अल्बर्ट स्पिअर - भाग - ६

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
15 Aug 2011 - 1:41 pm

अल्बर्ट स्पिअर - भाग १
अल्बर्ट स्पिअर - भाग २
अल्बर्ट स्पिअर - भाग ३
अल्बर्ट स्पिअर - भाग ४
अल्बर्ट स्पिअर - भाग ५

विश्वासघात आता वहिवाट आहे,
मित्रांना वाटे मैत्री हा शाप आहे !
(त्यावेळच्या घडामोडींचा आभ्यास करताना मला हा शेर सुचला. याला शेर म्हणावा का अजून काही, ते कळत नाही)

कटकारस्थाने व अल्बर्ट स्पिअर :

१९४२ च्या थंडीतील स्टॅलिनग्राडच्या मानहानीनंतर बोरमन, कायटेल व लॅमर्स यांनी हिटलरच्या भोवती आपले पाश आवळले.

हिटलरलकडे येणारे सारे कागद, आता त्यांच्या चाळणीतून जायचे. याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेलच. सगळ्या हुकूमशहाच्या नशिबी हेच का येते कळत नाही. आपण इतिहासात डोकावले की, आपल्याला हेच दिसेल. माओ, लेनिन, स्टॅलिन, एवढेच काय एखाद्या पक्षाच्या शक्तिमान अशा अध्यक्षांच्या नशिबीसुद्धा हेच असते, उदा. आपल्या येथे स्व. काशिराम..... असो. आता हिटलरच्या समोर सहीसाठी काय ठेवायचे हेसुद्धा हे त्रिकुट ठरवायला लागले. याला फक्त एकच अपवाद होता आणि तो म्हणजे अल्बर्टचा. अल्बर्टच्या थोड्याच दिवसात लक्षात आले की या तिघांनी आपापले प्रांत वाटून घेतले होते.

ज. कायटेल -

कायटेल सैन्यदलाच्या संदर्भातील कागद बघायचा. पण काहीच दिवसांनी त्याला कळून चुकले की हवाईदल आणि नौदल यांच्या प्रमुखांना ही व्यवस्था अजिबात मान्य नव्हती आणि ते त्याचे सर्व आदेश धुडकावून लावत होते. सर्व खात्याचे प्रश्न व कागद, तसेच प्रशासकीय आदेश इत्यादी हे लॅमर बघू लागला तर बोरमन अंतर्गत धोरणे, सुव्यवस्था इत्यादी.. लॅमरला हिटलरची भेट सहसा मिळायची नाही त्यामुळे त्याची कामेही बोरमनमार्फतच व्हायची.

बोरमन -

लॅमर -

लवकरच हिटलरची सत्ता जवळजवळ या तिघांच्याच हातात आली की काय अशी शंका वरिष्ठ वर्तुळात बोलून दाखवली जाऊ लागली. बोरमन तर हिटलरला सोडतच नसे. हिटलरला आपल्या मंत्र्यांच्या उपमंत्र्यांना बैठकीला बोलवायची अत्यंत हौस असल्यामुळे सगळे मंत्री आपला उपमंत्री हा बिनडोक असेल अशी काळजी घेत असत. तसेच आपला हिटलरवर असलेला प्रभाव कमी होईल या भीतीने कोणी रजाही घेत नसे. यालाही दोन अपवाद होतेच ते म्हणजे अल्बर्ट व गोअरींग. शेवटी अशी वेळ आली की प्रांतप्रमुख (आईश्लाइटर) आणि पक्षाच्या गावप्रमुखांनाही (गाऊलैटर) हिटलरची भेट मिळेनाशी झाली.

