हा कुठला बरे आजार/विकार?
वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फ़ारसे लाभले नाही. कधी आर्थीक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलीक स्थितीमुळे पुस्तके अनुपलब्ध असल्यामुळे असे घडले असावे.
पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही.
खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं. कथा,कादंबरी,कविता,गज़ल,लावणी पासून ते हिंदी उपन्यास वगैरे वगैरे.... कशाचे काहीही बंधन नाही.
पण....
कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते हे वास्तव नाहीच. या देशातल्या ७० टक्के जनतेचे हे चित्रण नसून या लेखाचा जनसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबध नाहीये. मग यात वेळ खर्ची घालून अनावश्यक काडीकचरा डोक्यात कोंबण्यात काय हशिल आहे? तो असा विचार करतो आणि पुस्तक फ़ेकून देतो.
कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते ज्या लेखकाने हे लिहिलेय तो लेखक, त्या लेखकाचे व्यक्तिमत्व आणि आचरण त्या लेखात मांडलेल्या विचांराशी, भुमिकेशी प्रामाणिक किंवा सुसंगत नाही. मग जो विचार,भूमिका स्वत: लेखकाला जगता येत नाही त्या विचाराला, "विचार" तरी कसे म्हणावे? थोडा वेळ उत्तर शोधतो आणि उबग आल्यागत पुस्तक फ़ेकून देतो.
तसे त्याला बालकवींची श्रावणमासी ही कविता आवडते कारण त्यात जे श्रावण महिण्याचे वर्णन आले ना, ती केवळ कवीकल्पना नसून त्या कवितेतला अद्भुत आनंद त्याला श्रावण महिना सूरू झाला की प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो.
"सरसर येते क्षणांत शिरवे, क्षणांत फ़िरूनी ऊन पडे" हे दृष्य केवळ त्याच महिण्यात पहायला मिळते. इतर महिण्यात नाहीच.
कवी, कविता आणि श्रावणमास एवढे एकरूप झालेत की त्यांना वेगवेगळे नाहीच करता येणार.
अजूनही श्रावणमहिना त्याच कवितेचे अनुसरण करतो, तसाच वागतो जसे कवितेत लिहिले आहे.
पण ना.धो.महानोरांची "या नभाने भुईला दान द्यावे" ही कविता तर सर्वांची आवडती कविता. उत्तुंग लोकप्रियता लाभलेली पण ग्यानबाला नाहीच आवडत.
तो समर्थनार्थ जे पुरावे सादर करतो तेही जगावेगळे.
त्याच्या मते नभाने भुईला नेहमीच दान दिलेले आहे. मग अतिरिक्त दानाची मागणी करणे याचा अर्थ मातीतून अधिक भरघोस उत्पन्न निघावे अशी अपेक्षा असणार. समजा नभाने आराधना स्विकारली आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे,सुर्य आणि चंद्र जरी लागलेत तरी कोणतेही सरकार चांदणे,सुर्य आणि चंद्राकडे "शेतमाल" याच दृष्टीकोनातून बघणार आणि या सुर्य,चंद्र तार्यांना "भजी किंवा आलुबोंडा" यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची पुरेपुर व्यवस्था करणार.
कदाचित शासन रेशनकार्डावर अनुदानीत किंमतीत सुर्य,चंद्र तारे उपल्ब्ध करून देईल. त्यामुळे गल्लोगल्लीत, नालीच्या काठावर, कचरापेटीत सुर्य,चंद्र,तार्यांचे ढिगारे साचलेले दिसतील.
पण......
ज्या शेतकर्यांसाठी दान मागीतले त्याच्या पदरात काय पडणार? शेतात सुर्य,चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असेल तर.... त्याची दरिद्री आहे तशीच राहणार. त्या ऐवजी कविने "या नभाने सरकारला अक्कलदान द्यावे, जेणेकरून शेतकर्यांच्या दारापर्यंत विकाससुर्य पोहचेल" अशी मागणी करणे जास्त संयुक्तिक नाही का? कवी बिगर शेतकरी असता तर ग्यानबाची अजिबात हरकत नव्हती. पण कवी दस्तुरखुद्द शेतकरी असल्याने ही बाब जास्तच गंभिर आहे, असे त्याला वाटते. आणि असे त्याला वाटले की तो डाव्याहातचे पुस्तक तो उजव्या हाताने फ़ेकून देतो.
"काळ्या(काया) मातीत मातीत" ही किती सुंदर कविता. महाराष्ट्रभर गाजलेली. सिनेमावाल्यांना देखिल भुरळ पाडून त्यांना त्यांच्या सिनेमात समावेश करण्यास भाग पाडणारी.
