"श्रींच्या आरतीस पाच मिनिटांत सुरूवात होत आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर मंडपात उपस्थित राहावे."
अशी 'अलाऊंसमेंट' नऊ ते साडेनऊ पर्यंत निदान चार-पाच वेळा तरी केल्याशिवाय कुणीही अजिबात मंडपात प्रकट होत नाही. आमच्या सोसायटीत हे असले एकेक नग आहेत.
"आरती ना, कधीं म्हणून होतें का ती साडेंनवाच्या आधीं? तूं जेवांयस वाढ तोंवर. मग जातों सांवकाश पावणेंदहा पर्यंत. कसेबसे कर्पूरगौरास आरती ओवाळण्यापर्यंत पोहोचलें असतील तोवर!" हे आमचे आपटेबुवा. "आरत्या म्हणाव्यात तर यांनी" असा यांच्या नावाचा डंका होता! म्हणजे सुखकर्ता दु:खहर्ता, लवथवती विक्राळा, दुर्गे दुर्घट भारी, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, युगे अठ्ठावीस, येई वो विठ्ठले वगैरे 'सर्वसामान्य' (हा त्यांनीच या सगळ्या आरत्यांना बहाल केलेला शब्द! ;) ), कोणाही माणसाला म्हणता येतील अशा आरत्या म्हणून झाल्या की मगच यांचं इंजिन चालू होते. तोवर हे आपले कुठेतरी कोपर्यात सुपारी कातरत, पिष्टन साफ करत पडलेले असणार! बरं आता बाकी पब्लिकपैकी एकजण वेळेवर येईल तर शप्पथ. कुणाला कुणा एका 'अधुर्या कहाणी'त इंटरेस्ट तर कुणाचं 'उधाण वार्याचं मन' बंड करून त्यांना घरात बसवून ठेवी! शेवट रडत खडत साडेनवापर्यंत सगळे आपापल्या झांजा, टाळ वगैरे घेऊन मंडपात हजर होणार. बरं, झांजा वाजवण्यास काही विशेष कौशल्य लागत नसलं तरी प्रत्येकाला आपापल्या घरच्या झांजा घेऊनच आरतीस उपस्थिती लावायची असते. जणू आपण झांजा वाजवल्या नाहीत तर तो गजानन (नि इतर सर्वच देव) समस्त भक्तगणांकडे दुर्लक्षच करणार आहे. मग त्या सगळ्या झांजांचे ते 'अनाहत ध्वनी' अपार गर्जले नि आपल्याला जमेल त्या सुरांत प्रत्येकाने आरत्या म्हणावयास सुरूवात केली की त्या बिचार्या भगवंताचीच दया येते हो. पण मग 'अठरा पद्मे वानरांच्या भुभु:कारा'चा त्यास ऑलरेडी एक्स्पिरीयन्स असल्याने मी निश्चिंत होऊन जातो!
मग त्या तबला, मृदंग, झांजा, टाळांच्या गजरात सगळं वातावरण न्हाऊन निघतं. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे सुरांचा बाजार मांडत (किंवा उठवत, कसंही! ;) ) आरत्या म्हणत असतो! कुणी तारसप्तकात लीलया खेळत मोठ्या उत्साहात पीतांबरधारी लंबोदरास आळवत असतो तर कुणी अरुंद बोळात अडकल्यासारखं एकाच सुरात, आपलंच तुंड वक्र करून सरळ शुंडेच्या विघ्नहर्त्यास आळवत असतो! पण तो जो काही गजबजाट असतो तो श्रवणीय असतो खरा! आणखी एक गमतीचा भाग म्हणजे आरत्यांतले शब्द! काही लोकांना माहितीच नसतं की आपण चुकीचं म्हणतोय! पण कसं आहे, शेवटी भावना महत्त्वाची! ते शब्द चुकीचे म्हटल्याने कुणाचं काही वाईट होणार नाही पण आरत्यांत म्हटले जाणारे चुकीचे शब्द टिपायला मजा येते खरी! आमच्याकडे दहांतली निदान सहा माणसे "दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे" असंच म्हणतात! म्हणजे काय? गजानन बाकी कधी पावला नाही तरी चालतंय! पण संकष्टीला पावायलाच हवा!
