या पुर्वीचे भाग.
हवेतल्या गोष्टी - १
हवेतल्या गोष्टी - २ : ती
पावसाळा सुरू झालाय. अजुन तिन चार महिने तरी धडधडत यावं जावं लागणार. एरवी काहीवेळेला विमानप्रवास अगदीच एकसूरी आणि कंटाळवाणा होतो. थकलेलो असेन आणि एकही पुस्तक हातात नसेल तर बसल्याक्षणी डोळे मिटून घेण्याची कला आताशा अवगत झालेली आहे. पण अशा दिवसातली गोष्टच काही और आहे.
खूप पाउस असेल किंवा 'नभ मेघांनी आक्रमिले' असेल तर त्या विमानाच्या नेहेमीच्या प्रवासपातळीवरून खालच्या पातळीवर जाण्यासाठी 'सेफ' फट शोधावी लागते. त्यासाठी किती घिरट्या घालाव्या लागतील कोण जाणे. सारखे धक्के बसत असतात, हादरे बसत असतात. ह्या सगळ्या तारांबळीत हळुच सहप्रवाशांच्या चेहेर्यावरचे भाव टिपणं यासारखी मौज नाही. अशावेळेस प्राथमीक भितीवर नियंत्रण ठेवून जरा आजूबाजूला पाहिले तर अनेक नजारे दिसतात.
प्रवास: पुणे बंगळूरू, वेळ साधारणत: नऊ साडेनऊची. माझी नेहेमीची आयल सीट. माझ्या मागच्याच सीटवर एक तरूणी, बहुतेक नवविवाहीत, हातात इंग्रजी पुस्तक घेउन वाचल्याचा बहाणा करत इकडेतिकडे बघत होती.
बंगलूरू जवळ आल्यावर डीसेंट चालू झाल्याची घोषणा पायलटनी केली. खराब हवामानाची घोषणा ऐकल्यावर प्रवाशांचे साधारणतः दोन ठळक प्रकार होतात. चेहेर्यावर चिंतेचं जाळं विणलं गेलेले आणि हि घोषणा ऐकून उगाचच बेफिकीर चेहेरा करून भुवई उडवणारे.
विमान ढगात शिरल्यावर हळूहळू धक्के वाढत गेले. सगळ्यांच्याच चेहेर्यावर चिंतेची भावना दिसू लागली. काही सेकंदानंतर धक्के अजूनच वाढले, विमान जोरानं थरथरू लागलं. दाट ढगात शिरल्यावर हा नेहेमीचा भाग. साधारणत: या वेळेपर्यंत लोक नकली बेफिकीरीची भावना सोडून हँडरेस्ट घट्ट पकडून बसलेले असतात. काही जण आपल्या पुढच्या सीटची पाठ घट्ट धरून ठेवतात. काही जण गळ्यातलं लॉकेट वगैरे मुठीत धरून ठेवतात. काही जण डोळे मिटून काहितरी पुटपुटायला सुरूवात करतात. प्रत्येकजण खिडकीतून बाहेर बघायचा प्रयत्न करत असतो. तुम्ही स्वतःची भिती जेवढी लवकर बाजूला कराल तेवढं तुम्हाला हे सगळं एंजॉय करायला जास्त वेळ मिळतो.
हादरे वाढल्यानंतर माझ्या मागच्या बाईनं माझ्या सीटची पाठ घट्ट धरून ठेवली होती, माझ्या दोन्ही कानापाशी तिच्या आवळलेल्या मुठी मला जाणवत होत्या, त्यामुळे मी जरासा आक्रसूनच बसलो होतो. धक्केविरहीत असे ५-७ सेकंद गेले, सगळं सुरळीत झालं असं समजून तिनं हाताची पकड सोडली त्याच क्षणी एक जोरदार हादरा बसला. तिनं घाबरून जोरात हाताचा कवळा घातला माझ्या बेकरेस्टला. आणी क्षणभर माझे डोळेच पांढरे झाले. त्या जोरदार हादर्यामुळं तिनं साक्षात माझा गळा आवळला होता पाठीमागून.
मला ह्या अनपेक्षीत हल्ल्यानं काही सुचेना. ओरडायलाही जमेना, शेवटी कसंबसं मी तिचा हात बाजूला केला तेव्हा श्वास घेता आला. नंतर ती भयंकर ओशाळ्या चेहेर्यानं दोनतीन वेळेला सॉरी म्हणाली. माझ्या शेजारचा एक गुज्जूभाइ माझ्याकडे बघून मिश्कीलपणे हसत होता. मी पण त्याच्याकडे पाहून हसलो, पण त्याला खरं कारण कळलंच नाही. कारण मी त्याला मघाशीच कुठल्यातरी देवाचा फोटो शर्टाच्या खिशातुन काढून हातात घट्ट पकडताना बघितलं होतं.
