पेपरातलं काम

Primary tabs

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
29 Oct 2011 - 3:37 am

कालच्या धाग्याच्या निमित्तानं काही जणांनी वृत्तपत्रातले किस्से लिहायला सांगितले आहे. असे किस्से लिहायला माणूस फिल्डवर, किमान संपादकीय विभागात काम केलेला असावा लागतो. कारण पेपरची भवती न भवती त्याच विभागात होते. मी मात्र माझ्या पहिल्या नोकरीत जाहिरात विभागाचा भाषांतरकार होतो.
आमचा संपादकीयशी संबंध यायचा, पण आम्‍ही केलेल्‍या जाहिराती, जाहिरात संपादकीय मजकुरापुरताच.

रेल्वे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, असतील-नसतील तेवढी मंत्रालये यांच्यासोबत खंडीभर सरकारी खात्यांच्या निविदा सूचना, शासकीय महत्वाच्या दिवशी येणार्‍या पान-अर्ध्‍या पानाच्या जाहिराती, जाहिरात संपादकीय, झालंच तर दररोजचे मराठीतून हिंदी-इंग्रजीत जाणारे, हिंदी-इंग्रजीतून मराठीत येणारे उठावणे (obiturial), अमुक फ्रेंडशीप क्लब, तमुक शक्तीदायक तेल, आमचे अशीलाचे शिलावर शिंतोडे उडवल्‍याबद्दल अॅड. फलाणे बिस्‍ताणेकडून रजीस्‍टर्ड नोटीस हा सगळा खुर्दा मराठी-हिंदी-इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत करणे हे आमचे काम.

पहिले काही दिवस तर ते लोक माझी थट्टा करीत आहेत असा माझा वहीम होता. का? वाचा -

''भारताच्या राष्‍ट्रपतींच्यावतीने (हे लिहायला लय भारी वाटायचं) आणि त्यांचेकरिता विभागीय नियंत्रक, उत्तर रेल्‍वे, डी.आर.एम. संकुल, तिसरा मजला, गोरखपूर यांच्याकडून उत्तर रेल्वेच्या गोरखपूर विभागात खालील बाबी वास्तविक काम सुरू झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत पूर्ततेसाठी दि.15 नोव्हेंबर 2011 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंत (निविदा प्राप्ती दिनांक) वरील कार्यालयात पोहोचतील अशा रितीने व दि. 30 नोव्हेंबर 2011 रोजी दुपारी 3.00 वाजता (निविदा उघडण्‍याचा दिनांक) त्याच कार्यालयात उघडल्या जाण्‍यासाठी गेल्या तीन वर्षांत प्रत्येकी रु. 15, 00, 000/- लाख (अक्षरी रुपये पंधरा लाख फक्त) निविदा मूल्‍याची अशाप्रकारची किमान तीन कामे निष्‍पादीत केलेल्या व सनदी लेखापरिक्षकाकडून मागील पाच वर्षांपासून वर्षनिहाय उलाढालीचे लेखापरिक्षित ताळेबंद सादर करू शकणार्‍या व डी.आर.एम. गोरखपूर यांच्याकडे नोंदणीकृत असणार्‍या नामांकित व अधिकारप्राप्त कंत्राटदारांकडून नोंदणीकृत टपालाने योग्य प्रकारे मोहोरबंद केलेल्या लिफाफा ''अ'' आणि ''ब'' मध्‍ये (लिफाफा अ मध्‍ये तांत्रिक बोली व लिफाफा ब मध्‍ये किंमत बोली) निविदा आमंत्रित करण्‍यात येत आहेत

.

