बोट - अग्निशमन (Fire Fighting)

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
26 Mar 2016 - 11:30 am

असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही.

भूवासियांच्या जगात विभागीकरण (compartmentalization) खूप असतं. असायला हवं देखील. प्रत्येक जण प्रत्येकच काम करायचा प्रयत्न करू लागला तर कुठलंच काम ठीक होणार नाही. शिवाय जबाबदारीचं विभाजन करणं अवघड होईल. मात्र विभागीकरण शक्य असतं कारण तितकी माणसं उपलब्ध असतात. जर नसतील तर?

तूर्तास पाणी, झाडं आणि दिवे दूर ठेवू. सिर सलामत तो पगडी पचास! आग लागली तर?

आपल्या घरात वा बिल्डिंगमध्ये आग लागली तर प्रथम आपण विद्युतपुरवठा बंद करून आगीवर पाणी टाकून विझवायचा प्रयत्न करतो. जर ती आटोक्यात आली नाही तर बिल्डिंगच्या बाहेर पळ काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचतो आणि अग्निशामक दलाला फोन करतो. मग देवाचा धावा करतो.

पुढचं काम अग्निशामक दलाचं. आग विझवणं, आत जर कोणी अडकला असेल तर त्याला बाहेर काढणं हे काम त्यांचं. ते बाहेर काढलेल्याला बोलावलेल्या ऍम्ब्यूलन्स च्या ताब्यात देतात. आता त्याचा श्वासोश्वास सुरू करणं, भाजलेलं, कापलेलं, तुटलेलं बघणं आणि त्याला स्टॅबिलाइज करणं हे ऍम्ब्यूलन्समधल्या सेवकांचं काम. आपला जीव तर वाचलेलाच असतो. त्यामुळे आपल्या दृष्टीनी वाईटात वाईट परिणाम म्हणजे संपूर्ण बिल्डिंग जळून खाक होऊ शकते. पण जमीन तर तिथल्या तिथेच राहाते. जमीन काही आपल्याला सीतामाईसारखं गिळून टाकत नाही.

बोटीवरची परिस्थिती जरा वेगळी असते.

तिथे अग्निशामक दल आपणंच, ऍम्ब्युलन्स आपणच आणि शिवाय सूर्याजीने दोर कापलेले असतात. आग विझवली गेलीच पाहिजे. नाही विझवली आणि बोटीच्या stability ला धोका निर्माण झाला तर पायाखालची जमीन देखील गुल!

आधुनिक बोटींना खरं तर बुडण्यापेक्षा आगीचा धोका जास्त असतो. याचं कारण भरपूर मशिनरी आणि सामुग्री (equipment) कमीत कमी जागेत ठासून भरलेली असते. इतकी ठासून का भरतात? पैसे हे माल वाहण्यासाठी मिळतात. त्यामुळे जास्तीत जास्त जागा मालाला. बाकी सगळं कमीत कमी जागेत बसवायचं.

मशिनरी म्हटलं की उष्णता, घर्षण, विद्युत प्रवाह, तेल, वंगण सगळं आलंच. त्यामुळे ‘अग्निशमन’ हा आमच्या ट्रेनिंगचा एक प्रचंड महत्वाचा भाग आणि तो आयुष्यभर चालतो. प्रत्येक आग ही सुरू होते तेव्हां अर्थातच छोटी असते. इंजिन रूममध्ये सगळीकडे फायर एक्स्टिंग्विशर भरपूर प्रमाणात लावलेले असतात. मात्र ज्याला ही छोटी आग पहिल्यांदा दिसते त्यानी लगेच ती विझवायचा प्रयत्न करायचा नाही! हे वाचून आश्चर्य वाटलं असेल.

कोठलंही काम जर व्यवस्थित व्हायला हवं असेल तर ते करण्याची योग्य पद्धतच अवलंबायला हवी. आगीच्या बाबतीत ती पद्धत लक्षात ठेवायला सोपी व्हावी म्हणून ‘FIRE’ या शब्दाच्या स्पेलिंगला ती संलग्न केली आहे.
Find, Inform, Restrict, Extinguish
आग दिसल्यावर पहिल्याप्रथम बाकीच्यांना जागरूक करायचं. ठिकठिकाणी अलार्म पुश-बटण्स लावलेली असतात. ते दाबायचं. लगेच सगळीकडे घंटा वाजायला लागतात आणि कुठलं बटण दाबलं गेलं आहे हे देखील कळतं.

पुढची पायरी म्हणजे ती आग पसरणार नाही याची काळजी घेणे. जर एखाद्या विद्युत उपकरणाला आग लागली असेल तर त्याचा विद्युत पुरवठा बंद करणे, इंजिनला किंवा गळक्या तेलाला लागली असेल तर त्याचा इंधनपुरवठा बंद करणे, खोलीत असेल तर तिथे जाणारा व्हेंटिलेशन डक्ट आणि खोलीचं दार बंद करणे इत्यादी.

