असेच काहितरी सुचलेले- फोटो.

राजू's picture
राजू in जनातलं, मनातलं
29 Jul 2016 - 6:59 pm

"पप्पा,तुम्ही स्कुल मध्ये जायचे तेंव्हा मोबाईल नव्हते पण kodak camera तर असायचा ना मग तुम्ही त्याने स्कुलचे,स्कुल फ्रेंड्सचे फोटो का काढले नाहीत?"

माझ्या मुलाने हा प्रश्न केला आणि मन भुर्रकन शाळेच्या दिवसात गेले.

दिवाळी,घरातील कोणाचे तरी लग्न,उरूस आणि जून मध्ये सुरु होणारी शाळा अशा मोजक्याच प्रसंगी मिळणारे नविन कपडे त्यात शाळेचा पांढरा शर्ट,खाकी पँट नविन मिळणे हि सुद्धा एकप्रकारे चैनीची गोष्ट होती.

तर वर्षातून दोन-तीनदा मिळणारे कपडे जिथे मुश्किलीने मिळायचे तिथे कॅमेरा कोठून येणार आणि फक्त कॅमेराच नाही तर त्याला लागणारा रोल व त्यानंतर निगेटिव्ह डेव्हलप साठीचा खर्च आवाक्याबाहेरचा होता.

असो मंडळी फोटोची हौस तर खुप दांडगी असे मग ती भागवायची कशी तर कोणाचे तरी लग्न त्यातील साखरपुडा,हळदी असे वेगवेगळे क्षण कॅमेऱ्यात टिपले जायचे आणि तशाच कोणत्यातरी फोटोत आपण असावे म्हणून हळूच गर्दीत कोठेतरी जागा बनवून आपले डोके बाहेर काढायचे म्हणजे फोटोत आपण येणार हे नक्की.

तुम्हीच आपले लहानपण आठवा अशा कितीतरी फोटोमध्ये आपण नक्कीच हा प्रयत्न केला असणार. या पुढील भाग म्हणजे गणेशोत्सव,उरूस,यात्रा-जत्रा वा नवरात्रीमध्ये हौसेने काढलेले ते फोटो म्हणजे एका ओळीत थोरल्या पासून कडेवरच्या धाकट्यापर्यंत क्रमाने सावधान पोजमध्ये उभे असलेले कुटुंबच जास्त दिसेल.

हा जास्तीत जास्त रोमँटिक फोटो म्हणजे विमान,जहाज,कार,बुलेट यावरचे किंवा धबधबा ते हिमालयाचा बॅक ग्राउंड असलेले पेंटिंग समोर काढलेले फोटो आणि त्यातही काही नविन लग्न झालेली जोडपी ताजमहाल नाहीतर बुलेटच्या पेंटींगला प्राधान्य देत असत.

त्यावेळच्या कित्येक मुलांची फोटोची हौस पूर्ण केली ती दहावीच्या आयकार्ड, हॉल तिकिटाने कारण यावर लावायला पासपोर्ट साईज फोटो गरजेचा असल्याने कित्येकांनी आयुष्यात पहिल्यांदा पासपोर्ट साईज फोटो काढले आहेत.

हा...हा...हा..एक फोटोचा प्रकार मात्र राहिलाच हं.

तो म्हणजे पूर्वी घरोघरी दिसणारे ते फ्रेम मधले ब्लॅक अँड व्हाईट फोटो ज्यात एक पालथे पडलेले बाळ जे खुळखुळा ते एखादा बॉल बरोबर खेळत आहे असा काहीसा फोटो असे.

पण त्यापुढेही एक प्रकार असे तो म्हणजे कुरळे केस,डोळ्यात भरलेले काजळ,गालावर काजळाचा टिका कमरेला चांदीची साखळी आणि कानात बाळी पण अंगावर एकही कपडा नसलेले ते गोंडस बाळ हा एक फोटो तुम्ही नक्कीच पाहिला असेल.

मंडळी आजही आपण जर विचार केला तर आपल्या मुलांचे अगदी एक महिन्याचा असतानाचे,रांगताणाचे,पहिल्यादा टाकलेले पावलांचे शाळेच्या गॅदरिंगचे असे कितीतरी फोटो असतील.

