"बेतार योजना और समन्वय स्कंध" असा बोर्ड असलेल्या हपीसात बरोब्बर चौदा वर्षांपूर्वी मी एरॉनॉटिकल रेडिओ लायसेन्सच्या परीक्षेला गेलो होतो. त्यावेळी पाचदहा टक्के पासिंग रेट असलेली ही परीक्षा.. पण तरीही त्यावेळी माझ्यासोबत असलेले सर्व शिकाऊ पायलट मित्र दिल्लीत पोचण्यापूर्वीपासूनच परीक्षेपेक्षा जास्त तीव्रतेने वाट पहात होते ती परीक्षेनंतर त्याच संध्याकाळी ठरलेल्या टीजीआय फ्रायडेमधल्या पार्टीची.
मी त्यावेळी "घेत" नसल्याने, शिव शिव करुन त्या सर्वांना वसंतविहारमधे "ड्रॉप" केलं आणि तीच गाडी दिल्लीभर फिरवून तीन तासांनी परत त्यांना पिकअप करायला आलो.
तेव्हा मोबाईल वगैरे काही सर्वांकडे नसायचे. तेव्हा आता टीजीआयएफमधे आत जाऊन त्यांना बाहेर काढणं आलं.
मी त्या ठिकाणी दरवाज्यातून आत शिरताशिरताच लालचुटुक रंगाचा टीजीआय फ्रायडेचा युनिफॉर्म घातलेल्या दोन अत्यंत सुंदर अल्लड तरुणी बागडत सुहास्यवदनाने माझ्याकडे आल्या. त्यांचा जोश आणि उत्फुल्लता बघून, मी तत्कालयोग्य ती काळजी न घेतल्यास आता त्या दोघी मला झळंबतील आणि माझे हात दोन्हीकडून पकडून "सारे के सारे गामा को लेके" नाचत मला टेबलकडे घेऊन जातील अशी भीती वाटायला लागली.
"माझे मित्र आत आधीपासून बसले आहेत", मी थरथरत त्यांना सांगितलं.
"ओह ओके.. धिस वे प्लीज..", करत त्यांनी मला आत जायचा रस्ता दाखवला.
आत खूप मजेशीर अँबियन्स असलेलं रेस्टॉरंट होतं. त्यात भिंतीवर, छतावर कुठेही बास्केटबॉल्स म्हणा, रॅकेट्स म्हणा, स्पोर्ट सायकल म्हणा असे आयकॉन्स चिकटवले होते.. म्हणजे खरीखुरी सायकल बरं का..
ज्यांचे शर्ट वेगवेगळ्या मजेशीर बिल्ल्यांनी पूर्ण भरले आहेत असे वेटर आणि पोरी (वेट्रेसेस असाव्यात..) सुळसुळ धावत होते. एकूण माहोल अलिशान, थंड आणि अत्यंत दिलखेचक होता.
धुंडाधुंड केल्यावर एका टेबलापाशी माझे चारी मित्र लाल नाक करुन आणि जडावलेल्या डोळ्यांनी बसलेले दिसले. मग चला चला करुन त्यांना हाकलत बाहेर काढलं. एकाला कारपर्यंत सोडावा तर उरलेल्या तिघांतले दोघे गायब, त्यांना शोधून गाडीत बसवावं तर गाडीतला मूळ आयटेम गायब. मग त्याला शोधायला जावं तर तो रस्त्यात आडवा झोपलेला आणि भोवती लोक.
असं सगळं निस्तरत सर्वांना फिजिकली उचलून गाडीत टाकलं आणि परत आणलं.
यातल्या मित्रांच्या अतिमद्यपानाविषयीचा चिडीखेरीज त्या ठिकाणाविषयी मात्र एक मजेशीर नॉस्टॅल्जिया तयार झाला होता. यथावकाश मुंबईतही टीजीआय फ्रायडे निघालं. आणखीही बर्याच शहरात.. पण पहिल्या आणि मूळ ठिकाणाची मजा काही वेगळीच.. अशी माझी समजूत होती.
मग आत्ताच तीनेक आठवड्यांपूर्वी वसंतविहारला हे शोधत गेलो. खूप वेळ घालवल्यावर समजलं की ते आता वसंतविहारमधे नाहीच मुळी.. घ्या..
