नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते. कांही वृत्तवाहिन्यांच्या बातमीप्रमाणे ट्रॅक बंद पडल्यावर गायक आणि वादकांनी खरेच गायला-वाजवायला सुरुवात केली तेव्हा एनर्जी लेव्हल मधे कमालीचा फरक पडून गाणे नीरस झाले.
या जोडीची सगळी नाही तरी अनेक गाणी आवडतात. कलाकार म्हणून ते पुढेही आवडत रहातीलच. पण त्यांच्या किंवा अन्य कुणाच्या लाईव्ह कार्यक्रमात जाणे आता नकोसे वाटेल. तुमचे मत काय?
या निमित्ताने मनात आलेले कांही प्रश्न असे:
१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का?
२. अन्य कलाकार असेच करत असतात का?
३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का?
४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही?
५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते?
६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का?
७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का?
प्रतिक्रिया
18 Oct 2016 - 12:31 pm | एस
जवळजवळ सर्वच कलाकार असे 'लिपसिंकिंग' करतात लाईव्ह शो मध्ये. त्यामुळे आश्चर्य वाटले नाही.
18 Oct 2016 - 1:40 pm | मोदक
हेच बोलतो...
..आणि ही नवीन गोष्ट असेल असे वाटले नव्हते.
एक साधा विचार करा. "मूळ गाण्यातला प्रत्येक सूर जुळवत, वाद्यांचे त्या त्या ठिकाणचे आवाज आजिबात न चुकता योग्य ठिकाणी वाजवत आणि स्टेजवर न दमता इतकी नाचानाची करत तेच गाणे तस्सेच्च म्हणले जाणे" आपल्याला दिसते तेंव्हा मागे गाणे सुरू आहे आणि गायक लोक्स नाटक करत आहेत हे सहज लक्षात येते.
हल्ली फॉरवर्ड होत असलेल्या एक दोन रिअॅलिटी शो मधल्या मुलांच्या गाण्यालाही हीच शंका येते.
अर्थात याला अपवाद वाटलेले अनेक कार्यक्रम आहेत.. सगळेच लोक असे करतात असे नक्कीच नसावे.
18 Oct 2016 - 3:58 pm | अनुप ढेरे
स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं गाणं देखील खूप गायक ऑटो ट्यून मधून काढतात असं ऐकलेलं आहे ज्यात बेसुर सूर ठीक करता येतात सॉफ्टवेअरमधून. स्टूडिओमध्येदेखील जर एवढी वेळ येत असेल तर लाईवमध्ये बरोब्बर सुरात गाणं अशक्य आहे.
18 Oct 2016 - 12:36 pm | किसन शिंदे
बॉलीवूडमध्ये हा प्रकार तर पूर्वीपासूनच सुरू आहे.
आता परवाच्या लोकसत्तामध्ये कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीमधील आनंदजी यांनी किशोर कुमारबाबत सांगितलेला किस्साही अशाच प्रकारचा होता.
त्या लेखातला काही भाग..
18 Oct 2016 - 12:39 pm | पुंबा
ही युक्ती नाही तर अत्यंत गलीच्छ फसवणूक आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ते निर्लजापणे सांगतात, म्हणून कलावंतांची कदर केली जात नाही या देशात. सगळ्यांचे पाय मातीचेच असतात हे खरे.
21 Oct 2016 - 11:48 pm | आशु जोग
आणीबाणी ही देशाचीच फसवणूक होती. त्या काळात किशोरकुमार बाबतीत काय झालं होतं हे आधी जाणून घ्या
18 Oct 2016 - 12:36 pm | पुंबा
१. हो
२. दुर्दैवाने हो. अगदी लता, आशा, रेहमान वगैरेसुद्धा असे करत असत असे काल वाचले.
३. हो
४. चार पैसे फेकले की वृत्तपत्र नावाचे कुत्रे गोंडा घोळत येते असे ऐकून आहे.
५. त्याची गरज होती आणि सैराट deserved it.
६. आजीबात नाही. मुळात अश्या फसवनुकीत सहभाग घेने हेच प्रोफेशनल एथिक्सच्या विरोधात आहे.
७. मागता यायला हवेत. प्रेक्शकांची ही खुप मोठी फसवणूक आहे. ग्राहक न्यायालयात याबद्दल दाद मागता यायला हवी. अर्थात हे सिद्ध कसे करणार हा प्रश्न आहेच.
18 Oct 2016 - 1:53 pm | मराठी_माणूस
कुठे वाचले त्याचा संदर्भ देउ शकाल का ?
18 Oct 2016 - 12:42 pm | आदूबाळ
कुठाहेत आपले पुमुंग्रापं?
18 Oct 2016 - 12:53 pm | तुषार काळभोर
१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का?
>>>>>हो, बहुतेक सर्व भारतीय कार्यक्रम (चित्रपटसंगीताशी संबंधित) हे रेकॉर्डेड असतात व आपल्यासाठी ते 'लाईव्ह असल्याचा आभास केला जातो.
२. अन्य कलाकार असेच करत असतात का?
>>>>> (चित्रपट संगीताशि संबंधित बहुतेक सर्व कार्यक्रम) हो. सर्व अॅवॉर्ड सोहळ्यातील गाण्याचे कार्यक्रमसुद्धा.
३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का?
>>>>> त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने असं नव्हे, तर जास्त परफेक्शन साठी होत असेल. झटपट पैशांबाबतः तो कोणाला नको असतो?
४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही?
>>>>> दिसतंय की! लोकसत्ता
५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते?
>>>>> याड लागलं आणि सैराट झालं जी या दोन गाण्यांचा वाद्यमेळ अफाट सुंदर आहे. त्याला (जर)साठ-सत्तर लाख खर्च केले असतील, तर ते नक्कीच पैसा वसूल काम झालंय!
६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का?
>>>>> अर्थात! लाईव्ह कार्यक्रमात/नाटकात/स्टेज शो मध्ये/सत्कार कार्यक्रमात/राजकीय सभांमध्ये अशा गडबड गोष्टी होतच असतात. त्यातून कार्यक्रम जास्तीत जास्त स्मुथली पुढे नेण्यात सूत्रसंचालकाचे खरे कसब असते.
७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का?
>>>>> डिस्क्लेमर वगैरे कोणी टाकणार नाही. तिकिटाचे पैसेही परत मागता येतील असे वाटत नाही. युक्तिवाद असा असू शकतो: ' अजय अतुल लाईव्ह असा कार्यक्रम होता. अजय अतुल तिथे प्रत्यक्ष उपस्थित होऊन गाणी गायल्याचा प्रत्यक्ष अभिनयही करीत होते. ते प्रत्यक्ष गाणी म्हणतील असा कुठेही उल्लेख आम्ही केला नव्हता'
*माझी मते नेहमीच लवचिक असतात.
18 Oct 2016 - 1:14 pm | खेडूत
:)
मकरंद अनासपुरेंच्या अन्य सामाजिक कामांमुळे त्यांच्याकडून अपेक्षा जास्त असतात, त्यामुळे असे वाटले, अन्यथा सूत्रसंचालकाने प्रसंगावधान राखून वेळ मारून नेणे योग्यच.