असल्या करामती मला बिनचुकपणे दिवसाला किमान 4-5 वेळा करुन दाखवाव्या लागायच्या. नमुना म्हणून एक परिच्‍छेद दिलाय.. बाबींचे वर्णन दिले तर पुन्हा तुम्ही मी लिहिलेलं वाचायला शिल्‍लक राहणार नाही ही भीती आहे. रेल्‍वेच्या गोरखपूर भांडारात पूर्णविरामाचा तुडवडा होता, की तिथल्या आद्य हेड क्लार्कची पूर्णविरामाशी काही जानी दुष्‍मनी होती, की आद्य हेड क्लार्कने लिहिलेलाच ड्राफ्‍ट सुरु ठेवण्‍याची रेल्‍वेची खानदानी परंपरा पुढे सुरु होती हे मला नोकरी सोडेपर्यंत कळालं नाही. बरं एवढ्‍या मोठ्‍या परिच्छेदाला सुटी- सुटी वाक्यं लिहून पूर्णविरामानं तोडायला जावं तर लगेच रेल्‍वे शुद्धीपत्रक मागायची.

सोबत देशपांडे काका नावाचे सिनीयर होते. ते शिक्षणाधिकारी म्‍हणून निवृत्त होऊन सतत 13 वर्षांपासून भाषांतराचं काम करीत होते. ते सात वाजले की घरी निघायचे... नेमक्या त्यावेळी जाहिरात विभागातून जाहिरात घेऊन कुणी आलं तर सरळ हात जोडून म्हणायचे, ''आता मला माफ करा..''
नोकरीवर रुजू झालो त्या दिवशी त्‍यांनी मला ऑफिसमध्‍ये सगळीकडे फिरवून लोकांच्या ओळखी करून दिल्या. प्रुफ रिडर्स उर्फ मुद्रीत शोधकांची ओळख करुन देताना त्यांनी 'हे आपल्या ऑफिसमधले फार विद्वान लोक आहेत बरं का..' असं ते म्‍हणाल्‍याचं मला आठवतं.
डेस्‍कवर ओळीनं बसलेल्‍या त्या चार-पाच विद्वानांपैकी दोन जण भांडण लागल्‍यासारखं काहीतरी वाचत होते.. आणि त्यापैकी एक कागदावर चुका दुरुस्‍त करीत होता.
पण मी या कामात रूळलो. सगळ्याच जाहिराती रेल्‍वेच्या नसायच्‍या. डिस्‍प्‍लेची जाहिरात असेल तर मजा यायची. जास्‍तीत जास्‍त 2 परिच्‍छेद, एक मथळा, उपमथळा आणि बोधवाक्‍य, ब्रीदवाक्य भाषांतरीत केलं की काम खलास! रेल्‍वेचं Serving Customers With A Smile ''ग्राहकांची सस्‍मित सेवा'' हे मराठीतलं बोधवाक्‍य कुठं वाचलंत तर ती आमचीच करामत आहे.. बरेच भाषांतरकार त्याचं ''हसतमुखाने ग्राहकांना सेवा देतात'' किंवा ''ग्राहकांची स्‍मितसह सेवा'' असलं काहीतरी अचाट करतात.. पण ते काही खरं नाही.

एकदा मात्र खैर झाली. काम करून रात्री घरी गेलो. सकाळी दहा साडेदहा वाजता हपीसचा फोन.
''लवकर ये.. काय लिहीलंस जाहिरातीत कालच्‍या.. लोकांनी अंक जाळलेत आपले क्रांती चौकात..''
गाडी काढून ऑफिसमध्‍ये पोचतोय तो गेटवर पोलीसांची जीप. म्हटलं असेल नेहमीसारखी.
पण पुढं गेलो तर चार-पाच कॉन्‍स्‍टेबल दांडके-बंदुका घेऊन उभे.
वर गेलो.
काल एका महापुरुषाची जयंती होती. नेहमीप्रमाणं केंद्रीय मंत्रालयांच्या दोन अडीच पानं भरून जाहीराती आल्‍या होत्‍या. त्‍या मीच एकट्यानं केल्‍या होत्‍या.
आमचे अंक जाळायला कारणीभूत झालेलं माझं वाक्‍य होतं ''कृतज्ञ राष्‍ट्राची विनम्र श्रद्धांजली!''
हिंदी कॉपीत वापरलेला ''श्रद्धांजली'' हा शब्द मी मराठीतपण तसाच ठेवला होता. तो एकच शब्द. पण आमच्या नेत्याच्या जन्मदिनी श्रद्धांजली वाहणारा कोण तो शहाणा म्हणून कार्यकर्त्यांनी आमचे अंक जाळले.