ते जवळच्या वसंतकुंजमधे शिफ्ट झालेलं आहे.
वसंतकुंजमधे शेवटी ते सापडलं..
अहाहा.. तिथे तशाच लालचुटुक कपड्यातल्या सुंदर अल्लड तरुणी होत्या.. पण त्यांनी मला दारातच अडवून सांगितलं की आत दोन पार्ट्या चालू आहेत आणि आत्ता आम्ही तुम्हाला आत सोडू शकत नाही.
झाला की पोपट.. अरे हाताला धरुन बागडत आत नेऊ नका. पण हे असं हाकलून देणं?
तरीही थोड्या वेळाने हिंडूनफिरुन मी परत आलो. तोसवर यांचं दार उघडलं होतं.
मग रीतसर स्वागत झालं..
एंट्री केल्यावरच पुन्हा भिंतींवर चिकटलेल्या सायकली आणि खेळणी बघून नॉस्टाल्जिया परत आला.
बरंसं टेबल पकडून बूड टेकलं. सोबत असलेल्या सुपुत्राला तिथल्या एका वेटरने किंवा पोरीने कलरिंग बुक आणि क्रेयॉन्सचं पॅकेट दिलं, तो खूष होऊन त्यात गुंगला.. हे बरंच झालं. आणखीही बरीच पोरं धावर्या मुंग्यांसारखी पळापळ करत होती.
मग मी मेन्यूकडे मोर्चा वळवला. मेन्यूकार्ड व्हायब्रंट होतं एकदम..
साधारण मेक्सिकन, कॅरेबियन, इटालियन आणि विविध देशांतले पदार्थ दिसत होते. काहीकाही उच्चारापलीकडले होते.
अगदी निवडक काहींची जंत्री इथे देतो:
-कॅरेबियन सीफूड आणि चिकन राईस कॉम्बिनेशन. (सॉटीड श्रिंप, कलमारी, चिकन सॉसेज, राईस, बटर, करी आणि सीझनिंग या सर्वांचं कॉम्बिनेशन..)
-फ्रायडेज् स्पेशल श्रिंप. (कॉकटेल टार्टर सॉससहित बटरमधे सोनेरी तांबूस तळलेले बारा बॅटर्ड प्रॉन्स..)
-टॉर्टिला क्रस्टेड फिश..
-चिकन आल्फ्रेडो पास्ता
शाकाहारींसाठीही बरेच ऑप्शन्स होते.
-Cottage Cheese Tchoupatoulis अशा नावाचा पदार्थ होता. याचा उच्चार सांगून कोणीतरी सहकार्य करावं.
-टस्कन व्हेजिटेबल मेल्ट. मशरूम आणि मोझेरिला चीज + ब्रेड असा काहीसा पदार्थ, सूपसहित.
-व्हेजिटेबल चिमिचांगा.. (काय असावं बरं..)
-गार्डन बर्गर
-बर्याच प्रकारचे पिझ्झे आणि आपला पूर्ण सेल्फ डिझाईंड पिझ्झा बनवून घेण्याचीही सोय होती.
-स्टर फ्राईड थाई टोफू नूडल्स.
असे अजून शंभरेक पदार्थ असावेत, पण हे सर्व पदार्थ चारशे ते सहाशे या किंमतीच्या रेंजमधे होते. हे पाहून मला फार आनंद झाला नाही हे सांगणे नलगे.
मग प्रत्यक्ष टेस्टिंग चालू केलं..
वेगवेगळे "शॉट्स्", लिक्युअर्स, कॉकटेल्स, पिचर्स आणि ज्या ज्या पद्धतीने मद्याची रेलचेल करता येईल तशी केली होती. त्यातही नेहमीचं कॉकटेल आणि एक प्रीमियम कॉकटेल असाही प्रकार होता. सावधान.. नेहमीचं कॉकटेल ४०० ते ६०० च्या रेंजमधे तर प्रीमियम म्हटलं की तेच ते कॉकटेल अधिक चांगल्या स्वरुपात (अधिक प्रमाणात) पेश करुन त्याची किंमत आठशेवर जाते.
