आज पहायला मिळालेली एक सुरेख अॅनिमेशन फिल्म : बाप आणि मुलगी!
ह्या लघुपटात तशी दोनच पात्रे आहेत, पण आजूबाजूचे माणसांचे संदर्भही प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष रीतीने येत राहतात. बाप आणि मुलीच्या अनोख्या नात्याचं, त्यांच्यातील भावस्पंदांचं इथे पहावयास मिळणारं चित्रण कालातीत, अप्रतिम!
मनाला स्पर्शून जाणारी, हृदयात कोठेतरी कालवाकालव निर्माण करणारी, डोळ्यांत पाणी आणणारी ही फिल्म अवश्य पहाच!
डच भूमीतील एक भाग. वडील आपल्या छोट्याशा टिचकीभर मुलीला हृदयाशी कवटाळून तिचा निरोप घेतात आणि बोटीतून निघून जातात ते परत कधीच न येण्यासाठी. मुलगी त्यांची रोज त्याच ठिकाणी वाट बघत राहते. सोसाट्याच्या वार्यातून, पानगळीतून, बर्फाळ वादळातून मार्ग काढत, उंचावरची अवघड वाट पार करत, आपली सायकल दामटत त्या ठिकाणी डोळ्यांत आस घेऊन ती रोज येत राहाते. दिवसांमागून दिवस जात राहातात, निसर्ग बदलत जातो, ती मुलगीही बालपण मागे सारून तरुणी होते. तिचा स्वतःचा परिवार - नवरा, मुले निर्माण होतात; पण तरीही ती आपल्या परत न आलेल्या पित्याची ओढीने वाट पाहत राहते. अगदी वृध्दापकाळातही ती ओढ सतत तिच्या मनाला व्यापून उरते.
ही कथा एकप्रकारे रुपकही असू शकते. वडील बोटीने दूर जातात हे कदाचित त्यांचा मृत्यू दर्शवते. आणि मुलीने त्यांची वाट पाहाणे हे तिच्या मनात सतत त्यांचे विचार येतात ह्याचे प्रतीक असावे. आणि वृध्दावस्थेतील ती मुलगी जेव्हा कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रातून प्रवास करताना दिसते ते कदाचित ती आता मृत्यूला जवळ करून पुन्हा एकदा आपल्या वडीलांना शोधायला निघाली आहे ह्याचे प्रतीक असावे.
मायकेल ड्यूडोक डि विट या डच कलाकाराने बनवलेल्या ह्या लघुपटाला २००० सालचे ऑस्करचे उत्कृष्ठ अॅनिमेशनपटाचे पारितोषिक मिळाले. त्याखेरीज ह्या लघुपटाला बाफ्ता, अॅकॅडमी अॅवॉर्ड व इतर २० पारितोषिके आणि १ नामांकन मिळाले. लघुपटाच्या कथानकाला साजेसे सुंदर पार्श्वसंगीत, त्यात दाखवलेला निसर्ग व त्याची विविध रूपे, लहानशा मुलीच्या वाट बघण्यातील आर्तता आणि तेच ती मोठी झाल्यावरही तिच्या देहबोलीतून व्यक्त होणारी आपुलकीच्या, वत्सलतेच्या, प्रेमाच्या, स्नेहाच्या त्या आश्वासक स्पर्शाची ओढ.... जलरंग, शाई व रेखाटनाच्या प्रतिभावंत, सहज सुंदर आविष्कारातून जुळून आलेला हा लघुपट नक्कीच प्रेक्षणीय आहे. शिवाय त्यात लपलेल्या गूढार्थाने त्याला अजून सौंदर्य व झळाळी प्राप्त झाली आहे!
-- अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
13 Apr 2010 - 11:02 pm | शुचि
फार सुंदर लिहीलयस ग अरुंधती : ) ......
मला खूप उत्सुकता वाटतेय ही फिल्म पहायची. कचेरीत पहाता येत नाहीये.
मी नेहेमीच "फादर्स डॉटर " होते रादर दॅन मदर्स : ) ...... वाचनखूण साठवल्या गेली आहेत : )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
13 Apr 2010 - 11:14 pm | रामपुरी
.
14 Apr 2010 - 12:32 am | APPLE
Thanks Arundhati for sharing such wonderful short movie.
I also liked another good movie "Life is Beautiful".
Regards,
Apple
14 Apr 2010 - 1:01 am | अविनाशकुलकर्णी
निशब्द...........डोळ्यातुन पाणी आले
14 Apr 2010 - 5:01 am | sur_nair
Simple story but very sensitive. Thanks very much for sharing
14 Apr 2010 - 5:25 am | रेवती
अफलातून कल्पना!
