हवेतल्या गोष्टी - १
हवेतल्या गोष्टी - २ : ती
हवेतल्या गोष्टी - ३ - पिंजर्याचे दार उघडावे..
पावसाळ्यातील अशीच एक फ्लाईट, अगदी पहाटे पहाटे निघालो होतो. वास्तविक पहाटेची फ्लाईट म्हणजे माझी अगदी आवडती. आजूबाजूची रात्रीबेरात्री उठून विमानतळावर आलेली मंडळी, पुन्हा झोपेच्या आधीन होत असताना, मी टक्क जागा असतो.
ढगांच्या पांढऱ्या समुद्रावर जाऊन शांतपणे उगवता सूर्य पाहणं मोठं लोभसवाण असतं. अजून दिवसाच्या ट्राफिकनं रविराज कावलेले नसतात, नुकतेच क्षितिजावरुन बाहेर येत ढगांच्या मऊशार पाठीवर आपली किरणं आजमावून पहात असतात. तो सगळा सोनेरी सोहळा माझ्याही कोत्या मनात भव्यतेची, मंगलाची छाप दिवसभराकरता ठेऊन जातो.
पण आज मात्र सुर्यादेवांना सुट्टी, करड्या काळ्या ढगांचीच सत्ता आकाशात. आज दिवसभरात काही चांगलं घडूच शकणार नाही असा माहौल..
खराब हवामानाची नेहेमीची सूचना देऊन झाली आहे. मंडळींच्या चेहेऱ्यावर चिंतेच्या छटा चढू लागल्यात. विमान ढगात शिरतं. हादरु लागतं. लोकांच्या नेहेमीच्याच प्रतिक्रिया मी जरा वैतागूनच पहात राहतो.
माझ्या शेजारच्या जागेवर एक आजोबा, ते एकट्यानं प्रवास कसे करतायत ह्याचं मला आश्चर्य वाटलं होतंच. मी त्यांच्याकडे त्यांच्या नकळत निरखून पाहू लागतो. सुरकुतलेला चेहेरा. अंगात स्वेटर, हाफशर्ट. वय साधारण पासष्ठ ते सत्तरच्या आसपास. पण चेहऱ्यावर, डोळ्यात काहीतरी विलक्षण गोड भाव..
काही लोकांच्या चेहेर्यावरच एक तृप्त, समाधानी भाव कोरलेला असतो, म्हणजे बघा.. चंद्रकांत गोखले यांचा चेहेरा आठवतोय, तसा काहीसा भाव... माझ्याकडे बघून एक छानसं कुणालाही जिंकून घेणारं स्मितहास्य..
ते शांत आहेत. विमान हादरु लागल्यावर ते डोळे मिटून घेतात, पण चेहेऱ्यावर एकही जास्तीची सुरकुती उमटत नाही.. तसाच प्रसन्न, शांत चेहेरा.. माझी विचाराश्रुन्खाला नेहेमीप्रमाणे चालूच.. आत्ता या आजोबांच्या मनात काय चालू असेल...
मृत्यूची प्रकर्षानं जाणीव होत असेल का इतरांसारखी.. जर तशी जाणीव होत असेल तर नक्की काय विचार उमटत असतील.. खेद असेल कि तृप्तता... काही करायचं राहिलं याची रुखरुख असेल... की एवढं करू शकलो, एवढ्या लांब आलो याचं समाधान असेल.. आप्तांची आठवण येत असेल का... का पैलतीरावर आप्तांचीच भेट होणार म्हणून उत्सुकता असेल.. आत्तापर्यंतच्या वाटचालीचा कोलाज येत असेल का विचारांच्या पटलावर.. की कोरी पाटी असेल नवा अनुभव घ्यायला..
मी असा सामोरा जाऊ शकेन का... नाही जाणार कदाचित... का म्हणून? अजून खूप जगायचंय म्हणून..जगायचय म्हणजे नक्की काय करायचय.. जास्ती दिवस श्वास घेणं म्हणजे आयुष्य का? म्हणजे मृत्यूला सामोरं जाताना वय महत्वाचं कि वृत्ती..
आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय, जन्मल्यापासून मरेपर्यंत एखाद्या मांजराच्या पिलासाराखं पायात तडमडत रहातं ते, अडखळायला होतंच पण असतं ही लोभसवाणं..
अजून खूप जगायचंय, खूप पहायचय.. पण तरीही असंच म्हणावसं वाटतं...
आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन् संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
-संदीप खरे
प्रतिक्रिया
27 Oct 2011 - 9:01 pm | रेवती
आधीचे भाग पहाता यावेळी अजून लेखनाची अपेक्षा होती.
(अपेक्षा तुम्हीच वाढवून ठेवल्या आहेत.)
संदीप खरेची कविता चांगली आहे.
27 Oct 2011 - 9:24 pm | मेघवेडा
तंतोतंत.
