डिस्क्लेमर: नाजुक तब्बेतीच्या मिपाकरांनी जरा इनो जवळ ठेवूनच हा धागा वाचण्याचे करावे.
नुकताच पुण्यनगरीत डेक्कनच्या पूनम नामक ‘तीर्थ’क्षेत्री एक कट्टा झाला. कट्टा नव्हे दंगा... नव्हे... नव्हे दंगलच झाली.
या या या, खी खी खी, ठो ठो ठो, ठॅ ठॅ ठॅ अश्या गोंगाटातच ही दंगल झाली.
या दंगलीचे दंगेखोर होते बिका, परा आणि योगप्रभू, बाकीचे सर्व (मि)पा(क)मर दंगलग्रस्त होते ;).
(मागच्या ओळख धाग्याचा कट्टा फारच सोवळ्यातला कट्टा होता. तेव्हा मी सर्वांना पहिल्यांदाच भेटणार असल्यामुळे सर्वजण सोवळ्यात आले असावेत अशी आता दाट शंका येतेय ;) )
या वेळी जे. पी. मॉर्गन याची भेट असे कट्ट्याचे कारण होते. बाकी कोण कोण येणार याचा काहीच अंदाज नव्हता. तर हजर असणारे आणि प्रथमच भेट्णारे मिपाकर होते योगप्रभू, जातीवंत भटका, जे. पी. मॉर्गन, मृत्यून्जय, असुर तर जुणॆ मिपाकर होते परा, बिका, धम्या, श्रामो आणि मी.
या दंगलीस कारणीभूत असलेल्या दंगेखोर मिपाकरांची आणि दंगलग्रस्त मिपाकरांची ही ओळख.
दंगेखोर
परा (परिकथेतील राजकुमार): या गृहस्थाशी, अरे नाही; मुंज्या आहे हा अजून, नव्यानेच ओळख झाली. ही ओळख अशी की “नभोवाणी केंद्र किंवा आकाशवाणी केंद्र”. हे केंद्र जसे 24*7 काही ना काही प्रसारीत करत असते तसा परा यावेळी काही ना काही प्रसारीत करत होता (की प्रसवत होता ;)). तेही त्याच्या ‘तार’वाणीने. बहुधा तो आधीच ‘कावेरी’ नामक तीर्थक्षेत्री जाउन ‘पावन’ होउन आला असावा, अशी दाट शंका मला आणि धम्याला अजूनही येतेय. या कट्ट्याचे सोवळे मोडून त्याचे दंगलीत रुपांतर करण्याची सुरुवात याने केली. अतिशय ‘भन्नाट’ जोक्स आणि किस्से सांगायला सुरुवात करुन. (लेका भन्नाटचे पुढचे भागही याच जोमात येउदेत की रे!)
बिपीन कार्यकर्ते: मागच्या भेटीत यांनी पुस्तक वगैरे भेट दिले होते हे मी जाहीर केले आणि यांची खरडवही दुथडी भरुन वाहुन गेल्यामुळॆ यावेळी ते असल्या फंदात पडले नाहीत (माझी सुपारी देणाच्या विचार त्यांनी केलेला आहेच, पण म्हणून मी भितो की काय...). तर यावेळी ते आले होते ‘अरेबिअन नाइट्स’ चा खजिना बरोबर घेउन, आणि या खजिना लुटीमुळेच दंगलीने उग्र रुप धारण केले. काय त्या एकेक अरबी उंटिणींच्या सुरस आणि चमत्कारीक कथा. अरबी मानवी (पक्षी:माणूस) विश्व त्यांनी उलगडून दाखविले :P पण त्यांचा संचार यावेळी फक्त अरबस्तानापुरता मर्यादित नव्हता. ‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीप्रमाणेच त्यांनी तमाम दंगलग्रस्तांना विश्वसंचार घडवून आणला. मानवी मनाच्या कंगोऱ्यांबरोबरच शारिरीक कंगोरेही उलगडून दाखावले, अगदी अलगद पदर (कांद्याचा हो) उलगडावा तसे. पण त्यामुळे दंगलीचा प्रभाव वाढतच होता आणि झिंग चढलेल्या जातियवादी नेत्याच्या आवेशात ते दंगलीला चिथावणी देत होते.