18 Oct 2016 - 1:31 pm | वेल्लाभट
म्हणून सांगतो; मैफिल ऐकावी शास्त्रीय, उपशास्त्रीय, अगदी सुगमही. ज्यात गायक वादक समोर स्प्ष्ट दिसतील. कॉन्सर्ट च्या नावाने पैसे वाया घालवू नये.
18 Oct 2016 - 1:34 pm | आदूबाळ
सहमत आहे.
विशेषतः शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायक-वादकाने बुद्धीचा वापर केल्याचं स्पष्ट जाणवतं.
19 Oct 2016 - 2:11 pm | अंतरा आनंद
+१
18 Oct 2016 - 2:15 pm | वरुण मोहिते
बायकोच्या हट्टामुळे. बाकी असा होतंच असतं त्यात काही नवीन नाही पण शास्त्रीय संगीत किंवा एखादा बॅण्ड परदेशी कलाकारांचा लाईव्ह बघणं हे बेस्ट त्यापेक्षा .
18 Oct 2016 - 2:28 pm | मराठी कथालेखक
आमचा शंकर (महादेवन) नाही बरं त्यातला :)
18 Oct 2016 - 3:20 pm | योगी९००
शंकर महादेवन असले प्रकार करत नाही.
18 Oct 2016 - 3:29 pm | गिरिजा देशपांडे
अजय-अतुलनी मटा वर दिलेलं स्पष्टीकरण बाकी खरा खोटा त्यांचे तेच जाणोत
18 Oct 2016 - 4:07 pm | आदूबाळ
काय कळ्ळं नाही त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते.
18 Oct 2016 - 4:35 pm | विशुमित
जाणीव पूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
काही अंशी मला ही तेच वाटत.
http://www.loksatta.com/manoranjan-news/atul-gogavales-clarification-ove...
18 Oct 2016 - 4:41 pm | खेडूत
त्यांचं म्हणणं असं दिसतंय की मायनस ट्रॅकवर मुद्रित संगीताच्या साथीत ते खरंच गात होते आणि बंद पडून पुन्हा सुरू होताना टेक्निशियनने प्लस ट्रॅक लावला. हे खरं मानलं तर आधी वादक वाजवल्याचा अभिनयच करत होते असा होतो!
18 Oct 2016 - 5:08 pm | आदूबाळ
एग्जॅक्टली! म्हणूनच "मग ऐंशी वादकांचा ताफा आम्ही का नेला असता" वगैरे पोकळ वाटतं.
@विशुमितः जाणीवपूर्वक गैरसमज का बरं पसरवले जातील?
18 Oct 2016 - 3:48 pm | कंजूस
हजारो वॅाट्स स्पिकर ध्वनिवर्धक लावून अशा मोकळ्या जागेत शक्य नसावे.कारण नाजूक वाद्यांचा आवाज,गायकाचा आवाज माइक्रोफोनने पकडून मोठा करायचा उघड्यावर सोपे वाटत नाही. शास्त्रिय गायक ओरडून गात नाहीत.
18 Oct 2016 - 4:11 pm | बाजीप्रभू
२००३ साली अमेरिकेच्या कुठल्यातरी इनॉग्रेशन डेच्या दिवशी गायिका बेयोँसे आणि तिचा वाद्यवृंद नाटक करतांना रेड हँडेड पकडला गेला होता. लोकांनी आणि मीडियाने खूप "पिसं" काढली, माफी मागायला लावली.
ओबामाभाऊ सुद्धा रेड हँडेड पकडला गेला होता एकदा. हा पहा व्हिडीओ,
Obama
18 Oct 2016 - 4:38 pm | तुषार काळभोर
भारतातले सर्व गायन-रियालिटी-शोजचे ग्राण्ड फिनाले - महाअंतिम फेर्या - या रेकॉर्डेडच असतात.
18 Oct 2016 - 4:54 pm | मराठी_माणूस
याच्यापेक्षा पुर्वीचे ते मेलडी मेकर्स सारखे ऑर्केस्ट्रॉ चांगले म्हणायचे, जे काय सादर होत असे ते १००% लाईव्ह.
गेले ते दिन गेले.
18 Oct 2016 - 4:56 pm | कंजूस
गायक तुमच्यासमोर तीन तास आले,कार्यक्रम सादर केला आणखी काय पाहिजे?
हीच गोष्ट शाळाकॅालेजच्या शिक्षणाची आहेच. तुम्ही चांगल्या संस्थेत पैसे खल्च करून मुलांना पाठवता मग आखी दहापट फी क्लासची का भरता? तुमची मुलं तुम्हाला फसवतातच ना?
18 Oct 2016 - 5:06 pm | खेडूत
तसे नव्हे. ही तुलना पटली नाही.
गायक तुमच्यासाठी गायला येतोय म्हणून हजार रूपये तिकीट काढून आपण जातो. गाणे शंभर टक्के ' मूळ आहे तसेच' ऐकण्याची अपेक्षा नसतेच. तान्त्रिक/ नैसर्गिक मर्यादा येत असतील तर तसे स्पष्ट सांगावे, हरकत असायचे कारण नाही.
शंकर महादेवन, शौनक अभिषेकी किंवा राहुल देशपांडे यांची मैफिल ऐकली तर अनेकदा गाणे मूळ गाण्यापेक्षा पूर्ण वेगळेच सादर केले जाते. ते चांगलेही वाटते.
19 Oct 2016 - 3:58 am | कंजूस
हवा येऊ द्या कार्यक्रमात बरीच गाणीे तरी माइक सिस्टिम स्थानिकच असते ती मंत्र्यांच्या भाषणात वापरतात.
18 Oct 2016 - 5:23 pm | पद्मावति
जर प्री रेकॉर्डेड ट्रॅक वर ही मंडळी लीप सिंक करत असतील तरीही हरकत नाही. फक्त मग त्याला लाईव शो म्हणू नये इतकेच मला वाटते. बाकी कॉन्सर्ट मधे प्रचंड ऑडियेन्स मधे खर्या गाण्याचा बहुतेक आवाजही नीट पोहोचणार नाही आणि लाईव शो मधे गायकाच्या किंवा वाद्यवृंदाच्या चुकीमुळे पूर्ण शोचा विचका होऊ शकतो त्यामुळे हे प्री रेकॉर्डेड प्रकार सुरू झाले असावेत. ते ठीकच आहे पण मग ते स्पष्टपणे सांगावे.
19 Oct 2016 - 5:50 pm | हृषीकेश पालोदकर
अगदी बरोबर
18 Oct 2016 - 5:36 pm | रेवती
१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का?
उत्तर- हो, हा प्रकार होतो असेच फार्फार वर्षांपूर्वीच ऐकले होते. आपण त्याची सवय करायला नको, या कार्य्क्रमान्ला जाऊ नये असे मला वाटते.
२. अन्य कलाकार असेच करत असतात का?
उत्तर- तसे ऐकले तरी आहे. शिवाय या धाग्यानिमित्ताने जर एखादा तूनळीवरील लाईव्ह शोचा व्हिडिओ पाहिलात तर आवडण्यासारखे काही दिसत नाही.
