काल महात्मा फुलेंच्या लेखावर भाई नावाच्या सदस्याची प्रतिक्रिया आली. ही आणि अश्याच काही प्रतिक्रिया मी आधीही ऐकल्या आहेत. वाचल्या आहेत. हे असं काही वाचलं की मनात काही विचार उठतात. आज ते येथे सविस्तर देण्याचा मानस आहे. ही माझी बडबड आहे. हेच तेवढं खरं असा माझा आग्रह नाही.
-------------------------------------------------------------------
शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात एक धडा होता,
'आतले आणि बाहेरचे'.
आपण जेव्हा रेल्वेच्या प्लॅटफार्म वर उभे असतो आणि गाडी येते तेव्हा गाडीत गर्दी असली तरीही आपल्याला त्यात जागा दिसते,आपण आत घुसायची धडपड करतो, त्याचवेळी आतील लोक मात्र, 'खूप गर्दी आहे, जागा नाहीये...' असं बोलतात आणि शक्य असेल तर दार सुद्धा लावण्याचा प्रयत्न करतात. आपण कसंबसं आत घुसतो... गाडी चालू लागते आणि आपल्याला जागा होते, आपण सावरून बसतो. एवढ्यात समोरचं स्टेशन येते.. बाहेर उभे असलेल्या लोकांना आत जागा असल्याचं दिसतं, ते आत घुसण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचवेळी आतील लोक मात्र, 'खूप गर्दी आहे, जागा नाहीये...' असं बोलतात आता फरक एवढाच असतो की त्या आतून बोलणार्या लोकांत आपण सुद्धा असतो... आता आपण आतले असतो !
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही.
खरं तर प्रत्येकाची लढाई आपले हितसंबंध जपण्याची असते.त्या हितसंबंधांच्या आड येणारा/येणारे आपले शत्रू आहेत असं आपल्याला वाटतं. हे अत्यंत नैसर्गिक आहे. या हितसंबंधाच्या जोपासनेसाठी पुढे संघर्ष घडतात. बलवान तो विजयी होतो पराजित दास होतो.
अत्यंत नैसर्गिक अवस्थेत हा संघर्ष आपल्याला आजही पाहायला मिळतो, तो आपले शिकार क्षेत्र राखण्यासाठी असो की आपल्या कळपांतील माद्यांवर हक्क सांगण्याचा असो... आपले हितसंबंध जपण्यासाठी संघर्ष करणे ही नैसर्गिक प्रेरणा आहे.
आम्ही जेव्हा प्रगत होत गेलो, माणूस होत गेलो, तेव्हा आम्ही समाज बनवला आणि त्याच्या नियोजनासाठी काही नियम सुद्धा... पुढे आपला समाज हा घटक सुद्धा आपल्या हितसंबंधात जोडल्या गेला. आधीचा वैयक्तिक पातळीवरचा संघर्ष आता गटाचा/ समाजाचा झाला.
आमचा वाढता मेंदू आम्हाला इतर प्राण्यांपासून वेगळा करायला लागला. आमच्या जाणीवा समृद्ध व्हायला लागल्या... आणि आमच्याच मते आम्हाला संस्कृती प्राप्त झाली.आम्ही आमची वर्तणूक आता निसर्गाच्या नव्हे तर त्याही पुढे जाऊन नैतिकतेच्या पातळीवर जोखायला लागलो. आम्ही सुसंस्कृत झालो.
सुरुवातीच्या काळात बनलेले काही अग्रक्रम आजही कायम आहेत, जसे व्यक्ती पेक्षा समाजाच्या हिताला जास्त महत्त्व, एकापेक्षा अनेकांना काय योग्य ते बरोबर.आदी.
