार नाही.

त्यांच्या तथाकथित मृत्यु विषयीसुद्धा मला भ्रमाचीच शक्यता वाटते. शेवटी त्या अवस्थेनंतर ते जीवित राहिले होते तर किमान आयुर्वेदातल्या जीविताच्या व्याख्येनुसार

"शरिरेन्द्रिय सत्त्वात्मसंयोगो धारि जीवितम्।" (चरक संहिता)

त्यावेळी त्यांच्या ठायी शरीर, इन्द्रिय, मन आणि आत्मा यांचा संयोग नक्कीच होता. तिथे मन होतं, युजींनी ते मानलं काय न मानलं काय, त्याने काहीच फरक पडत नाही. मन त्यांना आवश्यक असेल तेव्हा तेवढ्यापुरतं उभं राहतं आणि गरज नसताना पूर्ववत पडून राहतं म्हणून ते नसतंच हे असलं आयुर्वेदाला तरी मान्य नाही हे नमूद करू इच्छितो.

असो.

कुणी युजींना मानावं, त्यांच्या मतांच्या संग्रहांचा, संवादांच्या संग्रहांचा अभ्यास करावा, त्याने स्वतःची मत बनवावी हे व्यक्तिशः मी त्यांच्या त्यांच्यावरच सोडेन.

वैयक्तिकरीत्या किमान माझ्यापुरते मी ते नाकारलेलेच आहेत.

हीच माझ्याकडून लेखन सीमा होय.

यकु's picture

16 Nov 2011 - 7:52 pm | यकु

आपल्या प्रतिसादावर लिहिण्यासारखं बरंच काही आहे.
पण आपल्याकडून लेखनसीमेचा संकेत आल्याने मी पण थांबतो.

प्रास's picture

16 Nov 2011 - 8:00 pm | प्रास

काय आहे, या अशा विषयांवर होऊ शकणार्‍या प्रतिसादांच्या प्रतिसादांची सीमा गाठणे कठीण आहे. कुठेतरी ठरवून सीमा आखावीच लागते.

शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाची मतं आहेत आणि ती तो नेहमी ठामपणे मांडत राहणारच आहे.

आपली मतं एकमेकांना पटली नाहीत तरीही आपण एकमेकांच्या मतांचा आदर निश्चितच करू शकतो, असंच मी मानतो.

अगदी.. अगदी

सुरुवातीला कित्येक वेळा युजी हे ठार बुद्धीभ्रष्ट आहेत असं मलाही कित्येकदा वाटलं होतं.
म्हणून कुणी युजींच्या नावाने काहीही म्हटले तरी त्यात आश्चर्य वाटत नाही.

ठाम विचार मांडण्यामागे फक्त तोंडओळखीवरुन काही महत्वाचं सुटू नये एवढाच विचार होता.

करून सवरून नामानिराळं राहण्याच्या युजींच्या या कृतीचा निषेध करावा तितका थोडा आहे. पण दोष त्यांना तरी का द्या? त्यांच्या असंगत आणि भ्रमिष्टावस्थेतील बोलण्यात काही तरी तात्त्विक आणि अध्यात्मिक अर्थ सामावला आहे अशी कल्पना करून त्यांच्या भजनी लागणार्‍या लोकांचीच ही खरी शोकांतिका आहे

आणखी सुसंगत उत्तर सुचले म्हणून हा पुन्हा एक प्रतिसाद.
'करुन सवरुन'बद्दल सांगतो - युजींच्या जीवनकालात त्यांच्या अवतीभवती कुठलीही संस्था त्यांनी उभी राहू दिली नाही. विकण्यासारखं कोणतंही प्रॉडक्ट आपल्याकडे नाही, कसल्याही आध्यात्मिक प्रश्नावर आपल्याकडे उत्तर नाही हे युजी सांगत असत. उत्तरे मिळवण्यासाठी जे आध्यात्मिक गुरु बाजारात बसले आहेत त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला युजी देत. निषेध करायचा असेल तर त्या तथाकथित आध्यात्मिक गुरुंचा करा जे केवळ शब्दच्छल करुन, येनकेन प्रकारेण लोकांना गंडवण्याच्या युक्त्या वापरुन स्वतःचे साम्राज्य उभे करतात.