३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का?
उत्तर- अजय अतुल काय किंवा कोणी दुसरे काय, मर्यादा प्रत्येकालाच असतात. जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमातील एक गाणे ऐकण्यात आले, त्यातील संगीत लक्षपूर्वक ऐकले तर सैराटमधील एका गाण्याची आठवण यावी असे आहे.
४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही?
उत्तर- ही बातमी होती हे माहित नसल्याने पास.
५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते?
उत्तर- माहित नाही. तरी संगीत चांगले झाले असल्यास ठीक आहे असे म्हणावे लागेल.
६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का?
उत्तर- असे केले हे माहित नव्हते पण केले असल्यास चुकीचे आहे तरी मित्र मित्रांना सांभाळून घेतायत असे म्हणावे लागेल, फक्त सांभाळून घेण्याचा मार्ग प्रेक्षकांच्या खिश्यातून जातोय.
७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का?
उत्तर- तिकिटांचे पैसे परत मागता यावेत असे वाटते.
18 Oct 2016 - 7:37 pm | फेरफटका
हा प्रकार नवीन नाही. माझा एक अनुभव म्हणजे १९९९ साली ३१ डिसेंबर चा एक शो आम्ही परगावी एका रिसॉर्ट मधे केला होता. तेव्हा गायक / निवेदक जरी लाईव्ह गात असले, तरी सगळं संगीत हे ट्रॅक वर होतं आणी मागे ठेवलेल्या वाद्यांवर बसलेले वादक 'अभिनय' करत होते. ह्या प्रकाराचं आश्चर्य वाटावं ईतका हा प्रकार नवीन नक्कीच नाहीये. उघड्या मैदानात, प्रेक्षकांच्या जल्लोशात, नाचताना वगैरे गाण्याचे सूर संभाळता येतील हे खूप अवघड आहे. इच्छूकांनी चालत चालत गाणं गुणगुणून बघावं.
18 Oct 2016 - 8:19 pm | शब्दबम्बाळ
बऱ्याचदा तांत्रिक कारणामुळे(स्पीकर अथवा माईक खराब) लाईव्ह कार्यक्रम खराब होऊ शकतो. त्यातल्या त्यात तो कार्यक्रम संगीताचा असला कि जास्तच काळजी! लोक भरमसाठ किमतीची तिकिटे काढून येतात त्यांना दोषरहित आणि खिळवून ठेवणारा अनुभव देण्यासाठी लिपसिंक केले जात असावे.
13-14 वर्षांपूर्वी शाळेत असताना नाटक सादर करताना आम्हीही हि गोष्ट केली होती. शाळेमध्ये मिळणारे माईक कायम मधेच खराब व्हायचे किंवा किssssss कुssss असले चित्र विचित्र आवाज काढायचे ज्याने सादरीकरणातली सगळी मजा निघून जायची. हे टाळण्यासाठी आम्ही आख्खे नाटक कॅसेटवर रेकॉर्ड केले. हे करण्यामागे प्रेक्षकांना चांगले सादरीकरण पाहाता यावे हाच हेतू होता आणि रेकॉर्डिंग वर लीपसिंक करायला सुद्धा खूप मेहनत लागली होती!
मग इथे जर यांनी पूर्ण गाणी लिपसिंक केली (असतील) तर त्यामागे देखील मेहनत असणारच आहे...
अरिजित सिंग ने सादर केलेला रेडिओ मिरची अवॉर्ड मधला परफॉर्मन्स खूप छान आहे! त्याचा ऑडिओ जवळपास रोज ऐकतो. पण त्या कार्यक्रमात देखील त्याने लिपसिंक केले होते! :)
गाण्याची लिंक, 3:33 मिनिट च्या इथे पहा, गाण्यात 'हलकासा' शब्द आहे पण तो 'थोडासा' असे बोलतो! ;)
18 Oct 2016 - 8:21 pm | संदीप डांगे
खरं तर बोलण्यासारखं काहीच नाही आणि खूप काही आहेही, अनेकांनी इथे मांडले आहेसुद्धा,
Live concert हे फक्त शास्त्रीय संगीत व रॉक यांचीच टिकेट काढून बघायला जावी, बाकी सगळा काळाबाजार आहे!
पूर्वमुद्रित रेकॉर्डवर गाणारे लोक ज्या कॉन्सर्ट सादर करतात त्यात गाणे ऐकण्यापेक्षा गाणारे, जे सेलिब्रिटी आहेत त्यांना गाताना बघायला जाणे जास्त महत्वाचे असते, कोणी दुकानाची फीत कापायला येणे आणि हि गाणी ऐकायला जाणे यात फार फरक नाही. सेलेब्रिटी प्रत्यक्ष बघायला मिळणे हेच फलित, बाकी काही नाही,
तसेच जे काही लोक्स पैसे लुबाडल्याबद्दल कुरबुर करतायत ते लोक ते ऐकत असलेले प्रत्येक गाणे, बघत असलेला प्रत्येक चित्रपट विकत घेऊन ऐकत/बघत असतील तर माझा त्यांच्या फसवल्या गेल्याच्या भावनेला बिनशर्त पाठिंबा आहे. अन्यथा ह्या कलाकारांच्या कलाकृती फुकट उपभोगायच्या आणि त्यांनी फसवले कि बोंबाबोंब करायची हा शुद्ध दांभिकपणा आहे. ;)
18 Oct 2016 - 9:47 pm | हुप्प्या
एका चुकीचे समर्थन करण्याकरता दुसर्या चुकीकडे बोट दाखवणे काही पटत नाही. काही लोक फुकट डिव्हीडी, व्हिडियो बघतात म्हणून लाइव्ह कन्सर्ट मधे गाणे म्हणण्याचे नाटक करणे न्याय्य ठरते हे काही पटत नाही. सगळे कॉन्सर्टला आलेले तमाम प्रेक्षक हे फुकट डीव्हीडी वालेच होते ह्याला काय पुरावा?
18 Oct 2016 - 10:09 pm | संदीप डांगे
नीट वाचा हो, 'तमाम प्रेक्षक' हे शब्द मी वापरले नाहीत,
18 Oct 2016 - 10:17 pm | हुप्प्या
जर सगळे प्रेक्षक बेकायदा गाणी ऐकणारे आहेत असा काही पुरावा असता तर सरसकटीकरण कदाचित (होय, कदाचितच) योग्य ठरले असते. पण तसे काही नसले तर तो मुद्द पूर्ण गैरलागू आहे.
तिकिट काढून आलेल्या ग्राहकाला पूर्ण माहिती न देता असा प्रकार करणे हे चूकच. मग तक्रार करणारे गिर्हाईक हे आदर्श नागरिक आहे का, त्याने वा तिने कधी कुठला कायदा मोडला आहे का असा उलटा कांगावा करणे चूक आहे. अशा प्रकारचा आदर्श नागरिक नसेल तर त्याला वा तिला अशी तक्रार करण्याचा हक्कच नाही वगैरे म्हणणे पूर्णपणे गैरलागू आहे.