सुखकर्ता दु:खहर्ता संपली की पटवर्धनांच्या बंड्याला "नाना परिमळ दुर्वा" म्हणायची असते, तो सुरू करतोही. पण पटवर्धनकाका, त्याचेच वडील, पहिल्या 'सर्वसामान्य' आरत्यांचे इन-चार्ज असल्याने, नि त्यांना कदाचित 'नाना परिमळ' येत नसल्याने, "लवथवती विक्राळा" चालू करून बंड्याकडे तिसरा डोळा उघडल्याच्या थाटात एक जळजळीत कटाक्ष टाकतात नि बंड्या बिचारा हिरमुसला होऊन मागे होतो. शंकराची आरती म्हणताना अगदी मंडपात तांडव चालू असते सगळ्यांचे. "व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी" म्हणताना एकेकाला हा असला जोश येतो, की सांगून सोय नाही. मृदंगही जोरजोरात कडाडू लागतात, टाळ दाही दिशी घुमू लागतात. सोसायटीतल्या सर्व नंदीबैलांचं परमेश्वराचं गुणगान करताना रौद्र तांडव सुरू असतं! शिवाची आरती संपून दुर्गेची आरती सुरू झाली की बॅटन महिलामंडळाकडे पास केलं जातं! आता सगळ्या महिषासुरमर्दिन्यांचा आपापल्या घरातल्या महिषापेक्षा आपण वरचढ कशा आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू होतो! मागे कुठेतरी देसाईकाकू जोरजोरात टाळ्या पिटत घोगर्या आवाजात, मोठ्या तल्लीनतेने दुर्गेचं गुणगान करत असतात. त्यात यमी, त्यांची धाकटी लेक, त्यांच्या पायात घुटमळत असते. तिला आलेला असतो कंटाळा आणि तिला प्रसाद कधी मिळतो याचंच अप्रूप जास्त असतं. आता तिची बिचारीची आशा तिच्या या जगदंबेवाचून कोण पुरवणार? म्हणून मग ती सारखी, "आई, प्लशाद कदी वातनाल?" विचारू लागते. तिला जगदंबा हळूच खुणेनेच "मग मग" असं सांगते. तिचं पुन्हा तेच. थोड्या वेळाने मात्र देसाईकाकू वैतागतात. मग
"प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां..
अगो गप्प बैस की जरा कार्टे..
अंबे तुजवाचोनि कोण पुरवील आशा..
आता फटके देईन हां मी मनू..
जय देवी जय देवी.. काय आहे गं सारखी कटकट तुझी..
सुरवर ईश्वर वरदे.."
फाट्ट... एक फटका पडतो मनुला.. की मग पुढे दत्तगुरूंच्या आरतीला मनुच्या "भ्यांऽऽ" अशा कोरसची भर पडते! एकीकडे पंढरीची नियमित वारी करणारा म्हादेव कुंभार पांडुरंगाची आरती कधी सुरू होते याची अठ्ठावीस युगांपासून वाट बघत असल्यासारखा चेहरा करून, जांभया देत टाळ्या वाजवत उभा असतो! मग तिथे "दत्त दत्त ऐसे लागले ध्यान.." झालं की याचं हरपलेलं मन ताळ्यावर येत. मग गर्दीतून सगळ्यात पुढे जाऊन उभा राहण्यासाठी म्हादेवाचा आटापिटा सुरू होतो! कुणाच्यातरी लक्षात येतं "अरे हो.. हा म्हादेव कुंभार. जाऊ दे जाऊ दे त्याला पुढे.." मग त्याला वाट करून दिली जाते! पुढे जाता जाता कुणाला चुकून पदस्पर्श झाला तर त्या मनुष्याला तिथल्या तिथं आधी नमस्कार करून तो पुढे सरकणार. अशा गर्दीच्या वेळी सुद्धा नियम म्हणजे नियम, त्यांत जराही सूट नाही, हां. हातांतल्या चिपळ्या वर करून स्वारी हळूहळू गर्दीतून पुढे सरकत असते. शेवटी कसाबसा तो "जय देव जय देव जय पांडुरंगा.." करत पुढे पोहोचतो! मग जणू त्याच्या अंगी नामदेवच येतात. मुक्त चिपळ्या वाजवत, अगदी तल्लीन होऊन गिरक्या घेत नाचेल काय, पुलंच्या हरीतात्यांसारखी हवेतल्या हवेत डुबकी मारून चंद्रभागेतलं स्नान उरकून घेईल काय, विठोबाची आरती म्हणजे सोहळा असतो अगदी सोहळा! मग "येई वो विठ्ठले" सुरू झाली की सगळ्यांच्या नजरा आपोआप आपटेबुवांना शोधू लागतात. कारण सर्वांनाच येणारी ही यादीतली शेवटची आरती असते! इकडे म्हाद्येव कुंभाराचा 'पंढरपुरी असणार्या मायबापास' एक साष्टांग प्रणिपात घालून झालेला असतो! तिथे 'पिवळा पीतांबर गगनी झळकू लागला' की गर्दीतून वाट काढत पुढे येणारी आपटेबुवांची पीतांबर (अर्थात पिवळं पडलेलं बनियान) धारण केलेली लंबोदर आकृती दिसू लागते! आणि सगळ्यांना "चालत गर्दीतुनि माझा कैवारी आला" अशी भावना होऊन "हुश्श.." होतं.
आणि मग आपटेबुवा सूत्रे हाती घेतात! खर्जातला आवाज नि सुरांचं पुरेसं ज्ञान असल्याने कमालीच्या संथ लयीत त्यांनी म्हटलेल्या आरत्या अत्यंत श्रवणीय असतात! इतका वेळ गजबजाट करणारी बाकी सर्व मंडळी आपटेबुवांनी "उत्कट साधुनि शीळा सेतु बांधोनि" सुरू केलं की आपोआप रामानं वानरसेनेला शिस्तीत आणावं तसं शिस्तीत झांजा वाजवत, टाळ्या वाजवत श्रवणभक्ती करू लागतात! आमच्यासारखे एखाद दोन जणं तेवढाच आवाज मोठा करून शायनिंग मारतात तेवढ्यात. पण समुद्राच्या खवळणार्या लाटा अचानक शांत प्रवाही व्हाव्यात तसं काहीसं होतं आपटेबुवांनी आरत्या म्हणायला सुरूवात केली की!