१. रूपांतरणोत्तर आयुष्यात युजी कधीही डॉक्टरांकडे गेले नाहीत. शरीर हे स्वतः ला बरं करुन घेण्यात स्वतःच समर्थ असतं असे ते मानायचे. याचा अर्थ कुणीही डॉक्टरांकडे जाऊ नये असे त्यांचे म्हणणे नव्हते. वेदना होत असतील तर जरुर डॉक्टरांचे उपचार करायला हवेत असे ते सांगायचे. पण 'शुट ऑल डॉक्टर्स ऑन साईट अ‍ॅण्ड अ‍ॅट साईट... वी डू नॉट नीड ऑल दोज स्क्रौंड्रल्स' असेही त्यांचे एक विधान आहे.

२. रुपांतरणोत्तर आयुष्यात युजींनी कधीही 'हेल्थ फूड' किंवा कसलेही आहाराचे चोचले केले नाहीत. केवळ सॉलिड क्रिम आणि चीज हा त्यांचा मरेपर्यंत ६०-७० वर्षे आहार राहिला. तुम्ही अन्न खात नाही, संकल्पना खाता असं त्यांचं म्हणणं असे.

लोक अवतीभवती जमा होतात म्हणू युजी दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त एका ठिकाणी रहात नसत. युजी हे एखाद्या गावी जाण्यासाठी विमानाचं बुकींग करतात, ते लगेच दुसर्‍या गावी जाण्यासाठी असे त्यांचा ट्रॅव्हल एजंट म्हणत असे. यातून त्यांनी आफ्रिकेतील काही देश सोडले तर जगभरातील देशांत प्रवास केला - कुठेही कुठली संस्था न उभारता, 'टिचींग' चा कसलाच अजेंडा नसताना!
मी मेल्यानंतर बागेतलं गांडूळ जसं सडून जातं तसाच सडेन हे त्यांचं म्हणणं होतं. ते इटालीतील व्हॅलेक्रोशिया येथे अगदी एकांतात, त्यांना ऐकाणार्‍या, शेवटचं पहाण्यासाठी जमलेल्या लोकांच्या कसल्याही सेलिब्रेशन शिवाय त्यांचा मृत्यू झाला, आणि तो तसाच व्हायला हवा हे त्यांनी सांगून ठेवलं होतं.

रामपुरी's picture

16 Nov 2011 - 3:32 am | रामपुरी

मृत्यूचं सेलिब्रेशन??? काहीतरी चुकतंय काय? की इतका वाईट माणूस होता तो?

जन्माचं सेलीब्रेशन होतं. जन्म दीवसाचही होतं मग जर आर्थीक तरतूद असेल तर सामोर्‍या गेलेल्या मृत्यूच सेलीब्रेशन का नसावं ? इतकी का ती अनैसर्गीक घटना आहे ?

युजी हे त्यांना ऐकायला येणार्‍या लोकांमध्ये कितीही नाही म्हटलं तरी 'एक पोचलेली विभूती' मानले जात होते.
अशा व्यक्तीची गेल्यानंतर समाधी बांधणे, त्याच्या मृत्यूसमयी/नंतर काही विशेष गोष्टी करणे वगैरे केले जाते, ते केले नव्हते या अर्थाने 'सेलिब्रेशन.'

मराठी_माणूस's picture

16 Nov 2011 - 8:54 am | मराठी_माणूस

काही शंका

यातून त्यांनी आफ्रिकेतील काही देश सोडले तर जगभरातील देशांत प्रवास केला -

ह्याचा सर्व खर्च कोणी केला.

जे.कृष्णमुर्ति आणि युजींच्या तत्वज्ञानात काय फरक आहे ?

यातून त्यांनी आफ्रिकेतील काही देश सोडले तर जगभरातील देशांत प्रवास केला - ह्याचा सर्व खर्च कोणी केला.

