पैलवान-१

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
26 May 2017 - 11:54 am

"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी.

"....तरीबी पब्लिक कुस्तीच्या रिंगणाजवळ एवढ दाटीवाटीनं बसल्यालं की एकाला ढकाल्ला असता तरी वळीन सगळी सांडली असती. कुस्तीच आशी आजाब लावल्याली! गावबी आजाबच म्हणायच! म्याबी लका पैलवान हाय, पण आपलीबी छाती झाली नस्ती त्या डोंगराच्या बगलत मान द्यायची. ह्ये मोठ्ठा तगडा राक्षिसावनी गडी आन दुसरं कोनतरी फाळकं होतं. पर अर्धा तास उलाटला तरी त्यो चिपाड काय पडना गड्या! त्या ढोल्यानं कुस्तीतले आसत्याल नसत्याल तेवढे डाव लावले पण ह्यो दुसरा काय दाद दिना! आन त्यो डाव... आगागा... त्या मोठ्यानं बारक्याला उच्याललं तसा चपळाईनं बारका त्याज्या खांद्यावरच चढला आन रप्पदिशी पायाची कैची त्याज्या गळ्यात मारून उलटा पाण्यात सूर मारत्यात तसा त्यान मातीकडं सूर मारला. कसला लका त्याज्या पायात जोर! गड्यानं त्या पैलवानाला उलटा फेकला. बारका उताणा आन त्यो राकीस पालथा झाला की रं मिंटात. काय कळ्ळच नाय. मोटा काय उटला नाय पण बारक्यानी लय दंगा घातला, पब्लिकनी तर त्याज्या वर! कुणीतर लका माळच घातली त्याला नोटांची. आपुनबी ह्या दारूशप्पत सांगतो, हातात गलास आसलं ना माणूस तसाबी खोट बोलतच नाय पण तरी आईचीबी आन घेऊन सांगतो आसली कुस्ती आन आसला डाव ना कधी कुनी केला आसलं ना कोन करील पुढबी! लका पुढच्या कुस्त्या बगाय कोन थांबना. ज्याज्या त्याज्या तोंडावर त्या बारक्या पैलवानाचंच नाव. म्याबी लका पुढं जाऊन हात मिळीवला आन शंभराची नोट ववाळून टाकली!"

"कुटं बघितली रं आसली कुस्ती?" शंकऱ्या, विनोद आणि रामाचा जणू एकच सवाल पडला. "आरं नरशिंग नीवळीला गेलतो. आमच्या म्हाताऱ्यालाबी एवढ्या लांबच्याच देवाला नवस बोलायचा व्हता, त्योच फेडाय गेलतो. आर लय लांब लका गाव ती, एमपीच्या बॉडरजवळ हाय. जिकडं तिकडं हिंदीचीच भयालोकं!"

दत्त्यानं सांगीतल्यावर तिकडीनं तोंडानं च्याक आवाज केला आणि नुसतं ओठाला ओठ लावून व खालचा ओठ जरा बाहेर काढून अर्धवर्तुळाचा आकार काढला. चकण्याचे बकाने भरले गेले. ग्लास हेंदकाळले आणि गप्पांच्या मैफिलीत त्या चौघांची रात्र कशी सरली त्यांनाही कळलं नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी दत्ता आपली बैलगाडी तयार करून बाहेर निघण्याच्या तयारीत होता तेवढ्यात रामा तिथे आला. "कुट रं दत्त्या?" गळ्यातल्या पंचावर हात लटकवून तो विचारता झाला. बैलाचा कासरा ओढत ओढत दत्ता बोलला, "आरं जरा शेताकडं जाऊन येतो. म्हतारं परवापासनं हाय तिथ. सालकरी ठिवा म्हणलं तर ती काय जमाना म्हाताऱ्याला. माज्या जीवाला नुस्ता घोर! जाऊन बघतो तरी न्हायतर म्हतारं म्हाग लय किरकिर करतयं"
"होय की रं पैलवाना, एक काम करू. शंकऱ्या आन इन्याला घिऊ सोबत आन तुझ शेतावरचं झाल की आमच्या बहिणीच्या गावाला जाऊ सोमनाथाच्या वाडीला. आजच हाय त्यांची जत्रा. सकाळीच यस्टीतनं पाव्हण्यांचा निरूप आलता, म्हणले यावाच लागतयं, बोकाड हाय!" दत्ता 'नाही' म्हणायच कारण नव्हत पण त्याची जराशी चुळबूळ पाहून शंकऱ्याने विनोदला जोरात हाक दिली. विनोद आणि रामा पलीकडच्याच बोळाच्या उलट्या टोकाकडे राहत होते. आवाज पोचलाच असणार कारण पुढच्या मिन्टाला दोघेही दत्ताच्या अंगणात हजर झाले. तंबाखूचा मोठ्ठा बार लावता लावता शंकऱ्याने सगळ्यांना प्लॅन सांगितला.

"ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू... उद्या सांच्याला आपल्या घरला!" शंकऱ्याने तळहातावरील तंबाखूवर थापा मारल्या व इतरांपुढे तंबाखूचा हात पसरीत प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला.

क्रमश:

संस्कृतीकलावाङ्मयकथासमाजजीवनमानमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुरूवात तर मस्त झालीय..

गुड. येऊंदे फुडला भाग.

अत्रुप्त आत्मा's picture

26 May 2017 - 2:40 pm | अत्रुप्त आत्मा

+१
आक्शी जोर्रात टाकलाया डाव.. .

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 May 2017 - 5:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

पैलवान, लिवा बिगी बिगी.
पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

27 May 2017 - 12:48 pm | तुषार काळभोर

बिगी बिगी.

तुषार काळभोर's picture

27 May 2017 - 12:48 pm | तुषार काळभोर

बिगी बिगी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 May 2017 - 9:54 am | ज्ञानोबाचे पैजार

तुमाला नाय चांदने पैलवानांना म्हनालो फुडची गोष्ट येउद्या बिगी बिगी...

त्ये काय मनाव घेइना बघा,

तुमी काय म्हनताय? ते बस लागने थांबल का नाय?

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

28 May 2017 - 12:41 pm | तुषार काळभोर

मेमरीला मानलं तुमच्या!!

आँ मेमरी मेमरी काय म्हणतासा,
आम्हाला ते पैलवान म्हणलं की घसरगुंडी, पालखी, घोडा, ओवामीन, थत्तेचाचाचाचे नुस्खे सगळं अगदी डिट्टेलात आठवते. ;)

तुषार काळभोर's picture

28 May 2017 - 3:07 pm | तुषार काळभोर

1

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 May 2017 - 5:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

लिस्ट मधे बसुन पिंगा आणि इयरप्लग राहिले ना,
पैजारबुवा,

पैसा's picture

26 May 2017 - 5:27 pm | पैसा

मस्त सुरुवात!

सिरुसेरि's picture

27 May 2017 - 11:23 am | सिरुसेरि

रे सुल्तान .. कर्दे चटाई .

प्रचेतस's picture

27 May 2017 - 11:45 am | प्रचेतस

झक्कास सुरुवात.

येउ द्यात पुढचा भाग.

अभ्या..'s picture

27 May 2017 - 12:17 pm | अभ्या..

जब्बरदस्त रे सॅन्डीबाबा

संजय पाटिल's picture

28 May 2017 - 7:29 am | संजय पाटिल

येउदे लवकर लवकर ..