"निजबळे निजशक्ती सोडविली सीता,
म्हणुनि येणे झाले अयोध्ये रघुनाथा,
आपटेबुवा म्हणताहेत नि बाकी मंडळी फक्त शिस्तीत झांजा वाजवताहेत. खरंच इतका प्रसन्न सोहळा असतो तो! मग पुढं
आनंद वोसंडे वैराग्य भरता,
आरती घेऊनि आली कौसल्या माता"
झालं की "हं.." असं म्हणून आपटे बुवा सर्वांच्या दिशेनं हात हलवून "चला, म्हणा" अशी खूण करतात की सगळ्यांना कळतं काय म्हणायचंय ते. नि पब्लिक चालू होतं. "जयदेव जयदेव निजबोधा रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा, जयदेव जयदेव!" श्रीरामाच्या नामात नक्कीच एक वेगळीच शक्ती आहे! उगाच नाही ते दगड तरंगले समुद्रावर! अहो तेव्हा निदान समुद्राच्या पाण्याचा तरी आधार होता, आमच्या सोसायटीतले एकेक दगड हे असे हवेत तरंगत असतात रामाची आरती म्हणताना! ;)
श्रीरामाच्या आरती पाठोपाठ हनुमंताची आरती होते, महालक्ष्मीची होते, पंचायतानाची होते, द्शावताराची होते, धूपारती होते, अनेक आरत्या होतात! दशावताराच्या आरतीत आम्हा पोरांचा नुस्ता धिंगाणा चालू असतो नि सगळी मोठी मंडळी देखील हसत असतात, त्यामुळे आम्ही आणखीच चेकाळतो! मग "प्रल्हादाकारणेंऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" ला पंधरा सेकंदांनी श्वास सुटला तरी एकदा ब्रेक घेऊन परत.. "हेऽऽऽऽऽऽऽऽहे.." असं ताणत ढोलकी वाजवणार्याचा पेशन्स टेस्ट केला जातो! ;) शेवटी कल्कीपर्यंत पोहोचेपर्यंत नुसता "वनी आनंद, भुवनी आनंद, आनंदी आनंद वनभुवनी" झालेला असतो! किती छान, निर्मळ, खेळीमेळीचं वातावरण असतं ते! मग लोटांगणं वगैरे घालून झाली की आपटेबुवा अतिशय सुंदर देवे म्हणतात, मंत्रपुष्प म्हणतात! "एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति: प्रचोदयात्" प्रमाणे लक्ष्मी, विष्णु, रूद्र, दुर्गा, दत्त, ब्रह्म, आदित्य, अग्नि, श्रीराम, सीता, हनुमंत, श्रीकृष्ण, नृसिंह, परशुराम, इंद्र, सरस्वती, शनि, शंख, मंत्र, तंत्र इ. प्रमाणे एकवीस गायत्रीपुष्पं अर्पण करतात! नुसतं ऐकत राहावंसं वाटतं! केवळ अप्रतिम! तास-तास चालणारी ती आरती म्हणजे एक विलक्षण सोहळाच असतो! गणेशोत्सवाचे सर्वच दिवस उत्साहाचेच असतात मात्र हा सार्वजनिक आरतीचा सोहळा हृदयात घर करून राहिलेला आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्याच सोसायटीत, कॉलनीत, चाळींत, वाडीत, मंडळात थोड्याबहुत फरकाने हा सोहळा पार पडत असेलच याची खात्री. प्रत्येकाचा हा सोहळा असाच निरंतर चालू दे अशी गजाननाकडे एकच प्रार्थना! जीव आहे तोवर सप्रेम आरती करत राहू नि संस्कृतीचं हे लेणं पिढ्यानपिढ्या पुढं चालवू!
आरती सप्रेम मोरया पार्वतीनंदना!
** वरील सर्व पात्रे (आपटे, रेडे, नंदीबैल, म्हशी सगळीच ;) ) काल्पनिक आहेत. बाकी आम्ही स्वतः आरत्यांच्या सुपार्या घेतो! पुढल्या गणेशोत्सवासाठी त्वरित संपर्क साधणे. येत्या पाडव्यापूर्वी बुकिंग केल्यास घसघशीत डिस्काऊंट! **
प्रतिक्रिया
2 Dec 2010 - 9:17 pm | प्रीत-मोहर
मेवे सुरेख रे.....
2 Dec 2010 - 9:22 pm | असुर
एक नंबर! काय फुल्ल फास्ट लिहिलाय!
आमच्या सोसायटीच्या आरतीची आठवण झाली! सेम टू सेम! गणेशोत्सवातल्या आरत्या म्हणजे निव्वळ दंगा, पण काय मजा येते!