मध्यवर्ती आर्थिक योजनेच्या बैठकींच्यावेळी अल्बर्टने इतर खर्चांना कात्री लावण्याचा बराच प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. अल्बर्टने सुचविलेल्या इतर योजनांनाही अशाच वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. जर या मान्य करण्यात आल्या असत्या तर युद्ध अजून काही काळ चालवता आले असते आणि जर्मनीला युद्धानंतरचा काळ जरा सुसह्य झाला असता. हिटलरला अल्बर्ट आणि कंपनीने उधळपट्टी थांबवण्यासाठी अनेक मार्ग सुचवले. त्यातच एका फॅक्टरीमधे होत असलेले स्त्रियांच्या हेअरस्टाईलसाठी वापरण्यात येणारे कसलेसे रसायनाचे उत्पादनही बंद करावे लागणार होते. ( ती जागा व यंत्रे, दुसर्‍या कामासाठी वापरण्यात येणार होती). हे उत्पादन इव्हा ब्राऊन वापरत असल्यामुळे व तिने तक्रार केल्यामुळे हिटलरने त्यांना असा सल्ला दिला की “तूर्तास फक्त हेअरडायच बंद करा. मग पुढे बघू.”

इव्हा ब्राऊन -

हळू हळू कॅबिनेटच्या बैठकाही या तिघांच्या हातात जावू लागल्या व त्यात कामाऐवजी वादळी चर्चाच होऊ लागल्या. हे झाल्यावर गोबेल्सने सगळ्या देशभर प्रचाराची एकच राळ उडवली. त्यात त्याने खर्चाला कात्री लावण्याचे जनतेला आवाहन केले तसेच महागडी हॉटेल/बार बंद पाडायचे आवाहनही केले. त्याने वातावरण इतके तापवले की जनतेने उठावात बरेचसे बार व महागडी हॉटेल्स बंद करून टाकली. यातच राईशमार्शलचा लाडका बार “हॉर्शर”ही बंद झाला. अत्यंत आळशी गोअरींगने या बारच्या संरक्षणासाठी मात्र आपले बूड त्वरेने हालवले. पण तोपर्यंत गोबेल्सचे कार्यकर्ते तेथे जमा झाले होते व परिस्थिती हाताबाहेर गेली होती. याचा राग गोअरींगने मनात ठेवला होता.

राईश मार्शल गोअरींग -

याच सुमारास गोबेल्सच्या आलिशान प्रासादात एक बैठक भरली त्यात कायदा मंत्री थिरॅक, राज्यसचिव स्टुकार्ट, मिल्च, गोअरींगचा उजवा हात क्रोनर, फंक व ले. या बैठकीत अल्बर्टने सुचविलेल्या उपायांची प्रथमच चर्चा करण्यात आली.

नऊ दिवसानंतर गोबेल्सने अल्बर्टला त्याच्या त्याच घरी बैठकीला बोलावले. त्या प्रासादाची त्याने आता झोपडी करून टाकली होती. सगळे फर्निचर काढून टाकले होते, मोठमोठाले पडदे, महागड्या गोष्टी इ. अदृष्य झाल्या होत्या. (त्याला म्हणे जनतेला उदाहरण द्यायचे होते) एका लहानशा खोलीत ही बैठक झाली.
“ हे असे फार काळ चालू देणे धोक्याचे आहे. हिटलर बर्लिनला येत नाही, त्याला आपली मते ऐकायला वेळ नाही. आपल्याला सगळे अहवाल, प्रश्न, बोरमनलाच पाठवावे लागतात. त्यातील किती हिटलरकडे पोहोचतात देवाला माहीत. काहीतरी करून हिटलरच्या बर्लिनच्या भेटींची संख्या वाढविली पाहिजे. बोरमनच सगळे निर्णय घेतो पण हिटलरला वाटते की त्यानेच सर्व निर्णय घेतले आहेत. खरे तर आपल्या समोर अल्बर्ट, तू म्हणतोस तसा नेतृत्वाचा प्रश्न नसून नेत्याचाच गंभीर प्रश्न उभा आहे.” तो काय बोलतोय हे त्याचे त्यालाच कळत नव्हते.