टेक्‍नीकली चूक झाली होती.
आमचे जाहिरात व्यवस्‍थापक म्हणे तु कुठेही काही बोलायचं नाही. तुला यातलं काही माहित नाही. थोड्या वेळानं त्यांचा मोर्चा येईल.
ते कार्यकारी संचालकांसोबत बोलतील.
मी म्हटलं बरं. मला कुठे मार खायची हौस आहे.
माझा या प्रकारातला सहभाग एवढाच.
मी केलेली तीच जाहिरात आमच्या मुंबई आवृत्तीनंही छापली होती. पण तिथं कुणाला काही चूक वाटलं नव्हतं. अंक जाळणं वगैरे तर बिलकुल झालं नव्हतं.
आमच्या अॅड मॅनेजरने तोपर्यंत ''कृतज्ञ राष्‍ट्र की विनम्र श्रद्धांजली!'' ही मूळ हिंदी कॉपी, मी केलेलं ''कृतज्ञ राष्‍ट्राची विनम्र श्रद्धांजली!'' हे भाषांतर दोन्‍ही ताडून पाहिलं होतं.
मुद्रीत शोधकांशींही त्‍यांचं बोलणं झालं होतं.
अॅड मॅनेजरने काय तो निर्णय घेतला.
कार्यकर्ते आले. त्यांनी संचालकांसोबत चर्चा केली. जयंतीसाठी देणगी स्‍वीकारून ते शांत झाले म्हणे.
भाषांतरकार म्हणून केलेल्या नोकरीत घडलेला हा असला एकच किस्सा.

बाकी किस्से पुन्हा कधीतरी...

भाषाव्याकरणशब्दक्रीडाशब्दार्थसमाजप्रकटनप्रतिसादमाध्यमवेधअनुभवभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

29 Oct 2011 - 5:53 am | बहुगुणी

मजा आली वाचतांना! तुम्हालाही आणखीही बरेच मजेचे अनुभव आले असतील (तुम्हाला त्या 'श्रद्धांजली' प्रकरणावरून त्रास झाला असता मजेचं सजेत रुपांतर झालं असतं! अ‍ॅड मॅनेजरने वाचवलं म्हणायचं.)

आता भाषांतरकार म्हणून काम करतांना आलेले अनुभव झाले की फील्डवरचे आणि संपादकीय विभागातीलही अनुभव येऊ द्यात.

प्रदीप's picture

29 Oct 2011 - 10:52 am | प्रदीप

म्हणतो, हे किस्से छानच होते, अजून येऊद्यात.

लेखन आवडले.
असे दंगे घडवणं आणि देणगी स्विकारणं हा मोठा व्यवसाय झालाय म्हणायला हवं.
अजूनही किस्से लिहा.
जर संपादकांच्या बाजूने लिहिलेत तर तुम्हाला एकवीस लाडू बक्षिस देण्यात येतील.;) (हलके घ्या.)

तुम्हाला एकवीस लाडू बक्षिस देण्यात येतील. (हलके घ्या.)

आज्जे, लाडु हलके नकोत... भरलेले पायजेत.... चालणार नाय....

रेल्वेची झैरात अन तुमचा अनुभव भारीच हो!!
किस्से लिहुन काढाच.

पाषाणभेद's picture

29 Oct 2011 - 7:52 am | पाषाणभेद

छान अनुभव कथन

अर्धवट's picture

29 Oct 2011 - 7:53 am | अर्धवट

हायला.. मी लहान असताना, अशी टेंडर वगैरे फार मनापासून वाचायचो, मला तो भाषेचा लहेजा फार आवडायचा

पाषाणभेद's picture

29 Oct 2011 - 8:56 am | पाषाणभेद

क्या बात है अर्धवट. मी पण टेंडरे, छोट्या झैराती, जाहिर फारकत, जाहीर नोटीस, नावात बदल, हरवले सापडले आवडीने वाचतो.

मागे आम्ही येथेपण एक निवीदा सुचना काढली होती.