19 Oct 2016 - 12:19 am | संदीप डांगे
परत तेच?
मी कुठे सरसकटीकरण केले ते दाखवाल काय?
19 Oct 2016 - 12:23 am | संदीप डांगे
तसेच सगळे प्रेक्षक बेकायदा गाणी ऐकणारे नाहीतच ह्याचाही काय पुरावा आहे?
माझे विधान कोणतेही प्रामाणिक प्रेक्षक उगाच अंगावर घेणार नाहीत, पण चोराच्या मनात चांदणे असेल तर नाईलाज आहे.
19 Oct 2016 - 7:15 am | हुप्प्या
प्रेक्षकांच्या ग्राहक म्हणून हक्काचा हा प्रश्न आहे. ज्यांनी तिकिटे काढून हा शो पाहिला त्यांची फसवणूक झाली आहे का हाच चर्चेचा मुद्दा आहे.
आता त्याला प्रेक्षक स्वत: किती प्रामाणिक आहेत वगैरे फाटे फोडणे हे साफ गैरलागू आहे. काही मोजके वा बरेच वा सगळेच प्रेक्षक कधी ना कधी वा कधीतरी बेकायदा सिनेमे बघत वा बेकायदा गाणी ऐकत असतील का ह्या मुद्द्याचा प्रस्तुत चर्चेशी काहीही संबंध नाही. उपस्थित प्रेक्षकांपैकी ज्यांना आपली फसवणूक झाली असे वाटते आहे त्यांना त्याची तक्रार करण्याचा हक्क आहे.
एखादा फसवणूक झाली म्हणून तक्रार घेऊन आला तर तू कधी बिनातिकिट प्रवास केला असशील तर तुला फसवणुकीची तक्रार दाखल करायचा हक्कच नाही असे म्हणण्यासारखे आहे. केवळ आदर्श, कधीही कायदा न मोडलेल्या स्त्री वा पुरुषालाच फसवणुकीची तक्रार करण्याचा हक्क आहे असे म्हणणे हे आततायीपणाचे आणि चूक आहे.
जाता जाता: मी आजपर्यंत असले कन्सर्ट कधी पाहिले नाहीत आणि भविष्यात पाहीन असे वाटत नाही त्यामुळे चोराच्या मनात चांदणे वगैरे वैयक्तिक आरोपांचे आणखी नवीन फाटे फोडू नये. मुख्य मुद्द्यावरच रहावे ही विनंती.
19 Oct 2016 - 7:55 am | संदीप डांगे
माझा काय मुद्दा होता हे तुम्ही नीट समजून घेतला नाही तेव्हा असो.
बाकी आता फसवणुकीची तक्रार दाखल करण्याबद्दल, तर कायदेशिरपणे तसे कोणीही करू शकतो, ग्राहक म्हणून प्रत्येकाचा तो हक्क आहे, माझा मुद्दा नैतिकतेबद्दल होता, कायदेशीर बद्दल नाही, तो मुद्दा वेगळा. कोर्टात ही फसवणूक सिद्ध करणे अवघड आहे त्यामुळे असो. अजय अतुलवर बहिष्कार घालत असतील तरी माझं काही वाया जात नाही.. ;)
आपण सिग्नल मोडायचा पण तोच दुसर्याने मोडला कि बोंबाबोंब करायची यात तुमच्या मते काही गैर नसेल तर ठीक आहे,असो.
तरीही मी सर्वांच्या सर्वच प्रेक्षक अगदी तस्सेच दांभिक असतात असं कुठेही कधीही म्हटले नाही - फक्त एक दृष्टिकोन दिला, विनाकारण माझ्या मुद्द्याला गैरलागू म्हणण्याची गरज नव्हती, नसलेले शब्द माझ्या तोंडी कोंबण्याची गरज नव्हती, तेव्हा तेही असोच.
चर्चेबद्दल धन्यवाद!
21 Oct 2016 - 1:25 pm | भालचंद्र_पराडकर
तसेच जे काही लोक्स पैसे लुबाडल्याबद्दल कुरबुर करतायत ते लोक ते ऐकत असलेले प्रत्येक गाणे, बघत असलेला प्रत्येक चित्रपट विकत घेऊन ऐकत/बघत असतील तर माझा त्यांच्या फसवल्या गेल्याच्या भावनेला बिनशर्त पाठिंबा आहे. अन्यथा ह्या कलाकारांच्या कलाकृती फुकट उपभोगायच्या आणि त्यांनी फसवले कि बोंबाबोंब करायची हा शुद्ध दांभिकपणा आहे. ;) ही पण बाजू मान्य
22 Oct 2016 - 5:29 am | हुप्प्या
-- आपण सिग्नल मोडायचा पण तोच दुसर्याने मोडला कि बोंबाबोंब करायची यात तुमच्या मते काही गैर नसेल तर ठीक आहे,असो.
इथे जे दोन गुन्हे आपण एकाच पारड्यात तोलत आहात ते एकसारखे नाहीत.
एका बाजूला काही कलाकारांनी आपले नाव वापरुन हजारो प्रेक्षकांना लाईव्ह शोची तिकिटे विकली आहेत. आणि प्रत्यक्षात शो लाईव्ह नव्हताच.
दुसर्या बाजूला काही प्रेक्षकांनी कधीतरी फुकट वा स्वस्तात बेकायदा पद्धतीने गाणी ऐकली असतील असा आपला दावा.
हे दोन पूर्ण दोन वेगळे गुन्हे आहेत. वेगळ्या पातळीवरचे गुन्हे आहेत. दोन्ही गुन्ह्यांकरता वेगळ्या शिक्षा आहेत.
ह्यातला दोन नंबरचा गुन्हा ज्यांनी केला आहे त्यांना एक नंबरच्या गुन्ह्याबद्दल दाद मागायचा हक्क नाही हा आपला तर्क साफ चुकीचा आहे. त्याला कायदेशीर वा नैतिक आधार मलातरी आढळलेला नाही.
बेकायदा गाणी ऐकणे वा पहाणे हा एक स्वतंत्र विषय आहे. तोही अत्यंत किचकट विषय आहे. लाईव्ह शो बाबतच्या फसवणूकीचा मुद्द्दा चर्चेत असतना तो उकरुन काढण्याचे प्रयोजन समजले नाही.
22 Oct 2016 - 9:07 am | संदीप डांगे
ओके, फाईन. असो!
18 Oct 2016 - 8:42 pm | रॉजरमूर
शकिरा .........
शकिरा ने ही 2006 मध्ये जर्मनीत त झालेल्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या उदघाटनाला हाच प्रकार केला होता .
त्यावेळेस तिने "हीप्स डोन्ट लाय " या गाण्याचे "बाम्बो" हे रिमिक्स व्हर्शन गायले होते .
त्या प्रचंड स्टेडियम मध्ये प्रेक्षकांच्या कोलाहलात हा परफॉर्मन्स तिने दिला होता .
व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसतंय की ती ओठ हलवतेय आणि वादक नाटक करताहेत .
बाम्बो
18 Oct 2016 - 9:01 pm | अविनाशकुलकर्णी
अजय अतुल मधल्या अजय चा जबडा जबरी आहे..गायला लागला की कळते..
