अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी

Primary tabs

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in जनातलं, मनातलं
24 Mar 2011 - 1:47 pm

‘मराठी ऐतिहासिक कादंबरी’ असं म्हटलं की काही ठराविक नावं समोर येतात. त्यांचा एक साचादेखील जवळपास ठरलेला असतो. एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आणि अभिमानास्पद वाटतील अशा, म्हणजे मराठ्यांचं शौर्य वगैरे उदात्त गोष्टींची त्या कादंबरीत भलामण करायची. असं केलं म्हणजे मराठी लोक तिच्याविषयी भरभरून बोलतात. आपल्या इतिहासाला उज्ज्वल करणारी अशी मराठी पुस्तकं आजकाल प्रचंड खपतातसुद्धा, त्यामुळे मग अशा कादंबऱ्या (आणि त्यांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या) काढायला प्रकाशकदेखील उतावीळ असतात. त्याहून वेगळी वाट चोखाळणार्‍या ‘अंताजीची बखर’ या नंदा खरेलिखित ऐतिहासिक कादंबरीचं आता या अशा वातावरणात जवळपास विस्मरण झालेलं दिसतं. ‘बखर अंतकाळाची’ या नावानं तिचा दुसरा भाग (सीक्वेल) नुकताच प्रकाशित झाला. या अंताजीची आणि गेली काही वर्षं अनुपलब्ध असणाऱ्या त्याच्या बखरीची त्या निमित्तानं पुन्हा एकदा आठवण झाली. तिचा थोडक्यात परिचय इथे करून दिला आहे.

कादंबरीबद्दल सर्वप्रथम लक्षात येणारी गोष्ट म्हणजे आपल्या नावाला अनुसरत ती एखाद्या बखरीच्या भाषेत लिहिलेली आहे. अंताजी खरे नावाचा कुणी एक माणूस पेशवेकाळात खराच होऊन गेला, आणि त्यानं लिहिलेली बखर त्याच्या वंशजांना जुन्या कागदपत्रांत सापडली, असं कल्पून हे पुस्तक लिहिलेलं आहे. लेखकाचं नाव अनंत खरे आणि बखरीचा लेखक हादेखील त्याच नावाचा त्याचा पूर्वज अशी रचना असल्यानं हे काही तितकंसं सरळसोट पुस्तक नाही याची जाणीव लगेच होते.

हळूहळू हेही लक्षात येऊ लागतं की बखरीचा लेखक अंताजी हा एक तल्लख आणि मजेशीर प्राणी आहे. तो चक्क गुप्तहेर आहे. शिवाय, तो बायकांच्या बाबतीत चांगलाच ‘रसिक’ आहे. आणि तरीही त्या बाबतीत त्याची काही तत्त्वं आहेत. म्हणजे, ज्यात परस्परसंमती असेल असेच शरीरसंबंध तो ठेवतो; उगीच कुणावर बळजबरी वगैरे नाही. बायकाही त्याला वश होतात. शिवाय अशा आनंददायी गोष्टींत व्यवहार करणं त्याला मान्य नाही. त्यामुळे जो आनंद घ्यायचा तो ‘उपभोग्य मालाची खरेदी-विक्री’ करून नाही तर अगदी राजीखुशीनं. अगदी गणिकासुद्धा काही मोल न घेता त्याला वश होते!

आता गुप्तहेर, स्त्रीजातीचा गुणग्राहक रसिक आणि त्याही अशा स्वखुशीनं त्याच्या गळ्यात पडतात म्हणजे अगदी ‘जेम्स बाँड’च आठवला असेल ना? पण हा अंताजी काही कुणी साहसी, शूरवीर आणि धीरोदात्त नायक अजिबात नाही बरं! उलट तो एका साध्या मीठविक्या ब्राह्मणाचा पोर आहे आणि चांगलाच कातडीबचाऊसुद्धा आहे. कुठेही गेला की याला चिंता म्हणजे आपला जीव कसा वाचेल याची! आणि तो जातो तरी कुठेकुठे आणि भेटतो तरी कुणाकुणाला म्हणाल तर अगदी पेशवाईत ‘नेम ड्रॉपिंग' म्हणता येईल असे एकेक मोहोरे! त्यात पेशव्यांपासून थेट बंगालचा नबाब सिराजउद्दौला आणि ब्रिटिशांचा रॉबर्ट क्लाईव्हसुद्धा येतात. नागपूरकर भोसले जेव्हा बंगाल सर करायच्या इर्ष्येनं गेले तेव्हा हा अंताजी त्यांच्याबरोबर जातो. इतकंच नव्हे तर बरोबर कलकत्त्याच्या कुप्रसिद्ध 'ब्लॅक होल'मध्ये तो अडकतो आणि प्लासीच्या लढाईत इंग्रज बाजूनं (‘लढतो’ असं म्हणता येत नाही, म्हणून आपला) ‘असतो’.