अँबियन्स मस्त होता. बार लखलखत होता. हॅपी अवर्स चालू होते..
कॉकटेल मागवलं.. म्हणजे आपला नेहमीचा लोंग आयलंड आईस टी.. आणि त्यासोबत डायनाबाईट्स नावाचा चीजचा प्रकार मागवला.
इथे एक उचकी लागली. म्हणजे डायनाबाईट्स बरे होते पण लाँग आयलंड म्हणजे एकदम पिचकावणी.. त्यात हॅपी अवर्समुळे एकावर एक फ्री..एवढा वाईट लाँग आयलंड यापूर्वी टेस्ट केला नव्हता..
डायनाबाईट्स्
डायनाबाईट्स् बरे होते म्हणजे चावायला बरे होते इतकंच..टेस्ट काही विशेष नाहीच..
मॉकटेलचा एक नमुना म्हणून नोव्हेंबर सनब्रीझ नावाचं ड्रिंक मागवलं. हे प्रकरण लाईम, अॅपल आणि क्रॅनबेरी यांचं स्पार्कलिंग मिश्रण असल्याचं कळलं..
नोव्हेंबर सनब्रीझः
हेही लाँग आयलंडशी स्पर्धा करत होतं. पुळकावणीपणात.. ते तुम्हाला या ग्लासाच्या फोटोवरुनही कळेलच..
ऐला, लोअरपरळ स्टेशनबाहेर दोनदोन रुपयांना लिंबू सरबत विकतात ते यापेक्षा वीसपट चांगलं..
वरुन हॅपी अवर्स.. म्हणजे हे नोव्हेंबर सनब्रीझही एकावर एक फ्री एकावेळी आणूनच ठेवलं.. वेस्टेज..
मग अजून काही वेगळं मागवून पाहू असं म्हणून काही ऑर्डर दिल्या आणि त्या येईपर्यंत जरा इकडेतिकडे फेरी मारून रेस्टॉरंटच्या कानाकोपर्यात नजर टाकली.
यथावकाश अर्थात सावकाश, ऑर्डरची टेबलवर डिलिव्हरी झाली..
पायनॅपल मोहितो फिश असा अनवट वाटणारा पदार्थ मी मागवला होता.. त्यात तसा अननसाचा काही संबंध दिसत नव्हता..स्पॅनिश राईस आणि त्यावर ग्रिल केलेला मासा ठेवलेला.. या ग्रिलमधे पायनॅपल मोहितो पिको दि गार्लो असा काहीतरी मसाला वापरला आहे असं वर्णनात लिहिलं होतं.
याच्यावरचा मासा टेस्टला ठीक होता.. पण तो खालचा भात??? अगागागा..
फिकट बेचव शेझवान राईसच्या वाटेवरचा पण धड चायनीज नाही असा हा मेक्सिकन राईस.. कसाबसा थोडासा खाऊ शकलो..
बरं, वरच्या माश्याची टेस्ट चांगली वाटत होती ते अशासाठी की मसाला लावून ग्रिल केलेला बोनलेस मासा असा कितीसा वाईट लागणार. म्हणून भाताच्या तुलनेत बरा इतकंच..
आता वास्तविक मी इथून उठून जायला हवं होतं.. पण एखाददोन पदार्थ आणि कॉकटेल्सवरुन मत कशाला बनवा, अजून एक संधी देऊच, असं म्हणत एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी मागवू असा विचार केला.
जमैकन चिमिचुरी लॅम्ब स्क्यूअर्स.. जमैकन सीझनिंगमधे घोळवलेली मेंढी आणि ऑलिव्ह ऑईलमधे ग्रिल्ड, असा प्रकार ऑर्डर केला. लॅम्ब म्हणजे मस्त रसरशीत असेल अशा आशेने.