असाच आमचा भारतीय समाज. ज्ञात इतिहासाच्या आधारे असं सांगता येतं की, संस्कृतीच्या विकासाचा आमचा वेग इतर जगापेक्षा खूप जास्त होता. आमची समाजाची बांधणी घट्ट होती. संस्कार, शिष्टाचार आदींनी आमचं जीवन व्यापलं गेलं होतं. समाजाच्या सुरवातीच्या काळात 'सर्व समाजाच्या हिताचं ते योग्य' असा, नियम म्हणा हवं तर, पण एवढं साधं होतं सर्व. त्यामुळे साहजिकच ते सर्वांना मान्य होतं. त्यानुसार ही व्यवस्था चालली होती. पुढे यात काही कालानुरूप आणि काही हेतूमूलक बदल करण्यात आले. आणि ह्या व्यवस्थेला कीड लागली. ही कीड एवढी भयानक होती की , ही कीड आहे ! हे समजायला सुद्धा काही हजार वर्षे आणि शेकडो पिढ्या जाव्या लागल्या, खरं आणि नेमकं बोलावं तर शेकडो पिढ्या पिचल्या गेल्या.
शतकांचा अंधार पडल्यानंतर अचानक बाहेरून कुणीतरी येतं आणि आमच्या , " हे असंच असतं, आपल्या धर्मात हे असंच सांगितलं आहे " नावाच्या ह्या जोखडाला हात लावतं, आणि आम्हाला सांगतं की,"बघ, हे जे जोखड तू मानेवर घेऊन फिरतो आहेस ना? ते नैसर्गिक नाहीये... ते तुला जन्मतः प्राप्त झालेलं नाही तर येथील भेदभावमूलक समाज व्यवस्थेने कुणाचे तरी हितसंबंध जपले जावेत म्हणून तुझ्या मानेवर ठेवलेलं आहे. आणि हे हालतं बघ ! बघ, जरा जोर लावून तुटतं का ते..." आणि मग आमच्या मनातली नैसर्गिक ऊर्मी उफाळून आली, हे जोखड आम्ही झुगारून दिलं.
कुठल्याही मोठ्या कामासारखी याही गुलामगिरी झुगारण्याची सुरुवात एकट्यानेच झाली. हा 'एक' पुढच्या अनेक पिढ्यांना दिशादर्शक बनला. देशाच्या आणि समाजाच्या सुदैवाने हा 'एक' खरंच विचारवंत होता. याच्या विचाराची बैठक जरी नवी होती तरी त्याने भारतीय विवेक सोडला नव्हता. त्याला समाज तोडायचा नव्हता, तर समाजाचा अधू - पंगू झालेला भाग जागा करून त्याला सक्षम करायचा होता. त्याभागाकडे ज्ञान रुपी रक्त पोहोचवण्यासाठी शिक्षणाच्या रक्तवाहिन्या पसरवणे आवश्यक होते. त्याच वेळी इतर प्रलोभनांपासून स्वतः व आपल्या अनुयायांना दूर ठेवणे आवश्यक होते. शक्य तेवढं समाजाला समजावून सांगावं, जमेल ते करून दाखवावं, आणि वेळ प्रसंगी आई जसं मुलांचं नाक दाबून का होईन पण त्याच्या हिताचं असं औषध त्याच्या गळ्याखाली उतरवते तशी भूमिका घ्यायची.
आपल्या विचारांवर आणि आपल्या कामाच्या दिशेवर तो 'एक' कायम होता. तो विद्रोही होता, तो बंडखोर होता,पण तो केवळ विध्वंसावर लक्ष ठेवून नव्हता तर त्याला सृजन हवं होतं, अत्यंत नैसर्गिक सृजन मानसाला माणूस म्हणून मान्यता द्या आणि त्याला विकासाची संधी द्या एवढंच त्यांचं मागणं होतं.
त्यासाठी त्याने अनेक कष्ट केले, स्वतःच्या पत्नीला शिकवले, तिला मुलींची शाळा काढून दिली. यासाठी समाजाचा प्रखर विरोध तर सहन केलाच पण आपल्या प्रसंगी स्वतःच्या घरातून बाहेर पडण्याची रस्त्यावर येण्याचीही तयारी ठेवली, पुढे तसं घडलंही. अशिक्षितांना शिकवणं हे आज चांगलं काम मानलं जातं मात्र ते चांगलं काम करण्यासाठी त्यांना रोज शेण आणि चिखल अंगावर घ्यावा लागला.
