भाग १: मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय
पूर्वपीठिका: लेख जरा लांबलचक होतो आहे अशी जाणीव लिहिताना झाली होती. त्यामुळे तो शेवटीशेवटी थोडक्यात आटपला होता, हे कबूल करतो. पण शेवटचा भाग त्रोटक करण्यामागे त्याशिवाय अजून एक विचार होता: अखेर चित्रं ही डोळ्यांनी पहायची असतात. त्याविषयीचं विवेचन हे फार फार तर जरा मदत एवढ्यापुरतंच यावं असं मला वाटतं. असो. काही लोकांची तशी इच्छा दिसल्यामुळे थोडं अधिक विवेचन देत आहे. शिवाय प्रत्यक्ष लेखाच्या आशयाशी संबंधित अशा आलेल्या काही प्रश्नांचे प्रतिसादही दिले आहेत. हे सर्व लिहिता लिहिता ते पुन्हा लांब होऊ लागलं म्हणून मूळ धाग्यावर प्रतिसाद देण्याऐवजी पुढचा भाग म्हणून प्रकाशित करत आहे.
काही प्रतिसादांमधून उपस्थित झालेले मुद्दे विवेचनाच्या दृष्टीनं कळीचे आहेत म्हणून त्यांना आधी प्रतिसाद देतो.
वास्तवदर्शी शैलीच आकर्षक वाटते: इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ब्रिटिश येईपर्यंत भारतात वास्तवदर्शी शैली नव्हती. भारतीय कलांमध्ये शैली आणि परंपरा अनेकविध होत्या आणि त्या खूप समृद्ध होत्या, पण त्यातली कुठलीही शैली 'जितकं हुबेहूब तितकं चांगलं' असं मानत नव्हती. त्यामुळे 'वास्तवदर्शी शैलीच आकर्षक वाटते' हा दृष्टिकोण खूपच अलीकडचा आणि उपरा आहे. म्हणजे हे आपलं एक प्रकारचं 'कंडिशनिंग' झालेलं आहे. गंमत म्हणजे आफ्रिका, ओशनिया, मध्यपूर्व, प्री-कोलंबिअन अमेरिका अशा कोणत्याही संस्कृतींतल्या पारंपरिक शैली वास्तवदर्शी नाहीत. भारताला परकीय कलाप्रवाहांची सवय पूर्वीपासून होती. गांधारमधल्या कलेवर ग्रीकांचा प्रभाव पडला होता; मुघल लघुचित्रं पर्शियन परंपरेतून आली. पण प्रत्येक वेळी हे प्रभाव आत्मसात करताना आपण ते आपल्यात रिचवले. शिवाय, मुळात पाश्चिमात्य कलाप्रवाहांतदेखील आता वास्तवदर्शी कलेपासून दूर प्रवास चालू झालेला होता. याची जाणीव होती म्हणूनसुद्धा प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्सना वास्तवदर्शी चित्रणात अडकून पडणं ही वैचारिक गुलामगिरी वाटत होती. जागतिक कलेच्या इतिहासात वास्तवदर्शी शैली हा एक फार छोटा आणि मर्यादित कालखंड आहे. त्याआधी, त्यानंतर आणि जगात इतरत्र खूप वेगवेगळे कलाविष्कार झाले आणि होत आहेत. पण जोपर्यंत वास्तवदर्शी कलेविषयीच्या या आकर्षणात आपण अडकून राहू तोपर्यंत मानवेतिहासातल्या एका मोठ्या संचिताला आपण मुकत राहू.