पाभे आणि अर्धवट,
मी पण लहानपणीपासून त्या जाहीराती वाचायचो.
म्हणून तर त्यांनी घेतलेल्या मुलाखतीत पास झालो ना ;-)
पण त्या वाचायलाच तेवढी मजा यायची.. स्वतः करताना मात्र नको हे जीणं असं वाटायचं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2011 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या. बाकी तुमचा दिव्य मराठी दिव्यच आहे, यात काही वाद नाही. :)
संध्यानंदचा भाऊ दिव्यानंद तसंच वाटतं मला ते दैनिक.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

29 Oct 2011 - 11:39 am | प्रचेतस

मजा आली वाचून. आता पुढच्या किश्श्यांची वाट पाहतो आहे.

बाकी ते दिव्य मराठी खरोखरच दिव्य आहे. मध्यंतरी नासिकला गेलो होतो तर तिथे घरोघरी दिव्य मराठीने वाटले पार्क अ‍ॅवेन्यू चे पावडरचे डबे आणि शेविंग क्रीम आहेत.

प्रदीप's picture

29 Oct 2011 - 12:01 pm | प्रदीप

तिथे घरोघरी दिव्य मराठीने वाटले पार्क अ‍ॅवेन्यू चे पावडरचे डबे आणि शेविंग क्रीम आहेत.

हेही मराठी दिव्यच आहे!

प्रचेतस's picture

29 Oct 2011 - 12:13 pm | प्रचेतस

समजून घ्या हो मालक,
हे मराठी दिव्य नसून घाईघाईने टंकतांना झालेली दिव्य चूक आहे.

धन्या's picture

29 Oct 2011 - 11:43 am | धन्या

या लेखाच्या निमित्ताने तुम्ही वृत्तपत्रात काम करणारे भाषांतरकार आहात हे नक्की झाले. ;)

सुहास झेले's picture

29 Oct 2011 - 12:10 pm | सुहास झेले

सहीच.. अजुन येऊ देत :) :)

जाई.'s picture

29 Oct 2011 - 2:08 pm | जाई.

मस्त आहेत किस्से

स्मिता.'s picture

29 Oct 2011 - 3:08 pm | स्मिता.

सगळे किस्से मजेशीर आहेत. आणखी किस्से येवू द्यात.

-(पेपरातल्या निविदा-नोटिसा कधीच न वाचणारी :P ) स्मिता

मन१'s picture

29 Oct 2011 - 6:01 pm | मन१

लेखाचा शेवट ट्विस्ट(देणगी वगैरे) तर लै भारी.

मागे असेच एकदा एका IAS ऑफिसरला सस्पेंड का dismiss केले म्हणे. त्याने पेप्रात २ ऑक्टोबर ला दिलेल्या सरकारी जाहिरातीचे शीर्षक होते:-
"आपण सदैव राष्ट्राच्या ऋणात रहाल"
आणि खाली राष्ट्रपित्याचा फोटो!!

भास्कर केन्डे's picture

31 Oct 2011 - 8:43 pm | भास्कर केन्डे

यशवंतरांचे मूळ किस्से आणि त्याला शोभनारा हा प्रतिसाद, एकदम भन्नाट!

पैसा's picture

29 Oct 2011 - 7:43 pm | पैसा

असलं दिव्य मराठी जाहिरातींना वापरून अजून तुझं लिखाण मस्त होतंय, यावरून तू किती चांगला लेखक असला पाहिजेस हे समजतंय!

इंटरनेटस्नेही's picture

29 Oct 2011 - 8:24 pm | इंटरनेटस्नेही

वा! वा! चान!! चान!!

दोस्तहो.. किस्सा आवडलेल्या, न आवडलेल्या सगळ्यांना धन्यवाद बरं का !
@ धना: अरे मी आता शीएमएमआय लेव्हल ३ मध्ये काम करतो नव्हं का? ;-)
जुना भाषांतरकार होतो रे.
@ इंटेशः नोंद घेतल्या गेली आहे ;-)

आत्मशून्य's picture

31 Oct 2011 - 9:26 pm | आत्मशून्य

.