नागपूरकर भोसल्यांच्या बंगाल चढाईशी निगडित रचलेल्या अशा या सगळ्या कल्पित गोष्टीला इतिहासाची भक्कम जोड आहे. जागोजागच्या तळटीपांमधून आणि अखेर दिलेल्या कालानुक्रमे घटना-यादीमधून लेखक आपल्याला त्याची जाणीव करून देतो. उपलब्ध साधनांमधून जो इतिहास ज्ञात आहे त्यातल्या फटींत त्यांनी अंताजीला अगदी बेमालूम बेतून ठेवलंय.

अशा फटींतून निसटत निसटत लोकांचं निरीक्षण करणं ही अंताजीची आवड म्हणता येईल. त्याच्या आजूबाजूला अक्षरश: इतिहास घडत असतो. अशा वेळी थोरामोठ्यांपासून सर्वसामान्य कसे वागतात, त्यांच्या आस्था काय असतात आणि त्यांच्या या आस्था आणि वर्तनाचा आपल्या इतिहासाशी कसा संबंध लागतो, यांविषयीची मार्मिक निरीक्षणं अंताजी त्या सगळ्या धबडग्यात करत राहतो आणि आपल्या बखरीत नोंदत राहतो. ही निरीक्षणं म्हणजे आपल्या इतिहासावरची आणि समाजावरची एक अभ्यासपूर्ण टिप्पणी आहे. बंगालात इतकी समृद्धी असून मराठे ती आपल्याकडे वळवून घेण्यात अपयशी का ठरले; शूर असून सिराजउद्दौला किंवा इतर तत्कालीन शासक ब्रिटिशांपुढे का टिकले नाहीत; फ्रेंच आणि ब्रिटीश यांच्यात काय गुणात्मक फरक होते आणि अखेर भारतात ब्रिटिश साम्राज्य प्रस्थापित का झालं, या आणि अशा अनेक गोष्टी अंताजी आपल्या परिप्रेक्ष्यातून वाचकाला दाखवतो. इतकंच नाही, तर अगदी जदुनाथ सरकार मराठ्यांचा इतिहास सांगताना उभं करतात ते चित्र आणि आपल्या मनात त्या इतिहासाविषयी असलेली धारणा यांचा तौलनिक अभ्यासही जाताजाता लेखक करून जातो.

असा सर्व पट उभा करत असतानाच अंताजी आपला भ्याड आणि कातडीबचाऊ पळपुटेपणा मोकळ्या मनानं मान्य करतो. आपलं आणि मराठी राज्यकर्त्यांचं कुठे काय चुकत गेलं हे त्याला त्यातून जाणवू लागतं. मराठेशाही आणि मराठी माणूस यांच्या मूल्यमापनाची ही एक तऱ्हा आहे हे मग हळूहळू वाचकाच्या लक्षात येतं. स्त्री-पुरुष असमानता, धर्म-कर्मकांडांचा समाजावर असणारा पगडा आणि त्यातून अखेरीस मराठेशाहीची आणि भारताची झालेली दूरगामी हानीसुद्धा त्यात दिसते. म्हणजे निव्वळ ऐतिहासिक घटना आणि त्यांद्वारे इतिहासाचं मूल्यमापनच नाही, तर व्यक्तिगत घडामोडी ते व्यापक सामाजिक आशय असादेखील एक मोठा पट त्यात मांडला आहे.

असं म्हणता म्हणता हेदेखील जाणवू लागतं की कादंबरी निव्वळ ऐतिहासिक नसून तिच्यात एक समकालीन आशयसुद्धा दडलेला आहे. आज आपण ज्याला नव्वदच्या दशकातलं आर्थिक उदारीकरण म्हणतो त्याच्या आसपास, म्हणजे काहींच्या मते आपण अमेरिकेचे मांडलिक झालो त्या काळाच्या आसपास लिहिलेली ही कादंबरी आहे. (मांडलिकत्वाविषयीच्या या विधानाच्या आधारासाठी अगदी विकीलीक्सद्वारा सध्या उघड होणारे प्रकारसुद्धा पुरावे म्हणून घेता यावेत!) परकीय प्रभावाच्या पुनरागमनाच्या त्या काळाची कादंबरीवर पडलेली सावली लक्षात येते.