डॉ. गोबेल्स -

हा सगळा स्टॅलिनग्राडचा परिणाम होता. शेवटी असे ठरले की याकामी गोअरींगचीच मदत घ्यावी लागेल. म्हणजे मंत्रीपरिषदेचा अध्यक्ष म्हणून त्याला जे अमर्यादित आधिकार होते, त्याचा उपयोग करून घ्यायचा हे ठरले. गोबेल्स आणि गोअरींगचे संबंध त्या बारप्रकरणामुळे तणावपूर्ण असल्यामुळे अल्बर्टला गोअरींगशी बोलण्याची विनंती करण्यात आली. अर्थात हा तणाव नंतर दोघांच्यात दिलजमाई करून दूर करण्यात आला. (ते हॉटेल खाजगी म्हणून जाहीर करण्यात आले आणि त्याला बंदीपासून मुक्ती देण्यात आली.) सगळा मनमानी ढोंगीपणा चालला होता हेच खरे. याच बैठकीमुळे अल्बर्टचा अस्सल राजकारणात प्रवेश झाला असे म्हणायला हरकत नाही.

खरे तर बोरमनच्या कंपूला दूर करून तसे काहीच साध्य झाले नसते. बोरमन जाऊन तेथे गोबेल्सचा कंपू (ज्यात अल्बर्टही होता) आला असता आणि त्यांनी हिटलरचेच धोरण हिरीरीने पुढे चालवले असते. अल्बर्टला जे साध्य करायचे होते त्यासाठी हिटलरचाच काटा काढायला लागला असता पण त्यांच्या स्वप्नातही ते शक्य नव्हते. अखेरीस गोअरींगबरोबरची बैठक पार पडली. त्यात अल्बर्टने बोरमनचे कारस्थान काय आहे हे त्याला समजावून सांगितले. त्यावर गोअरींगचे ठाम मत पडले की बोरमन स्वत:ला हिटलरचा वारसदार समजायला लागला आहे आणि त्याची पावले त्याच दिशेने पडत आहेत. सत्य हे होते की अल्बर्टने गोअरींगच्या मनात बोरमनबद्दल विष कालवायचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला. अर्थात बोरमन हा ही पक्का बदमाश होता. त्याची पद्धत फार वेगळी होती. एखाद्याची बदनामी करायची असेल, त्याला मातीत घालायचे असेल तर तो बर्यालच दिवसाची योजना आखे. तो त्या माणसाबद्दल कधीच वाईट बोलायचा नाही. म्हणजे उदा. हिटलरला एखाद्या व्यक्तीबद्दल तो एकदम काहीच सांगत नसे. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या दिवशी, तो चहाड्या अशा गुंफे की म्हटले तर त्याला काहीच अर्थ नसे. त्यावेळीसुद्धा बोरमन हिटलरशी बोलताना त्या व्यक्तीचीच बाजू घेऊन बोलायचा. त्याची प्रशंसा पण अशी करण्यात येई की त्यातून त्या व्यक्तीचे वाईट गुणच लक्षात राहिले पाहिजेत. (उदा. तो खूप शूर आहे पण त्याच्यामुळे २० रणगाडयांची वाट लागली ") पण एके दिवशी एखाद्या प्रसंगात हिटलरला त्या सगळ्या कहाण्यांची सांगता लागायची आणि शेवटी त्या व्यक्तीची गच्छंती व्हायची. अल्बर्टने गोअरींगला असे पटवले की बोरमन हीच चाल गोअरींगच्या बाबतीत खेळतोय.