__________________________________________________________________________________
मला अशाप्रसंगी विमानात भिती वाटायची कधी बंद झाली? किंवा खरंच बंद झाली का? की केवळ सवयीचा भाग म्हणून आता भिती वाटत नाही. नेहेमीच्या धक्क्यांपेक्षा काही वेगळ्या पद्धतीनं विमान हलू लागलं तर मला भिती वाटेल का? कदाचित विमान काहिवेळ फ्रीफॉल मधे गेलं तर मीही तसाच हॅंडरेस्ट घट्ट पकडून ठेवेन का?
अगदी सुरवातीला पहिल्या काही विमानप्रवासात अशा वेळी मला काय वाटलं होतं. भीती की ‘आता शेवटचाच प्रवास’ म्हणून येणारी निराशा, हतबलता. की आप्तजनांचे चेहेरे परत दिसणार नाहीत म्हणून व्याकुळ झालो असेन. काय माहित.. नक्की आठवत नाही आता.. देवाचा धावा नक्की केला नसेन असं म्हणता येईल.
एखाद्या घटनेमधे मृत्यूची भिती नक्की केव्हा मिसळते, आणि नक्की केव्हा नाहीशी होते.
भिती नक्की मृत्यूची की अज्ञाताची... मृत्यूची भीती अथवा आयुष्य नसण्याची भिती.. आयुष्य नसण्याची भिती की आयुष्यात फक्त प्रेयस गोष्टीच मिळवण्याची वेडी हाव... मृत्यू म्हणजे तरी काय...
मृत्यूला विरोध करण्याची प्रक्रिया स्वाभावीकच असेल का. कुठल्याही मानवी जागृत प्रयत्नाविना स्वयंस्फूर्तपणे चालणार्या हृदयाच्या धडधडीसारखीच ती धडधड अखंड चालू ठेवण्याची धडपड नैसर्गीक असेल? की अशी धडपड त्या धडधडीचाच एक अविभाज्य भाग आहे?
कुठलाही अप्रतीम, उत्कट क्षण उलटून जातो म्हणजे काळ पुढे सरकतो... खरंतर आपण त्या क्षणातून पुढे सरकतो.... म्हणजे प्रत्येक क्षणी आपलं अस्तित्व त्या क्षणात मृत होउन पुढल्या क्षणाकडे सरकतं. ही प्रक्रिया सतत पुढे चालू, पुढचा क्षण जगायचा, मग त्यापुढचा, मग त्याहीपुढचा... पुढचा क्षण कसा असेल माहित नाही.. पण ‘हा’ सरला म्हणजे ‘तो’ असणार हे नक्की..
मृत्यू म्हणजे असा कुठलातरी एक क्षण आपल्यासाठी कायमचा थांबणं... म्हणजे त्या नेमक्या क्षणात आपण थांबायचं... काळ पुढे चालू... फक्त आपल्यापुरता तो क्षण फ्रीझ झालेला असं काहीसं.
हा क्षण नेहेमीच आपल्याला निवडता न येणारा का असावा... आपल्याला हवा तोच उत्कट जिवंत क्षण आपण पकडून का ठेवू नये.. कायमचा..
______________________________________________________________________________
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंज-याचे दार उघडावे
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तुझ्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे
वाळल्या ओठां दे निरोपाचे फुल
भूलीतली भूल शेवटली
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
कवी : बा भ बोरकर
प्रतिक्रिया
5 Sep 2011 - 12:01 pm | प्रीत-मोहर
अप्रतिम..