असे वाटते ्की हा कुणाला तरी गीळणार
18 Oct 2016 - 10:10 pm | खटपट्या
हे भारी निरीक्षण आहे. यासाठी तुम्हाला सलाम. व्यंगचित्रकार असेच काही शोधत असतात... :)
21 Oct 2016 - 2:45 pm | मार्मिक गोडसे
मागे एका कार्यक्रमात वैभव मांगलेंनी अजयच्या जबड्याची हुबेहूब नक्कल केली होती.
18 Oct 2016 - 9:50 pm | हुप्प्या
काही लोकांना असे नकली कन्सर्ट करण्यात वावगे वाटत नाही असे दिसते आहे. ग्राहकाला ह्याची माहिती असावी म्हणून कन्सर्टच्या जाहिरातीत निदान बारीक अक्षरात तळटीप असावी की सर्व गाणी ही प्रत्यक्ष गायलेली असतीलच असे नाही. काही गाणी पार्श्वसंगीताच्या स्वरूपात सादर होतील. अशी माहिती आधीच दिलेली असेल तर ग्राहक तशी अपेक्षा ठेवूनच जातील आणि असा अपेक्षाभंग होणार नाही.
व्यक्तिशः मला तरी असा प्रकार आवडत नाही. भरपूर पैसे देऊन अशा प्रकारचे शो बघण्याची माझी तरी इच्छा नाही. ज्यांना हा प्रकार रुचतो त्यांनी तो जरुर पहावा.
19 Oct 2016 - 9:42 am | बोका-ए-आझम
१. अजय-अतुल यांनी अल्पावधीत मिळवलेल्या यशामुळे वैतागलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी ही बातमी तिखट-मीठ लावलेल्या स्वरूपात छापून आणलेली असण्याची दाट शक्यता आहे. या इंडस्ट्रीत अशा गोष्टी होत असतातच.
२. अजय-अतुल जे lip sync करत होते ते त्यांच्या स्वतःच्याच गाण्यांचे ट्रॅक्स होते. इतर कोणाच्या गाण्यांचे नाहीत. म्हणजे मूळ मेहनत तर त्यांनी केलेली आहे.
३. प्रेक्षकांच्या फसवणूकीचा जो मुद्दा आहे - प्रेक्षकांची गाणं live ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती का? तसं असेल तर फसवणूक झाली असं म्हणू शकतो. पण जर तसं नसेल तर मग काय फरक पडतो? उद्या एखादा गायक live गातो म्हणून लोक जातील का? ते अजय-अतुल यांच्या नावामुळे जातील. मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो?
४. शास्त्रीय संगीत ऐकायला जाणारे श्रोते अाणि अजय-अतुल किंवा इतर कोणाच्याही concerts ऐकायला जाणारे प्रेक्षक यांच्यात फरक आहे. अशा concerts मध्ये प्रचंड गोंगाट असतो. एखाद्या गायकाने live गाणं म्हणणं हे त्याच्यासाठी त्याची कारकीर्द नष्ट करु शकतं. त्याचा आवाज पूर्णपणे निकामी होऊ शकतो. असं झालं तर प्रेक्षक त्याची जबाबदारी घेतील का?
५. स्टार्स appearance money म्हणून आयोजकांकडून पैसे घेतात. अजय-अतुल आज लोकप्रिय आहेत. आयोजक त्याच लोकप्रियतेचा फायदा उठवत आहेत. परत तोच मुद्दा येतो. उद्या एखादा गायक live गातो म्हणून लोक जातील का? ते अजय-अतुल यांच्या नावामुळे जातील. मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो?
19 Oct 2016 - 10:08 am | खेडूत
त्यांना कोण आहेत म्हणे प्रतिस्पर्धी?
बिचारे निलेश मोहरीर/ सलील कुलकर्णी/ अवधूत (!) वगैरे हे आपापले मर्यादित स्थान टिकवून आहेत.
तसंच आहे, आणि असतं.
अन्यत्र प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लाईव्ह गाताना सूर हलले तरी लोक समजून घेतीलच. आवाज खराब व्हायचं काही कारण नाही, अति हळू आवाजात गायले तरी ११० डेसिबल्सला असह्य आवाज येतो!
लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात. त्यांनी तसे सांगितले तर निम्मी तिकीटेही संपणार नाहीत. कदाचित या भीतीनेच तिकीटाचे दरही खूप जास्त ठेवतात. अन्यथा प्रायोजक आणि दूरचित्रवाहिन्यांचे हक्क विकूनही इतके महाग तिकीट का असावे? या साखळीत सगळेजण प्रामाणिकपणे कर भरत असतील तर ती एक आनंदाची बाब असेल.
आता तुमचे स्पष्टीकरण मान्य करावे तर दुसरा प्रश्न येतो, की हे अजय-अतुल का बोलत नाहीत? ते तर सारवा सारव करताना दिसतायत.
19 Oct 2016 - 10:26 am | विशुमित
प्रचंड सहमत...
अगदी सेम विचार होते पण शब्द बद्द करता येत नव्हते..
19 Oct 2016 - 10:26 am | बोका-ए-आझम
हिंदीत आहेत. मराठी कलाकारांविषयी हिंदी चित्रपटसृष्टीत आकस आहे ही वस्तुस्थिती आहे. अाणि त्यांचे मराठीतले प्रतिस्पर्धी असं करणार नाहीत असं तुम्हाला वाटतं का? सारेगम च्या एका भागात अजय-अतुल पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा नटरंग चं संगीत गाजत होतं. त्यांचं कौतुक होत असताना जज सलील कुलकर्णींचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
एवढी ठाम खात्री असेल तर विषयच खुंटला.
लोक enjoy करायला जातात. Live मुळे track पेक्षा जास्त मनोरंजन होतं असा विदा असल्यास द्यावा.
जागेचं भाडं आणि करमणूक कर.
तो त्यांचा मूर्खपणा/चांगुलपणा आहे. त्यांना एखादी गोष्ट चूक वाटू शकते. म्हणजे ती असेलच असं नाही. कितीतरी वेळा लोक न केलेल्या चुकांची क्षमा मागतात.
19 Oct 2016 - 11:24 am | विशुमित
<<<लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात.
लोक enjoy करायला जातात. Live मुळे track पेक्षा जास्त मनोरंजन होतं असा विदा असल्यास द्यावा.
--- तिकीट काढून क्रिकेट म्याच पाहायला कोण जातं? फक्त एन्जॉयमेंटच असते ती.
जे बुद्धिजीवी असतात ते एकतर शास्त्रीय आणि सुगम संगीत ऐकायला जातील नाहीतर घरात बसतील. असल्या शो मध्ये जाणार नाहीत.
19 Oct 2016 - 11:07 am | भाते
एका वेळी सलग १४ गाणी प्रत्यक्ष म्हणणे अशक्य आहे. पूर्वी मी टीव्हीवर एमजेच्या कॉन्सर्टस बघायचो त्यावेळी मला हाच प्रश्न पडायचा. सलग २ तास इतकी सगळी गाणी म्हणणे कसे शक्य आहे? मग लक्षात आले कि तो काही मोजकी गाणी प्रत्यक्ष गातो आणि बाकीची सगळी लिपसिंकिंग असतात.