रिबेन्ट्रॉप -

अल्बर्टने गोअरींग आणि गोबेल्सची गाठ घालून दिली आणि त्या दोघांमधील गैरसमज दूर झाले. याचे खरे कारण शत्रूचा शत्रू हा आपला मित्र हेच होते. त्यात असे ठरले की जर्मनीच्या संरक्षणासाठी जी संरक्षण परिषद स्थापन करण्यात आली होती त्यात गोबेल्स आणि अल्बर्टलाही सामिल करून घ्यायचे, रिबेन्ट्रॉपचा काटा काढायचा कारण त्याच्याबद्द्ल गोबेल्सचे मत आजिबात चांगले नव्हते. त्याने हिटलरचे याच्याविरूद्ध कान भरायचे बरेच प्रयत्न केले होते पण गोबेल्सचे खच्चिकरण करायला हिटलरने हे प्यादे राखून ठेवले होते. थोडक्यात असे ठरले की गोअरींगची ताकद अजून वाढवायची. त्यात सर्व प्रांतप्रमुखांना आणि गावप्रमुखांना बोलविण्याचे आधिकार या परिषदेला द्यावेत इ. कलमात, या गोबेल्सने अजून एक कलम मोठ्या शिताफीने जोडले होते ते म्हणजे या काऊन्सीलचे उपाध्यक्षपद गोबेल्सकडे रहावे आणि राईशमार्शल गोअरींगच्या अनुपस्थितीत सर्व आधिकार उपाध्यक्षांकडे रहावेत. अर्थ सरळ होता, गोअरींगला त्याचा आत्ताचाच कार्यभाग झेपत नव्हता तर तो या परिषदेच्या बैठकींना काय हजर राहणार ?

लवकरच एक संधी चालून आली. कामगार मंत्री साऊकेल कामगार पुरवठ्याचे जे आकडे बैठकींमधे देत होता ते फारच शंकास्पद होते. कशाशीही ते जुळत नव्हते.

साऊकेल -

व फाशी झाल्यावरचे दारूण चित्र -

गोअरींगने लॅमर्सला एक बैठक बोलवायला सांगितली आणि त्यात अल्बर्टच्या कंपूला पण आमंत्रण द्यायला सांगितले. या बैठकीच्या अगोदर अल्बर्टने गोअरींगची गाठ घेतली आणि या बैठकीतून काय मिळवायचे आहे याची कल्पना दिली. त्यावर गोअरींगने ते सगळे होईल याची अल्बर्टला खात्री दिली. या बैठकीत अल्बर्टला राजकारण काय असते याचा पहिला हिसका बसणार होता. बैठक सुरू झाली तेव्हा, त्या बैठकीत बोरमन, हिमलर, कायटेल इत्यादि मंडळी उपस्थित असलेली बघून अल्बर्टच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गोबेल्सला यकृताच्या दुखण्याचा त्रास होऊ लागल्यामुळे तो या बैठकीला गैरहजर राहणार आहे असा त्याचा निरोप आला होता. हे खरे होते का खोटे हे शेवटपर्यंत कळले नाही पण एकंदरीत घटनांचा क्रम बघता खोटेच असावे. शेवटी त्याची भीती खरी ठरली कारण गोअरींगने साऊकेलला आकड्यांचे स्पष्टीकरण मागण्याऐवजी मिल्चवरच हल्ला चढवला. मिल्चवर हल्ला म्हण्जे अल्बर्टवरच हल्ला होता. गोअरींगने साऊकेलचे त्याच्या कामाबद्दल जाहीर आभारच मानले. बिचारा मिल्च. त्याला काय करावे तेच सुधरेना. अखेरीस त्या बैठकीचा आणि अल्बर्टच्या आणि गोअरींगच्या सहकार्याचा अंत झाला आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या बैठकीनंतर गोअरींग अल्बर्टला भेटला आणि म्हणाला “ तुला मिल्चबरोबर काम करायला आवडते ! हो ना ? पण त्याच्यापासून सावध रहा. तो एक नंबरचा विश्वासघातकी आहे.” अल्बर्टने हे मिल्चच्या कानावर घातले तेव्हा तो हसला आणि त्याने कबूल केले की दोनच दिवसापूर्वी गोअरींगने त्यालाही हेच सांगितले होते. या वरिष्ठ वर्तुळात विश्वासघात हा इतका खोलवर रुजला होता की मैत्री हा शाप वाटावा.