सरतेशेवटी आग विझवणे.

अशी असंख्य उदाहरणं आहेत की आग दिसल्यावर बाकीच्यांना बोलावण्याऐवजी स्वतःच विझवण्याच्या प्रयत्नात धूर फुफ्फुसात जाऊन लोक कोसळले आहेत. माहीत असूनही कित्येक जण अशी चूक का करतात?

याला दोनपैकी एक कारण बहुदा असतं.
१. त्या व्यक्तीच्या चुकीमुळेच ती आग लागलेली असते आणि दुसर्‍या कुणाला समजण्याआधी आपण ती बिनबोभाट विझवावी अशी त्याची इच्छा असते.
२. ‘छोटीशीच तर आहे. आपणच ती विझवू.’ हा फाजील आत्मविश्वास.

आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू बनवताना इतक्या प्रकारची रसायनं वापरलेली असतात की ती वस्तू जळल्यावर त्यातून कल्पनातीत विषारी वायू बाहेर पडतात. ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही.

आगीमध्ये जी काही जीवितहानी होते त्यातील फक्त दहा टक्के प्रत्यक्षात भाजून होते. नव्वद टक्के धुरामुळे श्वास कोंडून होते. बोटीवरील जवळजवळ प्रत्येक जागा – कॅबिन, इंजिन रूम, स्टोअर रूम्स, जिथे माल लादलेला असतो ते holds and tanks (घनरूप मालासाठी होल्ड आणि द्रवरूप मालासाठी टॅंक) वगैरे सगळे बंदिस्त असतात. त्यामुळे धूर लगेचच जमतो.

मी ज्यूनियर इंजिनियर असतानाचा अनुभव. माझ्या ड्यूटीवर एकदा आमच्या एअर कंडिशनिंग मशिनरीजवळ फायर अलार्म आला. ही खोली इंजिनरूमच्या बाहेर होती. खोलीचा विद्युत आणि हवेचा पुरवठा बंद केला. मी नेहमीप्रमाणे दरवाज्याला हात लावून अंदाज घेतला. अजिबात गरम नव्हता. (गरम असता तर अंगात अग्निरोधक कपडे [Fire Proximity Suit] घालून आणि हातात फायर होझ घेऊनच दोघांनी एकत्र प्रवेश करायचा असतो.) दरवाजा उघडला. आग अगदीच किरकोळ असणार कारण ती विझून देखील गेली होती. एक जळका रबरी व्ही बेल्ट जमिनीवर पडला होता. (व्ही बेल्ट - पिठाच्या गिरणीत जो पट्टा असतो तो ‘फ्लॅट’ बेल्ट. तसंच काम करणारा, त्याहून छोटा पण ‘व्ही’ आकाराचा). मी मागचा पुढचा विचार न करता खोलीत पाय ठेवला आणि श्वास घेतला मात्र! एखाद्या मुष्टियोध्यानी मला माझ्या गळ्यावर (Adam’s Apple वर) बुक्का मारल्यासारखं वाटलं! क्षणार्धात माझा श्वासच बंद झाला! माझ्या पायातली शक्ती गेली.

माझ्या मागेच माझा असिस्टंट (त्यांना आम्ही त्या काळी ‘तेलवाला’ म्हणायचो) होता. त्यानी मला पटकन काखांखाली हात घालून मागे ओढलं, जवळजवळ फरफटंत बाहेर डेकवर मोकळ्या हवेत नेलं. तिथे भडाभडा ओकल्यावर माझ्या जिवात जीव आला.

या कारणाने आमचा बोटीवरचा फास्ट फ्रेंड म्हणजे SCBA (Self Contained Breathing Apparatus). पाठीवर हवेचा सिलिंडर, चेहर्यावर घट्ट बसणारा मुखवटा (mask). मग बाहेर धूर असो नाहीतर विषारी वायु असो. आपली साधारण पंचवीस मिनिटांची हवा आपल्याबरोबर. (ज्यांनी स्कुबा डायव्हिंग केलेलं आहे त्यांनी साधारण अशा प्रकारची एक्विपमेंट वापरली असेल.)

वेगवेगळ्या परिस्थितीत आग विझवण्याचं वेगळं तंत्र असतं पण आपण Worst Case Scenario घेऊ या.

इंजिन रूममध्ये आग लागली आहे. इंजिनरूममध्ये धूर भरल्यामुळे ड्यूटी इंजिनियर आत अडकला आहे. तो फोनला उत्तर देत नाही त्या अर्थी बेशुद्ध पडलेला असणार.