व्हॅलेंटाईन डी कार्व्हान या बाईंनी युजींच्या प्रवासासाठी स्वखर्चाने एक फंड उभारला होता, त्यातून तो खर्च होत असे. व्हॅलेंटाईनने कधीही युजींबद्दल कसलेही मतप्रदर्शन केलेले नाहीय. त्या शेवटी बंगलोर मध्ये, युजींच्या मित्रांकडे रहात असत. तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या डायरीत युजीबद्दल 'व्हेअर एल्स इन दि वर्ल्ड आय कुड हॅव फाऊंड सच ए मॅन लाईक युजी' असं एकच विधान आहे.

यावर आता शेवटी व्हॅलेंटाईनला का होईना लुटलेच ना ? असे म्हणायचे असेल तर मी अगोदरच असं म्हणून ठेऊ इच्छितो की माणसांदरम्यान ऋणानुबंध निर्माण होऊच शकत नाहीत असे ज्याला वाटत असेल त्याने असा जरुर विचार करावा.

जे.कृष्णमुर्ति आणि युजींच्या तत्वज्ञानात काय फरक आहे ?

मलाही माहित नाही. तो समजून घ्यावा लागेल.

आत्मशून्य's picture

16 Nov 2011 - 3:22 am | आत्मशून्य

.

दिलेले संदर्भ वाचले. येथे शून्यवादाचे तत्त्वज्ञानही आहे, आणि यूजी हे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात त्या तत्त्वाला जमेल तितके प्रामाणिकही होते. त्यांच्या अनुयायांबाबत आपली "जो जे वांछील" अशी भूमिका हवी. (इतपत लेखकाशी असहमती सांगतो आहे.)

महेश भट यांच्यासह संवादाची चित्रफीत बघितली. जर अनुयायांना यूजी यांची तत्त्व-प्रामाणिक स्थिती हवी असून मिळवता येत नसेल, तर तत्त्वज्ञान शिकवण्याच्या पद्धतीचा तरी विरोध करण्यालायक आहे. (इतपत सहमती सांगतो आहे.)

मला पूर्ण शून्यवादाचे तत्त्वज्ञान पुरते पटत नाही. त्यातील (म्हणजे नेमके युजी नव्हे, तर शून्यवादातील) कुठला भाग पटतो, आणि कुठला भाग पटत नाही, ते वेगळ्या लेखात लिहिलेले आहे.

ऋषिकेश's picture

16 Nov 2011 - 9:28 am | ऋषिकेश

आतापर्यंत मी जितके युजींचे जे लिखाण वाचले आहे ते वाचुन मला अजिबात पटलेले नाहि.. उगाच आपलं कै च्या कै लिहायचा हा माणूस (असं मला वाटलं.)

युजींचं वाचलं की पुलं च्या "आमच्या गुरुदेवांकडे चला.. मग तुम्हाला ब्लड म्हणून नाहि प्रेशर म्हणून नाही... काहि राहणार नाही" हे वाक्य आठवतं! ;)

युजींचं तत्वज्ञान (!! हा शब्द तरी कसा वापरावा??!) किंवा त्यांची विचारस्थिती (हे जास्त बरोबर होईल मला वाटतं)
हे नक्कीच

१. एकदम फारच टाकाऊ वाटेल
किंवा
२. एकदम फारच आकर्षून घेणारं वाटेल

या दोन एक्स्ट्रीम्सचंच आहे.

त्यांचं रिअलायझेशन (पुन्हा त्यांचे विचार किंवा त्यांची मतं हा शब्द टाळतोय..) निव्वळ थिऑरिटिकली योग्य्/बरोबर्/सत्य/ परम सत्य असं काहीही असू शकेल. तशा अनेक कन्सेप्टस प्युअर थिअरीमधे मान्य करण्यासारख्या असतात (मल्टिव्हर्स/ पॅरेलल युनिव्हर्स/ एन्-डायमेन्शनल जॉमेट्री / वक्राकार स्पेसटाईम.)

पण ...

आपण शेवटी प्रत्येक विचाराचा (भले मिथ्या आयुष्य का असेना पण) आपल्या आयुष्यातला रिलेव्हन्स बघतोच..