काही दिवसांनंतर मिल्चने खरी हकीकत शोधून काढली. गोअरींगच्या अमली पदार्थांच्या सेवनाची इत्तंभूत बातमी गेस्टापोंनी त्याच्याच कानावर घातली आणि बोरमनने गोअरींगला साठ लाख मार्क्स आहेर म्हणून कारखानदारांकडून मिळतील अशी व्यवस्था केली होती. एवढेच नाहीतर एका बैठकीच्या दरम्यान बोरमनने अल्बर्टला धमकावले “गोअरींगला जागे करणे महाग पडते हे आता तुला कळले असेल”. ही तथाकथित आघाडी कोसळल्यानंतर गोअरींगने अल्बर्टच्या विरूद्ध आघाडीच उघडली. अल्बर्टला काय करावे ते कळेना. नशिबाने त्यालाही लवकरच एक संधी साधून आली. गोअरींगने त्याच्या आधिकारात त्याला पोलाद उत्पादकांची एक बैठक बोलावण्यास सांगितली. त्या बैठकीत मोठमोठे कारखानदार उपस्थित होते. गोअरींग नेहमीप्रमाणे नशा करून आला होता. गंमत म्हणजे त्याने या लोकांना, ज्यांचे आयुष्य पोलाद उत्पादन करण्यात गेले होते त्यांना पोलाद उत्पादन कसे करायचे याच्यावर एक भले मोठे भाषण ठोकले. सर्व उपस्थितांमधे चुळबुळ चालू झाली. पण थोड्याच वेळात गोअरींगने आपले डोके टेबलावर ठेवले आणि तो चक्क झोपी गेला. झोपेतून उठल्यावर त्याने तडफेने बैठक संपली असे जाहीर करून टाकले आणि तेथून चालता झाला. अशाच एका दुसर्‍या र्प्रसंगानंतर मात्र हे सगळे स्पिअरने हिटलरच्या कानावर घातले. हिटलरच्या मनातून गोअरींग एवढा उतरला की त्याने सर्व पोलाद उत्पादकांची बैठक बोलाविली आणि गोअरींगकडे लक्ष न द्यायची सूचना केली. त्यानंतर गोअरींग जो अकार्यक्षमतेच्या खोल गर्तेत कोसळला तो एकदम न्युरेंबर्गच्या खटल्यातच परत जागा झाला.

हा त्यावेळच्या जर्मनीतील राजकारणाचा नमुना होता....याच्यापेक्षाही भयंकर किस्से आहेत ते परत केव्हातरी....

जयंत कुलकर्णी.
क्रमशः :-)

इतिहासकथासमाजराहणीलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

प्रास's picture

15 Aug 2011 - 2:12 pm | प्रास

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनीत खेळल्या जात असलेल्या राजकारणाची उत्तम माहिती या लेखात तुम्ही करून दिलेली आहे. ती वाचताना त्यावेळचा प्रसंगच नव्हे तर अगदी तो काळही विशेष करून डोळ्यापुढे उभा राहत आहे.

पुन्हा एकदा म्हणतो, "उत्तम लेखमाला! खूप गोष्टी उलगडत आहेत यामुळे. तेव्हा पुढले भाग जरूर येऊ द्यावेत"

हा त्यावेळच्या जर्मनीतील राजकारणाचा नमुना होता....याच्यापेक्षाही भयंकर किस्से आहेत ते परत केव्हातरी....

नक्कीच वाचायला आवडतील. या लेखमालेतच होऊन जाऊ देत की......

तुमचा फ्यान :-)

पल्लवी's picture

15 Aug 2011 - 7:34 pm | पल्लवी

>>>>>"उत्तम लेखमाला! खूप गोष्टी उलगडत आहेत यामुळे. तेव्हा पुढले भाग जरूर येऊ द्या"

डिट्टो.