अनेक बारकाव्यांनिशी आणि अनेक अंगांनी इतिहासाचा केलेला अभ्यास, तरीही कादंबरी रंजक, मसालेदार आणि उत्कंठापूर्ण ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न, आपल्याविषयी केलेली गुणात्मक आणि कालातीत म्हणता येईल अशी टिप्पणी यांमुळे खरं तर ही कादंबरी मराठी साहित्यात ऐतिहासिक महत्त्वाची वाटते. ती प्रकाशित झाली तेव्हा जाणकार मराठी वर्तुळांत तिचा बोलबाला झालाही, पण आता मात्र मराठी माणसाला तिचा विसर पडलेला दिसतो. ‘बखर अंतकाळाची’ या पुढच्या भागाच्या प्रकाशनामुळे मराठी माणसाला पुन्हा एकदा तिचा परिचय होईल अशी आशा आहे.

‘बखर अंतकाळाची’मधला एक उतारा इथे पहाता येईल. कादंबरीची एकूण शैली आणि आशय यांचा त्यातून अंदाज येईल.

अंताजीची बखर – लेखक: नंदा खरे; प्रकाशकः ग्रंथाली

कलासंस्कृतीवाङ्मयइतिहाससमाजलेखशिफारसप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Mar 2011 - 2:51 pm | llपुण्याचे पेशवेll

चांगली ओळख आहे.

असुर's picture

24 Mar 2011 - 3:13 pm | असुर

परिचय आवडला!
आता वाचायला लागणार, ऑप्शनच नाही!!

--असुर

चित्रा's picture

24 Mar 2011 - 11:59 pm | चित्रा

असेच म्हणते. ओळख आवडली.

हे असे लेखन कठीण असावे, एकतर सगळे कल्पनेचे चित्र आणि मुख्य म्हणजे भाषा अशी की काळात कुठेतरी मागे जायचे. हा दुसरा भाग अधिक कठीण असावा.

मेघवेडा's picture

25 Mar 2011 - 3:35 am | मेघवेडा

वाचण्याशिवाय ऑप्शनच नाही.

बाकी येथे माझ्यामते भाषेचा अडसर त्यामानाने सोपा असावा. कारण त्या भाषेत बरंच लिखाण उपलब्ध आहे. मुख्य अडथळा म्हणजे हा सगळा कल्पनाविलास करताना त्या काळचे समाजातले, राहणीमानातले, बोलीचालीतले सगळे बारकावे टिपत त्या चौकटींत बद्ध राहण्याचा असावा.

सहज's picture

24 Mar 2011 - 3:49 pm | सहज

पुस्तक परीचयावरुन आता वाचण्याचे कुतूहल वाढले आहे. पण ही अशी भाषा एका दमात वाचवेल की नाही शंका आहे.

पण जुने ऐतीहासीक संदर्भ खरे असल्यास वाचायला नक्की आवडेल.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Mar 2011 - 3:54 pm | परिकथेतील राजकुमार

बखरीची तोंडओळख आवडली.
लायब्ररीत धाव घ्यावीच लागणार आता.

५० फक्त's picture

24 Mar 2011 - 4:16 pm | ५० फक्त

वाचायला लागणार, अरे आपण मिपावरचे सगळॅ मिळुन सामुहिक वाचन करु शकतो काय ?

गोगोल's picture

25 Mar 2011 - 12:19 am | गोगोल

पण तो सँपल लेख वाचून बखर-टू-मराठी डिक्शनरी लागेल अस दिसतय.

आत्मशून्य's picture

25 Mar 2011 - 3:26 am | आत्मशून्य

त्या पेक्शा सध्याच्या प्रचलीत भाषेतल्या (पण अलंकारीक) असलेल्या कादंबर्‍या कीमान समजतात म्हणून तरी खपतात.