__/\__
5 Sep 2011 - 12:02 pm | बिपिन कार्यकर्ते
असे अनुभव आले आहेत चिक्कार! विशेषतः आफ्रिकेत स्थानिक एअरलाईन्सने प्रवास करायचा योग आला आहे काही वेळा तेव्हा. एकदा दुबईहून चेन्नैला जाताना समुद्रावर असताना विमान खराब हवामानात अडकले आणि हेलकावे खाऊ लागले. रात्रीची वेळ होती. सगळेच अस्वस्थ. मी आणि माझा बॉस शेजारी शेजारी बसलो होतो. एकदम एक खूप मोठा एअरपॉकेट आला आणि विमान धडामकन कित्येकशे फूट दाणकन खाली आले. विमानात नुसता आरडाओरडा चालू होता. काही लोक चक्क रडत होते. का कोण जाणे मला फक्त अनपेक्षित हादर्याचंच काही वाटलं... आपण बहुतेक मरू या भावनेमुळे फारसा त्रास झाला नाही. मात्र काही क्षण डोळ्यासमोर माझ्या मुलींचे चेहरे मात्र तरळून गेले. त्यातून सावरतोय न सावरतोय तोच सगळे स्थिरस्थावर झाले आणि हळूहळू सगळेच शांत झाले. जणू काही घडलेच नाही अशा तोर्यात विमानातील कर्मचारी वर्ग फिरू लागला. एरवी माज दाखवणारा माझा बॉस मात्र त्या काही सेकंदांमधे माझा हात घट्ट धरून बसला होता, तो आता परत चेहर्यावर बेफिकिरी घेऊन बसला. मजा आली!
5 Sep 2011 - 2:46 pm | गणपा
=))
कोण रे... कोण तो ? ;)
5 Sep 2011 - 8:08 pm | बिपिन कार्यकर्ते
ओळख! ओळख!! ;)
देवाजीचं नाव घ्यावं, सकाळच्या पारी! ;)
5 Sep 2011 - 8:14 pm | गणपा
वाटलच होतं पण जरा खात्री करुन घ्यायची होती बास. :)
कित्ती कित्ती लोकांचे दुवे मिळावायचा हाती आलेला चानस घालवीला तुम्ही. ;)
5 Sep 2011 - 12:50 pm | मृत्युन्जय
मला का कोण जाणे या प्रकाराची फारशी भिती वाटत नाही. खरेच जर विमान जोरात पडायला लागले तर आजूबाजूच्यांचे चेहरे कसे होतील अशी कल्पना करुन हसु येते. अर्थात आजवर कधी प्रंचंड घाबरगुंडी उडावी अशी वेळ विमानात बसल्यावर आलेली नाही आहे,
5 Sep 2011 - 1:48 pm | परिकथेतील राजकुमार
हा भाग देखील अप्रतिम.
वेगवेगळे मूडस चित्तारणारे लिखाण एकदम आवडेश.
5 Sep 2011 - 1:52 pm | गवि
मस्त.. वेगळ्या बॅकड्रॉपवरचे अनुभव..
5 Sep 2011 - 2:14 pm | नगरीनिरंजन
मृत्युवरचे विवेचन आवडले. साध्या साध्या पण वेगळ्या अनुभवांमधून विचार उलगडत जाण्याची हातोटी छान आहे.
कविताही खूप सुंदर आहे.
5 Sep 2011 - 2:19 pm | सहज
नेहमीप्रमाणे सुरेख मुक्तक.
बोरकरांची सोपी सहज गोग्गोड कविता ...
बाकी मृत्युला सामोरे जायला पूर्वतयारी केली पाहीजे असे एकंदर दिसते. ज्याची तयारी अपूर्ण तो प्रसंगी इतरांचा गळा आवळायलाही कमी करणार नाही असा अर्थ लावायचा का? :-)
लेखमाला आवडत आहे हे वे सां न ल
5 Sep 2011 - 2:37 pm | स्मिता.
अनुभवकथन आणि कविता दोन्हीही छानच.
विमानात असे अनुभव येतात तेव्हा मला घाबरायला होतं. मीसुद्धा आर्मरेस्ट घट्ट घरून ठेवणार्यातली एक आहे. पण त्याक्षणी मला जी भीती वाटते ती प्रत्यक्ष मृत्यूची नसून तो मृत्यू कसा असेल याची असते. म्हणजे विमान कोसळलं किंवा स्फोट किंवा तत्सम काही झाले तर मृत्युपूर्वी मला कश्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल याची ती भिती असते.
मला तरी ही मृत्यूच्या भितीपेक्षा यातनांची भीती असावी असे वाटते.
5 Sep 2011 - 2:55 pm | गणपा
छान लिहिलयस रे.
विमान घातपातावर बेतलेल बरेच इंग्रजी चित्रपट/मालिका पाहिल्या असल्याने भावना बोथट झाल्यात.
लहान असताना केलेल्या पहिल्या विमान प्रवासात जो पोटात गोळा उठला होता (उड्डाणाच्यावेळी) त्याची तोड कश्यालाच नाही. :) अक्षरशः कुणी तरी मागुन खेचतोय असंच वाटत होतं. मी टरकुन बाबांचा हात घट्ट पकडुन बसलो होतो.