आमची बहुतेक मशिनरी इंजिन रूममध्ये असली तरी आपात्कालीन लागणारी मशिनरी बाहेर सुरक्षित ठिकाणीच असते. मुख्य इंजिन आणि जनरेटर बंद झाल्यामुळे सगळा अंधार होऊन सगळं ठप्प होतं. इमर्जन्सी जनरेटर आणि इमर्जन्सी फायर पंप चालू करतो जेणेकरून उजेड, आग विझवायला पाणी आणि बाकी आपात्कालीन सर्व्हिसेस सुरू होतात.

बोटीवर काहीही इमर्जन्सी आली की घणाघाती घंटा वाजते. कितीही डाराडूर झोपलो असलो तरी ताडकन उठू अशी. सगळ्यांनी एकत्र जमण्याची एक सुरक्षित अशी ठरलेली जागा असते. त्या जागेला Muster Station असं म्हणतात. काय इमर्जन्सी झाली आहे त्याची माहिती तिथे सगळ्यांना दिली जाते, कोणी लापता आहे का हे समजतं आणि आता कोणी कोणी काय कामं करायची हे ठरवलं जातं. हे सगळं पटापट व्हावं म्हणून काही पद्धती असतात. उदा, प्रत्येकाच्या उभं राहाण्याच्या ठिकाणी जमिनीवर एक एक गोळा रंगवलेला असतो. हजेरी घ्यायची जरूर पडता कामा नये. जो गोळा रिकामा आहे तो casualty असणार.

इंजिन रूममध्ये नेहमी हवा खेळती राहाण्यासाठी चार किंवा पाच भलेमोठे पंखे बाहेरची स्वच्छ हवा आतमध्ये ढकलंत असतात. इंजिन रुममधली जुनी गरम हवा फनेलच्या मागच्या बाजूनी लूव्हर्स करवी (हे लूव्हर्स म्हणजे आपल्या बाथरूमच्या खिडक्यांना असतात तसेच, पण काचेऐवजी लोखंडी आणि दहा फुटी लांब असतात) बाहेर जात असते.

इंजिनरूममध्ये आग लागली की सर्वप्रथम हे पंखे बंद करून हवा आतबाहेर जाण्याचे मार्ग बंद केले जातात. (आगीला नवीन प्राणवायू मिळता कामा नये.) आता दोन कामं करायची आहेत. आत अडकलेल्या इन्जिनियरला बाहेर काढायचं आहे आणि आग विझवायची आहे. दोन्ही कामं एकाच वेळेस करण्याचा प्रयत्न करायचा नाही. (If you chase two hares, both will escape.) प्राथमिकता जिवाला. दोघांनी फायर सूट आणि हवेचे सिलिंडर चढवायचे, वॉकी टॉकी, विजेरी, कुर्‍हाड आणि फायर होज घेऊन इंजिन रूममध्ये प्रवेश करायचा. (तयार झालेला फायर फायटर हा ऍक्शन हीरोसारखा दिसतो. मात्र छातीत धडधड असते आणि सामानाच्या वजनामुळे दमछाक लवकर होते.) अडकलेल्या साथिदाराला शोधून काढायचं, पण त्याला वर कसं आणणार? इंजिनरूममधले जिने प्रचंड चिंचोळे आणि उंच (स्टीप) असतात. त्या जिन्यांनी बेशुद्ध व्यक्तीला उचलून आणणं कर्मकठीण! सबंद इंजिन रूमला एक चिंचोळा इमर्जन्सी एस्केप वरपासून थेट खालपर्यंत जातो. दिसायला आपल्या लिफ्टच्या शाफ्टसारखा. मात्र यात लिफ्ट नसून लांबच्या लांब शिडी असते. वरच्या टोकाला त्याला एक कप्पी लावलेली असते त्यातून एक मजबूत दोर खालपर्यंत लोंबकळत असतो. दोराच्या खालच्या टोकाला एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रेचर बांधलेलं असतं. नॉर्मल स्ट्रेचरमध्ये रोग्याला आडवं ठेवलं जातं. मात्र या स्ट्रेचरमध्ये एखाद्याला व्यवस्थित बांधलं की त्याला उभं उचलता येतं. एस्केपला इंजिन रूमच्या प्रत्येक मजल्यावर एक Fire proof दरवाजा असतो. जखमी साथिदाराला या एस्केपमध्ये घेऊन जायचं आणि स्ट्रेचरमध्ये बांधायचं. मग वरचे लोक कप्पी आणि दोरखंडानी त्याला वर ओढून घेतात आणि प्रथमोपचार सुरू करतात.

हे सगळं होईपर्यंत फायर फायटर्सच्या सिलिंडरांमध्ये पुरेशी हवा शिल्लक असली तर ते दुसर्‍या कामाला – आग विझवण्याच्या – लागतात. नाहीतर ते बाहेर येतात आणि नव्या दमाचे नवे दोन गडी आत प्रवेश करतात.