"ऑफ्ट ओल ओन्ल्यी सींपलीसीटी सर्वायव."
ऊदा :- पर्वाच प्रीन्स ऑफ पर्सीया - सॅंड्स ओफ टाइम पाहीला, अरेबीयन नाईट स्टाइल पार्श्वभुमी असून सूध्दा त्यातले डायलॉग म्हणजे अस्सल अमेरीकन इंग्लीश पध्दतीचे होते जसकी त्यातली राजकूमारी तीच्या कीडनॅपरला म्हणते "नो बूल*ट, बट वी आर ओन सॅक्रीड टेम्पल मीशन" (लगेच कीत्येक पोपकोर्न स्टाइल अमेरीकन समर अ‍ॅक्षन मोवीज आठवल्या, त्यात ह्या धाटणीचे एक तरी वाक्य असतेच) कीव्हा तोच कीडनॅपर बेन कींग्जलेला "नीजाम यू ब्युरोक्रॅट, याह आय अ‍ॅम अवेअर ओफ सीक्रेट गव्हर्नमेंट कीलींग अ‍ॅक्टीवीटीज" वगैरे सूनावतो (लगेच जेसन बॉर्न.. ट्रेडस्टोन ब्लॅकब्रायर आणी डेवीड वेब आठवलं) ... अर्थात डायलॉग मजेशीर वाटत होते हे ऐकताना पण जर त्यात जूनी लॅग्वेज ठेवली असती तर शेकडो तास प्रीन्स ऑफ पर्शीया खेळून सूध्दा त्यावर बेतलेला चीत्रपट कीती आपूलकीने चीत्रपट पाहीला गेला असता हा एक प्रश्नच आहे.. थोडक्यात मूळात तो गेम खेळणारी/खेळलेली जनरेशन डोळ्यासमोर ठेऊनच चीत्रपटात अशी भाषा वापरली असावी... जरी चीत्रपट पर्शीयन/अरेबीयन परीकथांच्या अत्यंत जून्या काळातील होता तरी...

प्रास's picture

25 Mar 2011 - 12:23 am | प्रास

फारच छान ओळख करून दिलीत पुस्तकाची. त्यातही दिलेल्या दुव्यातील नारायणरावांच्या खुनाचा प्रसंग अ प्र ति म उतरलाय. पुस्तकातली बखरीसदृश्य भाषा वाचणेही आनंददायक वाटतेय. नक्कीच वाचेन हे पुस्तक....

हरिप्रिया_'s picture

25 Mar 2011 - 2:09 pm | हरिप्रिया_

+१
मिळवून,वाचायलाच हव पुस्तक

चिंतातुर जंतू's picture

25 Mar 2011 - 2:10 pm | चिंतातुर जंतू

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.

हे असे लेखन कठीण असावे, एकतर सगळे कल्पनेचे चित्र आणि मुख्य म्हणजे भाषा अशी की काळात कुठेतरी मागे जायचे.

मुख्य अडथळा म्हणजे हा सगळा कल्पनाविलास करताना त्या काळचे समाजातले, राहणीमानातले, बोलीचालीतले सगळे बारकावे टिपत त्या चौकटींत बद्ध राहण्याचा असावा.

या दोन्ही गोष्टी खर्‍या आहेत. विशिष्ट कालखंडात घडणारी कादंबरी लिहिताना एकेक शब्द विचारपूर्वक लिहिला आहे हे जाणवतं. त्या काळातले प्रचलित शब्द कटाक्षानं वापरलेले आहेत. शिवाय, आजच्या वाचकाला ते फार अडणार नाहीत अशीही काळजी घेतलेली आहे. त्यामुळे नियमित मराठी वाचन असणार्‍या माणसाला ते कठीण पडणार नाही असं वाटतं. उदा. दुवा दिलेल्या उतार्‍यातला 'लव्हाने भिजलेली वस्त्रे' हा शब्दप्रयोग सुटा पाहिला तर रक्तासाठी वापरल्या जाणार्‍या 'लहू' शब्दाचं ते रूप आहे हे पटकन कदाचित कळणार नाही, पण इथं ते प्रसंगाच्या संदर्भानं लगेच लक्षात येतं.

त्याशिवाय, त्या काळातली माणसं कसं जगत असतील आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती काय विचार करत असतील, याचा अंदाज घेऊन लिहिणं हेही कठीण आहे. पण हे शिवधनुष्य लेखकानं उत्तमरीत्या पेललेलं आहे. मूळ लेखात याचा उल्लेख करायचा राहून गेला होता. ते लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Mar 2011 - 2:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही कादंबरी वाचायला, आजच्या मराठीत लिहीलेल्या कादंबर्‍यांपेक्षा जास्त वेळ लागेल निश्चित; लेखन करण्यापेक्षा वाचन बरंच सोपं असावं. चिंतातुर जंतू यांच्या रेकमेंडेशनमुळे कादंबरी वाचावीच लागणार.

आज आपण ज्याला नव्वदच्या दशकातलं आर्थिक उदारीकरण म्हणतो त्याच्या आसपास, म्हणजे काहींच्या मते आपण अमेरिकेचे मांडलिक झालो त्या काळाच्या आसपास लिहिलेली ही कादंबरी आहे.

हे विधान रोचक वाटलं.

पैसा's picture

27 Mar 2011 - 11:19 am | पैसा

कादंबरी आणि तिची पार्श्वभूमी याबद्दल चिं.जं. ची टिप्पणी आवडली. आता कादंबरी मिळवून वाचणं भाग आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2011 - 5:38 pm | निनाद मुक्काम प...