चित्राचा अर्थ किंवा चित्र समजणे म्हणजे नक्की काय: एका काळापर्यंत जगभरातली कला ही प्रामुख्यानं धर्माधिष्ठित होती. त्यात धर्मसंस्कृतीविशिष्ट असे अनेक संकेत असत. त्यांचं सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय अंगानं विश्लेषण करता येतं; केलंही जातं. उदा: एखाद्या समाजामध्ये दरवाजापाशी कासव काढण्याचा संकेत असेल. त्यामागे कासवं दीर्घायुषी असतात ही जाणीव आणि घरात राहणार्यांना तसं दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा असेल. आपल्याला ते माहीत नसताना आपण ते कासव पाहिलं तर हा अर्थ आपल्याला कळणार नाही, पण कासव सुंदर आहे असं आपण म्हणू शकू. म्हणजे इथेच अर्थबोधनाचे दोन प्रकार झाले. त्यात आधुनिक कलेनं हे धर्माशी असलेलं कलेचं नातं तोडलं. काही काळ कलेला राजाश्रयाचा लाभ झाला - तेव्हा सरदार-उमराव-राजे-राण्या यांची भाटगिरी करणारी व्यक्तिचित्रं काढली जात. आधुनिक कलेच्या लोकशाहीकरणाचा एक भाग म्हणजे सर्वसामान्य माणसांचं चित्रण होऊ लागलं आणि त्यांच्या दृष्टिसुखासाठी चित्रांची प्रदर्शनंदेखील भरवली जाऊ लागली. (फ्रेंच राज्यक्रांतीनंतर राजाचा कलासंग्रह लूव्र या राजवाड्यातच सर्वसामान्य नागरिकांना पहाण्यासाठी खुला केला गेला.) पण या लोकशाहीकरणाचा एक अर्थ असाही झाला की आधुनिक कला एक प्रकारे व्यक्तिगत झाली. म्हणजे सगळ्यांनी एका शैलीत चित्रं काढणं यापेक्षा कलाकारानं आपली अशी व्यक्तिगत शैली विकसित करणं हे होऊ लागलं. (पिकासोसारख्यांनी तर एक नव्हे, कित्येक व्यक्तिगत शैली विकसित केल्या.) पण मग या सर्व व्यक्तिसापेक्षतेतून कलाकृतीचं अर्थबोधन हेदेखील तितकंच अवघड बनलं. म्हणजे अगदी रविवर्म्याच्या सरस्वतीच्या चित्रातही शुभ्रवस्त्रावृता, वीणावरदंडमंडितकरा वगैरे संकेत आहेत म्हणून ती सरस्वती आहे एवढाच अर्थ आहे. त्याहून अधिक अर्थ असा काही नाही. गंमत म्हणजे काही भारतीयांनी या सरस्वतीच्या प्रतिमेची पूजा केली तर काहींनी आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवण्यासाठी तिचा उपयोग केला. म्हणजे केवळ भिंत सजवण्याचा एक मार्ग असाही एक अर्थ त्यातून काढता येतो.
असो. सांगण्याचा मुद्दा हा की अर्थ असा काही असेलच असं नाही. हे मदर तेरेसाचं चित्र आहे किंवा ही एक बाई आहे एवढाच अर्थदेखील असू शकतो.
उदाहरणादाखल हे चित्र पहा:
यात एक चेहरा आहे हे कळावं इतपत तपशील आहेत. त्यामुळे याला अमूर्त म्हणता येणार नाही. थोड्याशाच पण ठळक रेषांतून हे लक्षात आणून देण्याची हुसेनची हातोटी उल्लेखण्याजोगी आहे. सबंध चित्रावर निळ्या रंगाच्या विविध छटा, गडद काळ्या रेषा आणि करड्या पॅलेटचं प्रभुत्व आहे. अशी रंगसंगती ही फार प्रसन्न मानली जात नाही. चेहर्यावरचे भावही प्रसन्न वाटत नाहीत. म्हणजे रंगसंगती आणि चित्राचा भाव यांचा काही संबंध लागतो असं म्हणता येईल. ज्यांना पिकासोच्या चित्रांचा परिचय आहे त्यांना त्याच्या 'ब्लू पिरीअड'ची दाट छाया यावर दिसेल.
आता हे चित्र पहा:
ठळक रेषांमधून घोड्याचा आकार पटकन जाणवेल अशी रचना यातही आहे. पण रंगसंगती वेगळी आहे. यातला विटकरी रंग अगदी गेरूच्या रंगाची आठवण करून देतो. हे खास भारतीय परंपरेतून आलेलं आहे. पार्श्वभूमी आणि घोड्याचं अंग या दोहोंत तो आहे. काळ्या रंगाच्या वापरातून ते वेगळं दाखवून त्यातून घोडा निर्माण केलेला आहे. हे भिंतीवर किंवा जमिनीवर गेरूनं सारवून त्यातून काढलेल्या रांगोळी वगैरेशी नातं सांगतं. तसंच निळ्या रंगाबाबत म्हणता येईल. नीळ वापरून केलेला गडद निळा असा हा वाटतो. आणि पोपटी तर खरोखर पोपटासारखा आहे. म्हणून हे पॅलेट खास भारतीय वाटतं.