पण ग्यानबाला भुरळ पडेल तर तो ग्यानबा कसला? त्याच्या मते विठ्ठल वाघासारखे शेतकर्याचे घरात जन्मलेले शेतकरीपुत्र कवी, शेतकर्यांच्या वेदना विकून मोठ्ठे कवी/साहित्यिक वगैरे झालेत, धन मिळवले, मान मिळवला पण.... शेतकर्याच्या पायातून सांडणारे लाल रगत (रक्त) थोडेफ़ार थांबावे आणि त्याला (कविला देखिल) पडलेले हिरवे सपान (स्वप्न) प्रत्यक्षात खरे व्हावे यासाठी पुढे मग काहीच प्रयत्न केले नाहीत. ज्या सरकारच्या "शेतकरी विरोधी धोरणांमुळे" ही परिस्थीती उदभवते, त्या सरकारशी दोन हात करून शेतकर्यांचे प्रश्न खंबिरपणे मांडण्याऐवजी सरकारकडून जेवढा काही लाभ उपटता येईल तेवढा उपटण्यातच धन्यता मानली. त्याला हा चक्क बेगडीपणा वाटतो. आणि असे त्याला वाटले की तो हातातले पुस्तक कपाळावर मारून घेतो आणि दुर भिरकावून देतो.
"बारोमास"कार सदानंद देशमुख असो की आणखी कोणी. त्याचं सदैव एकच तुणतुणं.
नको तसा विचार करणे आणि त्याचा राग पुस्तकावर काढणे.
कुठला आजार/विकार म्हणावे याला?
गंगाधर मुटे
प्रतिक्रिया
20 Aug 2010 - 10:40 am | llपुण्याचे पेशवेll
कधी कधी तो पुस्तक घेतो, वाचायला सुरूवात करतोय पण काही पाने वाचून झाले की, त्याला असे वाटते हे वास्तव नाहीच. या देशातल्या ७० टक्के जनतेचे हे चित्रण नसून या लेखाचा जनसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबध नाहीये. मग यात वेळ खर्ची घालून अनावश्यक काडीकचरा डोक्यात कोंबण्यात काय हशिल आहे? तो असा विचार करतो आणि पुस्तक फ़ेकून देतो.
बस बस बस.. हाच आजार मलाही आहे. यासाठी मी अन्य काही लोकांकडे मदतही मागितली होती.
20 Aug 2010 - 11:33 am | समंजस
छान आहे प्रकटन!
तुमची शेतकर्यांच्या बद्दल असलेली कळवळ नेहमीच तुमच्या लिखाणातून दिसून येते.
मागील काही वर्षांपासून परिस्थीती अशी दिसून येत आहे की, सरकारची धोरणे ही धान्य उत्पादनात पुर्वीप्रमाणे स्वावलंबी न राहता ईतर उद्योगांकडे वळणे, आवश्यक असल्यास शेतीपयोगी जमीनी शेतकर्यांकडून काढून घेणे (सेझ च्या नावाखाली), शेतकरी तगेल, जगेल असले उपक्रम न राबवता इतर उद्योगांची पुढील काळात जास्त आवशक्यता आहे हा भास निर्माण करणे हेच दिसून येतंय. या प्रकारांमागे सरकारचा चांगला हेतू किती या बद्दल नक्कीच संशय ठेवायला जागा आहे. २००६-२००९ दरम्यान ज्या प्रकारे जागोजागी सेझ च्या घोषणा होताना दिसत होत्या त्या सध्यातरी थंडावल्या आहेत. परंतु त्या परत सुरू होणार नाही याची काय हमी?
मागील काही वर्षांतील सरकारचं वागणं बघून मला तरी वाटतं की पुढे काही वर्षांनी, लहान शेतकर्यांना(काही एकरच शेतजमीन असणार्यांना) चांगला भविष्यकाळ नाही. लहान शेतकरी आपल्या जमीनी विकून दुसरा व्यवसाय/मजूरी या कडे वळतील अशी काळजी सरकार ची धोरणे घेतीलच.
भविष्यातील लोकसंख्या आटोकात आणण्या करीता सरकार कडे काहीच धोरण नाही, असलं तरी राबवण्याची हिम्मत नाही अश्या परिस्थीत भरपूर प्रमाणा वर लागणार्या अन्नधान्याचा पुरवठा आणि तो सुद्धा योग्य किंमतीत, महागाई न वाढू देता कसा आणि कोठून होणार याची काळजी अर्थातच सरकारला नाही. महागाई कितीही वाढली तरी त्यांच्याकडे उपाय नाहीत. फक्त वाट बघा हे एकच उत्तर सरकार कडे आहे. भारतातील लहान शेतकर्यांना आणि विशेष करून पावसाच्याच पाण्यावर अवलंबून असण्यार्या शेतकर्यांना येणारा काळ हा जास्त धोकादायक आहे.