बाकी आम्ही स्वतः आरत्यांच्या सुपार्या घेतो!
केली झैरात? कुटं चान्स म्हणून सोडत नाय हे!
--असुर
2 Dec 2010 - 9:40 pm | सूड
सह्ही !!
बाकी आम्ही स्वतः आरत्यांच्या सुपार्या घेतो! पुढल्या गणेशोत्सवासाठी त्वरित संपर्क साधणे. येत्या पाडव्यापूर्वी बुकिंग केल्यास घसघशीत डिस्काऊंट! **
अशी जाहिरात बदलापूर गावातल्या गणपतीच्या देवळातही असते ''सौ. क्षक्षक्ष ( देवळातल्या भटजीबुवांच्या मिसेस) यांच्याकडे हलव्याचे दागिने, तीळाचे लाडू ( हे सणानुसार बदलते, अन्यथा) चादरी, उशांचे अभ्रे इ. इ. योग्य दरात मिळेल." :D
2 Dec 2010 - 9:25 pm | निवेदिता-ताई
मस्त आहे रे.....................लेखन
2 Dec 2010 - 9:29 pm | मदनबाण
पंढरपुरी आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽहे...माझा माय बाप !!! असा लांब लचक सुर धरताना लयं धमाल असते बघ... :)
क्लास लिहलं आहेस... :)
2 Dec 2010 - 9:35 pm | यशोधरा
मस्त रे मेव्या, झकास लिहिलं आहेस बघ! ! !
2 Dec 2010 - 9:57 pm | गणपा
छान रे. एकदम ओघवत लिहिलयस :)
2 Dec 2010 - 10:03 pm | धमाल मुलगा
आख्खं चित्रच डोळ्यापुढं उभं केलंस की.
चित्रदर्शी लेखन, चित्रदर्शी लेखन म्हणतात ते हेच असावं :)
:D बरेचजण 'सदना' ऐवजी 'सजना' पण म्हणतात. =)) =)) सजना? दास रामाचा वाट पाहे सजना? =))
=)) च्यायला! हे हाईट्ट आहे एकदम. :D
झक्कास रे झक्कास लिहिलंयस.
2 Dec 2010 - 10:57 pm | मस्तानी
गणपतीतल्या आरत्या खूप miss करते असं मी नेहेमी म्हणते पण म्हणजे नक्की काय ते सांगता येत नाही, हा लेख बरचसं सांगतो हे नक्की.
(सर्वसामान्य आरत्या म्हणता येणारी)
3 Dec 2010 - 12:08 am | नंदन
मस्त लेख रे, मेव्या! चिखलवाडीत जवळजवळ तासभर चालणार्या आरत्या आठवल्या.
--- खी: खी: खी:
बाकी आरतीतले शब्द चुकीचे म्हणणे, थोडे अधिकचे त्यात घालणे (काही मंडळी 'पंढरीचा महिमा वर्णावा किती' म्हणताना त्यात 'पंढरीचा महिमा, द्वारकेचा महिमा' अशी भर घालतात) हे गमतीचे. 'हरितात्या'मधलं आरतीचं वर्णन 'सभासद इति' हे पायरी चुकून पडल्यासारखे येणारे शब्द इ. आठवलं :)
किंचित अवांतर - मिभोकाकांनी (त्यांच्या पूर्वाश्रमीच्या अवतारात :)) सुखकर्ता दु:खहर्ता मधल्या शब्दांकडे लक्ष वेधले होते ('वार्ता विघ्नाची नुरवी'). त्या चर्चेत धनंजयांनी दिलेला लताबाईंनी म्हटलेल्या याच आरतीचा दुवा नुरवीनंतरच्या स्वल्पविरामासाठी ऐकून पहावा असा. 'गोणेस्पोती राया'चा दुवाही वाचनीय.
3 Dec 2010 - 1:00 am | मेघवेडा
>> काही मंडळी 'पंढरीचा महिमा वर्णावा किती' म्हणताना त्यात 'पंढरीचा महिमा, द्वारकेचा महिमा' अशी भर घालतात
खरंच रे.. वास्तविक हे लेखात लिहिणार होतो पण म्हटलं कुणीतरी प्रतिसादांत विषय काढेलच म्हणून नाही लिहिलं! तेवढाच ट्यार्पी! ;)
खूप सारी उदाहरणे आहेत अशी! गमतीदारच! एका ठिकाणी आरतीत मी ऐकलं होतं, "जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, दर्शनमात्रे नम, श्रवणमात्रे मन कामनापूर्ती!" आता गणपतीला ऐकायला हे लोक कुठे गेले होते ते काही कळलं नाही! ;)
आणि शब्द चुकीचे म्हणण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विठ्ठलाच्या आरतीत - "राही रखमाबाई राणी या सकळा, ओवाळितीं राजा विठोबा सावळां." या ओळीत बरेच जण सरळ "ओवाळितो राजा विठोबा सावळां.." म्हणतात! म्हणजे काय? विठोबा ओवाळतो की काय राहीबाई, रखमाबाईंना? हल्ली स्त्री-पुरूष समानतेच्या युगात बायका घेतील करून असं नवर्यांकडून पण त्या काळी, देवादिकांकडून अशा अपेक्षा ठेवण जरा अतिच नाही का? (गविंच्या या धाग्यावर हा प्रतिसाद लिहिला होता. तो प्रतिसादच खरंतर या लेखाची प्रेरणा)
बाकी 'नुरवी पुरवी' च्या चर्चेतला धनंजयांचा प्रतिसाद म्हणजे, केवळ __/\__!