पण जितकं लिहिलंय ते मस्तच. :) खरेंची कवितासुद्धा छानच आहे, शेवटचं कडवं फार सुंदर लिहिलंय.
>> अजून खूप जगायचंय, खूप पहायचय
यावरून ’इतुक्या लवकर येई न मरणा’ आठवली! :)
27 Oct 2011 - 9:28 pm | अर्धवट
मलाही तीच आठवली होती रे मेव्या पण दिवाळीत 'मासळीचा सेवीत स्वाद दुणा' नको म्हणून ही घेतली. ;)
28 Oct 2011 - 1:40 pm | मेघवेडा
हा हा हा. अरे अस्सल मासेखाऊ गोंयकार असतो ना त्याला दिवाळी बिवाळीचं सुतक नसतं म्हणे. सुरमई, सोलकढी आणि साहित्य एकत्र असल्यावर बाकी कसलं भान उरत नाही रे असं आमचे नंदूबाब स्यॅन्डियेगोकर म्हणून गेलेत! ;)
29 Oct 2011 - 12:35 am | प्रभो
>>नंदूबाब स्यॅन्डियेगोकर म्हणून गेलेत!
असतील हो...तुम्हाला(वरणभात वाल्याला) काय उपयोग??
30 Oct 2011 - 12:27 pm | नंदन
'स'कारात्मक विचार करतोय रे तो ;).
बाकी सुदैवाने हा त्रिवेणी संगम इथे कट्ट्याच्या निमित्ताने दोन-तीन महिन्यांतून एकदा घडत असतो :)
28 Oct 2011 - 1:55 am | इंटरनेटस्नेही
एक्झॅक्टली.
27 Oct 2011 - 9:05 pm | गणपा
वाह !!! अर्धवटा काय झकास उपमा दिली आहेस आयुष्याला.
हा भागही ईतर भागांसारखाच वाचनीय झाला आहे. शेवट एका छान समर्पक कवितेन करण्याची कल्पनाही एकदम भारीच.
27 Oct 2011 - 9:16 pm | बिपिन कार्यकर्ते
छान!
28 Oct 2011 - 2:05 am | शिल्पा ब
लेख छानच. बाकी आमच्या गवर्या स्मशानात गेल्यात त्यामुळे कश्शाची भिती वाटत नै आता...फक्त वाट पहायची. असो.
28 Oct 2011 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फक्त वाट पहायची.
येसो नै बोलबेको...!!!
हे अस्सं बोलणं म्हणजे अजून खूप जगायचं आहे, असेच ना ? :)
-दिलीप बिरुटे
28 Oct 2011 - 9:23 am | नगरीनिरंजन
आणि शेवटची कविताही आवडली.
जगण्याचं, जिवंतपणाचं फाजील स्तोम आता आता लक्षात येऊ लागल्याने लेखातल्या भावनेशी मात्र समरस होऊ शकलो नाही.
28 Oct 2011 - 9:40 am | अर्धवट
>>जिवंतपणाचं फाजील स्तोम
वाह् क्या बात है.. असं काहिसं म्हणायचंय का देवा..
उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये
नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये
असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये
शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये सर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये
कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये
कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये
-संदीप खरे
दोन्ही कविता संदीपच्याच ब्लॉगवरून साभार
28 Oct 2011 - 9:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
’
28 Oct 2011 - 11:34 am | नगरीनिरंजन
मस्त कविता!
28 Oct 2011 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय.
-दिलीप बिरुटे
28 Oct 2011 - 12:02 pm | गवि
संपूर्ण धागा, कविता, पायात येणार्या मांजराच्या पिल्लाची उपमा आणि सर्व प्रतिसाद, सगळंच सुंदर. एकदम ए-वन..
28 Oct 2011 - 1:33 pm | जाई.
मस्त लिहीलय
28 Oct 2011 - 1:41 pm | पैसा
असेच आणखी "हवामहल" बांधा. आणि सोबतच्या दोन्ही कविता खूपच आवडल्या.
29 Oct 2011 - 12:36 am | प्रभो
ह्म्म्म...लिहित रहा रे भौ....
30 Oct 2011 - 12:06 pm | नंदन
हाही भाग उत्तम.
"आप्त सारे भेटती जे जे तिथे वस्तीस गेले,
सांगतो मी त्यांस किस्से पाहिलेले ऐकिलेले
मी खरा तेथील वासी हा न वाडा ही सराई,
पाहुणा येथे जरी मी जायची मातें न घाई"
ह्या ओळींची आठवण करून देणारं लेखन.
31 Oct 2011 - 10:12 am | किसन शिंदे
रेवतीताईंच्या वरील प्रतिसादाशी सहमत...
आधीच्या भागाच्या तुलनेत हा भाग तितका जास्त लिहला नाहीये, पण लेखन मात्र नेहमीप्रमाणेच बहारदार.
पुढिल मोठ्या भागाच्या प्रतिक्षेत...... :)