पुन्हा आरामशीर तब्ब्येतीत वेळ लावून हा पदार्थ माझ्यासमोर आला:
हे राम..ती लॅम्ब ऊर्फ वातड गच्च गोळा त्या स्टिकवरुन निघेनाच. काडीसकट खायची वेळ आली. बर्याच झटापटीनंतर मी एक तुकडा स्टिकपासून अलग केला. तो तोंडात घातला मात्र.. जबड्याची पूर्ण शक्ती वापरुनही तो चावला जाईना. चबार चबार रबरासारखा तीनचार मिनिटं चावून तो तसाच गिळून टाकला. पुढचा तुकडा खाण्याचा धीर होईना. कसेबसे अजून दोन तुकडे खाल्ले आणि बाकीचं ठेवून दिलं...
पुन्हा या लॅम्बच्या खालीही तो अत्याचारी भात होता. फ्लेवर वेगळा पण दर्जा तोच.. यावेळी म्हणे पाएला राईस म्हणून प्रकार होता..त्यात स्पायसी रेड पेपर अँड पायनॅपल साल्सा.. मला तर कशात काही लागत नव्हतं.. नुसता बेचव खारा भात.
जिभेच्या आणि दातांच्या एवढ्या विटंबनेनंतर डेझर्ट मागवायची इच्छा पार मरुन गेली. नारळाच्या दुधाचं काहीतरी कॅरेबियन डेझर्ट मनात भरलं होतं पण या सर्वांनंतर त्या डेझर्टातही नारळाचा चोथाच वाट्याला येईल अशी खात्री वाटायला लागली. म्हणून ते मागवायचा बेत रहित केला.
हे असलंच खाऊन माझे मित्र टीजीआय फ्रायडेवर इतके खूष होते यावर विश्वास बसेना. की चौदा वर्षांत इतकी अधोगती झाली... ??
नॉस्टाल्जिया आपल्या जागी आणि चवढव आपल्या जागी असा धडा घेऊन प्रचंड हलक्या खिशाने मी टीजीआय फ्रायडे सोडलं..
बाहेर पडलो.. पत्नी म्हणाली, आता कुठे जाऊया?
"कुठेतरी जाऊन नीट जेवूया आता".. मी पडक्या चेहर्याने म्हणालो..
......................
......................
......................
......................
......................
नोंद....टीजीआय फ्रायडे, फोटोजमधले मेन्यूकार्ड, आयकॉन्स वगैरे सर्व किंवा त्यातले काही टीजीआय फ्रायडेचे ट्रेडमार्क्स किंवा लोगो आहेत / असू शकतात. ते इथे फोटोत आलेत इतकंच..
प्रतिक्रिया
24 Oct 2011 - 1:25 pm | सुहास झेले
अँबियन्स बघून एकदम फ्रेश वाटलं...बार पण मस्त दिसतोय :) :)
बाकी खायचे पदार्थ बघून खास वाटलं नाही... आधी कधी नावं ऐकलंसुद्धा नव्हत. त्यामुळे आता कधी टेस्ट करायला जाईन, ही शंकाच आहे ;-) ;-)
24 Oct 2011 - 4:12 pm | गवि
सुहास, मुंबईत पण आहेत २ ठिकाणी. इन्फिनिटी मॉलमधे आहे एक.
बंगळुरात पण आहेत २ त्यांचे आउटलेट्स.
24 Oct 2011 - 1:45 pm | प्रचेतस
टिजीआयने चांगलाच पचका केला म्हणायचा.
बाकी त्या लालचुटुक कपड्यातल्या सुंदर अल्लड तरुणींचे फोटू न टाकल्याबद्दल तुमचा निषेध. :)
24 Oct 2011 - 1:50 pm | मदनबाण
त्या लालचुटुक कपड्यातल्या सुंदर अल्लड तरुणींचे फोटू न टाकल्याबद्दल तुमचा निषेध.
सहमत... ;)
24 Oct 2011 - 1:56 pm | पैसा
गवि, तुमच्या मित्रांची जी अवस्था तुम्ही वर्णन केलीय, त्यावरून त्याना आपण काय खातोय हे तरी कळत होतं का शंकाच आहे! तेव्हा त्याना तिथलंच काय, काहीही, अगदी रबर आणि कागद खायला घातले असते तरी चांगलेच लागले असते.
24 Oct 2011 - 2:24 pm | समीरसूर
मस्त आहे परीक्षण. चुरचुरीत एकदम.
मला यावरून एक प्रसंग आठवला.