आता अशाच पॅलेटमधलं एक वेगळं चित्र पाहू:
यात घोडा नसून गाढव आहे असं लगेच वाटतं. का? असा प्रश्न स्वतःला विचारून पहा. चित्रातले दोन पुरुष पांढर्या रंगाच्या किंचित फटकार्यांनी दाढीधारी म्हातारे असल्याचं लक्षात आणून दिलेलं आहे. अंगाच्या रंगाच्या किंचित वेगळ्या छटेच्या एक-दोन फटकार्यांनी चेहरा कसा बोलका होतो ते पहा. अंगाचा रंग आणि कपड्यांचा रंग यांतला कॉन्ट्रास्ट लक्षात घेतलात तर मी आधी जो भारतीय रंगसंगतीतल्या झगझगीतपणाबद्दल मुद्दा मांडला होता तो लक्षात यावा. आता यातला केशरी रंगही खास भारतीय आहे हे मी सांगायला नको, पण त्याच्या किंचितशा फटकार्यातून टोपी दाखवली आहे हे लक्षात आलं का? त्यामुळे कदाचित एक दाढीवाला फकीर वगैरे असू शकेल. दोघांच्या अंगावर एक रंग पण वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून आणि दोघांच्या मधोमध थोडी हिरवाई दाखवून चित्रात एक उब येते असं मला वाटतं. म्हणजे अगदी रस्त्यात वाट विचारण्यापुरता थांबलेला माणूस आणि त्याला वाट दाखवणारा एखादा अनोळखी यांतही काही क्षणिक नात्याची उब निर्माण होते, तसं काहीसं... तू कुठचा, कुठून आलास, अच्छा, त्या गावात माझा एक भाइबंद रहातो, हो मला माहीत आहे तो, ... अशा गप्पांत क्षणभर रेंगाळणारे भारतीय मला हे पाहून आठवतात. एकंदर चित्र गोड आहे असं त्यामुळे वाटतं. रोजच्या आयुष्यातल्या छोट्याछोट्या साध्या गोष्टी दाखवणारा असा हुसेन मला माझ्या लहानपणचा एखादा प्रेमळ चाचा वाटतो. पटकन खिशातून एखादी लिमलेटची गोळी काढून हातावर ठेवेल आणि एखादी मुल्ला नसरुद्दिनची वगैरे गोष्ट सांगेल असं वाटतं.
आणखी काय सांगणार? सध्या एवढंच पुरे.
प्रतिक्रिया
12 Jun 2011 - 7:26 pm | सामान्य वाचक
मला वैयक्तिकपणे रिनाइसन्स शैलीतील चित्रे आवडतात. प्रत्येक चित्राची अ़कारण दा विन्चि , रेम्ब्रॉ , राफाएल यांच्याशी तुलना होते.
पिएता, प्रिमावेरा, नाइट वॉच, यांचे मनावरचे गारुड उतरतच नाही. आणि नव चित्रकला काही डोक्यात शिरत नाही.
12 Jun 2011 - 7:46 pm | श्रावण मोडक
एक वर्ग सुरू करायला हरकत नाही.
12 Jun 2011 - 8:47 pm | बिपिन कार्यकर्ते
ष्ट्राँग अनुमोडक!
12 Jun 2011 - 8:26 pm | ईश आपटे
मॉडर्न चित्रकलेची वाचकांना ओळख करुन दिल्याबद्द्ल आभार. एम. एफ हुसेन बद्द्ल राजकीय आक्षेप घेता येउ शकतो, चित्रकलेबाबतही घेता येउ शकतो... पण त्यांनी भारतात मॉडर्न चित्रकलेचा कल्ट रुजवला हे तर मान्य करता येईल.
दुसर सकाळ मधुन एक चित्रकार लेखन करायचे त्यांचे ह्या नव्या शैलीविषयी गंभीर आक्षेप होते... कुणाला त्यांचे नाव आठवतय का ?? सकाळ च्या अग्रलेखाच्या पानावर त्यांचे लेख यायचे.
