निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना
निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ५: पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ६: फॉरेस्ट मॅन: जादव पायेंग
निसर्ग, पर्यावरण आणि आपण ७: काही अज्ञात पर्यावरणप्रेमी!
इस्राएलचे जल- संवर्धन
इस्राएल! एक छोटा पण अगदी वेगळा देश! जगातल्या विशेष देशांपैकी एक! इस्राएलच्या जल संवर्धनाची चर्चा करण्याआधी इस्राएल देशाला समजून घ्यावं लागेल. संपूर्ण जगभर पसरलेल्या ज्यूंचा हा देश आहे. एके काळी अमेरिकेपासून युरोप- आशियापर्यंत ज्यू पसरलेले होते आणि स्थानिक एतद्देशीय नेहमीच त्यांना 'देश नसलेला समाज' म्हणायचे. युरोप आणि रशियामध्ये तर ज्यूंना शत्रू म्हणून त्यांना देशातून बाहेर काढलं गेलं. विशेषत: दुस-या महायुद्धामध्ये ज्यूंना भोगावे लागलेले अत्याचार! साठ लाखांपेक्षा जास्त ज्यूंना तर नाझी जर्मनीने मारलं. ज्या समाजाचा स्वत:चा देश नव्हता आणि जो समाज वेगवेगळ्या देशांमध्ये पसरला होता; ज्यांची स्वत:ची ओळख नव्हती त्या समाजाचा १९४८ मध्ये एक नवीन देश जन्मला!
म्हणतात ना की, जर एखादी गोष्ट जर एका टोकाला पोहचली, तर त्यामध्ये अगदी विपरित प्रकारचे गुणधर्म येतात. शेकडो वर्षांपर्यंत ज्यूंनी संकटे, संघर्ष आणि आव्हानांचा सामना केला आणि त्यातून शेवटी त्यांचा देश उभा राहिला जो त्या समाजाच्या त्या स्थितीच्या अगदी उलट बनला- सशक्त, समर्थ आणि खंबीर ओळख असलेला! ज्याप्रमाणे एखादा अंगुलीमालसारखा जेव्हा क्रूरकर्मा आणि हिंस्र होतो, तेव्हा त्या टोकापासून त्याचं संत बनणं लांब नसतं. फक्त एक गोष्ट पाहिजे की त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टीला त्या टोकाच्या शेवटापर्यंत पोहचावं लागतं. जे लोक खरोखर श्रीमंत असतात; संपत्ती अर्जित करतात; तेच एक दिवस संपत्तीच्या मोहातून मुक्तसुद्धा होऊ शकतात. जसं पाणी जर १०० अंशापर्यंत तापलं असेल, तरच वाफ बनतं; कोमट पाण्यात ती क्षमता नसते. त्याच प्रकारे शेकडो वर्षांपर्यंत अत्याचार झालेल्या; यातना भोगलेल्या आणि जीससला सुळावर चढवण्याची शिक्षा दोन हजार वर्षे भोगावी लागलेल्या समाजाचे दिवस अखेर बदलले! १९४८ मध्ये इस्राएलचा जन्म झाला.
इस्राएल देशासमोर आव्हाने होती, आजसुद्धा आहेत, पण शेकडो वर्षांच्या संघर्षाने त्याला क्षमताही दिली. आधी कोळसा असलेला तप्त आगीतून पार पडून हिरा बनला. सर्व बाजूंनी शत्रूंनी वेढलेला देश. अगदी भारत- पाकिस्तानसारखी स्थिती. पण इस्राएल देशाचा पाया पक्का होता. ज्या लोकांची आजवर स्पष्ट ओळख नव्हती; एक भाषा नव्हती; ते एक झाले. आणि इतका काळ विजनवासात राहून एकत्र येणं ही वेगळी गोष्ट असते. त्यामुळे ह्या देशाचे नागरिक स्वाभाविक प्रकारे राष्ट्रभक्त बनले. आपल्या देशाला मानाने समोर आणणं हे त्यांचं जिव्हाळ्याचं स्वप्न होतं. जगभर वेगवेगळ्या भागांमध्ये अनुभव घेतल्यामुळे त्यांच्याकडे दृष्टी होती, कौशल्ये होती आणि जिद्दही होती. त्यामुळे इस्राएल नेहमी पुढे राहिला. एका शिस्तीच्या व्यवस्थेसह हा देश पुढे जात राहिला. त्यामध्ये अंतर्गत संघर्ष आणि भेद नगण्य होते. एखादी विचारधारा, एखादा संप्रदाय, जाती- पाती ह्या कारणांमुळे होणारे अंतर्गत मतभेद नगण्य होते. छोट्या देशांना नेहमीच हे फायदे मिळतात. इंग्लेंडसारखा छोटा देशसुद्धा संपूर्ण जगावर राज्य करू शकतो. असो.