जाई.'s picture

15 Aug 2011 - 4:54 pm | जाई.

+1

रोचक माहिती

नविन माहिती बाहेर येतेय. कुलकर्णीकाका आणखी माहिती येऊ द्या.

- पिंगू

मन१'s picture

15 Aug 2011 - 5:28 pm | मन१

.

वाचतोय!
येऊ द्या दमा दमानं :)

प्राजु's picture

16 Aug 2011 - 12:21 am | प्राजु

प्रचंफ वेगवान लेखमाला. :)
मस्तच.

जयंत कुलकर्णी's picture

16 Aug 2011 - 9:17 am | जयंत कुलकर्णी

प्राजू,

माझ्या लेखनाचा वेग तुला भलताच आवडतो आहे असे दिसते. माझं "लेखन" तुला आवडण्यासाठी काय करावे लागेल ते सांग, म्हणजे प्रयत्न करता येईल.

बहुतेक वेग कमी करावा लागेल का ? सध्या वेळ असल्यामुळे या गमजा चालल्या आहेत माझ्या !

:-)

शिल्पा ब's picture

16 Aug 2011 - 1:52 am | शिल्पा ब

मस्त. आणि पुन्हा केव्हातरी नकोच आत्ताच सांगा.

स्पा's picture

16 Aug 2011 - 10:27 am | स्पा

जे बात
'जकु' रॉक्स

या प्रकारचं राजकारण समजावुन करण्यासाठी जेवढी बुद्धीमता लागते जवळपास तेवढीच समजावुन घेण्यासाठी सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या करुन सांगितल्या बद्दल धन्यावाद जयंतसर.

अवांतर - ५० वर्षांनी असेल लेखन अण्णा हजारेंबद्दल केले गेल्यास कसे होईल याची कल्पना करुन हसु येतंय .

किसन शिंदे's picture

16 Aug 2011 - 11:37 am | किसन शिंदे

हे काय, खाली क्रमश टाकायला विसरलात काय?

लेखमाला पुढे चालू ठेवा, इतक्यात बंद करू नका.

अवांतर: अल्बर्ट स्पिअरला बाजुला ठेवून हळूहळू हि मालिका हिटलर आणी त्याच्या आजूबाजूस असलेल्या राजकारणाच्या वाटेने जातेय असं वाटतयं.

जयंत कुलकर्णी's picture

16 Aug 2011 - 1:15 pm | जयंत कुलकर्णी

अल्बर्ट स्पिअरने ज्या राजकारणात / घडामोडीत भाग घेतला तेवढाच याच्यात येईल. आणि शेवटी वाटलेच तर न्युरेंबर्गचा खटला....फक्त त्याच्यापुरता...

मला वाटते असे केले तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल...

किसन शिंदे's picture

16 Aug 2011 - 1:34 pm | किसन शिंदे

अल्बर्ट स्पिअरने ज्या राजकारणात / घडामोडीत भाग घेतला तेवढाच याच्यात येईल. आणि शेवटी वाटलेच तर न्युरेंबर्गचा खटला....फक्त त्याच्यापुरता...

अल्बर्ट स्पिअरशी निगडीत राजकारण आणी घडामोडी आणी त्याबरोबरच न्युरेंबर्गचा खटला यावरच जास्त भर द्या, हेच म्हणायचं होतं मला

नया है वह's picture

10 May 2017 - 6:10 pm | नया है वह

..

सविता००१'s picture

16 Aug 2011 - 2:54 pm | सविता००१

काका, मालिका इतकी सुंदर रंगत आहे की ती बंद करण्याची कल्पनाही सहन होत नाही. खूप माहीत नसलेल्या गोष्टी कळतायत मला.

diggi12's picture

17 Oct 2023 - 1:37 pm | diggi12

पुढचा भाग ?