शेवटी मॉडर्न चित्रकला मला हार्ड मेटल किंवा ट्रान्स म्युसिक सारखी वाटते. ऊठसुठ भारतीय शास्त्रीय संगीतच ग्रेट म्हणणार्यांचा जसा नव्या संगीताला आक्षेप असतो, तसाच एम एफ हुसेन ह्यांच्याविषयी ही असतो. ह्यांना धड पारंपारिक भारतीय चित्रकला ही समजलेली नसते.................
13 Jun 2011 - 7:32 am | आत्मशून्य
हुसेन यांची फक्त घोड्यांची चीत्रे मस्त असायची बाकी इतर गोश्टी/चित्रे हाइप केल्या गेल्या होत्या असा ठाम विश्वास बर्याच चीत्रकारांनी व कले संबधीत माननीय लोकांनी माझ्याशी समक्ष भेटीत काही (वर्षापूर्वी सहजच झालेल्या चर्चेमधे) व्यक्त केला होता. बाकी आपल्याला जास्तीच कळत नाय म्हून वैयक्तीक मत लीहता येत नाय.
12 Jun 2011 - 8:34 pm | राजेश घासकडवी
चित्रं व शैलीची ओळख, दोन्हीही.
तुम्ही फार पूर्वीच दृक्-कलांविषयी काहीतरी लिहायचा मानस व्यक्त केलेला होता. या निमित्ताने का होईना त्यातलं थोडं लेखन बाहेर आलं याचा आनंद आहे. चित्रकलाक्षेत्रातले प्रवाह माहीत नसल्याने माझ्यासारख्या सामान्याला अशा लेखनाने म्हणजे एखादी दुर्बोध कविता उलगडून दाखवल्यावर 'या कवीला का थोर मानलं जातं?' या प्रश्नाचं उत्तर मिळायला थोडी मदत व्हावी तशी होते.
वेगवेगळ्या भारतीय शैली, त्यांवर परिणाम करणाऱ्या जागतिक शैली, व या सगळ्यामधलं हुसेनचं स्थान याचा आढावा चांगला चालू आहे. हुसेनविषयी अनेकांच्या मनात दुर्दैवाने 'हिंदू देवतांचा अपमान करणारा' अशी प्रतिमा आहे. काहींचे हे पूर्वग्रह पक्के असले तरी बराच वाचकवर्ग इथे असा आहे ज्यांना 'हे नक्की काय प्रकरण आहे' किंवा 'या अमूर्त शैलीतून चित्रकार नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतो' हे समजून घ्यायला आवडेल. त्यांच्यातर्फे एक विनंती आहे, की इथे थांबू नये. नुसत्याच वादग्रस्त चित्रांविषयी, किंवा केवळ हुसेनविषयी लिहिण्यापेक्षा व्याप्ती वाढवून चित्रकलेविषयी, आवडत्या चित्रकारांविषयी अधिक लिहावं.
12 Jun 2011 - 8:48 pm | बिपिन कार्यकर्ते
संपूर्ण सहमत!
13 Jun 2011 - 5:19 pm | विसुनाना
पूर्ण प्रतिसादाशी सहमत . विशेषतः त्यातील शेवटच्या वाक्याकडे लक्ष वेधतो.
13 Jun 2011 - 6:01 pm | स्मिता.
घासकडवी काकांच्या आग्रहाला आमचेही अनुमोदन!
मी 'हे नक्की काय प्रकरण आहे' किंवा 'या अमूर्त शैलीतून चित्रकार नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतो' या गटात मोडते. आतापर्यंतचे दोन्ही भाग वाचून थोडं थोडं समजतंय असं वाटतंय. चित्रकलेविषयी आणखी लिहून आमच्या ज्ञानात भर घालावी.
12 Jun 2011 - 9:17 pm | गोगोल
प्लीज प्लीज प्लीज .. ईतक्यातच पुरे नको. खूप खूप मजा येत आहे वाचायला.
नेहमी सारख क्लिशे "येऊ द्यात अजून" नाही तर मनापासून, खरोखर येऊ द्यात अजून.
12 Jun 2011 - 11:36 pm | धनंजय
लेख आवडला. ओळख आवडली.