3 Dec 2010 - 12:39 am | शुचि
भयंकर खुसखुशीत लेख :-D.
3 Dec 2010 - 12:45 am | प्राजु
वाह!!! मस्तच!!
खूप छान लिहिलं आहेस. खूपच छान!
3 Dec 2010 - 5:34 am | उपास
आरत्या म्हणजे नॉस्टेल्जिक करुन सोडणारा एकदम नाजूक विषय.. मस्तच लिहिलयस मेवे, आवडलंच...
गिरगावात चाळीतल्या आरत्याना काय मजा येते (हो गुजराती आलेत बरेच तरीही) महाराजा.. काय वर्णावा तो सोहळा पारणे फिटे कानाचे.. आम्ही आता नेहमीच्या आरत्यांमध्ये प्रमुख स्वामींची गुजराथी आरती ही घेतो :)
आरत्यां म्हणण्याच्या पद्धतीत सुद्धा वैविध्य आहेच.. काहीजण सार्वजनिक ठिकाणी आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी किंवा अंगभूत वळणाने असे शब्द वापरतात जसे नंदनने वर उदाहरण दिले आहेच तर काही जण त्या समूह गायनात शब्द आणि ताल पकडायला धडपडतात हे अगदी बघण्यासारखंच..
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आरत्या कितीही आणि कधीही म्हटल्या तरी कंटाळा येत नाही. .चाळीत बर्याच जणांकडे गणपती आणि एकीकडच्या आरत्या म्हणून झाल्या की तितक्याच उत्साहाने त्याच आरत्या दुसरीकडे आणि त्याशिवाय सार्वजनिक आहेच.. घसे न बसले तरच नवल.. शिवाय गणपतीचे दहा झाले की नवरात्रांचे नऊ दिवस, पुढे खंडोबाचे नवरात्र असेल तेव्हा तेच आणि सत्यनारायण वगैरे असला की पुन्हा. संकष्टीचा उपास सोडताना चंद्रोदयालाही असतेच आरती दर महिन्यात.
डॅलस मधे मराठी मित्राकडे गणपती बसवला होता आणि आरतीला उभे राहिलो आणि मी इतक्यावर्षांच्या सवयींनुसार (इथे आपटेंसारखा) सुरु झालो एका मागून एक तर काय लोकांना आरत्या येणे सोडाच ती म्हणण्यापेक्षा संपवण्याकडेच कल जास्त :) म्हणजे दोन्-तीन वेळा मधेच कुठल्या तरी काकूंनी घालिन लोटांगण सुरु केलं.. पण मी ही मुरलेला असल्याने भक्कम आवाजात सत्राणे उड्डाण उडवलं.. तेव्हापासून 'आरती' -फेम झालो हे ही खरं! पण आरती म्हणणार्यांचा ग्रुप असेल तर खरी मजा!
महत्त्वाचं: 'आरती महासागर' माझ अतिशय आवडतं आरत्यांच पुस्तक आणि आरती भुवनसुंदराची आणि त्याच चालावरची आरती दत्तात्रयप्रभूंची अतिशय आवडती आणि जयजय त्रिंबकराज सुद्धा! त्यात काही आरत्या आणि चाली अशा आहेत की त्या आधीच्या पिढीतल्यांकडून शिकूनच घ्यायला हव्यात.
अवांतर: मेवे ह्या आरत्यांसारखंच लग्नातल्या मंगलाष्टकांबद्दलही लिही रे.. लोकांना मंगलाष्टक लिहीण्याचा, तो गाण्याचा आणि लांबवण्याचा जो काही उत्साह विवाह नामक गदारोळात असतो की ज्याचे नाव ते.. एकदा मुहूर्तावर 'तारा बलंत चंद्र बलंत देव' झालं की भटजींचा जीव भांड्यात ;)
3 Dec 2010 - 3:52 pm | मेघवेडा
>> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आरत्या कितीही आणि कधीही म्हटल्या तरी कंटाळा येत नाही
अगदी अगदी. गणपतीच्या दिवसांत घरोघरी जाऊन आरत्या गाजवलेल्या आहेत. उलट जितक्या जास्त वेळा म्हणू तितकी अधिक मजा येते!