फक्त स्त्रियाच नाही तर अस्पृश्यांना सुद्धा शिकता आलं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा शाळा काढल्या, हे सर्व घडत होतं १८४८ च्या काळात तेव्हा जेव्हा महाराष्ट्रात , पुण्यात पेशवाई संपून जेमतेम ३० वर्षे होत होती. 'उत्तर पेशवाई'चा हंगओव्हर येथील जनतेत बाकी होता. लोकहितवादींसारखे लोक पेशवाई का बुडली आदींवर सुद्धा हिरहिरींनी लिहीत होते व (मोजकेच) लोक ते वाचत होते. असा तो काळ.
धर्म आणि प्रथांचा घट्ट पगडा सगळ्या समाजमनावर होता.शेकडो वर्षे अंधारात काढलेल्या लोकांना प्रकाशाची किरणे सहन होत नव्हती. हा देवाचा कोप आहे की काय असं त्यांना वाटे. त्यांच्या खुळचट कल्पना दूर करण्यासाठी ह्या 'एका'ने लेखनी हाती घेतली. त्याकाळी आवश्यक असे जे-जे काही होते ते-ते त्यांनी लिहिले. समाजासाठी आवश्यक ते लिहिले. आवडेल ते लिहिले की नाही यात शंका आहे. मात्र आवश्यक ते नक्की लिहिले.
त्यांचं लिखाण हेतुमुलक कुणाच्याही विरोधात नव्हतं, आणि त्यांचं काम सुद्धा कुणाच्या ही विरोधात नव्हतं. त्यांचं काम होतं समाजाच्या दुर्बल घटकाला सामर्थ्य प्राप्त करून देण्याचं, त्यांच्या पंखात बळ भरण्याचं. त्यांचं काम एका घटकाच्या हिताचं होतं, त्यांच्या विकासाचं होतं. मात्र त्याच मुळे ज्यांचे हितसंबंध ह्या समाज घटकाला अविकसित ठेवण्यात , त्यांना मानसिक गुलामगिरीत पिचत ठेवण्यात गुंतले होते, त्यांच्या विरोधात हे काम आहे असं त्यांना वाटायला लागलं. ते ह्याला 'एक'टा पाहून विरोध करायला लागले. सुदैवाने ह्याने ते व्यक्तीगत अथवा भावनिक पातळीवर न घेता अत्यंत विचाराने त्याचं काम चालू ठेवलं.
फुल्यांचं काम हे त्याकाळच्या शासन यंत्रणेला त्यांचे हितसंबंध जोपासणारं वाटलं त्यामुळे व्यवस्थेने त्यांना मदत करायला सुरुवात केली, ह्या एकाने ती घेतलीही, मात्र समाजाच्या दुर्बल घटकांचे सबलीकरण करायचे हा आपला हेतू दूर होऊ दिला नाही. सरकारने भिक्षुकी साठी दिला जाणारा निधी (दक्षीणाफंड) शिक्षणासाठी देणे सुरू केले, साहजिकच काहींचे हितसंबंध दुखावले गेले. त्यामुळे 'त्याला' विरोध सुरू झाला. 'तो' मात्र आपल्या कार्यात मग्न होता. त्यासाठी काय वाट्टेल ते करायची तयारी 'त्याची' होती. हळू शिक्षण प्रसाराचे काम जोर पकडू लागले. सहकारी जमू लागले. सगळं स्थिरस्थावर झालं आहे. आणि येथे संघर्षाची गरज तेवढी नाही हे लक्षात आल्यावर एका निरपेक्ष संतासारखा 'त्याने' त्या शिक्षण प्रसाराच्या व्यवस्थेतून आपला सहभाग कमी केला आणि आता कार्याचा बिंदू केला शेतकरी.
ज्या सरकारची मदत घेऊन शिक्षण प्रसाराचं काम केलं त्याच सरकार विरुद्ध नगर जिल्ह्यात खरफोडीचं आंदोलन केलं , कारण काय तर सरकारचे काम आहे शेतकऱ्यांचे हित जपणे आणि ते काम सरकार चोखपणे करत नाही. सरकार अडचणीत आणि सरकारचे हितसंबंध धोक्यात.