इस्राएलच्या जल संवर्धनाचा विचार करूया. अतिशय कष्टाने ज्यूंना जी भूमी मिळाली, ती ६०% वाळवंत होती आणि उरलेली पडीक जमीन होती. पाण्याची समस्या सगळ्यांत मोठी होती. इथे देशाने आपलं कर्तृत्व पणाला लावलं. थेंब थेंब पाण्याचा योग्य वापर आत्मसात केला. हळु हळु जल संवर्धन वाढलं. अनेकदा जिथे खूप अडचणी असतात, तिथेच त्याच्यावरचे उपायसुद्धा विकसित होतात. इस्राएलमध्ये ड्रिप इरिगेशन विकसित झालं. अनेक दशकांच्या प्रयत्नांमधून इस्राएलने आपली सेंट्रलाईज्ड वॉटर मॅनेजमेंट प्रणाली विकसित केली. हळु हळु इस्राएलने नैसर्गिक पाण्यावर आपली निर्भरता कमी केली. वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर आणि रिसायकलिंग सुरू झालं. दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा शेतीत वापर सुरू झाला. इस्राएलला समुद्र किनारा असल्यामुळे समुद्राच्या पाण्याला शुद्ध करण्याची पद्धतही विकसित झाली. भूमिगत पाण्याचा इफिशिएंट वापर सुरू झाला. विहिरी बांधण्याच्या पद्धती व त्याचा वापर अधिक परिणामकारक प्रकारे सुरू झाला. नळाच्या जाळ्याद्वारे संपूर्ण देशभर पाणी पोहचवण्यास सुरुवात झाली. ह्या नळांमध्ये लीकेज प्रूफ पद्धती असल्यामुळे अख्खं पाणी वापरासाठी उपलब्ध झालं. अशी पीक- पद्धती विकसित झाली ज्यामध्ये कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळत होतं.
सार्वजनिक हिताने गार्डनिंग मर्यादित केलं गेलं. प्रत्येक ठिकाणी कमीत कमी पाणी वापरणारे शौचालय बंधनकारक केले गेले. पाण्याच्या वापराला मर्यादित ठेवण्यासाठी पाण्याचं बिल वाढवलं गेलं. त्यामुळे आज इस्राएल जल संवर्धनामध्ये जगातल्या अग्रणी देशांपैकी एक आहे. १९४८ च्या तुलनेमध्ये आज नैसर्गिक पर्जन्यमान अर्धं झालं आहे आणि इस्राएलची लोकसंख्याही दहा पट वाढली आहे. तरीही आज हा देश त्या स्थितीशी दोन हात करतो आहे. आव्हानं तर पुढेही राहतीलच. कारण क्लाएमेट चेंजमुळे सगळ्या गोष्टीच बदलत आहेत. ड्रिप इरिगेशनचे काही विपरित परिणामही झाले आहेत. ड्रिप इरिगेशन (ठिबक सिंचनामुळे) काही पिके अधिक वाढतात आणि अंतिमत: जमिनीमधल्या जास्त संसाधनांचा वापर करतात. पण असे अंडर करंटस असतातच. त्यामधूनच पुढे जात राहायचं असतं.
इस्राएलची शेतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज आपण भारतामध्ये विचारही करू शकत नाही, अशा पद्धती तिथे नेहमीच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या अतिशय कमी आहे. आज फारच थोडे लोक शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबून आहेत. शेती सामुहिक प्रकारे आणि देशाचं युनिट म्हणून केली जाते. अंतर्गत संघर्ष आणि तणाव नसल्यामुळे हे सहज शक्यही आहे. म्हणतात ना की, शांत समुद्र किना-यावर दर्यावर्दी तयार होत नाहीत. इस्राएलला सुरुवातीपासूनच इतक्या आव्हानात्मक स्थितीला सामोरं जावं लागलं, ज्यामुळे त्यांची देशाची धारणा अतिशय भक्कम आहे. आणि ह्या प्रगतीचा एक पैलू त्यांची कलेक्टिव्ह जीवनशैलीसुद्धा आहे. इस्रायली समाजात पारंपारिक कृषि समुदाय- किबुत्स असतात. त्यांनीही ह्या प्रक्रियेला बळकटी दिली. संपूर्ण देशाची जीवनशैली सामुहिक असल्यामुळे एका प्रकारचा कृषि साम्यवादसुद्धा इथे दिसतो. गार्डनिंग आणि व्यक्तिगत पाणी वापराचं रेशनिंग आहे. जेव्हा इतके कठोर आणि ठोस प्रयत्न केले जातात आणि जेव्हा कोणाला वाईट तर वाटणार नाही; कोणाच्या अधिकारांचं हनन तर होणार नाही अशा विचारांपासून दूर राहून सामुहिक हिताला महत्त्व दिलं जातं, तेव्हा असे परिणाम नक्कीच मिळतात.