13 Jun 2011 - 7:49 am | ५० फक्त
चित्रातलं काही कळत नाही, कधी तरी यांच्या चित्रातल्या घोड्याबद्दलच्या चर्चा ऐकलेल्या आहेत, घोडे आवडतात त्यामु़ळं ती चित्रं पहायला आवडायची, पण थेट संगितासारखं, खालचा ग वरचा ढ या बाबतीत मी अतिशय उच्च ढ आहे, तसंच चित्रांच्या बाबतीत पण आहे.
पण हे लेख आवडले, अजुन लिहा आम्ही वाचत राहु.
13 Jun 2011 - 8:27 am | अरुण मनोहर
प्रकाटाआ
13 Jun 2011 - 10:41 am | नीधप
हे दोन्ही लेख लिहिल्याबद्दल आभार. आवडले लेख. पण इथेच थांबू नका. स्वातंत्र्योत्तर भारताची चित्रपरंपरा याबद्दल अजून येत राहूद्यातच.
निळ्या चेहर्यावर पिकासोच्या ब्लू पिरियडचा प्रभाव याबद्दल अगदी अगदी... पिकासो किंचित जरी माहित असेल तरी तो चेहरा बघितल्यावर पिकासोचं 'डेथ' आठवल्यावाचून रहात नाही.
13 Jun 2011 - 11:08 am | नंदन
वास्तवदर्शी शैली, छायाचित्रे आणि आधुनिक चित्रकलेची शैली ह्यांची तुलना करणारं एक प्रदर्शन पाहण्याचा अलीकडेच योग आला होता, त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही लेख अतिशय आवडले. या विषयावर अधिक लिहावं, ह्या गुर्जींच्या विनंतीशी सहमत आहे.
13 Jun 2011 - 2:43 pm | वाहीदा
लेखातिल चित्रे दिसत नाहीत :-(
त्यामुळे तुमचा हा लेख वाचण्याचा उत्साह असला तरी तुर्तास त्यावर पाणी सांडले आहे .. :-(
तुमच्या आधिच्या लेखातील चित्रे जशी दिसत होती तसे प्रयोजन करु शकता का ?
13 Jun 2011 - 2:52 pm | सहज
लेख फार एन्जॉय केला.
असेच अजुन वाचनीय, संग्रहणीय लेख येउ द्या.
13 Jun 2011 - 4:45 pm | ऋषिकेश
बर्याच दिवसांनी वाचनखुणांत साठवावा असा लेख वाचनात आला. अतिशय सुंदर परिचय.
ज्यांनी केवळ मधुबनी, रग्माला, वारली, मैसोर वगैरे चित्रे केवळ पाहिली असतील त्यांनाही भारतीय परंपरा ही वास्तवदर्शी चित्रांची नाहि.
लेखमाला इथे थांबवू नये या विनंतीशी सहमत.. केवळ भारतीयच नाहि तर जगातील उत्तमोत्तम शैलींबद्दल अशीच रोचक माहिती येउ द्या. अर्थात त्या वास्तवदर्शी शैलीही आल्याच मात्र त्याबरोबर जगातील स्थानिक उल्लेखनीय शैली, प्राचीन शैली, चायनीज-जापनीज शैली ह्या साचल्या आहेत का त्यातही प्रयोग होत आहेत वगैरेंबद्दल वाचायला आवडेल.
13 Jun 2011 - 5:02 pm | स्वानन्द
चित्र शैलीचा परीचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
पण मला अजूनही ही चित्रे खास अशी वाटत नाहीत.
13 Jun 2011 - 5:59 pm | चेतन
चित्रकलेतलं काही कळत नसलं तरी चित्र पहायला आवडतात.
लेख आवडला चित्र फारशी आवड्ली नाहीत.
आँध मधल्या खालच्या देवळात बरीच जुनी चित्र आहेत तसेच तिथल्या संग्रहालयातहि (बहुतेक रवी वर्मांचीही आहेत)
माहित असल्यास त्याबद्द्लही लिहावे
चेतन
अवांतरः पहिल्या धाग्यातील अनावश्यक परिच्छेद टाळल्यामुळे सुंदर धाग्याची वाट लागली नाही...
13 Jun 2011 - 6:06 pm | रेवती
हे लेखनही चांगले झाले आहे.
सगळी चित्रे आवडली. घोड्याचे जास्त आवडले.