हाच अनुभव काही वर्षांमागे परत आला होता.. पण या वेळी मी बाबांच्या भुमिकेत होतो आणि लेक बिलगुन बसली होती. :)
5 Sep 2011 - 2:58 pm | श्रावण मोडक
कविता गुंफण्याची कल्पना आवडली. यानिमित्ताने अशा कविता पुन्हा वाचायला मिळतात.
घरी कधी येऊ? समग्र विंदा आणि बोरकर हवे आहेत.
5 Sep 2011 - 4:51 pm | जातीवंत भटका
मस्त लिहीले आहे. मृत्यूला व्याख्येत बसवण्याचा प्रयत्न अप्रतिम आहे.
बोरकरांची कविता वाचून छान वाटले. सलील कुलकर्णीच्या "संधीप्रकाशात" या अल्बममधलं हे शीर्षकगीत आज सकाळीच ऐकले. सुंदर !!
5 Sep 2011 - 7:06 pm | स्वाती२
आवडले. मी आर्मरेस्ट घट्ट पकडून बसते. मृत्यूपेक्षा जास्त भीती 'आपल्यामागे आई-बाबांचे काय?' याची वाटते.
5 Sep 2011 - 7:15 pm | कुंदन
मज्जा येते लोकांची प्रतिक्रिया बघताना अशा वेळी.
5 Sep 2011 - 8:39 pm | शुचि
सुंदर कविता. लिखाणदेखील खूप आवडले.
5 Sep 2011 - 9:59 pm | ५० फक्त
+१० टु जातिवंत भटका, ''मृत्यूला व्याख्येत बसवण्याचा प्रयत्न अप्रतिम आहे.'' अगदि मनातलं बोललास,
@ सहज, ''बाकी मृत्युला सामोरे जायला पूर्वतयारी केली पाहीजे असे एकंदर दिसते. ज्याची तयारी अपूर्ण तो प्रसंगी इतरांचा गळा आवळायलाही कमी करणार नाही असा अर्थ लावायचा का? '' नक्कीच नक्कीच करा अशी तयारी.
6 Sep 2011 - 7:37 pm | प्रभो
छान लेख रे अर्ध्याशेठ!!! असेच किस्से-अनुभव लिहित रहा आमच्यासाठी.
6 Sep 2011 - 7:58 pm | चतुरंग
छान अनुभव. या निमित्ताने कविताही देताय ते फारच आवडले. एक छान काव्य वाचायला मिळते.
मला असा अनुभव बर्याचदा आलाय. एका फ्लाईटमधे मात्र थांबून थांबून जवळपास १० मिनिटे विमान थडथडत होतं. दोन तीन वेळा भलामोठा झोल घेऊन असं काही वर खाली झालं की ज्याचं नाव ते! पोटात गोळे येऊन येऊन तिथले स्नायू दुखायला लागले. आजूबाजूला असलेल्या काही बायका टिप्पिकल आवाजात अशा काही किंचाळत होत्या की त्याही अवस्थेत मला हसू अनावर झाले. "ओ माय गॉड!" "फॉर हेवन्स सेक!" "ओ नो, वाट ईज गोईंग ऑन!"
"प्लीज प्लीज, गॉड सेव मी!" अशा आशयाचे अनेक उद्गार सभोवती निघत होते. मी घाबरलो होतो पण थोड्याच वेळात असे वाटून गेले की जे काय व्हायचे आहे ते होणार आहे घाबरुन काय फायदा, जर आपत्ती आली तर त्यातून बाहेर कसे पडता येईल हे बघायला हवे. आणि मग मी शांतपणे बसून राहिलो!
टर्ब्युलंस संपल्यावर स्पीकर चिरकला आणि कॅप्टन म्हणाला "कॅप्टन स्पीकिंग, ऑल इज क्लिअर अँड आय अॅम स्टिल हिअर विथ यू!" :)
(टर्ब्युलंट) रंगा
6 Sep 2011 - 9:51 pm | कुंदन
>>मी घाबरलो होतो पण थोड्याच वेळात असे वाटून गेले की जे काय व्हायचे आहे ते होणार आहे घाबरुन काय फायदा,
सहमत.
>>जर आपत्ती आली तर त्यातून बाहेर कसे पडता येईल हे बघायला हवे.
आपत्ती येण्यापुर्वी विमा काढलेला बरा ना ?
6 Sep 2011 - 8:24 pm | रेवती
लेखन आवडले पण प्रसंग नावडता आहे.
घाबरलेले लोक बघण्यात कसली मजा?
मी तर कायमच घाबरलेली असते.