[माझ्या लहानपणी शाळेत असताना भुगोल या विषयात भारताबद्दल माहिती सांगताना एक वाक्य हमखास असायचं ते म्हणजे भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. नजिकच्या काळात या वाक्यात बदल होण्याची शक्यता दाट आहे].
20 Aug 2010 - 12:02 pm | गंगाधर मुटे
दुर्दैवाने हे खरे आहे.
कधी वेळ मिळाल्यास बघा. हा देश कृषीप्रधान कसा?
20 Aug 2010 - 12:03 pm | नगरीनिरंजन
काही लोकांच्या मते या विकाराला संवेदनशीलता म्हणतात तर काही लोकांच्या मते याला नस्त्या उठाठेवी असेही नाव आहे.
नाव काहीही असो, उपचार मात्र भयंकर अवघड आहेत. घरादारावर पाणी सोडून चळवळ करणे हे एक प्रभावी पण अत्यंत महाग औषध आहे. त्यापेक्षा कमी महाग म्हणजे सरकार दरबारी खेटा घालून, माहितीचा कायदा वगैरे वापरून गरजूना माहिती आणि मदत मिळवून देणे. हा उपाय सुद्धा बराच महाग आणि मनःस्थिती बिघडवणारा आहे. हे उपाय परवडत नसतील तर साधं तात्पुरतं वेदनाशामक म्हणून तळमळीने लिहीणे हा सगळ्यात स्वस्त उपाय. तो ग्यानबा करीत आहेच. (कदाचित इतरानाही महागडे उपाय झेपले नसावेत म्हणून ते तसे झाले. ग्यानबाने राग धरू नये.)
20 Aug 2010 - 12:05 pm | सहज
माहीतीपूर्ण प्रतिसाद आवडला.
21 Aug 2010 - 1:07 am | गंगाधर मुटे
घरादारावर पाणी सोडून चळवळ करणे हे एक प्रभावी पण अत्यंत महाग औषध आहे. तरीपण त्यासाठी सर्वस्व पणाला लावून आयुष्य उध्वस्त करून घेणारे आहेत. कदाचित ग्यानबा त्यातीलच एक असू शकतो.
पण जेथे आभाळच फाटले आहे तेथे एकट्या ग्यानबाच्या आहूतीने फार काही साध्य होत नाही, हा अगदी अलिकडच्या काळातील इतिहास आहे.
त्यासाठी किमान साहित्यक्षेत्र तरी पाठीशी हवे ना?
पण तेथेही ग्यानबाची उपेक्षाच उपेक्षा.
त्याने अपेक्षा करावी तरी कोणाकडून?
21 Aug 2010 - 10:08 am | नगरीनिरंजन
एकट्याने काहीच होत नाही हे खरेच आहे पण परिस्थिती बदलेल की नाही याचा विचार न करता केवळ स्वतःच्या अस्वस्थतेपोटी स्वतःला जमेल ते करणे एवढेच ग्यानबाच्या हाती आहे हो. ग्यानबाला त्याच्यासारखा दुसरा कोणी धडपड्या मिळाला तर चांगलंच. नाहीतर 'अॅकला चॉलो रे'च. साहित्यक्षेत्रच काय सगळीकडेच खुज्यांचीच गर्दी फार. त्यांच्याकडून कृतीहीन पाठिंबा मिळाला काय न मिळाला काय, सारखंच. चळवळीचा यज्ञ पेटता राहो की विझो, त्यात स्वत:ची अनाम आहुती देणे एवढेच क्रांतिकारकांचे प्राक्तन.
लिहीत रहा. कधीतरी ग्यानबाला त्याच्या सारखाच पेटलेला तुका मिळेलच अशी आशा.
20 Aug 2010 - 12:18 pm | ऋषिकेश
ह्या रोगावर इलाज तर नाहि.. आणि ह्या आजारामुळे अशीच संवेदनशीलता राहणार असेलत तर उपचार करावा का? हा देखील प्रश्नच आहे.
प्रकटन आवडले
20 Aug 2010 - 4:26 pm | झंम्प्या
ह्या आजार जर आणखी बळावत गेला तर ह्याचे आणखी विचित्र दुष्परिणाम दिसण्याची शक्यता असते..
कधी कधी माणूस आजूबाजूच्या परिस्थितीत काहीच चांगला नाही अस मानायला लागतो.. आणि टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या किवा दुसर्यांची हत्या अशा गोष्टीही करतो..
ह्याचे उत्तम उद्हार्ण "डोंबिवली फाष्ट" ह्या चित्रपटात दिसून येते...
ह्या आजाराचा फायदा घेऊन काही लोक दुसर्यांना आजारीही पडतात.. आणि फायदा उठून घेतात.. ह्या जमातीला नक्षलवादी, अतिरेकी असेही mhantat
मध्ये मध्ये मलाही ह्या आजाराची लागण होतेय अस वाटत असताना आमच्या श्रीमुखात भडकावली आणि आम्ही जागेवर आलो..