जरी मी म्हटलं असलं की सिलिंडरमध्ये पंचवीस मिनिटांची हवा असते, तरी प्रत्यक्षात वेगळंच घडतं. सराव करताना प्रतेक गोष्ट आपल्या नियंत्रणात असते. जेव्हां खरी वेळ येते तेव्हां आत गेलेल्या फायर फायटर्सना प्रचंड एकटेपणाची जाणीव होते. आपल्याच श्वासोश्वासाचा आवाज आपल्या कानात घुमू लागतो. (ज्यांनी स्कुबा डायव्हिंग केलं आहे त्यांना याचा थोडाफार अनुभव असेल. स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स – घेतला श्वास, बुड्बुडबुडबुडबुडबुड्बुड – सोडला श्वास!) आगीत धुरामुळे पुढलं नीट दिसत नाही त्यामुळे आपण बंदी झाल्यासारखं वाटायला लागतं (claustrophobia). आपल्याला इथे काही झालं तर आपल्याला मदत करायला कोणाला सहज येता देखील येणार नाही या जाणिवेनी कित्येक जण बिथरतात. श्वासोश्वास उथळ आणि जलद होतो आणि पंचवीस मिनिटांची हवा पंधरा मिनिटातच संपते. त्यात त्यांना धोका काही नसतो कारण संपण्याआधी पुरेसा वेळ एक धोक्याची शिटी येते. त्यानंतरही परत बाहेर जायला पुरेशी हवा सिलिंडरमध्ये असते. मात्र आत जाऊन काम करू शकले नाहीत तर जो बेशुद्ध पडलेला असतो त्याचा जीव वाचण्याची शक्यता कमी होते.

आता असं समजू या की आपण आत अडकलेल्या इंजिनियरला इमर्जन्सी एस्केपकरवी बाहेर धाडलं आहे पण आग फारच पसरली आहे आणि अति उष्णता आणि धुरामुळे आगीशी लढणं अशक्य झालं आहे. या परिस्थितीसाठी प्रत्येक बोटीवर एक हुकमी एक्का असतो. त्याला आम्ही म्हणतो Fixed Fire Fighting System.

यातही प्रकार आहेत पण आपण सगळ्यात पॉप्यूलर असलेली कर्बद्विप्राणिलवायू (CO2) सिस्टिम बघू या. द्रवरूप CO2चे सिलिंडर्स सुरक्षित ठिकाणी असतात. इंजिन रुमला अजिबात हवाबंद करण्यासाठी झडपा असतात. त्या बंद करून पुन्हा एकदा सर्व लोकांना मोजायचं. आता कोणीही इंजिन रूममध्ये नाही याची खात्री करून ह्या सर्व सिलिंडरांमधला CO2 धाडकन एकदम इंजिनरूममध्ये सोडायचा. आग कितीही भयानक असली तरी ती विझते. मात्र यासाठी एक म्हणजे इंजिन रूम व्यवस्थित बंदिस्त झालेली पाहिजे आणि सगळा CO2 दोन मिनिटात सुटला पाहिजे. त्यासाठी या दोन्ही सिस्टिम्सचा मेंटेनन्स अगदी व्यवस्थित पाहिजे.

या मधून एक फार महत्वाची शंका निर्माण होते. जर आग लवकर वाढली आणि आत अडकलेल्या माणसाला काढता आलं नाही तर CO2 सोडतात की नाही? अतिशय अतिशय अवघड निर्णय!

तो आत असताना CO2 सोडणं म्हणजे त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यासारखंच! जर “तो आत आहे तोपर्यंत मी काहीही झालं तरी CO2 सोडणार नाही” असं ठरवणं धोक्याचं ठरू शकतं. जर का आग वाढत वाढत तेलाला लागली तर बोटच बुडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे एकाच्या ऐवजी पंचवीस जणांचे जीव! कोठला निर्णय योग्य ठरेल हे कसं सांगणार? कोठलाही घेतलात तरी काही चांगलं आणि काही वाईट होणार हे अटळच आहे.

कोठलाही निर्णय घेतला तरी दोन परिणामांना सामोरं जायलाच हवं. एक म्हणजे अपघाताची जी चौकशी होईल तेव्हां तुमच्या निर्णयाची चिरफाड ही होणारंच! जो निर्णय तुम्ही प्रचंड स्ट्रेसखाली पाच मिनिटात घेतलात तो योग्य होता की नाही हे कित्येक एक्स्पर्ट्स एकत्र बसून तासन् तास चर्चा करून ठरवणार. दुसरा परिणाम म्हणजे त्यातून जे काही वाईट निष्पन्न झालेलं असेल त्याची बोच तुम्हाला राहाणारच. कदाचित आयुष्यभर.