आमच्या कार्यालयातल्या टीमची पार्टी पुणे विद्यापीठ रस्त्यावरच्या पुणे सेंट्रललगतच्या 'पिझ्झेरिया' की अशाच कुठल्याशा विचित्र नावाच्या हॉटेलमध्ये होती. आम्ही उत्साहात गेलो. मला पिझ्झा वगैरे तसा फारसा आवडत नाही. मी एकटा जेवायला बाहेर गेलोय आणि एकदम तब्येतीत पिझ्झा किंवा पास्ता किंवा असेच काही परदेशी खाद्यपदार्थ मागवलेत; सोबत रशियन सलाद किंवा असलंच काही अगम्य नावाचं काहीतरी अगम्य मागवलंय ही कल्पनाच मी करू शकत नाही. पण टीमची पार्टी असल्याने त्या हॉटेलात गेलो. पिझ्झा मागवला. भूक प्रचंड लागली होती. तीन-तीनशे रुपयाच्या पिझ्झ्याचे चतकोर तुकडे प्लेटमध्ये येऊन पडले तेव्हा माझा चेहरा हिंस्त्र झाला.
'एवढंच?'
मी त्रासून म्हटलं. मग अजून पिझ्झा मागवला. त्याचेही असेच एक-दोन चतकोर तुकडे कुत्र्याला शिळी पोळी टाकतात तसे माझ्या ईवल्याशा पानात पडले. मी गप गुमान ते गिळले आणि ३ मिनिटात बापुडवाणा चेहरा करून इकडे-तिकडे बघत राहिलो. बाकीची मंडळी 'ईट्स अमेझिंग, लूक अॅट धिस, इट लूक्स सो टेम्प्टींग, इजन्ट इट? धिस सलाद इज यम्मी' वगैरे उद्गार ऐकू येत होते. मी माझी भूक आणि राग पाण्याच्या घोटासोबत गिळत होतो. अरे ही काय पद्धत झाली? प्रत्येकी पाच-पाचशे रुपये द्यायचे आणि पोटभर खायला पण मिळू नये? काहीतरी विचित्र नावाचे दोन-चार घासांचे पदार्थ द्यायचे आणि आपण त्याला उगाच त्याला 'इट्स अमेझिंग...' वगैरे म्हणत बसायचं!
कशीबशी ती भिकार पार्टी संपल्यावर आणि रग्गड पैसे खर्च झाल्यावर मी तडक निघालो आणि शिवाजीनगर स्टँडच्या भुर्जी-पावच्या गाडीवर येऊन थडकलो. भरपेट भुर्जी-पाव खाऊन झाल्यावर जोरदार ढेकर देऊन मी तृप्त मनाने घरी पोहोचलो. :-)
मी जर एकटा जेवायला गेलो आणि भूक खूप असेल (ती नेहमीच असते) तर मी डायनिंग हॉलमध्ये जातो. ३०-४० पदार्थ हादडल्यावर जी गुंगी येते त्या गुंगीची मजा कुठल्याच दारूतही नाही. डायनिंग हॉलला जायचे नसेल तर मी एखादे साधे हॉटेल गाठतो. तसे आमच्या घराजवळ खान्देश नावाचे झणझणीत हॉटेल आहे. तिथे चिकन मसाला, भाकरी, चिकन सुक्का, आणि भात मागवून चंगळ करतो. अगदीच कंटाळा आला असेल तर भुर्जी-पाव बेष्ट!!!
हॉटेल जितके साधारण तितके तिथले पदार्थ चविष्ट असतात असे माझे एक ढोबळ निरीक्षण आहे. खूप अलिशान हॉटेलमधले पदार्थ चवीत मार खातात. तिथे पदार्थाच्या कुळाची आणि नावाची जास्त चर्चा व्हावी अशी सोय असते. बाकी चव म्हणाल तर आवर्जून खाण्यासारखी नसते. मागे आम्ही एकदा पुण्यातल्या '११ ईस्ट स्ट्रीट कॅफे' मध्ये गेलो होतो. विचित्र नावाचे पदार्थ होतेच. बरं महागही प्रचंड होते. पोर्शन्स अगदीच किरकोळ होते. परिणाम, भूक शमली नाही. :(
आता मी अगदी 'चिनारा बॅलिसिया किंबार्ता' असे नाव लिहून त्याशेजारी ' अ वाईडली पॉप्युलर मेक्सिकन डेलिकसी, चिनारा बॅलिसिया किंबार्ता इज नथिंग बट प्युअर ब्लिस. टेंडर चिकन मॅरीनेटेड इन...' असे काहीसे वर्णन लिहिले तर कुणाला काही कळेल का? ;-)
--समीर
24 Oct 2011 - 3:51 pm | गवि
हाहा.. मस्त प्रतिसाद.. खूप हसलो..