तरी एकादोनदा मासीक वाचताना काही मिनिटं विसरले की आपण विमानात आहोत आणि नंतर जास्तच घाबरले.
6 Sep 2011 - 10:18 pm | जाई.
लेखन आवडले
मुंबई दिल्ली प्रवास करताना मलादेखील असा अनुभव आलाय
त्यावेळी परीक्षेच्या टेन्शनमधे असल्याने फार काही वाटल नाही
10 Sep 2011 - 12:29 am | शिल्पा ब
लेख अन प्रतिक्रिया दोन्ही मस्त.
मला एकदम मादागास्कर - एस्केप टु अफ्रिका मधला सीन आठवला.
बाकी मी अगदी शुरवीर आहे...कधीकधी भिती वाटते तेवढीच.
5 Nov 2014 - 10:46 pm | इनिगोय
मस्त लेखमालिका.
नेहमीचे अनुभव आणि कलदार मांडणी. आवडलं.
6 Nov 2014 - 9:37 am | विवेकपटाईत
कथा आवडली, आता मला भीती वाटत नाही, ... मृत्यू म्हणजे तरी काय... .. जून २७, सकाळचे ८.४० बसमधून सचिवालयाच्या दिशेने चालू लागलो. रकाब गंज गुरुद्वार्याच्या समोर असताना, चक्कर येत आहे असे वाटले, एका झाडाखाली थांबलो, पाणी पिल्याने थोडे बरे वाटेल, म्हणून बेग मधून पाण्याची बाटली काढली. क्षणात मला वाटले मी हिरव्या गवतावर पहुडलेलो आहे, समोर ताटव्यात सोनेरी फुले उमललेली आहे, दूर कुठून तरी बासरीचा आवाज ऐकू येत आहे, मला एकदम मस्त वाटत होते, पण अचानक स्वप्न भंग झाल, 'पटाईत ठीक तो हो न, एका कार्यालयातल्या सहकर्मिच्या आवाजाने तंद्र भंग झाली........नंतर हाच अनुभव एका गोष्टीत मांडला
सोनेरी फुलं आणि म्हातारा
6 Nov 2014 - 10:09 am | बोका-ए-आझम
अप्रतिम अनुभवकथन! या flight ला land नका करु! चालू राहू दे!
7 Nov 2014 - 2:48 am | बहुगुणी
धाग्याशी थोडीशीच संबंधित, मरणाला सामोरं कसं जावं, याविषयी 'सिद्धार्थ'-कार हरमान हेस यांनी लिहिलेली Steps [Stuffen] ही कविता काही महिन्यांपूर्वी वाचून त्याचा भावानुवाद करावासा वाटला होता, तो इथे उद्धृत करतो आहे:
************
कोमेजणं हे भविष्य जसं प्रत्येक फुलाचं असावं
आयुष्याच्या हरक्षणी, तारुण्याने वार्धक्याला सामोरं जावं
प्रत्येक शहाणपणाची, गुणाची आपली एक वेळ असते
हळूहळू कालौघात नष्ट होण्याची खेळी असते
आयुष्याने बोलावलं की मनाने तयारी ठेवावी ही
नव्या भरारीची, आणि निरोपाचीही
धीराने, दु:ख न करता सामोरं जावं
नव्या, वेगळ्या बंधनांना स्वीकारावं
नव्या सुरूवातीत असते एक दडलेली किमया
जगण्याची ऊर्मी देणारी, माथ्यावर नवी छाया
एका खोलीतून दुसरीत, मग तिसरीत आनंदात जावं
पण कुठल्याही वास्तूला आपलं घर न म्हणावं
जगरहाटीची नसते इच्छा ठेवण्याची आपल्याला बंधनात
पायरी-पायरीने वर चढावं, विस्फारत्या अवकाशात
क्वचितच रहिवासी व्हावं एका विवक्षित जागेचं
नाहीतर रेंगाळतो आपण, सोयीचं आयुष्य होतं सवयीचं
जो असतो तयार चटकन् उठून प्रवासास निघायला
पांगळं करणार्या सवयींतून तोच मुक्त करतो स्वतःला
वेळ येईल तेंव्हा नव्या वर्तुळांत पाठवेल मृत्यूही
तोवर थांबू नये आपल्या आयुष्याचं बोलावणंही
मुक्त हो, हे हृदया माझ्या, शमू दे वेदनेला प्रत्यही
*************
हरमान हेस यांच्या आवाजातली मूळ कविता इथे ऐकायला मिळेल (यूट्यूब वरही ती उपलब्ध आहे.)