“जर माझ्यावर अशी वेळ आली तर माझ्या निर्णयप्रक्रियेत मी कोठल्या गोष्टीला किती महत्व देईन?” याचा निर्णय कित्येक कॅप्टन आणि चीफ इंजिनियर आधीच करून ठेवतात. करावा देखील. शेवटच्या क्षणी ग म भ न पासून सुरवात नको.

या नोकरीमुळे काही सवयी अंगवळणी पडतात. थियेटरमध्ये आपल्या खुर्चीवर जाऊन बसलं की “अंधारात जर जवळच्या exit ला धावत पळंत जावं लागलं तर किती ओळी आणि किती खुर्च्या ओलांडायच्या आहेत” याचं मोजमाप नकळंत होतं. हॉटेलमध्ये आपली खोली पहिल्यांदा उघडण्याआधीच एकदा इमर्जन्सी एस्केप जिन्यापर्यंत चालत जाऊन पावलं मोजून येतो.

कोणी याला नकारात्मक विचार म्हणेल तर कोणी सकारात्मक. मात्र मी ते आयुष्यभर करंत राहीन आणि माझ्या विद्यार्थ्यांना ते शिकवत राहीन एवढं मात्र नक्की!

कथाkathaaप्रवासदेशांतरनोकरीसामुद्रिकलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

26 Mar 2016 - 11:44 am | उगा काहितरीच

एका वेगळ्याच विश्वाची सफर चालू आहे तर !धन्यवाद , स्विट टॉकरजी. जहाजावरील जीवन हे नुसते आरामशीर नसते हे कळत आहे या निमित्ताने . पुभाप्र ...

एस's picture

26 Mar 2016 - 11:44 am | एस

dainMdin jeevanaatahee upayukt maahitee.

बदामची राणी's picture

26 Mar 2016 - 11:54 am | बदामची राणी

एका वेगळ्या जगाची ओळख होतेय. तुमची लिहिण्याची शैली पण फारच interesting आहे.< कोठला निर्णय योग्य ठरेल हे कसं सांगणार?> धोनी म्हणाला होता त्याप्रमाणे, "निर्णय कप्तान घेत असतो. पण त्याची अम्मलबजावणी फलन्दाज किन्वा गोलन्दाज करत असतो. यश मिळाले तर कप्तानाच्या निर्णयाचे खूप कौतुक होते, पण अपयश आले तर मात्र त्याच निर्णयाबाबत कप्तानाच्या अकलेचे धिन्दवडे निघतात."

जगप्रवासी's picture

26 Mar 2016 - 12:01 pm | जगप्रवासी

आधी वाटायचं बोटीवरच लाइफ म्हणजे मस्त एकदम आरामदायी पण आता तुमची लेखमालिका वाचून मत बदलत चालल आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद नवीन जगाची ओळख करून देताय.

वाचताना घुसमटल्यासारखं झालं.....एकदम प्रत्ययकारी लिखाण!!

धन्यवाद!

विवेकपटाईत's picture

26 Mar 2016 - 1:07 pm | विवेकपटाईत

सुन्दर लेख , नवीन जगाची ओळख होतेय.

टवाळ कार्टा's picture

26 Mar 2016 - 2:55 pm | टवाळ कार्टा

हे फायर फाईटिंग शाळेपासून शिकवले पाहीजे...जरा काही झाले की लोक इतके पॅनिक होतात कि त्यामुळेच जास्त जीवीतहानी होते

खेडूत's picture

26 Mar 2016 - 3:19 pm | खेडूत

वेगळ्या विश्वाची सफर घडवल्याबद्दल आभार!
अजून वाचायला आवडेल- अन्य धोके, जसे चाचे, वादळे, दिशा भरकटणे वगैरे.
तसेच प्रवासाचे नियोजन कसे करतात? म्हणजे एका दौर्यात दहा बंदरांवर जायचे असेल तर कसे मार्ग ठरवतात?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Mar 2016 - 3:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

Traveling salesman algorithm =))

आवडलं लेखन.बोटीवरच्या जीवनाची वाचकांना आवड उत्पन्न करायचं अवघड काम करता आहात.

बोका-ए-आझम's picture

26 Mar 2016 - 3:41 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र!

भाऊंचे भाऊ's picture

26 Mar 2016 - 7:26 pm | भाऊंचे भाऊ

मला घुसमटण्याचि फार भीती वाटते अन लेख वाचताना उगा अस्वस्थ झालो. सुरेख माहिती.