सरकारने धरणे बांधली पण धरणात अडवलेलं पाणी वापरायला शेतकरी तयार होईनात कारण ते पाणी मेलंय असा समज आणि मेलेल्या पाण्याने पीक कसं येईल? हा प्रश्न. त्या 'एका'ने स्वतः धरणाच्या पाण्याने शेती केली व भरघोस उत्पन्न काढून दाखवलं. शेतकर्याने प्रगतिशील राहावे, नव्या तंत्रज्ञानाची जोपासना करावी हेच त्याला दाखवायचे होते.
स्त्रियांचं शिक्षण, शेतकरी सबलीकरण, आदी नंतर त्यांनी हिंदू धर्मातील वाईट चालींचा विरोध केला. विधवांचं केशवपण करून त्यांना विद्रूप करण्याची वाईट चाल समाजात होती. जे ज्योतीबांवर जातीद्वेषी म्हणून आरोप लावतात त्यांनी(फक्त त्यांनीच) लक्षात घ्यावे की ही चाल प्रामुख्याने समाजाच्या ज्योतीबांना विरोध करणार्याच गटात होती, मात्र ह्या 'एका'ने 'तसा' विचार केला नाही. ही केशवपनाची वाईटचाल दूर व्हावी म्हणून पुण्यात न्हाव्ह्यांचा संप घडवून आणला. लहान वयात वैधव्य आलेल्या विधवांचा गैरफायदा त्याकाळी घेतल्या जायचा. विचार करा, केशवपण करून कुठेही समाजात फिरण्याची बंदी असलेल्या ह्या स्त्रिया जेव्हा अश्या गैरफायदा घेतल्या गेल्याने गर्भार राहायचा तेव्हा त्यांना कुठेच आसरा मिळायचा नाही. ह्या सर्वाला केवळ तिलाच दोषी मानलं जायचं आणि त्यामुळे पुढे असं जन्मलेलं मूल कचर्याच्या कुंडीत फेकलं जायचं .
हे सर्व पाहून तो 'एक' हेलावला. त्याने बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. सोबत एक पत्रक सुद्धा की, 'येथे या, निश्चिंतपणे बाळंत व्हा, हवं असल्यास मूल सोबत न्या, नको असल्यास खुशाल येथे सोडून जा आम्ही त्याचा सांभाळ करू.'
त्याकाळच्या समाजप्रमुखांना हे मान्य नव्हतं, हे म्हणजे धर्म बाह्य वर्तन होतं. त्यावेळेस त्यांच्यावर मारेकरी सुद्धा घालण्यात आले होते. पण त्यांना मारायला गेलेल्या लोकांना हा 'एक' रात्री जागून अनाथ मुलांची काळजी घेताना दिसला. हातातली शस्त्रे गळून पडली, पुढे ह्यातील एक आजन्म त्या 'एकाचा' संरक्षक म्हणून सोबत राहिला.
दीनदुबळ्या लोकांची कैफियत मांडण्यासाठी दिनबंधु सुरू केलं. पुढे जसजसा लोकसंपर्क वाढला विचार पक्का होत गेला, चिंतन गहिरं झालं, मुळात आपल्या समाजाच्या आकलनातच चूक आहे. खरं सत्त्व बाजूला ठेवून आपण कर्मकांडाच्याच मागे आहोत. म्हणून मग या सत्याच्या शोधासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सर्वसाक्षी जगत्पती| त्याला नकोच मध्यस्ती ||
हे त्यांचं साधं सरळ तत्त्वज्ञान , स्त्री पुरूष समानता, शिक्षणाचा हक्क, आधुनिक विचारसरणी आदींचा पुरस्कार त्यांनी केला. हे सर्व त्यांनी आपल्या जीवनात सुद्धा आचरणात आणले.
येथे एक प्रसंग देण्याचा मोह होतोय.
ज्योतीबांना मूल होत नव्हतं. त्यांनी दुसरा विवाह करावा असा त्यांच्या घरच्यांचा आग्रह. मात्र ते ऐकेनात, म्हणून त्यांना समजावण्यासाठी त्यांचे सासरे म्हणजे सावित्रीबाईंचे वडील आले, त्यांचं बोलणं झाल्यावर ज्योतीबां त्यांना म्हणाले की ठी़क आहे तुमच्या म्हणण्या नुसार माझ्या बायकोला मूल होत नाही म्हणून मी दुसरे लग्न करायला तयार आहे. पण त्या आधी मी माझी तपासणी करून घेईल , माझ्यात काही दोष निघाला तर तुम्ही सावित्रीचं दुसरं लग्न लावून द्याल असं वचन द्या.
