गेल्या सहा सात वर्षात थंडीचे चार सहा महिने घराबाहेर पडायला अगदीच कमी वाव असायचा. थंडीचे विकेंड म्हणजे कोणाच्या तरी घरी जमून गप्पा गोष्टी, पॉट लक किंवा फार फार तर कुठेतरी इनडोअर ठिकाणाला भेट यापेक्षा जास्त इतके दिवस काही केलं नव्हतं.
या वर्षी व्हॅंकुवरला शिफ्ट झाल्यामुळे लोकप्रिय विंटर स्पोर्ट असलेल्या स्किईंगचा अनुभव घेता आला. घरापासून ३० ते ५० मिनिटांच्या ड्राईव्हवर ३ स्की रिसॉर्ट असल्यामुळे आधी एखाद्य ठिकाणी जाऊन कसे वाटते ते बघू आणि मग पुढे शिकायचे कि नाही ते ठरवू असं ठरवलं. त्यानुसार डिसेंबर मध्ये मी आणि लेकीने माउंट सिमोर या स्की रिसॉर्ट मध्ये एका तासाचे ट्रेनिंग घेतले आणि तो अनुभव आवडल्यामुळे आम्ही सगळ्यांनी चार सेशन्स असलेल्या ग्रुप ट्रेनिंगमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. यावेळी मात्र घरापासून त्यातल्या त्यात जवळ अश्या ग्राऊस माउंटन या ठिकाणी प्रशिक्षणासाठी नोंद केली. बर्यापैकी अॅक्टीव्ह राहणीमान असल्यामुळे आणि आम्ही प्राथमीक पातळीचंच स्कीईंग शिकणार असल्यामुळे आहे तो फिटनेस पुरेसा वाटला त्यामुळे फिटनेस वाढवण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नाही.
माउंट सिमोर स्की एरीया
ट्रेनिंगच्या फी मधेच स्की बूटस आणि स्की आणि पोल्स वापरायला मिळणार होते त्यामुळे हे साहित्य घ्यायची आवश्यकता नव्हती. स्कीइंगसाठी लागणारे कपडे खरेदी करणं मात्र गरजेच होतं. स्कीईंग करताना योग्य कपडे नसतील तर थंडीचा त्रास होण्याची शक्यता असते. शिवाय आपण थंडीने गारठलेलो नसु तरच खेळावर लक्ष केंद्रित करू शकतो. त्यामुळं योग्य लेयरींग म्हणजेच एकावर एक दोन तीन प्रकारच्या कपड्यांचे थर घालून मगच स्कीईंगला जाणं गरजेचं आहे. एक शरीरालगतचा थर (बेस लेयर - मुख्यतः घाम टिपून लगेच वाळेल या प्रकारातला), त्यावर अजून एक माध्यम जाडीचा थर यात फ्लीस प्रकारातलं जॅकेट जास्त करुन वपरतात(मिड लेयर) आणि सगळ्यात बाहेर आतल्या या कापडयांना कोरडं ठेवण्यासाठी पाण्याला अवरोधक असं औटर लेयर अश्या तीन थरांमध्ये कपडे घातल्यास थंडीचा काहीही त्रास जाणवत नाही. स्की बूटस सुद्धा जाड आणि वॉटरप्रूफ असतात त्यामुळे सॉक्ससुद्धा बेसलेयर प्रमाणेच घातलेले चांगले म्हणजे घामामुळे ब्लिस्टर्स येऊन त्रास होत नाही. स्की पॅन्ट शक्यतो थोडी लूज आणि स्की बूट्स च्या वर येईल अशी असावी म्हणजे बूट्स च्या आत स्नो जाऊन पायाला गार वाटत नाही. पायासाठी फक्त बेसलेयर आणि त्यावर स्की पॅन्ट एवढं पुरेसं होतं. या सगळ्या बरोबर चांगले वॉटरप्रूफ ग्लोव्हजही आवश्यक आहेत. डोक्याच्या सुरक्षिततेसाठी स्की हेल्मेट घालणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. हेल्मेट असेल तर डोक्यावर टोपी घालण्याचीही गरज पडत नाही. हेल्मेटमुळ डोकं आणि कान दोन्ही झाकून गेल्यामुळ डोक्याला गार लागत नाही. स्की गॉगल घेणं गरजेचं नसलं तरीही उन्हात स्की करताना किंवा बर्फ पडत असताना गॉगल असेल तर डोळयांना त्रास होत नाही. तर एकंदर असा सगळा जामानिमा करून आम्ही स्की सेशन्ससाठी सज्ज झालो.
स्की गिअर्स
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)
आमचं दोघांचं सेशन साडेनऊ ते साडे अकरा आणि लेकीच सेशन नऊ ते बारा असल्यामुळे आधी तिला तिच्या सेशनच्या ठिकाणी सोडून मग आम्हाला आमच्या ट्रेनिंग एरिया मध्ये जाणं सोयीस्कर होतं. ग्राउस माऊंटनला पायथ्याशी गाडी लावुन केबलकार (गोंडोला) मधुनवर जावे लागते. वेदर चांगले असेल तर या गोंडोलामधुन व्हॅंकुवर शहर आणि आसपासच्या परिसराचे सुंदर दर्शन होते.
