संक्रांत कशासाठी

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जनातलं, मनातलं
14 Jan 2009 - 7:36 am

संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते.

मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. तेव्हा आपण आपल्या वाड-वडिलांकडून कळालेल्या काही पैलुंना येथे मांडू यात का?

आमच्या आजोबांनी तसेच आईने सहजपणे सांगितलेल्या तर निरिक्षणातून लक्षात आलेल्या या काही बाबी...

संक्रांतीपासून दिवस मोठा व्हायला लागतो. म्हणजेच उन्हाळ्याची चाहूल लागू लागते. हा काळ म्हणजे रबीच्या पिकांच्या काढणीचा, पारंपारिक फळांच्या बहराचा. शेतात ओंब्या, हुरडा अन टहाळ चापायचा, पेरुच्या बागांमधून हुंदडायचे, बोरा-चिंचा-कवट असा रानमेवा खुश्शाला गिळायचा... अन रात्रीच्या थंडीत शेकोटीच्या उबीने शाल पांघरुन गप्पा-टप्पा करत आंथरुन जवळ करायचे. अशा या आनंदाच्या काळात आपल्या पूर्वजांनी हा सण व त्यात करायच्या गेष्टी फार विचार करून नेमल्या.

या काळात आपल्याकडे हवा मंद वाहत असते. पाऊस नसतो तशी उघड्यावर उभे राहिल्याने उन्हाने अंगाची होरपळही होत नसते. म्हणूनच पतंग उडवायची मजा खरे तर याच मोसमात. रबीचा हंगाम हातात आल्याचा आनंदोतस्व साजरा करायला मग पतंगाचा पर्याय आहे की नाही मस्त?

लहान मुलांना सर्व प्रकारच्या पारंपारिक फळांची आवड लागावी तसेच रखरखीत उन्हाळा येण्यापूर्वी या सगळ्या फळांना खाऊन सर्वांची तब्येत चांगली व्हावी म्हणून लहान मुलांचे बोर नहाणाची प्रथा अस्तित्वात आणली. बोर नहाणात मुलांना मौज येते व ती ही फळे आनंदाने लपेटायला लागतात. त्याच बरोबर भाज्याही सर्वांनी खाव्यात हा ही संदेश द्यायचा होता. तर 'मला आमुक भाजी नाही आवडत' असे नखरे करणार्‍यांना सुद्धा नैवेद्याच्या-प्रसादाच्या नादाने का होईना पण डझनभर वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून खायला लावण्यासाठी मिश्र भाजीचा दंडकही आणला गेला.

सुगडे (मातीचे नवे कोरे माठ/मडके) आणून त्यात शेतात असलेल्या ओंब्या, टहाळ, बोरे, चिंचा, वगैरे टाकून त्याची पुजा करायची. काही दिवसांनी या सुगड्यांत पाणी भरुन ठेवायचे. म्हणजे उन्हाळ्यापर्यंत या सुगड्यांचे पाझरणे थोडे कमी होऊन ती दैनंदिन वापरासाठी उपयोगात येतात. त्यात संक्रांतीच्या दिवशी रानमेवा व पिकांचे नमुने एक संकेत म्हणून भरुन ठेवायचे की देवा या सुगड्यांना उतरंडीमध्ये असेच भरलेले राहू दे. तसेच या सुगड्यांमध्ये भाज्या, विड्याची पाणे, साठवल्यास बरेच जास्त काळ टिकत. कदाचित तो संदेशही असावा.

आवा लुटण्याचा हा असाच एक अफलातून प्रकार. ताट, चमचे, वाट्या, बांगड्या अशा छोट्या-छोट्या भेटवस्तू हळदी-कुंकवासोबत सुवासिनी एकमेकिंना देतात. या सगळ्या कामाच्या नवनवीन वस्तू अनपेक्षित पणे घरात वापरायला मिळाल्याने त्यांना दररोजच्या कामात थोडा बदल व उत्साह जाणवत असावा. तसेच हातात आलेल्या पैशाने घरातल्या वापरासाठी नवीन वस्तू याव्यात. व्यापार उदीमही वाढावा. असाही दृष्टीकोन असवा असे वाटते. जाणकार अधिक माहिती देतीलच.

असा हा मकर संक्रांतीचा विषेश सांस्कृतिक सण तुम्ह सर्वांना आनंदाचा जावो.

तुम्हाला माहित असलेल्या संक्रांतीबाबतच्या इतर सांस्कृतिक बाबी पण येऊ द्यात...

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानराहणीप्रकटनसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

सुनील's picture

14 Jan 2009 - 7:49 am | सुनील

संक्रांतीचा सुरेख वेध घेणारा लेख. तीळगुळाचे लाडू, गुळाच्या पोळ्या आदिंच्या आठवणी करून दिल्यात!

संक्रांतीपासून दिवस मोठा व्हायला लागतो
हे बरोबर नाही. उ. गोलार्धात २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो तो २१ जूनपर्यंत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भास्कर केन्डे's picture

14 Jan 2009 - 8:12 am | भास्कर केन्डे

धन्यवाद सुनीलराव!