सासरे बुवा आल्या पाऊली परत गेले. पुढे ज्योतीबांनी बालहत्या प्रतिबंधक गृहातील एक मूल दत्तक घेतले होते.
ज्योतीबांनीच रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि त्यावर फुले अर्पण केली. त्यांच्यावर पोवाडा रचला. शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव पुढे बंद पडला, त्या नंतर टिळकांनी तो पुन्हा सुरू केला.
जनसामान्यांना धर्माचं खरं रूप समजावून सांगणे, त्यांच्यासाठी धर्म विधी सोपा करणे, लग्नात मंगलाष्टकं मराठीत म्हणवून घेणे, स्त्रिया व विधवांच्या सबलीकरणासाठी काम करणे, अस्पृश्य समाजाला शिक्षण देणे आदी सगळ्या बाबी एका विशिष्ट गटाच्या हितसंबंधाच्या आड येत होत्या. त्यामुळे साहजिकच फुल्यांच्या विरोधात लिखाण केलं गेलं असेल.
भारतातील सर्वात पहिली कामगार संघटना नारायण मेधाजी लोखंडे यांनी तयार केली. हे ना.मे. लोखंडे फुल्यांचेच शिष्य. समाजातील प्रत्येक पिडीत व शोषित घटकाला न्याय मिळावा म्हणून झटणार हा 'एक' महात्मा ! ज्योतीबा फुले.
प्रतिक्रिया
12 Apr 2008 - 3:52 pm | भडकमकर मास्तर
नीलकांत,
उत्तम लेख....
मला आवडला.... ते नाटक उपलब्ध आहे काय??
12 Apr 2008 - 4:47 pm | इनोबा म्हणे
अप्रतिम शब्दरचना. संयमीत व अभ्यासपुर्वक प्रतिसादात्मक लेख.
या निमित्ताने पुन्हा एकदा महात्म्याला जवळून पाहता आले. नीलकांत यांचे आभार.
महात्मा फूलेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन!
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
12 Apr 2008 - 5:06 pm | विकास
लेख आवडलाच पण शिर्षक अजून आवडले, अर्थात योग्य वाटले.
आपण सांगीतलेला सासरा-जावई प्रसंग आधीपण ऐकला-वाचल्याचे आठवले. अजून एक आठवण जी आत्ता नीट आठवत नाही आहे पण ते सिव्हील इंजिनियरींगची कंत्राटाची कामे घेत. मुंबईच्या "व्हि.टी." स्टेशनचे बांधकाम तेंव्हा चालू झाले होते त्यात पण त्यांचा संबंध होता. त्यांचे खालील वाक्य प्रसिद्ध होते.
विद्येविना मती गेली , मतीविना निती गेली , नितीविना वित्त गेले , वित्ताविना क्षुद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
अवांतरः आचार्य अत्र्यांनी "महात्मा फुले" नावाचा चित्रपट काढला होता. ५०च्या दशकातला असावा पण त्यावेळेसही तो जनजागृती करायला काढल्यासारखाच असावा (मी तेंव्हा नव्हतो:) पण) ,नंतर अनेक वर्षांनी पाहीला. त्यांच्यावरील नाटक मात्र पाहीलेले नाही.
12 Apr 2008 - 6:38 pm | धनंजय
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही.
कळीचे वाक्य. कित्येक हिरिरीने केलेले वाद वांझ असतात. कारण तो वाद करण्यापूर्वी प्रतिवादी हा "आतल्या-बाहेरच्या"चा विचार शांतपणे करत नाहीत.
हा विचार केल्यानंतर सर्वत्र प्रेम-प्रेम माजणार नाही, हितसंबंध राहातीलच. पण वादांमध्ये "तू असा कसा अनैसर्गिक" हा आरोप-प्रत्यारोप राहाणार नाही. "आतल्या"ला फार गर्दीने काय जीवघेणा त्रास होत आहे, "बाहेरच्या"ला प्रवास किती निकडीचा आहे, अशा प्रकारचा वाद होईल. "तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते.