तीन महिन्यांपूर्वी डोंबिवलीत मुग्धा वैशंपायनच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तीन तासाच्या कार्यक्रमात तिने दोन राग आणि चार गाणी म्हणाली. पण मध्ये गप्पा/मुलाखत आणि मध्ये गाणी असा कायर्क्रम असल्याने ते शक्य झाले.
इथे तर बऱ्याच कलावंतांनी त्याचे समर्थन केले आहे.
19 Oct 2016 - 11:21 am | संदीप डांगे
बोका शेठ, तुमच्याशी सहमत आहे
19 Oct 2016 - 11:34 am | हृषीकेश पालोदकर
सर्व जाहीर कार्यक्रम असेच असतात कि काय ?
19 Oct 2016 - 11:46 am | दिलीप सावंत
मराठीमधील सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात असे पण होऊ शकते असे मला वाटले नव्हते. याला तिथले व्यवस्थापक जबाबदार आहेत असे मला वाटते.
19 Oct 2016 - 2:44 pm | प्रदीप
प्रथम लेखातील काही प्रश्नांना माझी उत्तरे:
१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का?
उ: नेहेमीच हे होते किंवा नाही, ह्याविषयी माहिती नाही. इथे तरी झाले असे दिसते.
२. अन्य कलाकार असेच करत असतात का?
उ: ठाऊक नाही. खरे तर अगदी व्यवस्थित माहिती असल्याशिवाय एकाद्या कलाकाराच्या अशा शोविषयी काहीही सांगणे चुकीचे आहे. सौरा ह्यांनी अगदी लता, आशा ह्या तसे करत आसल्याचे कुठेतरी वाचले आहे, असे लिहील आहे. तर त्याचा दुवा असल्यास द्यावा. मी स्वतः आमच्या शहरात लताचा शो १९९५ साली पाहिला, आशाचा अलिकडे सुमारे ५ वर्षांपूर्वी पाहिला. ह्या दोन्ही शोंचे (वेगवेगळे) आयोजक अथवा त्यात बॅकस्टेजशी संबंधित व्यक्ति माझ्या ओळखीच्या असल्याने मी हे ठामपणे येथे सांगू शकतो, की त्या दोन्ही शोजमधे असे काही केले गेले नाही.
वास्तविक काराओकी मोडमधे गाणे त्या दोघींना नवे आहे, अपरिचीत नच्व्हे, कारण अलिकडील बहुतेक सर्वच रेकॉर्डिंग्सही जवळजवळ तशीच करावी लागतात आणि त्या दोघींनीही ते व्यवस्थित केलेलेही आहे. पण हे त्यांचे 'नेटिव्ह मोड' नव्हे. तसेच लता १९७४ पासून नियमित रूपाने असे शोज करते आहे. त्या अगोदर अधूनमधून काही ना काही निमीत्ताने असे शोज व्ह्यायचे (युद्धे, फिल्मफेयर अॅवॉर्ड्स वगैरे). ह्या सर्व वेळी आताचे टेक्निक उपलब्ध नव्हते. सर्व शोज त्यावेळी लाईव्हच व्हायचे. ते त्यांना जास्त जवळचे वाटावे- तेव्हा आणि आताही.
३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का?
उ: असे नसावे. दोन्ही गोष्टी एकाचवेळी करता येतात की!
५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते?
उ: ह्या प्रश्नाला काय म्हणावे? चित्रपट हा व्यवसाय आहे. त्याच्या रेकॉर्डींगचा खर्च प्रोड्यूसर करतो, त्यावेळी तो त्यातील रीटर्न्सवर लक्ष ठेऊनच करतो. समजा अगादी अजय- अतुल ह्यांनी तो खर्च स्वतः केला, तरी तेव्हा त्यांनी त्याच्या रीटर्न्सवर लक्ष ठेवले असेलच. म्हणजे काही व्यावसायिक आडाखे कुणीतरी (प्रोड्यूसर अथवा संगीतकार) ह्यांनी बांधले, ते रीस्क त्यांनी घेतले. त्त्याबद्दल त्याची गरज होती किंवा नाही ह्याची उठाठेव आपणास कशाला असावी?
६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का?
उ: ते त्या शोचे एमसी असतील तर तशी सारसारव करणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग होता. वेळप्रसंग मारून नेणे हे त्या व्यक्तिपेक्षा इतर कुणीही ऑन- द- स्पॉट करेल असे वाटत नाही. तेव्हा उत्तर 'हो' असे आहे.
७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का?
उ: एका अर्थी ही फसवणूक आहे. पण असा डिस्क्लेमर कुणीही देणार नाही. झालेल्या प्रसंगाची आता भरपूर शोभा माध्यमांतून झाल्याने प्रेक्षकांनी सजग व्ह्यावे!
आता इतर काही टिपण्णी:
मायनस ट्रॅकः हा काराओकीसाठी वापरतात तसा ट्रॅक. म्हणजे त्यात सर्व ऑर्केस्ट्रेशन व पर्क्युजन असते, फक्त गाणार्यांचे आवाज नसतात. तेव्हा काराओकीप्रमाणे, गायकांना त्या ट्रॅकवर गावे लागते. हा ट्रॅक अगोदर तयार केलेला असतो. मूळ रेकॉर्डिंगमधे आवश्यक तसे मल्टि- ट्रॅक्स असतील-- जसे ते अलिकडच्या सर्वच रेकॉर्डिंग्जमधे असतात- तर तांत्रिकदृष्ट्या, अशा रेकॉर्डिंगवरून मायनस ट्रॅक करणे अगदी सोपे आहे. जेव्हा मूळ रेकॉर्डिंगमधे हवे तसे मल्टी- ट्रॅक्स उपलब्ध नाहीत, तिथे (म्हणजे पूर्वीच्या सगळ्याच गाण्यांच्या रेकोर्डिंग्ज), अलिकडे सहज व स्वस्तात उपलब्ध असलेली काही सॉफ्टवेयर अॅप्लिकेशन्स वापरून असा ट्रॅक तयार करणे शक्य आहे.