बाकी थोडं माझं मत..
मला क्वांटिटी दुसर्या क्रमांकावर महत्वाची वाटते.
सर्वात पहिले क्वालिटी ऊर्फ चव हवी..
वेगवेगळे प्रकार मिळण्यासाठी काहीशी रिस्क आणि पैसे वाया जाण्याची तयारी ठेवावीच लागेल हे माहीत असूनही असा पचका झाला की दु:ख होतंच..
:)
भुर्जीपाव, मिसळपाव, भेळ (तीही कळकट अधिक चांगली हे पुलंपासून चालत आलेलं मजेशीर तर्कज्ञान) हे सर्व नेहमीचं आहेच हो. ते चालूच ठेवायचं. माझ्या गावी म्हणजे ठाण्यातही गोखले उपाहारगृह, मामलेदार मिसळ, आमंत्रण, राजमाता वडापाव वगैरे जबरदस्त ठिकाणं आहेतच. तिथे पडीक असणं आता नवीन राहिलेलं नाही..
पण खाण्याचे शौकीन असल्यावर मग याआधी कधीच न मिळालेलं / नेहमी न मिळणारं काही मिळायला रिस्क घ्यायला हवीच अशी इच्छा होते.. मग सर्व थरातली रेस्टॉरंट्स धुंडाळली जातात.. :)
उदा. इथेही मला कोणी सहज म्हणेल, की मग तुम्हीच म्हटलेलं लोअरपरळचं लिंबू सरबत सोडून इथे कशाला पाचशे रुपये देऊन आलात?
पण गंमत अशी की ते लिंबू सरबत रोजच्या आयुष्याचाच भाग आहे. ते पितोच नेहमी..
इथे आलोय ते वेगळं काही मिळेल या आशेने. तिथे निदान पांचट तरी काही मिळू नये.. :)
एखादा जगाच्या कोण्याश्या कोपर्यातला सुंदर पदार्थ इतकी मजा देऊन जातो की त्यासाठी प्रिमियम किंमत गेली तरी हरकत नसते. पण किंमतच जास्त आणि पदार्थ बेकार.. हे काही पचनी नाही पडत माझ्याही..
एखाद्या देशानुसार, एरियानुसार पदार्थ बनवण्याची पद्धतच अशी असू शकते की मला रोजच्या सवयीत न बसणारी एक वेगळी (निगेटिव्ह) चव लागेल. पण पदार्थ जेन्युईन असेल..तो इतर कोणाला आवडू शकेल..
तो फरक आपण सगळे करु शकतो
.. पण जे काही बनवलंय ते कच्चं वातड, जो काही मसाला आहे तोही नीटपणे न लागलेला, हे अनअॅक्सेप्टेबल होऊन जातं..
तेच टीजीआय फ्रायडेत झालंय..
24 Oct 2011 - 5:39 pm | समीरसूर
चव निर्विवादपणे पहिला निकष.
आणि त्यात बेचव पण महाग असं काँबिनेशन असलं की मात्र तळपायाची आग पोटात जाते. चविष्ट पण महाग चालतं, चविष्ट आणि वाजवी पळतं, चविष्ट आणि स्वस्त मॅरेथॉन करतं.
टिळक रस्त्यावर ह्युंदाई शोरूमच्या मागे (की जवळ) एक वृद्ध महिला खूप चविष्ट पण स्वस्त जेवण देते असं ऐकलंय. चिकन अगदी घरच्यासारखं आणि ते ही फक्त ४० रुपयात! पोळ्या अमर्यादित! शाकाहारी जेवण फक्त २५ रुपयात आणि ते ही अमर्यादित!! तुफान चालते म्हणे. आणि फक्त पहिल्या २० जणांना जेवण मिळते असंही ऐकून आहे...अशा ठिकाणची गंमत न्यारी!