गोंडोला, व्हॅंकुवर शहर आणि परिसर
इथल्या मुलांच्या ट्रेनिंग एरियाच नाव स्की वी आहे. इथे मुलांना आधी छोट्या जागेत आजू बाजूला कुशन्स ठेऊन सुरुवातीचं ट्रेनिंग देतात. एका ग्रुप मध्ये चार ते पाच मुलं आणि सहसा दोन इंस्ट्रक्टर्स असतात. शिवाय मधे अर्ध्या तासाची खाऊसाठी सुट्टी असते आणि खाऊसुद्धा त्यांच्याकडूनच पुरवला जातो.
सकाळी ९ ला ट्रेनिंग सुरु होत असल्यामुळे धावतपळत आम्ही आधी लेकीला सोडलं आणि मग आमचा ट्रेनिंग एरिया गाठला. माझ्या ग्रुप मध्ये आम्ही सात जण होतो. सगळ्यांच्या ओळखी होऊन ट्रेनिंगला सुरुवात झाली. माझं आधी एक तासाचं जुजबी ट्रेनिंग झाल्यामुळं आता आपल्याला जमतंय स्कीईंग असं वाटून मी मनातल्या मनात खूश होत होते. पहिल्यांदा इन्स्ट्रक्टरने आम्हाला एकाच पायात स्की घालून सपाट भागातच एक मोठी चक्कर मारायला लावली, पुन्हा तेच दुसर्या पायात स्की घालून. नंतर दोन्ही पायातल्या स्की घालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्की करत जायचं होतं हेही सहज जमलं. पुढे एका उतारावरून घसरत जाऊन सपाट भागात थांबायचं होतं. यातही घसरत जाताना थोडी कसरत होत होती पण सपाट भाग आल्यावर आपोआप वेग कमी होऊन थांबत होतो त्यामुळे स्वतःहून थांबण्याची गरज पडली नाही आणि मग तर खरंच आपाल्याला जमतंय. या उतांरावर खाली आल्यवर पुन्हा चढावर जाण्यासाठी जास्त कसरत करावी लागते. स्की एकमेकांना समांतर पण उताराला काटकोनात ठेऊन एक एक पायरी वर-वर चढत जावं लागतं. खाली घसरत येण्यापेक्षा या वर जाण्यालाच जास्त वेळ लागतो आणि दमायला होतं. छोट्या उतारावर बर्याच वेळा खाली वर करुन दमल्यामुळे आता जरा अजून मोठ्या उतारावर जाऊन बघू, किती वेळ या छोट्या चढ उतारांवरच खेळायचं असं वाटू लागलं. सगळे जण मोठ्या उतारावर जायला उत्सुक झालो होतो. शिवाय मोठ्या उतारवरुन खाली गेल्यावर पुन्हा वर येण्यासाठी सरकत कार्पेट किंवा चेअर लिफ्ट असते त्यामुळे दमायला होतं नाही.
पण मोठ्या उतारावर वेग आटोक्यात ठेवणं आणि थांबता येणं महत्वाचं आहे. उतारावर घसरण्यासाठी दोन्ही स्की एकमेकांना समांतर ठेवाव्या लागतात या पोजीशनला आमचा इंस्ट्रक्टर फ्रेंचफ्राय म्हणायचा तर थांबण्यासाठी पुढच्या बाजूची टोकं जुळवून इंग्रजी व्ही आकार करायचा असतो याला म्हणायचं पिझ्झा किंवा स्नो प्लोव.
फ्रेंचफ्राय आणि पिझ्झा (माझा इन्स्ट्रक्टर आणि गृपमधील मैत्रीण)
उतारावर घसरताना जेव्हा दोन्ही स्की समांतर असतात तेव्हा साहजिकच गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही वेगाने पुढे जाऊ लागता अशा वेळी पायाच्या नडग्या(शीन्स) स्की बुटसच्या पुढच्या भागाला रेटून ठेवाव्या लागतात जर त्या तश्या बुटांना टेकलेल्या नसतील तर वाढत्या वेगासोबत तोल नीट सांभाळता न आल्यामुळे आपण घसरत जातो आणि मधेच कुठेतरी दाणकन आपटतो. हे टाळायचं असेल तर वेळेत स्नो प्लोव करून थांबता तरी यायला हवं किंवा घसरण्याची दिशा बदलुन वेग तरी कमी करता यायला हवा. त्यामुळं मोठ्या उतारावर जाण्याआधी आमचा इन्स्ट्रक्टर आमच्याकडून छोट्या टेकडीवर फ्रेंचफ्राय आणि पिझ्झाचा सराव करून घेत होता. हि छोटी टेकडी असून सुद्धा आमच्या ग्रुप मधले काही जण पडत होते. माझं नशीब मात्र जोरावर असल्यामुळे या सेशनमध्ये मी एकदाही पडले नाही. नवरा दुसर्या ग्रुपमधे होता आणि त्यांच्या ग्रुपचा इन्स्ट्रक्टर त्यांना थोड्या वेळातच मोठ्या उतारावर घेऊन गेला त्यामुळे मलासुद्धा तिथे जायची घाई झाली होती. पण छोट्या टेकडीवरच थोडा सराव करून आमचं पहिल्या दिवशीच सेशन संपलं. पुढच्या आठवड्यात नक्की मोठ्या उतारवर जायचं असं एकमेकांना सांगत सगळे आपापल्या वाटेला निघालो.