असे का करत असावेत? - तर तुम्हाला काही भव्यदिव्य दाखवायचे आहे, म्हणजे १५ - २० व्हायोलिन्स, अॅकॉर्डियन,,फ्लूट्स, सगळी पर्क्यूजन वाद्ये, ऑक्टोपॅड, सिंथेसायजर्स, सॅक्स इत्यादी-- तर ते तसेच्या तसे अॅकॉस्टिक्स फारसे नसलेल्या हॉलमधे, अथवा उघड्या प्रेक्षागृहात- व्यवस्थित प्रत्यक्ष वाजवून त्यांचा उचित मिक्स करून ते प्रेक्षकांपुढे पोहोचवणे, अतिशय जिकीरीचे आहे. ह्यात बरेच रिस्क आहे, मुळात इतके फॅक्टर्स आहेत (जसे वादकांना उपलब्ध असलेली जागा, त्यांची एकमेकांशी असलेली प्रॉक्झिमीटी, त्यांना मिळणारा 'फोल्डबॅक साऊंड', गायका- वादकांचे त्यांच्या माईक्सच्या समोरून हलणे इत्यादी ) की थोड्या वेळात हे सगळे तिथे मांडून, त्याची टेस्ट घेऊन, मग ते रीतसर कसलाही प्रॉब्लेम न येता (फीडबॅक-- जो 'कुंई.... ' असा आवाज कधीतरी येतो तो, एकाद्या वाद्याचा आवाजच येतो आहे, येत नाही...) प्रत्यक्ष सादर करणे जवळजवळ अवघड आहे. त्यासाठी अतिशय काटेकोर प्लॅनिंग करावे लागेल, सादरीकरण जिथे करायचे आहे, तेथील परिस्थिती लक्षात घेऊन त्यात आवश्यक ते फेरबदल करावे लागतील, ह्यात बराच वेळ व पैसा खर्चावा लागेल. इतके सगळे करण्यापेक्षा काराओकीचा मार्ग तुलनेने बराच सोपा. त्यात गाणेही प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचते, आणि ते सगळे दिसतेही भव्य- दिव्य.
अजय अतुल ह्यांनी मटाच्या खुलाशाच्या बातमीत 'लाईव्ह कन्सर्टमधे बॅकग्राऊंडचा टेंपो कमीजास्त होत असतो म्हणून असे करावे लागते' असे म्हटले आहे, ते मलातरी अगम्य वाटते! तुम्ही लाईव्ह गाता आहात, सर्व म्युझिकही लाईव्हच आहे, मग टेंपो कमीजास्त झालाच तर प्रॉब्लेम काय आहे? हे काही पटत नाही. ही सारवासारव तर नव्हे?
अशा तर्हेच्या सर्वच ऑर्केस्ट्रांच्या कार्यक्रमांतून हे असेच केले जाते का? मी अलिकडे यू- ट्यूबवर अनेक जुन्या हिंदी चित्रपट गीतांचे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम पहात आहे. हे सर्व त्या त्या ऑर्केस्ट्राच्या चालक- मालकांनीच अपलोड केलेले आहेत, तेव्हा त्यात काही खोटे- चूक नसावे. माझे ह्यांविषयीचे एक सर्वसाधारण निरीक्षण असे आहे की, जिथे अगदी थोडी वाद्ये आहेत-- एक सिंथ, एक फ्ल्यूट, एकादी सतार, थोडे पर्क्त्या, थोडक्यात जिथे १५ ~ २० व्हायोलिन्स, चेल्लो, सॅक्स वगैरे नाहीत-- तिथे ते कार्यक्रम संपूर्ण लाईव्ह पेश केले गेले. हा माझा ढोबळ अंदाज आहे. आणि कुणास ह्याची काही उदाहरणे पहायची असतील तर माझ्याशी खरडीतून संपर्क साधावा, काही दुवे देता येतील.
19 Oct 2016 - 3:29 pm | खेडूत
सहमत. मला काय म्हणायचे ते आपण नेमके आणि सविस्तर लिहीलेत.
गेल्या वीस वर्षांत अनेक लाईव्ह कार्यक्रम पाहिले-ऐकले. आशाताईंचा 'नक्षत्रांचे देणे' हा त्यात सर्वांत आवडलेला कार्यक्रम! १९९३ च्या काळात मर्यादित तन्त्राच्या मदतीने किती सुंदर कार्यक्रम करायच्या त्या. अल्बर्ट हॉलचा लतादीदींचा कार्यक्रम आजही ऐकावासा वाटतो.
पुढे बर्लिन, स्टुट्गार्ट, लिवरपूल आणि पुण्यात अजय-अतुल, शंकर महादेवन हे सगळे कार्यक्रम पहायला मिळाले, आणि आवडलेही. मात्र इतकय सराईतपणे अलिकडे ट्रॅक वापरत असतात हे नवीनच होते, म्हणून धक्का बसला इतकेच.
व्यवसाय कुणी कसा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला असे कार्यक्रम आवडणार नाहीत हे निश्चित.
बाकी स्टुडिओची उठाठेव उत्सुकतेपोटी केली, कारण एकच गाणे कुठले ते वेगळे-विशेष असे कळले नाही, थेटरात बसूनही.
मकरंद अनासपुरेंचे सामाजिक कामात योगदान आणि संवेदनशीलता पाहून तो प्रश्न पडला. अन्य कलाकार असता तर वाटले नसते. स्वतः अनासपुरेंनाही ते करताना वाईट वाटलेच असेल.
निव्वळ एंजॉय करायला जाणार्यांनी तसे जावेच. नको कोण म्हणतंय! आम्हाला फरक पडतो इतकेच.
19 Oct 2016 - 7:20 pm | प्रदीप
मलाही बसला. ह्या प्रोग्राम्समधे असे वाजवले जाते हे मला माहिती नव्हते.
बाकी स्टुडिओची उठाठेव उत्सुकतेपोटी केली, कारण एकच गाणे कुठले ते वेगळे-विशेष असे कळले नाही, थेटरात बसूनही. म्हणजे त्यांच्या त्या प्रचंड खर्चाचे जस्टिफिकेशन झालेले दिसत नाही. मी 'उठाठेव' वगैरे कडक शब्द वापरल्याबद्दल मात्र माफी मागतो, राहवले नाही म्हणून तसे लिहून गेलो.
निव्वळ एंजॉय करायला जाणार्यांनी तसे जावेच. नको कोण म्हणतंय! आम्हाला फरक पडतो इतकेच. १००% सहमत. फरक मलाही पडलाच आहे.
19 Oct 2016 - 5:47 pm | मराठी_माणूस
मीही आशा, लता ही नावे वाचुन माझ्या वरच्या एका प्रतिसादात संदर्भ मागीतला आहे. कारण पुर्वी हे तंत्र जेंव्हा उपलब्ध नव्हते तेंव्हा ही असे लाइव्ह कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत.
19 Oct 2016 - 6:27 pm | पुंबा
मी असे फेबूवर, मुकेश माचकर यांनी एका कमेंटमध्ये, आणि बिपीन कुलकर्णी यांच्या याविषयीच्या पोस्ट्वरील कमेंट्समध्ये वाचले आहे. अर्थात माझ्याकडे याचा आणखी काही पुरावा नाही.
19 Oct 2016 - 7:23 pm | मराठी_माणूस
हे दोघे कोण आहेत?
19 Oct 2016 - 7:36 pm | प्रदीप
मराठी दैनिकातील पत्रकार आहेत. दुसरे कोण आहेत, माहिती नाही.