>> डॅलस मधे मराठी मित्राकडे गणपती बसवला होता आणि आरतीला उभे राहिलो आणि मी इतक्यावर्षांच्या सवयींनुसार (इथे आपटेंसारखा) सुरु झालो एका मागून एक
अगदी सारखा अनुभव मला आला यंदा. मी म्हणत होतो पण पब्लिक बहुभाषिक असल्याने त्यांना कदाचित सगळे जोरदार बाऊन्सर गेल्याने "आता पुरेऽ" म्हणायची वेळ आली! ;)
बाकी भुवनसुंदराची आरती आहेच गोड! "किंकिणिक्वणित नाद घणघणित वांकिवर झुणित नुपुरें झनन मंजराची!" हे लै भारी! अशीच महालक्ष्मीची आरती - वससि व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी" - फार सुंदर आहे. तशीच "जयदेव जयदेव जय सुखकरमूर्ती, गणपति शिव हरि भास्कर अंबा सुखमूर्ती" ही पंचायतनाची आरती. ही तर आमच्याकडे कुठलंही कार्य असलं तरी म्हटली जाते. माझी सर्वात आवडती आरती हीच. फारच सुरेख नादमय रचना आहे! मजाच येते म्हणायला. शब्दही इतके सुंदर वापरले आहेत.. अहाहा! मस्तच! कुणाला हवी असल्यास सांगणे. लिहून देतो. :)
3 Dec 2010 - 4:09 pm | यशोधरा
नेकी तरी पण म्हणे.... :D
लिही इथेच.
3 Dec 2010 - 4:19 pm | असुर
अक्षरश: सहमत!
ओ आरतीकथेतील मेवेकुमार, भाव खाणं बंद करा आणि लिहा पटापट! उगाच धतिंग नाय पायजेल!
--असुर
क्याप्टन, 101st सिंहलद्वार रेजिमेंट,
उत्तरद्वार, लंका बुद्रुक
3 Dec 2010 - 4:21 pm | मेघवेडा
जय देव जय देव जय सुखकरमूर्ती, गणपति शिव हरि भास्कर अंबा सुखमूर्ती ॥धृ.॥
अघसंकट भयनाशन सुखदा विघ्नेशा, आद्या सुरवरवंद्या नरवारणवेषा।
पाशांकुशधर सुंदर पुरविसी आशा, निजपद देऊनि हरिसी भ्रांतीच्या पाशा॥जयदेव.॥१॥
नंदीवहना गहना पार्वतिच्या रमणा, मन्मथदहना शंभो वातात्मजनयना।
सर्वौपाधिविवर्जित तापत्रयशमना, कैलासाचलवासा करिति सुर नमना॥ जयदेव.॥२॥
पयसागरजाकांता धरणीधरशयना, करूणालव वारिसी भव वारिजदलनयना।
गरुडध्वज भजनप्रिय प्रभु पीतवसना, अनुदिनी तव कीर्तनरस चाखो हे रसना॥ जयदेव. ॥३॥
पद्मप्रबोधकरणा नेत्रभ्रमहरणा, गोधनबंधनहर्ता द्योतक आचरणा।
किरणस्पर्शे वारिसी या तम आवरणा, शरणागत भयनाशन सुखवर्धनकरणा॥ जयदेव. ॥ ४॥
त्रिभुवन उत्पत्ति पालन करिसी तूं माया, नाही तुझिया रूपा दुसरी उपमा या।
तुझा गुणगणमहिमा न कळें निगमा या, करूणा करिसी अंबे मनी विश्रामा या॥ जयदेव. ॥५॥
3 Dec 2010 - 4:26 pm | स्पा
सुंदर आरती,
माझ्याकडे सुद्धा काही मस्त देवीच्या वेगळ्या आरत्या आहेत, ज्या सहसा म्हटल्या जात नाहीत
जमलं तर टाकेन
26 Sep 2012 - 4:46 pm | सुबक ठेंगणी
ह्या लेखातल्या आपटे काकांसारखी माझी आज्जी होती. आम्ही मारे आरतीचं पुस्तक वगैरे घेऊन तिच्याबरोबरीने म्हणायला जायचो आणि मग झेपलं नाही की काही वेळाने शिस्तीत पुस्तक मिटून फक्त टाळ्या वाजवायचो.
बादवे, मेवा तुला "सुंदर देखिली भवानी, तुळजापुर वासीनी तनमन ओवाळू" ही देवीची आरती माहिती आहे का रे?
3 Dec 2010 - 4:01 am | रेवती
तू ग्रेट आहेस मेवे!
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां
यातलं निजदासा मी निजलासा म्हणत असे.
अनेक जण आपापल्या पद्धतीने आरत्या म्हणतात. ध्रुवपदाशी आल्यावर प्रत्येकजण अडखळायला लागतो.
कारण 'जयदेव जयदेव जय श्री शंकरा' किंवा त्यापुढे 'स्वामी शंकरा' असे थोडे थोडे बदल असतात म्हणून.
आजी आजोबांचे वय झाल्यावर आरत्या म्हणण्याचे प्रकार आमच्याकडे बदलले. त्यांचे सगळे दात गेल्यावर उच्चारही वेगळे होत आणि आम्ही नातवंडे तेच म्हणत असू.;) तश्याच प्रकारे मी 'निजदासाला' 'निजलासा' केले होते.;) त्यावेळचे कितीतरी चुकिचे उच्चार अजूनही तसेच चालू आहेत.