योगप्रभू: यांना मी प्रथमच भेटत होतो. आल्या आल्या यांनी अगदी खांद्यावर हात वगैरे टाकून अगदी पार चड्डीतली (संघाची नव्हे, शाळेतली) ओळख असल्यासारखे गप्पा मारायला सुरुवात केली आणि मला जिंकूनच घेतले. पण पुढे येणाऱ्या दंगलरुपी वादळापूर्वीचा हा शांत भाव आहे हे कुठे मला ठाऊक होते. पर्या आणि बिकांनी दंगा करायला सुरुवात केली आणि मग योगप्रभू ही काय चीज आहे ते कळले. तोपर्यंत वैश्विक सूत्रे मांडुन वैश्विक सुसूत्रता आणणारा एक अभ्यासू असंच समजून बसलो होतो मी. बिकांनी त्यांची 'माझी लालच' असे म्हणून दर वेळेप्रमाणे "लाल वारुणी" ऑर्डर केल्या; मग डरकाळी फोडून योगप्रभूंनीही माझीही लाल हे दाखवले... म्हणजे "लाल वारुणी" ऑर्डर केली. पण त्याआधी त्यांनी 'कमी तिथं आम्ही' या भूमिकेतून मर्दानी दारु व्हिस्की माझ्याबरोबर शेअर केली होती. मग पुढे ती वारुणी आणि व्हिस्की यांची जी काही दंगल योगप्रभूंच्या शरिरात झाली ती बाहेरच्या दंगलीला उग्र करुन गेली. बरं झाले पण हे झाले. यामुळे योगप्रभूंची पोतडी हळुहळू उघडली जाऊ लागली आणि बाहेर येऊ लागल खरंखुरं 'वैश्विक सत्य'. अस्सल रोमनाळ, खंग्री, चावट, वाह्यात, इरसाल, दांडगट, रासवट, भयंकर.....(शब्द संपले) असल्या किश्शांची आणि फटाक्यांची माळ चालू झाली. यांचाही मग वैश्विक संचार सुरू झाला आणि त्याचा शेवट कॅंपातुन फिरुन सदाशिव पेठेत झाला. कॅम्पातल्या मुली आणि सदाशिव पेठेतील मुली यांच्यामध्ये फरक काय? हे त्यांनी तोंडी तर सांगितलेच, वर अक्षरश: "मांडूनही" दाखवले. ;) 'शब्द'प्रभू असण्याबरोबरच योगप्रभू हे कलाकारही आहेत, हाडाचे नाही कागदाचे. त्यांचे 'वैश्विक सूत्र' त्यांनी चक्क ओरी'गामी' मधूनच मांडून दाखवले. तसेच ओरी या शब्दाचा एक नवीन अर्थही समस्तांना विषद केला. गामी सगळ्यांनाच माहिती असते म्हणा. योगप्रभूंनी आता 'ओरीगामी'ची मालीका लवकर चालू करावी अशी मी त्यांना विनंती करतो.
दंगलग्रस्त
जे. पी. मॉर्गन: याला भेटण्यासाठी हा कट्टा आयोजीत केला आणि हाच पठ्ठ्या सर्वात उशीरा आला. कारण काय तर म्हणे 'कसे असतील सगळेजण कोनजाने' हा प्रश्न त्याला पडला होता. त्यामुळे कुंपणावरच बसून गंमत बघु असा विचार करुन तो आला होता. पण त्याचे टायमिंग एकदम हुकले. तो येइपर्यंत कट्ट्याचं दंगलीत रुपांतर झालं होतं. आणि मग आल्यावर नुसताच बावचळून आणि भंजाळून गेला होता. कोणाचे ऐकू आणि किती ऐकू असा एकदम बिचारा झाला होता की काहीच बोलला नाही. शेवटी मात्र धीर करुन जोकचा एक फटाका फोडलाच त्याने, लवंगीच होता कारण दंगलग्रस्त होता तो यावेळी.
मृत्यून्जय: एक धीरगंभीर व्यक्तिमत्व दंगलीत पार झाकोळुन गेलं असं मला वाटत. पण दंगलीच्या सुरुवातीपासून असल्यामुळॆ दंगलीचा आनंद घेउन जोकचा एक आपटबारही फोडून घेतला पठ्ठ्याने. पण याचीही पहिलीच वेळ असल्याने (सर्वांना भेटण्याची) जास्त काही न बोलता ऐकतच बसल्यामुळे अजून एकदा त्यांना घेउन बसावे लागणार आहे असे दिसते.
असूर: टेबलावरील बाटल्या, ग्लास आणि धडाधड सुटणार्या ऑर्डरी बघुन, "च्यायला मी पितही नाही आणि खातही नाही तरीही या बलदंड बिलाचा भागीदार व्हावे लागणार" असा विचारी चेहरा करुन खर्या अर्थाने दंगलग्रस्त झाला होता. त्यात अजून नवीन लग्न झाल्यामुळे फोनवरुन "रिमोट कंट्रोल्ड" होऊन 'लग्नग्रस्त' असल्याची जाणीवही करुन देत होता. त्याने घेतलेल्या चॉकलेटचे रहस्य या "सध्या लग्न झाले आहे" (हे विधान त्याचेच आहे) या परिस्थितीत दडलेले होते, हे दिसत होतंच.