पण आपल्या लहानपणचे मात्र असेच कोणाच्यातरी लग्नातले,आजी,मावशी,मामा-मामी,आई-बाबा यापैकी कोणाच्यातरी कडेवर एक लहानमुल आहे आणि ते घरचे सांगत आहेत म्हणून आपण आहोत या विश्वासाचे तर काहीजणांचे मात्र एकदम दहावीच्या परीक्षेसाठी आयुष्यातले पहिले वहिले काढलेले ते पासपोर्ट साईज फोटो याच आपल्या आठवणी आहेत.

वाङ्मयकथामुक्तकभाषाजीवनमानkathaaमौजमजाप्रकटनलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

29 Jul 2016 - 7:28 pm | तुषार काळभोर

१) सहा महिने: फक्त चड्डीवर पालथा पडून (आणि एक किलर स्माईल देऊन ;)
२) १ वर्ष: एका गोलाकार जाळीच्या खूर्चीत बसून
३) अडीच वर्षे : सफारी घालून हाताची घडी घालून

राजू's picture

29 Jul 2016 - 7:57 pm | राजू

मस्तच.

कंजूस's picture

29 Jul 2016 - 8:36 pm | कंजूस

अच्छा फोटोललित आहे.

पद्मावति's picture

29 Jul 2016 - 9:52 pm | पद्मावति

सुंदर लिहिता आहात.
अजुन काही
ग्रॅजुयेशन च्या वेळचा क्लास्सिक--हातात डिग्री घेतलेला उभा आणि शेजारी टेबल, टेबलावर flower पॉट.
लग्न ठरवतांनाचा मुलीचा साडी नेसून.

राजू's picture

29 Jul 2016 - 10:33 pm | राजू

अविस्मरणीय क्षण असतात ते.

राजू's picture

29 Jul 2016 - 10:36 pm | राजू

अविस्मरणीय क्षण असतात ते.

लेखाचा विषय छान आहे. खूप गोष्टी आठवल्या.
छान लिहिले आहे, पण लेख थोडा विस्कळीत आहे असे वाटले. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा!

प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.

सिरुसेरि's picture

30 Jul 2016 - 3:00 pm | सिरुसेरि

छान लिहिले आहे . अजुन काही फोटो म्हणजे "कुणीतरी येणार येणार गं" टाईपचे - डोहाळजेवणाचे , हातात धनुष्यबाण घेतलेले , नावेत , चंद्रावर बसलेले .

बरखा's picture

30 Jul 2016 - 3:45 pm | बरखा

या मधे शाळेत होणारे स्नेह-संमेलनाचे फोटो पण घ्या. भारी यायचे ते पण फोटो.

लेख मनाला फार फार स्पर्शून गेला.

मलाही लहानपणी फोटो हा प्रकार खुप आवडायचा पण लेखात म्हटल्याप्रमाणे कॅमेरा घेण्यापासून ते फोटो डेव्हलप करण्यापर्यंत खुप खर्चीक असल्याने त्यावेळी विचारही करता येत नसे.

माझा एक काकांचा मुलगा सुरतला असतो तो फोटोग्राफर आहे. तो जेव्हा कधी सुट्टीत यायचा तेव्हा आमचे काही मोजके फोटो काढायचा (त्यावेळी रोल पुरवावा लागत असे) व पुढल्या फेरीत घेऊन यायचा. काय आनंद व्ह्यायचा तेव्हा. पासपोर्ट साईज फोटो पण जपून ठेवला जात असे तेव्हा. आम्हि शाळेच्या निरोपसमारंभाच्यावेळी साडी नेसून ग्रुप फोटो स्टुडीओत जाऊन काढला होता तसेच बारावीतही काढला होता . ते दोन्ही फोटो आता गायब आहेत. पण ते फोटो अजुन डोळ्यासमोर जसेच्या तसे आहेत. किती जपुन पाहीले जायचे फोटो. मध्ये हात न लावता, हाताच्या पंजात मावून किंवा चिमटीत पकडून.

आता माझे ३ कॅमेरे झाले. अगणीत फोटो काढलेत पण डेव्हलप नाही करत. हवे तेव्हा हवे ते फोटो कॉम्युटर, मोबाईलवर आपल्या फाईल्स काढुन पहाता येतात. पण ती जूनी डेव्हलप केलेल्या फोटोंची मजा, त्यांचा स्पर्श, त्यांचा तुकतुकीतपणा वेगळाच होता.

सणासमारंभाचे फोटोही किती कुतुहलाने व पुन्हा पुन्हा पाहीले जायचे.