प्रचेतस's picture

26 Mar 2016 - 8:17 pm | प्रचेतस

गुंगवून टाकणारे लेखन.
जहाजांबद्दलची माझी माहिती एलिस्टर मैकलीनच्या कादंबऱ्यांपुरतीच मर्यादित. तुमच्या लेखनाने मात्र सखोल माहिती तीही सुरेख लेखनशैलीत मिळत आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2016 - 9:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सेम हिअर. गोल्डन र्‍हांदेवु चा पंखा आहे.

जब्बर लेख स्वीटटॉकर :)!!!

अदि's picture

28 Mar 2016 - 6:00 pm | अदि

पण!!

प्रमोद देर्देकर's picture

26 Mar 2016 - 8:51 pm | प्रमोद देर्देकर

नेहमी प्रमाणेच उपयुक्त माहिती.
तुमच्या लिखाणाचा एक पंखा

तुषार काळभोर's picture

26 Mar 2016 - 11:06 pm | तुषार काळभोर

व दैनंदिन आयुष्यातही उपयुक्त ठरेल अशी माहिती.

विकास...'s picture

27 Mar 2016 - 1:23 pm | विकास...

उपयुक्त माहिती.. फायर फाईटिंग आणी प्रथमोपचार याची माहिती प्रत्येकाला पाहिजेच.
"एअर कंडिशनिंग मशिनरी" मधिल अनुभव यामधे श्वास बंद झाला तो कोणत्या वायुमुळे?.

स्वीट टॉकर's picture

27 Mar 2016 - 1:35 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,
धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना लेख आवडला हे बरं झालं. माहितीपर लेखांचा हा जरा लोचा असतो. तो interesting होतोच असं नाही.

बदामची राणी - तर मात्र त्याच निर्णयाबाबत कप्तानाच्या अकलेचे धिन्दवडे निघतात." प्रश्न धिंडवड्यात संपला तरी चालतं. स्पेन च्या उत्तरेला एक बोट बुडली. वादळात दोन तुकडे होऊन. त्यात कप्तानाची काही चूक नव्हती. बोट तुटण्याआधी कप्तानानी अतिशय शिस्तीत सगळ्यांना लाइफ बोटीत उतरवले आणि सगळे वाचले. पुढे या बोटीतलं तेल स्पेनच्या किनार्‍यावर पसरून चिकार हानी झाली. कप्तान ग्रीस देशाचा नागरिक होता. त्याला तुरुंगवास भोगायला लागला. त्यानी सगळ्यांना उत्तम तर्हेनी वाचवलं याला काहीही महत्व दिलं गेलं नाही. Such is life.

जगप्रवासी - जे पैसे देऊन प्रवास करतात, उदा. paying passengers, त्यांचा प्रवास अर्थातच मस्त आणि आरामाचा असतो. ज्यांना त्याच प्रवासाचे पैसे मिळतात, उदा. बोटीवरचे कर्मचारी, त्यांचा तोच प्रवास खडतर असतो. हा जगाचाच नियम आहे. समुद्रावर वेगळा नियम असायचं काहीच कारण नाही.
तुमचं नावच जगप्रवासी आहे. एकदा तरी क्रूझ शिपवर प्रवास कराच. धमाल असते.

टवाळ कार्टा - बरोबर आहे. पॅनिक होणं ही आपली मोठी कमजोरी. गर्दीत जी चेंगराचेंगरी होऊन शेकडो लोक हकनाक मरतात त्यालाही पॅनिक हे मुख्य कारण.

खेडूत - वादळांबद्दल झालेलंच आहे. चाच्यांबद्दल येईलच. ज्या दहा बंदरांना जायचं आहे ती एकमेकांपासून दूर असली तर निर्णयस्वातंत्र्य रहातच नाही. जे आधी येईल ते घ्यावंच लागतं. मात्र जर जवळ असतील प्रश्न उभा रहातो. ही दहा बंदरं कशी ठरली? या बंदरांचा माल मिळाला म्हणून ठरली का इथे जायचं ठरलं म्हणून तिथला माल मिळाला? ज्या क्रमानी बंदरं घ्यायची त्या क्रमानी माल लादण्याचा प्रयत्न असतो. (हा नेहमीच सफल होतो असं नाही कारण माल जिथे लादला जातो ती देखील कधी कधी दहा बंदरं असतात.) कित्येक वेळा पुढच्या बंदराचा माल काढून बाजूला ठेवायचा, या बंदराचा unload करायचा आणि आधी बाजूला काढलेला माल पुन्हा भरायचा अशी दुप्पट हमाली करावी लागते. हल्ली संगणकांमुळे हे नियोजन सोपं झालं आहे. पूर्वी डोकं फिरायचीच पाळी यायची.

कॅ जॅ स्पॅ - Traveling salesman algorithm =)) अर्थ समजला नाही.

अजया's picture

27 Mar 2016 - 2:28 pm | अजया

पुभाप्र

मुक्त विहारि's picture

28 Mar 2016 - 10:33 am | मुक्त विहारि

एका वेगळ्या विषयावरची माहिती उत्तमरित्या मिळत आहे.