ग्रेट व्हिडिओ आहे. अगदी पारितोषिकपात्र असायलाच हवा असा!
सगळी फिल्म आवडली पण शेवटी वडिलांकडे जाताना ती पुन्हा लहान लहान झालेली दाखवलीये ते पाहून फार कालवाकालव झाली.
रेवती
14 Apr 2010 - 6:00 am | शुचि
ती पुन्हा लहान लहान झालेली दाखवलीये ते पाहून फार कालवाकालव झाली माझ्या मनातसुद्धा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
14 Apr 2010 - 5:26 am | सोम्यागोम्या
>>>ही कथा एकप्रकारे रुपकही असू शकते. वडील बोटीने दूर जातात हे कदाचित त्यांचा मृत्यू दर्शवते. आणि मुलीने त्यांची वाट पाहाणे हे तिच्या मनात सतत त्यांचे विचार येतात ह्याचे प्रतीक असावे. आणि वृध्दावस्थेतील ती मुलगी जेव्हा कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रातून प्रवास करताना दिसते ते कदाचित ती आता मृत्यूला जवळ करून पुन्हा एकदा आपल्या वडीलांना शोधायला निघाली आहे ह्याचे प्रतीक असावे.
हे वाचल्यानंतर असं काही असु शकेल याची जाणीव झाली ! धन्स !
14 Apr 2010 - 6:05 am | मुक्तसुनीत
पुन्हा एकदा, एका उत्तम फिल्मची ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार. अजूनही मनात ती युक्रेनची फिल्म रेंगाळत आहेच.
मूळ प्रस्तावात एकंदर मर्म उत्तम उलगडून दाखवलेले आहे. भाषेची शैली चित्रदर्शी आहे. एकेक पदर नाजूकपणे उलगडलेले.
फिल्मबद्दल काही बाबी मला जाणवल्या.
१.संगीत : पन्नासच्या दशकाच्या संगीताची छाप. अकॉर्डीयनपासून इतर अनेक तुकड्यांबद्दल. असे संगीत हल्ली ऐकायला येत नाही. हॉलीवूडपट म्हणा, किंवा इतर संगीत म्हणा. तुमच्यापैकी कुणाला राज कपूरच्या एका गाण्याची अकॉर्डीयनमधून आठवण झाली का ? मला सुरवातीचा तुकडा ओळखीचाच नव्हे तर हुबेहूब वाटला. पण दुर्दैवाने गाणे सापडत नाही. (प्रदीप सारखे पटकन ओळखतील !) ***
२. रूपक : कथेमागचे रूपक लेखिकेने उलगडलेले आहेच. मला "काँटॅक्ट" या कादंबरी/चित्रपटाची आठवणही झाली. (जोडी फोस्टरला आउटरस्पेस मधील जीवांशी काँटॅक्ट होईल असे वाटत असते; इतकेच नव्हे तर आपले वडीलही भेटतील असे वाटते - तसे ते भेटतातही.)
३. मृत्युचे प्रतीक अगदी लख्ख आहे. मुलीच्या नंतरच्या सायकलस्वारींमधे अन्य वृद्ध तिथे जाताना रस्त्यात दिसतात. यातून अजून एक मुद्दा कुठेतरी अधोरेखित होतो : मरण्यामधली डिग्निटी आणि मरणसमयीचा आप्तांचा निरोप, त्यांचा स्पर्श. इतर वृद्ध कमीअधिक फरकाने खुरडत म्हणा किंवा संथपणे - चाललेत. एकटेच. त्याना कुणी निरोप देत नाही. मात्र, ज्यांचा स्नेह मृत्यूसमयी टिकून आहे, निरोपाची ऊब जिथे आहे , तिथे दुसर्या दुनियेत भेटीचीही आशा आहे. बाकीच्यांच्या नशीबात तेही असेल काय - अगदी त्या पारलौकिकात सुद्धा ?
असो. एक गोष्ट अजून जाणवली. हे जे चित्रकाव्य आहे त्यामधे जे आयुष्याचे प्रतिबिंब पहाण्याचा प्रयत्न आहे ते सगळे सगळ्या आधुनिकोत्तर संवेदनशीलतेपेक्षा निश्चित जुने आहे. माझ्या (मर्यादित )वाचनानुसार , ही अशी रूपकात्मता आजकालच्या फिक्शन, किंवा चित्रपटांमधे पहायला मिळत नाही. आपल्याला जीए कुलकर्णी आठवतील. पन्नाशीमधले संगीत आठवेल. "मुसाफिर"सारख्या चित्रपटातून जन्म-सहजीवन-मृत्यू यांची प्रतीकात्म कथा आठवेल. फारफारतर कार्ल सगान ची काँटॅक्ट आठवेल. पण नव्वदीपलिकडच्या लिखाणामधे अशी आयुष्याबद्दलची समग्रता एखाद्याच रूपकात मांडण्याचा प्रयत्न दिसणार नाही. आपल्या विखंडित स्वरूपाच्या आयुष्याला अशी , काहीशी ठराविक रूपके जणू विसंगतच वाटावीत. यातले रूपक छान मांडले आहे हे खरे, पण हे रूपक चिरपरिचयाचे आहे.