स्की लाइन्स
.
प्रत्येक सेशनमध्ये एक कॉम्प्लिमेंटरी स्नॅक आणि ड्रिंक (चहा/कॉफी/ हॉट चॉकलेट) समाविष्ट असल्यामुळे लगेच लेकीला घेऊन कॅफेकडे रवाना झालो. हा पहिलाच दिवस असल्यामुळे लेक पण दमली होती. त्यामुळे कॅफेमधेच जेवून पुढच्यावेळी अजून थोडावेळ थांबून प्रॅक्टिस करु, आज जाऊया घरी असं ठरवून आम्ही घराकडे कूच केलं.
प्रतिक्रिया
4 May 2017 - 2:07 pm | वरुण मोहिते
फोटो वैग्रे . कधीतरी करायला हवा हा प्रकार .
4 May 2017 - 2:17 pm | एस
लईच भारी!
4 May 2017 - 2:24 pm | शामसुता
खुप छान माहिती इडो. सुंदर फोटो.
4 May 2017 - 2:56 pm | प्रीत-मोहर
वाह मस्तच. तु स्की कर मी हे सगळं दुरुन बघेन :)
4 May 2017 - 4:40 pm | मंजूताई
अनुभव कथन! सिनेमातच पाहिलं होतं! भारी!
4 May 2017 - 5:16 pm | स्रुजा
अरे वा ! डिटेल माहिती. तुमचं सिमोर बरंच प्रसिद्ध आहे स्किईंग साठी. आमच्या पहिल्या स्किईंग नंतर जी काही वाट लागली होती ती आठवुन आज ही हसायला येतं. पण व्यक्तिश : मला आईस स्केटिंग जास्त आवडलं. आमच्या शहरात तर आख्खा कनाल फ्रीझ होतो त्यामुळे मिळेल तो वीकांत स्केटिंग करायला सोपं आणि तुलनेने स्वस्त पण पडतं
4 May 2017 - 5:35 pm | मितान
मस्त ग इडो ! पहिला फोटो फार फार आवडला !
पुढचा अनुभव वाचायला उत्सुक :)
4 May 2017 - 6:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं !
5 May 2017 - 1:14 am | इडली डोसा
वरुण, शामसुता, प्रिमो, मंजुताई, स्रुजा, मितान, म्हात्रेसर धन्यवाद!
5 May 2017 - 1:15 am | इडली डोसा
एस भौ राहिले वाटतं, धन्यवाद एस भौ!
5 May 2017 - 2:15 am | रुपी
अरे वा! मस्त आम्हिती आणि छान फोटो.
एक-दोन वेळा आइअसस्केटींग करताना दणकून मार खाल्ल्यामुळे आता स्कीइंगचीही भीती वाटायला लागली आहे. पण मुलांना शिकवायचं तर बहुतेक स्वतः करायचीही मनाची तयारी करावी लागेल.
5 May 2017 - 4:18 pm | स्मिता चौगुले
खूप छान अनुभव कथन
मला नविन मिपा थिम आल्यापासुन कोणत्याच धाग्यावरचे फोटो दिसत नाहित .. :(
5 May 2017 - 4:33 pm | सस्नेह
रोचक प्रकार आहे !
ऐन उन्हाळ्यात बर्फातले फोटो बघून जीव गार गार झाला !!
6 May 2017 - 3:14 am | विंजिनेर
छान. आता "पिझा" ते हॉकी-स्टॉप हा प्रवास, बनी स्लोप वरून ब्लू आणि मग ब्लॅक डायमंड स्लोपवरचे असे सर्व अनुभव येउदे.
जाता जाता - ट्रेनिंग सेशन मध्ये खाऊ पण म्हंजे बरच परवडेण्बल दिसतंय तुमचं स्की रिसॉर्ट. इथे तर चक्क लुटतात :(
6 May 2017 - 12:12 pm | पद्मावति
मस्तच. पुभाप्र
6 May 2017 - 12:56 pm | सपे-पुणे-३०
मस्त माहिती ! सुंदर फोटो .
6 May 2017 - 1:47 pm | पैसा
मस्त लिहिते आहेस!
10 May 2017 - 12:57 pm | इडली डोसा
पुढचा भाग टाकला आहे. इथे बघायला मिळेल.