पूर्वी लताचे (आशाचे माहिती नाही, पण,ह्याबाबतीत फरक नसावा) दूरदर्शनवर कार्यक्रम कधीमधी व्ह्यायचे, (मदनमोहन १९७५ साली गेल्यावर तसा एक त्याच्यावरील कार्यक्रम झाला होता, ते मला आठवते) तेव्हा तेथील ध्वनियंत्रणेच्या व अॅकॉस्टिक्सच्या लिमीटेशनमुळे ती गाणी 'फोल्डबॅक' मधे चित्रीत केली गेली, असे मी तेथील काही कर्मचार्यांकडून ऐकले होते. म्हणजे गीत रेकॉर्डींग स्टुडियोत प्रथम ध्वनिमुद्रित केले गेले, व त्याचे चित्रीकरण लिप्सिंक करून केले गेले, असा तो प्रकार. हे असे असेल तर इतरही काही कलकारांच्या बाबतीत तसे केले गेले असण्याची शक्यता आहे. ह्यामागे जाबाबदारी त्या त्या कलाकारांची नव्हे, हे उघड आहे. असो.
19 Oct 2016 - 5:51 pm | दुर्गविहारी
प्लस मायनस ट्रॅक विषयीची हि लिन्क
http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/marathi-singers/articleshow/54916503.cms
19 Oct 2016 - 6:12 pm | माम्लेदारचा पन्खा
गणपतीचा साचा असला म्हणजे झालं....मग हव्या तितक्या मूर्ती...!
19 Oct 2016 - 6:26 pm | सुबोध खरे
केवळ एक तानपुरा आणि एक तबला असला तरी खरा गायक सप्तस्वरांचा स्वर्ग उभा करील.
अन्यथा पन्नास वाद्यांचे कडबोळे करून जगणारे गायक संगीतकार कमी नाहीत
अशा अर्थाचे श्री पु ल देशपान्डे यांचे वाक्य आठवले.
भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांचे "शिवकल्याण राजा" हे गीत आजच (परत) ऐकले. केवळ मागे तानपुरा सोडला तर इतर कोणतेही वाद्य नसताना अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू उभे राहतील इतके भावपूर्ण गायन आहे.(किंवा श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान ऐकून पहा) त्याची आठवण झाली.
19 Oct 2016 - 7:28 pm | प्रदीप
पुल, जीए हे सगळे मला अतिशय माननीय, वंदनीय आहेत, पण म्हणून त्यांची सगळी मते, विधाने मान्य आहेत असे नव्हे. नाहीतर टाईट जीन्स घातलेली स्त्री पाहून ती 'ढुंगणावरचे रूधिराभिसरण' दाखवते आहे, असे मला वाटत रहिले असते.
चित्रपट संगीत व शास्त्रीय अथवा सुगम संगीत ह्यांत काही मूलभूत फरक आहेत. त्यांनुसार त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. हे लक्षात ठेऊन टिका करावी. अन्यथा, माझ्यासारख्या फिल्म संगीत (व तेही ६० - ७० जणांचा, ब्रास, विंड, पर्क्युजन अशांनी नटलेला भरजरी) गाण्यांच्या चाहत्याला 'काय ते तुमचे 'ओ ...' वगैरे अशी टिका करता येणे कठीण नाही. पण हे सगळे विषयाला सोडून झाले.
19 Oct 2016 - 8:31 pm | सुबोध खरे
नाही.
एवढ्या मोठ्या ताफ्यामध्ये गायकाची गरज आहे का ? असे वाटले. कारण तो ही आवाज आता संगणकावर काढता येतो.
आणि इथे लाईव्ह कार्यक्रम काही लोक त्यांच्या "दर्शनासाठी" गेले होते असे वाटत नाही.
बाकी घरात "बोस" किंवा "हर्मन" सारखी उच्च दर्जाची होम थिएटर असणारी मंडळी भारतात कमी नाहीत. हे जर असे "रेकॉर्डेड" (ध्वनिमुद्रित) संगीत ऐकायला कोणी "लाईव्ह" कार्यक्रमाला भरपूर पैसे मोजून जात असतील असे वाटत नाही.
बाकी चालू द्या.
20 Oct 2016 - 7:02 pm | रेवती
अजय अतुलला लाईव्ह बघण्यासाठी जातात वगैरे मान्य नाही. लाईव्ह कार्यक्रमात आणि रेकॉर्डेड कार्यक्रमात वेगळेपणा आहे आणि असायलाच हवा. हे प्रिरेकॉर्डेड असले तरी चालतय वगैरे न्यू नॉर्मल आहे. मुळात तसे नसावे. शास्त्रीय संगिताच्या मैफिली जर लाईव्ह होऊ शकतात तर हे कार्य्क्रम का नाही? शेकडो वादक घेऊन येणे (गरज आहे की नाही माहित नाही) किंवा आकाशातून धरणीवर पडणे, नाहीतर पृथ्वीवरून आकाशात झेप घेऊन गाणे वगैरे अचाट करण्यापेक्षा जी गाणी गायचीयेत ती रेकॉर्डेडपेक्षा वेगळी भासणार आहेत याची कल्पना प्रेक्षकांना असायला पाहिजे. मलातरी लाईव्ह कार्य्क्रम आवडत नाहीत. गाणे ऐकताना गाण्यावर लक्ष देता येत नाही तर झगमगीत कपडे, काहीतरी करामती पहाव्या लागतात. बरं, हे केलं नाही तर कार्यक्रम निरस वाटण्याचा धोका असतो हेही मान्य! परदेशातल्या कुठल्यातशी लाईव्ह शोमध्ये कविता कृष्णमूर्ती हिने इतकी साधी साडी नेसली होती की ते ही बरे वाटत नव्हते (तूनळीवर दिसले). एकंदरीतच विचित्र प्रकरण असतं असं वाटतय.
कलाकारांसाठीही ते फारसं सोयिचं नसावं. एखादे दिवशी घसा बसलेला असला (खासकरून परदेशी बर्फाळ थंडी असताना, जास्त मैफिली करून पिट्टा पडलेला असताना), दमलेला आवाज, वादकांपैकी कोणाची तरी फ्लाईट उशिरा, लवकर येणे वगैरेतून जमवाजमव करायची हे सोपं असेल असं नाही. हिकडे राहूल देशपांडेच्या कार्य्क्रमालाही एकदा उशीर झाला होता (त्या कार्य्क्रमाला मी गेले होते). कारण फार सिरियस नसेल पण उशीर होऊ शकतो.
21 Oct 2016 - 2:57 pm | मार्मिक गोडसे
टाकावाच. त्यामुळे वादकांच्या ताफ्याचा खर्चही वाचेल व कमी दरात लोकांना आपल्या आवडत्या कलाकारांचा 'लाईव्ह' शो बघायला मिळेल.
23 Oct 2016 - 9:08 pm | विजय नरवडे
मी डोंबिवलीत फुले नाट्यगृहात 'पुन्हा सही रे सही ' नाटकाचा रेकॉर्डेड प्रयोग पाहिलेला आहे साधारण वर्षभरापूर्वी.
23 Oct 2016 - 9:26 pm | खेडूत
नाटकाचा ?
तो कसा असतो? म्हणजे पात्रे अभिनय करतच असतील तर बोलत का नाहीत?
23 Oct 2016 - 9:56 pm | विजय नरवडे
त्यांच्या ओठांची हालचाल म्हणजे बोलण्याचा अभिनय आणि येणारा आवाज जुळत नाही.