वेगळ्याच विषयावरची माहिती...
धन्यवाद.

नाखु's picture

28 Mar 2016 - 10:54 am | नाखु

नुसते अतरंग नाही तर अत्रंगही उलगडणारी लेखमाला.. वयक्तीक आणि सामाजीक सुऱक्षेचे शिक्षण शाळेत पुरेसे दिले जात नाही.दिले तर कोणी गांभेर्याने घेत नाही. ं अंमलबजावणी तर दूरच . खाजगी कंपन्याच जरा आग्रही आणी किमान सुरक्षेबाबत जागरूक आहेत.

मंत्रालयाला लागलेल्या / (की लावलेल्या) आगीने अजून ही शिकले नाहीत त्यालाच शासन म्हणत असावेत.

नितवाचक नाखु.

पैसा's picture

28 Mar 2016 - 11:01 am | पैसा

किती वेगळेच आयुष्य आहे हे! खूप छान लिहिताय!

मृत्युन्जय's picture

28 Mar 2016 - 12:19 pm | मृत्युन्जय

अजुन एक सुंदर लेख. तुमच्या लेखनाने आमचेही अनुभवविष्व समृद्ध होते आहे :)

श्रीरंग_जोशी's picture

29 Mar 2016 - 12:25 am | श्रीरंग_जोशी

माहितीपूर्ण आणि अनुभवसंपन्न असे लेखन.

पुभाप्र.

रेवती's picture

29 Mar 2016 - 1:10 am | रेवती

वाचतिये.

ना.खू म्हणतात त्याप्रमाणे खाजगी कंपन्यांमधे अधुन मधुन फायर ड्रील्स होतात पण त्याला फार कोणी गांभिर्याने घेत नाही. आपल्यावर अशी वेळ प्रत्यक्षात कधी येणारच नाही याची खात्री असल्यासारखी (accidents happen to others ga.vi. theory) जनता अळम् टळम करत निवांत बाहेर पडत असते (मी सुद्धा आहे त्यात :( )

आता इथुन पुढे फायर ड्रील्स सिरिअसली घेणार.

अर्धवटराव's picture

29 Mar 2016 - 2:14 am | अर्धवटराव

पाण्यावरच्या प्रवासाचे अंतरंग रंजक भाषेत उलगडाहेत.
मस्त.

कौशिकी०२५'s picture

31 Mar 2016 - 11:52 am | कौशिकी०२५

आवडला लेख....पुभाप्र

वेल्लाभट's picture

31 Mar 2016 - 12:17 pm | वेल्लाभट

क्लास लिहिताय तुम्ही !
खूपच सही. अनोळखी विश्वाची सफर घडतेय, शिकायला मिळतंय....

अनेक धन्यवाद. येत राहूद्या अजून....

मधुरा देशपांडे's picture

1 Apr 2016 - 1:39 am | मधुरा देशपांडे

अत्यंत सोप्या भाषेतला उत्तम लेख. इमर्जन्सी घंटा, त्यानंतर घ्यायच्या ऍक्शन्स यासोबतच आताच्या काळात अशा काही सिस्टिम्स असतात का की ज्याद्वारे आग लागल्यावर त्या कंट्रोल सिस्टिम द्वारा एका ठराविक क्रमाने मशिन्स, इंजिन हे आपोआप बंद होतील आणि मोठी दुर्घटना टळू शकेल. यात सगळं काही बंद करून चालणार नाहीच. पण ऑटोमॅटिक फायर फाईटिंग सिस्टिम ने यात हानी कमी व्हावी आणि जास्तीत जास्त सुरक्षितता मिळावी म्हणून काही करता येतं का?
कुठलाही ऑइल प्लॅटफॉर्म किंवा एखादा केमिकल प्लांट यात हे सर्व अत्यावश्यक असते, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ते एका मर्यादेपर्यंत साध्य होऊ शकते पण त्यातही अनेक अपवाद असतात. शिवाय या प्रकारच्या यंत्रणे साठी होणारा खर्च देखील प्रचंड असतो. फक्त तसे काही या बोटींवर असते का किंवा त्यावर प्रयत्न चालू आहेत का याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.

स्वीट टॉकर's picture

6 Apr 2016 - 1:40 pm | स्वीट टॉकर

सर्व जण,
पुन्हा धन्यवाद.

इडली डो सा - जनता अळम् टळम करत निवांत बाहेर पडत असते यामुळे ऑफिसला/कारखान्याला असलेले दरवाजे, पायर्या वगैरे पुरेशा वाटतात. जेव्हां खरी आग लागते तेव्हां सगळे धूम पळतात आणि त्याच दरवाज्यात चेंगराचेंगरी होते. पायर्यांवरून लोक धडपडतात आणि मागचे त्यांच्यावर अडखळतात आणि दिल्लीच्या थियेटरमध्ये झाली तशी हकनाक जीवितहानी होते.