इस्राएलच्या ह्या चमत्काराचा आणखी एक घटक म्हणजे ज्यूंचा मेंदू. ज्यू समाज अशा समाजापैकी आहे ज्यांनी सर्वाधिक नोबेल पारितोषक जिंकले आहेत. इतिहासात खूप शोषण झालं असेल, अत्याचार झाले असतील, पण वस्तुस्थिती ही आहे की, ज्यू समाज अतिशय सक्षम आहे. आज अमेरिकेमधल्या मुख्य बँकांचे खरे सूत्रधारही ज्यूच आहेत. विज्ञान आणि आर्थिक जगतात त्यांचा खूप प्रभाव राहिलेला आहे. पाच ज्यूंची एक गोष्ट आहे. आद्य ज्यू मोझेसने म्हंटलं होतं की, शरीरात डोकं सर्वांत महत्त्वाचं असतं. नंतर आलेल्या जीजसनी (जे मुळात ज्यूच होते) म्हंतलं की, हृदय सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर आले कार्ल मार्क्स. त्यांनी म्हंटलं की, पोटच सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. नंतर आलेल्या फ्रॉईडनी म्हंटलं की, पोटसुद्धा नाही, त्याच्या दोन इंच खालची जागा सर्वांत महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात शेवटी आईनस्टाईनने म्हंटलं- हे सगळं सापेक्ष आहे!
इस्राएलचं उदाहरण बघताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की, त्यांचं तंत्रज्ञान आणि पद्धती प्रेरणादायी नक्कीच आहेत, पण आपल्या देशामध्ये त्या अनिवार्य प्रकारे उपयोगी असतीलच असं नाही. आपला समाज, आपला देश आणि आपलं सगळं फ्रेमवर्कच पूर्ण वेगळं आहे. शिक्षणाचा दर्जा, समाजामधील अंतर्गत तणाव, विविधता, पारस्परिक मतभेद आणि इतका मोठा देश! ह्या कारणांमुळे तिथल्या गोष्टी इथे लागू करणं चुकीचं आहे. आणि तसंही प्रत्येक देश आणि समाजाला स्वत:ची वाट स्वत: पालथी घालायची असते. पण इस्राएलसारखे देश आपल्याला मार्गदर्शन नक्कीच देतात. पुढच्या लेखात अशाच काही देशांमधल्या पर्यावरणाच्या स्थितीवर विचार करूया.
पुढचा भाग: निसर्ग, पर्यावरण आणि आपण ९: जगातील प्रमुख देशांमधील पर्यावरणाची स्थिती
माझे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
6 Jun 2016 - 11:00 pm | एस
चांगले विश्लेषण. पुभाप्र.
6 Jun 2016 - 11:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेख ! उपयोगी लेखमाला !!
6 Jun 2016 - 11:51 pm | अशोक पतिल
जल सवर्धन हि खरोखर काळाचि व त्यातल्या त्यात भारताची अत्यंत महत्वाची गरज आहे. आज पाउस २५-३० वर्षा पुर्वी सारखा होत नाही.अनिर्बन्ढ जगंल तोड व आटोमोबाइअल चा अती राक्षसी वापर हे पण महत्वाचे कारण आहे, पण लक्शात कोण घेतो, ना सरकार ना नागरीक ?
7 Jun 2016 - 1:03 am | अर्धवटराव
ज्यु लोकांची आख्यायीका वाचली, पण इस्रायलनी पाणि समस्येवर काय उपाय केलेत हे नीट कळलच नाहि शेवटपर्यंत.
8 Jun 2016 - 9:51 am | मार्गी
वाचनाबद्दल सर्वांना धन्यवाद!
@अर्धवटराव जी- वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! मी हे लेख त्या कामांविषयी असे लिहित नाहीय. पर्यावरण हा मुख्य विषय आहे. त्या संदर्भात त्या कामांचं मला झालेलं आकलन मी समोर आणतोय. माझ्या नजरेतून. त्याला धरून इतरही अनेक बाबी मांडतोय. थिअरीटकल न लिहिता त्या थीमला धरून जनरल लिहितोय. त्या विषयांबद्दल शास्त्रशुद्ध माहिती हवी असेल तर ती इंटरनेटवर उपलब्ध आहेच. धन्यवाद.