कुंपणावरचे दंगलग्रस्त
जातीवंत भटका : मी यायच्या आधीच याचे आगमन झाले होते. मी पावसातून, गारव्यातून असा आत आडोश्याला आलो तोच बहदराने मला पेटती शिग्रेट ऑफर केली. त्यावेळी त्या शिग्रेटीचे इतके महत्व होते की त्या पुण्याबद्दल त्यालाही त्याच्या बायकोकडे परदेशात भटकंती करायला मिळो अशी इश्वरचरणी मी प्रार्थना करतो. त्या ऑफर केलेल्या शिग्रेटीच्या झुरक्यातला आनंद शब्तातीत आहे. बरं, हे कुंपणावरचे दंगलग्रस्त आयटीग्रस्त आहेत माझ्यासारखेच. मग काय सूर आणखीनच जुळले. पण हा "आयटीग्रस्तांचा दोस्ताना" बिकांना कुठे बघवतोय, दंगलखोर ना हे. लगेच 'अतिशय गंभीरपणॆ' त्यांनी त्यांचा जळजळीत निषेध तिथल्या तिथे नोंदवला :(
धमाल मुलगा: मागच्या आणि या जन्मी केलेल्या महाभयंकर पापांमुळे याच्या खाण्या-पिण्याला डॉक्टरांनी 'बुच' लावले आहे. तरीही त्या बुचाला थोडे भगदाड पाडुन याचे पापं करण चालुच आहे. पण पुर्वाश्रमीचा दंगेखोर असला तरीही या कट्ट्याचा आयोजक या नात्याने त्याला ना धड दंगेखोर होता आले ना धड दंगलग्रस्त. ना पोलीसही.
श्रावण मोडक: वादाच्या वेळी मिपावर यांची साक्ष घेतली जाते ते काही उगाच नाही याची प्रचिती यांनी करुन दिली. अतिशय पोक्त होउन सगळ्यांची मजा बघत बसले होते. दंगल थोडी कमी होतेय, असे झाले की लगेच काहीतरी काडी लावायचे योगप्रभूंना. पण दंगल पेटली पुन्हा की लगेच पोक्त हौन मिश्कीलपणे सगल्यांकडे बघत बसायचे. शिका शिका यांच्याकडुन.....
सोकाजी: 'सगळ्यात महत्वाचे, मादक द्रव्य' या तत्वाला चिकटून बसला होता हा सोक्या, दंगलग्रस्ताचा आव आणून. असो आत्मप्रौढीचा प्रमाद नाही करत, नाहीतर आहेतच बिका निषेधाचा खलिता घेऊन. (मरतोय आता मी ;))
आता जरा सचित्र ओळख
डावीकडुन : जे.पी. मॉर्गन, बिका, श्रामो, जातीवंत भटका, असुर, सोकाजी, योगप्रभु, परा, मृत्युन्जय आणि फोटो काढणारा धमु :)
बाकी चित्रांसाठी इथे टिचकी मारा.
नोट: पराठा कट्ट्यालाही जायचे फार मनात होते, पण ते जमले नाही :( तो धागा वाचुन ऑलरेडी इनो घेतल्या गेला आहे.
प्रतिक्रिया
1 Sep 2011 - 12:37 am | बिपिन कार्यकर्ते
रेवतीमाय! लिहिणारा सोक्या आणी त्याला हवा देणारे मोडक, धम्या आणि परा! तू काय विश्वास ठेवतेस? मी असं काही बोलेन का? उगाच काय तरी लिहितात हे लोक... म्हणतात ना त्यातली गत गं बाई! दिखावे पे ना जाओ, अपनी अकल लगाओ!
- शीलवान बिपिन.
मी दंगा केला नाही, मी ब्लेम घेणार नाही!
- बाणेदार बिपिन.
अवांतर: मागच्यावेळचे जे उदाहरण दिलेस त्यातही माझे नाव नाही हे तुझ्या लक्षात आलेच असेल. काय? :)
- अॅडव्होकेट बिपिन.
1 Sep 2011 - 12:39 am | श्रावण मोडक
शेजार. फोटो पहा. कळेलच. ;)
1 Sep 2011 - 3:32 pm | मृत्युन्जय
मी दंगा केला नाही, मी ब्लेम घेणार नाही!
देवा. सत्याचे दिवस सरले हेच खरे.
31 Aug 2011 - 8:20 pm | प्रभाकर पेठकर
कट्ट्यापेक्षा प्रतिसादांमध्येच दंगल उसळलेली दिसते आहे.
कट्ट्याच्या छायाचित्रांमध्ये दंगलीचे बरेचसे 'पुरावे' गायब केलेले दिसत आहेत. स्प्राईट्ची बाटली आणि रिकामे ग्लास दंगलींचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाहीत.
सोवळा किंवा ओवळा कुठलाही कट्टा असेल तरी (भारतात असलो तर) यायला आवडेल. भजनी कट्ट्यालाही हजेरी लावेन मात्र टाळ-मृदुंग कोणी आणायचा हे आधी ठरवावे.
1 Sep 2011 - 12:57 am | रेवती
परवाच तुमची आठवण आली होती.
अधून मधून मिपाभेटीला येत जावा.
कित्येक महिन्यात तुमची पाकृ आली नाहीये.