3 Dec 2010 - 4:02 am | शिल्पा ब
मस्त लेख....आम्हालाही लहानपणी आरत्यांपेक्षा प्रसादाचेच कौतुक होते..आता नाही असे नाही ;)
3 Dec 2010 - 4:48 am | बेसनलाडू
आरतीपुराण फारच छान रंगवून सांगितलंय. आवडले. आरतीच्या मांडवातील वानरांच्या भुभु:कारांचा वगैरे प्रत्यक्ष दांडगा अनुभव असल्याने लेखाशी अधिक जवळीक साधता आली.
(वाचक)बेसनलाडू
आमच्या चाळीच्या गणपतीत स्पीकरवरून 'अलाउन्स्मेन्ट' करून न बोलावता झांजा-ढोलकीच्या साथीने भजने, लावण्या, गौळणी म्हणून सर्वांना आरतीसाठी (अनौपचारीकपणे) चौकात आमंत्रित केले जायचे, त्याची आठवण झाली. चौकातून त्यांचे स्वर कानावर पडले की लहानपणी जेवणाच्या ताटावरून उठून हातही न धुता आरतीला पळायचो. शक्य असेल तर आरतीच्या आधी अर्धा तासापासून चौकात ठिय्या देऊन बसायचो, गोंधळ घालायचो. आरत्यांमधील वेरिएशन्स, काही खास आरत्या - जसे दशावताराची, ज्ञानोबा माउलींबरोबरच (आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा) जवळजवळ सर्व संतांच्या आरत्या(आरती एकनाथा, आरती तुकारामा, आरती साईबाबा...), वैशिष्ट्यपूर्ण चालीत म्हटली जाणारी 'येई ओ विठ्ठले माझे माउली ये' (आणि पुढच्या ओळीत बेंबीच्या देठापासून लावलेला आवाज - निढळावरी करअऽऽऽऽऽऽ (!!!!!!!), निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे, ठेवुनी वाट मी पाहे (!!)) ही तर कधीही विस्मृतीत न जाण्यासारखी! किंबहुना सगळ्याच आरत्या या चालीत म्हटल्याने किंवा त्यांच्या खास वेगळ्या चालींमुळे नि वेरिएशन्स मुळे आजही तोंडपाठ आहेत. म्हणताना पुस्तक हातात घ्यावे लागत नाही.
(स्मरणशील)बेसनलाडू
3 Dec 2010 - 5:29 am | नगरीनिरंजन
व्वा मेवे! अगदी पुलकित लेखन वाटले. गणपतीचा मंडप डोळ्यासमोर उभा राहिला आणि कानात झांजा- मृदुंग वाजायला लागले. जियो!
3 Dec 2010 - 6:50 am | स्पा
अगदी १०० % वस्तुस्थिती वर्णन केली आहेस...
गणपतीतल्या आरतीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.....
गर्दीतून वाट काढत पुढे येणारी आपटेबुवांची पीतांबर (अर्थात पिवळं पडलेलं बनियान) धारण केलेली लंबोदर आकृती दिसू लागते! आणि सगळ्यांना "चालत गर्दीतुनि माझा कैवारी आला" अशी भावना होऊन "हुश्श.." होतं
हॅ।हॅ हॅ
कै च्या कै ;)
अवांतर :- बाकी लेखात माझं नाव (प्रसन्न)आणि आडनाव (आपटे) वापरल्याबद्दल मला ROYALTI हवी आहे ;)
3 Dec 2010 - 1:32 pm | सूड
ओ आपटे, ते आपटे वायले हां !! ढिस्क्लेमर लिवलाय ना मेव्यान् खाली ता वाचा जरा. :D
3 Dec 2010 - 1:38 pm | स्पा
हॅ हॅ हॅ
3 Dec 2010 - 9:59 am | गवि
जिवंत वर्णन आणि एकदम वाचत राहण्यासारखा.
3 Dec 2010 - 10:19 am | sneharani
मस्त लेख, आरतीतले काही काही चुकीचे उच्चार आज आठवले की हसु येतं!
:)
3 Dec 2010 - 10:45 am | मधु बन
एकदम मस्त......
अगदी सार्वजनिक गणपति मंडळ कींव्हा एखाद्या देवळातल्या आरतिला गेल्या सारख वाटल..
3 Dec 2010 - 11:17 am | अवलिया
मस्त ! सुरेख !!
3 Dec 2010 - 11:40 am | परिकथेतील राजकुमार
ज ह ब र्या द स्त रे मेव्या :)
अतिशय सुरेख वर्णन. मला तर आरतीचा प्रसंग आजुबाजुला घडतोय असेच वाटत होते.
3 Dec 2010 - 12:03 pm | प्रभो
मस्त रे.....
3 Dec 2010 - 12:13 pm | विलासराव
लेख आवडला.
अवांतरः मला तर सुखकर्ता दुखकर्ता ही एकच आरती येते. ति तरी न चुकता येते का ते पहावे लागेल आता.
3 Dec 2010 - 12:40 pm | इंटरनेटस्नेही
लेख आवडला.
3 Dec 2010 - 2:07 pm | राजेश घासकडवी
छान लिहिलंय मेवे. चित्रदर्शी आणि खुसखुशीत असा विरळा संगम असलेली लेखनशैली मस्त. अजून येऊ दे.