आणि या युजींच्या विचारांचा "उपयोग" किंवा त्याने काही "फरक पडत असल्याचं" युजींनीही अमान्यच केलं असेल..

शिवाय युजी काही सिद्धही करु शकत नाहीत / इच्छित नाहीत..

"समजून घेण्यासारखं काही नाही" हा एक विचार आहे. पण तो अर्थहीन आहे. (थ्री डायमेन्शनल स्पेसमधे (०,०,०) असाही एक पॉईंट असतो.. पण त्यामधे एक्स वाय आणि झेड मधल्या परस्पर ओरिएंटेशनची स्पेसिफिसिटी नष्ट झालेली असते.. त्यामुळे या बिंदूचे ज्ञान होऊन किंवा न होऊन खास काही फरक पडतो असे नव्हे..)

ऑल सेड अँड डन: युजींच्या "विचारां"ची थिअरी मांडणं म्हणजे "मी याक्षणी गाढ झोपेत आहे" असं मोठ्याने ओरडून सांगण्यासारखं पॅरेडॉक्सिकल आहे..

पुलंचं एक वाक्य आठवलं ते देण्याचा मोह अनावर होतोय..

>>>>>>>>>>

"तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापेक्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल !"

आत्मशून्य's picture

16 Nov 2011 - 5:32 pm | आत्मशून्य

तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय?
फारच सूंदर वाक्य. निराश मनाला तर एकदम उल्हासीत करणारं, हवहवस वाटणारं. भौतीक सूखं राखण्याच्या नादात दमलेल्या प्रत्येकाला क्षणापूरतं आपलसं वाटणारं. पण काळ्या दगडावरची रेघ असतं तर ज्यांनी दारासमोर फुलबाग केली आहे! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागतो हे संपूर्ण अनूभवलेलं आहे ते शून्याला भागायच्या फंदात कधीच पडले नसते.

तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय?

:)

मन१'s picture

16 Nov 2011 - 11:59 am | मन१

"रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग " असे प्रत्यक्सहत कधीच हातात तल्वार न घेणारे, "मौ मेणाहूनी" असलेले आमचे तुकोबा का म्हणत असतील, कुनाशी युद्ध करत असतील ह्याची पुसटशी कल्पना येते आहे (की कल्पना आल्याचा भास होतोय?)

बाकी, यकुच्या जोशात(मराठी गंडलं) लिहिल्यासारख्या वाटणार्‍या भाषेतही आध्यात्मिक गुरु बाजारात बसले आहेत
किंवा अ ब्युटिफुल व्हायोलन्स अशी अनेक वाक्ये गंमतीशीर वाटतात.
बाकी युजींचा इतका अभ्यास केलात हे उत्तमच. पण तरीही आम्ही तरी वरती गविंच्या प्रतिसादातल्या पुलंशी ११०% सहमत. भरपूर खा, व्यायाम करा. एखादा छंद जोपासा. कुणाच्या चेहर्‍यावर हसू आणता आलं तर ते करा.
तत्वज्ञान वाचत बसण्याइतकं मानवी आयुष्य पुरेसं नाही. थोडक्यात, "तुझे आहे तुजपाशी" च्या एका प्रयोगाला मी माझ्या मित्रांना स्पॉन्सर करण्यास तयार आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

16 Nov 2011 - 2:44 pm | अविनाशकुलकर्णी

यु.जी समलिंगी संभोगी होता...

ओशोचे एक मत

मी रजनीशांचं बरच वाचलेलं आहे.
अंतर्जालावर उपलब्ध असलेल्या युजींबद्दलच्या रजनीशांच्या मतांमध्ये आपण जे म्हणालात ते कुठेही उपलब्ध नाही. हे कुठे लिहीलेले असेल, आणि ते आपल्याकडे उपलब्ध असेल ते इथे टाकू शकता का?
हा खोडसाळपणा मनात धरुन दिलेला प्रतिसाद असेल तर आपण इथे सांगितलेल्या ओशोचे तथाकथित मत सिद्ध करण्यासाठी आपण काहीही पुरावा देऊ शकणार नाही, आणि तशी अपेक्षाही नाही.