फुल्यांचा विस्तृत परिचय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. तो या संदर्भात खुलवून दाखवला यात तुमचे खास कौशल्य.
12 Apr 2008 - 7:17 pm | आनंदयात्री
उत्तम लेख नीलकांत.
..."तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते.
पटले.
अवांतरः रेल्वेतल्या लोकांच्या मानसिकतेला लाइफ बोट सिंड्रोम म्हणतात काय ?
12 Apr 2008 - 6:42 pm | सहज
नीलकांत सुंदर लेख आहे. महात्मा फुले यांचे कार्य अलौकीक होतेच.
आचार्य अत्रे यांचा महात्मा चित्रपट माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे.
कितीही महान व्यक्ती होउन गेल्या तरी त्यांच्यावर टिका करणारे असतातच. शेवटि मनुष्य हा "प्राणी" आहे रे!!
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.
12 Apr 2008 - 7:05 pm | विकास
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.
१००% सहमत
12 Apr 2008 - 10:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.
१००% सहमत
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
12 Apr 2008 - 11:59 pm | भाई
आतले बाहेरचे ही सुरूवात थोडी विसंगत वाटली. फुल्यांप्रमाणेच त्याचकाळी पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे अनेकजण मोठे कार्य करते झाले. आपल्याला वाटणार्या फुल्याविषयीच्या आदराबद्दल कोणताही आकस नाही. त्याचप्रमाणे, आपणही दुसरी बाजू विचारात ठेवावी ही विनंती. आधिक चर्चा मी मूळ धाग्यावर केलेली आहेच.
13 Apr 2008 - 10:36 am | नीलकांत
भडकमकर, विकास, धनंजय, सहज, विनोबा, बिरूटे सर आणि भाई प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
व्हीटी स्टेशन बद्दल असं सांगता येईल की, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फुले त्या काळात बांधकाम व्यवसाय करत होते.
भाईंसाठी...
ज्या दुसर्या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती.
लोक आज या महापुरूषांच्या नावावर काय धिंगाणा घालताहेत त्याबद्दल कुणी काही बोलावं व कुणी काही लिहावं असं बाकी नाही.
माझी भूमिका एवढीच की या महापुरूषांना त्यांच्या कार्याने ओळखल्या जावं, मुळात त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं.
नीलकांत
14 Apr 2008 - 8:41 pm | प्रकाश घाटपांडे
वर्तमानातून भूतकाळाकडे पहाताना आपले संदर्भ, दृष्टी ही बदलत असते. तटस्थपणे बघणे शक्य नसते. प्रत्येक काळात हे घडत असते. शेवटी तारतम्य हा भाग आहेच ना!
नीलकांत नी चांगला विषय मांडला म्हणुन त्याला धन्यवाद
प्रकाश घाटपांडे
14 Apr 2008 - 9:31 pm | चतुरंग
अतिशय संयत आणि सहज, सोपे लेखन. अगदी आतून आलेले जाणवते आणि त्यामुळेच भावते.
'विधवा केशवपन' आणि 'बालहत्याबंदी' सारखी कामे ही जातीच्या पलीकडे विचार गेल्याशिवाय होऊच शकत नाहीत. ज्या तथाकथित उच्चभ्रू समाजात ह्या चालीरीती होत्या, नव्हे त्या पोसल्या गेल्या आणि त्याचा यथास्थित गैरफायदाही वर्षानुवर्षे घेतला गेला, त्या रुढी तोडतांना फुल्यांवर झालेले आरोप हे अटळ आहेत. ते हे आरोप पचवून पुढे गेले त्यामुळेच ते महात्मा झाले.
योग्य आणि संयत चर्चेतून विधायक लिखाण कसे जन्म घेते त्याचा उत्तम वस्तुपाठ. नीलकांत, भाई आणि चर्चेला योग्य दिशा देणार्यांचे अभिनंदन!
चतुरंग
6 Apr 2015 - 12:56 pm | भिंगरी
शाळेत असताना (९ वीत )असा धडा होता आतले आणी बाहेरचे.
त्या वेळेस या विषयाची व्याप्ती एव्हडी जाणवली नव्हती.
छान लेख.