बाकी गंगाधर रावांचे लिखाणाची शैली आवडली.
20 Aug 2010 - 4:31 pm | मदनबाण
लेखन आवडले...
20 Aug 2010 - 4:39 pm | इन्द्र्राज पवार
"ज्या शेतकर्यांसाठी दान मागीतले त्याच्या पदरात काय पडणार? शेतात सुर्य,चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असेल तर...."
राजकारणीच काय पण आमच्या संतानी आणि साहित्यिकांनीसुद्धा शेतकरी म्हणजे दिवसभर अठरावीस तास शेतात राब राब राबणारा आणि रात्री पाण्याच्या घोटाबरोबर "मीठभाकर" खावून 'विठ्ठ्ल विठ्ठल' करीत 'समाधाना'ने शांत चित्ती झोपी जातो तो असेच चित्र शब्दात रंगविल्याने आणि त्या भोवती नाना भाकडकथा रचणार्यांनी ती टाळमृदुंगाच्या साथीने देवळात, ओसरीत गायल्याने अगदी ताम्रपाषाण युगापासून म्हणजेच आठदहा हजार वर्षापूर्वीपासून "शेतकर्याला चार ज्यादाचे पैशे मिळावेत" अशी कल्पना इथल्या काळ्या मातीत रूजलीच नाही.
शेतकर्याची स्वतःसाठी नव्हे तर "दुसर्यासाठी" राबायचे ही व्याख्या पारंपरिक असून तिची सांगड इतिहास, संस्कृतीशी घातल्याने तीपासून त्याने दूर जावूच नये ही मतलबी योजना निव्वळ जमिनदारांनीच नव्हे तर त्यांच्या "हिताचे कंकण आम्ही घातले आहे" असा टाहो फोडणार्या राजकारण्यांनीही मताच्या मैफिलीसाठी सातत्याने राबविली आहे.
हे सर्व झाले आहे शेतकर्याच्या अशिक्षितपणामुळे आणि देवाच्या भीतीमुळे. ज्ञानोबा, तुकोबा, नामा, एकनाथाचे एखादे चावून चोथा झालेले वचन त्याच्या तोंडावर फेकायचे आणि त्याची मानसिक तयारी अशी करायची की, त्याने जमिनीची प्रत उत्तम राखण्यासाठी काय करावे, कोणते नवीन तंत्रज्ञान वापरावे, खतांचा नेमका वापर कसा व किती करावा, कोणत्या हवामानात कसले नगदी पीक घ्यावे, पाण्याची उपलब्धता वाढ्ण्यासाठी पाटबंधार्याच्या योजना आपल्या भागात येण्यासाठी लोकप्रतिनीधीच्या दंडाला कसे धरावे, शेतमालाला फायद्याचा भाव येण्यासाठी मधल्या अडत्यांचा अडकित्ता कसा दूर करावा.... या आणि तत्सम धाग्यापासून तो कायमचाच कसा लांब राहील आणि निव्वळ बैलासारखा शेतात कसा राबेल हेच समाजाने पाहिले आहे.
नवी पिढी सजग झाली आहे हे निदान पश्चिम महाराष्ट्रात तरी (साखर कारखान्यांमुळे आलेल्या जाणिवेमुळे असेल...) सध्या प्रकर्षाने दिसून येत आहे आणि हा स्वागतार्ह बदल आहे असे मी म्हणेन.
शेती आणि शेतकरी हे घटक देशाच्या प्रगतीसाठी एक व्यवहार्य नियोजित उत्पादक व्यवस्था आहे. शेती ही एक सहजसाध्य निसर्ग घडामोड नव्हे तर त्यातून सोने निर्माण करण्यासाठी प्रमाणभूत कष्ट आहेत, जे कष्ट मुंबईच्या मंत्रालयात एसीमध्ये बसणारा आयएएस रामराव करत नसून वेळेला अर्धपोटी राहुन हवामानाचे नखरे सहन करून घाम गाळणारा रामा करीत आहे... पण म्हणून या रामाने हीच स्थिती नशीबात आहे म्हणून आयुष्य तसे काढ्ण्याची गरज नाही तर त्याच्या कष्टाला पूरक अशी दिशा देवून ते कष्ट प्रॉफिटेबिलिटीमध्ये परिवर्तीत करण्याची काळाची गरज आहे....जे फक्त जमिनीवर पाय असणारे व वैज्ञानिक दृष्टी राखणारे सरकार करू शकेल.
ग्यानबा वाचत असलेल्या पुस्तकांच्या धड्यातून किंवा महानोर/वाघांच्या कवितेत त्याच्या प्रश्नाची उत्तरे नाहीत.
21 Aug 2010 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग्यानबाच्या मनात येतं ते अगदी खरं आहे.
-दिलीप बिरुटे