पुन्हा एकदा , धन्यवाद.
*** : आठवले ! हा पीस हुबेहूब "जीना यहां मरना यहां " मधला ! शंकाच नको ! आता ही चोरी आहे का काय आहे ते कळत नाही. पण पीस तोच ! अकॉर्डीयनवरचाच !
हम्म : डॅन्युब वेव्ह्ज हा तो प्रसिद्ध पीस.
http://www.youtube.com/watch?v=xTN6TiusVQo
वेव्ह्ज ऑफ डॅन्युब विकी : http://en.wikipedia.org/wiki/Waves_of_the_Danube
(आपले जयकिशन भाऊना या निमित्ताने शिसानविवि !)
14 Apr 2010 - 1:31 pm | अरुंधती
लघुचित्रपटातील अनेक पदर अजून उलगडवून दाखवलेत त्याबद्दल आभार! :-)
मला ह्यातील काही पदर जाणवत होते, पण तुमच्या लिखाणातून ते स्पष्ट झाले!! हो, ते संगीत ''डॅन्युब वेव्हज'' आहे.... माझ्या मते फिल्मच्या शेवटी येणार्या क्रेडिट्समध्ये तसे लिहिलेही आहे! हा पीस क्लासिक आहे. त्यामुळेच संगीतातूनही कालातीतपणा डोकावतो. मुळात फिल्मला असा स्वतःचा असा नक्की काळ नाही....कारण ही घटना आहे, हे जे कथानक आहे ते फार जुने आहे आणि आजही ते तेवढेच खरेही आहे!! माणसाच्या भावना काळाच्या पडद्याआडही नष्ट होत नाहीत, प्रत्येक पिढीत त्या अभिव्यक्त होत राहतात, प्रकट होत जातात त्याचेच हे प्रतीक! आता पुन्हा एकदा ती फिल्म बघते आणि तिचा आस्वाद घेते! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
14 Apr 2010 - 4:52 pm | मुक्तसुनीत
मुळात फिल्मला असा स्वतःचा असा नक्की काळ नाही....कारण ही घटना आहे, हे जे कथानक आहे ते फार जुने आहे आणि आजही ते तेवढेच खरेही आहे!! माणसाच्या भावना काळाच्या पडद्याआडही नष्ट होत नाहीत, प्रत्येक पिढीत त्या अभिव्यक्त होत राहतात, प्रकट होत जातात त्याचेच हे प्रतीक!
हे मला पूर्ण मान्य आहेच. माझा एकंदर रोख आयुष्याला/जीवन-मरणाला एखाद्या प्रतीकात (किंवा प्रतिकांच्या समुच्चयात )बांधायच्या विचारसरणीबद्दल होता. "आधुनिकोत्तर" असे ज्याचे वर्णन केले जाते त्या आजच्या विचारसरणीमधे या अशा समग्र दर्शनालाच सर्वप्रथम नाकारलेले आहे :
http://en.wikipedia.org/wiki/Postmodernism मधले पहिलेच वाक्य आहे :
Postmodernism is a tendency in contemporary culture characterized by the rejection of objective truth and global cultural narrative.
तस्मात, प्रस्तुत "फिल्मचा काळ" जुना आहे असे मला म्हणायचे नसून, ही कलाकृती एका अर्थाने जुन्या काळातल्या कलामूल्यांशी इमान राखणारी आहे असे मी वर म्हण्टले आहे.
14 Apr 2010 - 2:08 pm | इन्द्र्राज पवार
नक्कीच ! जी. ए. कुलकर्णी यांच्या जातकुळीतीलच ही कथा आहे. तानिमावशी आणि तिचा आईविना पोरका झालेला लाडका भाचा ! ~~ "कैरी". त्यालाही गावाच्या त्या छोट्या रेल्वे स्टेशनवर डोळ्यात पाणी आणून त्याला निरोप देणारी मावशी कायमपणे आठवत राहते व बिचा-याला पुन्हा ती कधीच दिसणार नाही याची शंकाही येत नाही. मात्र कैरी कशी खावी ही तिची शिकवण तो आयुष्यभर जपून ठेवणार असतो. श्रीपुमामाचे लहान पोरासारखे रडणे त्याला बुचकळ्यात टाकतो तो प्रसंग आपणास हेलावून सोडतो. धन्यवाद एम. एस.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
14 Apr 2010 - 7:21 am | स्पंदन
एका उत्तम व ऋद्यस्पर्शि चित्रफिती ची ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार.... अनेक धन्यवाद. मुलीचे बापा बद्दल चे प्रेम पाहुन डोळे पाणावले...!!