चित्रा's picture

16 Nov 2011 - 8:16 pm | चित्रा

का समलिंगी संभोगी आहे.
य विषमलिंगी संभोगी आहे.
फ पुरुष आहे.
र स्त्री आहे.
क काळा आहे.
प गोरी आहे.
ड नकटी आहे.
तो ब्रह्मचारी आहे.

कोणाही माणसाने काय सांगितलेले आहे ते तत्व आपल्याला पटते का? एवढाच प्रश्न आहे. अर्थात अविनाशकुलकर्णींकडून याचे उत्तर मला अपेक्षित नाही. (त्यांचे म्हणणे अधिक जाणून घेण्याची उत्सुकता मला वाटली नाही हे माझ्यापुरते उत्तर).

अविनाशकुलकर्णी's picture

17 Nov 2011 - 12:16 am | अविनाशकुलकर्णी

सदर मत मेी एका पुस्तकात वाचले होत पण संधर्भ लागत नाहि..देवु शकत नाहि ..पुस्त्क खुप जुने आहे..
त्या मुळे विधान मागे घेत आहे..
यशवंत रावाना मानसीक यातना झाल्या त्या बद्दल दिलगीर आहोत...

सदर मत मेी एका पुस्तकात वाचले होत पण संधर्भ लागत नाहि..देवु शकत नाहि ..पुस्त्क खुप जुने आहे.. त्या मुळे विधान मागे घेत आहे.. यशवंत रावाना मानसीक यातना झाल्या त्या बद्दल दिलगीर आहोत...

स्वतःचा काहीही अनुभव नसताना आणि फक्त रजनीशांच्या एका 'जुन्या पुस्तकात' वाचल्याबद्दल आणि ते इथे सादर न करु शकल्याबद्दल दिलगीर झालात ते योग्यच.
पण रजनीशांचं असं मत असलेलं कोणतंही पुस्तक असू शकत नाही कारण रजनीशांची सगळी मते (सन ६०-६२ पासुनची नंतरची ) जे. कृष्णमूर्तींबद्दल आहेत, युजी कृष्णमूर्तींबद्दल नव्हे!
मला कसल्याही मानसिक यातना झाल्या नाहीत.

प्यारे१'s picture

17 Nov 2011 - 12:53 pm | प्यारे१

>>>>स्वतःचा काहीही अनुभव नसताना

फुटलो! ;)
आपल्याला नक्की काय म्हणायचे होते यकु साहेब? ;)

आपल्याला नक्की काय म्हणायचे होते

तेच हो!

यकु साहेब? Wink

मायला लोक आम्हाला पूर्णपणे सटकलेली केस समजायला लागले राव! ;-)
जाऊ द्या.. कि फरक पैंदा ;-)

आनंदी गोपाळ's picture

21 Nov 2011 - 8:01 pm | आनंदी गोपाळ

आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की बाजारातून दोन पैशाची भांग आणून खाल्ली की तत्त्वज्ञानातल्या शेकडो नवनव्या कल्पना सुचू शकतात.

२ पैशात भांग आजकाल कुठे मिळते?

शिक्षकांना भांगे(च्या तत्वज्ञाना)बद्दल कुठे माहिती मिळाली?

प्रास's picture

21 Nov 2011 - 8:15 pm | प्रास

२ पैशात भांग आजकाल कुठे मिळते?

२ पैशात भांग मिळणारे दिवस गेले आणि तेवढ्याला भांग आणणारे शिक्षकही गेले.....

शिक्षकांना भांगे(च्या तत्वज्ञाना)बद्दल कुठे माहिती मिळाली?

त्या वेळचे शिक्षक अगदी स्वानुभवसंपन्न होते असं म्हणायला हरकत नाही....

:-)

आनंदी गोपाळ's picture

28 Nov 2011 - 9:24 pm | आनंदी गोपाळ

तुम्हाला हे २ पैशे बक्षिस!

ता.क. लेख आवडलेला आहे. म्हणून छापावाला एक अन काटावाला एक अशे २ दोन पैसे दिले आहेत. २ वर २ फ्री