@आज आपण ज्याला नव्वदच्या दशकातलं आर्थिक उदारीकरण म्हणतो त्याच्या आसपास, म्हणजे काहींच्या मते आपण अमेरिकेचे मांडलिक झालो त्या काळाच्या आसपास लिहिलेली ही कादंबरी आहे.

हे विधान आवडले
कुणा युरोपियन ला टोमणा मारताना ह्या वाक्यातील भावार्थ जाणून हाणायला खूपच उपयोगी वाक्य

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Mar 2011 - 3:10 pm | बिपिन कार्यकर्ते

नेहमीप्रमाणेच एका उत्तम पुस्तकाची उत्तम ओळख. जंतुची अजून एक भेट. :)

या कादंबरीचे नाव मागे कधीतरी ऐकले होते आणि बहुधा नाववैचित्र्यामुळे लक्षात राहिली होती असे अंधुकसे आठवते आहे. आता मात्र वाचावीच लागेल. भाषेमुळे काही अडचण होईल असे वाटत नाही.

धन्यवाद, जंतु.

धमाल मुलगा's picture

25 Mar 2011 - 4:10 pm | धमाल मुलगा

शिवकालीन ते पेशवेकालीन मराठीचा लहेजा हे अत्यंतिक आवडतं प्रकरण आहे. निदान त्यासाठीतरी अंताजीची बखर वाचणारच.

नंदन's picture

27 Mar 2011 - 1:49 pm | नंदन

पुस्तकपरिचय आवडला. विशेषतः आजच्या परिस्थितीत इतक्या मार्मिकपणे इतिहासातल्या चुकांकडे पाहणारं हे पुस्तक महत्त्वाचं ठरावं. 'बखर अंतकाळाची' आणि ह्या पुस्तकाचं अधिक चांगल्या प्रकारे मार्केटिंग करता आलं असतं, असं राहून राहून वाटतं.

आळश्यांचा राजा's picture

3 Apr 2011 - 7:08 am | आळश्यांचा राजा

सहमत आहे. जंतूंचे आभार!

कादंबरीची कल्पनाच अफलातून आहे.

अनवट कदंबरीचं उत्तम परीक्षण केलंत, चिंज.
ही कादंबरी वाचून पुष्कळ वर्षं झाली त्यामुळे बारीक तपशील लक्षात नाहीत. केवळ रंजनवादी* साच्यातल्या कादंबर्‍यांच्या गर्दीत अंताजीच्या बखरीचा वेगळेपणा भावला होता. पुढचा भागही आहे हे तुमचामुळे कळलं. धन्यवाद.

* >एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आणि अभिमानास्पद वाटतील अशा, म्हणजे मराठ्यांचं शौर्य वगैरे उदात्त गोष्टींची त्या कादंबरीत भलामण करायची. असं केलं म्हणजे मराठी लोक तिच्याविषयी भरभरून बोलतात

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jun 2011 - 6:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अंताजी प्रचलित अथवा तेव्हाच्या कालानुसार असणारा 'गुड बॉय' नव्हे, खरंतर चारचौघांच्या दृष्टीने वाया गेलेलाच. पण कुठेही आपण हीरो आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न नाही. वर शहराजाद यांनी म्हटलं आहेच, त्यात एक भर, कुठेही दंभ नाही, खोटा अभिमान नाही. मराठी, ब्राह्मण, तत्कालीन राजांच्या पदरी नोकरीला असल्याचा निरर्थक अभिमान नाही. बारगीरांनी बंगालात अत्याचार केले ही गोष्ट मोकळेपणाने मान्य केलेली तसाच मोकळेपणा इंग्रजांच्या शिस्तीचं गुणगान करताना दिसतो.

अंताजी हिंदुस्थानी, बंगाली, इंग्लिश अशा अनेक भाषा शिकतो. त्यापैकी हिंदुस्थानी शिकल्याचे 'पुरावे' संभाषणांतून येतात, बंगाली ऑकारयुक्त उच्चारांचेच पुरावे मुद्दाम ठेवल्यासारखे येतात आणि इंग्लिश येतं हे वेगळं सांगावं लागतं. ही गोष्ट थोडी खटकली.

या प्रकारचं मराठी वाचताना सुरूवातीला थोडी मेहेनत घ्यावी लागली. पण (सलग वाचल्यामुळे असेल) पहिल्या दहाएक पानांनंतर फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.

धागा आला तेव्हा 'आऊट ऑफ प्रिंट' असणारी कादंबरी आता पुन्हा प्रकाशित झाली आहे. पुण्याच्या 'अक्षरधारा'मधे मिळाली.