मुसूभाऊ नी पण सुरेख विश्लेशण केले, तेव्हा मुसू भाऊ तुम्हाला ही अनेक धन्यवाद
14 Apr 2010 - 8:52 am | स्पंदना
सुन्दर! अप्र्तिम!!
अन अरुन्धती तुझी उलगड ही तेव्हढीच सुन्दर. गाभ्याला न दुखवता.
न कळत अश्रु ओघळले बघ!!
वरील प्रत्येकान जे काही लिहिल आहे ते सुद्धा तितकच सुन्दर. अगदी रेवतीची कालवाकालव अन मु.सु. भाउन्च विवरण !!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
14 Apr 2010 - 9:07 am | मदनबाण
अप्रतिम...
हा इडियो इथे दिल्या बद्धल धन्यवाद... :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
14 Apr 2010 - 1:32 pm | अरुंधती
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
14 Apr 2010 - 2:09 pm | वाहीदा
Thanks Arundhati for giving Review of this Movie ...
~ वाहीदा
14 Apr 2010 - 1:52 pm | इन्द्र्राज पवार
".....शिवाय त्यात लपलेल्या गूढार्थाने त्याला अजून सौंदर्य व झळाळी प्राप्त झाली आहे!".....
लिखाणाची भाषा आणि चित्रभाषा यामध्ये किती फरक असू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणून मी या अनेक पारितोषिके प्राप्त Animation पटाकडे पाहतो. तरलता तर ठायीठायी दिसतेच पण संगीत किती परिणाम करू शकते हे अनुभवायला मिळाले. विशेष म्हणजे आठ मिनिटाच्या या कथेत ती मुलगी बापासाठी कुठेही प्रार्थना करीत बसल्याचे दाखविले गेले नाही, अन्यथा `देवाने तिची प्रार्थना ऐकली व पित्याची भेट घडवून आणली` असला (भारतीय परंपरेतील) मूर्खपणा झाला असता. सायकल चालाविण्यातील तिची उत्कटता, वातावरणातील योग्य दर्शक बदल, तिचे साफल्य यांचा विचार सातत्याने येत राहतो. कधीही परत येऊ न शकणा-या गावी गेलेल्या बापाची वाट पाहण्यातील तिची तळमळ ही या पटाची पताका मानावी. डी सिकाचा `बायसिकल थीफ` हा देखील असाच बाप आणि मुलगा यांच्यातील नाते दाखविणारा पारितोषिक प्राप्त विलक्षण बोलपट !
एक अतिशय सुंदर अनुभव दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद अरुंधती ताई !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
14 Apr 2010 - 2:27 pm | अमोल केळकर
खुप छान
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
14 Apr 2010 - 2:37 pm | बेभान
एकही संवाद नसताना नुसत्या अॅनिमेशनच्या बळावर सर्व भावना व्यक्त करण्यास बनविणा-याला यश आले आहे. अतिशय सुरेख. जेंव्हा पाहीला होता तेंव्हा डोळ्यात टचकन पाणी आले.
असाच अजुन २००९ साली ऑस्कर नामांकन झालेला (मिळालेला बहुतेक) रशियाच्या कोन्स्तांतिन ब्रॉझित (Konstantin Bronzit) यांनी दिग्दर्शित केलेला Lavatory/Love Story हा ही लघुपट खुप सुंदर.
http://www.youtube.com/watch?v=ajLrFugsdMw
मिपाकर यावरच्या लेखाची वाट पहातोय.
14 Apr 2010 - 2:56 pm | अरुंधती
व्वा!!!! धमाल आहे ही चित्रफीत! किती छोटीशी कथावस्तू, पण खूप कुशलपणे फुलवली आहे!! :) मस्त!
धन्यवाद!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
14 Apr 2010 - 9:18 pm | प्राजु
मस्तच!!
अरूंधती, तू फार सुंदर चित्रफित दिली आहेस..
आणि बेभान यांचीही क्लास आहे..
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
15 Apr 2010 - 12:10 pm | चित्रगुप्त
मूळ चित्रफीत आणि त्यावर सर्वांनीच जे जे काही लिहिले आहे, ते सर्वच फार सुंदर.....

16 Jul 2012 - 9:13 pm | मन१
आवडले.