तुम्ही यापुढे ही ड्रिल्स सीरियसली घेणार हे चांगलंच आहे. मात्र ह्या अळम टळम वृत्तीवर अतिशय सोपा उपाय आहे. वरिष्ठांनी घोषणा करायची की 'ड्रिलमध्ये आपण इतक्या सेकंदात/मिनिटात सुखरूपपणे बाहेर पडू अशी अपेक्षा आहे. जोपर्यंत ही वेळ आपण गाठू शकत नाही तो पर्यंत आपण पुन्हा पुन्हा ड्रिल करणार आहोत.' आकार कसाही असो. सगळे पळतात हरणाप्रमाणे!

मधुरा देशपांडे - आग लागल्यावर मशिनरी आपोआप बंद करण्याची सिस्टिम करणं अगदीच सोपं आहे. मात्र बोट ही स्थिर नसून चालत असल्यामुळे वेगळे प्रश्न उभे राहातात. जर मशिनरी बंद झाल्यामुळे बोटीवरचं नियंत्रण सुटलं तर ती दुसर्या बोटीवर, बंदरात जेट्टीवर, आपली आपण खडकांवर वगैरे आपटू शकेल. 'एक्झॉन वाल्डेझ' नावाची बोट अलास्का मध्ये खडकावर आपटून किती प्रचंड हानी झाली हे सगळ्यांना आठवत असेल. आगीमुळे जितकं नुकसान होऊ शकेल त्याच्या कित्येक पट नुकसान हकनाक मशिनरी बंद करून होऊ शकतं. त्यामुळे तो निर्णय माणसाच्या हातातच ठेवणं बरं!

मात्र आग लवकर पसरू नये म्हणून एक सिस्टिम असते. त्याला म्हणतात 'हायपर मिस्ट सिस्टिम'. जर साधं पाणी प्रचंड दाबानी एखाद्या बारीक भोकातून पलिकडे ढकललं तर त्याचे अत्यंत छोटे तुषार (मिस्ट) तयार होतात. हे तुषार आगीतील उष्णता शोषून घेण्यात प्रवीण असतात. शिवाय पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे मशिनरी चालू असेल तरीही तिचं नुकसान नगण्य होतं. ही सिस्टिम आग विझवू शकत नाही. मात्र लागलेली आग लवकर पसरू देत नाही. त्यामुळे जिकडे आग लागण्याची जास्त शक्यता आहे, उदा. बोटीचं मुख्य इंजिन, जनरेटर इंजिन, बॉइलर, कचरा जाळण्याचा इन्सिनरेटर, तेल शुद्धिकरणाचं मशीन (याला आम्ही 'फ्युएल ऑइल प्युरिफायर' म्हणतो) या सगळ्यांवर ही सिस्टिम लावलेली असते. ही संपूर्णतः स्वयंचलित असते. ऑइल टँकर्सवर ही सिस्टिम लावणं कायद्यानी बंधनकारक असतं.

मधुरा देशपांडे's picture

6 Apr 2016 - 5:50 pm | मधुरा देशपांडे

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद. हेच जाणून घ्यायचे होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2016 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

साध्या शब्दात रोचक व उपयोगी माहिती देत आहात ! पुभाप्र.

गामा पैलवान's picture

2 Jun 2016 - 9:57 pm | गामा पैलवान

स्वीट टॉकर,

एकंदरीत मोठ्या नौकेवरची भडकलेली आग म्हणजे एक महाभयानक प्रकरण असते. इथे एक अनुभव आहे : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2015/10/blog-post_9424.html

या अनुभवानंतर संबंधित माणसाच्या पत्नीचा अनुभव इथे आहे : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2015/11/blog-post_522.html

या अनुभवाचे श्रद्धापूर्वक केलेले अध्यात्मिक विवेचन इथे आहे : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2016/03/blog-post_62.html

आ.न.,
-गा.पै.

स्वीट टॉकर's picture

3 Jun 2016 - 11:29 am | स्वीट टॉकर

गा पै - धन्यवाद!
कुठलीही गोष्ट वाचल्यावर तुमचा त्याच्यावर आणखी शोध आणि अभ्यास असतो. ही फारच उत्तम सवय आहे.

गामा पैलवान's picture

3 Jun 2016 - 9:33 pm | गामा पैलवान

धन्यवाद स्वीट टॉकर! शोधाभ्यासास पूरक वातावरण हे प्रशासक, संपादकमंडळ व मिपाधनी यांच्या अथक परिश्रमांमुळेच लाभते.
आ.न.,
-गा.पै.