आपण चूक ध्यानात आणून दिलीत. आमच्या गावाकडे संक्रातीपासून दिवस मोठा होतो असे सर्वजन बोलतात त्यामुळे पाठ्यपुस्तकात शिकलेल्या पेक्षा ते जास्त लक्षात राहिले... :)

आपला,
(गाववाला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jan 2009 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळ्यात उशीरा सूर्योदय आणि सगळ्यात लवकर सूर्यास्त २२ डिसेंबरला होत नाहीत. पण दिवसाची लांबी सगळ्यात कमी २२ डिसेंबरला असते.
सध्या वेळ नाही आहे, दोनेक दिवसात विस्तृत विवेचन लिहिते.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

धनंजय's picture

14 Jan 2009 - 8:38 am | धनंजय

माझ्या लहानपणी घरी कन्नड मुलुखातली एक रीत मोठी गोड होती. म्हणजे खरेच "गोड" - ती म्हणजे साखरेची खेळणी बनवणे. याच्या लाकडी साचांना अच्चू म्हणतात, आणि बनलेल्या साखरेच्या खेळण्यांनाही अच्चूच म्हणतात.

साखरेचा पाक घट्ट होत-होत त्याची साखर होऊ लागली की लाकडाच्या साच्यांमध्ये तो ओतायचा. हे मोठे कौशल्याचे काम आईचे होते. खेळण्यातली नक्षी नाजूक असली तर पाक अगदी घट्ट होण्यापूर्वी साच्यात ओतावा लागे - पण त्या विशिष्ट क्षणापेक्षा थोडासुद्धा आधी ओतला, तर पाक साच्याच्या भेगांतून बाहेर सांडे, थोडादेखील उशीर केला तर साचा भरण्याआधी पाक गोठून जाई.

मला मात्र काय - ती खेळणी खाण्याचीच मजा वाटे!

पक्या's picture

14 Jan 2009 - 1:41 pm | पक्या

छान लेख. आवडला.
त्यात अजून २ गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात.
नवीन लग्न झालेल्या सुनेचे तिळवण तिला हलव्याच्या दागिन्यांनी सजवून करतात. शिवाय जावयांचे संक्रांतीचे प्रथमवाण ही खास असते.

धनंजयांनी साखरेच्या खेळण्यांची छान आठवण करून दिली. माझी आजी देखील लहानपणी आम्हा नातवंडाना साखरेची खेळणी बाजारातून आणून देत असे. आम्हा मुलांना या साखरेच्या खेळण्याचं फार अप्रूप वाटत असे. खेळायला खेळ आणि खेळून झाल्यावर गोड खाऊ असा दुहेरी फायदा.

भौगोलिकदृष्ट्या २२ डिसे. सर्वात लहान दिवस हे बरोबर आहे. पण संक्रातीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते असेच लहानपणापासून ऐकले आहे. उत्तरायणात सूर्य थोडा थोडा उत्तरेला सरकत असल्याने उ. गोलार्धात दिवस मोठा होत जातो.

संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.

भास्कर केन्डे's picture

14 Jan 2009 - 8:13 pm | भास्कर केन्डे

नवीन लग्न झालेल्या सुनेचे तिळवण तिला हलव्याच्या दागिन्यांनी सजवून करतात. शिवाय जावयांचे संक्रांतीचे प्रथमवाण ही खास असते.
अरे हो की... विसरलोच हे मुद्दे. कदाचित जावाई म्हणून मी कोणत्या सणांना सासरवाडीत न गेल्याने झाले असेल. आठवण करुन दिल्याबद्दल आभार! आपण हा मुद्दा जरा विस्ताराने सांगितला असतात तर अजून आनंद झाला असता.

धनंजयांनी साखरेच्या खेळण्यांची छान आठवण करून दिली.
हेच म्हणतो. आमच्या कडे (मराठवाड्यात) ही प्रथा एवढी रूढ नसल्याने राहून गेली. धनंजयांचे आभार!

आपला,
(नम्र) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर's picture

15 Jan 2009 - 12:49 pm | विसोबा खेचर

संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद,

आम्हाला तरी संक्रांत म्हटलं की हे एवढंच आठवतं! :)

तात्या.

भास्कर केन्डे's picture

15 Jan 2009 - 8:27 pm | भास्कर केन्डे

तात्या, भूक लागलीये वाटतं... बाकी भा पो बरं का...! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2009 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भास्करराव लेख आवडला !!!

संक्रातीनंतर तीळ-तीळ थंडी कमी होत जाते असेही म्हणतात.

या वर्षी संक्रातीच्या विशेष अफवा नाही आल्या. जावयाने सासूला साडी घ्यायची, ननंदांनी भावजयांना बांगड्या भरायच्या, ...वगैरे इत्यादी.
जागतिक मंदीमूळे अफवांना या वर्षी मंदी आली वाटते :)

-दिलीप बिरुटे

वात्रट's picture

15 Jan 2009 - 8:40 pm | वात्रट

भास्कर ...
तुमचा लेख वाचुन सकाळ मध्ये येणारया लेखांची आठवण झाली...:)
लेख आवडला...