3 Dec 2010 - 3:30 pm | प्राजक्ता पवार
छान लिहलय .
3 Dec 2010 - 6:49 pm | स्वाती२
सुरेख!
3 Dec 2010 - 8:17 pm | पैसा
प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखं वाटलं. रत्नागिरीत सगळ्या शेजार्यांकडे सगळ्या आरत्या म्हटल्या गेल्याच पायजेत असा दंडक होता. आणि आरती संपली की नेनेवहिनींकडे कॉफी, जोश्यांकडे पोहे वगैरे असायचंच.
"भक्त संकटी नानाऽ" म्हटलं की नाना मणेरकर डोळ्यासमोर यायचे आणि हसायला यायचं.
इथे गोव्यात आरत्या म्हणजे मोठं प्रकर्ण असतं. घुमटाच्या साथीने म्हटलेल्या आरत्यांसाठी स्पर्धा असतात, आणि अशा आरत्या म्हणणारे स्पेशालिस्ट असतात. त्याना मुद्दम भरपूर बिदागी देऊन गणपतीत बोलावतात.
27 Sep 2012 - 1:07 am | प्रभाकर पेठकर
आमच्या इथेही 'नाना मणेरीकर' आणि 'श्रीकृष्ण कुलकर्णी' असे दोन ज्येष्ठ नागरीक होते.
'भक्त संकटी नानाSSSSSSSS ही आरोळी आम्ही नाना मणेरीकर ह्यांच्याकडे पाहून करीत असू.
तर 'गोपीकांचे प्रेम पाहूनी श्रीकृष्ण भुलले' ह्या ओळीला आम्ही श्रीकृष्ण कुलकर्णी ह्यांच्याकडे पाहून हसत असू.
4 Dec 2010 - 5:55 pm | स्पंदना
मेवे! अगदी हलवा झालाय लेख. हे आवडल ते आवडल म्हणायला जाव तर सारा लेख च कॉपी पेस्ट करावा लागेल .
डोळ्या समोर आले भोगुलकर आप्पा! ढेरपोटाचा उपयोग आरती ठेवण्या साठी करणारे.
5 Dec 2010 - 10:36 am | ऋषिकेश
मेव्या मेव्या! लय भारी!
मजा आली
दरवर्षी अजूनही अस्साच धिंगाणा आम्ही घालतो.. चांगली तास-सव्वातासभर आरती चालते आमची.. ते सगळं डोळ्यापुढे उभं राहिलं..
बर्याच आरत्यांवर वर तु आनि इतरांनी प्रतिसादात लिहिलं आहेच. या फेमस आरत्यांबरोबरच मला महालक्ष्मीच्या दोन्ही टंग ट्वीस्टर आरत्याही आवडतात (जय देवी जय देवी जय महालक्ष्मी आणि अलिकुलकोमलबाले)
5 Dec 2010 - 1:56 pm | स्वाती दिनेश
मेव्या, आरतीपुराण आवडले, मस्तच लिहिले आहेस. लहानपणच्या सगळ्या आठवणी जाग्या करुन नॉस्टेल्जिक केलेस, आता दिवसभर तरी डोक्यातून ते हलणार नाही आणि त्रास होणार आहे..
स्वाती
21 Sep 2012 - 1:42 pm | यशोधरा
आज पुन्हा एकदा वाचले आरतीपुराण!
एकदम फ्रेश वाटले वाचून.
अवांतरः झैरात करुन दिलेय! :D
26 Sep 2012 - 10:26 am | ज्ञानराम
मस्त लिहीलय...
माझी आजी लवथवती विक्राळा म्हणायच तर "लवलवती" विक्राळा म्हणायची.. आणी अजूनही म्हणते. ( मला ही आरती सुरु झाली की किंचीत हसू येते)
लहाण पणी तेच म्हणत होतो आम्ही पण एकदा पुस्तक हातात पडले तेव्हा वाचले की आपण अर्थाचा अनर्थ करतोय...
आणी घालीन लोटांगण ला पुढे काय घोटाळा झालेला अस्तो काय माहीत...( कायेन वाचा...............) मधुनच आवाज कमी होरो.....परत हरे राम हरे रामसुरु झालं की मात्र लोकांचा आवाज वाढतो...
26 Sep 2012 - 3:29 pm | sagarpdy
>>> मग "प्रल्हादाकारणेंऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" ला पंधरा सेकंदांनी श्वास सुटला तरी एकदा ब्रेक घेऊन परत.. "हेऽऽऽऽऽऽऽऽहे.." असं ताणत ढोलकी वाजवणार्याचा पेशन्स टेस्ट केला जातो!
अगदी अगदी! लईच मजा येते असं करायला.
लेख मस्त! उत्खननासाठी धन्यवाद!
19 Feb 2013 - 7:05 pm | प्रसाद गोडबोले
अहाहा ...कसलं भारी लिहिलय !! ० मिनिटात गणेशोत्सवात आमच्या गल्लीततल्या गणपतिबापाच्या मुर्ती समोर जाऊन पोचलो !!
अप्रतिम लेखन !!