तसच टिळक रस्त्यावरच बादशाही पण छान आहे.
नवीन काही ट्राय करायला मी थोडा घाबरतो पण कधी कधी सगळं जुळून येतं आणि झकास जेवण मिळतं. गोव्याला कलंगुट बीचवर एक मोठं हॉटेल आहे. नाव सौझा लोबो (उच्चार क्षमस्व!) आहे बहुतेक. महाग आहे थोडं पण फिशकरी फार छान मिळाली होती. दिवे आगरला अँम्बियन्स रिसॉर्टमध्ये चिकन आणि तळलेला मासा अप्रतिम मिळाला होता.
'११ ईस्ट स्ट्रीट कॅफे' मध्ये लिंबाच्या सरबताप्रमाणे काहीतरी प्यालो होतो. खूप महाग होतं पण खूपच जबरदस्त होतं. तिथली आवडलेली ती एकमेव गोष्ट होती. एक अख्खा जग भरून आणून ठेवतात. त्यात लिंबाच्या फोडी, कसलेतरी हर्ब्स असं काहीबाही असतं पण चव, अहाहा...एकदम अमृततुल्य!! किंमत दीड-दोनशेच्या घरात होती.
24 Oct 2011 - 11:22 pm | श्रीरंग
या ठिकाणी खायला बरं मिळतं. पण काही महिन्यांपूर्वी गेलो होतो तेव्हा तिकदच्या वेटर्स व मॅनेजरचा प्रचंड उर्मटपणा बघून अवक झालो. बागा जवळील ब्रिटोज हे फूड क्वालिटी व सर्वीस, या दोन्ही बाबतीत इतर बर्याच हॉटेल्स पेक्षा खूपच उजवे आहे.
24 Oct 2011 - 5:00 pm | आत्मशून्य
हॅ हॅ हॅ.... क्वांटीटी व तिखटपणाच्या बाबत ते 'ल - पिझ्झेरिया' की कुठलसं विचित्र ठीकाण आहेच मूळात टूकार. पण तिथे गेलाच तर व्हॅनीला आइस्क्रिम विथ चोकोलेट फज मात्र अवश्य ट्राय करा तेव्हडच फक्त खाणेबल आहे असं वाटत. बाकी भरपेट जेवायचं असेल तर शक्यतो नवीन ठीकाण फ्यामीलीसोबत ट्राय करू नये असेच म्हणतो ;)
24 Oct 2011 - 5:41 pm | समीरसूर
पिझ्झेरियाला जाणे होईल की नाही शंकाच आहे. पण गेलोच तर नक्की ट्राय करीन. :-)
24 Oct 2011 - 5:46 pm | समीरसूर
मी आईस्क्रीम खात नाही. बायकोला घेऊन जाता येईल.
'बायको' जातीला आईस्क्रीम, चॉकलेट, भेळ, पाणीपुरी, पावभाजी, पनीरच्या यच्चयावत भाज्या, भजी, नवरतन कोर्मा सारखी गिळगिळीत डीश हे सगळं आवडतं बहुधा.
24 Oct 2011 - 8:25 pm | रेवती
-व्हेजिटेबल चिमिचांगा.. (काय असावं बरं..)
शाकाहारी ऐवजी मांसाहारी प्रकार सानिकानं दिला होता.
http://www.misalpav.com/node/19324
24 Oct 2011 - 9:42 pm | मिसळ
मी सुद्धा ह्या रेस्टॉर.न्ट मध्ये सह्कुटुम्ब जाऊन पस्तावलोय. इतके वाईट जेवण की बस रे बस.
25 Oct 2011 - 3:51 am | नेत्रेश
परदेशी पदार्थ चवीला खुप वेगळे असतात कारण त्यातले घटक भारतात सहजा सहजी न मिळणारे व भारतीय जेवणात कधीही न वापरलेले असतात. बनवण्याची पद्धतही बर्याचदा खुप वेगळी असते. असे पदार्थ एक दोन वेळा खाऊन त्यांची चव पसंतीस येण्याची शक्यता कमीच असते. बर्याचदा ते पदार्थ खाउन हळुहळु चव डेव्हलप होते.
ब्लु चिज - सहसा सलाड, बर्गर ईत्यादीमध्ये वापरला जाणारा पदार्थ. कुणाही भारतीयाला पहील्यांदा हा पदार्थ खाताना त्याच्या वासाने व चवीने नक्कीच उलटी होण्याची भावना होणार.
रेअर / मिडियम रेअर मीट - अक्षरशः कच्चे देसणारे मांस, डिशमध्ये घेउन खाण्यासाठी कापताना येणारे रक्ताच्या रंगाचे ज्युस पाहुन बहुतेकांना गरगरायलाच लागेल.
ऑथँटीक चायनीज फुड - आपल्याकडे भारतात चायनीज म्हणुन जे मिळते ते चव आणी प्रिपरेशनमध्ये खर्या चायनीज फुडच्या जवळपासही जाणारे नसते. त्यात आपल्या भारतीय चविला आवडेल असे प्रचंड प्रमणात बदल केलेले असतात. पण असे बदल न केलेले ऑथँटीक चायनीज फुड भारतीयांना आवडणे कठीण आहे.
जापनीज फुड / सुशी - न शीजवलेला कच्चा मासा भाताच्या थंडगार गोळ्यावर ठेउन खायला कीतीजणांना आवडेल?
असे शेकड्यानी पदार्थ आहेत ज्याना भारताबाहेर डेलीकसी म्हणतात, पण अस्सल भारतीय चवीला ते अजीबात आवडणार नाहीत. भारतातली हॉटेल्स असे पदार्थ करताना त्यातील इंन्ग्रेडीयन्स बदलुन भारतीय चविला आवडतील आणी हॉटेल्सना परवडतील असे वापरतात. त्यामुळे आपल्या डीश मध्ये येणारा पदार्थ हा बर्याचदा ऑथँटीक कुझीन नसतो.
माझ्या चांगल्या म्हणा किंवा वाईट म्हणा नशीबाने वर दीलेले पदार्थ मला कित्येक वर्षे खावे लागले. पहीले ६ महीने हे पदार्थ खाताना खुप वाईट हाल झाले. काही काळानंतर त्यातील चव समजु लागली, आता तर ते खुप आवडतातही. (रेअर / मिडेयम रेअर मीट अजुनही खात नाही).
भारतात परदेशी पदार्थांच्या नावाखाली जे काही दीले जाते ते मुळपदार्थाच्या साधारण जवळपास जाणारे असते. बर्याच ठीकाणचा पिझ्झा म्हणजेही एक जोकच असतो. त्यापेक्षा भारतात भारतीय पदार्थानांच प्राधान्य देतो.
भारतातही काही हॉटेल्समध्ये परदेशातील ऑथँटीक कुझीनस उत्तम मिळतात, पण त्याच किंमतीत माणुस परदेशात जाउन यायचा :) भारतातुन जवळच सिंगापुर कींवा थायलंडमध्ये सर्व जगभरातील ऑथँटीकेट कुझीनस अगदी सहज उपलब्ध आहेत. नोकरी, उद्योगानिमीत्त्त किंवा सहलीसाठी तिकडे जाणार्यांना ते नक्कीच ट्राय करता येतील.
25 Oct 2011 - 9:08 am | रेवती
छान सविस्तर प्रतिसाद.
9 Jan 2015 - 4:41 pm | मृत्युन्जय
हा धागा कसा विसरलो. अतिच उत्तम लिहिले आहे.
गविंचे त्यावेळेस असे ३-४ धागे आले होते बहुधा. त्या अनुषंगाने नीलकांतला सूचनाही केली होती की साहित्य, चर्चा, काव्य या प्रमाणेच खादाडी असाही एक सेक्शन कराव ज्यात लोक ते जिथे जाउन आले आहेत अश्या हॉटेलांचे परिक्षण लिहितील. अजुनही तसे काही करता आले तर बघा. लैच जिवंत सेक्शन होइल तो.